मुळनक्षत्री : एक प्रेरणादाई जीवनधारा : भाग - 9

निसर्ग संकेत व भूक

निद्रा, भूक, भय आणि मैथून या घटनेपैकी भूक ज्याच्याशी पोट संलग्न आहे. कशासाठी पोटासाठी! खंडाळयाच्या घाटासाठी! आम्ही बालपणी म्हणत असू, पण आजही जे काही करतो ते पोटासाठीच करतो, हे साठी ओलांडतानाही म्हणतोच, म्हणजे जन्मलेल्या बाळाला डोळे झाकूनच आईचे स्तन शोधणं, जसं अवगत असतं. मम्मू, बज्जी व इश्शी मधला हा मम्मूचा जरी विषय असला, तरी केवळ बाल्यांचा मुळीच नाही. आपण अन्न पोटाला पुरवायचं व पोटानं सार्‍या शरीरातल्या अवयवांना, पेशींना अन्न पोचवायचं, हा जणू ठरलेला करार!

दिवस-रात्र वीतभर पोटासाठी अहोरात्र खपणारी माणसं आम्ही पाहिली आहेत. त्याला तुम्ही-आम्ही तरी अपवाद कुठे आहोत! खर ना!

पण खरे सांगू का? पोटाच्या आडोशाला, पोटाच्या नावाखाली, अनंत अवयवांची भूक शमवायला आम्ही येथे बसलो आहोत. पोट हे एक निमित्त आहे. होय कि नाही? तसं पाहिलं तर, पोटासाठी इतक्या मेहनतीचे काय कारण आहे? पोटासाठी इतकं बेहोश होऊन, तहान-भूक हरवून, पोटाला चिमटे देऊन, राबण्याचे काही कारण आहे का? तसे पोटाला फारच थोडं लागतं, पण पोटाच्या परिघावर असणार्‍या इतर अवयवांची भूक मात्र फारच न्यारी आहे.

कोणा अवयवाला चव हवी आहे, तर कोणाला त्यात सुगंधही, कोणाला करमकूरम आवाजही त्यात हवा आहे. सारांश, स्पर्शही गुलाबजामचा, तीत मुलायम हवा आहे. मग हे सर्व काही मिळविण्यासाठी राबतो बिचारा! अहोरात्र जीवाची बाजी लावून हे दुर्धर खाद्य संस्कार आता तरी दूरदर्शनामुळे घराघरात घरघरत आहेत.

म्हणे संसार-संसार! आधी तवा चूलीवर॥ आधी हाताला चटके। तेव्हा मिळते भाकर॥ भाकरी भाजून पोट जाळण्याआधी, हाताला चटके किती सहन करावे लागतात? मग चटके महागाईचे आहेत, कष्टाचे आहे, तव्याचे आहेत, दुश्मनीचे आहेत, इर्षेचे आहेत, मत्सराचे आहेत. याच्याच भोवती माणूस नावाचा प्राणी अडकून पडला आहे. कैद झाला आहे. वीतभर पोटावर काटकं ओढण्यासाठी दिवसभर जळणं, काटूक गोळा करणारे लोक मी पाहिलेत. काहींना तेला-मीठाची भ्रांत आहे. तर काहींना जिभेवर तरळणारी वस्तू निर्माण करण्यासाठी त्याला तो घास आधी तेलात तळावा लागतो आहे. आणि स्वतःचा तीळ-पापड करवून घेऊन पापड भाजतो आहे.

क्षितिजावरच्या वस्तू हस्तगत करण्याच्या प्रयत्नात, हात लांबवतो आहे. पण जिथे खिशापर्यंत हात थिटे पडताहेत, तेव्हा हे कसं शक्य व्हावं? समजा पोचले हात, तोवर खिसा मारलेला, फाटलेला. पुन्हा त्याला जोरात पायंडल फिरवावं लागतयं, ते एवढयासाठी, जे हाताला येत नाही तेच नेमकं मिळवण्यासाठी. तोवर आणखीन नवी अमिषं बाजारात दत्त झालेली असतात आणि मग हे विना तळाच्या बारडीत बाजार भरणं चालू राहतं. आपण मात्र म्हणू लागतो. हे असचं चालायचं!

हे, असचं चालायलाही काही हरकत नाही. चालतं तोवर ठीक आहे. पण कोणाचे, चालता चालता पाय गळाले आहेत. हात थकले आहेत. श्‍वास लागला आहे. डोळे मंद होतायेत. मति धुंद होती आहे. पोट फुगते आहे. स्वतःचाच दुर्गंध येतो आहे. झोप हराम झाली आहे. काही माणसे माणसातून बाजूला सरकत आहेत. अशा बिकट प्रसंगी मला जरूर काही सांगायचयं. माझा विश्‍वास आहे, माझ्या कथनाचा परिणाम तुम्हांवर नक्कीच होईल. चालते पाय चालत राहोत. तुम्ही चालू लागलात तरी नशीबही उठून चालू लागतं म्हणतात.

तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही! पण अजाण बालकाला माहीत आहे. माझं दूध, आई आपल्या छातीवर घेऊन मिरवित असते. लाज तुम्हाला वाटत असेल, त्यावर पदर टाकत असाल. स्तनपान करताना आडोशाला घेत असाल. पण मुलाच्या म्हणण्यालाही काही अर्थ आहे.

बाळाच्या पोटगीचा विषय, पण निसर्गानं असं छातीवर दिलं आहे. काही विचारू नका! पण लक्षात कोण घेतोय? हे फक्त बालका बाबतचे असं झालेलं नाही. तर, तुम्हा-आम्हा प्रौढ भू-पुत्रांसाठी सुद्धा, हा असा फळा-फुलांचा झोका, भूमाता आपल्या छातीवर घेऊन मिरवीत आहे. मांडी आडानं खावं ते तंत्र निसर्गाला जणू मान्य नसावं! आपले पोट व पोटगीचं साहित्य दुसर्‍याच्या नजरेला पडेल तर, नजर लागेल ही कल्पना, संकुचित माणसाचीच.

आपण जे खातो ते दुसर्‍याच्या नजरेलाच पडू नये. कोणाची तरी दृष्ट लागेल. हा आपला एक समज. आपण आपल्या भूमातेची वक्षस्थळं म्हणू, तर झाडं अर्थात वनस्पती आहेत. त्यात असणारे जैविक रसायन म्हणजे टचून भरलेले भूपुत्रांच्या पोषणासाठी, मातृक्षीरच आहेत. यावर बाळाचं बाळसं अवलंबून राहील.

झाडा-वेलींना डवरलेली, पानं-फुलं, फळं, मुळं, खोडं ही त्याची पाचही अंगे, जवळजवळ आमच्यातल्या पाच तत्त्वांना सांभाळून आहेत. सजीवात अशा आपल्या मातृ दुधाशिवाय, स्वास्थ्यास ओरिजनल असं अन्न आहेच कुठंं? आपलं बाळ कधीही आजारी न पडता सुव्यवस्थित म्हातारं व्हावं ही अपेक्षा फक्त मातेचीच! पण बाळ शेवटी, बाळचं राहिलं नां! आईच्या दुधाला पारखं झालं, नि चॉकलेटच्या नादी लागलं! चॉकलेट चघळून-चघळून आता टॉयलेट कडूनही महाग झालं.

कुंथावं लागतयं, खडे होतायेत, गॅस धरतोय, बैचेनी आहे. मी अस्वस्थ आहे. आज झोप नाही. छातीत जळजळतयं. पोटातं भगभगतय डोळे जळतायेत. हातापायाला धग होते. या दग्ध अग्नीवर शेकून अन्नग्रहण करणार्‍यांच्या किती म्हणून तक्रारी? ते शांत करायला पुन्हा वैद्य आणि डॉक्टर, म्हणजे, आणखीन गोड मुलाम्याचे दुसरे चॉकलेट चघळताना लेट का असेना, होणारा टॉयलेट तोही बंद.

आता काय? तर म्हणे गाठ गाठीशी टयूमर, ब्लडप्रेशर, मधुमेह. का लंगडता? तर म्हणे गुडघ्याची चक्ती झिजली. असं बोलताना दमता का? तर म्हणे श्‍वास लागतो. अगदी अ‍ॅलर्जीसह गर्दी मग एकक रोगांच्या समस्या तुमच्या, पण सुगीचा काळ, वैद्य, डॉक्टर नि औषधी जगतांचा! आज खेडयात रेशनच्या दुकानासारखी, औषधांची दुकानं सजली आहेत. औषध हा आज फॅशन होऊन राहिलाय. पदरी डॉक्टर, नर्स यांना जवळ बाळगणं, कुबडया, ऑक्सीजन जवळ ठेवणं ही सुद्धा समेृद्धी झाली आहे.

चुकतं कुठे? इकडे कोणाचेच लक्षं नाही. जो तो धावत आहे दवाखान्याकडे पण, सशाची/सरड्याची धाव कुंपणापर्यंत म्हणतात ना! त्याप्रमाणे प्रत्येक रूग्ण आज टाटा हॉस्पिटलपर्यंत धाव घेऊन टाटा करताना दिसतो, ही खेदाची गोष्ट नव्हे का? इथं पोचवण्यासाठी किती हा द्रविडी प्राणायाम! कोणत्याही गोष्टीला एक हद्द असते. आजही जे, मनुष्येतर प्राणी आपल्या चोचीला अनुरूप चारा निवडतात, स्वच्छंदी राहतात, मन मानेल तिकडे विहार करतात, याप्रकारच्या विहाराला सुसंस्कृत माणूस, निसर्गोपचार म्हणतो आहे. अशा रीतीने हुकलेल्या वाटेवर पुन्हा येण्यासाठी त्याला इतका प्रदीर्घ प्रवास करावा लागला आहे. निसर्गाचा तोल म्हणजे, पर्यावरण व मानवी जैविक शक्तीचा अभ्युदय, सदाचारी, संयमी माणूस इ. शिवाय इंधन समस्या असे अनेक प्रश्‍न समर्थपणे हे नजीकच्या काळात निसर्गोपचारच सोडवेल!

भूक ही गोष्ट नसून हकीकत आहे. भूक ही अंतर जगताची, पोषक तत्त्वे मागण्याची संवेदना आहे. ज्या ग्लुकोज इंधनावर यंत्र चालते ते इंधन विशिष्ट पातळी जेव्हा खाली उतरते, त्या प्रमाणात भूक लागते, पोषक तत्त्वातून ऊर्जा, ऊर्जेचा खप, तशी मागणी व मागणी तसा पुरवठा, असा हा निसर्ग आहे. यंत्राच्या बनावटीनुसार, त्यातले ते इंधन आपण वापरतो. तशी ही बॉडी या पाच तत्त्वानुसार बनली, त्याच तत्त्वांच्या माध्यमानी बनलेले अन्न घटक देहास अपेक्षित आहेत.

भूक ही एक अंतर संवेदना आहे. जिभेच्या अग्रापासून गुदद्वारच्या अंतिम टोकापर्यंत जिचे कार्यक्षेत्र ठरलेले आहे. जिला आपण पचन संस्था म्हणतो.

भूक लागते तेंव्हाच आतडीत येणार्‍या अन्नाचं स्वागत करायला अगदी सर्व यंत्रणा सज्ज असते. अगदी जिभेकडून लाळ सुटण्यापासून ते जठर, लहान आतडे, मोठे आतडे यामधले ते रसायन सुटायला, ही सर्व अंतर अवयवे, तत्पर झालेली असतात. त्याची सूचना मेंदूच्या व्हन्ट्रो लॅटरल न्युक्लिअस सेंटरकडून होऊ लागते, अगदी अन्न पुरवठा होइपर्यंत.

हो, खरं आहे, आपण भूकेची दाद घेतली नाही. कोणत्या तरी कामात गढून गेलात तर भूक गजर करून, भूंकून-भूंकून मेंदूतील हंगर सेंटर थांबतेही. थांबते म्हणजे, आपल्यातले राखीव शिल्लकी अन्न गरजेपोटी वापरणे सुरू होते. मनुष्य जो रोडावलेला दिसतो तो त्याच्या देहात असलेला चरबीचा संग्रह असाच कधीकधी वापरला जात असल्याने विरघळणारी चरबी, लिव्हरमध्ये ग्लुकोजच्या रूपात रूपांतरण होऊन खर्ची पडते.

माझे गुरू विनोदाने म्हणत असतं, कोणताही कर्मकांडी उपवासी साधक, हा शाकाहारी असूच शकत नाही. कारण त्याच्या आतडयातून देहात इतरत्र असलेली चरबी इंधन म्हणून आहाराचा भाग म्हणून खर्ची पडत असते. अर्थात ते खर्ची पडतानाही थोडं जे निकृष्ट द्रव्ये असतात वाजवी असतात, ती प्रथम निकालात निघतात. जसे आपण बाजारात प्रथम खराब जीर्ण नोटा पुढे करून खपवीत असतो.

भुकेला कोंडा, निजेला धोंडा ही म्हण, नैसर्गिक स्वास्थ्याचे रहस्य प्रतिबिंबित करणारी आहे. कोंडा याचा अर्थ, काहीही असा नव्हे. जे सहजा सहजी आपल्या आहारात समाविष्ट होणे गरजेचे आहे. पण जे होत नाही, तो धान्याचा कठीण भाग, धान्याच्या ज्या भागांना वर्षभर किडया-मुंग्यांपासून रक्षण केले जाते. तो पापुद्रा, ती भिंत तुमचे ही रक्षण करू शकते. ती भिंत तुम्हालाही अन्य रोगराईपासून जंतु-चिलटांपासून वाचवू शकते. हा श्रीमंती भाव त्यात अंतर्भूत आहे. अल्पसंख्यांकी अशा जीभेला, ती आवडेल याची खात्री जरी नसली तरी, बहुसंख्यांकी देहाला पोसणारे असे, धाान्याचे कव्हर्स तुम्हालाही कव्हर (संरक्षण) करतात, मजबूत ठेवतात, हे लक्षात ठेवा!

कव्हर म्हणजे कोंडा, धान्याच्या सीमा, अर्थात शत्रूशी दोन हात करण्याची कठीणाई, जिच्यात अंतर्भूत आहे असा भाग. थोडक्यात आपली त्वचाच, आपल्या त्वचेचे रक्षण करण्यात ज्याचा प्रमुख वाटा आहे. असा अंश म्हणजे, हा कोंडा होय.

कोंडयात तंतुमय अन्नपदार्थाचा चिवट भाग असल्यामुळे, त्यातला बराच कस काढून घेतल्यावरही ज्याचेवर आंतडयातील रसायनाचे कार्य चालत नाही, असा भरपूर भाग आंतडयाच्या भिंतींना इमरीप्रमाणे घासीत जाऊन, त्यांना साफ करीत मलविसर्जन बरोबर बाहेर पडतो, ज्यामुळे आतडयात मळाचा कोंडमारा होऊच शकत नाही.

निजायला धोंडा याचा अर्थ, डोकं टेकायला मऊशार उशीची जी अपेक्षा सर्व साधारण लोकांची आहे. तो दगड असला तरी, ज्यांना आराम झोप लागते ते सुदैवी लोक, हे अर्थात श्रमिक असतात व श्रम हे आरोग्यदायक आहे. श्रमिकांची सर्व गात्रंही राबत असतात. साहजिकच धावणार्‍या गाडीला इंधनही अधिक पुरवठा करायला हवा, पण... श्रमिकांना जे हवे ते, हवे तितक्या प्रमाणात आपल्या देशात मिळत नाही. उलट ऐषआरामी माणसाला ते अन्न भरपूर मिळत राहते. यातून कुचंबणा दोघांचीही होते. पण, या म्हणीचा अर्थ, ‘काहीही’ असा मुळीच नाही, तर ‘योग्य तेच’ हे लक्षात असू द्या. गल्लत नको. युक्त आहार.

सुधारणा, याची व्याख्या आपण कशी करू यावर हे सर्व अवलंबून राहील. समजा, सुधारणा म्हणजे निसर्गापासून दूर दूर सरकणे. जंगलीपणा संपुष्टात आणणे. असेच असेल तर पुन्हा जंगलीपणा समजून सांगायला शिक्षणक्रम उभारावाच लागेल. सर्व शिक्षणाचा गाभा, हा ओरिजनॅलिटीकडे धावण्याचा हेतू त्यात अभिप्रेत असेल, तर गोष्ट अलहिदा... माणूस जिथं आहे, जसा आहे, तेथून पुन्हा प्राकृतिक होणं ही खरी संस्कृती आहे. पण आम्ही प्रकृतीपासून वंचित होण्यालाच संस्कृती समजून आहोत. इथंच  आपल घोडं पेंड खात आहे. म्हणजे गतानुकालिक सुधारणांच्या नावाखाली जे सामाजिक संस्कार उमटले आहेत. त्यांना पुन्हा रस्ता दाखवून पुसणं हे शिक्षणाशिवाय कसे शक्य आहे?

हो जरूर, हाडापिंडाचा जंगली माणूस आम्हाला अपेक्षित आहे. जंगली माणूसच समग्र देहातील अवयवांना चौखूर सचेत ठेवूं शकतो. अन्यथा सुधारित लोकांची बरीच अवयवे, कामात न घेतल्यामुळे, शेपटीप्रमाणे कालवश होतील. पण सुधारित व्यक्ती म्हणजे, एक लोळा-गोळा व्यक्तीच असेल. कॉम्पूटराईज जग लवकरच मेंदूलाही निकालात काढेल. ज्यामुळे हा प्रश्‍न विचारणारा बिचारा मेंदू तरी शिल्लक असेल का? हा आम्हापुढे आजचा प्रश्‍न आहे. सुशिक्षित पण प्रेतवतं माणूस, आम्हाला अभिप्रेत नाहीचं!

जीभ हे चव अभिव्यक्त करणारे एक चपखळ इंद्रिय आहे. ज्याला आपण रसनेंद्रिये ही म्हणतो. जिथं, मुखात येणार्‍या अन्नाचा रसस्वाद जिभेद्वारे, मेंदूच्या सेंटरला पोचविण्याची संवेदन क्षमता मौजूद आहे.

सर्वच संवेदना या भूतकालीन दिलेली वागणूक, वर्तमानी परिणाम करीत असतात. त्यामुळेच तुम्ही गोड लाडू खाऊन चहा घेऊ लागतात की, चहा सपक (चवहीन) लागू लागतो. अर्थात अपेक्षित गोडी जाणवेनाशी होते. मग थोडा तिखट चिवडा चघळताच, हळूहळू तोच चहा गोड वाटू लागतो. म्हणजे या सर्व संवेदना तशा भ्रामक व भासमान सापेक्षित ठरतात. शरीराला काय हवे आहे. कोणती डेफिशियन्सी आहे. याचे अचूक ज्ञान चवीच्या माध्यमानी जीभ अभिव्यक्त करेलचं, याची खात्री नाही. त्यामुळे जीभ हा सर्वस्वी आहार-तंत्राचा सूत्रधार होऊच शकत नाही. अन्यथा माथेफिरूच्या हाती सूत्रसंचालनाचा कारभार दिल्याचा परिणाम भोगावा लागेल. म्हणून एकंदर स्वास्थ्याच्या प्रवासामध्ये जीभ ही अडसर आहे, ज्यात स्वतःचा अंत आहे अशा विषारी अन्नास, बाजूला काढण्याची फार थोड़ी संवेदना, जीभेकडे आहे. घातक गोष्टी डोळयांच्या पापण्याप्रमाणे, फेटाळण्याची प्रक्रिया होत नाही. म्हणून तरी व्यवहारात विषारी दाऊ पिऊन, विषारी अन्न खाऊन, विषबाधा झालेले इतके लोक दिसतात. तथापि अति जागृत माणसाची जीभ विवेक माध्यमांनी योग्य सूत्रसंचालन करू शकते.

जो आहार, स्वीकारताना त्रास देत नाही, मल विसर्जन होऊन बाहेर पडतानाही त्रास होत नाही. असा तोच युक्त आहार योग्य होईल. आपले आवधान केवळ आवक यावर ठेवून चालणार नाही. तर जावक यावरही पाहिजे. जावकाकडे होत गेलेल्या दुर्लक्षातूनच सर्व मेडिकल लाईनच्या क्षेत्राचा विकास झाला आहे. अर्थात, ज्याला आपण मलबद्धता किंवा मलावरोध म्हणतो. कारण मलबद्धता हीच सर्व रोगांची जननी आहे.

मलबद्धता म्हणजे, आतडयातून खाल्ल्या गेलेल्या अन्नाबाबतचा निषेध होय. संप किंवा टाळेबंदी म्हणा हवं तर! स्थूलमानाने असे आपल्याला जरूर म्हणता येईल की, ज्या भोजनाचे अन्नकण अन्न पात्रास चिकटून बसतात. भोजन उपरांत हात धुण्यासाठी पाणी अधिक लागते. खाताना मुखातही अन्न टाळयांला, दातांना अधिक चिकटून बसू पाहते. तेच अन्न आतडयांनाही चिकटून बसते. त्यातुनही मलविसर्जन झालेच तर, ती जागा धुवायलाही पाणी अधिक लागते.

असा अन्न पदार्थ, प्रामुख्याने मैदा अधिक प्रमाणात वापरला गेला असले तर घडते. मैदा म्हणजे धान्याचा मधला सेंटरचा भाग, ज्यात खळ सदृश रचना आहे. जे आपणाकडे ब्रेड, बिस्कीट, केक्स व मिठाई यांच्या बनावटीत अधिक वापरतात. पीठ चाळत असलेल्या चाळणीतून प्रथम मैदा प्रवेश करतो. पण आतडयांतून बाहेर प्रवेश करताना मात्र मलविसर्जन मुश्किलीने लेट होत राहते. लोणी, तूप, मांस व तेल इ. ही देखील त्या त्या अन्न पदार्थांमधले सेंटर भाग आहेत, या सर्वांमधले सेंटर, अन्न समूहातून, आपल्यात शिरून दिवसेंदिवस आपला आकार बिघडवते व जे अल्पायुष्याचा आलेख कोरते. दुबळे बनवते.

मलबद्धतेचे दुसरे एक प्रमुख कारण असे आहे की, नॅचरल कॉलकडे पूर्णतः दुर्लक्ष मलमूत्र विसर्जनाची भावना होते तोवर नाही, तर सवड मिळाल्यावर, किंवा म्हणे अडसर दिसल्यावर. सुधारित संस्कृतीने जे असे मॅनर्स स्वीकारले आहेत. तेही एक कारण या संवेदनशील अवयवांना बोथट करून टाकले आहेत. तिसरे कारण, म्हणता येईल, कष्टाशिवाय, कष्ट सदृश जड अन्न स्वीकारणे होय. अर्थात गाडी गॅरेजमध्ये ठेऊन, समृद्धीच्या नावे तेलांचं इधन घालीत राहणे. चौथे कारण म्हणता येईल की, भूक आहे की नाही हे न पाहता, आग्रहाच्या शिष्टाचाराला दाद देत राहणे व पोटाचे नरसाळे करणे. इत्यादी गोष्टी मलबद्धता निर्माण करतात.         मानवाचा ओरिजनल पूर्वज, जर आपण माकड म्हणतो. तर माकडाचेच अन्न ओरिजनल व्हायला पाहिजे. पान, फूल, फळ, खोड व मूळ खाऊन आम्ही माकडाच्या मूळ चपळाईकडे का जाऊ नये? माकडचेष्टा करू नये? मनुष्य ही माकडाची सुधारित आवृत्ती म्हणत असाल तर माकडापेक्षा उंच उडी घेणे मनुष्याला सहज व सुलभ जायला नको होते का?

हनुमान म्हणजे मारूती, बल-शक्तीचे आराध्य दैवत. आरोग्याचा बलदंडाचा पुष्ट नमुना, म्हणून तर याची प्रतिमा देखील आपल्या संस्कृतीने वानर मुख निवडले आहे. पर्यावरणाचा तोल सांभाळणारा प्राणी, या सर्व गोष्टींमध्ये काय पूर्वजांचा हा बहुआयामी उद्देश नसेल?

कोबी, फ्लॉवर, गाजर, काकडी, टोमॅटो, बीट, रताळी, मूळा इत्यादी सर्व प्रकारच्या फळ भाज्या. गहूं, मेथी, मूग, मटकी, मसूर, शेंगदाणे, हरभरा, सोयाबीन इ. सर्व कडधान्यांच्या अंकुरित मोडी व झाडावर झोका घेत असलेली हिरवी, पिवळी, गुलाबी, रंगे-बेरंगी सर्व फळे, पपई, पेरू, ऊस, काजू, डाळिंब, आंबा, चिक्कू, सफरचंद, द्राक्षे, दुधी भोपळे, संत्री, मोसंबी इ. फळे. अक्रोड, बेदाणे, मनुके, पिस्ते, बदाम, जर्दाळू, वेलदोडे, लवंग, दालचिनी सर्व प्रकारचे हे सुके मेवे, मेथी, पाला-पात्री, कोथंबीर, अंबाडी इ. भाजीपाले, बेल, उंबर, तुळस, दुर्वा इ. दैवी पाने लिंब किंवा या सर्व गोष्टी ओरिजनल माकड आहारात निश्‍चित समाविष्ट होऊ शकतील. आहारात स्थूल मानाने वनस्पतीजन्य व प्राणीजन्य असा मूलभूत फरक केलेला आहे. अगदी सर्व प्राणीजन्य पदार्थ मांस, मच्छी, अंडी व दुधसुद्धा हिंसक मार्ग अवलंबूनच प्राप्त होतात. प्रत्येक प्राणी, पक्षी, जीवाणू व किटाणू यांचा आहार अगदी ठरलेला आहे. तो त्याच्या चोचीला आनुशंगिक असाच आहे. जिभेपासून ते गुदद्वारापर्यंत त्यांची विल्हेवाट लावण्याच्या पद्धतीत या रचनात्मकदृष्टया, त्यांच्या आंतर रचना अगदी भिन्न भिन्न आहेत.

ज्यांच्या जबडयांची शेवटच्या टोकापर्यंत तोंड उघडण्याची मोठयात मोठी क्षमता असते. तोंडा बाहेर लांबच लांब जीभ काढून चट्टा, मट्टा आवाज काढीत पाणी पिण्याची सोय आहे. ज्यांचे दात लांब अणकुचीदार, हुकासारखे सुळे आहेत. ज्यांची नखे तीक्ष्ण धारेदार आहेत. अशांच्या आंतडयाची लांबीही पाठीच्या कण्याच्या लांबीच्या सहापट असते. ते असे सर्व प्राणी मांसाहारी आहेत. त्यांच्यात मांस पचविण्याची क्षमता असते. नखांनी शिकार फाडणे, दातांनी तोडणे व जिभेने धावते रक्त घोटणे, सहज शक्य व्हावे अशी ज्यांच्यामध्ये निसर्गाकडून काळजी वाहिली आहे. त्यांना तशी साथ दिली आहे. मुभा दिली आहे.

गुजराती थाळी, पंजाबी थाळी, चायनिज-डिश-पुलाव-बिर्याणी चिकन इ. अत्यंत प्रकार, आजकालच्या डिशची जरी नावे पाहिलीत, की विद्यमान स्थिती समजण्यासारखी आहे. लवकरच स्वाद व गंधही, सुधारित उद्याच्या टी.व्ही. कडून कदाचित, अपेक्षा करायला हरकत नाही. म्हणजे जेणेकरून, उरली सुरली मानवी जमात, परस्परांना बहुसंख्यांनी काय ते इस्पितळात भेटत राहतील.

हे पाहा, विज्ञानाच्या लक्षात हे केव्हाच आले आहे. ज्या विज्ञानाने, प्रयोग शाळाच प्रयोग करता करता पेटविली. त्या विज्ञानाकडून आता अपेक्षा तरी कसली करता? लवकरचं आता राखेशिवाय येथे काय आढळणार आहे?

आपण लोक प्रत्येक गोष्टीत किंबहुना प्रत्येक वाक्यात वैज्ञानिकता पाहणारे किती व्यासंगी आहोत. घटनानुभव हा आता दुय्यम झाला आहे. पुराणातील वांगी पुराणात म्हणतात ना! तसे, विज्ञानाचे मत केवळ शास्त्रज्ञांसाठी असे म्हणून, रिकामे होणार्‍यांना तुम्ही काय म्हणाल?

क्रमश:

डॉ. शशी पाटील एक महान सेवाभावी चिकित्सक होते. 'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' हे त्यांच्या जीवनाचे ब्रीद होते. ते नेहमी निस्वार्थ व निर्मळ भावनेतून रुग्ण उपचार करायचे, त्यामुळे त्यांच्या फक्त हातालाच नव्हे तर त्यांच्या वाणीला ही गुण होता. त्यांच्या अनुभवसिद्ध उपचारांमुळे अनेक रुग्ण दुर्धर रोगातून मुक्त व्हायचे. मूलतः डॉ. शशी पाटील हे एक आध्यात्मिक साधक होते. प्रत्येक औषधोपचाराचा प्रयोग, ते प्रथम स्वतःवर करून पाहायचे. त्यांचा शिवांबू, योग, निसर्गोपचार व आयुर्वेदाचा फक्त प्रगाढ अभ्यास होता असे नाही तर ते एक उत्तम हस्त कुशल उपचारक होते. मॉलिश व ॲक्युप्रेशर यासारख्या उपचार कलेमध्ये ते निपून होते. ते एक उत्तम लेखक व कवी सुद्धा होते. त्यांनी आरोग्य विषयक अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. ते आरोग्याचा गहन विषय रुग्णांना दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणे देऊन सहजपणे पटवायचे.त्यांचे आपल्या वाणीवर चांगले प्रभुत्व होते. प्रस्तुत ‘मुळनक्षत्री - एक प्रेरणादाई जीवन-धारा’  या लेख मालिकेतून आम्ही  डॉ. शशी पाटील यांचे  ‘जीवन चरित्र’ क्रमश: प्रकाशित करीत आहोत. आज हजारो लोकांसाठी त्यांचे जीवन, नव-प्रेरणेचा स्त्रोत आहे.

Previous Post Next Post