मुळनक्षत्री : एक प्रेरणादाई जीवनधारा : भाग - 6

शिवाम्बूची ध्वजा रूमानियात

देशी उपचारासाठी, स्वदेशी उपचारासाठी, परदेशाहून बोलावलं जाईल असं मला वाटलचं नव्हतं. निसर्गोपचाराबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी, लोकांमध्ये या पद्धतीची आवड निर्माण व्हावी, यासाठी माझे विविध प्रयोग सुरू आहेत, सुरू राहणारं. मला जवळ-जवळ वैद्यकीय क्षेत्रात काम करायला सुरूवात करून अर्धशतक पूर्ण झालं.

माणसाला जखडून बेजार करणारे अनेक रोग, व्याधी सर्वत्र आहेत. या सर्वांवर कोणतेही समान औषध इलाज म्हणून चालताना मी पाहिलं नव्हतं. पण निसर्गोपचाराचा अभ्यास करताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती गोष्ट म्हणजेच, ‘स्वमूत्र उपचार’ अर्थात ‘शिवाम्बू चिकित्सा’.

29 एप्रिल 1989 रोजी ‘अथेन्स' या ग्रीस मधील शहरात झालेल्या ‘इंटरनॅशनल वैकल्पिक चिकित्सा' मेळाव्यामध्ये डॉ. जी. के. ठक्कर यांनीही भाग घेतला होता. त्यांनी ह्या शिवाम्बूची माहिती शोध निबंधामध्ये दिली होती.

त्यामध्ये हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, दमा, कुष्ठरोगी, या उपचाराने कशी बरी झाली आहेत, आदींची सविस्तर माहिती आणि या अनुभवाचा सविस्तर ऊहापोह त्यांनी आपल्या शोधनिबंधात केला होता.

‘वंडर्स ऑफ यूरोपॅथी’ या नावे आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रामध्ये ती प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये माझ्या कार्याचा कोल्हापूर क्षेत्रात चाललेल्या कामाचा विशेष उल्लेख केला होता.

रूमानियातील बुखारेस्ट या शहरातील होमियोपॅथी व अ‍ॅक्युप्रेशर तज्ञ डॉ.डिंकास स्थेलुता यांची नजर शोधनिबंधावर पडली. त्या विशेष निबंधाच्या प्रती त्यांच्या हाताला लागल्या.

अ‍ॅडव्होकेट ठक्करांना आपल्या निबंधाच्या प्रती विविध भाषेत प्रसिद्ध झाल्याची विशेष कल्पना नव्हती. डिंकास स्थेलुता हिच्या शेजारी राहणार्‍या सोफिया या युवतीवर हा उपचार करून पाहावा का? तिला स्तनाचा (ब्रेस्ट) कॅन्सर होता. त्या मरणाच्या दाढेत होत्या. त्यांचं वय 30 वर्षाचं होतं.

नानाप्रकारचे औषधोपचार व उपाय आधीचं झाले होते. जगेल तितके दिवस अशी मनस्थिती असणार्‍या सोफियाची आई स्थेलुता ओघेल हिला डॉ. डिंकास यांनी या उपचाराची कल्पना दिली. त्यावरून श्रीमती ओघेल यांनी मला एक पत्र लिहिलं, त्यात आपल्या मुलीच्या आजाराचा उल्लेख केला. त्या पत्रामध्ये तुम्ही येऊ शकाल का? मात्र हवाई प्रवास व उपचारासाठी खर्च करण्याची तयारी नसल्याचे लिहिले होते.

दरम्यानच्या काळामध्ये त्या डॉ. डिंकास यांचा संबंध राजकीय पाठबळ असलेली महिला व्यक्ती मारिया हिच्याशी आला. ही पण ब्रेस्ट कॅन्सरने अत्यवस्थ होती. तिलाही या उपचाराचा महिमा समजवला गेला.

आपल्याकडच्या रवींद्रनाथ टागोर यांच्याप्रमाणे ती रूमानियन कवयित्री, राष्ट्रगीत निर्माती होती. तिने आपली शक्ती माझ्या प्रवासासाठी लावली. तिने मला पत्र लिहिले, आमंत्रण केले.

मीही यायला तयार असल्याचं उत्तर लिहिलं. या पत्राची इतक्या सहजपणे दखल घेतली जाईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझ्या डोक्यातून हा विषय केव्हाच निघून गेला होता.

नोव्हेंबर महिन्याची दुसरी तारीख. मी उपचार विभागात बोलत होतो. इतक्यात एक तार घेऊन तारमन आला. मला वाटलं मुंबईतून कोणातरी पेशंटची आगमनाची तार असेल. माझ्याकडे फोन    व्यवस्था नव्हती.

फोन कनेक्शनसाठी रू. 35000/- डिपॉझिट माझ्याकडे नव्हते. यामुळे आमच्या केंद्राला सर्वच लोक तार करून येत असतं. नेहमीप्रमाणे काम आटोपून मी तारेचा कागद उघडला. ही तार लांबलचक कोणाची आहे म्हणून सहज मागे पाहिले तर त्यामध्ये मुंबईतील रूमानियन राजदूताचे नाव होते. कुतूहलाने मी तार वाचली.

ती तार हिंदीमध्ये होती व त्याचा भावार्थ खालीलप्रमाणे होता.

प्रति,

डॉ. शशी पाटील

शिवाम्बू भवन, कोल्हापूर

आपण युरोपॅथी या उपचार पद्धतीतील तज्ज्ञ आहातं असे आम्हाला समजले आहे. कॅन्सर आणि इतर दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी तातडीने आपली आवश्यकता आहे. कृपया तातडीने आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

-श्रीयुत एन. के. शहा

तारेत शेवटी मुंबईतील रूमानियन राजदूताच्या कचेरीचा पत्ताही दिला होता.

ही तार मिळाल्यापासून तिसर्‍या दिवशी तारेत उल्लेख केलेल्या राजदूताला घेऊन श्रीयुत एन. के. शहा मला शोधत घरी आले. त्याबरोबर आगमनाचा निर्णय ताबडतोब घ्यावा अशी विनंतीही केली. वाटलं हे आव्हानं आपणं स्वीकारायलाचं हवं. त्यांनी मला सोबत टीम घेण्यास सांगितलं.

त्यावेळी माझ्या टीममध्ये माझ्या पत्नीशिवाय कोणीही नव्हतं. पत्नीला घेऊन निघायचं म्हणजे दाराला कुलूप. सर्व खर्च प्रवासाचा, जेवण-राहण्याचा सरकार करील. स्वतःला यातून काय प्राप्ती होणार की नाही? याचा मी विचारचं केला नाही.

परदेशात आपल्या या शिवाम्बू निसर्गोपचाराची ध्वजा अटकेपार फडकवायची संधी मजकडे चालून आली होती. स्वदेशी सामान्य माणसाला परदेशी जाण्याचा मोका हाच माझ्यासाठी मोठा होता. मध्यस्थी असलेल्या श्री. शहा यांना मी होकार देऊन मजबरोबर एकच व्यक्ती येईल, असे म्हणालो आणि ही मंडळी निघून गेली.

मला माझ्या विचाराचा, इंग्लिश जाणणारा जोडीदार हवा होता. माझ्या कॉलनीमध्ये माझे मित्र डॉ. सतीश पाटील यांना मी पत्र व आमंत्रणाची तार दाखवली. मी सोबत यायला तयार आहे असे म्हणून त्यांनी तयारी दर्शविली. हे स्वतः वकील असून सर्जन आहेत. शिवाय पैलवानही आहेत. म्हणजे कायद्याचा, शक्तीचा व वैद्यकीय माहितीचा साठा डॉ. सतीश पाटील या निमित्ताने मला मिळाला होता.

अपरिचित देशात प्रवास जाणकाराची मलाही जरूरी होती. पासपोर्ट, व्हिसा यांची जबाबदारी एन. के. शहा यांनी घेतली. यासाठी जी धावपळ करावी लागली ती त्यांनी केली. कागदपत्रावर नाममात्र सह्या मी केल्या.

11 नोव्हेंबर 1990 हा कोल्हापूर सोडावयाचा दिवस ठरला. त्या दिवशी माझे अनेक शिवाम्बूप्रेमी मित्र मला शुभेच्छा देण्याकरिता हार-तुरे घेऊन हजर झाले. त्यात डॉक्टर, वकील, प्रोफेसर, आमच्या महामंडळाचे पदाधिकारी, ज्यांना उपचार देऊन बरे केले ते स्वास्थ्यप्रेमीही होते. सर्वांनी मला ‘हॅपी जर्नी व यशस्वी व्हा’ म्हणून सदिच्छा दिल्या. रात्रीच्या रेल्वेने कोल्हापूर सोडले.

दुसर्‍या दिवशी सकाळी 8 वाजता बोरीबंदर (व्ही. टी.) ला उतरताच आम्हाला घ्यायला रूमानियाचे राजदूत श्री. मारीन ओवोनेल इथेही ते जातीने हजर होेते. त्यांनी आपली गाडी आणली होती. सोबत एन. के. शहा होतेच. भारतातच मी रूमानियाचा पाहुणा बनलो होतो. त्यांनी आम्हाला निपीशन्सी रोडवरील हॉटेल रिजन्सीमध्ये उतरविले. नीट व्यवस्था लावून दिली. पुन्हा दुपारी 2 वाजता भोजनाला न्यायला आले. डॉ. सतीश पाटील येईल त्या प्रकारचा आहार स्वीकारायला तयार होते. पण मी आपल्या उपचार मूल्यांशी चिकटून होतो. ओवोनेल यांच्या हे लक्षात आले. मी केवळ टेबलवरील शेंगदाणे-फुटाणे खात असताना ते म्हणाले,  “तुमची आमच्या देशात कुचंबणा होऊ शकते. त्याकरिता मला इथचं काही केलं पाहिजे.”  दरम्यान ही मंडळी बिअर पीत होती. मी सलाड खात होतो. शाकाहारी पुलाव खात होतो.

जेवण आटोपल्यावर त्यांनी आम्हास रात्री 11 वाजता तयार राहण्यास सांगितले. पहाटे 3.30 ला विमान जर्मन मार्गे फ्रॅन्कफूटकडे उडणार होते.

श्री. मरीन ओवोनेल यांनी माझ्या करिता ड्रायफ्रूट, शाकाहारी पदार्थांची रेलचेल भरून बिग बॅग आणली होती.  “ही आमच्या देशामध्ये तुम्हाला उपयोगी पडेल म्हणून सोबत घेऊन चला.”  असे ते अत्यंत अदबीने म्हणाले.

ऑफिस कामातील दफ्तरी कामकाजाकडून कोणत्याही व्यत्यय येऊ नये म्हणून विमानात स्वार होईपर्यंत ते आम्हा बरोबरच राहिले. ज्या अडचणी आल्या त्या त्यांनी निवारण केल्या. रात्री ठीक 3 वाजता आम्ही विमानात शिरलो.

माझीही तशी विमानात शिरण्याची पहिलीच वेळ होती. लुप्तांझाचे हे मोठे थोरले विमान साडेतीन वाजता सुटले. तिथेही निरोप द्यायला शिवाम्बू प्रेमी जी.के.ठक्कर काही गुजराथी मित्रांना घेऊन आले होते.

अशा रीतीने 13 नोव्हेंबर 1990 रोजी जर्मन हवाई मार्गाने आम्हा शिवाम्बू चिकित्सकांना मरिन ओवोलेन यांनी भारतातून आपल्या देशाकडे पाठविले.

अंधार्‍या रात्रीचा पाठलाग करीत हे धूड विमान फ्रॅन्कफ्रूट या जंक्शन विमानतळावरती 250 प्रवाशांसह सुखरूप उतरले. भारतीय वेळेनुसार दुपारचे 12 वाजले होते. तिथल्या सूचनेनुसार हवाई सुंदरीचा निरोप घेत घडयाळाच्या सकाळचे सात वाजेपर्यंत फिरवून एअर पोर्टच्या प्रतिक्षा विभागात आलो. अख्खं विमानतळ नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळे ओलेचिंब झाले होते.

गर्द धुक्यात सापडलेली सकाळ अत्यल्प प्रकाश टाकून येत होती. मोठं विलाभनीय दृश्य होतं ते. रूमानियातील बुखारेस्ट या राजधानी असलेल्या शहराकडे संलग्न असलेल्या हवाई जहाजाची वेळ सायंकाळची 5.30 ही होती. तोपर्यंतचा काळ मॉडर्न शॉपिंग सेंटर पाहत काढणे खेरीज पर्याय नव्हता. चमचमणारी दुकाने, झगमगणारा प्रकाश आणि मॉडर्न जर्मन टेक्नॉलॉजी पाहत-पाहत केव्हा चार वाजले कळालेच नाही.

बुखारेस्टच्या एअर लाईनवर सायंकाळी 5 वाजता दुसरे छोटे विमान प्रवाशांना आत घेत उभे होते. त्यामध्ये आम्ही शिरून आसनस्थ झालो. बरोबर 5.30 वाजता हे विमान सरकू लागलं. सलग तीन तास आकाशगमन करीत बुखारेस्टच्या तळावरती आम्ही 8.30 वाजता उतरलो.

इथल्या वेळेनुसार घडयाळयातील काटयांना 9.30 वाजेपर्यंत पुढे ढकलून विमानातच प्रवासकाळात नाश्ता जेवण उरकले होते. विमान कंपनी मार्फतच ती व्यवस्था होती. सरकणार्‍या पायर्‍या, वातानुकूलित व्यवस्था, थंडीचा स्पर्श जाणवत नव्हता. त्यामुळे आम्हा हाफ सफारी घातलेल्या दोघा भारतीयांना उबदार कपडयाची आवश्यकता वाटली नव्हती.

बुखारेस्ट विमानतळावरील दालनात दोन तरूण हातात कागदी फलक उंचावून उभे होते. त्यावर चक्कं लिहिलं होतं. भारतीय डॉक्टरांकरीता. यांना लांबूनच हाताने आम्ही मान्यतेचा संदेश दिला. आमच्या कडील लगेज ही मंडळी घेऊन निघाली. तेव्हा त्यातल्या एक जणाने दोन पावले पुढे येऊन हातातील बॅग घेऊन, अंगावर मोठे रूमानियन कोट चढवून वातानुकुलितच्या हद्दीतून कार पार्किंगकडे आणले. बाहेर येताच थंडीची तीव्रता जाणवली. थंडी मिळेल त्या वाटेने आत शिरत होती. कारचा दरवाजा उघडून सुहास्य वदने अभिवादन करून, गाडीत बसण्याकरीता अनूज्ञा झाली. या स्वागतकरांना खुणवण्या खेरीज व रूमानियन भाषेखेरीज दुसरी कोणतीही भाषा येत नव्हती. समुद्रासारख्या रस्त्यावरून भरधाव वेगाने बेफामपणे गाडी चालवित होते. हे लोक आपल्याला अपहरण करून नेत नसतील ना? अशी पाल चुकचुकली असे वातावरण होते.

हा-हा म्हणता एका मोठया चौकाच्या वळणावर गाडी थांबली. एका अपार्टमेंटच्या प्रवेशद्वाराजवळ ही मंडळी लगेज बाहेर काढत लिफ्ट पर्यंत आली. लगेजसह आम्ही चौघे सहाव्या मजल्यावर आलो. वांदा ऐने नेमप्लेटच्या बंद दरवाज्यासमोर बेल दाबली. त्याबरोबर दरवाजा उघडला.

पाच-सहा महिलांनी तिथल्या रीतीरिवाजानुसार स्वागत करून भारतीय चिकित्सकांना आसन ग्रहण करायला सुचविले. त्यावेळी आपल्यापैकी डॉ. शशी पाटील कोण? हे प्रथम विचारण्यात आले. परस्परांचा परिचय करून घेण्यास जवळ-जवळ रात्रीचे अकरा वाजले होते. युरोपियन थाटामाटाचे घर व सुव्यवस्थित अंतर्रचना पाहून मन प्रसन्न झाले. माझी ओळख लक्षात येताच डॉ. सतीश पाटील यांच्याकडे बोट करून हे कोण? असे विचारण्यात आले. त्यावेळी मी हे सर्जन आहेत अशी कल्पना देताच त्या म्हणाल्या,  “यांना कशाला घेऊन आलात? ही मंडळी आमच्या देशात कमी नाहीत. यांच्या ऐवजी तुम्ही योगा टिचर यांना घेऊन आला असता तर बरं झालं असतं.”

ज्या रूग्णाच्यासाठी या कुटुंबियाला इतकी यातायात जी करावी लागली. ती महिला मारिया पालिगोरा याच इमारतीत आपल्या बहिणीकडे म्हणजेच वांदा ऐने हिच्याकडे उपचार शुश्रूषाकरिता आली होती. डॉक्टरांचा पहिला प्रभावच रूग्णांवर टिकून राहतो. तेव्हा आपण उद्या सकाळीच या रूग्णाची हजेरी घेऊ. असे माझे सहकारी मित्र डॉ. सतीश पाटील यांनी सुचविले. प्रत्येकाला स्पेशल बेडरूम देण्यात आले होते. केवळ झोपेचीच जागा काय, सर्वच नवे होते तरी सुद्धा झोप पडल्या-पडल्या आलीचं.

दुसरा दिवस उगवला. पण सूर्य मात्र दिसत नव्हता. इतक्या धुक्यात सर्व परिसर व्यापला होता. सतत सर्द गर्द वातावरण होते. प्रातःविधी आटोपले. पेशंटही आमच्या स्वागतासाठी तयार होता. दुभाषी क्रिस्तिना जशी आली तसे आम्ही सर्वजण गुडमॉर्निंगच्या गजरात मारियाच्या खोलीत शिरलो.

लख्ख प्रकाशात मारिया रूग्णशय्येवर भिंतीचा आधार घेऊन बसली होती. उंचीपुरी मारिया प्रथमदर्शनी सिनेसृष्टीतील फिल्म अभिनेत्री नूतन याप्रमाणेच वाटली. कसे बसे ओढून ताणून ती आमचे स्वागत करू पाहत होती. हे अगदी सहजपणे जाणवत होते. मुळात गोरा असणारा तिचा युरोपियन वर्ण त्यामध्ये अ‍ॅनिमियाची भर साहजिकच निळ न घातलेल्या कपडयासारखी तिची कांती दिसत होती. अशक्तपणामुळे त्वचा व डोळे अगदीच निस्तेज वाटत होते.

तिची चालू स्थिती ज्ञात व्हावी या प्रयोजनाने आम्ही तिला आमच्या समवेत असणार्‍या दुभाषिक क्रिस्तीनाच्या मध्यस्तीने काही प्रश्‍न विचारले. तेव्हा मारिया सांगू लागली, ‘तुम्हाला न दिसणारा वाघ मला आतून पंजा मारतो आहे.’

कोणतीही हालचाल करणे अशक्य झालेली मारिया स्तनावर करण्यात आलेल्या कर्करोगावरील शस्त्रक्रिया आम्हाला दाखवित होती. तिची चालू स्थिती समजावी म्हणून क्रिस्तीनेच्या मदतीने काही प्रश्‍न विचारण्यात आले. त्या प्रश्‍नांना तिने रूमानियन भाषेतून उत्तरे दिली.

कारण तिला रूमानियन भाषेखेरीज अन्य कोणतीही भाषा अवगत नव्हती. 42 वर्षाची मारिया ही व्यवसायाने इंजिनियर आहे/होती. कॅन्सरने तिला अगदी कमरेपर्यत धरले होते. बोलताना अगदी खोकल्याची उबळ तिला सलगपणे बोलू देत नसे. कॅन्सरची लक्षणे पसरली असल्याची वस्तुस्थिती माझे मित्र डॉ. सतीश पाटील हे मला सांगत होते.

अगदीच आर्त स्वरात मारिया सांगू लागली होती,  “आतापर्यंत मी माझ्या अनेक मैत्रिणींना याच अवस्थेत या जगाचा अगदी कायमचा निरोप घेताना पाहिलं आहे. तसा हा रोग मला नवीन नाही.”  असं सांगून प्राप्त परिस्थितीला सामोरे जायची तिची मनिषा झाली होती. बर्‍याच दिवसात झोप नाही. त्या झोपेसाठी काहीही करा. ही एकमेव विनंती मात्र तिने आम्हाला यावेळी केली. सर्व औषधे नाकाम झाली होती. 

बर्‍याच वेळा भाषेअभावी कामकाज अडत होते. पण उपचार पद्धतीचा सहवासानंतर अपरिचितपणा हळू-हळू दूर झाला. रांगत्या बालबोध भाषेमध्ये डिक्शनरीच्या मध्यस्थीने शब्दार्थ शोधत-शोधत आमच्या उपचाराची वाटचाल बुखारेस्टमध्ये असणारे भारतीय राजदूत श्री. जे. एफ. रिबेरो, यांच्या सहयोगाने, व त्यांचे सेक्रेटरी श्री. जोशी व बांग्लादेशचे पालिलोवा हे हिंदीसह बोलणारे रूमानियन भाष्यकार सहज मिळाल्यामुळे परस्परांच्या विचारातला दुरावा व तणाव बर्‍याच अंशानी दूर होत निघाला.

 या उपचाराच्या मर्यादा व शर्ती याबाबत जे मी सांगत होतो. त्यातल्या आणि-परंतु सह ते भाषांतर करून वर्तवित होते. यामुळे संपूर्ण परिवारास माझे म्हणणे आकलन झाल्याचे भाव त्यांच्या चेहर्‍यावरून मला ज्ञात होत होते.  “यू आर व्हेरी ग्रेट”  असे म्हणत वांदा ऐने या माझ्या पाठीवरून हात फिरवित होत्या. भारतीय तत्त्वप्रणालीवर गाढा विश्‍वास असणार्‍या मारिया पालिगोरा या होकारार्थी संमती देत होत्या.

थोडक्यात मी सांगत असलेली चिकित्सा म्हणजे.....प्रत्येक मरणासन्न रोग्यांनी, आपल्या देहातून पास होणारी युरीन सर्वच्या सर्व ज्या-त्यावेळी प्यावयाची, मधून-मधून सूर्यस्नान व शिळया मूत्राचा सर्वांगास मसाज (अंगमर्दन) करून घ्यावयाचा, दुखर्‍या असहय भागावर चार पदरी कापडाची, लघवीत भिजवलेली घडी वाळेल तशी ती भिजवायची, ठिंबक सिंचित शिवाम्बूला एनिमा तसेच भूकेची जाणीव होऊ नये म्हणून पेशंटला अधून-मधून स्वच्छ पाणी पाजावयाचे. या शिवाय अ‍ॅक्युप्रेशर, स्टिम स्पंज बाथ, वेदना शामक रूईच्या चिकाच्या टिकल्यांचा प्रयोग, ज्यामुळे टच अ‍ॅण्ड गो, याची प्रचिती तिलाही यायची.

झाडाचा नमुना म्हणून रूईची मोठी फांदी सोबत घेतली होती. निद्रेकरिता रूग्णाच्या रूमानियन मातृभोषेत संमोहन प्रयोग आदींचा अंर्तभाव असलेली ही पद्धती उपयोगात आणीत होतो.

चिकित्सकांना भावपूर्णतेने केलेल्या प्रयोगास, रूग्णाकडून श्रद्धापूर्वक सहयोग मिळत गेल्यास स्वास्थ्याची मोहक फळे बहरतातच. यावर माझा पूर्ण विश्‍वास आहे. या प्रयोगाने चार-पाच दिवसात पेशंटमध्ये स्थित्यंतरे होऊ लागतात. हा मुळी माझ्या अनुभवाचा भाग आहे.

...आणि गंमत म्हणजे याप्रमाणे तिसर्‍या-चौथ्या दिवशी मारिया बिछान्यापासून अलग होऊ लागली. आमच्या हास्य विनोदात भाग घेऊ लागली. अख्खा परिवार शिवाम्बूपान करण्याच्या विचाराधीन झाला. मसाजच्या इतस्ततः उडणार्‍या शिवाम्बूच्या तुषारांना जिज्ञासेपोटी अत्तराप्रमाणे हाताना, कोटांना लावू लागली. इकडे माझ्यासोबतचे मित्र डॉ. सतीश पाटील मात्र कन्नडमध्यें मला म्हणू लागले कि,  “आपल्या देशातच खुळी माणसं नाहीतर इथं पण खुळी माणसं आहेत.”  त्यांची मात्र जिज्ञासा वाढत होती.

मारियाचा नवरा अधून-मधून येरझारा मारीत होता. आपल्या टकलेवरून हात फिरवित यावर काही मार्ग सांगाल का? आता मी मारियेला शोभायचा तरी कसा? अशी चेष्टा होत होती. म्युझिकच्या तालावर केला जाणारा मसाज व त्याला ताल धरून मिळणारा मारियाचा प्रतिसाद, यामुळे मारियाच्या अंगावर फिरणार्‍या माझ्या बोटांना जणू वन्स मोअर वाटत होता. चार-दोन तासांच्या मसाजनंतरही तिच्याकडून बस्स किंवा मला पूरे... असा भाव व्यक्त केला जायचा नाही. मसाजनंतर उबदार स्टिम स्पंज बाथ दिला जात असे.

रूग्णाच्या झोपेकरिता संमोहन तंत्र वापरले जाई. तिच्या रूमानियन मातृभाषेतील संमोहित विशिष्ट शब्द समूहाच्या, माझ्या उच्चाराद्वारे ती केव्हा झोपून जात असे हे तिचे घोरणे चालू झालेवर आम्हास कळून येई. तिचे आप्त लोक चकित होत मग तिच्या झोपेत कोणताच व्यत्यय येऊ नये किंवा तिने शांतता कायम राहावी म्हणून खबरदारी घेत.

विव्हळणार्‍या संवेदनशील मारियेचा देहक्लेश कमी करण्याकरीता व शांत झोपेकरीता जो शब्दसमूह आधार म्हणून निवडला होता, ज्याद्वारे संमोहन यशस्वी होत असे. तो रूमानियन स्वर व त्याचा मराठी अर्थ याप्रमाणे...

ये माझ्या मारिया, तुला असे काय बरे होत आहे?...

ओ माय मारिया! चेसे अंतिप्ल आंकूखू तेने.

अग, तुझ्या सर्व दुःखाचे औषध तुझ्याजवळ आहे...

त्वाते मिडिकामेटेले नेचे सारे सत्वे फाच बिने अंनतिने.

ही तर करूणाप्रिय निसर्गाची देण आहे...

आचेस्ते मेडीकामेन्टेले संत पुसे, अनतिने दे दुमने झेवो.

तुझे पूर्ण दुःख हरण करण्यासाठीच येशूने मला येथे धाडले आहे...

येसूज मादूस अन रूमानिया इत बुखारेस्ट सच यावो त्वाते दू-यारिले.

हिम्मत ठेव आणि शांत रहा. सर्व काही भले यात आहे...

फी कुराज्वास शिलिनिश्‍चित त्वतच्से अस्ते बिने पेन्त्रुतिने दिपिन्द्रे आचरता.

हे जग सर्वांनाच एक दिवस सोडावयाचे आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे...

त्वच त्रेबुये स परस्यास्क अनथ्रोजी सावावता आचास्तेलुमे सनु

ओ फिये फिक्र, यो संत संग तिने, पॅन्थ्रो आसल्या व्याजता.

मारिया, तू आता शांत झोपावयाला हवीस, आता खोल झोप लागेल...

मारिया इचेस्ते टीमपुल सोदर्मीमाय प्रफुन्द, तुन्हेअ आदोर्मी

सिनेचर प्रफुन्द.

तुझे शरीर तू पूर्णपणे ढिले सोड, चिंतेचे आता कारण नाही...

रिलाक्शाझच टोथ कोरपुल तव, नोई तोच सनतेम आईचा.

तुझ्या रोगाच्या समूळ उच्चाटना करिताच मी इथे आलो आहे.

एलिमिनम् बाला डीन तिने, आम अनचे पुत अनु त्राता मेन फ्वार्थे    बुन.

योग्य प्रभावी औषध तुझ्या स्वाधीन झाले आहे. हे दैवी औषध मात्र तू घे.

मुलते काजुरी सिमिलारे, ऑव फ्वॉस्त कंप्लेत विदेकांते,

षटु वेफी विदेकांत

याने गतःप्राण माणूस जागा झाला आहे. म्हणून तर

तू सहजच बरी होणार आहेस...

ते रोगनु रिसपिंजे त्राता र्मेतु पे कारे अल फाश्‍चेम.

तेव्हा मारिया कृपया तू आता डोळे झाक आणि अंग ढिले सोड...

सो मारिया इनाकिदे वॉकी प्लिज. अन चास्क सदोर्मी प्रफुन्द

बिलकुल हलू नकोस. शांत शांत झोप...

नुते मिष्का, सोमन उश्‍वर.

मी उठ म्हणेन तेव्हाच उठ...

नेत्र्यझी पननुअ, अच्यस्युन सते स्कोली.

विवेकानंदांना धर्म परिषदेसाठी शिकागेला येण्याचा चान्स मिळत होता, त्यामध्ये त्यांच्या प्रतिमेचा निनाद लोकांच्या लक्षात आला. तसचं काहीही करून हा आडवा पेशंट उभा करण्यासाठी व जगप्रसिद्ध होण्यासाठी हा एक मोका आहे असं समजून मी सर्व प्रयत्न पणाला लावले होते.

रूग्णावर इतर निसर्गोपचार करावयाला तिथे नैसर्गिक सुविधा नव्हत्या. नेहमीच प्रचंड धुके असायचे. थंडी तर बरीच बोचणारी असावयाची. यामुळे उपचार जितके जमतील तितके देणे चालू होते. आपल्या देशात इतस्ततः विखुरलेली रूई तिथे दीड-दोनशे किलोमीटरचे अंतर गाडी पळवूनही शेवटी मिळाली नाहीचं.

माझा विश्‍वास, शिवाम्बू इतकाच रूई या वनस्पतीवर देखील आहे. रूईचा चीक व्याधीच्या मुळांना उपसतो. तर शिवाम्बू त्याला देहातून बाहेर ढकलत राहते. अशा प्रक्रियेतून शुद्ध होत निघालेले शरीर पुन्हा लवकरच अशुद्ध होऊ नये म्हणून पहिली चार महिने माकड आहार (मंकी डाएट) अर्थात कच्चे, न शिजवलेले अन्न पदार्थ व पालेभाज्या, फळभाज्या यांवर अवलंबून राहण्यासंबंधी माझा आग्रह राहतो. कारण त्या देहाकडून शिवाम्बूसारखे अमृततत्व मिळवायचे आहे. ती अधिक गुणात्मक होऊन मिळण्यासाठी ही नैसर्गिक सुलभता आवश्यक आहे.

मारिया समजून होती कि, प्रभू येशूच कोणा भारतीयांच्या रूपाने माझ्या अंतिम क्षणी धावला आहे. आणि माझी समज होती की, परमात्माच कोणी या महिलेच्या रूपाने तरी माझी कसोटी घेत नसेल?

मारिया पालिगोरा हिच्यात होणार्‍या या स्थानाकुल फेर बदल्यामुळे इकडे आम्हा भारतीयांच्या दैनंदिन शिस्तीच्या उठाठेवीत रूमानियन जिव्हाळा खपत होता.

डॉ. डिंका स्थेलुता यांच्या कन्सल्टिंग विभागात शिवाम्बू चहात्यांची गर्दी वाढू लागली होती. पुन्हा स्तनाच्याच कॅन्सरने त्रस्त अशा पन्नास रूग्णांच्या नोंदी झाल्या. आपल्यातही या भारतीय परंपरेच्या ठेवीतून काही निर्वाणीचा स्वास्थ्य लाभ होईल का? हा आशावाद त्यात अभिप्रेत होता.

डॉ. डिंका स्थेलुता या, ‘युरोपॅथी’ ही ‘होमियोपॅथीचा’ बाप आहे, असे अभ्यासपूर्ण वक्तव्य मधून-मधून सल्ल्यांमध्ये करीत होते.      इथे   लवकरच या उपचाराची शाखा उपलब्ध व्हावी, असा मला आग्रह ही होत होता.

युरोपॅथी कन्सल्टिंगचा विभाग, माझे सहकारी मित्र डॉ. सतीश पाटील हे पाहत होते. परंतु सर्जरीची कला अवगत असलेले माझे सहकारी, काहींना सर्जरीच सुचवत होते. सर्जरीला व औषध उपायाला कंटाळलेले, आपण हे काय ऐकतोय? असे समजून कपाळावर रेषा उमटवून नाराजी व्यक्त करीत असताना दिसत होते.

मारिया पालिगोराची जिवलग मैत्रिण युरेका ही, मारिया बरोबरच माझी पण व्यवस्था पाहत होती. मोजे चढविण्यापासून थंडीचे कपडे क्रमशः कसे चढवायला हवेत? याचे निमित्त काढून, आग्रहाने माझ्यावरती कपडे चढवून प्रात्यक्षिक दाखवित असे.

माझ्या बेडचे स्टार्च टिनोपालचे बेडशिट रोजच्या रोज बदलले जायचे. अत्यंत विनम्र भाव त्यांच्या हालचालीत असायचा. जस-जसा मारिया मध्ये गुण दिसू लागला तस-तसा हा प्रकार वाढू लागला.

मसाज चालू असताना प्रत्येक 20-30 मिनिटांनी ऑरेंज ज्यूस अथवा सरबताच्या सरबत्तीला तोटा नव्हता. मसाज आटोपताच ‘यू आर ओबासित शशी?' असे म्हणून मी बसलेल्या खुर्चीसमोर, पाय ठेवून आराम करण्यासाठी, मऊ आसन ठेऊन आग्रह होत असे.

‘ओबासित’ याचा अर्थ रूमानियन भाषेत ‘दमणे’ असा आहे. ‘मुल्ची मास्क’ म्हणजे आभारी आहोत. ‘बुनियादी मिनाचा’ म्हणजे ‘शुभप्रभात किंवा गुड मॉर्निंग’ वगैरे अनेक व्यावहारिक शब्दसमूह आता परिचयाचे झाले होते.

कन्सल्टिंग विभागातून व इतर अन्य रूग्ण, आप-आपल्या घरातून मसाजकरिता वेळ मागून घ्यावयाचे काम वांदा ऐने यांच्या फोनवर डॉ. सतीश यांनी चालू ठेविले होते. या उपचार पद्धतीत मसाजला अनन्यसाधारण स्थान असल्यामुळे ही विचारणा होत होती. पण दणकट व मजबूत रूमानियन महिलांचा मसाज, मला जड जाणारा होता. आमंत्रण तर भारतातून येताना टीमसह येण्याचे होते. तेव्हा नाईलाजाने मी आपल्या सर्जन मित्राला म्हणायचो की,  “निदान पैलवानांनी तरी पैलवानांचा मसाज करायचा.”  कारण सतीश तसे मल्लही आहेत. शिवाय आपण अपॉइंटमेंट घेतलेल्यांचा तरी आपणच मसाज केला पाहिजे असा प्रेमाचा आग्रह मी धरीत होतो. सतीश नाही होय म्हणत कोल्हापूरी मर्दानी मसाजचा नमुना दाखवू लागले होते. शिवाम्बूप्रेमी नसतानाही शिवाम्बू मसाज करीत होते. शिळया शिवाम्बूचे महत्त्व असल्यामुळे शिळी शिवाम्बू आम्ही भारतातून नेली होती.

इथल्या स्त्रियांना पुरूषांकडून मसाज तिळमात्र ही संकोच नव्हता. त्यांना मसाज खूपच आवडत असे तेव्हा... फिरणार्‍या बोटांचे लगेच चुंबने घेतली जात. ही प्रतिक्रिया हीच त्यांची संस्कृती होती. बोटे शिवाम्बूत भिजलेली असतं.

मला बर्‍याच काळाचा मसाज अनुभव व सराव असल्यामुळे, अ‍ॅक्युप्रेशरसह नव्या अवगत तंत्रामुळे हाताची बोटे कसब दाखवित.

तेव्हा मारिया पालिगोरा म्हणत असे,  “शशी जर का मी यातून उठले तर, मी नक्कीच तुम्ही मला काय वाटलेत या बोटांनी माझ्यात  काय घडले? याचा तपशील म्हणजे ‘गोल्डन फिंगर्स’ नावाचा नवा    ग्रंथ असेल.”

13 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर पर्यंत या प्रकारच्या उपचार प्रयोगाला तब्बल वीस दिवस भरले होते. फक्त दोन सप्ताहाचा व्हिसा हाती होता. आम्ही दोन महिन्यांपर्यंत तळ हालवू नये असा आग्रह मात्र चालू राहिला.

औषधाशिवाय अनंत पर्याय निसर्गात रोगमुक्तीसाठी आहेत. रोगमुक्ती बरोबरच औषध मुक्ती सुद्धा ही काळाचीच गरज नजीकच्या काळात लक्षात येणारी आहे.

चिकित्सकांच्या करूणेतून, अर्थात लव्ह थेरपीने सुद्धा एकदा रूग्ण स्वास्थ्याकडे दृतगतीने ढकलणे कसे शक्य होते? याची प्रचिती बुखारेस्ट तिथल्या न कळणार्‍या अशा भाषेच्या अपरिचित देशात, मला घेता आली.

प्रेमाला ना भाषेची गरज आहे, ना व्यक्तिमत्त्वाची... पण निस्सिम श्रद्धा, अविरत प्रयत्न, उत्कट भाव व अगाध माणूसकी अर्थात करूणा, प्रेम, मुदिता या द्वारे शत्रूच काय तर रोग सुद्धा आपली जागा सोडतात. यावर माझा विश्‍वास वाढला. प्राचीन संतांच्या स्पर्शातून रूग्णांना आकस्मिक मिळालेले स्वास्थ्य हाच त्याचा गाभा असावा.

रोग्याच्या पिडेमुळे सर्व प्रयत्न जेव्हा थिटे पडतात. जेव्हा उपाय योजना नाकाम होतात, जेव्हा यम आपले पाश आवळत असताना दिसतो, निदान तेव्हा तरी... सर्व पूर्वग्रह दूर ठेऊन, मृत्यू नंतरच्या दुसर्‍या जगात प्रवेश करणार्‍या या चेतनेला, सर्व चिकित्सकांकडून अत्यंत भावविभोर होऊन दिलासा मिळावा.

योग्य आहार यातून देहशुद्धी व शूचिर्भूत प्रसन्न परिसर याचीही तेथे आबाळ होऊ देऊ नये... तरच आंधळे प्रेम डोळस बनू शकेल. असे माझे प्रामाणिक मत आहे.

एकदा सायंकाळच्या वेळी पाय रिकामे व्हावेत म्हणून आरामशीर भटकंती करण्यासाठी बाहेर पडलो. भारतीय पेहरावाची एक महिला रस्त्यावर जात असताना दिसली. रंगरूपासह इंडियन असणार्‍या या महिलेला थांबवून डॉ. सतीश पाटील यांनी ‘आपण इंडियनच ना मॅडम?’ असं विचारलचं. त्या सध्याचे भारतीय राजदूत श्री. जे. एफ. रिबेरो यांचे सेक्रेटरी श्री. जोशी यांच्या पत्नी होत्या. चालू असलेल्या कामकाजाचे विवेचन होताच, त्यांनी घरी येण्याचा आग्रह केला. त्यांच्या निर्देशित वेळात, श्री. जोशी घरी बोलावण्यासाठी गाडी घेऊन आले.

परस्परांचा परिचय देत त्यांच्या आलिशान घरात आम्ही प्रवेश केला. स्वास्थ्यावर प्रेम करणारे श्री.व सौ. जोशी यांचेकडून अनेक गोष्टी विचारल्या गेल्या. सर्व परिवारासह बुफे पद्धतीने बोलत-बोलत आहार केला. काही दिवसानंतर का असेना, हिंदुस्थानी आहार व हिंदी भाषा यामुळे हायसे वाटले.

एके दिवशी डॉ. डिंका व जोशी परिवार यांचा समेट घडवून आणला. एकंदर सर्व हकीकत ऐकून, जोशी यांनी भारत सरकारने आपल्या या उपचार पद्धतीकडे, आपल्या कामकाजाकडे लक्ष दिले की नाही? विचारले.

याच वेळी वांदा ऐनेच्या शेजारची युवाना ही कन्या, भारतीय पद्धतीचे आहार रहस्य समजून घेण्यात सौ. जोशी यांच्याकडे मश्गूल होती. ती मला सांगत होती, ‘आता शाकाहारी जेवण मी नक्कीच बनवू शकेन. आपण कोणत्या निमित्ताने इंडियाला परतण्याची भाषा करता पाहू या?’

“आमच्या इंडियाचा हा मनुष्य इतका साधा असताना तुम्ही यांच्या वरती इतके मोहित कसे झालात?”  असे श्री. जोशी, मारिया पालिगोरा हिच्या मिस्टरांकडे पाहत मला म्हणाले.  “याचे काय रहस्य आहे तुमच्याकडे?”  तेव्हा मी म्हणालो कि,  “सारं काही तुम्ही त्यांनाच विचारा?”

 “या मनुष्याने तीन दिवसामध्ये इंडियाच्या पारंपारिक उपचार पद्धतीने आमच्या पेशंटला उभे केले आहे. त्यामुळे हा मनुष्य साधा नसून येशूचाच अवतार असं आम्ही समजतो आहे.”

 “मग मी माझ्या दोन वर्षाच्या सर्व्हिसनंतर माझ्या निवृत्ती काळात दिल्लीमध्ये शिवाम्बू उपचाराची शिबीरे व संमेलने घडवून जनसेवेचे नवे पर्व उभे करेन.”  ही संकल्पना श्री. जोशींनी मनोभावे व्यक्त केली.

त्यावेळी मारिया पालिगोराचे मिस्टर श्री. जोशींना म्हणाले,  “यांना तुम्ही रूमानियाचे नागरिकत्व देता येते का ते पाहावे.”  तेव्हा मी त्यांना म्हणालो कि,  “माझ्या देशात माझी मुले-बाळे आहेत. माझा सर्व प्रपंच तिथे असताना मी इथे स्थायिक होऊ शकतो?”  तेव्हा ते म्हणाले की,  “इथेही तुम्ही तुमचा प्रपंच उभा करू शकता?”  असे विनोदाचे किस्से होत राहिले.

सर्व स्वयंपाक वांदाच्या घरी युवानाकडून येत असे. आम्ही इंडियाला परतणार ही भाषाच ती सहन करीत नव्हती. हवालदिल होत होती. कारण या सर्व परिवारासह, परिवाराचे, मारिया पालिगोरा या गोड महिलेवर सारखेच प्रेम होते.

दुसर्‍या दिवशी युवाना कोणत्याही देशाच्या नकाशाला शोभेल अशा चपात्या बनवून, काही कमी जास्त शिजवून, भारतीय स्वयंपाक घेऊन वांदा ऐनेच्या घरी आली. डोळयाला योग्य न वाटणार्‍या या आहार पद्धतीची प्रतिक्रया माझ्या चेहर्‍यावर पाहून, युवाना या मुलीने ताडले, ‘नो मिट नो एग’ (यात अंडी नाहीत व मटण नाही) असे ती पुन्हा पुन्हा उच्चारू लागली.

संपूर्ण उपस्थित परिवार हसत-हसत, हाच आहार करू लागला होता. दरम्यानच्या काळात सर्वांनीच मांसाहार बंद केला होता. या शाकाहाराचे कौतुक चालले होते. मी अल्पशे जेवण घेऊन आहार संपवित असे. तेव्हा वांदा ऐने, दुसरे कशाचे तरी प्लेट पुढे करीत असे. तेव्हा मी इनफ-इनफ म्हणून जागा सोडीत असे. तेव्हा वांदा अगदी काकुळतीला येऊन आपल्या गळयाला व बेंबीला हाताने घट्ट पकडून ‘नो एग नो मिट’ म्हणून आडवी हालत होती. तेव्हा सर्व हसत होते...

एकदा काय झाले मारिया पालिगोरा हिचे मिस्टर आम्हाला मार्केटमध्ये घेऊन गेले. तुम्हाला काय खरेदी करायचं असेल ते करा असं ते म्हणाले. आमची आठवण तुमच्याकडे राहू देत. मी आधीच अपरिग्रहवादी, ‘कम सामान प्रवास आराम’ या मताचा होतो. तरीपण त्या मार्केटमधील एक व्हायवोलिन मला मोहित करीत होता. त्याकडे बोट करून मी त्यांना तुम्ही हे मला देऊ शकाल का असे विचारले पण त्याची किंमत खूप असल्याची मोठे डोळे करून त्यांनी दाखवली. शेवटी काहीच खरेदी न करता फक्त मार्केट बघूनच आम्ही परतलो.

या दरम्यान प्रचंड थंडीमुळे माझे पायाकडून चालणे मुश्किल होत होते. पायाची बोटे थंड होऊन बधीर झाली होती. मी घरी येताच मारिया पालिगोरा मला आपल्या कॉटवर बसवून माझे पाय छातीजवळ घेऊन हाताने पाय चोळून गरम मसाज देण्याचा प्रयत्न करीत होती. तेव्हा ती म्हणाली की,  “इकडची ही थंडी फार बोचरी आहे ती तुम्हाला परत अपंग बनवू शकते. नव्या लोकांना या थंडीमुळे गँगरीन सारखा उपद्रव होऊ शकतो.” एवढे सांगून तिने उलनचे समृद्ध मोजे काढून माझ्या पायात चढवले.

वीस दिवसानंतर आमच्या परतीचा प्रवास होणार होता. आम्ही परत इंडियाला जाणे हे त्यांच्यासाठी फारच वेदनादायक ठरत होते.

हा पेशंट निसर्गाची अनुकूलता नसल्यामुळे पुन्हा अडचणीत येणार होता. त्याच्या आधीच इन टाइम निघणे मला क्रमप्राप्त वाटत होते. त्यासाठी माझी घाई होती. त्या पेशंटवर या सगळयाच परिवाराचे निरातिशय आंधळे प्रेम असल्यामुळे पेशंटचे स्वास्थ्य बिघडल्यानंतर हे सगळेच लोक मानसिकदृष्टया बिघडणार होते.

यासाठी परतीच्या प्रवासाचा मी हट्ट धरला. हे सगळेच परिवारातील मुले, मुली, स्त्रिया मोठया प्रमाणात सिंगार स्मोकिंग करत असल्यामुळे तसेच इमारतीचा अंतर्गत भाग पॅक असल्यामुळे सिगारच्या धुरांनी मी गुदमरत होतो. मी त्यांना म्हणत होतो की, माझी मान कुठल्या तरी खिडकीतून बाहेर काढून ठेवाल तर मी इथे काही क्षण काढू शकेन. एकंदर त्यांची संस्कृती, त्यांचं खाणं-पिणं आणि राहणं हे लक्षात आल्यानंतर या पेशंटचे भविष्य मला योग्य वाटलं नाही.

शेवटी आम्ही आमचा बोजा गुंडाळून परतलो. त्यांचा गोड निरोप वेळीच घेतला. या साहित्य सम्राज्ञीने अभिप्राय म्हणून एक पत्र लिहिले ते खालीलप्रमाणे होते, ज्याचा अनुवाद प्राध्यापकांनी केला आहे.

रूमानियन मारियेचे मनोगत...

मारिया पालिगोरा,

बुखारेस्ट, रूमानिया

या जगातून मी माझ्या मृत्यूनंतरच्या जगात असता, भारतीय दूत पाठवून भारतीय तत्त्वप्रणालीने तिसरे अभूतपूर्व जग मला दाखवले. माझा भविष्यकाळ हा काळाअधीन असला तरी, दरम्यान भारतीयांच्या स्वाधीन होताना, पुन्हा जगायला मिळणारं की काय? याची अंधुकशी खात्री मला होत आहे. सांस्कृतिदृष्टया जड जाणारी, मानसिकदृष्टया कठोर वाटणारी अशी पॅथी, पण... प्रेमाच्या या कुशल चिकित्सकांकडून मला प्रेमात पाडीत आहे. अगदी मरणाच्या उंबरठयावर असताना, हा जो एक अद्वितीय अनुभव मिळतो. याचे नियोजन संघटीतपणे करता येणार नाही का? मी अशा पुष्कळ लोकांना भेटले आहे जे जगण्याची आशा नसताना देखील श्रद्धा, विश्‍वास, परमेश्‍वर इत्यादींशी तडजोड करून हतबल परिस्थितीतून धडपडत असतात.

माझा स्वभाव, बालपणाचे संस्कार व माझा स्वाभिमान यांच्या जोरावर हा तडजोडीचा मोह मी आवरला होता. मी सुद्धा अशा अनिवार्य परिस्थितीत असताना शिवाम्बू सारख्या अतिप्राचीन उपचार तंत्राचा लाभ घेण्यात रस घ्यावा काय? कारण माझ्या मनात संशयाचे कल्लोळ होते की, या फंदात पडू नये, ही उपचार पद्धती क्वचितच वापरली जात असताना देखील, मला भारतीयांच्या परंपरेत खोल रूजलेली ही पद्धती, आणि त्यात भारतीय तर... जगातील अव्वल दर्जाचे अध्यात्मवादी.....!

डॉ. शशी यांच्या उपचार पद्धतीच्या यशाची तशी मला खात्री नसताना सुद्धा, केवळ माझ्या कुटुंबीयांच्या समजूती करता या उपचार पद्धतीला मी मान्यता दिली. हा चमत्कार नसून वस्तुस्थिती आहे. मला ही उपचार पद्धती पटत नव्हती. निसर्गोपचार तज्ञ डॉ. शशी पाटील यांनी, माझ्यात श्रद्धेचे बळ पुनःस्थापित केले आहे. मी माझ्या इच्छाशक्तीवर पूर्ण काबू ठेऊन या निसर्गदत्त वस्तुवर विश्‍वास ठेवला. जरी     आपल्या शिक्षण पद्धतीत केव्हाही याचा समावेश नसला तरी मी त्या        गोष्टी स्विकारल्या.

योग्य दिशेने ही उपचार पद्धती यशस्वी व्हावयाची असेल तर, कल्पनाशक्ती, चैतन्य व कुशल बुद्धी यांचा सम स्तरांवर संयोग झाला पाहिजे. परंतु आमच्यात फार मोठी अडचण होती. ती ही कि ज्यांनी प्रश्‍न निर्माण झाला होता ती अडचण म्हणजे डॉक्टर व रूग्ण यांच्यामध्ये संवादा करता एकच भाषा नव्हती. यावर मात करत डॉ. शशी पाटील यांनी हृदयाकडून हृदयाकडे हृदयाचीच भाषा अर्थात, अंतरीच्या बोलीची भाषा सुचवली. त्यामुळे दिलाकडून दिलासा, याची देवाण-घेवाण होऊ लागली आणि हा प्रश्‍न मिटला.

आपणाला यशस्वी व्हावयाचे असेल तर आपलं हृदय सताड उघडे करून त्यात दुसर्‍याचे हृदय मिळवले पाहिजे (दिल से दिल मिलाते चलो) अशी जुनी भारतीय म्हण आहे. रोगोपचाराची कारणे व परिणाम   यावरच्या विश्‍वासापलीकडे वस्तुस्थिती होती हे समजण्यासाठी ही म्हण वापरली आहे.

डॉ.शशी पाटील हे माझ्या जवळचे मित्र आहेत. अहंकार विरहीत सतत उद्योग, फलाची आशा न ठेवता, जीवनविषयक दृष्टिकोन आवश्यकरित्या सुस्थापित करणेसाठी, हे डॉक्टर, माता, पिता, बहीण-भाऊ इ. वेगवेगळया भूमिका करताना दिसले. उपचाराच्या अत्यवस्थ अवस्थेत आपल्या सभोवतालच्या लोकांचे संपूर्ण परिवर्तन करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे. ही उपचारपद्धती बरोबर समजून घेऊन ती अंतःकरणापासून स्वीकारली तेव्हा, त्या क्षणापासून तुमचे त्यांच्यावर अवलंबून राहणे संपुष्टात येते. त्यांच्यावर कायमपणे कसे अवलंबून   राहता यावे?

पहिले तीन आठवडे घेतलेल्या उपचार माध्यमांनी अपेक्षित परिणाम दिसून येतील असे म्हणता येणार नाही. ही उपचार पद्धती आपली श्रद्धा असेल तरचं ही एक गोष्ट सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये शाश्‍वत राहिल अशी आशा आहे.

जेंव्हा इतर प्रकारचे धागेदोरे समजून घेण्याची कुवत कुंठित होते, तेंव्हा या लोकांना परलोकात जाण्याच्या क्षणाला, शाश्‍वत साथ देणारी अशी एक अभिव्यक्ती म्हणजे, डॉ. शशी पाटील होय.

- मारिया पालिगोरा

एके दिवशी माझे वडील मला म्हणाले,  “मला हर्नियाचा व गुडघेदुखीचा त्रास आहे. ऑपरेशन करावयाचे ठरले. त्याआधी तुझ्या निसर्ग उपचाराने त्याला काही दाद मिळेल का?”  मला पाहायचे आहे.

मी वडिलांना म्हणालो,  “काय होतयं बघू या.”

मला पूर्वानुभव नाही. कारण हे शिवाम्बू घेणार नव्हते, शिवाम्बू मसाजही घेणार नव्हते. सगळे नियम माझे बांधावरती ठेऊन मी त्यांना शाश्‍वती देणार तरी कशी?

माझ्या शिवाम्बू भवनमध्ये एकदाचे ते दाखल झाले. मी त्यांना तेल मसाज करत होतो. ते मला मॉलिश करताना विचारायला लागले,  “तू ही सगळी मॉलिश करायची विद्या कुठे शिकलास? मी तुझा बाप आहे म्हणून इतकं सुंदर मॉलिश केलसं का असचं सगळयांना मॉलिश करतोस?”

तेव्हा मी वडिलांना म्हणालो,  “सर्वांनाच मी बाप समजून मॉलिश करत असतो.”

संत रोहिदास यांना त्यांचे धनिक भक्त म्हणत असायचे,  “आम्ही इतके मोठे-मोठे लोक तुमचे शिष्य झालो आहोत. आतातरी चर्मकाराचे काम तुम्ही थांबवावे.”     

तेव्हा रोहिदास स्वतः म्हणाले होते,  “काय करू तुम्ही सांगा. स्वतः रामच संध्याकाळपर्यंत हे जोडे तू शिवून दिलेच पाहिजेस असे म्हणत असेल तर तुम्हीच सांगा ते काम मी करू की नको.”

त्याप्रमाणे माझ्यासारख्या बाप गमविलेल्या व्यक्तिला प्रत्येकात बाप शोधण्याची गरज होती. वाल्या कोळयाला राम वाली मिळाला. तसा मला कोणीतरी वाली हवाच होता. मी प्रत्येकात शोधत निघालो. कामात घाम आणला, घामानं दाम मिळाला, दामातून बाप मिळाला.

शिवाम्बू केंद्रात आता घरची माणसे तोकडी पडू लागली. सौ. सरोज महिला विभाग सांभाळत होत्या. चि. नितीनचाही सहयोग आम्हाला हवा होता. राजीनामा देता आला तर पाहावं. त्याचीही या कामात सामील होण्याची ओढ होती. बॉसच्या बॉसिंगला तोही कंटाळला होता. या दरम्यान शिस्त, अनुशासन, कर्तव्य, तत्परता, या सर्व नीतिमूल्यांचे पालन करून वायूसेनेमध्ये चि. नितीन यांनी स्वतःची एक छाप निर्माण केली होती. अचखए चा अभ्यास वायूसेने मध्येच पूर्ण केला होता.

शिवाम्बू उपचार पद्धतीचा प्रचार-प्रसार देश-परदेशात व्हावा याकरिता त्याने वायूसेनेचा सन 2000 मध्ये राजीनामा दिला. ‘मानसशास्त्र’ या विषयामध्ये पोस्ट गॅ्रज्यूएशन पूर्ण केले. ‘निसर्ग उपचार व योग’ या विषयावरील शिक्षण ‘विवेकानंद योग अनुसंधान केंद्र, बेंगलोर’ येथे पूर्ण करून पुन्हा ‘शिवाम्बू भवन’ मध्ये रूग्ण सेेवेत दाखल झाला. अशा प्रकारे आमच्या कल्पनेप्रमाणे यथावकाश घरचीच टीम तयार झाली. या कौटुंबिक उपचार पद्धतीमध्ये चि. नितीनही सामील झाला.

‘भैय्या परदेशी’ नावाचा एक विशेष जिवलग मित्र आमच्या परिवारात कसा जुळला हे नेमकं आठवत नाही. पण ही व्यक्ती, त्याचं बालपण समजून घेण्यासारखं आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वकाळात पाकिस्तानाच्या सरहद्दीवरून काही हिंदूंना जेव्हा हाकलले तेव्हा हाही परिवार आपला बोझा गुंडाळून मार्गस्थ झाला म्हणे. गर्दीमध्ये हे मूल बाजूला झाले असे म्हणतात आणि ती संबंधित रेल्वेगाडी कोल्हापूर मुक्कामी येऊन थांबली. हे शेवटचं स्टेशन होतं. त्यामुळे गाडी पुढे जाणार नव्हती. सगळीच रेल्वे रिकामी होत असताना आई-वडिलांशिवाय हे मूलं कोल्हापूरात उतरलं. कुठेतरी हॉटेलमध्ये त्याला काम मिळालं. आचार्‍याचे ज्ञान अवगत झाले. सुरूवातीचे काही दिवस चिवडा-भडंग याच्या विक्रीतून त्यांनी जम बसविला. अक्षर-ओळख नव्हती.

कुपोषित बिचारा टक्के-टोणपे यातून त्याचा विकास झाला होता. हळू-हळू चार डबे एकत्र करत ताराबाई रोडला, सरस्वती टॉकीज समोर एक छोटीशी जागा भाडयाने घेऊन तो कामाला लागला. लग्न झालेच नाही.  “लग्न का नाही केलं?”  असे विचारल्यावर ते म्हणायचे,  “ताटातूट झाल्यानंतर अवघड वाटू नये म्हणून मी कुठले मित्रही केले नाहीत. विरह मला फार सलतो. माझा उद्देश एकच आहे, मित्राची ताटातूट होऊन मला दुःख होऊ नये. तरी पण मग तुमच्या मित्रत्वाच्या प्रेमात मी कसा काय पडलो हे मात्र मला समजत नाही. तुमच्या घरात, स्वयंपाकापर्यंत मी  कसा प्रवास केला आणि आपली गट्टी जमलीच कशी? पण जमली एवढी मात्र खरे!”

भैय्याजी परदेशी हे नाव कोल्हापूर जिल्हयामध्ये कर्णासारखे औदार्य असलेले, दानशूर म्हणून ख्यातनाम होते. साधारण पन्नास कोटीचे भांडवल त्यांच्या मागे-पुढे दिसत असे. राजकारणातही त्यांचा सहभाग असे. त्यांनी एक संकल्प केला होता.

मला चितळे दूध केंद्रासारखं दूध केंद्र काढून आपला देश बलवान करायला मीही निमित्त होऊ शकतो. ते जागा पाहत होते. एक जागा मजकडे माझ्या प्रकल्पासाठी आली होती. खूपच किंमत असल्यामुळे मी यांना ती घेताय का बघा म्हणून सांगितलं. त्यांनी ती सात एकराची जागा खरेदी केली.

हातात टेप, फुटपट्टी न घेता पावले मोजत जमीन मोजत असतं, नाकाने वास घेऊन योग्य अयोग्य ठरवीत असतं. रजपूत घराण्यातला क्षत्रिय बाण्याचा लढवय्या कुणी याला दम देण्यासाठी, माझा मेहुणा, माझा बाप. डी. एस. पी. आहे, कलेक्टर आहे. असे कुणी प्रेशर ठेवत असेल तर लगेच दात खाऊन, पायातले बूट काढून त्याला ठोकत असे.

मी निर्भय आहे, शूर आणि प्रामाणिकही आहे. मला कुणाच्या प्रेशरची गरज नाही. अशा प्रकारचे किस्से तो मला ऐकवत असे. यातून मला त्यांच्यातला हाडेलहप्पीपणा, हुंब-दांडगापणा स्पष्ट दिसत होता. पण त्यांच्या प्रतिष्ठेमुळे ते झाकले जायचे.

यांच्या फरसाणाच्या दुकानामध्ये पाच-पन्नास कामगार असायचे. हा एक छोटा लघुउद्योग होता. कामगारांना पोटच्या मुलासारखे सांभाळायचा. दुधाचे रतीप लावायचा. कारण तो कामगारातूनच विकसित झाला होता. नावारूपाला आला होता. पांढरधोट कपडे वापरायचा.

भैय्याजी परदेशी ही व्यक्ती त्यांच्या भाषेवरून तो कोल्हापूरचा नाही, हा परदेशी आहे हे स्पष्ट व्हायचं. तो माझ्या बैठकीमध्ये वरचेवर येऊन बसू लागला. रूग्णसेवेच्या गोष्टींना तो समजून घेऊ लागला. मजकडे दिल्लीपासून काश्मीर पर्यत, कन्याकुमारी, कलकत्ता, कच्छ, सौराष्ट्र अख्या देशातून पेशंट यायचे हे तो पाहत होता.

मी त्याला म्हणालो,  “चितळे दूध केंद्रापेक्षा तुम्ही हाच उपचार का डोक्यात घेत नाही. हा पुण्याईचा भल्याचा मार्ग आहे. त्या दूध केंद्रामध्ये जी भाकड जनावरे असतील ती कसायाच्या ताब्यात जातील. त्याचे पाप तुमच्याच डोक्यावरती राहील ना.”

अनेकदा या गोष्टी चर्चिल्या नंतर एके दिवशी मला ते म्हणाले,  “मला तुम्ही म्हणताय ते पटतयं. आडवा मनुष्य उभा करण्याचा तुमचा प्रयत्न मला रास्त वाटतोय.”

एकदा बेंगलोरच्या जिंदाल निसर्ग उपचाराकडे आम्ही दोघे मिळून गेलो, तोतया पेशंट बनायचे आणि सगळी माहिती घ्यायची ठरले. दोघे मिळून प्रवासाला लागलो. प्रवासात झोपलेल्या अवस्थेत खिशातून पैशाचा फार मोठा पुडका पडला होता. मी यांचाच असेल म्हणून उचलून दिला. एका हॉटेलमध्ये थांबलो. सगळयांच्या सवयी असाव्यात या संज्ञेखाली त्यांनी माझ्यासमोर दारूचा ग्लास पुढे केला, मी प्यालोच नाही. कृपा करा मला हे चालणार नाही असं मी विनवणी केली.

माणसं चालण्या-बोलण्यातून प्रवासाअंती चांगलीच समजतात.

चितळे दूध केंद्राच्या इमारतीचे भारतीय निसर्गउपचार केंद्रामध्ये रूपांतरण झाले. स्वतः कोणत्याही अनुभव नसताना ते स्वतःच डॉक्टर बनले. यामुळे सगळया सुख-सुविधा निर्माण करूनही ड्रायव्हर नसल्यामुळे त्या लक्झरी गाडीत पॅसेंजर नव्हते. सगळया इमारती इंजिनिअरच्या शिवाय त्यांच्याच मर्जीने, त्यांच्याच हातापायाच्या मेजरमेंटने बनविल्यामुळे, आडमुठेपणाच्या कळसाचा नमुना मात्र सर्वत्र दिसत होता. शंकेखोर वृत्ती यामुळे त्यांच्या शेतातला कामगार फार काळ टिकत नव्हता. त्यामुळे सगळाच परिसर फाटका भकास दिसत होता.

एवढयातूनही आमची जिगरी दोस्ती मात्र टिकल्यामुळे या संपूर्ण भैय्याजींच्या इस्टेटीचे वारसदार म्हणून आमचा उल्लेख होऊ लागला. लोक त्यांना विचारत असत.  “भैय्याजी सगळी इस्टेट शेवटी कोणाला देणार?”

 “भारत सरकारला.”  असं त्यांच उत्तर असायचं.

सारंगचे प्रवचन त्यांना खूपच आवडत असे. तिथे अधून-मधून निसर्गोपचाराची शिबिरे होत असत. पुढच्या पीएच.डी.च्या शिक्षणासाठी सारंग गेले असताना, भैय्या परदेशी यांना ब्रेन मध्ये कॅन्सर झाला. आता काय मी जगत नाही, याची चाहूल त्यांना लागली.

माझ्याकडे येऊन कृपया सारंगला बोलावून घ्या असे ते कळवळून म्हणू लागले. सारंग येऊ शकलाच नाही. शेवटी त्यांनी आपली सगळीच इस्टेट पाशा नावाच्या मुसलमान इंजिनिअरला देऊन फुकून टाकली.

जो पाशा, आठवीला असल्यापासून त्यांच्या पैशावर शिकत होता, काही अनाथ मुले, यांंच्या प्रेरणेने शिकत होती. त्यापैकी तो एक होता. तो सिव्हील इंजिनिअर झाला होता. त्याच्याकडे गाडी-माडी आली होती. भैय्याजी मात्र एम 80 वरून फिरत असतं.

एकदा तो बहाद्दर नवी कोरी मारूती चेस गाडी ताब्यात देऊन भैय्याजी कडे येऊन म्हणाला,  “बापू, तूमचे एम 80 वरचे दिवस आता संपले आहेत, तुम्ही या गाडीत बसावं. हा तुमचा ड्रायव्हर आणि ही तुमची गाडीची किल्ली.”

अनेकदा बर्‍याच वेळेला हा किस्सा मला ते डोळयात पाणी काढून सांगत. शेवटी त्यांच्या बेवारस इस्टेटीचा मालक हा पाशाच झाला. पाशाशी पाश जोडला.

एकदा माझ्या गेटच्या दारात एखादया दगडाचा आधार घेऊन एक सायकलस्वार सायकल वर बसूनचं मी एका पेशंटला मातीचा चिखल लावत असलेले पाहत होता. मी त्याला विचारलं,

 “काय नाव आपलं? काय बघत आहात?”

 “तुम्ही काय करताय ते बघतोय?”  तो म्हणाला.

कधी मी पेशंटना भूगर्भाचा प्रयोग करायचो, पेशंटना पुरायचो, पेशंटना कधी चिखल लावायचो, कधी ही माणसं उन्हात तळपत असायची हे नवख्याला पाहण्यासारखचं होतं.

मी त्यांना आत बोलावून घेतलं.  “काय करताय विचारलं?”

 “अगरबत्ती विकतो. घराघरात होम डिलीव्हरी करतो. तुमच्या शेजारीच निटवे यांच्या घरात भाडेकरू आहे तुमचे हे काम मी रोजच पाहतो.”

पेशंट लोकांना तुमचं नाव कोणतं? काय झालयं? चौकशी करत होता. सदरील पेशंट दिल्लीचा होता लेप्रसीसाठी उपचार घेत होता. खूपच गुण आला आहे. यांचे उपचार फारच मर्मभेदी आहेत, असे म्हणत होता.

त्यांनी माझ्याकडे फिरून पाहिले व म्हणाला,  “तुमची मला चिड येते, का येते? म्हणाल, म्हणून सांगतो, इतका प्रभावी उपचार जगाच्या एका कोपर्‍यात मांडून बसल्याची!”

मी म्हटलं,  “काय करायला पाहिजे होतं? चौका-चौकात बोर्ड लिहावयाला पाहिजे होते. होल्डिंग लावायला पाहिजे होते.”  असे म्हणून या उपचाराविषयी साहित्य वाङमय मला वाचायला द्या, ही मागणी घातली. मी त्याला हाताबरोबर मागणीनुसार एक गठ्ठा वाचायला दिला.

सेम असेच उपचार केंद्र मिरज, सांगली रोडवर चंदनवाडी येथे एका इमारतीवरती शिवाम्बू उपचार केंद्र बोर्ड लिहून कोणीतरी आरंभ केला होता, याची मला कुण-कुण लागली. मी अधिक माहितीसाठी त्याच्याकडे जाऊन त्यांचा अनुभव घ्यायचं ठरवलं. आणि एके दिवशी चंदनवाडी मुक्कामी गेलो सुद्धा, तर हाच गृहस्थ माझ्या स्वागताला घोंगडयावरून उठला. या-या म्हणाला, मी म्हटलं  “अरे तूच आहेस? तू एका शब्दाने मला बोलला कसा नाहीस?”

 “मला तुमचा राग आला होता, म्हणून बोललो नाही. इतका समर्थ उपचार शेजारी मलाही कळू न देता तुम्ही करत होता याचा! म्हणून मी तुम्हाला काहीच बोललो नाही. आपणच ही उणीव भरून काढावी.”  मी कपाळाला हात लावला.

आठ-दहा पेशंट आतल्या खोलीत होते. ते सगळे लेप्रसीचे होते डोळे रक्ताळलेले होते. मी आश्‍चर्यचकित झालो. बाळ केळूसकर मात्र अर्ध्या हळकुंडाने डॉक्टर(पिवळा) झाला होता. म्हणजेच तो बाळ राहिला नव्हता. तरीपण लोक गुण आहे म्हणत होते.

दुसरी एक व्हिजीट मी त्याच्याकडे जेव्हा टाकली, त्यावेळेस कुपवाडच्या शेतामध्ये त्याने वीस पेशंटचा तांडा ठेवला होता. हा चेला शेराला सव्वाशेर भेटला नक्कीच! त्यांनी होल्डिंग लावले होते. चौका-चौकात बोर्ड लावले होते. मी जिथे-जिथे चुकत होतो तिथे-तिथे तो बरोबर होता, असे मला वाटले होेते.

एके काळी पानांच्या टपर्‍याप्रमाणे गल्ली-गल्ली अशा प्रकारचे ह्युमन बॉडी सर्व्हिसिंग सेंटर सर्वत्र जगात उपलब्ध होतील, पाहायला मिळतील त्यापैकीच एक बाळ केळूसकर असावा. त्याची पत्नीही त्याच्या हाताखाली सरोज पाटील प्रमाणे काम करीत असताना मला दिसली. कुठलाही अनुभव नसताना ही जोडी निव्वळ चार बुकं वाचून रोग उपसायला तयार झाली होती. रोग उपसला जात होता. कारण उपचारच समर्थ होता.

पुढे एके दिवशी वृत्तपत्राच्या फ्रंटपेजवरती एक ठळक बातमी वाचली. डॉ. बाळ केळूसकर यांना पकड वॉरंट. न्यूड छायाचित्रे प्रकरणामध्ये तो सापडला होता. पोलीस तपास चालू होता. आश्रयाला भैय्या परदेशींकडे आल्याची मला कुण-कुण होती. यानंतर ही जोडी गेली कुठे? त्यांचं नेमकं काय झालं काय? अद्याप मला कळू शकलेलं नाही.

मजकडेही एक पोलीस केस झाली होती. याला प्रसंग म्हणायचा, दुर्घटना की समस्या? जवळ-जवळ वीस वर्षे पोहण्याची वहिवाट असलेला मी! एकदा काय झालं? रंकाळयाचा परिसर! इथचं काय तो निसर्ग कोंडलेला. आम्हा निसर्ग उपासकाच्या चिकित्सकाला आकर्षित करणारा. सरडयाची धाव कुंपणापर्यंत म्हणतात, तसा आम्हा चिकित्सकांची धाव या रंकाळयाच्या पदउद्यानांपर्यंतच.

कोल्हापूरच्या नगरपालिकेने या रंकाळयाचा किनारा आणखीन सुशोभित केला होता. आम्ही आकर्षित झालो होतो. वीस-पंचवीस लोकांचा तांडा शिवाम्बू केंद्रातून रोज रात्री तीन वाजता फिरण्यासाठी निघायचा. सोबत मारूती गाडी असायची. गौरा नावाची साजरी गायही असायची. गोमूत्रही ताजं-ताजं मिळायचं. या आमच्या वहिवाटीला बरेच दिवस गेले होते. रात्री गस्तीला पोलीस असायचे.

ते म्हणायचे,  “सुरूवातीला इतक्या लवकर इतके लोक तुम्ही जाताय कुठे?”

मी म्हणायचो,  “चोवीस तासांमध्ये हीच एक वेळ शांत निर्जन झालेली असते साहेब आणि निसर्ग फक्त रंकाळयाच्या भोवतीच एकवटलेला आहे, आणि आमच्या निसर्ग उपचार प्रयोगामध्ये मॉर्निंग वॉकला विशेष महत्त्व राहते! सर्व वयोगटाचे व सर्व रोगाचे आमच्याकडे रूग्ण असतात! मॉर्निंग वॉक चा परिणाम रोगाच्या मुळावर होताना दिसतो.”

असं काहीतरी महत्त्वाचं सांगून पोलिस लोकांचा विरोध शिथिल केला होता.

चांगली दहा-वीस वर्षे हा मॉर्निंग वॉकचा प्रयोग त्या परिसराला माहितीचा झाला होता. मी रूग्णाला वाळूवरून किंवा खडीवरून अनवाणी चालताना,  “हा पायाच्या तळव्यासाठी अ‍ॅक्युप्रेशर करवणारा चिवडा आहे बरं का!”

बागेतल्या लॉनवरून जाताना  “हे पायासाठी बुंदीलाडू आहेत बरं का!”  असं म्हणायचो.

चालण्याच्या क्षमतेचा अंत होईपर्यंत चालत होतो. बागेत गौरा नावाच्या पांढर्‍या शुभ्र गाईला एका झाडाला बांधत होतो. चालण्याची क्षमता नसणार्‍या लोकांना गाडीत बसवित होतो. ही रोजचीच पदयात्रा पदउद्यानापर्यंत दांडीयात्रेसारखी या वेळेत चालू असायची, गाईचे गोमूत्र ताजे-ताजे सगळयांसाठी उपलब्ध व्हायचं, गाय देखणी आणि शहाण्या गुणाची होती, पांढरी शुभ्र, खिल्लारी होती. गौरा म्हणून हाक मारली की असेल तेथून पळत यायची. मी गाडीत असेल तर गौरा गाडीत येण्याचा प्रयत्न करायची. आम्ही तिला शिवाम्बू भवनच्या गेटवरती बांधत असायचो. हा सर्व लोकांचा समूह पाहून एखाद्याला वाटू शकत होतं की या लोकांचा समूह कोणाच्या तरी मातीला निघाला आहे.

एका शिवजयंतीच्या निमित्ताने गेट जवळच फटाक्यांची माळ कोणीतरी लावली, फटाक्याच्या आवाजाने गौरा उधळली. दावे तोडून जी गेली ती पुन्हा मिळालीच नाही. ती पोकळी अद्याप भरून निघाली नाही. पांढरी शुभ्र गौरा हे शिवाम्बूच्या निसर्गोपचाराला भूषण वाटायची.

एकदा काय झाले रोजच्या आमच्या सकाळच्या दिनक्रमामध्ये तीन तरूण पाहुणे कलाकार आमचे कौशल्य पाहायला आले होते. त्यामध्ये एक जुना पेशंट उपचार अनुभवी होता. ज्याचा सोरायसिस हा त्वचारोग या उपचारांनी पूर्ण बरा झाला होता. या अभिनव उपचाराची शहानिशा त्याला दाखवायची होती. ही सर्वच मुलं पंचविशीच्या दरम्यान तरूण मुलं होती. त्यांना पण उपचार घ्यायचा होता. त्यासाठी रहाणे महती समजावून देत होता, त्यांनी माझी भेट घेतली. एकंदर झालेली स्वतःची शारीरिक प्रगती दाखवली. त्यांना परतायचं होतं. तोपर्यंत रात्र झाली. म्हणून त्यांनी शिवाम्बू भवन मध्ये मुक्काम केला. आपल्या इथल्या अभिप्राय बुकामध्ये खालील प्रमाणे नवीन अभिप्राय नोंदविला. तो अभिप्राय या प्रमाणे...

आप्पासाहेब रहाणे

मु.पो.अंधानेर,

ता.कन्नड, जि. औरंगाबाद

प्रति,

गुरूवर्य डॉ. शशी पाटील सर,

हा अभिप्राय लिहिताना मला अत्यंत आनंद होत आहे, कारण हा माझा नवा जन्म आहे, तुम्ही म्हणाल हे असं काय म्हणत आहे, परंतु हे शंभर टक्के खरं आहे. मी शिवाम्बू भवन येथे, दिनांक 21/01/2006 रोजी अ‍ॅडमिट झालो त्यावेळी माझे पूर्ण अंग हे सोरासिसच्या त्वचारोगाने बरबटलेले होते.

या आजारावर मी कमीत-कमी आठ वर्षे उपचार केले आणि  त्यावर कमीत-कमी 50 हजार रूपये खर्च केला होता, परंतु हा रोग वाढतच राहिला. आता माझ्याकडे दोनच पर्याय होते-एकतर मरणे नाहीतर डॉ. शशी पाटील सांगतात तसे करणे.

आणि खरं सांगतो जेव्हा डॉ. शशी पाटील यांनी मला हा उपचार सांगितला आणि मी तो सुरू केला. उपचार सुरू केल्यावर मला पहिले दहा दिवस खूप त्रास झाला. पण तेव्हा मला माहित नव्हते की हा त्रासच मला बरा करतो आहे.

आणि तसचं झालं. कारण माझ्या शरीरातील घाण बाहेर आली आणि उपचार सुरू केल्यापासून बरोबर 21 वा दिवस उजाडला, तो माझ्यासाठी सोन्याचा दिवस ठरला आणि जणू त्या दिवशी माझा नवा जन्म झाला कारण ह्या दिवशी माझे संपूर्ण अंग कोरडे पडले होते आणि पूर्ण खाज बंद झाली होती.

त्यानंतरही मी उपचार चालूच ठेवला व तीनच महिन्यामध्ये मी 100 टक्के बरा झालो व आज आनंदाने जगत आहे.

आपला नम्र,

आप्पासाहेब बाबूराव रहाणे

त्यानंतर दुसर्‍या दिवशी ही पाहुणे मंडळी मॉर्निंग वॉकचा प्रयोग पाहण्यासाठी आप्पासाहेब रहाणेंनी आपल्या मित्रांना देखील सोबत घेतले होते. समूहाचे प्रतिनिधित्व हीच मंडळी पुढे राहून करत होती. नियमाप्रमाणे मॉर्निंग वॉक एक तासभर झाला. हनुमान मंदिरामध्ये एक सामुदायिक प्रार्थनाही झाली. हनुमंता, हनुमंता, तुमची शक्ती कधी देता! कधी देता!! कधी देता!!! ही प्रार्थनाही झाली. या नवीन पाहुणे कलाकारांची बाकीच्या लोकांना ओळख करून दिली. ज्याला गुण आला होता, ज्याने उपचाराची अभिप्रायादाखल वाखाणणी दाखल भाषण ही केलं आणि सोबतचे हे माझे मित्र असून, इथे काय काय उपचार केले जातात? इथे औषध म्हणून काय काय असतं? याची संभाषणात ओळख दिली. कालच ही मंडळी परतणार होती पण सकाळचा मनोरम कार्यक्रम पाहायचा होता म्हणून यांनी वस्ती टाकली.

या समारोपानंतर हा सगळा समूह घेऊन मी उठलो. पोहण्याची व्यवस्था मारूती मंदिराच्या जवळच खणीत असल्यामुळे सगळा समुदाय ग्रीलला रोखून रेटून उभा होता. पाणी खोल असल्यामुळे पाइपांचा लोखंडी अडथळा एक बंदोबस्त, अनोळखी व्यक्ती पाण्याच्या धोक्याकडे जाऊ नये, यासाठी होती.

मी बोलता-बोलता बोललो. जे पिंडात तेच ब्रम्हांडात, पृथ्वीवरती एकाहत्तर टक्के पाणी आहे आणि शरीरातही. माणसाला बँका बुडवित असतात, पाणी पंचमहाभूतापैकी एक शक्ती आहे. पाणी कधीच बुडवित नाही. माणसाला भिती बुडवित असते. मरत असलेला मनुष्य पाणी-पाणी म्हणून जीव सोडत असतो. तो पाणी पिऊनच जिवंत होत असतो. पाण्याचा स्वभाव आहे जगविण्याचा. फक्त तुम्ही पाण्यामध्ये जाऊन समर्पित व्हायचं. असचं पाण्यात डोळे बंद करून मान टाकून शवासनात पडायचं. यामध्ये मी फक्त प्रात्यक्षिक दाखवत होतो. कोणालाही सहभागी होण्यास सांगितले नव्हते. इतके बोलेतोपर्यंत मी कपडे काढले होते आणि गुडघ्या एवढया पाण्यात शवासनही केले होते. मान लोंबकळत सोडली होती. समर्पण कसं व्हावं? हे दाखवीत होतो. दरम्यान पोहायला येणारी प्रेक्षक मंडळी कठ्डयाला रेटून उभी होती. माझ्या पोहण्याचे निरीक्षण करीत होती. मी हात डोक्याकडून पायाकडे सरकवत-सरकवत खणीच्या आत, पाण्याच्या पृष्ठभागावरती उताणा पडून दूर गेलो. तोपर्यंत ही पाहुणे मंडळी कपडे काढून, मोबाईल बाजूला ठेऊन कधी पाण्यात आले मला कळालेच नाही. या लोकांना पाण्याचा अंदाज पण नव्हता. लोखंडी रूळाला ही मंडळी रेळून, चिकटून उभी होती. त्यांच्याबरोबर साधारण पन्नास एक रूग्ण लोकांचा समूह होता. पाणी हे नैसर्गिक उर्वराशक्तीचा हा महान द्योतक आहे, ज्याच्या मध्ये सृजन होण्याची सर्व शक्ती आपण अनुभवली आहे. पण या पाण्याने आमच्या तोंडच्या पाण्याला पळविले.

या काळात मला आकाशच फक्त दिसत होते. तोपर्यंत एक दहा मिनिटे गेली असतील-नसतील मी एक मोठा आक्रोश ऐकला. आक्रोशामध्ये मेलो-मेलो-मेलो असे तीन शब्द होते. मी दचकून सिंहावलोकन केलं. पाण्याची उसळी उडाली होती. ‘तुमचे तीनही पाहुणे कलाकार पाण्यात बुडाले आहेत.’ अन्य खणविहारातील मित्र मंडळींनी पुटपुटले. चेष्टा मस्करीचा हा आवाज असावा असं मला वाटलं, तपास घ्यावा म्हणून चौकशी केली. सोबत खणीमध्येे  नेहमी त्यावेळेस पोहण्यास येणारी मंडळी हेाती.

त्या आवाजाबरोबरचं माझ्या छातीत धस्सं झालं. या सकाळी हे माझ्यासमोर काय वाढून ठेवलं असं मला वाटलं व मी वेगानं परतलो. तपशील ठीक समजून घेतला. त्यात ‘योगेश सोन्या बापू डांगे’ याला पोहायला येत नव्हते, तो बुडत होता म्हणून ‘आप्पासाहेब रहाणे’ व ‘सच्चिदानंद दापके’ हे त्याचे मित्र त्याला वाचवायला सरसावले आणि एकमेकाला मगर-मिठी मारून सगळेच बुडाल्याची ही घटना होती. त्यांचं श्‍वास घेण शक्य होईल म्हणून पाच-दहा मिनिटे त्यांची वाट पाहिली. पाण्याची खोली चाळीस फूट होती.

मी कपडे घातले अन् संबंधित अपघात घटना कळवायला अत्यावश्यक त्या ठिकाणी कळविण्या करिता, मदत मागविण्याकरिता कारने घराकडे धावलो. चि. सारंग सरांना एकूण झालेली हकीकत सांगितली. सकाळची साडे पाच-पाऊणे सहाची वेळ झाली होती. माणसं-माणसांना स्पष्ट दिसू लागली होती. जुन्या राजवाडयाच्या पोलीस कचेरीला कळवलं. अग्निशामक दलालाही शांत चित्तानं एकूण व्यथेचं कथनं केलं. संबंधित सेवा कार्यस्थळाकडे रूजू झाली.

तसचं त्यावेळी त्यांच्या आई-वडिलांनाही फोनद्वारे मी कळवलं. वडील ही बातमी ऐकून, ‘तुमच्या चांगल्या कामाला खीळ नको’ हा उद्गार मी त्यांच्याकडून ऐकला. मला खूपचं हायसं वाटलं. तिघांची प्रेत व पंचनामा हे सोपस्कार पूर्ण व्हायला दोन तास निघून गेले.

हा-हा म्हणता ही वार्ता पोहायला येणार्‍या गर्दीने सर्वत्र पांगवली. हौशे-गवशे, नवशे समाजातला स्तर एकत्र झाला. नको ती बोलणी ऐकत राहण्याशिवाय इलाज नव्हता. व्हायची ती गोष्ट होऊन गेली होती. ही तीन उमदी मुले माझे मित्र होते.

अपघातातील मुले केवळ माझ्याबरोबर होती म्हणून हे प्रकरण आम्हाला शेकणारं होतं. मी माझ्या चिरंजीवांना म्हणत होतो. त्यांच्या वाजवी धाडसातून हा अपघात झाला होता. पर्यायाने येणार्‍या शिक्षेस मी समर्थ आहे, जी असेल ती शिक्षा भोगेन. मधला मार्ग शोधू नका, फारसा विचार करू नका.

पण चिरंजीवांनी या गोष्टी ऐकल्याच नाहीत. वेळ चांगली की त्यांच्या आई-वडिलांचा आग्रह बिघडला नाही. स्थानिक कोल्हापूरवासी त्यांचा ग्रह बिघडविण्याचा अमाप प्रयत्न करत होते. यांच्या चांगल्या कामाला खीळ बसू नये, व्हायचे ते होऊन गेले आहे, मुलांच्या आततायीपणामुळे घटना घडून गेली आहे. त्यानंतर मात्र रंकाळयाकडे येणे-जाणे, ढुंकूनही बघणे पूर्णतः बंद झाले. वीस-तीस वर्षाची पोहण्याची वहिवाट या निमित्ताने थांबली ते थांबलीच.

दुसर्‍या दिवशी वृत्तपत्रामध्ये आणि दूरदर्शनच्या मिडीयाने वारंवार या घडामोडी सर्वत्र जगजाहीर केलेल्याच आहेत. त्या येथे विशद करण्याची गरज पण नाही. दरम्यानच्या काळात ‘आनंदकुंज’ चे काम सजत होते.

क्रमश:

डॉ. शशी पाटील एक महान सेवाभावी चिकित्सक होते. 'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' हे त्यांच्या जीवनाचे ब्रीद होते. ते नेहमी निस्वार्थ व निर्मळ भावनेतून रुग्ण उपचार करायचे, त्यामुळे त्यांच्या फक्त हातालाच नव्हे तर त्यांच्या वाणीला ही गुण होता. त्यांच्या अनुभवसिद्ध उपचारांमुळे अनेक रुग्ण दुर्धर रोगातून मुक्त व्हायचे. मूलतः डॉ. शशी पाटील हे एक आध्यात्मिक साधक होते. प्रत्येक औषधोपचाराचा प्रयोग, ते प्रथम स्वतःवर करून पाहायचे. त्यांचा शिवांबू, योग, निसर्गोपचार व आयुर्वेदाचा फक्त प्रगाढ अभ्यास होता असे नाही तर ते एक उत्तम हस्त कुशल उपचारक होते. मॉलिश व ॲक्युप्रेशर यासारख्या उपचार कलेमध्ये ते निपून होते. ते एक उत्तम लेखक व कवी सुद्धा होते. त्यांनी आरोग्य विषयक अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. ते आरोग्याचा गहन विषय रुग्णांना दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणे देऊन सहजपणे पटवायचे.त्यांचे आपल्या वाणीवर चांगले प्रभुत्व होते. प्रस्तुत ‘मुळनक्षत्री - एक प्रेरणादाई जीवन-धारा’  या लेख मालिकेतून आम्ही  डॉ. शशी पाटील यांचे  ‘जीवन चरित्र’ क्रमश: प्रकाशित करीत आहोत. आज हजारो लोकांसाठी त्यांचे जीवन, नव-प्रेरणेचा स्त्रोत आहे.

Previous Post Next Post