हात

‘अपना हाथ जगन्नाथ’ असं म्हटलं जातं. ‘आपले आरोग्य आपल्या हातात’ असंही ऐकलं असेल. रोग किंवा आरोग्य निर्माण करण्यामागेसुद्धा आपलेच हात असतात, हे किती मुलांना माहीत आहे? हात धुवावेत, कितीदा धुवावेत? केव्हा धुवावेत? कसे धुवावेत व का धुवावेत? हे आता अतिसूक्ष्म तंत्र-विज्ञान युगात सांगायला लागू नयेच. देहाचे बारकाईने निरीक्षण केले की हाताइतका धोकादायक, असा जंतु दोषांनी युक्त, दुसरा कोणता अवयव नसतोच, हे लक्षात येईल.

केवळ मलविसर्जनानंतर हात धुतले पाहिजेत असे नाही, यानंतरही धुवायला हवेत; पण ज्यावेळी आपण खाद्यवस्तू हाताळतो तेव्हा तरी ते अवश्य धुवावेत.

हात राखेने चोळून स्वच्छ होतात, हात मातीने चोळूनही स्वच्छ होतात. हात साबण लावूनही स्वच्छ करूया; पण हात धुवायला हयगय नकोच. डॉक्टर मंडळींनीच, नर्स, कंपाउंडरनीच हात धुवावेत असे नाही.

आपले हात अनेक ठिकाणी सरकत असतात. हाताच्या तळव्यांना बारीक घामाचा ओलावा (आर्द्रता) असतो. तळव्यांना क्रेपसारख्या रेषा असतात. त्यात मल-जंतू यांचा उपद्रव क्षणाक्षणाने वाढतोच आहे, याचा अंदाज हाताच्या तळव्याच्या कोणत्याही भागावर जीभ टेकून करू शकता. तोच हात धुतल्यावर पुन्हा तीच जीभ अंदाज देऊ शकते. झोंबणारी बेचव ‘चव’ हेच विष आहे.

हातपाय धुऊनच पूर्वीचे लोक घरात प्रवेश करायचे. देवळात प्रवेश करतानाही हातपाय धुतले जायचे. हात न धुणार्‍यांमध्ये जंतांचा प्रादूर्भाव वाढलेला दिसला.

पोटशूळाचा प्रकार, हगवण, मलबद्धता, गॅसेस, इत्यादी पोटाची अस्वस्थता वाढविणार्‍या घटना बहुधा हात न धुण्यामुळेच झाल्या आहेत. भोजन खाणार्‍यांनीच हात धुऊन फक्त नाही चालणार, तर स्वयंपाक करणार्‍यांनीही हात धुवावेतच. खाद्यपदार्थांना येनकेन प्रकारेन स्पर्श करताना चांगले कोपरासह हात धुणे आवश्यक आहेत. हात न धुता खाद्यपदार्थांना शिवणारे अशिक्षित म्हणायला हवेत. मला यांनी...त्यांनी.... विष घातलं. बाधा घातली, वगैरे जो ग्रामीण भागात समज असतो, तो खोटा आहे. हात न धुण्यामुळे विषसदृश घटना झालेली असते. मध्ये काळ गेलेला असतो, इतकेच !

नखे

हातापेक्षाही प्रभावी विषारी द्रव्ये नखांत संचित होतात. अल्कली व आम्लधर्मीय खाद्यपदार्थांत ती घाण क्षणार्धात विलीन होते व ते संपूर्ण अन्न दूषित बनते. तेव्हा चार-आठ दिवसांनी मुद्दाम नखे काढावीत. अगदी अंगाबरोबर नेलकटरने सुरक्षित काढावीत.

आजकाल अनेक स्त्रीपुरुष संपूर्ण नखे, तर काहीजण फक्त तर्जनी व अंगठा यांची नखे वाढवतात. प्रत्येक नखाला अन्नस्पर्श होणारच, त्यामुळे असे अन्न अखाद्य बनते, असे स्वयंपाकी अपात्र ठरतात. त्याकरिता नखे दिसूच देऊ नका. आली की काढत रहा.

दात

थोडीशी सावधानता कोणत्याही दंतविकारावर मात करू शकते. सांभाळू दात, तर होईल कसा घात? ‘दात’ म्हणजे आपले जातेच. काहीही खाऊन झाल्यावर दात चोळण्यापेक्षा हिरड्या चोळण्याचा सराव, दातांना बळकटी मिळवून देतो. दातांची पकड सर्वस्वी हिरड्यांच्या स्वास्थ्यावर अवलंबून राहते. हिरड्या आतून-बाहेरून चोळून चोळूनच ती जागा गरम झाली पाहिजे.

असे प्रत्येक वेळा मुखशुद्धीच्या वेळी चोळल्यास, दात शेवटपर्यंत टिकतात. लोक दात घासतात की धार लावतात हेच नेमके कळत नाही. बराच वेळ व दिवसातून दोन-चारदा घासत बसतात, विशेषत: बायका...

तंबाखू, मिश्री हा अत्यंत वाईट प्रकार आहे. तेव्हा तेही नकोच नको. घर्षणाने काय होते, दाताचे इनॅमल (वरचे कोटिंग) झिजून जाते. हवा, पाण्याचा स्पर्श त्यांना सहनच होत नाही. वेदना सुरू होताच लवकर दात काढून घ्यावे लागतात. अल्पसे मीठ व मोहरीचे तेल दात घासायला पुरे आहे. हिरड्यांचा सर्व भाग मुद्दाम समान जोर देऊन चोळावा. दातांवरील हिरड्यांचे पांघरूणच मरेपर्यंत दात शाबूत ठेवू शकते. दातांच्या उपस्थितीवर, त्यांच्या आरोग्यावर, सौंदर्यावर, भाषेची व वाणीची स्पष्टता अवलंबून राहते. दातांची ठेवण, त्यांचा रंग यांवरूनसुद्धा माणसाचा रोग, आहार, शाकाहार की मांसाहार व स्वभाव, वय, इ. सारे कळू शकते. दातांच्या उतरणीवरून वयाचाही अंदाज बांधता येतो.

दातांच्या योग्य ठेवणीवरच चेहर्‍याची रेखीवता सांभाळली जाते. तेव्हा दीर्घकाळ दात टिकावेत म्हणून आपण हा प्रयत्न दीर्घकाळ करायला हवा. शिवाय दाताकडूनच जात्याचं म्हणजेच दळायचं काम होत असतं. म्हणजे चर्वणाचे काम जितके चांगले होईल तितके त्या अन्नांशाचे रक्तात रूपांतरण होणार. म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची मिळकत आपण दातांकडून साधणार असतो.

माणसाच्या व्यक्तिमत्त्वात केस, त्वचा, नाक, डोळे यांबरोबरच दातांची ठेवण, त्यांचे आरोग्य यांना खूपच महत्त्व आहे.

तेव्हा मुखातील बत्तीस सरदार सुरुवातीपासूनच सज्ज ठेवूया. दात फक्त चर्वणासाठीच वापरूया. हसतील त्याचे दात दिसतील. दिसू देत... भक्कम, मजबूत दात दाखवायला मुद्दामच हसूया.

केस

पृथ्वीवरची झाडी, वनस्पती जमिनीची धूप रोखतात. तसे त्वचेवरचे केस, त्वचेचा पोत सांभाळतात. आपण हिरव्यागार झाडांचा भूप्रदेश सुकाळाची निशाणी मानतो. तसे सर्वत्र अंगावर असलेले केस आरोग्याचे लक्षण मानायला हवे.

विरळ केस हे देखील कोणत्यातरी आवश्यक प्रथिनांचा अभाव दर्शवितात. टकलासारख्या समस्या पारंपरिक जीन्सच्या डिझाईननुसार जर हजर झाल्या असतील तर त्याला उपाय नाही.

केसांची विशेष स्थाने व तशी त्यांची तिथली आवश्यकता यांचा तपशील, विचार केल्यावर लक्षात येण्यासारखा आहे. अंगावरील केस काही अंशानी वस्त्राचेच काम करतात. निसर्गाने जे दिले आहे, जसे दिले आहे, त्याचा स्वीकार करणे व ते चांगले सांभाळणे, त्याला नीटनेटके ठेवणे, हीच संस्कृती आहे.

देश तसा वेश, हे बरोबरच आहे. ज्या देशाची जी हवा, जी संस्कृती तो पेहराव करणे योग्यच होईल. मुंंडन तर मुंडन, जे आहे जसे आहे, त्याला तसेच सांभाळायचे, त्याला नीटनेटके ठेवायचे. जो शाळेचा युनिफॉर्म आहे. जो नियम आहे, तो विद्यार्जनाचा काळ संपेपर्यंत पाळायलाच हवा. सफाईला, स्वच्छतेला मात्र हयगय नकोच.

क्रमश:

डॉ. शशी पाटील  समाजातील  प्रत्येक घटकासाठी  स्वास्थ्य  मार्गदर्शन करायचे. त्यांचा सेवा-संपर्क लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खूप मोठा होता. त्यांनी अनेक शाळा कॉलेजातून लहान मुलांसाठी व तरुणांसाठी स्वास्थ्य जागरणाचे विविध उपक्रम राबविले.  त्यांनी 'जीवनाच्या बाराखड्या' या नावाचा उपक्रम लहान मुलांसाठी  अनेक वर्षे राबवला, जो मोठ्यांसाठी ही खूप उपयुक्त आहे.  त्यांनी या उपक्रमातून हजारो  बालकांना व तरुणांना समाजामध्ये 'स्वास्थ्य रक्षक' म्हणून कार्य करण्यास प्रेरित केले.  प्रस्तुत लेखस्तंभातून, 'जीवनाच्या बाराखड्या' या त्यांच्या उपक्रमातील व्याख्यानांचे संकलन, आम्ही क्रमश: प्रकाशित करीत आहोत..

Previous Post Next Post