स्नान
स्नान जीवनाच्या बाराखडीत आठवं पुष्प आहे. स्नान म्हणजे अंघोळ, दिवसरात्र मनुष्य सर्व घोळ घालून झाल्यावर शेवटी अंघोळ करून नवीन दिवसाचा आरंभ करतो. चार बाय चारच्या बाथरूममध्येच काय तो अंघोळीवेळी प्रसन्न असतो.
अंघोळीच्या निमित्ताने होणार्या हातांच्या आडव्यातिडव्या डान्सबद्ध हालचालींनी, त्याला थोडे गावेसे वाटते. गाण्याच्या एक-दोन ओळी गात गात, पाणी अंगावर घेताना त्याला बरे वाटते.
पण मुलांनो, अंघोळ तरी तुम्ही सरळ करता का? मग कावळ्यालाच उगीच नावे कशाला ठेवता? तुम्हीही कावळ्यासारखेच अंघोळ करता झालं.
कावळ्यापेक्षा थोडा फरक, काय तो थोडे साबण लावता इतकेच... मग ते साबण हेमामालिनी लावते म्हणता, अभिताभ लावतो म्हणता आणि लावता. तो साबणही नीट धूत नाही. पाणीही सर्वत्र अंगावर फिरत नाही, तोवर हू... हू करीत टॉवेलमध्ये येता झालं... मुलांनो, अंघोळीशीही तुम्ही घोळच घालता. असं मी नक्की म्हणेन, पूर्वज जसे अंघोळ करतात तसेच तुम्ही करणार? दुसरं काय करणार?
नैसर्गिक अंघोळ
उद्याच तुम्ही अशी अंघोळ करून बघा, साधारण एक आठवडा तरी जरूर करा. जे घडतं ते मला जरूर कळवा. एक अंघोळसुद्धा, जीवनाची घडी बसवून देऊ शकते.
मी म्हणतो, देहाची दोनच भोके श्वास घेत नाहीत, तर त्वचेची रंध्रेच्या रंध्रे हवेचे अवागमन करीत असतात. मनुष्याने सुरक्षिततेच्या भीतीने चार भिंतीचा आसरा स्वीकारला. चार भिंतींत राहूनही अंगभर कपडे चढवले. तेही एकच पदरी नव्हे, तर चार, दोन पदरी कपड्यांनी देहाचा भाग वेढला गेला.
यामुळे काय झाले? शरीरात उष्णता वाढत राहिली. थेट वार्याने देहाचे तापमान योग्य पातळीला राहू शकले असते; पण आपण तसेही होऊ दिले नाही. परत स्नानासाठी कढत पाणी घेऊन शरीराचे तापमान आणखी वाढविले, जागरणाने उष्णता वाढली आहे. तेल, मीठ, मसाला, चहा, दारू, यथेच्छ चविष्ट भोजनाची चंगळच चालू आहे. या चंगळवादाने पुन्हा उष्णता वाढली आहे.
टेरीलीन, बॉस्की, नायलॉन या सिंथेटिक कपड्यांनी पुन्हा देहाला तुम्ही सीलबंद केलं आहेच. नखशिखांत युरोपियन पेहराव यानेही देहाच्या तापमानात भर टाकली ती वेगळीच.
या सर्वांमुळे झालं काय माहीत आहे? माणूस शीघ्रकोपी झाला. जिथे हात लावू तिथे भाजून घेऊ. माणसाचा संयम सुटला. माणूस जिथे तिथे एवढ्यातेवढ्या निमित्ताने चिडायला लागला.
स्त्री असो, पुरुष असो. सगळ्यांचा मानसिक तोल हुकला. ईर्षा, स्पर्धा, मत्सर, लोभ, लालसा, राजकारण, प्रदूषण यांनी तो वेढला. या सर्वांचा परिणाम आतड्यावर व कातड्यावर झाला. कातडी निस्तेज झाली. शुष्क झाली, खडबडीत झाली, तिची जाडी वाढली. ज्याने माणूस फुगरा-सुजरा झाला. या सार्या गरम प्रवृत्तीने तो आळशी, निरुत्साही झाला. अकाली वृद्धत्व येऊन गरम पाण्याच्या वारंवार होणार्या लयलोटांनी त्याची त्वचा जळू लागली. ती संवेदनाहीन होऊ लागली. धमन्यांतील स्थितिस्थापकत्व नाहीसे होऊन त्यांचे काठिण्य वाढले. यामुळे रक्तदाब वाढला. सारेच निसर्गाच्या उलट. कुठवर ते टिकावं ? कुठवर त्यानं सोसावं? तुम्ही घेता ते अंघोळीचे गरम पाणी तुमच्या बागेतील झाडाझुडपांना घालून बघा, तीही मलूल होतील. आपले भूतपूर्व पंतप्रधान, शंभरी गाठत आलेले स्व. श्री. मोरारजीभाई देसाई म्हणायचे, तुमच्या हातांचे तळवे आणि त्यांवरच्या रेषा या काही भविष्यवाणी वर्तवणार्या यंत्रणा नव्हेत; तर हात अंगावर चोळून, त्वचेवर घासून मळ वेगळा काढण्याची ती सुसंबद्ध नैसर्गिक अशी योजना आहे.
चतुष्पाद प्राण्यांकडे ही योजना त्यांच्या मुखात जिभेवर ठेवली आहे. चटाटा जीभ बाहेर करून एखादा अवयव चाटू लागले म्हणजे पहा, त्या काय संवेदना असतात समजेल? निसर्गाचे संकेत आम्ही ओळखलेच नाहीत.
मुद्दाम एक दोन अंघोळीच्या वेळी असे करून तरी पहा. दोन्ही हातांत हातमोजे चढवा किंवा पायमोजे चढवा. तळपायापासून डोक्यापर्यंत एकेक अवयव घासून घासून रंध्रे नि रंध्रे साफ करा. एक गव्हाइतका भागही दुर्लक्षित करू नका. सर्वत्र सारख्या प्रमाणात घासा. कुठे जास्त, कुठे कमी असेही नको व्हायला. साबण अजिबात हातात घेऊच नका. स्नानानंतर टॅावेलही पुसायला घेऊच नका. अंगावरचे पाणी व्यायाम करून जिरवा. थोडे थोडे पाणी राहिले तरी हातांच्या तळव्यांनी चोळून जिरवा. असे एक सप्ताह स्नान करून पहा. दिवसभर तुम्ही किती ताजेतवाने असता, हे स्वत:च अनुभवू शकाल !
मी तुमच्या वयाचा असताना, एका स्नानामध्ये चार-दोन वेळा साबण लावून स्नान करीत असे. वडील साबण लावत असता, ते संस्कार साबणाचे, आम्ही उचलले. मी थोडा अतीसाबणाच वापर करीत असेन, कारण मी स्नान करणार, तेव्हा माझी भावंडे साबण दडवून ठेवीत असत. मला मग बिनसाबणाची अंघोळ करावी लागे. त्याच काळात मला कुणी हे विचार सुचविणारा मिळाला असता किंवा असा एखादा मजकूर वाचला असता तर, माझी त्वचा त्याच वेळी आणखी पारदर्शक झाली असती, कांतिमान झाली असती. मी तुम्हाला तसे कांतिमान होण्याची या निमित्ताने विद्या देतो आहे.
क्रमश:
डॉ. शशी पाटील समाजातील प्रत्येक घटकासाठी स्वास्थ्य मार्गदर्शन करायचे. त्यांचा सेवा-संपर्क लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खूप मोठा होता. त्यांनी अनेक शाळा कॉलेजातून लहान मुलांसाठी व तरुणांसाठी स्वास्थ्य जागरणाचे विविध उपक्रम राबविले. त्यांनी 'जीवनाच्या बाराखड्या' या नावाचा उपक्रम लहान मुलांसाठी अनेक वर्षे राबवला, जो मोठ्यांसाठी ही खूप उपयुक्त आहे. त्यांनी या उपक्रमातून हजारो बालकांना व तरुणांना समाजामध्ये 'स्वास्थ्य रक्षक' म्हणून कार्य करण्यास प्रेरित केले. प्रस्तुत लेखस्तंभातून, 'जीवनाच्या बाराखड्या' या त्यांच्या उपक्रमातील व्याख्यानांचे संकलन, आम्ही क्रमश: प्रकाशित करीत आहोत..