हल्लीच्या जगात पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात आढळणारा, परंतु ज्याची शास्त्रीय माहिती खूपच कमी जणांना असते असा एक विकार म्हणजे थायरॉईडचा विकार. ही थायरॉईड म्हणजे नक्की काय? ती प्रत्येक माणसाला असते का? थायरॉईडमध्ये बिघाड नसताना ही ग्रंथी नक्की काय कामे करते? थायरॉईडचे विकार का होतात त्यांची लक्षणे काय असतात? त्यांची कारणे कोणती? त्यांच्या उपचारात आयुर्वेदाची कशी मदत होते?
आपल्या शरीरात अंतःस्रावी आणि बहिस्रावी अशा दोन प्रकारच्या ग्रंथी असतात. यापैकी ज्या ग्रंथीचे स्राव कोणत्याही नलिकेशिवाय सरळ रक्तामध्ये स्रवण होऊन कार्य करतात, अशा ग्रंथीना अंतःस्रावी ग्रंथी म्हणतात व या ग्रंथीच्या स्रावांना हार्मोन्स असे नाव आहे. अशा अनेक ग्रंथीपैकी एक ग्रंथी म्हणजेच थायरॉईड ग्रंथी. थायरॉईड ही ग्रंथी मानवी शरीरामध्ये असते. घशाच्या मुळाशी मानेमध्ये पुढील बाजूस असणार्या या ग्रंथीला फुलपाखरा प्रमाणे दोन्ही बाजूस एक असे लोबन असतात. तरूण व्यक्तीमध्ये या ग्रंथीचे वजन 20-25 ग्रॅम असते. शरीरात अत्यंत महत्त्वाचे कार्य करणार्या या ग्रंथीला रक्तपुरवठा देखील भरपूर असतो. ही ग्रंथी थायरॉक्सीन ट्रॉय आयडोथायरॉनीन आणि कॅल्सिटोनिन नावाचे हार्मोन उत्पन्न करते.
थायरॉईडची कार्ये
थायरॉईड ग्रंथीच्या थायरॉक्झीन या हार्मोन्समुळे शरीरातील विविध क्रियांना प्रेरणा देण्याचे महत्त्वाचे कार्य होत असते. शरीराच्या प्राकृतिक वाढीसाठी, विविध पेशीच्या विभागणी आणि पनिपक्वतेसाठी महत्त्वाचे कार्य याच स्रावामुळे होत असते.
शरीरातील ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया थायरॉईडमुळे वाढते. पिष्टमय पदार्थाच्या चयापचयावरील क्रियेमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. रक्तातील कोलेस्ट्रॉल (मेदघटक) उपयोगात आणण्याचे म्हणजेच तो रक्तात वाढू न देण्याचे कार्य थायरॉक्सीनमुळे होते. हाडातील कॅल्शियम,फॉस्फरस काढून टाकण्याची क्रिया थायरॉक्सीनमुळे होते. किडनीच्या कार्यावरील परिणामामुळे लघवीचे प्रमाण वाढते. स्त्रियामध्ये अंगावरील दूध वाढविण्याचे कार्य होते. हृदयाची गती वाढते. माणसाच्या विविध मानसिक भावना चांगल्या व्यक्त होण्यासाठी थायरॉक्सीन आवश्यक असते. मज्जासंस्थेला म्हणजेच मेंदूला उत्तेजित करण्याचे, शरीरातील विविध स्नायूंची कार्यक्षमता वाढविण्याचे कार्य थायरॉक्सीन करते. थोडक्यात शरीराची वाढ, हालचाल, चपळपणा, उत्साह या गोष्टी थायरॉईडवर अवलंबून असतात.
हायपो थायरॉईडीझम
रक्तातील थायरॉक्सीनचे प्रमाण (T3, T4) कमी झाल्यामुळे निर्माण होणारी ही एक अवस्था आहे. ही अवस्था ज्यावेळी जास्त प्रमाणात असते व जास्त काळ टिकते त्यावेळी त्यास मिक्सीडिमा असे म्हणतात. स्त्रियामध्ये वयाच्या पस्तीशीनंतर हा विकार जास्त प्रमाणात आढळतो. शरीरात आयोडिनची कमतरता निर्माण झाल्यामुळे थायरॉईड ग्रंथीच्या क्षयामुळे अथवा सूज आल्यामुळे यासारख्या कारणामुळे साधारणपणे हा विकार होतो.
लक्षणे
हायपोथायरॉईडीझमची सुरूवात झाल्यावर हळूहळू विविध लक्षणे उत्पन्न होतात. थकवा, कंटाळा,शरीराला जडत्व येऊन वजन वाढू लागे, गळयाच्या मध्यभागी फुगीरपणा येतो, थंडी सहन होत नाही. चेहरा फुगलेला चकचकीत दिसू लागतो, डोळयाखाली फुगीरपणा येऊन चेहर्यावर सूज दिसू लागते. कालांतराने मान, खांदे, पाठ, हात, पाय यावरही सूज जाणवू लागते, घाम कमी येतो, केस गळू लागतात, छातीत कधीकधी दुखते, हृदयाचे ठोके कमी पडतात व हृदयाचे कार्य मंदावते, हृदय व फुफ्फुसाच्या आवरणात पाणी साठू लागते. मानसिक नैराश्य जडपणा आलेला असतो, अंगात वेदना जाणवतात, चमका येतात, हाताची बोटे मनगट दुखते, पायाला गोळे येतात, हातपाय जखडतात, स्नायूतील ताकद कमी होते, आवाज जड व घोगरा होतो, संडासला साफ होत नाही, पोट जड होते, काही वेळा पोटात पाणी होते. रक्ताची टक्केवारी कमी होते, स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या तक्रारी, अति रक्तस्राव, वंधत्व, संभोग इच्छा कमी होणे हे परिणाम दिसतात. शरीराची व बुद्धीची वाढ कमी होते, रक्तातील चरबीचे प्रमाण (कोलस्ट्रॉल) वाढते.
हायपर थायरॉईडझम
कोणत्याही कारणाने थायरॉईड ग्रंथीचे कार्य वाढल्यामुळे रक्तातील थायरॉक्झीन किंवा ट्राय आयडा-थ्रानॉनीच 3 या स्रावांचे प्रमाण वाढल्याने ही अवस्था निर्माण होते. प्रामुख्याने गॉयटर या विकारांमुळे तसेच काही वेळा थायरॉईडच्या कर्करोगामुळे, ही अवस्था येत असते. काही वेळा म्हणजेच थायरॉईड ग्रंथीच्या सुजमुळे किंवा थायरॉईड हार्मोनची औषधी जास्त घेतल्यामुळे देखील फक्त स्रावांचे प्रमाण वाढून लक्षणे उत्पन्न होतात.
कारणे व लक्षणे
स्त्रियांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते. तरूण अवस्थेमध्ये अधिक्याने दिसणारा हा विकार अनुवंशिकपणे घडण्याची प्रवृत्ती आढळते. कोणत्याही प्रकारचे मानसिक ताणतणाव हे देखील काहीवेळा कारण असते. गळयाच्या मध्यभागी ग्रंथींप्रमाणे सूज येणे हे प्रमुख लक्षण असते. अंगात ताप किंवा उष्णतेची संवेदना, वजन कमी होणे, थकवा निरूत्साह, जास्त घाम येणे, ऊन नकोसे वाटणे ही लक्षणे जाणवतानाच मन अस्वस्थ चिंताग्रस्त बनते. शरीरातील प्रत्येक संस्थेवर या विकाराचा परिणाम होऊन वेगवेगळी लक्षणे निर्माण होतात तसेच प्रत्येक व्यक्तीत या लक्षणांचे प्रमाण कमी अधिक असू शकते. रक्ताभिसरण संस्थेवरील परिणामामुळे नाडीचे ठोके जास्त पडतात व झोपेत देखील ही गती कमी होत नाही. रक्तदाब जास्त राहतो. गरम वातावरणात चेहरा गरम व लाल होतो. हृदयाची धडपड अचानक वाढते. डोळयावरील दुष्परिणामामुळे डोळे बाहेर आलेले दिसतात. दृष्टी अंधूक होते. काही वेळा डोळयांना सूज येते. भुकेचे प्रमाण खूपच वाढलेले असते. तरीदेखील वारंवार होणारे उलटी अथवा जुलाब, अपचन यामुळे जास्त खाऊनसुद्धा शरीराचे वजन मात्र कमी होत असल्याचे आढळते. अंग खाजणे, तळवे लाल होणे, केस पातळ होणे, नडगीवरील सूज या त्वचेवरील लक्षणांबरोबरच हातपाय कापतात याचे प्रमाण वाढल्यास कोणतीही गोष्ट नीट स्थिर पकडता येत नाही. स्नायूंची ताकद कमी होऊ लागते व कालांतराने थकवा वाढून स्नायूंची झीज झालेली आढळते. काही वेळा वारे गेल्याप्रमाणे हात-पायात ताकद राहत नाही. घाम येण्याचे प्रमाण जास्त असते. केस प्रमाणापेक्षा लवकर पांढरे होतात. वरील लक्षणांनी त्रस्त झालेल्या या व्यक्ती, अवस्था नैराश्य, त्रासिकपणा, चिडचिड यांनी त्रस्त झालेल्या असतात. काही स्त्रियांत थायरॉईडमुळे मासिक स्रावांचे प्रमाण कमी झालेले असते तर काही स्त्रियांत यामुळे वंध्यत्वही आलेले असते.
आयुर्वेद उपचार
आयुर्वेदीय दृष्टिकोनातून विचार केल्यास शरीरातील मेद धातूमध्ये विकृती निर्माण झाल्याने उत्पन्न होणार्या विविध लक्षणांशी तसेच गळगंडू या विकाराची थायरॉईडच्या विकाराचे साधर्म्य आढळून येते. हायपो थायरॉडिझम अथवा हायपर थायरॉडिझमचे निदान झाल्यानंतर साधारणपणे थायरॉईड ग्रंथीच्या हार्मोन्समध्ये संतुलन निर्माण करणारी विविध रासायनिक औषधे सुरू केली जातात. काही रूग्णांना यानंतर बरे वाटू लागते. काही जणात तक्रारी थोडया कमी होतात, पण पूर्ण बरे वाटत नाही. रासायनिक औषधांचा डोस वाढवला तरी काही वेळा वेगळेच त्रास सुरू होतात, अशा वेळी या रूग्णांना आधुनिक औषधांच्या जोडीला पूरक म्हणून आयुर्वेदीय उपचारांचा खूपच चांगला उपयोग होतो. तसेच थायरॉईडच्या विकारात उत्पन्न झालेले विविध उपद्रव दूर करण्यासाठी देखील आयुर्वेदीय औषधे उपयोगी पडतात. विकार जास्त असल्यास आयुर्वेदातील स्नेहल (आयुर्वेदीय तेलाने मसाज), स्वेदन (विविध प्रकारचे औषधी शेक), वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोचन या पंचकर्मांचा काही काळ उपयोग खूपच फायदेशीर आढळून येतो.
हायपो थायरॉडिझम या विकारासाठी मिरी, पिंपळी, पुनर्नवा, गोखरू, दारू हरिद्रा, नींब, कुटकी, कुंभा, अर्जुन, गुग्गुळ, त्रिफळा, हरिद्रा, असाणा इ. वनस्पतीज तसेच ताम्रभस्म, वंगभस्म, मंडूभस्म, शीलाजीत इ. खनिज औषधी हायपर थायरॉईडीझम या विकारात कोरफड, शतावरी, गुळवेल, कांचनार, चंदन वाळा, अश्वगंधा, कवचबीज, ब्राम्ही, जटामांसी, आवळा, माका, बला, दशमुख, गुग्गुळ इ. वनस्पतीज औषधांचा आणि रौप्यभस्म, माक्षिक भस्म, त्रिवंण भस्म, शृंग भस्म, गोदंती भस्म, प्रवाळ भस्म मौक्तिक भस्म, इत्यादींच्या एकत्रीकरणातून विविध गोळया वापरल्या जातात. थोडक्यात थायरॉईडचा विकार उत्पन्न झाल्यावर सुरूवातीपासूनच आधुनिक औषधांबरोबरच आयुर्वेदीय उपचार सुरू केल्यास विकार लवकर नियंत्रित होण्यासाठी तसेच त्यामुळे होणारे विविध दुष्परिणाम टाळण्यासाठी म्हणून आयुर्वेदीय उपचारांचा निश्चित चांगला उपयोग होतो.