उत्सर्जन

मुलांनो, जीवनाच्या बाराखडीतले सातवे पुष्प आहे. मल-मूत्र विसर्जन. मल-मूत्र विसर्जन? शीऽ शीऽ ... तुम्ही म्हणाल. मलमूत्रासारखी गोष्ट चारचौघांत, सभेत शीऽ शीऽ शीऽ! मुलांनो, ही खरी जीवनाची मेख आहे. इथेच स्वास्थ्याच्या प्रसन्नतेची कुंजी दडून आहे. तुमचे अज्ञान इथेच पडून आहे. म्हणूनच तुमचे पूर्वज दवाखान्याच्या कॉटवर कण्हत आहेत.

तुम्ही कधी पाहिले नाहीत. थोडं पहा अन् विचार करा... आहार म्हणजे आवक आहे व मलमूत्र विसर्जन जावक आहे.

‘जावक’ ठीक जावक झाला, तरच आवकाला अर्थ असतो, रुची असते. आतड्यातील हालचाल मंदावली की सर्व चक्रे मंदावू लागतात. आतड्यातला अडथळा देहातल्या सर्व अडथळ्यांना जबाबदार असतो व हा अडथळाच आम्ही निसर्गोपचारवाल्यांनी सर्व रोगांचे आद्य कारण मानले आहे. आजोबांनी जागा सोडली तरच नातवांना जागा खाली होते. निसर्गाचे नियोजन तुमच्याही लक्षात यायला हवे. खाल्लेलं अन्न बाहेर पडायला, साधारण बारा तासांचा अवधी लागतो. तुम्हाला ज्या वेळी शौचाला निकोप व्हावे वाटते, नेमके त्याच्या 12 तास आधी चर्वणयुक्त आहार आटोपा. समजा, सकाळी तुम्हाला पाचला शौच व्हावं वाटतंय, तर मग सायंकाळी शेवटचा आहार पाच वाजताच घ्या. जर तुम्हाला सकाळी सात वाजता निकोप शौच हवा आहे, तर... शेवटचा मग कालचा आहार सात वाजता घ्या.

आजकाल जागरण करणं, उशिरा झोपणं, उशीरा म्हणजे रात्री बारा-एक वाजता जेवणं, या गोष्टी प्रतिष्ठेच्या मानल्या जाऊ लागल्या आहेत. लवकर झोपतो तो मागासलेला; आजारी, मूर्खसुद्धा ठरू लागलाय. थोर संत विनोबाजी भावे सायंकाळी सात वाजताच झोपी जात.

शास्त्र सांगतं, झोपण्याच्या चार ते पाच तास आधी चर्वणयुक्त जेवण उरकून घ्या. पण ऐकणार कोण? मग ऐका डॉक्टरांचे, चार गोळ्या सकाळी, चार गोळ्या दुपारी, चार रात्री, अन् मारा मग ढेकरा; इकडे तिकडे ठोकरा, मारीत राहा मग दवाखान्यात चकरा, किती सांगू बाबा लेकरा...!

तुम्हाला माहीत आहे, एक्झॉस्ट फॅन हॉलच्या कुठल्यातरी एक कोपर्‍यात काम करीत असतो. हॉल  बंदिस्त असला तरी, सारे वायुमंडळ बदलवून स्वच्छ हवा हॉलची जागा व्यापत असते. अगदी तद्वत... या तुमच्या बंदिस्त तब्येतीमध्ये मलमूत्र विसर्जन ही साधी बाब समजूच नका.

निकोप शौच-सुख काही आगळंच असतं. म्हणूनच विनोबाजी सारखे म्हणायचे, ‘मलं प्रथमं दर्शनं…’!

प्रत्येकाने प्रथम मलाचेच दर्शन घ्यावे. मलाच्याच दर्शनाने दिवसाचा आरंभ करावा. कोणाचं तोंड पाहिलं कोणास ठाऊक? एखादं काम झालंच नाही, तर अस्सं म्हणून आपण तुमच्या आतड्यापासून अलग होताना अवश्य पहा. मग असं म्हणायची वेळच येणार नाही.

माणसांची आतडी दिवसेंदिवस शिथिल होऊ लागली आहेत. जठराग्नी थंड होऊ लागला आहे. त्यामुळेच माणसाचे पोट मर्यादा सोडू लागले आहे. माणसाची अस्वस्थता वाढली आहे. आजचा माणूस आवकेकडेही लक्ष देत नाही व जावकेकडेही लक्ष देत नाही. ‘आओ-जाओ घर तुम्हारा’ असं म्हणूनच डॉक्टरांच्या हवाली होत आहे व हवालदिल होत आहे.

आतड्याची बैठक कमरेवर आहे. कंबर तंगडीवर आहे. तंगडी हलविल्यावर कंबर हलते. कंबर हलल्यावर आतडी हलतात. आतडी हलल्यावर चयापचय घडत आहे. अशी उतरंड ठेवली आहे. कसे आतड्यातले पाणी हलते, बघूया तरी? असे म्हणून समृद्धीने इकडे दंड थोपटले आहेत. या सर्वांच्या ताणाताणीत माणूस बिचारा दवाखान्यात नोटा पिसत आहे. कोणी कोणाला सांगायची सोय राहिली नाही. कोणी कोणाचे ऐकायचे नाही.

जो तो गाडीत. प्रत्येकाची गाडी उभी त्याच्या माडीत; प्रत्येकाच्या माडीत, डॉक्टर हकीम ठोकून पाहतो आहे त्याच्या नाडीत, काय पाहतो आहे नाडीत? पोट का टम्म आहे? छातीत का दम्म आहे? खिशात अजून किती दाम आहे?

तुम्ही अंघोळीचा बंब कधी पेटवलात काय? काय करा, मी सांगतो असं करा. एकदा खालची त्याची जाळी काढून राख झाडून काढा. तो बंब आधी निम्मा कागदाच्या गोळ्यांनीच भरा. राहिलेल्या निम्म्यात लाकूड सरपण ठेवा व खाली कागदाला जाळ लावा.

काय होते माहीत आहे? आधी कागद पेटून ती जागा खाली होते. ती पोकळी खाली होतानाच वरची लाकडे खाली दण्ण् करून आदळतात. एव्हाना लाकडांना ताव मिळतो. मग लाकडे जोराने पेट घेतात. उद्देश तुमचा सफल झाला. अगदी मलविसर्जनाचा उद्देश सफल करायचा झाला तर या देहाच्या बंबातसुद्धा हलके हलके सुपाचक असलेलेच अन्न आधी भरा, चावून खा! नंतर भाजी, भाकर मग जे तुम्हाला खायचे ते खा. आता सुपाचक म्हणजे काय खायचे ते पाहू.....

सुपाचक पोटाचा पहिला स्तर

पेरू, काकडी, गाजर, टरबूज, पपई यानेच पोट पॅक करा. मग जेवण करा. सेम बंबाप्रमाणे तुमचे उद्दिष्ट सफल होईल. कोंड्याची भाकर, हातसडीचा भात, ताकाचा भरपूर वापर, अखंड धान्याच्या घुगर्‍या मलविसर्जनासाठी उपयोगाच्या ठरल्या आहेत. सप्ताहाचा उपवास हाही मलविसर्जन करण्यास, आतडी साफ करण्याच्या कामी, चयापचय सक्षम करण्यासाठी उपयोगाचा होतो.

कोठा साफ तर मन साफ. मन साफ तर सारे साफ. मन चंगा तो काठवट में गंगा! परीटघडीचे कपडे अंगावर असले की आपण कुठेही बसत नाही. बसायलाही आपण त्याच पात्रतेची जागा पाहतो. जेव्हा कोठा साफ असतो, तेव्हाच मन साफ राहते. मन साफ असले तर... विचारही साफ येतात व साफ विचारच योग्य दिशा देतात व योग्य दिशाच योग्य परिणाम घडवितात.

क्रमश:

डॉ. शशी पाटील  समाजातील  प्रत्येक घटकासाठी  स्वास्थ्य  मार्गदर्शन करायचे. त्यांचा सेवा-संपर्क लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खूप मोठा होता. त्यांनी अनेक शाळा कॉलेजातून लहान मुलांसाठी व तरुणांसाठी स्वास्थ्य जागरणाचे विविध उपक्रम राबविले.  त्यांनी 'जीवनाच्या बाराखड्या' या नावाचा उपक्रम लहान मुलांसाठी  अनेक वर्षे राबवला, जो मोठ्यांसाठी ही खूप उपयुक्त आहे.  त्यांनी या उपक्रमातून हजारो  बालकांना व तरुणांना समाजामध्ये 'स्वास्थ्य रक्षक' म्हणून कार्य करण्यास प्रेरित केले.  प्रस्तुत लेखस्तंभातून, 'जीवनाच्या बाराखड्या' या त्यांच्या उपक्रमातील व्याख्यानांचे संकलन, आम्ही क्रमश: प्रकाशित करीत आहोत..

Previous Post Next Post