शिबाम्बू सभा
शिवाम्बूबद्दल औत्सुक्य असणाऱ्या बंधू-भगिनींनो, मी राजकारणातला मनुष्य आहे. आपली कल्पना झाली असेल की, मी हव्या त्या विषयावर बोलतो; परंतु माझ्यासंबंधी असणारा गैरसमज दूर व्हावा म्हणून मला हे सांगितलं पाहिजे की, मी का बोलतो आहे. शिवाम्बू चिकित्सेबद्दल चांगली माहिती प्रमुख वक्ते श्री. जगदीश बी. यांनी सुरस भाषेत कथित केली आहे.
ही औषधी म्हणजे गोरगरिबाला एक पैसा खर्च न करता अनेक रोगांतून मुक्त होण्याचे मुक्तद्वार आहे.
या अशा मार्गाचा उपचार, प्रसार गेल्या काही दिवसांपासून डॉ. शशी पाटील महामंडळाच्या वतीने करीत आहेत. त्यांचे आभार मानावे तितके थोडे आहेत.
आतापर्यंत लोक इकडे बघताना कुचेष्टेनं बघत होते. पण ही गर्दी पाहिल्यानंतर वाटतं की, कुचेष्टेचं रूपांतर कौतुकात व आज ना उद्या त्याचंही रूपांतर प्रतिष्ठेत झाल्याशिवाय राहणार नाही. (टाळ्यांचा गजर) अर्थात, टाळ्याच याची साक्ष देत आहेत. (हशा...) ज्यांनी टाळ्या वाजवल्या, ते तरी शिवाम्बुपान करीत असले पाहिजे. (परत हशा...) ...अशा प्रकारची ही व्याधिमुक्त करणारी औषधी मिळाली आहे, तेंव्हा मी तिकडे कसा वळलो, हे सांगतो.
१९६७ ते १९६९ या दोन वर्षांच्या दरम्यान माझी तब्येत बिघडली. पुण्याचे सुप्रसिद्ध धन्वंतरी एच. व्ही. सरदेसाई यांनी मधुमेह व रक्तदाब असे दोन रोग तुमच्या शरीरात घर करून आहेत म्हणून सांगितलं. या दोन रोगांची ज्याला खात्री झाली, त्याला तिसरा हार्ट डिसीज (भिऊन) व्हायला काही हरकत नाही. १८ फेब्रुवारी१९७१ रोजी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी कॉलेजमध्ये माझं व्याख्यान होतं. त्यावेळी मला हार्ट-अँटॅकही आला. सुदैवानं कोल्हापुरातले सर्व हृदयतज्ञ एकत्र जमलेही. मला फक्त अस्वस्थ होत होतं. माझ्या शरीरापासून हातपाय कुऱ्हाडीनं तोडून काढलेत की काय, असं होत होतं. डॉ. एस. के. कुलकर्णी, डॉ. चिटणीस म्हणू लागले की, पेशंट सीरियस आहे. मिरजला न्यावं लागेल. मी सकाळी व्याख्यानाला आलो आणि दुपारी तीन वाजता मिरजेच्या दिशेनं माझा प्रवास सुरू झाला. अँम्ब्युलन्स, नर्स, ऑक्सिजन सिलेंडर, सलाइनसह प्रवास चालू झाला. या तीन दिवसांमध्ये पृथ्वीलोक आणि मृत्युलोक यांच्या दरम्यान प्रवास चालू होता; परंतु मृत्युलोकाचे दरवाजे ठोठावून मी परत आलो. आत्मविश्वास ढळला होता. तीन-चार महिने रस्त्याने जात असता म्हैस, बस वगैरे अंगावर येते की काय अशी अवस्था होत होती.
नंतर शिवाम्बुपान करणारी काही मंडळी मला भेटली. तुम्ही जर शिवाम्बुपान करू लागलात, तर तुम्हाला बरं वाटेल म्हणाली. पण प्रत्येकाला घृणा असतेच. मी ऐकत होतो, पण प्रत्यक्षात मात्र आणत नव्हतो. बर्याच लोकांच्या सांगण्यामुळे एक उत्सुकता निर्माण झाली होती. जशी काहींच्यात आज झाली असेल. (हशा...)
गोमूत्राबाबतचे आपले संस्कार मूळचेच असल्यामुळे मनाला त्याचं पावित्र्य वाटतं. पण गोमूत्राऐवजी म्हशीचं मूत्र प्या म्हटलं, तर आपण जसं पिणार नाही, आणि स्वत:चं म्हटलं, तर मग नाहीच नाही. अशाप्रकारची मन:स्थिती माझी पण झाली होती. पण अशातच एक गृहस्थ आले. त्यांना मधुमेह झालेला होता. ते म्हणाले, माझा मधुमेह शिवाम्बुपानानं गेला. मी फक्त ऐकलं. माझं औत्सुक्य आणखी वाढलं. (हशा...)
असं करत करत विचारात आठ महिने गेले. १९७२ सालच्या नागपूरच्या आमदार अधिवेशनासाठी गेलो. तिथआमदार-निवासात आपली इकडची माणसं काही येत नाहीत, तेंव्हा प्रयोग करायला ही जागा मला बरी वाटली. (हशा...)
थोडा विचार केला आणि पहाटे थोडं लवकरच उठलो, लघवी केली. बाकीचं काही केलं नाही, फक्त तोंडात घेतलं आणि फेकून दिलं. (हशा), असंच दोन-तीन दिवस केलं....आणि चार दिवसांनंतर एक घोट आत नकळत उतरला आणि मग खळखळून तोंड धुतलं. दोन दिवसांनंतर दोन घोट गेले आणि असं करत करत त्या नागपूरच्या एक महिन्याच्या मुक्कामामध्ये एक दोघा-तिघांनी सुरुवात केली. पण एकच काय...? (प्रचंड हशा.)
एवढ्या मुदतीत मी कुणाला बोललो नाही. कोणाला सांगितलं नाही. जोपर्यंत गुण येणार नाही, तोपर्यंत सांगणं इष्टही असत नाही. उद्या सोडावं लागलं, तर बकवा कशाला? (प्रचंड हशा)
प्रत्येक महिन्या-दोन महिन्याला माझं रक्त, लघवी तपासून घेत होतो. माझी केस अगदी वाईट होती. म्हणजे माझ्या लघवीत तर साखर होतीच आणि रक्तातही साखर होती. दोन-चार-सहा महिन्यांनंतर दोन्हीतल्या साखरेचं प्रमाण कमी होत असलेलं दिसून आलं आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, पण माझ्या लघवीतली शुगर आणि रक्तातली शुगर अगदी नॉर्मलला आली. प्रचिती आल्यावर मी सांगत सुटलो. अर्थात हे ऐकल्यावर पंचववीस एक आमदारांनी माझ्याकडून ही दीक्षा घेतली. त्यांनी माझा हा गंडा बांधला (प्रचंड हशा...)
आणि म्हणून मी म्हणतो, भारताचे पंतप्रधान श्री, मोरारजीभाई यांच्याकडून याला राजमान्यता आली आणि आमच्या आमदारांमुळे याला लोकमान्यता आली. (हशा...)
आता मधुमेहाच्या बरोबर इतर काही पीडा जाण्यासंबधी विचार केला नव्हता. हार्ट-अँटॅक आल्यानंतर मला जी नाना प्रकारची अँन्टीबॉयोटिक इंजेक्शन दिली गेली होती, त्यांच्या साइड इफेक्टमुळे लघवी साफ होत नव्हती. लघवी तिथल्या तिथंच घरंगळायची. डॉक्टरांनी सांगितलं की, कदाचित प्रोस्टेड ग्लॅन्ड वाढली असण्याची शक्यता आहे. तेंव्हा ऑपरेशन करायला पाहिजे.
त्याशिवाय माझा एक दात हलत होता. खाताना आडवा पडायचा. तोही उभ्या स्थितीत सिमेंट लावल्यासारखा घट्ट झाला.
डोळ्याच्या संबंधात मी पुस्तकात वाचलं होतं. त्याप्रमाणे आयग्लासनी शिवाम्बूत डोळे धुवू लागलो. माझे डोळे दुरुस्त होऊ लागले होते, हे मला कळलं केंव्हा?
मी चश्मा उष्मा झाला तरी कधी काढीत नव्हतो. पण झालं काय, एकदा आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये मी चश्मा काढून ठेवल्या ठिकाणी विसरलो. नंतर मला तासाभरानं आठवलं की, डोळ्यांवर चश्मा नाही.
१९५२ सालापासून १९७५ पर्यंत मला चश्मा होता. पण त्यावेळी त्या निमित्ताने माझे डोळे सुधारल्याचं मला डोळसपणानं जाणवलं. गेली तीन वर्ष मी चश्मा लावत नव्हतो. पण गेल्या वर्षीपासून माझ्याहलगर्जीपणामुळे मी शिवाम्बू घेणं सोडून दिलं. त्यामुळे कदाचित पुन्हा चश्मा मला लावावा लागतोय असं मला वाटू लागलं आहे. (...हशा, टाळ्या)
अशाप्रकारे या शिवाम्बूपानानं माझ्यापुरता डोळ्याचे विकार, किडनीचा अडथळा, डायबेटीस, दाताचा दोष, हार्टचं कार्य, इत्यादी महत्त्वाच्या बाबतीत आमूलाग्र फरक पडला.
ब्लडप्रेशरच्या बाबतीत मात्र अद्याप माझ्यात फरक नाही. डॉ. शशी पाटील सुचवतील त्या पद्धतीने शास्त्रशुद्ध उपचार करून पाहावे, असं वाटतंय.
या उपचाराचा उल्लेख अनेक धर्मग्रंथकारांनी आपापल्या धर्मग्रंथात नमूद करून ठेवल्याचं आज उघडकीस येत आहे.
एखादा कंजूष माणूस असला म्हणजे आपण म्हणतो की, हा कापल्या करंगळीवरसुद्धा मुतणार नाही. याचे अर्थ दोन होतात. एक अर्थ, लघवी कृतज्ञ असली पाहिजे व त्याचीही साथ न देणारा कृतघ्न असला पाहिजे. लघवी अँटीबायोटिक आहे. जखम वाळवणं हा पारंपरिक अनुभव. तो पण मी घेतला आहे....मी मध्यंतरी ‘इलस्ट्रेटेड वीकली’ मध्ये यासंबंधातलं एक आर्टिकल वाचलं होतं की, के. के. दाते यांनी अशी प्रसिद्धी दिली की, जपानमध्ये याचे प्रयोग करायला सुरुवात झाली आहे. सगळ्या गावातील लघवी एकत्र करायची, त्यातली द्रव्यं शोधून काढायची आणि शरीराला पोषक असणारी द्रव्यं निवडून काढून त्याची इंजेक्शनं तयार करायची. ही इंजेक्शनं जपानच्या प्रयोगशाळेमध्ये आता सुरू झाली आहेत. १० सी. सी.च्या एका इंजेक्शनची किंमत तीन हजार डॉलर्स आहे. म्हणजे आपल्या लघवीला काय किंमत आहे, बघा! तीन हजार डॉलर म्हणजे- पाच रुपयाला एक डॉलर याप्रमाणे पंधरा हजार रुपये झाले.
आणि या इंजेक्शनचं जर मोठ्या प्रमाणावर प्रॉडक्शन झालं, तर तीन हजारावरून तीनशे डॉलर्स इतकी किंमत होईल. म्हणजे तरीसुद्धा तीनशे डॉलर्सचे पंधराशे रुपये होतील. अशाप्रकारच्या लघवीच्या इंजेक्शनचं काम जपाननं सुरू केलं आहे.
परंतु आपल्याला जपानकडे जायला नको. आर्मस्ट्रांगकडे जायला नको. दुसरीकडे कुठं जायला नको, आपल्या इथं, आपल्याजवळच हे औषध आहे. याला पाव पै खर्च करायचं कारण नाही. फक्त तुमच्या मनाची तयारी पाहिजे. कारण मनाच्या तयारीशिवाय घृणा नाहीशी होणार नाही. आपल्या शरीरामध्ये जे नाना प्रकारचे रोग होतात, त्याला दोन प्रकारांनी थोपवण्याचं कार्य शिवाम्बू करतं. शिवाम्बूत प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह म्हणजे रोग टाळता येतो आणि झालेला रोग बरा करता येतो, अशा दोन्ही प्रकारचे गुणधर्म असल्याकारणानं आता या दृष्टीनं, शास्त्रीय पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर चिकित्सा करण्याची वेळ आली आहे. त्याला अनुकूल पंतप्रधानही लाभले आहेत. आता कुचेष्टा करण्याची वेळ निघून गेलेली आहे. अशा रीतीनं ज्याची चिकित्सेसाठी एक पैसा खर्च करण्याची ऐपत नाही, अशा गोरगरिबाला शिवाम्बुपानामुळे लवकर रोगमुक्त होण्याची संधी आहे.
सध्या होमिओपॅथी, अँलोपॅथी, युनानी, आयुर्वेद, इत्यादी चार-पाच प्रकारच्या पद्धतींची नाना प्रकारच्या रोगांवर नाना प्रकारची औषधं आहेत. पण इथं असं आहे, की, ‘नाना प्रकारचे रोग आणि औषध मात्र एकच.’ (हशा...) - आणि म्हणून याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा.
ज्याला ज्याला प्रयोग सांगितला, तो तो म्हणतो की, मला आता आराम वाटू लागला आहे. सर्वांना उपलब्ध असणारी ही एक अमृतवल्ली आहे. लघवी म्हंटल्यावर जी घृणा वाटते, ती शिवाम्बू म्हंटल्यावर वाटत नाही. त्याला या नावानं आध्यात्मिक स्वरूप येतं आणि पावित्र्याच्या भावनेनं जीवन पवित्र होतं. याचा उपाय एखाद्याला झाला नाही, तरी अपाय होत नाही एवढं निश्चित आहे आणि म्हणून हा प्रयोग करायला हरकत नाही. कोणत्याही प्रकारची भीड, चिंता, चुका न ठेवता हा प्रयोग करण्याची सुबुद्धी सर्वांना होवो, एवढी अपेक्षा करून मी भाषण संपवतो.
अध्यक्षीय वक्ते : कै. आमदार पी. बी. साळुंखे
स्थळ : करवीर नगर वाचनालय
ता. २४/०२/१९७९