देहक्लेशाचा मुळारंभ मलावरोध
जगाच्यापाठीवर तुम्ही कुठंही असलात, कोणत्याही प्रसंगी चिंतातुर झालात, बालपण, तरुणपण वा म्हातारपण यापैकी कोणत्याही अवस्थेत असलात, तरी अहर्निश देहरक्षणासाठी तुमच्या पाठीशी उभ्या असलेल्या 'शक्ती'ला तुम्ही काय म्हणाल...? या शक्तीला कुणी ‘स्वमूत्र’ म्हणतं, तर कुणी 'शिवाम्बू'.
‘शिवाम्बू’ हा शब्द जवळजवळ रोज लघवी करणाऱ्यापर्यंत आता परिचयाचा झाला आहे. आज त्याची फोड करून ओळख करून देण्याचं कारण उरलेलं नाही.
‘मूत्रातून आरोग्यप्राप्ती’ ही कल्पना विचित्र वाटते खरी; परंतु याचा कमी-अधिक अनुभव समाजात प्राचीन काळापासून घेतला जातो आहे. अन्यथा 'कापल्या करंगळीवर मुतण्याची' लोकभाषा अनेक भाषांत प्रचलित झालीच नसती...!
निसर्गातून निसर्गाकडे जाणाऱ्या भारतीय संस्कृतीनं सर्व जगाचं लक्ष आपल्याकडे खेचलं असलं, तरी ब्रिटिशांच्या दीडशे वर्षांच्या सहवासामुळे चित्तभ्रम झाला आहे. आपल्या मलमूत्राची आपणच घृणा करू लागलो आहोत.
दिवसभरात एखादं अशुभ घडलं, तर आपण लगेच म्हणतो, ‘आज कोणाच तोंड पाहिलं कळत नाही!
पण 'प्रथमं मलदर्शनम्' हा शुभ वाक्प्रचार म्हणून ज्या संस्कृतीनं जतन केला होता, जिथं लोक आपल्या मलाचंच दर्शन घेऊन दिवसारंभ करीत, त्यांना आज स्वमुत्रापानाची इतकी घृणा का आहे, कळत नाही.
मलमूत्रानं जर का टाळेबंदी पुकारली, तर काय होईल? अक्षरश: टाळा पसरून धापा टाकीत कुंथण्यापलीकडे हाती काही उरणार नाही. माणसाला अनंत पर्याय शोधावे लागतील. म्हणजे नैसर्गिक मलविसर्जन किती महत्त्वाचं आहे, हे तेंव्हाच कळून येईल.
आज विज्ञानाने प्रचंड समृद्धी आणली असली, तरी प्रत्येकाचाच प्रातर्विधी मात्र आज अडखळू लागला आहे.
कोणा साहित्यिकाला एकदा कुणीतरी विचारलं, “तुमचा सुखाचा काळ कोणता?” साहित्याची अभिरुची असलेल्याकडून काही रसभरित विशेष गोष्ट प्रकाशात येईल, ही विचारणाऱ्याची धारणा होती... पण त्यांनी चक्क सांगितलं, “जेंव्हा मला शौचाला साफ होतं, तो दिवस मला भाग्याचा आणि सुखाचा वाटत असतो!”
विज्ञानानं यंत्राकरवी पोटातलं पाणी हलू न देता, बसल्या बसल्या बटणं दाबून जीवनपट हलवून सोडणाऱ्या 'रिमोट कंट्रोलर'ला जन्माला घातलं, तरी मानवी स्वास्थ्याचा यानंच की काय, पण र्हास होत चालला आहे.
कष्टानं सृजन झालेल्या, कष्टासाठी असलेल्या, कष्टाने विकसित होणाऱ्या, कष्टावर अधिष्ठित, नैसर्गिक मानवी देहाचा अशा कष्टचोर प्रवृत्तीनं पूर्णत: र्हास होतो आहे. कष्टाचे धक्के पोटाच्या आतड्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आता पार संपली आहे. म्हणून तर कष्टाशिवाय आतडी निष्क्रिय होऊ लागली आहेत. कष्टाच्या धक्क्यांवर हिंदकळणाऱ्या आतड्यातील अन्नरसाच्या लाटा कष्टाच्या अभावी मलविसर्जन करीत नाहीत.
दोन-चार दिवसांनी जबरदस्तीनं सरकत आलेल्या मैल्याला साहजिकच जो गंध असतो, तो बाहेर पडताना शेजार्यांनाच काय स्वत:लासुद्धा बेचैन करील.
“माणूस हा कष्टांसाठी नसतोच मुळी” हे घोषवाक्य रूढ होऊ पाहत आहे. समृद्धीनं देहकष्टाला अप्रतिष्ठा ठरविल्यामुळे नजीकच्या काळात सर्वांगीण स्वास्थ्याची अपरिमित हानी झाली आहे.
आज ७० ते ८० टक्के पांढरपेशा लोकांना या मलावरोधानं ग्रासलं आहे. सकाळचा प्रातर्विधी ही आज जणू एक प्रसवपीडा झाली आहे.
सर्व शरीरक्लेशाचा मुळारंभ मलावरोधानं होतो. जावकीपेक्षा आवक अधिक होत गेली की, गोदाम भरावं तसा साठा वाढतो व अवास्तव वजन वाढतं, तणाव वाढतो. बसणं, उठणं कठीण होतं. डोकेदुखी, मंद-दृष्टी, जडत्व, भूक मंद होणं, सांधेदुखी, कफ, पोटदुखी, पोटफुगी, छातीत चमक, कमरेत गोळा, मान आखडणं सर्व अस्वाभाविक कृती घडून जीवन दुःसह होतं.
माणसाचं पोट हे केंद्रस्थानी आहे. म्हणूनच की काय, पोटोबा हा आता सगळ्याचं केंद्र झाला आहे. सर्वश्रेष्ठ ठरला आहे. 'खाणं' हा शब्द इतका लोकरुचियुक्त झाला आहे, की भ्रष्टाचारात 'अखाद्य' वस्तूसुद्धा चक्क 'खाल्ली' असा लोकप्रयोग होताना दिसतो. काय खावं, कुठं खावं, किती खावं, कसं खावं, याचा धरबंध न राहिल्यानं अवास्तव पोटाचं दर्शन होऊ लागलं आहे.
माणसानं भुकेच्या निसर्गसंकेतानुसारच रोजचे खाद्यपदार्थ स्वीकारायला हवेत. भुकेची संवेदना, तुडुंब पोट भरून मालवू नये.
शरीरातील ज्ञात-अज्ञात अंतर्बाह्य व्यवस्था सुरळीत चालावी, म्हणून 'शिवाम्बू' हे अलौकिक शक्तीचं नैसर्गिक रसायन माणसानं घ्यायला हवं. निदान पोटात गर्दी जाणवते, तेंव्हा तरी घ्यायला हवंच हवं.
तरतूद निसर्गाची
माणूस आणि निसर्ग यांच्यामध्ये जे अतूट नातं आहे, ते नातं आजचा मनुष्य पार विसरलाच आहे. 'माणूस' हा निसर्गाचं अपत्य आहे. आजचा मनुष्य या जन्मदात्या माउलीपासून बराच दूर गेला आहे. निसर्गाशी तसं आमचं कोणतंच सोयरसुतक नाही, असं म्हणायला तो आता निर्ढावला आहे. वर आणखी निसर्गमाउलीला मागासलेली, जंगली अथवा असंस्कारित संबोधून झगमगाटाला कवटाळत आहे.
माणूस आजच्या इतका मानसिकदृष्ट्या दु:खी, कष्टी, शिवाय रोगग्रस्त यापूर्वी कधीही नव्हता. विज्ञानाला पाठीशी घेऊन तो आज कितीही वेगानं गती घेत घेत निघाला असला, तरी त्याची ही वाटचाल खड्ड्याच्या दिशेनं तर नसेल ना? परंतु एक ना एक दिवस विवेकपूर्ण माणूस लवकरच जागा होईल. ही शक्यता आता वाढली आहे. पुन्हा लवकरात लवकर या निसर्गपुत्रानं पुन्हा एकवेळ जन्मदात्रीच्या पोटाशी बिलगण्याचं औचित्य दाखवावं.
निसर्गाचा क्रोध आणि वात्सल्य याची जाणीव विसरलेल्या मानवाला विज्ञानसुद्धा जेव्हा थिट नि तोकडं पडतं, तेंव्हाच त्याला निसर्गाच्या शक्तीचा प्रत्यय येतो. निसर्गाची वात्सल्याची भूमिका माणूस का विसरला? का विसरला की, तुम्ही जन्मण्याआधी तुमच्या माउलीच्या स्तनात दूध भरून तो तुमच्या आगमनाची प्रतीक्षा करीत राहिला होता? तुमचं लालन-पालन नीट व्हावं, संगोपन व्हावं, म्हणून पाच महातत्त्वांच्या सहयोगानं बनविलेल्या अखंड विश्वाची योजना शरीर प्रकृतीला अनुसरून त्यानं केली?
ऋतुमानाप्रमाणे पानं-फुलं-फळं, भूक, तहान, रोग, दुःख, यापासून बचाव व्हावा म्हणून हर ठिकाणी निसर्गानं केलेली पूर्वनियोजित योजना, व्यवस्था, देहाबाहेरील जग व देहांतर्गत नित्य-अनित्य चाललेल्या या घडामोडी हे सर्व पाहूनही तुम्हाला आपण निसर्गाशीच जोडलेलो आहोत याची कल्पना येत नाही का?
ज्यानं चोच दिली, त्यानं त्या चोचीला अनुरूप चाराही दिला आहे, दाणाही दिला आहे. इतर कोणताही मनुष्येतर प्राणी अशी निसर्गबाह्य कृती अवलंबीत नाही. आपल्या मर्यादित जागेत गुण्यागोविंदाने नांदत आहेत. चोचीला अनुरूप चरत आहे.
तसा मानवाचा अनुरूप चारा कोणता? दाणापाणी कोणतं? त्याची बागडण्याची मर्यादित जागा कोणती? - याची शहानिशा या प्रगत म्हणवणाऱ्या मानवानं करायला हवी. त्याचप्रमाणे रोगाकडून आरोग्याकडे नेणार्या, रोग निवारणाऱ्या स्वाभाविक निसर्गदत्त शक्तीस प्रोत्साहित न करता तिला दुर्लक्षून, डावलून विलक्षण नसता प्रयत्न करणं हे चुकीचं नव्हे काय?
वर्ष-सहा महिन्यांच्या बालकाच्या हाती दिलेल्या मनगटी घड्याळाचं जे व्हावं, तेच मानवी देहाचं पण होत आहे. बिघडलेली घड्याळं परीक्षणाकरता, दुरुस्तीकरता शिल्लक तरी राहतात; पण माणसांची मात्र स्मशानात राख होताना दिसते. मानवाच्या मृत्यूचं नेमकं कारण न कळल्यामुळे सबळ पुराव्याअभावी औषधांसह शस्त्रक्रिया पुन्हा चालूच राहतात. वास्तविक वृद्धत्व हीच केवळ नैसर्गिक विसर्जित होण्याची प्रक्रिया आहे. या नैसर्गिक परंपरेचा विकास करणे हीच मानवाची प्रगती ठरायला हवी. आज म्हातारपण अनुभवण्यापूर्वीच अकाली निरोप घेणाऱ्यांची टक्केवारी वाढली आहे. हा केवळ अखाद्य पदार्थ व कृत्रिम औषधं यांचा परिणाम असून, यामुळे जीवन अकाली संपुष्टात येताना दिसतं आहे.
झाडाच्या निर्मितीचं कारण फळ आहे की बीज...? फळ हा बीजाचा परिणाम असून, बीज हे झाडाचं कारण आहे. झाडाची मुळं हा बीजाचा विकास आहे. आपल्याला झाड नष्ट करायचं असेल तर केवळ फळं तोडून चालेल का? पानं तोडून भागेल का? नाही! तर झाडाच्या मुळासह ते उखडावं लागेल. परिणामांना उखडण्यात काय हशील? कारणांना उखडायला हवं. हाच नियम सृष्टीचा घटक असणाऱ्या मानवालाही लागू होतो. मानवी देहातील रोग, पीडा, क्लेश हा वास्तविक परिणाम आहे. आधुनिक अँलोपॅथी ही चिकित्सा केवळ परिणामावर इलाज करते. त्यामुळे ती केवळ अपूर्ण आहे असं नव्हे, तर औषधातील अन्य विषांचा शरीरावर हळूहळू घातक परिणाम करण्यास कारणीभूत ठरते. तेंव्हा जी चिकित्सा परिणामाच्या कारणांवर हल्ला करते, ती सर्वश्रेष्ठ ठरायला हवी होती. निसर्गोपचार हा केवळ कारणमुळावर हल्ला चढवतो. म्हणूनच त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकून राहतात.
शल्यचिकित्साही व्याधीच्या कारणांचं समूळ उच्चाटन करू शकत नाही. उलट, कलम केलेल्या वनस्पतीप्रमाणे अन्य त्रास वाढताना दिसतो. नियम सृष्टीच्या सर्व घटकांत सारखेच दिसून येतात, हे लक्षात घ्या.