मुळनक्षत्री : एक प्रेरणादाई जीवनधारा : भाग - 7
आनंदकुंज निर्माण
‘आनंदकुंज’ या जागेचा जन्म कसा झाला? तुम्ही ही जागा शोधलीच कशी? तुमच्या नजरेच्या टप्प्यात ही जागा आलीच कशी? असे प्रत्येकाला प्रश्न पडत असतील त्याचं उत्तर असं-
गेली वीस वर्षे अनेक जागांची पहाणी आम्ही करत होतो पण प्रत्येक ठिकाणी काही ना काही उणीव असायची, काहीतरी समस्या असायची, त्रुटी या असायच्या एक तरं अत्यंत महाग असायच्या, एकतर पाण्याची सुविधा नसायची, एक तर रस्ता नसायचा. आमच्या प्रोजेक्टसाठी तीन-चार-पाच एकर सुद्ध आम्हाला पुरेशी होती.
एकदा असचं फिरत-फिरत कोल्हापूर पासून पश्चिमेला सुमारे चाळीस-पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरील करंजफेणच्या निसर्गरम्य वातावरणात आहे तिथे गेलो. ती जागा आम्हाला मूळ कोल्हापूरपासून दूर वाटली पण इथे आल्यानंतर .शीण गेला. निव्वळ इथल्या वातावरणानेच आम्ही बरे भारावलो. सभोवती डोंगरावर डोंगर यांची माळच माळं. झाडा-झुडुपांची रेलचेल, ओंजळीत मोदक घ्यावा असं एकूण दृश्य त्या मोदकावर हे ‘आनंदकुंज’. सोबत बिनविषारी कासारी नदी. मेन रस्त्यापासून, कोलाहलापासून, काही अंतरावर आवाजाचे प्रदूषण नाही. हवेचं तर नाहीच नाही, चोवीस तास भन्नाट हवा. निवासाच्या कुठल्याच ठिकाणी फॅनची आवश्यकता पडणार नाही. पूर्ण अनगड, निर्जन डोंगर, पाऊलवाटही जिकिरीची. दोन तरूणांनी मनावर घेतलं. अरविंद नानिवडेकर यांच्याच मार्गदर्शनाने ही जागा श्री. दातार यांच्याकडून मिळाली. तीस एकराचा डोंगर खरेदी केला.
मुंबईचे शिवाम्बूप्रेमी श्रीयुत केशुभाई शहा हे आमच्याकडे उपचार घेण्याच्या निमित्ताने डिसेंबर 2000 मध्ये आले होते. माझा त्यांचा परिचय झाला होता. अहमदाबाद येथे त्यांची एक फॅक्टरी आहे. आयुर्वेदिक हॉस्पिटलही ते चालवितात. आणि या शिवाम्बूच्या तंत्रावरतीही निरातशिय प्रेम करतात. मी काही आव्हानपूर्वक या उपचार तंंत्राने शारीरिक स्वास्थ्यात निश्चितपणे बदल करू शकतो आणि शिवाम्बू अनुकूल मन परिवर्तन करू शकतो. यावर त्यांचा विश्वास होता.
त्यांच्या पत्नीमध्ये आणि त्यांच्यामध्ये शिवाम्बूच एक अडसर होता. तीच त्यांना खंत होती. पत्नीला मधुमेह होता. इंन्सुलिन इंजेक्शन घेऊनसुद्धा ब्लडशुगर कंट्रोल होत नव्हती. बाकी शरीरयष्टी तिची उत्तम होती, राकट होती, मजबूत होती. पत्नीची सोबत अधिक दिवस राहावी म्हणून त्यांना चिंता होती.
एकदा मला मुंबईला आपल्या घरी घेऊन गेले. त्यांच्या पत्नीची ओळख झाली. मी त्यांना हमी दिली. केवळ चोवीस तासामध्ये तुमची ब्लडशुगर कोणतंही औषध न घेता दीडशेवरती आणून दाखविलं तर तुम्ही या उपचार तंत्राला मानाल की नाही. चोवीस तासात इतका परिणाम होत असेल तर तुम्ही मला ते करूनच दाखवा.
केशुभाईंचे शिळे मूत्र तयारचं होतंं. मी त्यांना दीड-दोन तास पूर्णपणे मॉलीश केलं. उन्हाची किरणे दिली. आणि एकसारखे उपलब्ध शिवाम्बू प्यायला सांगितलं आणि अधिक भूखेच्या वेळी मुबलक पाणी पिण्याचा आग्रह केला. केवळ एवढयाचमुळे ब्लडशुगर दोनशेवरती आली होती. त्यांच्या परिवारात रिलेशन असलेल्या डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं.
काही थोडे दिवस त्यांनी हा परिपाठ चालू ठेवला. पुढे त्या काही औषधाच्या चुकीच्या निर्णयामुळै चार-दोन वर्षानंतर आकस्मिक दवाखान्यातच निधन पावल्या.
या उभयतांना एकच कन्या, ती ही परदेशला. सहचारिणी गेल्याची खंत त्यांच्या मनावरती खोल दिसली. एकाकीपणा त्यांना विशेष जाणवू लागला. अनेकदा त्यांनी दुःख व्यक्त केलं होतं. मी त्यांना घरोबा देण्याचा माझ्यापरीने प्रयत्न केला.
एकदा असेच ते मजकडे आले होते. सदिच्छा ग्रेट भेट म्हणून मी याचा उल्लेख करतो. मी जवळच ‘जिवबा नाना पार्क’ येथे दोन रूमचा स्वतंत्र बंगला घेतला होता. एकांत मला हवा होता. मी त्यांना तिथे घेऊन गेलो आणि सहजपणे हात-पाय दाबण्याचा प्रकार जो मी शोधला होता. बोटांच्या नखामधील रक्त पेरा-पेराकडून पलीकडे न्यायचं. सुखदपणे दाबायचं. ही अॅक्शन पुन्हा-पुन्हा करून वीसदा करायची. त्यांना बेडवरती झोपवून मी काम सुरू केलं.
दुपारची वेळ होती. या प्रक्रियेमध्ये त्यांचा डोळा लागला. ते घोरू लागले. मी विचार केला कि आता ते उठू नयेत. यासाठी मी बाजूला झालो. तासभर झोप लागली. ते उठून म्हणाले, “तुम्ही काय केलं मला? असा मी कधीच शांत झोपलो नाही. मला अनिद्रेचा त्रास आहे आणि ही झोप मला फार महत्त्वाची वाटली. मला खूपचं हलकं-हलक वाटत आहे.”
मी त्यांना म्हणालो, “अशा अनेक कला या उपचार तंत्रानं मला शिकविल्या आहेत. पण त्या माझ्याबरोबरचं संपून जातील. त्या तशा संपू नयेत त्याआधी माझं स्वप्न साकार व्हावं.”
“तुमचं स्वप्नं आहे तरी काय? त्याचा खर्च किती आहे तरी?” असे ते म्हणाले. मी स्वप्नाचा विस्तार मांडला.
नदीच्या किनारी, डोंगराच्या पायथ्याला, वनाच्या शेजारी स्वास्थ्यक्षेत्र उभारावं. त्यामध्ये असाध्य ठरलेल्या रोग्याला दिलासा द्यावा. सोबत गाई असाव्यात. आधुनिक पद्धतीच्या झोपडया असाव्यात. गाईच्या शेणाने त्या झोपडया सारवल्या जाव्यात. बेड म्हणून दर्याची वाळू असावी. हा प्रस्ताव मी त्यांच्यासमोर मांडला. मला त्यांनी विचारलं, “एकूण हा किती खर्चाचा आयटम आहे?” मी सहजपणे वदलो, “दहा-बारा लाख या स्वप्नांसाठी पुरेसे होतील.” ते लगेच म्हणाले, “मी अकरा लाखाचा चेक देतोे. तुम्ही स्वप्न आता साकार करायला सुरू करावं.”
मी तसाच मुलांच्याकडे आलो. मुलांना म्हंटलं, “केशुकाकाने अकरा लाखाचा चेक दिला आहे. आता आपल्या स्वप्नांना जागवू या. जे आपल्या जवळचही किडूक-मिडूक आहे, ते सारेच एकत्र करू या. आता वेळ गमवायचा नाही.” त्याच काळात चि. नितीन यांनी वायुसेनेचा राजीनामा द्यायचा विचार निर्णय पक्का केला आणि ही चिरंजीव मंडळी जागा पाहण्यासाठी फिरू लागली. युद्धपातळीवर काम सुरू झालं. रोजच्या रोज पाच-सहा जागा बघूनच झोपणं होत होतं.
‘करंजफेण’ येथील परिसर आम्हाला पसंत पडला. शेजारी ‘पाली’ नावाचे गांव. त्या गावात ‘श्री. अरविंद नानिवडेकर’ एक मध्यस्ती सधन सावकार शेतकरी. आम्ही त्यांच्याकडे गेलो. आम्ही का आलो आहे हे त्यांना सांगितलं. त्यांनी एक दोन जागा दाखवल्या. संपर्क वाढत गेला. प्रकल्प फार मोठया प्रमाणात राबवायचा आहे, तेव्हा ते म्हणाले, “मी तुम्हाला ओळखतो. तुमच्या पॅथीला ओळखतो. माझा भाचा ब्लड कॅन्सरसाठी तुमच्याकडे अॅडमिट होता आणि तो ठणठणीत बरा झाला आहे.”
‘तुमच्या उपचाराची ताकद आणि तुमचा आवाका मला समजला आहे. हा असा प्रकल्प आमच्या गावटाण्यात होतोय हे आमचे भाग्य म्हणावे लागेल. इथेच आम्हाला यशाची चाहूल लागली.’
‘माझा एक दातार नावाचा मित्र आहे. त्याचा तीस एकर जागेचा माळ आहे. तो एक्साइज ऑफिसमध्ये क्लार्क आहे. कोल्हापूरातून जाऊन येऊन शेत पाहतो. त्याला बदली शेती देऊ आणि माळाची आपण घेऊया. ही जागा तुम्हाला पसंत पडते का बघा. असं त्यांनी घराच्या बाहेर येऊन इच्छित व निश्चित स्थळी बोट करून दाखवलं.’
आम्ही या स्थळावरती आलो. 75 एम.एम. इंग्लिश पिक्चर बघतोय असा परिसर एकाच नजरेत भरला. क्षेत्र समजून घेतलं. क्षेत्राच्या चतुःसीमा समजून घेतल्या आणि प्रयत्न करा म्हणालो. सौदा अकरा लाखाला पक्का झाला. ती तारीख होती 2005.
झालेला सौदा आमच्या शक्तीच्या दृष्टीने मोठा होता. हा सौदा लाभकारक आहे की नाही याची पाहणी करण्यासाठी इष्ट मित्र, संबंधित मंडळी यांचे मत आजमावणे चालू झाले. त्यामध्ये आर्याचे शेतकरी ‘हरि नाना चौगुले,’ बुलडोझर व्यवसायातले तज्ज्ञ त्यांना बोलावून आणले. त्यांनी जागा बघून मकसा रस्ता करणार? किती अडथळे आहेत? पाणी राहलं किती दूर? तरी कसं तुमचं स्वप्न साकार करणार? तुम्हाला हे सर्व अशक्य आहे,' असा शेरा मारून कोलतांगडा घातला. तसं नाकापेक्षा मोती जड तसं आम्हालाही वाटत होतं पण सर्व शक्तीनिशी मुकाबला द्यायचा होता.
सरकारी मोजमाप आणून सरहद्द पक्की केली. आधी फिनिशिंग पूर्ण केलं. शेजार्याची कोणाचीच तक्रार नाही पाहिल्यावर नव्या उमेदीनं वायुसेनेतील आलेला चिरंजीव वायुवेगाने कामाला लागला. हा इंजिनिअर होता. आर.एस.एस संघाची त्याच्याकडे शिस्त होती. ब्रम्हचारी होता. विना मोबदला त्यानं योगदान द्यायचंच ठरविलं.
गेटच्या जवळच ‘स्वागत’ नावाची इमारत आश्रयासाठी लवकर होऊ द्यावी म्हणून पाया खोदला. नानिवडेकरांसह आम्ही सगळेच पाया खुदाईला आलो होतो. रस्ता नसताना इमारतीचे साहित्य वरती येऊ-धावू लागले. इमारतीच्या पायासाठी जी नळ योजना होती, ती अनेक ठिकाणी फुटू लागली होती. कपाळाला घाम फुटतच होता. ‘जणू रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषः काल.’ एकदाची 2006 मध्ये ‘स्वागत’ इमारत सावली घेऊन उभी राहिली. त्या सावलीत चार भांडी वाजू लागली. चार शितं तिथं पडू लागली. वॉचमनसाठी शेड तयार झाला होता. ‘कृपासदन’ व ‘दर्शन’ या इमारतीची आखणी झाली होती. पाया खोदाई झाली.
माझा धाकटा भाऊ सुनील पाटील यांच्याकडे चीन टॅ्रक्टर होता. तो म्हणाला, “माझा टॅ्रक्टर घेऊन जावा. तेल पाणी वापरून एक महिन्यात काय उरकायचं ते उरका.” हळू-हळू रस्ता नागमोडी तयार झाला. ट्रस्टकडे स्वतःचा ट्रॅक्टर असावा या कल्पनेतून ‘मॅसी फर्ग्युसन’ हा ट्रॅक्टर खरेदी केला. चढ मोठा होता. अशी आयुध आपली आवश्यक होती. थोडं-थोडकं काही नव्हतं.
या दोन्ही चिरंजीवांपैकी एक चालू ‘शिवाम्बू भवन’ सांभाळू लागला व दुसरा हा प्रकल्प सांभाळू लागला. दोघांच्याही येरझार्या चालू झाल्या. नव्या होतकरू नातवांनीही भागीदारी केली. तेही सुट्टीत आले. श्रमदान, घामदान केले आणि बघता-बघता डोंगराच्या रांगेत एका टेकडीवर हा प्रकल्प सजू लागला.
या प्रकल्पाला नाव काय द्यायचं तेंव्हा चि. सारंगने ‘आनंदकुंज’ या नावाचा प्रस्ताव पुढे केला. सर्वानुमते ते नाव पास झाला.
ज्यांची दानत मोठी होती अशा लोकांना मुद्दाम बोलावून त्यांचा स्वागत समारंभ करून विनंती करण्यात आली. जागा बघून तरी पाझर फुटतो का? त्यामध्ये ठाण्याचे मोठे बिल्डर ‘खेमजीभाई ठक्कर,’ हे प्रत्यक्ष येऊन पाहून म्हणाले, “आम्ही बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर असलो तरी इतकी जोखमीची असलेली गोष्ट ही मंडळी करत आहेत. अवघड जागेत माल नेत आहेत.” त्यांच्याकडून आर्थिक बळ मिळालचं नाही. मात्र शाब्दिक बोळवण झाली. मात्र समारंभाला खर्च झाला.
पण एका पेक्षा एक हरिचे लाल येतच राहिले आणि ‘आनंदकुंज’ सजत गेला. चांगल्या विचारांच बीज जर आपल्या बरोबर असेल तर हाकेला प्रतिसाद मिळत जातो. साथीला साथ मिळत जाते. ‘देर है मगर अंधेर नहीं!’
योगायोगाने मधल्या काळात कलकत्त्याचे एक पेशंट जे मोठे धनी होते. ज्यांना ‘पार्किसन’ झालं होतं. आमच्या या उपचाराला पाच रोगावरती दाद मिळाली नव्हती त्यात पार्किसन हा एक रोग होता. उपचाराला दाद मिळत नसेल, त्या रोग्याला मी स्पष्टपणे सांगत असे. पण काही फरक झालाच तर बघू या.
या व्यक्तिबद्दल त्यांच्यासोबत असलेले मित्र यांच्या भांडवलीबद्दल खूप काही सांगत होते. हे कृष्णभक्त आहेत. दानत त्यांची मोठी आहे. तुम्ही थोडेसे जरी गुण देऊ शकला तर आनंदकुंजचं स्वरूप बदलू शकेल. इथं खूप काही पैसा ते लावू शकतात. या धनाढय व्यक्तीचं नाव ‘श्रीयुत गोपीनाथ बांगड.’ नियमाप्रमाणे उपचार करण्यात आला. रोगनिर्मूलनाच्या दृष्टीने फारसा लाभ झालाच नाही. पण परिसर आणि आमचे प्रयत्न बघून त्यांनी खुशी व्यक्त केली. प्रयत्नांना त्यांनी धन्यवाद दिले. या ट्रस्टच्या संभाव्य विकासाची, कामकाजाची यादी त्यांना दिली. त्याचा अभ्यास करून काहीना-काही याचा बोझा आपण घेऊ, असे सांगून त्यांनी निरोप घेतला.
त्यांचा एक मित्र ‘झुनझुनवाला’ तोही माझ्या फोन संपर्कात राहिला. त्याची पत्नी कॅन्सरग्रस्त होती. त्यांना इकडे आणायचं होतं. या श्रीमंत धनिकाचा लाभ आनंदकुंजला व्हावा व आपली पत्नीही बरी होईल का पाहावं? यासाठी फोन संपर्क माझ्याशी ठेवला.
पण अधिक सान्निध्य बांगड यांच्याशी वाढावा म्हणून कलकत्ता मुक्कामी उपचार टच रहावा म्हणून, आमच्या राखीव शिवाम्बू फौजेतला ‘विष्णू वडर’ यांची नियुक्ती केली. त्यांच्याशीही मी संपर्कात होतो. महिना-दोन महिना प्रयत्नातून विष्णू आपली बाजी लावत राहिला. विष्णू वडर म्हणजे प्रयत्नातून विकसित झालेला मनुष्य, शशी पाटील विचार, विकास, मोहिमेचा तो सेनापती, जो मुंबईत काम करीत होता. सर्वशक्ती लावून त्याने आपली कला अदा केली. ज्याला एक महिन्याचे मानधन म्हणून मेहनताना म्हणून जवळ-जवळ दीड लाख रूपये मिळाले होते, विष्णू गोपीनाथ बांगड यांच्या गळयातील ताईत झाला होता. ते जिथे कुठे जातील तिकडे विमानाने सोबत जात असे.
एकदा ते सिमला-दाजिर्लिंग येथे विमानाने विष्णूला घेऊन गेले. विष्णूने सेवा करीत करीत दार्जिलिंगची गोरीपान मुलगी पटकावली. तिच्याशी लग्न झालं. त्याचं चाळीस वयापर्यंत लग्नच झालं नव्हतं. तुझं सर्व काही भलं होणार. तू भल्याचा मार्ग सोडू नकोस, त्याने मजवरती, गुरूवरती असीम निष्ठा ठेऊन सेवा रूजू केली होती. या सगळयाच्या प्रयत्नात श्री. बांगड यांच्याकडून आनंदकुंजला पाच लाख रूपयांचा चेक आला.
केशुभाई शहा यांचे मित्र सर्वोदयवादी विनोबा भावे यांचे शिष्य व ‘शिवाम्बू’ या गुजराती मासिकाचे संपादक ‘श्री. जगदीशभाई शहा’ हे ओघाओघाने, यांचा फोन संपर्क, पत्र संपर्क वाढता-वाढता केशुभाई मित्रांना घेऊन आनंदकुंजला आले. त्यांनी परिसर पाहिला. आमची जिद्द, चिकाटी पाहिली, शिवाम्बूवरची निष्ठा पाहिली.
त्यांच्या गुजरात ट्रस्ट मध्ये ‘अमरशीभाई खारेचा’ हे अमेरिकेचे उद्योगपती विशेष शिवाम्बूप्रेमी व्यक्ती होती. हयात असताना शिवाम्बू या उपचाराच्या विकासासाठी अकरा लाखाची रक्कम त्यांनी जगदीशभाईंना दिली होती. जगदीशभाईंनी विचार केला कि कैलासवासी अमरशीभाई खारेचा यांची, त्यांच्या मृत्यूपत्रात नोंद असलेली रक्कम शिवाम्बूविषयक तळमळ लक्षात घेता या रक्कमेला वारस खर्या अर्थाने आनंदकुंजच होऊ शकतो. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. त्या ट्रस्टची ही अमानत रक्कम आनंदकुंज या ट्रस्टला देऊ केली. खारेचा परिवाराची ही त्यांनी अनुमती मिळवली.
गुजरातची इतकी मोठी रक्कम महाराष्ट्रात जातेच कशी? अशा प्रकारचा गुजराती लोकांचा रोष असतानाही तिकडे डोळे झाक करून ही रक्कम आली होती. वरचेवर जगदीशभाई मला म्हणायचे, “आम्ही इतके लोक शिवाम्बू प्रेमात पडलो असलो तरीही आमच्या घराघरामध्ये मात्र याला होणारा विरोध आम्ही टाळू शकलो नाही. एकीकडे मुलांचा विरोध, तर दुसरीकडे पत्नीचा विरोध. मोरारजी भाईंंसारख्या पंतप्रधानालाही त्यांचे चिरंजीव कांतीभाई विरोध करीत होते. तुम्ही मात्र अख्या परिवाराला शिवाम्बू प्रेमी बनवलेच कसे? याचेच आम्हाला गुजराती लोकांना आकर्षण आहे. तुमची दोन्ही मुलं यातच झेपावली कशी?”
याचं आम्हाला कौतुक वाटतं. हेच एक निमित्त आनंदकुंजच्या प्रेमात पडायला झालं आहे. हळू-हळू अशा प्रकारे छोटया-मोठया रक्कमा येत गेल्या. आनंदकुंज विकसित झालं. अशा रीतीने निसर्गाच्या सानिध्यात डोंगराच्या रांगेत, झाडी-झुडुपांच्या छायेत आनंदकुंज अनेकांच्या प्रेमात पडला. काय होती निष्ठा? काय होती भक्ती? कशाने दुर्धर रोग बरा होत होता?
खरं तर या जगामध्यें विद्यमान शिक्षण, जगावं कसं? सुख-सुविधा मिळाव्यात कशा? पदप्रतिष्ठा संपादाव्यात कशा? आपल्या बरोबरच्या शत्रूला नामोहरण करावं कसं? याचं शिक्षण शाळा, कॉलेज, युनिर्व्हसिटी देत आहेत. या एकाच प्रकारचे शिक्षण तेथे मिळते. जीवनावश्यक गोष्टी कशा संपादित करायच्या हे शिक्षण तसं अधुरं, अर्धचं आहे. कारण, जीवनाचे कौशल्य, जगावयाचे शिक्षण देऊन रिकामे झालात. दूसरे शिक्षण याही पेक्षा महत्त्वाचे आहे. अन् ते शिक्षण पूर्वी गुरूकुलात दिलं जायचं. ते शिक्षण आहे, मरताना मरायचं कसं? मृत्यूला स्विकारायचं कसं? मृत्यूला अलिंगन द्यायचं कसं? गुरूकुल समाजाला या दोन्हीचं शिक्षण देत असतं. म्हणून तर जीवनाला चार हिश्यांमध्ये विभागलं होतं.
जीवनाच्या सुरूवातीची पंचवीस वर्षे विद्यार्थी अर्थात ‘ब्रम्हचारी जीवन’ ज्यात गुरूंचे सान्निध्य चोवीस तास असायचे. ज्यामध्ये जीवनांची बांधाबांध व्हायची. मग पुन्हा पंचवीस वर्षे लोक ‘गृहस्थाश्रमी’ व्हायचे. जे आपण शिकलो त्याचा व्यावहारिक प्रयोग करत-करत पन्नास वर्षे निघून जायची.
उरलेल्या पंचवीस वर्षांत ‘वानप्रस्थ’ याचा अर्थ जंगलाकडे तोंड, घराकडे पाठ वळकटी बांधून तयार असायचे. तोपर्यंत तुम्ही पंच्याहत्तरी गाठत असायचे. उरलेल्या पंचवीस वर्षांत कंपलसरी ‘सन्यास’ असायचा. यामध्ये मृत्यूची पूर्व तयारी व्हायची. हे सगळेच धडे मरताना जीवाची धडपड होऊ नये म्हणून पूर्वी गुरूकुलं ही शिक्षण द्यायची. त्यामुळे तनाव नव्हता, भय नव्हतं. त्यामुळे अतिरेक नव्हता. अतिरेकी नव्हते.
आता बहुसंख्य जनता, शंभरीपण गाठू शकणार नाहीत अशी अवस्था झालेली आहे आणि मग पूर्वीच्या गुरूकुलाचे काम आज आनंदकुंजने शिरावरती घ्यावे अशी माझी तरी मनिषा आहे. तसेच ट्रस्टच्या नियमामध्ये स्पष्ट नमूद केले आहे. त्याला ‘सद्गती होम’ असे नामविधान केले आहे. जसं मॅटरनिटी होम, चिल्ड्रन होम, रिमांडहोम, वृद्धाश्रम ही नावे समाजामध्ये नव्या शिक्षणाने जन्माला घातलेली आहेत. आजचे वृद्धाश्रम हे संन्यासी जीवनाचे धडे देऊ शकतील. तीही उणीव दूर होईल. आजच्या वृद्धाश्रमामध्ये विपश्यना-ध्यान प्रयोग मन प्रसन्न होण्यासाठी आरंभ केला तर किती बहार होईल. ज्याच्या मध्ये ध्यानप्रयोग, सत्संग, प्रवचन, कीर्तन, संगीत यांची रेलचेल असेल.
आज लोकांना मृत्यूचं वावडं झालं आहे. रस्त्यातली प्रेतयात्रा आपल्याला खबर देत असते. हेच लोक मलाही असेच पोहचवणार आहेत. हा विचार सुद्धा जीवनामध्ये क्रांती घडविणारा आहे.
बुद्धांच्या जीवनात क्रांती झाली. समाजाने मुर्दाडपणा दाखवावा तरी किती? आम्ही लोक काचेच्या भिंती निर्माण कराव्या तर किती? चितेच्या धुराच्या आडोशाला व्हावे तर किती? आपणचं आपल्याला फसवावं तरी किती? ही शांती होऊ शकत नाही. मात्र सांत्वना होऊ शकते.
शांतीच्या मार्गानेच हा प्रश्न पूर्वजांनी गुरूकुलात सोडवला होता. तोच भाग या काळात आनंदकुंजने शिरावरती घ्यावा. ज्यातून मृत्युचेही भय निघून जाते. हळू-हळू वृद्धाश्रमें सद्गती होमची प्रतिकृती होतील. वृद्धश्रमाची नेतृत्त्व संत महंतानी करायला हवं. डॉ. वैद्य लोकांनी जाणायला हवं. ज्यांचा अंत्य समय नजीक आला आहे तो व्हि. आय. पी. व्हायला पाहिजे. त्याला मंदिराच्या गाभार्यात घ्यायला हवं. त्याला हिरोचं महत्त्व यायला हवं. तो कम समयाचा मेहमान आहे.
बस्ती प्रयोगाने मलाशय साफ करून स्पंजबाथने शरीर साफ करून धूप, अगरबत्त्तीने सुगंधाने शुचिर्भूत करायला हवे. तना-मनाच्या पलीकडे त्याचं दर्शन व्हावं म्हणून तंग कपडे काढून शुभ्र कफनी वजा पेहराव करावा. मी नेमका कोण असे अचूक मर्मभेदी विधान योजून कानाला हेडफोन इत्यादी आधुनिक साधन-सामुग्री जरूर तर वापरून त्याचा गोड निरोप घेता आला पाहिजे. त्याचे मन परिवर्तन करता आलं पाहिजे.
‘अंत्यमती, सो-गती’ त्या बिचार्याला साधता आली पाहिजे. तरच ती सद्गती होमची परिसीमा ठरेल. ब्रिटीशांच्या ऑपरेशनच्या थिएटर मध्ये मिरजेला काही ठिकाणी संबंधित पेशंटच्या नातेवाईक इत्यादी लोकांना ऑपरेशन पाहण्याची संधी असायची. मौन धरून हे लोक पहायचे. सेम तसेच असे एक दालन सद्गती होमच्या गाभार्यात असावं. असं जर सर्व सुविधांनी युक्त सद्गती होमच्या मागे अशी माझी कल्पना आहे.
मरावं तर इथचं मरावं. सेवा करावी तर इथचं येऊन करावी. उपचार घ्यावा तर इथेचं येऊन घ्यावा. चार विचार इथचं येऊन ऐकावे. चार श्वास शेवट विश्वासाने इथचं येऊन घ्यावेत. असं प्रत्येकालाच वाटू लागेल आणि असा हा आनंदकुंज झालाच तर नावाप्रमाणे अंतर्धान पावला असं म्हणावं लागेल. मरणाच्या अटळ असलेल्या गोष्टीतून मुक्त झालो. कुणालाच मरण सुटलेले नाही. सर्वांना या एकाच वाटेने निरोप घ्यायचा आहे. आपल्या प्रत्येकाच्या मध्ये जो अमृताचा दिवा जळतो आहे. त्याचा जेव्हा आपण अनुभव घेतो, तेव्हा मृत्यू होतोच कुठे? मग पुन्हा लांब प्रवासाला निघतो फक्त देहवस्त्र बदलतात. ‘हन्न् हन्नते, हने शरीरे' याचा अर्थ, ‘मरण्याने तो आत लपलेला आत्मा मरत नाही. ज्या ठिकाणी आपल्यातल्या या अमृताची प्रचिती येते. त्याच ठिकाणी सर्वातलं अमृत दर्शन होतं. सर्वच देहधार्यांना मरावं लागतं.’
ज्याने अमृताला जाणलायं, ज्याला आत्मसाक्षात्कार झालायं त्या अमृताला म्हणजेच स्वतःला निरोप घेण्याची ही कला म्हणजे एक क्रांती आहे. जीवनाचं संपूर्ण लक्ष्य एक सदे तो सब सदे हेच उद्दिष्ट आहे. आयुष्यभर साधना करून साधकाला हे शेवटी प्राप्त करायचं असतं.
क्रमश: