निसर्गोपचार आणि शिवाम्बू
माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई
शरीरविज्ञान आणि चिकित्साशास्त्रांचा कितीही विकास होऊ द्या, आम्ही नैसर्गिक अशा विलक्षण शरीररचनेला समजून घेतले आहे म्हणून दावा करू शकत नाही.
गांधीजी देहाला आत्म्याचे मंदिर मानत होते. ते म्हणायचे की, शरीरसुद्धा मंदिराइतकेच पवित्र असले पाहिजे. याच मानवी जीवनास ओळखून ते निसर्गोपचाराकडे आकर्षित झाले होते.
मी केंव्हाही कोणतीही काळजी केली नाही. कारण जगामध्ये जे काही होत आहे, ते सर्व काही ईश्वर आयोजित आहे. शांत मन खोल झोप आणते, तेंव्हाच शारीरिक थकवा दूर होतो.
शरीर निरोगी ठेवण्याकरता मानव समाजात पाच शास्त्रे प्रचारात आहेत.
१. आधुनिक शास्त्र (अलोपॅथी)
२. आयुर्वेद
३. होमिओपॅथी
४. हकीम अथवा युनानी
५. निसर्गोपचार व योगशाखा
पहिली चार शास्त्रे शरीर निरोगी ठेवण्यासाठी जितकी उपयोगी असावयास हवी होती, तितकी नसतात आणि बहुसंख्य आजारी माणसे या चार शास्त्रांच्या आधाराने प्रवास करतात. पाचवे शास्त्र मानवास आजारी पडू न देण्याचा प्रवास घडविते. कोणीसुद्धा मनुष्य या शास्त्राचा थोडा जरी अभ्यास करील, तरी तो स्वत: आपणहून आपल्या तब्येतीवर उपचार घेईल.
निसर्गोपचार चिकित्सेमध्ये गुंतागुंत, क्लिष्ट भाग नसून साधनसामग्रीची आवश्यकताही नाही. श्रीमंत अथवा गरीब, सर्व माणसे या उपचाराच्या सान्निध्यात येऊ शकतात. मला गेल्या बासष्ट वर्षांपासूनचा याचा अनुभव आहे.
‘निसर्गोपचाराकरता शरीररचनेची जाणीव करून घेणे आवश्यक नाही, या मताचा मी आहे. तथापि, अपघात्याला इलाजाकरता या गोष्टीची उणीव असू नये, हे ठीक आहे.
जर हे ठीक समजून घ्याल, की रोग काय आहे, तर त्यावर त्याचा उपचार त्वरित मिळून जाईल. वास्तविक शारीरिक यंत्रणा तीन कार्यांत गुंतलेली आहे.
(१) फाजील घाण बाहेर फेकणे.
(२) ग्रहण केलेले अन्न पचविणे.
(३) दररोज खाल्ल्या जाणाऱ्या नवीन आहाराने वाढलेल्या घाणीस बाहेर ढकलणे.
रोग केवळ एकच आहे आणि तो म्हणजे शरीरातील घाणीचे एकत्रीकरण होय. ज्यांची ही शक्ती कार्यान्वित आहे, ते निरोगी आहेत व बाकीचे रुग्ण आहे. शरीर आपल्या हद्दीतून घाणीस काढून टाकण्याचा जेंव्हा प्रयास करते, तेंव्हा त्यालाच आपण रोग समजतो.
जेंव्हा अस्वस्थता जाणवू लागते, तेंव्हा अन्नग्रहण बंद केल्यास शरीरातील सर्व घाण बाहेर फेकणे शरीरास सुलभ जाईल. दरम्यान, बाष्पस्नान, एनिमा, जादा पाणी पिऊन उलटी (वमन) करणे वगैरे पूरक उपचार पुरेसे आहेत. सर्दी, ताप, संग्रहणी वगैरे बंद होऊन जातात. मुदतीचा ताप, क्षय, कॅन्सर असे मोठे आजार सहसा जवळ येत नाहीत. या शारीरिक उत्सर्जित क्रियेस उत्तेजित करण्याकरता शरीरयंत्रणेचा भक्कमपणा तुमच्या मर्यादित व्यायामपद्धतीवर अवलंबून आहे. थोडी जरी अस्वस्थता वाटली व जर तत्काळ शारीरिक निसर्गोपचार योग्य रितीने पाळण्यात आले, तर महाभयंकर व्याधीतून सुटका होऊ शकते. शस्त्रक्रियेची वेळ देखील निघून जाईल.
इंग्रजीत एक म्हण आहे, की ‘ए मॅन अँट फॉर्टी इज आयदर ए फिजीशिअन ऑर ए फूल (‘A man at forty is either a physician or a fool’) याचा अर्थ असा की, चाळीस वर्षांच्या वयानंतर मनुष्य एक तर डॉक्टर तरी बनेल, नाही तर तो मूर्ख तरी असेल. मनुष्य जर समजून घेऊन जगेल, तर त्याला शरीरातील आंतरिक क्रिया समजत राहतील, तत्संबंधी तो पथ्यही पाळेल. पण जर त्याने दक्षता नाही घेतली तर तो बुध्दुच सिद्ध होईल.
मुख्यत्वेकरून शरीरस्वास्थ्यास उचित आहारच आधार आहे. लहानपणी चार वेळा, तरुणपणात तीन वेळा, त्यानंतर साठ वर्षांपर्यंत दोन वेळा व साठ वर्षांनतर एक वेळ जेवण घेणे हे विशेष महत्त्वाचे आहे. जेवतेवेळी थोडी भूक शिल्लक ठेवली पाहिजे. जे काही खाल, ते खूप चावून गिळले पाहिजे. जणू काही पाणी गिळत आहोत असे ते झाले पाहिजे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे. “ड्रिंक युवर सॉलिड्स अँन्ड इट युवर लिक्विड्स' (‘Drink your solids and eat your liquids’) याचा मथितार्थ तोच आहे. जेवणात मसाला खूप कमी वापरल्यास बरे.
सृष्टीने मानव शरीरामध्ये आजारपणाचे इलाजसुद्धा ठेवून दिले आहेत आणि ते आहे 'मानव मूत्र'. सन १९५७ पर्यंत मी या उपचारापासून वंचित होतो. दरम्यान, एक जुने गांधीभक्त आणि माझे सहकारी, स्व. रावजीभाई मणीभाई पटेल यांनी मला मानवमूत्रावर लिहिलेले आर्मस्ट्रांगचे ‘वॉटर ऑफ लाईफ’ (‘Water of Life’) नावाचे पुस्तक वाचण्यास दिले. ते वाचून मला मानवमूत्राच्या उपयोगाची जाणीव झाली. नंतर शोधताना कळून आले की, हजारो वर्षांपासून आमच्या देशातील साधू याचा उपयोग करीत आले आहेत. पुढे खोल अभ्यास केल्यावर हेही आढळून आले की, ग्रीसमध्ये आजपासून दोन हजार वर्षांपूर्वीच्या ग्रंथांमध्ये या उपचारांचे समर्थन आहे. हिंदूंच्या ग्रंथांमध्येसुद्धा गोमूत्राची पवित्रता सांगितलेली असून, धार्मिक क्रियेच्या अवधीत गोमूत्र-प्राशनाचे आदेश आहेत. मला याचा लाभ झाला. योगीसुद्धा हे उपचार करीत असत. ‘शिवाम्बूसंहिता’ संस्कृतमध्ये आहे, जी मी वाचली आहे. हा इलाज मी स्वतःवर करून पाहिला आहे आणि काही रुग्णांनीसुद्धा माझ्या सल्ल्याने याचा प्रयोग केला आहे. याने मधुमेह, कॅन्सर, क्षय, इत्यादी रोग बरे झाल्याचे मी पाहिले आहे. दात, कान, डोळे, त्वचा इत्यादींसाठीसुद्धा हे जालीम औषध आहे.
विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की, हा इलाज लोकमान्य का नाही? समाजामध्ये याबाबत घृणेची भावना आहे, हेच कदाचित त्याचे प्रमुख कारण होय.