उपसेल कचरा उपवास
उपवासच कचरा उपसा करेल ! कसा उपसा करणार? कधी कधी विहिरीतील पाणी सडू लागतं, वास मारतं, ठीक उपसा झाला नाही म्हणूनच.
समजा, हजार वर्षांची विहीर असली, पण रोजच पाणी उपसले जात असेल तर ती विहीर नवीनच आहे, ताजीच आहे. लक्षात ठेवा.
निकोप मल-मूत्र विसर्जन हाच सृजन-सर्जन
तुमचे उत्सर्जन उत्तम होत असेल तर... तुम्ही वृद्ध असूनही ताजे तरुणच आहात. मलमूत्र विसर्जन हाच उत्सर्जनाचा मोठा हिस्सा आहे. हा जर निकोप, परिपूर्ण, समाधानकारक होत असेल तर, बाकीच्या छोट्या-मोठ्या उत्सर्जनांवर ताण येणार नाही. म्हणजे जनरल महाद्वार उघडे असेल तर छोट्यामोठ्या दरवाजांवर ताण येत नाही. अर्थात घाम, थुंकी, मेकूड, बेडके इत्यादींच्या सफाईकडे आपण जातीने रोजच लक्ष देणार असलो तर, आरोग्याचे राजे आपणच असतो.
जमाना कॉन्ट्रॅक्टचा
मग आता आपण कसे करूया? आजकाल प्र्रत्येक गोष्टीचं कॉन्ट्रॅक्ट दिले-घेतले जाते. लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट मंगल कार्यालयाकडे देतो, बाळंतपणाचे कॉन्ट्रॅक्ट मॅटर्निटी होमकडे दिले जाते, तसे याचे कॉन्ट्रॅक्ट आपण कोणाकडे देऊ शकू ?
मी तुम्हाला सांगतो, मल-मूत्र विसर्जनाचे कॉन्ट्रॅक्ट एकटा शिवाम्बू घेऊ शकेल. श्वसनसंस्थेचे कॉन्ट्रॅक्ट प्राणायामाकडे देऊ या. त्यासोबत योगिक क्रियाही करूया. अर्थात उपवास, बस्ती, वमन, नेती, धौती, शंखप्रक्षालन, मसाज या गोष्टी अंतर्बाह्य शरीरास लख्ख लख्ख करतीलच.
ट्युनिंग सर्वांचे
तापत राहिलेले दूध, त्याचा थोडा-थोडासा पृष्ठभाग जेव्हा उचलला जात असतो, तेव्हा सुलक्षणी गृहिणी त्या शेगडीजवळच लाख कामे सोडून थांबते. दोन-चार गोष्टींपैकी एक गोष्ट त्वरित करते. एक तर भांडे उतरवील, गॅस बंद करील किंवा चार थेंब पाण्याचे मारील किंवा दुधावर फुंकर तरी मारील. पण दुधाला ती वाचवेलच.
मित्रहो, हेच कौशल्य आपण इथं करीत असतो. आपलं आरोग्य वाचवण्यासाठी हेच नेमकं करायचं आहे. मग याला तुम्ही दुधाचं भांडं उतरवणं म्हणा किंवा हीट ट्यून केला म्हणा. गाडीच्या टायरमध्ये हवा जास्त झाली की, कळ दाबून लेव्हलमध्ये आणता. म्हणजेच असंतुलित संतुलित करता. इथंही असंतुलित संतुलित करायचं आहे. वात, पित्त, कफ, निद्रा, भूक, भय, मैथुन, शौच सर्वांचे संतुलन. कुणीही लेव्हल सोडून खाली नाही की वर नाही. हेच असतं आरोग्यवानाचं कौशल्य, हाच आहे आरोग्यवानाचा शहाणपणा.
पुढच्यास ठेच...
आम्ही ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ म्हणतो अन् आम्ही मागचे तरी कुठे शहाणे असतो? जी चौकट पुढच्या माणसाच्या कपाळाला बडवली आहे, ज्याने टेंगूळही आले आहे, त्याच चौकटीतून प्रवेश करताना मला थोडं वाकायला नको का? दगड किंवा उंबरठा पुढच्या माणसाला नाका-तोंडावर पाडीत असेल तर मी, मागून येणारा, पाऊल उचलून टाकायला नको का?
याचाच अर्थ तुमचे आप्त-इष्ट-मित्र-आई-वडील एखाद्या रोगातून, ज्या कारणामुळे प्रवेश घेतले असतील, ती कारणे तुम्ही दूर करायला नकोत का?
आवडच - नावड करा !
समजा, माझे वडील, वडीलबंधू, माझे चुलते या सर्वांना हार्ट-अटॅक येऊन गेल्यामुळे या बिचार्यांना मी जर आज फोटोतच पाहत आहे. त्यांच्यातील आवडी-निवडी मी समजून घ्यायला नको का? त्यांची आवड मी माझ्यासाठी नावडच केली पाहिजे. हेच आहे ते पथ्य.
रोग्याची जिद्द ओलांडते रोगाची हद्द
पथ्य पथ्य तरी दुसरे काय असते? माझे आई-वडील मधुमेहाचे असतील तर, मी माझा स्वादुग्रंथी जपायला पाहिजेत. लहानपणापासून जर तुम्ही काळजी घेतलीत तर, वडिलार्जित रोग, पारंपरिक रोग यांना तुम्ही थोपवू शकता. या जगात अशक्य काय आहे? आम्ही नेहमी म्हणतो, रोग्याची जिद्दच रोगाची हद्द ओलांडू शकते.
पूर्वीचे राजे किल्ल्याच्याभोवती खंदक टाकीत होते. अगदी तसे, वारसाची जिद्द माता-पितरांच्या रोगाची हद्द ओलांडू शकतात.
मुक्त होऊया रोगाबरोबर औषधातूनही
औषधे हा पर्याय नव्हे, एक नाइलाज आहे. तुम्ही केवळ रोगातून मुक्त व्हायचं नाही, तर औषधातूनही मुक्त व्हायचं आहे आणि तसं होता येतं. पांगुळगाडा, कुबड्या यांना टाकायचे आहे. परावलंबित्व दूर करायचे आहे !
वेगळा संघर्ष
औषधं कुबड्या आहेत. कुबडी कायम कशी बरं ठेवता येईल? या इंग्रजी इंस्टंट औषधाने माणसाला दुबळं केलं आहे, आळशी केलं आहे आणि अज्ञानी ठेवला आहे. यानं माणूस बोथट झाला. हा माझा नुसता दावा नाही तर अनुभव आहे. टेंपररी दुरुस्ती ही तंदुरुस्ती नव्हेच, हे लक्षात असू द्या.
औषधांमुळे आम्ही रोगाच्या मूळ कारणापर्यंत पोचत नाही. भाड्याची घरं असली की आम्ही कामचलाऊ रिपेअरी करतो. तसं जर तुम्ही देहाचे मालक आहात, कूळ नाही, तर कामचलाऊ रिपेअरी कशाला करायची?
औषध हे विषच आहे. रोगाच्या लक्षणावर तातडीने परिणाम होतो, ही गोष्ट खरी ! वेळ मारून निघते; पण रोगाचं कारण तसंच राहतं. औषधे, त्यातील विजातीय घटक देहावर आपला परिणाम दाखवतीलच. कारण शरीर विजातीय द्रव्यांना बाहेर पिटाळत राहतं. या औषधांसाठी पुन्हा प्रतिकारशक्तीला वेगळा संघर्ष करावा लागतो.
कमांडो
ज्या वाटेनं रोग आत येत आहे, त्या वाटा बंद करायला हव्यात. जर आपण खरे समृद्ध असू तर, त्या दरवाजावर खास पहारा देणारा कमांडो ठेवू.
स्पीड ब्रेकर्स
साधारणपणे, आमच्या लक्षात आले आहे, आरोग्याच्या शिखरावर गती घेताना आपल्याला दारू, मटण, तंबाखू व चहा या चार गोष्टी स्थूल स्पीड ब्रेकर्स आहेत आणि सूक्ष्म स्पीड बे्रकर्स म्हणाल तर भूक नसताना स्वीकारलेला अन्नांश आहे. अन्न हे परब्रह्य असले तरी भूक असेल तरच ते स्वीकारा !
डबल गुन्हा
चुलीत चांगली धग असेल तरच ओलं सरपण खपू शकेल. भूक तीव्र असेल तरच एखादे अपथ्य पण खपू शकेल. इकडे भूक नाही, शिवाय अपथ्यही करीत असाल तर हा दुहेरी गुन्हा आहे. हे मतदान विरोधी पार्टीला दुहेरी आहे. मतमोजणी होताना, मतांची मेजॉरिटी वाढायला ही घटना त्याला मदत करेल.
ढिले कुंपण
यातून पुन्हा सूक्ष्म स्तरावर देहात रोगपोषक द्रव्ये तयार झाली किंवा दिसली, ती चटक-मटक जिव्हाप्रधान अन्नामुळेच.
अर्थात तेल, मीठ, तिखट, साखर, तांदूळ, दूध व मैदा या अन्नाचे सातत्य रोगनिर्मितीला उत्तेजन देते. थोडक्यात काय? विशेष बनावटीचे अन्न आपल्याला निष्क्रिय करते, असमर्थ करते. आपले कुंपण ढिले ठेवते. मग रोग पडक्या कुंपणावर पाय देत चढाई करीलच.
गाठा पैलतीर
नावेच्या या छोट्या-मोठ्या छिद्रांना लिंपत गेलात तर पाणी नावेत येणारच नाही; पाणी उपसण्याचे काम वाढणारच नाही. त्यातूनही लाटेबरोबर येणारे तुषाराचे पाणी नावेतून काढत राहाल तर नाव पैलतीर गाठेलच, यावर विश्वास ठेवा. हा वैज्ञानिक प्रयोग आहे. विहिरीतच जर पाणी नसेल तर पोहर्यात तरी येणार कुठून?
पेराल तसे उगवेल !
हे सर्व असेच का करायचे? देहाची अंतर्बाह्य रचना पाहताना इतर अन्य प्राण्यांपैकी मनुष्यप्राणी हाही एक प्राणी आहे. त्याचे अन्न नैसर्गिक स्थितीतीलच आहे. देहाला हवे असणारे क्षार, ग्लुकोज इ. त्या निसर्गाने तोलून, जोखून, मापून त्या प्रत्येक अन्नधान्यात, फळात व भाजीमध्येत समाविष्ट केले आहे. परत वरून त्यात घालणार असाल तर वरून काढावेच लागेल.
नैसर्गिक स्थितीतच त्याला देऊ केल्यास हळूहळू देह पूर्वस्थितीत येत राहील. अर्थात जातिवंत पेरणार तर जातिवंत उगवणारच.
आपण उपवास का करायचा?
मित्रहो, उपवासात आपण उपाशी राहत नाही, रोगाला आपण उपाशी ठेवत असतो. रोगालाही जिवंत राहायला अन्न लागते. त्यालाही पोट असते. तोही अन्न मिळवत असतो. आपली अपथ्ये हा त्याचा खुराक आहे. त्याला खुराक मिळणार तरच तो मजबूत होणार. तुमच्या शत्रूचा मित्र तो तुमचाही मित्र नाही तर तो शत्रूच आहे. हे आधी लक्षात घ्यायला पाहिजे.
रोगाचे आयुष्य पाच-दहा दिवसाचेच
उपवासामुळे रोगाची शक्ती कमी-कमी होत जाऊन रोगलक्षणे मंद होत जातील. शिथिल होत असह्य रोग सुसह्य होत जाईल. कोणत्याही रोगाचे आयुष्य पाच ते दहा दिवसांचेच असते, असे आमच्या लक्षात आले आहे. ठीक उपवासी राहिलात तर पाच-दहा दिवसांच्या शास्त्रीय उपवासाने रोगाचे पूर्ण उच्चाटन होऊ शकते. उपवास सोडताना योग्य काळजी घ्यायची आहे. त्याकरिता विशेषतज्ज्ञांची सोबत आवश्यक आहे; पण पूर्णत: नैसर्गिक संकेताना स्वीकारत गेले पाहिजे.
भुकेचे भान ठेवले पाहिजे. आहार कमी किंवा जास्त न करता संतुलित ठेवून निघालात की झालं ! जितका दीर्घ उपवास, तितकी काळजी उपवास सोडताना घ्यायची असते.
व्यायाम का करायचा?
मित्रहो, आपल्याला व्यायाम का करावा लागतो आहे? तुम्ही पोटाच्या कोट्याची पूर्तता केलीत. या धडाच्याभोवती बांधलेले अवयव, त्यांच्या हालचालींचा कोटा अदा करायला नको का?
हा मूळ देह बनविणार्याने टेबल, खुर्च्या, गाद्या-गिरद्या, कॉट यांना जमेला धरून या देहाची रचना केलेली नाही, तर तुम्हाला तुमचे अन्न शोधता यावे, तुमचे तुम्हाला खाता यावे, शत्रूपासून धावता यावे, या दैनिक कामकाजासाठी मूळ रचना झाली आहे. बालकापासून वृद्धापर्यंत हालचाल आवश्यक आहे. थांबला तो संपला !
सर्वच अवयवांना गती द्या !
आम्ही त्याला बाजारी रूप दिलं आणि सर्व काही गल्ल्याला टेकून ऑर्डर सोडू लागलो. मोबाईल फोनमुळे आम्ही आणखी मोबाईल व्हायचे थांबत आहे. मग या आवश्यक हालचाली झाल्याच नाहीत. म्हणून त्याची पूर्तता आपण व्यायामाद्वारे करीत असतो; म्हणून आपण माफक व्यायाम मुद्दाम केला पाहिजे. म्हणजे सर्वच अवयवांच्या हालचालींचा योग्य कोटा देऊ शकलो, तरच तन-मन प्रसन्न राहील.
हाच तो विहार आहे. हाच त्या अवयवांचा आहार आहे. हा आहार-विहार सांभाळला की पुरे आहे.
क्रमश: