मुळनक्षत्री : एक प्रेरणादाई जीवनधारा : भाग - 5

स्वामी शशीभारती

मला आर्थिक खुराकाच्या बरोबर आध्यात्मिक खुराकही लागायचा. आमच्या घराण्यामध्ये आध्यात्माचं बीज आजोबांची बहीण कृष्णा आजी हिने रोवले. तिचे तर निम्मे उर्वरित आयुष्य बाहुबली गुरूकुल आश्रमात तिने वाहिलं होतं.

शाळेच्या सुट्टी मध्ये ती आम्हाला खुराक द्यायची. धर्माचे पाठही द्यायची. मंत्र सांगायची. पाप-पुण्य समजवायची. हळू-हळू माझे वडील तिच्या त्या शिकंजेमध्ये अडकले. बाहुबली गुरूकुल मध्ये समंतभद्र महाराज एक महान तपस्वी होऊन गेले. जे त्या गुरूकुलाचे संचालक होते. वडील त्यांचे शिष्य असायचे. वयाने मोठी व्यक्ती असूनही ते आमच्या वडिलांना अण्णा म्हणायचे. माझे वडील मंदिरात रोजच देवपूजा करायचे. संध्याकाळी पोथी-पुराण वाचायचे, गंध टिकली लावायचे. धर्माभिमान व देशाभिमान कापड दुकानात लावलेल्या फोटोवरून तो स्पष्ट व्हायचा. या सर्वांचा प्रभाव आमच्यावरही झालाचं. समंतभद्र महाराज ज्यावेळी कर्करोगाने अत्सवस्थ झाले होते, तेव्हा एक निसर्गोपचार तज्ञ म्हणून मी त्यांना मॉलिश करत होतो. ते आमच्या जैन संप्रदायामध्ये युगपुरूष होते.

जयसिंगपूर, उद्गाव व कुंभोज यामध्ये फारसे अंतर नव्हतं. चिपरी, जैनापूर, उदगाव, शिरोळ, दानोळी, कोथळी, अंकली, ढामणे या जैन लोकांच्या समाजामध्ये आमचे एकमेव जैनांचं कापड दुकान होतं. आईलाही सासर-माहेर ऊन-सावली सारखं जवळचं होतं. त्यात धार्मिक व पाटील या विशेष बडेजाव आम्हा परिवाराला भूषणावह होता. त्यामुळे चांगली चलती होती. वडील सोवळे नेसून मंदिरात पूजा करीत असताना आमचा दिवस उगवायचा.

पोथी-पुराणाच्या वेळी वडील दिसतील त्या परिवारातील लोकांना घेऊन बसायचे. कथा-पुराण चालायचे. सोबत शेजारच्या काही आजीबाई पण यायच्या. दुकानाच्या काऊंटरवरच पोथी उघडून बसायचे. कथेमध्ये महारोग्यांची सेवा, तपस्व्यांचा स्पर्श व चमत्कार या गोष्टी यायच्या. एकूण काय, मुंगीपासून हत्तीपर्यंत सगळे प्राणी जीव-जीवाणू यांना समान जाणून मन, वचन, कायेने कोणालाच इजा पोहचवायची नाही, पोचवली तर पाप लागते. रोज देवदर्शन करावे. जय जिनेंद्र! म्हणावे व परस्परांचे स्वागत करावे हा परिपाठ वहीवाट म्हणून आमच्या परिवारात होता.

जेव्हा मी कोल्हापूर मुक्कामी आलो. तेव्हा प्रजापिता ब्रम्हाकुमारी यांचा पगडा अगदी कांदा लसूनपासून ब्रम्हचारी पर्यंत जैनांशी मिळता-जुळता होता. मंगळवार पेठेतल्या या युनिटच्या हॉलमध्ये आठ वाजता क्लास व्हायचा. मुरली वाजली जायची. धर्माचे धडे गिरवले जायचे. अबू पहाडापर्यंत कधी-कधी जाणं व्हायचं. व्ही. आय. पी. कोठयातून माझा शिरकाव व्हायचा. एकूण पूर्वानुभवावरून मी थोडा पस्तावलो होतो. मला थोडी मानसिक शांती हवी होती. आध्यात्मिक चर्चा करू लागलो. प्रजापिता ब्रम्हाकुमारी यांच्या क्लासेसला जाऊ लागलो. एकदा-दोनदा दत्ताबाळ हा काय प्रकार आहे पाहावं म्हणून जाऊन बसलो ते मला प्यायलेले दिसले, विक्षिप्त दिसले, जे बोलत होते ते काहीच कळत नव्हतं.

एकदा काय झालं डॉ. एन. जे. पाटील अण्णांनी एक पुस्तक मला वाचायला दिलं. त्याच्या मधल्या रेघोटयाने माझ्या खोडीची दखल घेऊन माझी परीक्षा घेण्याचे त्यांनी ठरविले.

त्या काळातले भगवान रजनीश यांचे पुस्तक माझ्या हाती देत ते म्हणाले,  “यात किती रेघोटया मारतोस बघू.”  पुण्याहून निघणारे ते ‘योगदीप’ नावाचे रजनीश आश्रमाचे पाक्षिक होते. मी त्याकाळी भन्नाट वाचत होतो. मला वाटत होते. जगामध्ये जितके धार्मिक ग्रंथाचे मुद्रण झालं आहे, ते नजरेखालीच घालावे. जे सापडेल ते मी वाचत होतो.

जेव्हा ‘योगदीप’ हाताला लागले. इथे माझी मनिषा थांबली. सगळया धर्माचा अर्क योगदीप मध्ये तरळत असताना दिसत होता. मी जर यांनाच समजून घेतलं तरी जग समजून घेतल्यासारखं आहे, असे समजून पहिल्यांदा रेघोट्यांशिवाय मी वाचून काढलं. सगळचं मला महत्त्वाचं वाटलं होतं. कारण महत्त्वाच्या शिवाय काही नव्हतचं. मग कशाला रेघोटया मारायच्या आणि कशाला नाही हे मला कळलचं नाही.

या एन. जे. भावांनी ‘योगदीप' पाक्षिक मला दिवाळीची भेट म्हणून त्याची वर्गणी भरली होती. प्रत्येक पंधरा दिवसांनी हे पाक्षिक मला मिळणार होतं. हा खुराक माझ्या पदरी पडणार होता. त्याची मी रद्दी करणार नव्हतो, विचारांची आणि कागदांचीही!

योगदीप पाक्षिकांची ही एक फाईल सजत गेली. भगवान रजनीश यांच्या व अण्णांच्याही अनाहूत प्रेमात मी पडत गेलो. खरचं ही माणसं मला देवमाणसं वाटली. अगदी वेडयासारखं ओशोंचं साहित्य वाचण्यामध्ये मी झपाटलो गेलो. ओशोंची कॅसेट ऐकत गेलो. उच्चभ्रू डॉक्टर दोस्त मंडळी अण्णांच्यासह त्यांच्या साहित्य वाङ्मयात डुंबत होती.

आता बांधावर राहणं मला पसंत नव्हतं. मी धाडस करून त्यांचा संन्यास घेतला. त्यांचा डोळस ‘फॉलोअर’ झालो. त्यांच्या आश्रमात राहू लागलो.

त्यांचा आश्रम वनश्रीनं आणि सफाईन आखीव रेखीवपणे सजलेला असायचा. विलक्षण शांतता असायची. मन मोहून जायचं. ठीक आठ वाजता प्रवचन हॉलला एक गाडी घेरा घालायची. त्यातून हात जोडून नाजूक पावले टाकत भाव विभोर होऊन एक दाढीवाली व्यक्ती प्रवचन मंचावरती यायची.

खुर्चीवरती पायावर पाय टाकून बसायची. बोलायला आरंभ करायची. तासभर बोलणं चालायचं. त्यामध्ये छोटे-मोठे विनोद असायचे, हास्याचे फवारे असायचे. मानवी मनाचा खुळेपणा असायचा. मुल्ला नसरूद्दीन असायचा. राजकारणं असायचं, महावीर, बुद्ध, मन्सूर इत्यादींचा जीवनपट सारं-सारं काही असायचे, जगाच्या अथपासून इथपर्यंत सार्‍यांचा उल्लेख व्हायचा पण हे बहाद्दर कधीच हसले नाहीत. गंभीर आणि तटस्थ असायचे. स्थितप्रज्ञ असायचे. यांच्या या विशेष प्रतिभांचा माझ्यावर प्रभाव पडायचा. मला हवं ते मला मिळाल्याचा विलक्षण आनंद असायचा.

इकडे माझ्या पत्नीला पण मी वेगळाच वाटू लागलो. मी वाहतोयं वाटतं! सगळचं सोडून मी जातोय वाटतं! असचं यांना वाटायचं. हा संन्यास तसा नव्हता. प्रपंच करत थाटाने उभा राहण्याचा होता. मी प्रत्येक प्रयोग स्वतः करून पाहत होतो. मी प्रयोगाला स्वतःस पात्र ठरत होता. प्रयोगवीर समजत होतो.

मी जेव्हा संन्यास घेतला त्या दिशवी एक सोहळा होता. रात्रीचे ठीक आठ वाजले होते. नुकतेच स्नान आटोपून भगवी वस्त्रे धारण करून माळ ग्रहण करायला भगवानांच्या समोर मला जायचं होतं.

मनाने मी ठरवलं होतं. भगवान रजनीश ही सामान्य व्यक्ती आहे. पूर्वग्रह काही न करून घेता त्यांच्या समोर बसायचं. काय होतयं बघू या?

भगवान खुर्चीवर एके ठिकाणी गर्दीत बसले होते. क्रमाक्रमाने माझं नाव पुकारलं गेलं तसा मी उठलो. माझ्या चेहर्‍यावरती प्रकाशाचा फोकस आला. गर्दीत मी कुणाला तुडवतोय हेच मला कळत नव्हतं. रस्ता काढत मी निघालो होतो.

ओशो माझ्याकडे बघत होते. एकदाच नजरेला नजर भिडवली आणि डोळे बंद केले. आता म्हटलं पाहायचं नाही! मी माझ्या चरणाकडेच बघत बसलो. एक फॉरेनर संन्यासी येथे ‘सीट टेका’ असा इशारा करत होता. मी तिथेच बसलो. ती बैठक ओशोंच्या चरणाशी होती. मी त्यांचा चरणस्पर्श करून माथा टेकला. त्यांनी मला डोळे बंद करायला सांगितलं.

मला कळालं नाही. तो फॉरेनर आपल्या पापणीवर हात ठेवून, भगवान डोळे बंद करायला सांगत आहेत असा संकेत दिला. त्याबरोबर मी डोळे बंद केले.

 “कौनसा ध्यान करोगे?”  भगवान मला विचारत होते.

मी ‘कुंडलिनीध्यान’ असे म्हणालो.

 “ठीक है। वही करो!”  ते म्हणाले.

ओशोंनी माझ्या कपाळाच्या भु्रकुटीवर, आज्ञाचक्रावर बोटाने दाबलं. दुसर्‍या हाताने माझ्या गळयात हळूच माळ सोडली. मला काहीचं कळालं नाही. त्यावेळी त्यांनी माझं नामकरणही बदललं ‘स्वामी शशी भारती’ नाम विधान दिलं.

माझ्या समोर एक गढूळ पुराचं पाणी इतक्या वेगाने घुमू लागलं. मी त्याच्यासह फिरायला लागलो. काही क्षणातचं तळातले दगड-धोंडयांचे शंख-शिंपल्याचे स्वच्छ दर्शन मला होऊ लागले, असे वाटले.

यात किती वेळ गेला? यात खूपच वेळ गेला असावा तोपर्यंत भगवान डोळे उघडा म्हणत होते. मला काही कळालचं नाही.

शेजारच्या फॉरेनर सेवकाने माझ्या मांडीला टच करून डोळे उघडायला सांगत आहेत असा संकेत दिला. तोपर्यंत दुसर्‍या माणसासाठी घोषणा झाली. मी उठून माझ्या जागेवरती आलो. मला असे का झाले? मी हा गृहस्थ सामान्य आहे समजून गेलो होतो. तथापि असे का झाले? ही सूचना हा संकेत कशाचा असेल? यावर माझे मनन आणि चिंतन चालू राहिले पुढे मी त्यांच्या विलक्षण प्रेमात पडलो आणि यांच्यासाठीच जीवन वाहावं असं वाटू लागलं.

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रेमप्रदीप-रजनीश ध्यान केंद्राची सूत्रे माझ्याकडे देण्यात आलीत. याची कार्यवाही स्थापना माझ्या इमारतीत वरच्या मजल्यावरती हॉलमध्ये सुरू झाली. आठवडयाला प्रवचनाच्या कॅसेटचा पुडका पोस्टाने पार्सल होऊन माझ्याकडे यायचा. ते ऐकायला शे-दीडशे लोक जमा व्हायचे माझी इमारत तोपर्यत आणखीन बांधली गेली व वरचा माळा, हॉल तयार झाला होता. एकंदर त्यांच्या साधनेमुळे पाटीलकी टेंभा संपला, अहंकार संपला.

अध्यात्माचे प्रयोग किंवा स्वास्थ्याचे सारेच प्रयोग हे मी आधी स्वतः वरतीच करीत असे. मग माझ्या पेशंटवर उतरवीत असे. मग शिवाम्बूचे प्रयोग असू देत किंवा ध्यानाच्या समाधीचे प्रयोग असू देत. माझ्याकडे वेगळी प्रयोगशाळा नव्हती. सगळेच प्रयोग माझ्या शरीरावरती होत. मग ते काहीही असोत.

विजापूरच्या ल्यूकेमियाचा पेशंट जुगल किशोर भूतडा हा जेव्हा माझ्या दवाखान्यामध्ये अ‍ॅडमिट होता, तेव्हा त्यांच्या आई-वडिलांनी श्रीशैल येथे असणार्‍या ‘माणिक अम्मांच्या कथा’ मला ऐकवल्या होत्या. सलग साठ वर्षे अन्न पाणी त्याग करून म्हणे ती भुयारामध्ये समाधीस्त तपस्वी असते. फक्त शिवरात्रीलाच ती बाहेर निघते व आपल्या भक्तांना भेटते. एका शिवरात्रीला आम्ही जायचं ठरवून ही अजून जाणं झालं नाही.

माझ्या पुईखडीच्या टेकडीवर घेतलेल्या स्वतःच्या जागेत महादेवाच्या पिंडीच्या आकाराची भली मोठी वास्तु माझ्याकडून उभी केली गेली. त्या काळी वीस-एक हजार रूपये खर्च आला होता. सूर्याच्या दिशेला दरवाजा ठेऊन महादेवाच्या पिंडीचा आकार त्याला देण्यात आला होता.

टेकडीवर दिसणारी ही एकच वास्तु लोकांच्या नजरेत भरायला लागली. चारही बाजूला व आकाशाच्या ही बाजूला मिळून पाच गोल खिडक्या बसवल्या होत्या, वायूविजन सुंदर व्हायचं. त्या ध्यान मंदिरात संडास पाणी यांची व्यवस्थाही करण्यात आली होती. मला माणिक अम्मांचा प्रयोग करून पाहायचा होता. त्यासाठी मी अनुकूल यंत्रणा उभी केली होती.

सभोवती पाचशे झाडे वनमहोत्सव करून वनीकरण विभागाकडून लावली होती. सोबत कुपनलिकाही खोदली होती. पाणी जेमतेम असायचं. त्यात मी स्वतः सहा महिने कोंडून राहण्याचा प्रयत्न केला.

व्यायाम, ध्यान व विश्रांती यात काळ सरकत निघाला. आरे, बीड, सावरवाडी, कांडगांव, देव्हाळे या परिचित गावातून लोक एस.टी. तून जाता-येता या वास्तुकडे बोट करून लंगडया डॉक्टरने इथे समाधी घेतली, असं कुजबुजत ती गाडी तिथून पास व्हायची. हा खरंतर गैरसमज होता.

‘शिवाम्बू उपवास’ हा माझ्या उपचाराचा कणा होता. सुरूवातीच्या कालखंडात मला भूक लागली तर काहीही खाऊन गुजराण करायची आणि ध्यानस्थ व्हायचो. गुण आलेले पेशंट तेथेही मला भेटायला यायचे. त्यामुळे माझ्या साधनेत व्यत्यय यायचा.

चातकासारखी प्रतीक्षा करणारे पेशंट मला म्हणत,  “इतका चांगला प्रपंच सोडून तुम्ही इकडे एकटे काय करत आहात. हा इकडे कोणता प्रयोग करीत आहात?”

अशाच एका दिवशी ‘भैय्या परदेशी’ नावाच्या व्यक्तीने मनापासून ठरविले होतं. या व्यक्तीला घरात आणून सोडावे. छोटया-मोठया खिडकीतून मी काय करीत आहे? हे तो शोधण्याचा प्रयत्न मला व्यत्यय आणून करीत होता. हाही मनुष्य प्रचंड जिद्दीचा होता.

 “आज पाडवा आहे, दिवाळी आहे, तुम्ही घरी चलावं. घरी दोन सोन्यासारखी मुलं आहेत.”  तो बाहेरून आवाज काढू लागला. मी तुम्हाला घराकडे नेणारचं म्हणू लागला. शेवटी तो मला घराकडे नेण्यामध्ये यशस्वी झाला.

त्या काळात माझे गुरू ‘भगवान रजनीश’ यांचे अमेरिकेला प्रयाण झाले होते. अमेरिकेमध्ये 64 चौ.कि.मी अशा बंजर जमिनीमध्ये ‘रजनीशपूरम’ नावाचे एक आधुनिक शहर वसवले होते. ‘रजनीश कम्यून’ असेही त्याला म्हणायचे.  

त्यावेळी मी हे सर्व विकून अमेरिकेलाही जावं की कायं? असाही विचार करीत होतो. कारण माझ्यासोबतचे गुरूबंधू लोकही रजनीशपूरमला गेले होते.

मला निसर्गाबद्दल ओढ व आपुलकी वाटायला लागली. रंकाळाही प्रिय होऊ लागला. एकांतात एकटा चराचरावरती प्रेम करत फिरू लागलो. एका खाणीमध्ये पाण्यात हात-पाय मारून कमी पाण्यात पोहणे शिकू लागलो. पोहण्याची कला मला हळूहळू आत्मसात झाली. पाण्यावरती तरंगत राहणे मला अवगत झाले. पाणी बुडवत नाही, माणसाला बँका बुडवितात, केवळ भितीच पाण्यात बुडवते, असा नवाच सिद्धांत मांडू लागलो. पाण्याचा स्वभाव आहे, माणसाला जिवंत ठेवण्याचा! म्हणूनच मरणारा मनुष्य पाणी-पाणी म्हणतो. पाणी पाजले की, माणसात जिवंतपणा येतो. मला जेव्हा-जेव्हा रिकामा वेळ मिळायचा तेव्हा-तेव्हा मी त्या खाणीमध्ये तरंगत असायचो. उन्हाळयामध्ये रात्री आठला पाण्यात उतरून सकाळी आठला घराकडे जाण्यासाठी बाहेर पडत असायचो असा रेकॉर्ड ब्रेक होत होता. कोणी मला विचारत नसे, मी स्वच्छंदी राहायचो.

मी दहा-वीस किलोमीटरच्या निर्जन जंगलामध्ये एकटा सर्व शिधा सामुग्रीसह चार-चार दिवस, आठ-आठ दिवस तंबू मारून राहू लागलो. चराचर माझे झाले होते. भिती सुंपुष्टात आली होती. यातूनच निसर्ग उपचाराकडे ओढला गेलो. हा जंगली उपचार जंगलातच करणे योग्य होईल असा विचार करून जंगलात कोणाची जागा विकायची आहे का? याची चौकशी सुरू केली. पन्हाळयाच्या आसपास जागा पाहिली. जागा महाग वाटली. हातात असलेली पुईखडीची जागा दरम्यानच्या काळात त्या महादेवाच्या पिंडीच्या वास्तूसह नगरपालिकेने अत्यावश्यक पाणी पुरवठा विभागाने हातातून नुकतीच काढून घेतली होती. त्यामुळे दुसरी जागा पाहत होतो.

गगनबावड्याकडे ‘पळसंबे’ या खेडयात आसळजं जवळ तो सगळाचं परिसर मनस्वी आवडला. गुरव समाजाची जमीन दोन एकरपर्यंत विकणार्‍याला शोधलं. पन्नास वाटकर्‍यासह ती जागा खरीदली. त्या जागेच्या जवळच सतत वाहणारा एक ओढा होता. त्या ओढयात पांडवकाळातील दगडामध्ये कोरलेल्या ध्यानस्थ बसण्यासाठी ओवर्‍या होत्या. ते पाहायला पर्यटक यायचे. आज नि उद्या माझा जंगली उपचार या जागेवर शोभा देईल या आशेवर तिथे एक मी पक्क्या इमारतीची खोली बांधली. तोपर्यंतच श्री. डी. वाय. पाटील या धन-दांडग्या लोकांनी शुगर फॅक्टरीचा घाट त्या भागात घातला. धूर ओकणारी शुगर फॅक्टरी इथल्या जागेला प्रदूषित केल्याशिवाय सोडणार नाही म्हणून त्या जागेवरचे प्रेम, जाणे-येणे हळूहळू कमी झाले. अजूनही जागा ती आपल्याच ताब्यात आहे. नियमाप्रमाणे शुगर फॅक्टरी सुंदर परिसर प्रदूषित करते आहे.

मी आर्‍याहून मोटर सायकलने कोल्हापूरला धावत होतो. सोबत माझी व्हिजीट बॅग होती. दुपारची वेळ होती. डोक्यावरती कडक ऊनं तळपतं होतं. जवळचं धोंडी पाटलांच्या गुर्‍हाळाचा खटला चालू होता. उसाची ट्रॉली ट्रॅक्टर रस्त्याने ऊस भरून ये-जा करीत होते आणि बारा वर्षाची पोर ट्रॉलीतला ऊस खेचत होती. ऊस काही निघत नव्हता. कुठे तरी पाय देऊन वर चढण्याचा प्रयत्न केला व रस्त्यावरती बघता-बघता फरफटू लागली. ट्रॅक्टर मात्र पुढे निघून गेला. ती बारा वर्षाची पोरं मात्र पडूनच राहिली. रस्ता निर्जन होता. मी स्वतःची गाडी थांबवली. फुकाटयात लोळली होती.

कुठं लागलं बघावं म्हटलं, पायाच्या घोटयापासून उखळी सांध्यापर्यंत पाय हुकाला अडकून  फाटला होता. चमडं बाजूला सरकलं होतं. लाल भडक मांस दिसत होतं. रस्त्यात तरी कुणीचं नव्हतं. जवळचं फडकर्‍याची छावणी होती. त्यातलीच ही पोर होती. त्यातल्याच आया-बाया कडून वाकळाची सुई मागून घेतली, दोरा मागून घेतला आणि ‘फर्स्ट-एड’ म्हणून काहीतरी करावं म्हणून चमडं ओढून आधे-मधे धाव टाके घातले.

त्या मुलीचा सहयोग बघून बारीक-बारीक ही टाके टाकावेसे वाटले आणि ते टाकले. एकूण टाके माजले, एकूण दीडशे टाके होते. निर्जंतूकीकरणची व्यवस्था मात्र उपलब्ध नव्हती. ते मुलं लमाण्याचं होतं. जमावाला लघवी गोळा करायला सांगितलं. कापूस ठेऊन ड्रेसिंग केलं. त्या ताज्या लघवीत त्याला भिजवलं आणि त्यांना म्हणालो,  “हे ड्रेसिंग वाळू देऊ नका. वाळू लागलं कि मुताचं पाणी टाकून भिजवां.” त्यांनाही एकूण या सर्वच उपचार पद्धतीचे आश्‍चर्य वाटलं.

मी पुन्हा दहाव्या दिवशी येईन म्हणालो. माणसं गरीब होती. भटकी होती. तीन दगडाचा उघडयावरती स्वयंपाक करणारा हा परिवार होता. ज्यांच्या वाटयाला आकाश अधिक, त्यांच्याच वाटयाला रोग प्रतिकारकशक्ती अधिक हा माझा जुना अनुभव होता.

शहर-दवाखाना जवळ नव्हता. उपचार तरी झाला होता. सांगितल्या प्रमाणे दहाव्या दिवशी आलो. त्या पाल्यात शिरलो. भिजलेलं ड्रेसिंग उलघडू लागलो. ड्रेसिंगच्या कापसालाच सगळे टाके चिकटले होते. एक दोन टाक्यालाच मला सीझरचा वापर करावा लागला. मी स्वतःच पाहून आश्‍चर्यचकित झालो होतो. जखमेचा व्रणही झाकून गेला होता.

रफू करणारा त्याच कापडातला धागा सोडवून रफू करतो. फाटलेल्या देहाला त्याच देहाच्या पाण्याने बेमालूम रफू मात्र झाली होती. कंपनीचा धागा कोणता? व रफूचा धागा कोणता? हे ओळखलं नव्हतं. अर्थात जखमेची मासोळी सारखं चिन्हही राहिली नाहीत. पायासारखाच पाय झाला होता.

आपल्याकडे एक म्हण आहे, ‘कापल्या करंगळीवर साला मुतायलाही तयार नाही.’ याचा अर्थ हा किती कंजूस आहे. कृतघ्न आहे, याचे दर्शन यातून होण्यासाठी हा शब्दप्रयोग आहे. याचाच अर्थ कापण्याशी आणि मूत्राशी नक्कीचं नातं आहे.

शेवटी ओठ आपले, दात आपले, डोळे आपले, बोटही आपली, इजा आपली, औषधही आपले, रक्तं आपलं, गोतावळाही आपला, सदस्य आपला, परिवारही आपलाच. याच न्यायाने एक खारं पाणी, डोळयाच्या वाहत्या खार्‍या पाण्याला अडवू शकलं होतं. जशी मायं सासरी जाणार्‍या लेकीच्या गालावरचे पाणी पुसते तशीच ही हकिकत होती. ‘निसर्ग हाच स्वर्ग’ मानणारा जो वर्ग आहे. त्यालाच हे मात्र कळणार   हे निर्विवाद.

‘सानेगुरूजी हौसिंग सोसायटीची' शिक्षक मंडळी, शिवाजी पेठेतल्या खंडोबा तालमीजवळ घराघरात जाऊन शिरगणतीच्या नोंदणी करत होती. तेवढयात एक अ‍ॅम्ब्युलन्स सायरन वाजवित एका घरासमोर जाऊन थांबली. त्याबरोबर ही मंडळीही धावली. पी. के. शिंदे नावाचा एक शिक्षक ज्याला ‘टाटा हॉस्पिटल, मुंबई' रिजेक्ट केलं होतं. पेशंट अत्यवस्थ झाला होता म्हणून घरी पाठवला होता. त्याला जीभेचा कॅन्सर होता. जीभ तोंडातून बाहेर पडली होती. डोळे पांढरे झाले होते. शरीर कृश झालं होतं. साधारण त्यांचे वजन पंचवीस किलोच्या घरात आलं होतं. तो शिक्षक कमिटीचा प्रतिनिधी होता. वसाहतीतील एका शिक्षकाला मात्र वाटू लागलं या माणसाला डॉ. शशी पाटलांकडे जायला सांगाव. तोपर्यत पी. के. शिंदेचा भाऊ पुटपुटला, मुंबईच्या विमानातून येणार्‍या डॉक्टरांनी हात टेकलं आणि तुम्ही काय सांगतायं?

ही बातचीत पी. के. शिंदेच्या शेजार्‍याने ऐकली आणि तो तडक माझ्याकडे आला. मला म्हणाला, तुम्हाला शिवाजी पेठेत लगेच माझ्या बरोबर यायला हवं! दरम्यान रस्त्यात एकूण व्यथेची कथन केली. मला एकूण व्यथा समजली. पेशंट वीस ते तीस किलो वजनाचा म्हणजे कृश झाला होता. डोळे आत गेले होते, जीभ बाहेरच होती. यांना काय सांगू? हा माझ्यापुढे प्रश्‍न होता. तरीपण धाडस केलं जीवात जीव आहे तोपर्यंत माझा दवाखाना तुम्ही तुमचे घर समजा, हा पेशंट इथे ठेवण्यापेक्षा तिथे ठेवा. ‘तीन दिवसात चमत्कार होऊ शकतो. तीन दिवसात ओम नमः शिवाय तो बोलू शकतो.' ती तशीच अ‍ॅम्ब्युलन्स माझ्या दवाखान्यासमोर आली. त्याला अ‍ॅडमिट करण्यात आलं.

उपलब्ध शिवाम्बू पाजण्यात आली आणि शिळे मूत्र तास-तास मी ते स्वतः चोळायचं केलं. उन्हाची सकाळची तिरपी किरणं उघडया अंगावर देण्यात आली. नस-नस, पेशी-पेशी तावून निघाल्या. शरीराचा दुष्काळ संपला. शरीर चमकू लागलं. बघेल तो फरक पडला म्हणू लागला. पी. के. शिंदे ओम नमः शिवाय उच्चारत उच्चारत मैदानात परेड करू लागले. जीभ पूर्ववत आत सरकली. उच्चार स्पष्ट होऊ लागला. उपाचारात सुधारणा होत निघाली. उपचार केंद्र प्रकाशातून महाप्रकाशाकडे निघालं.

हा लिडर असल्यामुळे पाच-पन्नास लोकं रोजच भेटायला येऊ लागली. शिवाम्बू उपचार केंद्र पंचक्रोशित ठळक होऊ लागले. ही बातमी पेपरमध्ये झळकली. पुढार्‍यांचे पुढारी, आमदार येऊ लागले. पाडळीचे काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस एस. आर. पाटील, माझ्यावरती दडपण आणत मला म्हणू लागले,  “आता जर उपाशी तुम्ही ठेवलात तर तुमच्यावर ब्लेम येईल, उपाशी ठेऊन मारल्याचा.”

कारण आतापर्यंत तो घास खाऊन महिना झाला आहे. उपवासचं रोगाची खोड मोडू शकतो ही उपचारा मागची माझी धारणा आहे. मर्यादित उपवास हा दिलाच पाहिजे हाच नाईलाजावरती इलाज आहे.

एस.आर.पाटीलांच्या ब्लेमचा धाक मला वाटला आणि मी म्हणालो,  “काहीही करा मरत असलेला आपल्या मरणाने मरणार  आणि उगीच ब्लेम कशाला?”  असे म्हणून मी फास्टिंग ब्रेक करायला सुरूवात केली.

तो लगेच भाकर पण मागू लागला. दिलं नाही तर डोळयातून पाणी काढू लागला. त्याचे परिवारातले संबंधित लोक गहिवरू लागले. नसती आफत नको म्हणून मी भाकरीही द्यायला लागलो. कारण नको व्हायचं ते होणारचं आणि शरीरात नको ती घटना, घडामोडी होऊ लागल्या. त्याला झोप ज्यादा येऊ लागली. पी. के. शिंदे हा परेड करणारा पेशंट गुंगीत अंथरूणाला बिलगला. बिचारा इथचं संपू नये म्हणून त्याला घरी वेळीच डिस्चार्ज दिला आणि हा इसम आठव्या दिवशी घरी संपला. उपचारामध्ये डिस्टर्ब झाला म्हणजे काय होतं? आप्त इस्ट आणि चिकित्सक यांच्यामध्ये मतभेद झाला म्हणजे कायं होतं? उपचार नियमात तोड-मोड झाली तर कायं होतं? हा पी. के. शिंदे एक त्याचा नमुना होता.

उपचारात आणि पथ्यात कसूर केल्यामुळे वाईट अनुभव आलेली आणखी दोन पेशंट ः

उपचार काळात तज्ज्ञ चिकित्सकांचा अनुभव जमेला घेतला नाही तर काय-काय होतं? त्याचं दुसरं उदाहरण देणारा हा एक दाखला. 

मलकापूरचे एक प्रसिद्ध व्यापारी ‘भाऊ भिंंगारडे’ यांना लकवा झाला होता. नाव लौकिक असणारा पेशंट, उपचार नियमातून सहा दिवस उपवास दिला.

उपवास काळात उपवास चालू असताना दुपारच्या वेळेत मी नसताना काही रूग्णांचे अटेंडण्ट जेवायला बसले होते. भाऊ भिंगारडे जेवणार्‍यांना दिसले. आपल्याकडे प्रथा आहे त्याप्रमाणे ‘या काका, जेऊ या!’ असं जेवणार्‍या लोकांनी उच्चार केला. उपोषणाने भूकावलेला भाऊ भिंगारडे याला इतकचं निमित्त पुरेसं झालं. लगेच ते मांडीला मांडी लाऊन एक भाकर हातात घेऊन बसलेले मला दिसलें. मी तोपर्यंत कुठून तरी आलो होतो. मला धसका बसला. उपवासाच्या सहाव्या दिवशी पेशंटच्या हातात भाकर म्हणजेच धोक्याची फार मोठी घटना. मी हातातील भाकर हिसकावून घेतली.

 “भाकर किती खाल्ली तुम्ही?” सांगा आधी म्हणालो.  “एक कोरभर भाकर खाल्ली असेल असे नसेल. पण तेवढीच भाकर पचवून दाखवां. काय-काय कसरत करावी लागते ते बघू या.”  मी म्हणालो, सोबतच्या लोकांवरही मी संतापलो.  “उपवासाच्या माणसाला तुम्ही भाकर दिलीच ंकशी?”  त्याकाळात साधारण पंचवीस एक रूग्णांची पटसंख्या होती.

भाऊराव भिंगारडे यांच्या आतडयामध्ये भाकरीचा लगदा जिथे-जिथे बसला होता. तिथली शारीरिक क्रिया-प्रक्रिया थांबली होती. डोळयाच्या दोन्ही बाजूला आखाळं खोल गेलं होतं. हातापायाला पेटके येत होतं. बी. पी. वाढलं होतं. एकूण पेशंट सिरीयस झाला होता. एनिमा देऊन पाहिला, गोमूत्र देऊन पाहिलं, पोट फुगत निघालं होतं. पेशंट अत्यवस्थ होत निघाला होता. घरच्या लोकांना बोलावून घेतलं. झालेली हकीकत सांगितली.

शेवटी एरंडेल देऊन गरम पाणी पाजले, तेव्हा कुठे आतील खाल्लेली भाकर पुढे सरकली. चार-दोन संडास झाले व पोट साफ झालं. पेशंटला हायसं वाटलं. माझाही जीव भांडयात पडला. हातातील संपूर्ण भाकर खाल्ली असती तर काय झालं असतं? पेशंट दगावला असता. वेळीच मी पोहोचलो होतो. नशीब पेशंटचं म्हणायचं की माझं म्हणायचं! हा माझ्यापुढे प्रश्‍न होता. आधीच आडदांड लोक त्यात उपचार असा उपेक्षिलेला त्यात उपवास ही सगळी गणित सोडवायची माझ्यापुढे सर्कसीची कसरत होती.

‘अन्न तारी व अन्न मारी’ हे एवढयासाठीच म्हटल आहे. उपवासानं आतडी कमकुवत व मलूल झालेली असतात. जितकं विमान उंचीवर पोहचतं तितकी त्याची जबाबदारी वाढते. जितका उपवास अधिक करतो, तितकाच उपवास सोडताना काळजी वाढत असते. आधी लिक्विड लिंबू-मधं पाण्याचं, नंतर सेमी लिक्विड मुगाच्या सुपाचं, हळू-हळू कॉन्टिटी वाढवत, सॉलिड अन्नांश देत-देत नॉर्मल अन्नावरती आणायचं असतं. हीच मोठी जबाबदारी घेणार्‍यांनी घेतली तर यात अवघड काहीच नसतं. हीच उपलब्ध शिवाम्बू भूकेला सतवू देत नाही आणि अधून-मधून पिलेल्या पाण्यातून शिवाम्बू तयार होतं असतं. शिवाम्बू हे अन्नाचं काम करत असतं. टॉप गेअर वरून फर्स्ट गेअरवरती येताना जशी क्लचं दाबून काळजी घेतात, तशीच ही काळजी घ्यायची असते. 

दुसरं उदाहरण एक सामान्य धनगरगडी, लेप्रसी (महारोग) साठी मजकडे उपचार घेत होता. माझ्या निवास क्षेत्रापासून पेशंटचा उपचार कक्ष काही अंतरावर असल्यामुळे माझी नजर म्हणावी तशी त्या पेशंटवरती राहत नव्हती. मेंढयांच्या कळपात जसं धनगर कायम पडून असतो. तसं या उपचारामध्ये चिकित्सकाने एकसारखं पेशंट वरती लक्ष ठेवावं लागतं. नाहीतर असे हे पेशंट चुकीच्या मार्गानी, चुकीचे अनुभव घेतात.

मोठा आजार बरा व्हावा म्हणून मी सलग दहा दिवसाचा उपवास त्याला दिला होता. पाय रिकामे करावेत म्हणून हा गृहस्थ दवाखाना सोडून बाहेर पडला. काही अंतरावरती गेल्यावर काही शेतकरी बैल सोडून जेवायला बसले होते. हा अनोळखा मनुष्य दिसताक्षणी प्रथेप्रमाणे ‘या पाव्हणं जेऊ या!' असं जेवणारे लोक त्याला म्हणाले.

आधीचं पाहुणा दहा दिवसाचा उपाशी होता, कधी भाकर खाईन असचं त्याला झालंच होतं. दोन भाकरी त्या बहाद्द्र्ानं खालेल्या दिसतात. नेहमीच दोन भाकरी खाणारा तो. दवाखान्यात आल्यावर पोट लागलं त्याचं फुगायला.

मी त्याला विचारलं,  “तू कायं खाल्लसं काय?”

 “लोकांनी आग्रह केला म्हणून मी दोन घास खाल्ले.”

 “नेमकं सांग किती खाल्लसं, नाहीतर जीव घोटाळयात पडणार आहे.”

त्यानं हात उचलून दोन बोट उभी करत दोन भाकरीचा ंसंकेत दिला. माझा जीव धस्सं झाला. आता काय होणार या पेशंटचं? गडबडीत मी एरंडेल दिलं त्याच्यावरती गरम पाणी पाजलं आणि त्याला वाचविण्यासाठी चोवीस तास प्रयत्न केला. मोठया मेहनतीनं तो वाचला.

अशा प्रकारच्या आततायी प्रकारामुळे उपवासाचा लाभ न होता तोटाच होतो व रोग बरा होण्याऐवजी रोग चेतावला जातो. आपण काचेचं भांड जसं सांभाळतो तसा उपवासाचा मनुष्य उपवास सोडताना सांभाळावा लागतो. नाहीतर बहुधा तो दगावतोच.

प्रायव्हेट हायस्कूलच्या मागे पाठक हे मामलेदार राहत होते. त्यांच्या पत्नी अंबुकाकू, त्यांना लिव्हर कॅन्सर झाला होता.

टाटा हॉस्पिटलकडून त्याही नुकत्याच परतल्या होत्या. बाईंचं पोट तड्म झालं होतं. हात-पाय सुजले होते. पेशंट सदृश दिसत होता. कोणीतरी त्यांना माझी माहिती दिली. त्यांचा मुलगा अविनाश मजकडे आला. एकूण हकीकत त्याने कथन केली. मी त्याच्या मोटरसायकलीवर बसलो.

 “काय परिस्थिती आहे बघू या?”  म्हणालो.

मी घरी आलो, त्या बरोबर आप्त-इष्ट व शेजारी या लोकांनी पेशंट भोवती एकच गर्दी केली होती. मी पोट पाहिलं, पोट नगारा दिसला, विचार केला. एनिमा देऊन पाहावं.

पेशंटच्या सुनबाईला म्हणालो,  “कुणी तरी मला ताजी लघवी पुरवा.”  मी व्हिजीट बॅगेतून एनिमाचे पात्र काढले. लिटर-सव्वा लिटर गरम, बॉडी टेम्परेचरची ताजी लघवी यांनी पुरविली. त्याने मी त्यांना एनिमा (बस्ती प्रयोग) दिला.

त्याबरोबर त्यांना तीव्र संडासची भावना झाली. सोबतच्या गर्दीला हटवलं व धरून संडासकडे नेलं. खळळ्-खळळ् संडास झालं. पाटीभर आंब्याच्या कोईसारख्या गाठी-गाठी सरकल्या. वरडयाने गंध सुटला.

मी विचारले,  “किती दिवस झाले संडास होऊन?”

त्यानं सांगितलं, “ पंधरा दिवस संडासच नाही झाला.”

जितकी मोठी माणसं तितका रोगही मोठा आणि जबाबदारी ही मोठी. माझा छंद होता आडवा माणूस उभा करण्याचा. माझा स्वभाव आव्हानात्मक अशा जबाबदार्‍यातून वाटा काढण्याचा.

अंबू काकू ही मामलेदाराची पत्नी होती. केस अवघड होती. शिळ्या मूत्रानं मी तिथचं मॉलिश केलं. गरम-गरम स्पंज बाथ दिला. पेशंटला इतका आराम वाटला कि काही विचारायचीच सोय नाही. मामलेदारीण बाई म्हणू लागल्या कि, मला यांच्या दवाखान्यात दाखल करा व पुढे ही केस माझ्या दवाखान्यात अ‍ॅडमिट झाली. त्यांनी नियमाप्रमाणे दहा दिवसाचा उपचार घेतला. त्यांनी उपचार घेतल्यानंतर जो अभिप्राय दिला तो खालीलप्रमाणे आहेः

 

दिनांक 02/02/1978

पं.वा.पाठक

2576, खासबाग, कोल्हापूर

माझी पत्नी लिव्हर आजाराने क्षीण झाली होती. बरेचसे डॉक्टरी उपाय अगदी मुंबईपर्यंत जाऊन केले. पण काही सुधारणा नव्हती. कोल्हापूरला परत आल्यावर माझ्या एका स्नेहिंनी मला शिवाम्बू उपचार केंद्राचा पत्ता सांगितला व डॉ. शशी पाटील यांची ओळख करून दिली. डॉक्टर साहेबांनी उपचाराची कल्पना दिली व उपचार सुरू केले. प्रथम थोडे दिवस घरी उपचार केला व नंतर डॉ. शशी पाटील यांच्या दवाखान्यात अ‍ॅडमिट केले. प्रकृतीत सुधारणा येत होती. या औषधोपचारावर पूर्ण विश्‍वास ठेऊन उपचार करून घेतलेस रूग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. असा मला अनुभव आला.

हा ब्राम्हण परिवार असल्याने त्यांनी बराच कात्थाकूट घातला. त्यांना आपल्या प्रेस्टीजखाली माझ्याकडून फुकट शुश्रुषा आणखीन पुढे करून घेण्याचा मोह होता. त्यासाठी ते माझ्यावरती आपल्या पदाचे प्रेशर आणत होते. त्यामध्ये मी ही क्लृप्ती करून मधला मार्ग शोधत होतो. त्याकाळी माझ्याजवळ फोन नसल्या कारणाने शेजार्‍यांकडून माझी आई सिरियस असल्याचा खोटा निरोप मला द्यावा लागला. त्यामुळे त्या पेशंटच्या जबाबदारीतून माझी वेळीच सुटका झाली.

अंबूकाकूच्या संबंधित घरी-दारी, हॉस्पिटलमध्ये जो संवाद झाला तो रेकॉर्ड केला गेला. त्या रेकॉर्डचं मुद्रण करण्यात आलं, त्या मुद्रणातून एक ग्रंथ तयार झाला. त्या ग्रंथाचं नाव ‘एकच पेला शिवाम्बूचा’ हा नाटयग्रंथ आम्ही 1979 साली प्रसिद्ध केला.

पुढे त्याच्या प्रकाशनाची जबाबदारी पुण्याच्या ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ यांनी उचलली. गडकर्‍यांचा पण ‘एकच पेला’ वाटेला लावणारा आणि माझाही ‘एकच पेला’ वाटेवरती आणणारा.

ज्या वाचकांना या उपचार थेरपीबद्दल विज्ञानाच्या माध्यमातून विशेष व संपूर्ण माहिती हवी असेल तर वाचकांनी ‘एकच पेला शिवाम्बूचा’ हा नाटय ग्रंथ वाचावयास हवा. ज्याच्यातून मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, तार्किक या सर्वच गोष्टींचा मार्मिक ऊहापोह व भेदक पद्धतीने मांडला आहे.

‘एकच पेला शिवाम्बूचा’ या नाटयग्रंथामध्ये-

वंदनीय स्वास्थ्यप्रेरकांचे शिवाम्बू चिकित्सेबद्दलचे विचार तसेच आंतरराष्ट्रीय किर्तीच्या थोर स्वास्थ्य-तज्ज्ञांचे निष्कर्ष दिले आहेत.

मी स्वतः शिवाम्बू उपचार केंद्र चालवित असताना आलेल्या अनुभवातून काढलेले निष्कर्ष यांची सूची व काही दुर्मिळ लेख इत्यादी महत्त्वाची प्रचूळ माहिती पुस्तकाच्या ठायी-ठायी तुम्ही पाहालं. हे माझं आत्मचरित्र वाचणार्‍या वाचंकांनी ‘एकच पेला शिवाम्बूचा’ हे पुस्तक जरूर वाचायलाचं हवं.

या दरम्यानच्या काळात आमचे दोन्ही चिरंजीव ‘महाराष्ट्र हायस्कूल' कोल्हापूर येथे शिक्षण घेत होते. सौ. सरोज घरात म्हशी सांभाळत दुधाची विक्री करत होत्या. मुलांच्या वाढत्या खर्चात हातभार लागावा हा उद्देश ठेवून त्या जनावरांना वैरणचारा देण्यासाठी वैरणीच्या बाजारातून कधी-कधी मुलं शाळेतून येताना सायकलीवरून वैरण आणत होती.

मधल्या काळात जवळ-जवळ चार म्हशी, एक बैल, एक गडी, एक छकडा या भांडवलीसह आम्ही दूध डेअरी देखील सांभाळत होतो. त्या डेअरीच्या इनचार्ज सौ. सरोज होत्या. आम्ही सगळेच मिळून काबाडकष्ट करत होतो.

 “पुढचे शिक्षण तुम्ही काय करणार?”  मी मुलांना विचारीत होतो. दोन्ही पण मुल टेक्नीकलच्या साइडला असल्यानं,  “इंजिनियर होणार!”  म्हणाली माझ्या साइडला कोणी येणार की नाही? दोघांनी मान हालवून नापसंती दिली. दरम्यानच्या काळात ‘सदानंद वर्दे’ हे उपचाराला आले होते. त्यांच्या ओळखीने पुढे ‘कोळसे-पाटील’ त्यांना भेटायला आले, जे हायकोर्टचे जज्ज होते.

इतकी मोठी-मोठी माणसे आपल्या वडिलांच्या पायांना स्पर्श करतात हे मुलांनी पाहिलं. हा माणसातला उद्योग मुलांनी लक्षात घेतला. दगड, विटा, चुना पुन्हा यांच्याशी संबंध इंजिनिअर होऊन वाढविण्यापेक्षा माणसातलाच उद्योग निवडणे योग्य हे चि. सारंगच्या मनात आले. ‘तुम्हाला मी मदत करणार, डॉक्टर होणार.’ असे तो म्हणाला. तोपर्यंत तो दहावी पास झाला होता.

सायन्स साइड न निवडल्यानं सारंगचं एक वर्ष वाया गेलं. निसर्ग उपचाराचे डिग्री कॉलेज त्या काळात एक कर्नाटकात व एक हैद्राबादला होते. हैद्राबाद मध्ये ‘एन. टी. रामाराव’ हे मुख्यमंत्री होते. त्यांना वशिला लावण्यासाठी अनेक प्रयासाने ‘मा. मोरारजीभाई देसाई’ यांच्याकडून एक पत्र मिळविले.

परप्रांतीय असल्याचे कारण दाखवून प्रवेश नाकारला. असेच कर्नाटकातही होऊ नये म्हणून तीर्थक्षेत्र बाहुबलीचे संचालक ब्रम्हचारी ‘माणिकचंद भिशीकर’ यांच्याकडूनही मुलाची पात्रता सिद्ध करण्यासाठी शिफारस पत्रिका मिळविली व निसर्ग उपचार कॉलेजचे प्रमुख संस्थापक ‘मा. विरंद्र हेगडेजी’ यांच्याकडे गेलो.

त्यांचे निसर्ग उपचाराचे नवीनच कॉलेज ओपन होणार होतं. त्यांना विद्यार्थी हवे होते. त्यांना कॉलेजच्या उद्घाटनाला असा एक मनुष्य हवा होता. जो निसर्ग संपूर्णतः स्वीकारतो आहे. तेव्हा त्यांना राजकीय बळ असलेला व निसर्ग फॉलो करणारा पाहुणा कॉलेजच्या उद्घाटनाला अपेक्षित होता.

ते मला नाव सुचवा म्हणाले. मी त्यांना ‘मोरारजीभाई देसाईंच’ नाव सुचवलं.

 “तुमचे नि त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत का?”  असं त्यांनी विचारलं.

तसे त्याकाळी आमचे व त्यांचे काही संबंध नव्हते. तीस हजार रूपये डोनेशन द्यायचे करून चि. सारंगचे त्या कॉलेजचे अ‍ॅडमिशन पक्के झाले होते. मधल्या काळात आमच्या परिवारामध्ये गॅस बंद ठेऊन अर्थात नैसर्गिक आहार सर्वानीच घेण्यासाठी माझ्याकडून सक्तीेचे प्रयोग केले जात होते. येणारे-जाणारे पाहुणे-रावळे यांना पण तोच फलाहार दिला जायचा. पुढे या योजनेला गती मिळाली नाही. सौ. सरोज विरोध करत राहिल्या.

तेव्हा निसर्ग फॉलो करणार्‍या पाहुण्यांची चौकशी विरेंद्र हेगडेजी जेव्हा करत होते. मी त्या काळात सारंगकडे पाहिले, मला तुम्ही लोकांनी जर सहयोग दिला असता तर तो पाहुणा आपणच झालो नसतो का? असा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता.

चि. नितीन यांच्या कॉलेज शिक्षणाची जबाबदारी जयसिंगपूर मुक्कामी असलेल्या शांतीनाथ पाटील यांच्याकडे सोपवली. वसंतराव पाटील अभियांत्रिकी इंजिनिअरिंग कॉलेज, माधव नगर, सांगली येथे नांव नोंदणी झाली. मॅकेनिक इंजिनिअर-डिग्री कोर्सला त्याचे नाव पक्के झाले. तो अधिक करून जयसिंगपूर मुक्कामीच मामाच्या व चुलत्यांच्या सान्निध्यात राहत होता.

त्याचा मामा ही त्या काळात जयसिंगपूर मुक्कामी असायचा. सरोजिनीचे आई-वडीलही नितीनच्या मामाबरोबर राहायचे. कधी मामाकडे कधी काकाकडे याप्रमाणे राहून तो कॉलेज करीत होता. कॉलेजच्या पहिल्याच वर्षात त्याचे सगळेच पेपर सुटले नाहीत. त्यामुळे मी नाराज झालो.

 “असे डबल शैक्षणिक खर्च माझ्याच्याने झेपणार नाहीत, मी तसा अपंग आहे.”  असं मी ठामपणे सांगितले. त्याची शैक्षणिक जबाबदारी मग कुणीही घेतली नाही. मग त्याने भारतीय वायुसेनेत जायचं ठरविलं व तेथे त्याची निवड पण झाली. त्या काळात कोल्हापूरच्या सानेगुरूजी वसाहतीत माझा निवास नवाच तयार झाला होता. मी माझ्या जीवनचा सारीपाट उभा केला होता. या नव्या इमारतीवर नवा विचार व्याधीमुक्त शिवाम्बू उपचार केंद्र मी टांगून दिला होता. व कामाला लागलो होतो. चि.सारंग आणि चि. नितीन यांचेही माझ्या निसर्गोपचार कार्याला प्रोत्साहन मिळत होते. ते म्हणत असतं, तुम्ही जागा घेऊन ठेवा. सुट्टी त दोन्ही मुले घरी येत तेव्हा जागा बघण्यासाठी प्रयत्न होत असतं. अनेक जागा नजरेसमोर यायच्या पण तेथे पाण्यासह व्यवस्था नसायची.

दरम्यान बराच काळ निघून गेला होता. चि. सारंगचे शिक्षण संपले होते.

पदवीदान समारंभाच्या काळात एका कार्यक्रमाला मी स्वतः गेलो होतो. चि. सारंगच्या बरोबर त्याचे रूम पार्टनर होते. त्या काळात सारंग म्हणाला,  “पप्पा, मला पुढच्या शिक्षणाला ही संस्था अमेरिकेला पाठवू इच्छिते.”  मी म्हटलं,  “तू मला मदत करणार होतास त्याचं काय झालं?”  तेव्हा सारंग मला म्हणाला,  “हा तुमचा उपचार वेस्ट आहे, आमचे सर म्हणतात.”

 “मग तू काय म्हणतोस?”  मी विचारले.

 “मी बेस्टच्या मागे आहे.”

 “मग बेस्ट काय आहे.”

 “शुद्ध निसर्ग उपचार आहे.”

मी म्हटलं,  “शिके तोपर्यंत तू मला गोड बोलून शिक्षण पदरात पाडून घेतलसं आणि मला ज्ञान पाजळतो आहेस!”

भगवान रजनीश प्रवचनात म्हणायचे,  “तुम्ही मुलांना कुठेच रोखू नका. जसच्या तस त्यांना पूर्ण होऊ द्या. गुलाबाच्या फुलांना झेंडू बनवू नका किंवा झेंडूच्या फुलांना गुलाबही बनवू नका.” मी त्याला काही बोललो नाही. मी खजील, नाराज होऊन मात्र मागे निघून आलो.

मी मनात विचार केला की, चि. सारंग शिवाय वेगळी व्यवस्था कशी-कशी करता येईल? काही दिवस जाऊ दिले. याचं काय-कायं होतयं? आणि कसं-कसं होतयं? अमेरिकेला जातो तर जाऊ दे. शेवटी अमेरिका राहिलीच.

त्याकाळी भारतीय निसर्गोपचार केंद्र नावाचे केंद्र माझ्या शेजारीच भैय्या परदेशींनी माझ्या प्रेरणेतून उभारले होते. ते मोठया सात एकरात उभारले होते. त्याचा आवाकाही मोठा होता. शेजारी वाशी नाक्याजवळ त्यांचा तळ होता. सारंग त्यांना जाऊन मिळाला. मलाही ते आग्रह करीत असतं, तुम्ही माझे हॉस्पिटल चालवायला घ्यावे. मी तुमच्याकडे येणार म्हटल्यावर माझे केंद्र बंद करावे लागेल आणि तुमचे आमचे एक करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण काही करू शकू. त्यांच्याकडे अमाप पैसा होता, जागा मोठी होती. चांगले-चांगले प्लॅन डोक्यात होते. शेवटी त्यांनीही भिती खाल्ली.

खरतर त्या जागेत चितळे दूध केंद्रासारखं दूध केंद्र उभारायचे होते. मी त्याला म्हणालो,  “चितळे दूध केंद्रापेक्षा तुम्ही हाच उपचार का डोक्यात घेत नाही. हा पुण्याईचा भल्याचा मार्ग आहे. त्या दूध केंद्रामध्ये जी भाकड जनावरे असतील ती कसायाच्या ताब्यात जातील. त्याचे पाप तुमच्याच डोक्यावरती राहील ना.”

हा पुण्याईचा भल्याचा मार्ग आहे म्हणून समजल्यावर ते निसर्गोपचाराकडे वळले. हा निसर्ग उपचार चाललाच नाही तर आज नि उद्या या जागेत दूध केंद्र खोलले तर दूध पितानाही लोक शंका घेतील आणि ते शिवाम्बूच समजतील. म्हणून तुम्ही शिवाम्बुचे केंद्र यात सामील करू नका. ते तिकडेच परस्पर राहू द्या असे म्हणत. त्यांचे मित्रही तसाच सल्ला त्यांना देतं.

भैय्यांच्या भारतीय निसर्गोपचार केंद्राच्या पाण्याच्या टाकीमध्ये चप्पल घालूनच एक मनुष्य टाकी धुवायला उतरला होता. त्याला मी पाहिलं. ‘ हे पाणी पिण्याच्या योग्यतेचे कसे राहू शकेल?’ ही तक्रार मी भैय्या परदेशींना केली त्यांनी तेव्हा ‘तुम्ही छोटया मनाचे आहात.’ असा शेरा मारला.

त्यांनी लगेच एक समर्पक उदाहरण दिले. ‘एका हॉटेलात मी गेलो होतो. दहा पैशात चहा मिळत होता. चहा मी मागवला. त्यात एक माशी तरंगत होती. मी तो कप घेऊन कॅशिअरकडे गेलो. कॅशिअर म्हणाला, ‘दहा पैशाचा चहा पिणार, तुला माशी नाहीतर हत्ती त्यात टाकू? मला पण परवडलं पाहिजे ना. पाहिजे तर माशी काढून प्या, नाहीतर फेकून द्या.’ म्हणजे हा मलाच दम होता. तुम्ही यातलं पाणी प्या नाहीतर नका पिऊ? मी म्हटलं हा गबाळा मनुष्य आहे. याची संगतच नको. त्या दिवसापासून त्याची संगत सोडली.

मात्र त्याच्या संगतीत सारंगने गती घेतली. सारंगची आणि त्याची जिगरी वाढली. सारंगला पाच हजार रूपये देऊन अकरा ते पाच या वेळेसाठी बटीक केले. तेथे पेशंट नसायचे, कसा तरी वेळ जायचा, तो वेळ काढायचा? माझ्याकडे मात्र त्याला वेळ नव्हता.

माझ्याकडे विविध रोगांचे पेशंट असायचे. वर्षे दोन वर्षांचा काळ गेला. वेळेचा अपव्यय झाल्याचा दाखला मी सारंगला समजावून दिला. दरम्यान शिवाम्बूसारख्या वेस्ट थेरपीचे बेस्ट परिणाम त्याच्याही ध्यानी आले आणि हळू-हळू तो या उपचार पद्धतीला शरण आला. तन-मन-धनाने सक्रिय झाला. शेवटी माझ्या चांगुलपणाच्या उपचार पद्धतीचा परिणाम त्याच्याही चांगलाच लक्षात आला.

मुंबईतल्या सांताक्रुझचे श्री. लिलाधरजी हेगडे, राष्ट्रीय सेवादलाचे शाहीर होते. आपल्या मधुमहाच्या रोगासाठी उपचाराला ते आले होते.

विनोद, नकला व शाहिरकी हा त्यांचा आवडीचा छंद होता. त्यामुळे ते कोल्हापूरचे शाहीर ‘पिराजीराव सरनाईक' यांना ओळखत असतं. उपचारासाठी आले तेव्हा सानेगुरूजी हौसिंग सोसायटीच्या शाळेमध्ये मुलांच्यासाठी आपला कार्यक्रम नेहमीप्रमाणे त्यांनी घेतला. सानेगुरूजी या नावाविषयी त्यांना विशेष आस्था होती. कारण ते सांताक्रुझ येथे ‘सानेगुरूजी आरोग्य मंदिर’ स्वतःच चालवित असतं. त्याचे ते मानद संचालक होते.

त्यांनी नोंदविलेल्या अभिप्रायात ते स्पष्ट म्हणतात,  “मी मात्र रोज शिवाम्बू घेतो. शिवाम्बूच्या उपचारामुळे माझा पँक्रिया कार्यक्षम झाला. मी नॉर्मल आहे. शिवाम्बू उपचार पद्धतीवर माझा पूर्ण विश्‍वास आहे. या पद्धतीत आपणचं औषध निर्माते असतो. त्यामुळे औषधाचा खर्च नाही. अनेक डॉक्टर मंडळीही माझा सल्ला घेऊ लागली आहेत.”

त्यांना त्याच काळात फ्रोजन शोल्डरचा विकार होता. त्यामुळे ते म्हणत,  “शाहिरकी करताना ड'  वाजवायला मला ' ारचं अवघड जातं. तोही त्रास मधुमेहाच्या बरोबरच पूर्णपणे संपला.”  त्यामुळे तशा प्रकारचे हे उपचार सत्र मुंबईकरांनाही आवडेल. यासाठी आपल्या सानेगुरूजी आरोग्य मंदिर मध्ये आम्ही लोकांनी शिबिर घेण्याचे आयोजन केले.

मुंबई आम्हाला पूर्णपणे नवीन होती. मुंबई ' क्त ऐकूणच होतो. मुंबईत शिबिर घेण्यासाठी त्यांनी मला माझ्या टीम सह आमंत्रण दिले. पण माझ्या टीममध्ये, ' क्त पत्नीच असायची. पत्नी महिला विभाग सांभाळत होत्या.

मुंबईचे कन्नमवार नगर, विक्रोळी येथील प्रजापिता ब्रम्हाकुमारी सदस्य रमेश माने यांच्याकडून अ‍ॅक्युप्रेशर पासून मसजापर्यंत ते आम्हाला मदत करीत असत. वीस ते पंचवीस रूग्ण विविध समस्यांचे अ‍ॅडमिट होत असत. ' ी ची रक्कमही लिलाधर हेगडेजी जमा करून घेत असत.

अ‍ॅडर्व्हेटाइजमेंट व भाडे या सदराखाली काही रक्कम ठेवून दोन ते तीन हजार रूपये देऊन आम्हाला कोल्हापूरला परत पाठवित असत. तिथेही दहा दिवसाची शिबिर चालायची. असे चार-दोन शिबिरे केल्यानंतर कोल्हापूरच्या उपचार केंद्राकडे मुंबईकरांचा ओघ सुरू झाला. गुजराती लोकांचा ग्रुप हळू-हळू परिचयाचा झाला. 

‘डॉ. जी. के. ठक्कर’ नावाचे गोरेपान व्यक्तिमत्त्व असलेले. ब्रिटीश रहाटणी उपचाराचे प्रचार-प्रसार करण्यासाठी स्वतः व्याख्याने देत. धीरूभाई अंबानीपासून मोठमोठयांच्या ते माझी ओळखी करून देत.

जी. के. ठक्कर यांनी जेव्हा तो अंक हाती घेतला. तेव्हा त्यांनी डोक्यावरती तो घेऊन नाचले होते. मी संपूर्ण आयुष्य शिवाम्बूला वाहिलेलं पाहून त्यांना मनस्वी आनंद होत होता.

मुंबईच्या श्री साप्ताहिकामध्ये ‘निसर्गाचा खजिना’ या नावे एक स्पेशल रिपोर्ट या सत्रात छापला गेला होता. त्यामध्ये माझ्या ‘एकच पेला शिवाम्बूचा’ याचे ' ्रन्ट पेज इस्टमन कलर मध्ये प्रकाशित झालं होते.

एकदा मी कोल्हापूरच्या शाहू सभागृहामध्ये डॉ. जी. के. ठक्कर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्याकाळात माझ्याकडे ‘व्हीकल’ म्हणून लुना होती. बिचार्‍या जी. के. ठक्करांना टाय, कोट घातलेल्या अवस्थेत लुनाच्या मागे बसवून मी शाहू सभागृहात पोहोचलो.

त्यात या कार्यक्रमाला एक पन्नास भरच शिवाम्बूप्रेमी लोक आले होते. मोठ्या उमेदीने जी. के. ठक्कर, मुंबईत व्याख्यान करतात तसेच ते दुसर्‍यांचे मूत्र स्वतः प्राशन करूनही दाखवतात. शिवाम्बूच्या उपचाराची समर्थता असतानाही समाजाकडून हा उपचार उपेक्षिलेला पाहून जी. के. ठक्कर यांनी खंत व्यक्त केली.

शिवाजी पेठेतल्या खंडोबा तालमीजवळ आमदार पी. बी. साळोखे, सत्तर-पंच्याहत्तरी गाठलेले, कोल्हापूरची एक विशेष शान होती. ते आमच्या सानेगुरूजी हौसिंग सोसायटीकडे मॉर्निंग वॉकसाठी फिरायला येत असतं. त्यांच्या बरोबर ज्येष्ठ नागरिकांचा मोठा ग्रुप असायचा. ते शिवाम्बूचे खंदे पुरस्कर्ते होते.

मी त्यांचे एकदा माझ्या केंद्रामार्फत आमच्या ‘शिवाम्बू उपचार-प्रचार-प्रसार महामंडळातर्फे’ नगर वाचन मंदिर, भवानी मंडप येथे व्याख्यान आयोजित केले. व्याख्यानासाठी आलेल्या जमावाने हॉल खचाखच भरला होता.

सिनेकलावंत ‘चंद्रकांत मांढरे' व प्रमुख व्यक्ती यांनी शोभा वाढविली होती. तो दिवस होता 24-2-1979 त्यांनी दिलेले व्याख्यान हे ‘एकच पेला शिवाम्बूचा’ या पुस्तकात खालीलप्रमाणे दिले आहे.

शिवाम्बूबद्दल औत्सुक्य असणार्‍या बंधु-भगिनींनो, मी राजकारणातला मनुष्य आहे. आपली कल्पना झाली असेल की, मी हव्या त्या विषयावर बोलतो. परंतु माझ्या संबंधी असणारा गैरसमज दूर व्हावा, म्हणून मला हे सांगितलं पाहिजे, की मी का बोलतो आहे. शिवाम्बू चिकित्सेबद्दल चांगली माहिती, प्रमुख वक्ते श्री. शशी पाटील यांनी सुरस भाषेत कथित केली आहे.

ही औषधी म्हणजे की गोरगरिबाला एक पैसा खर्च न करता अनेक रोगांतून मुक्त होण्याचे मुक्तद्वार आहे. या अशा मार्गाचा उपचार, प्रसार गेल्या काही दिवसांपासून डॉ. शशी पाटील, महामंडळाच्या वतीने करीत आहेत. त्यांचे आभार मानावे तितके थोडे आहेत.

आतापर्यंत लोक इकडे बघताना कुचेष्टेनं बघत होते. पण ही गर्दी पाहिल्यानंतर वाटतं, की कुचेष्टेचं रूपांतर कौतुकात व आज ना उद्या त्याचही रूपांतर प्रतिष्ठेत झाल्याशिवाय राहणार नाही.(टाळयांचा गजर) अर्थात टाळयाच याची साक्ष देत आहेत. (हशा...) ज्यांनी टाळया वाजवल्या, ते तरी शिवाम्बूपान करीत असले पाहिजे (परत हशा)...अशा प्रकारची ही व्याधिमुक्त करणारी औषधी मिळाली आहे, तेव्हा मी तिकडे कसा वळलो, हे सांगतो.

1967 ते 1969 या दोन वर्षाच्या दरम्यान माझी तब्येत बिघडली. पुण्याचे सुप्रसिद्ध धन्वंतरी एच. व्ही. सरदेसाई यांनी मधुमेह व रक्तदाब असे दोन रोग तुमच्या शरीरात घर करून आहेत, म्हणून सांगितलं. या दोन रोगांची त्याला खात्री झाली, त्याला तिसरा हार्ट डिसीज (भिऊन) व्हायला काही हरकत नाही.

18 फेब्रुवारी 1971 रोजी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी कॉलेजमध्ये माझं व्याख्यानं होतं. त्यावेळी मला हार्ट-अ‍ॅटॅकही आलाचं. सुदैवानं कोल्हापूरातले सर्व हृदयतज्ञ एकत्र जमलेही. मला फक्त अस्वस्थ होत होतं. माझ्या शरीरापासून हातपाय कुर्‍हाडीनं तोडूनं काढलेत की काय, असं होत होतं.

डॉ. एस. के. कुलकर्णी, डॉ.चिटणीस म्हणू लागले, की पेशंट सीरियस आहे. मिरजेला न्यावं लागेल. मी सकाळी व्याख्यानाला आलो आणि दुपारी तीन वाजता मिरजेच्या दिशेनं माझा प्रवास सुरू झाला. अ‍ॅम्ब्युलन्स, नर्स, ऑक्सिजन सिलेंडर, सलाईन सह प्रवास चालू झाला. या तीन दिवसांमध्ये पृथ्वीलोक आणि मृत्युलोक यांच्या दरम्यान प्रवास चालू होता. परंतु मृत्युलोकाचे दरवाजे ठोठावून मी परत आलो. आत्मविश्‍वास ढळला होता. तीन-चार महिने रस्त्याने जात असता म्हैस, बस वगैरे अंगावर येते की काय अशी अवस्था होत होती. नंतर शिवाम्बूपान करणारी काही मंडळी मला भेटली. तुम्ही जर शिवाम्बूपान करू लागलात, तर तुम्हाला आमच्या आमदारांच्यामुळं याला लोकमान्यता आली. (हशा...)

पण प्रत्येकाला घृणा असतेच. मी ऐकत होतो, पण प्रत्यक्षात मात्र आणत नव्हतो. बर्‍याच लोकांच्या सांगण्यामुळे एक उत्सुकता निर्माण झाली होती. जशी काहींच्यात आज झाली असेल. (हशा...)

गोमूत्राबाबतचे आपले संस्कार मूळचेच असल्यामुळे मनाला त्याचे पावित्र्य वाटतं. पण गोमूत्रा ऐवजी म्हशीचं मूत्र प्या म्हटलं, तर आपणं जसं पिणार नाही आणि स्वतःच म्हटलं, तर मग नाहीच नाही. अशा प्रकारची मनःस्थिती माझी पण झाली होती. पण अशातचं एक गृहस्थ आले. त्यांना मधुमेह झालेला होता. ते म्हणाले,  “माझा मधुमेह शिवाम्बूपानानं गेला.”  मी फक्त ऐकलं. माझं औत्सुक्य आणखी वाढलं. (हशा...)

असं करत करत विचारात आठ महिने गेले. 1972 सालच्या नागपूरच्या आमदार अधिवेशनासाठी गेलो. तिथं आमदार-निवासात आपली इकडची माणसं काही येत नाहीत, तेव्हा प्रयोग करायला ही जागा मला बरी वाटली. (हशा...)

थोडा विचार केला आणि पहाटे थोडं लवकरचं उठलो, लघवी केली. बाकीचं काही केलं नाही. फक्त तोंडात घेतलं आणि फेकून दिलं. (हशा...) असंच दोन-तीन दिवस केलं... आणि चार दिवसानंतर एक घोट आत नकळत उतरला. आणि मग खळखळून तोंड धुतलं. दोन दिवसानंतर दोन घोट घेतले आणि असं करत करत त्या नागपूरच्या एका महिन्याच्या मुक्कामामध्ये एक दोघा-तिघांनी सुरूवात केली. पण एकच काय....?(प्रचंड हशा...)

एवढया मुदतीत मी कोणाला बोललो नाही. कोणाला सांगितलं नाही. जोपर्यंत गुण येणार नाही, तोपर्यंत सांगणं इष्टही असत नाही. उद्या सोडावं लागलं, तर बकवास कशाला?(प्रचंड हशा...)

प्रत्येक महिन्याला माझं रक्त, लघवी तपासून घेत होतो. माझी केस अगदी वाईट होती. म्हणजे माझ्या लघवीत साखर तर होतीच आणि रक्तातही साखर होती. दोन-चार-सहा महिन्यानंतर दोन्हीतल्या साखरेचं प्रमाण कमी होत असलेलं दिसून आलं आणि आपल्याला आश्‍चर्य वाटेल पण माझ्या लघवीतली शुगर आणि रक्तातली शुगर अगदी नॉर्मलला आली. प्रचिती आल्यावर मी सांगत सुटलो. अर्थात हे ऐकल्यावर पंचवीस एक आमदारांनी माझ्याकडून ही दिशा घेतली. त्यांनी माझा हा गंडा बांधला.(प्रचंड हशा...)

आणि म्हणून मी म्हणतो, भारताचे पंतप्रधान श्री. मोरारजीभाई यांच्याकडून याला राजमान्यता आली आणि आमच्या आमदारांच्यामुळं याला लोकमान्यता आली.(हशा...टाळया...)

आता मधुमेहाच्या बरोबर इतर काही पीडा जाण्यासंबंधी विचार केला नव्हता. हार्ट-अ‍ॅटॅक आल्यानंतर मला जी नाना प्रकारची अ‍ॅन्टीबायोटिक इन्जेक्शनं दिली गेली होती. त्यांच्या साईड इफेक्टमुळं लघवी साफ होत नव्हती. लघवी तिथल्या तिथचं घरंगळायची. डॉक्टरांनी सांगितलं, की कदाचित प्रोस्टेड ग्लॅन्ड वाढली असण्याची शक्यता आहे. तेव्हा ऑपरेशन करायला पाहिजे.

त्याशिवाय माझा एक दात हालत होता. खाताना आडवा पडायचा. तोही उभ्या स्थितीत सिमेंट लावल्यासारखा घट्ट झाला. डोळयाच्या संबंधात मी पुस्तकात वाचलं होतं. त्याप्रमाणे आय ग्लासने शिवाम्बूत डोळे धुवू लागलो. माझे डोळे दुरूस्त होऊ लागले, हे मला कळलं केव्हा?

मी चष्मा, उष्मा झाला तरी कधी काढत नव्हतो. पण झालं काय एकदा आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये मी चष्मा काढून ठेवल्या ठिकाणी विसरलो. नंतर मला तासाभरानं आठवलं, की डोळयावर चष्मा नाही.

1952 सालापासून 1975 पर्यंत मला चष्मा होता. पण त्यावेळी, या निमित्ताने माझे डोळे सुधारल्याचं मला डोळसपणानं जाणवलं. गेली तीन वर्षे मी चष्मा लावत नव्हतो. पण गेल्या वर्षीपासून माझ्या हलगर्जीपणामुळे मी शिवाम्बू घेणं सोडून दिलं. त्यामुळं कदाचित पुन्हा चष्मा मला लावाव लागतोय असं मला वाटू लागलं आहे.

अशाप्रकारे या शिवाम्बूपानानं माझ्यापुरता डोळयाचे विकार, किडनीचा अडथळा, डायबेटीस, दाताचा दोष, हार्टचं कार्य, इत्यादी महत्त्वाच्या बाबतीत आमूलाग्र फरक पडला.

ब्लडप्रेशरच्या बाबतीत मात्र अद्याप माझ्यात फरक नाही.  डॉ. शशी पाटील सुचवतील, त्या पद्धतीने शास्त्रशुद्ध उपचार करून पाहावे, असं वाटतयं.

या उपचाराचा उल्लेख अनेक धर्मग्रंथकारांनी आपापल्या धर्मग्रंथात नमूद करून ठेवल्याचं आज उघडकीस येत आहे.

एखादा कंजूस माणूस असला म्हणजे आपण म्हणतो, की कापल्या करंगळीव सुद्धा मुतणार नाही. याचे अर्थ दोन होतात. एक अर्थ लघवी कृतज्ञ असली पाहिजे व त्याचीही साथ न देणारा कृतघ्न असला पाहिजे. लघवी अँटिबायोटिक आहे. जखमा वाळवणं हा पारंपारिक अनुभव तो पण मी घेतला आहे...

मी मध्यंतरी ‘इलेस्ट्रटेड विकली' मध्ये या संबंधातलं एक आर्टिकल वाचलं होतं, की डॉ. के. के. दाते यांनी अशी प्रसिद्धी दिली, की जपानमध्ये याचे प्रयोग करायला सुरूवात झाली आहे. सगळया गावातली लघवी एकत्र करायची, त्यातली द्रव्य शोधून काढायची आणि शरीराला पोषक असणारी द्रव्य निवडून काढून त्याची इंजेक्शन तयार करावयाची आणि ही इंजेक्शन जपानच्या प्रयोगशाळेमध्ये सुरू झाली आहेत. 10 सी.सी च्या एका इंजेक्शनची किंमत तीन हजार डॉलर्स आहे. म्हणजे आपल्या लघवीला काय किंमत आहे, बघा! तीन हजार डॉलर म्हणजे-पाच रूपयाला एक डॉलर म्हणजे याप्रमाणे पंधरा हजार रूपये झाले.

आणि या इंजेक्शनचं जर मोठया प्रमाणात प्रॉडक्शन झालं, तर तीन हजाराहून तीनशे डॉलर्स इतकी किंमत होईल. म्हणजे तरी सुद्धा तीनशे डॉलर्सचे पंधराशे रूपये होतील. अशा प्रकारच्या लघवीच्या इंजेक्शनचं कामं जपाननं सुरू केलं आहे. परंतु आपल्याला जपानकडे जायला नको. आर्मस्ट्राँगकडे जायला नको दुसरीकडे कुठं जायला नको. आपल्या इथं, आपल्या जवळचं हे औषध आहे, याला पाव पै खर्च करायचं काय कारण नाही. फक्त तुमच्या मनाची तयारी पाहिजे. कारण मनाच्या तयारीशिवाय घृणा नाहीशी होणार नाही. आपल्या शरीरामध्ये जे नाना प्रकारचे रोग होतात, त्याला दोन प्रकारांनी थोपवण्याचं कार्य शिवाम्बू करतं. शिवाम्बूत प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह म्हणजे रोग टाळता येतो आणि झालेला रोग बरा करता येतो अशा दोन्ही प्रकारचे गुणधर्म असल्याकारणानं आता या दृष्टीनं, शास्त्रीय पद्धतीनं मोठया प्रमाणावर चिकित्सा करण्याची वेळ आली आहे. त्याला अनुकूल पंतप्रधानही लाभले आहेत. आता कुचेष्टा करण्याची वेळ निघून गेली आहे. अशा रितीनं ज्याची चिकित्सेसाठी एक पैसा खर्च करण्याची ऐपत नाही, अशा गोरगरिबाला शिवाम्बूपानामुळं लवकर रोगमुक्त होण्याची संधी आहे.

सध्या होमिओपॅथी, अ‍ॅलोपॅथी, युनानी, आयुर्वेद इत्यादी चार-पाच प्रकारच्या पद्धतींची, नाना प्रकारच्या रोगांवर, नाना प्रकारची औषधं आहेत. पण इथं असं आहे की, नाना प्रकारचे रोग आणि औषध मात्र एकच.(हशा...)

-आणि म्हणून याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा.

ज्याला ज्याला प्रयोग सांगितला, तो तो म्हणतो, की मला आता आराम वाटू लागला आहे. सर्वांना उपलब्ध असणारी ही एक अमृतवल्ली आहे. लघवी म्हटल्यावर जी घृणा वाटते, ती शिवाम्बू म्हटल्यावर वाटत नाही. त्याला या नावानं आध्यात्मिक स्वरूप येतं आणि पावित्र्याच्या भावनेनं जीवन पवित्र होते. याचा उपाय एखादयाला झाला नाही, तरी अपाय होत नाही एवढं निश्‍चित आहे आणि म्हणून हा प्रयोग करायला हरकत नाही. कोणत्याही प्रकारची भीड, चिंता, चुका न ठेवता हा प्रयोग करण्याची सुबुद्धी सर्वांना होवो, एवढी अपेक्षा करून मी भाषण संपवतो.

त्या वेळेला रत्नाप्पा हौसिंग सोसायटीचे सेक्रेटरी मनोळे अण्णा यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन केले होते. दुसर्‍या दिवशी हा वृतांत सगळयाच लोकल पेपरवाल्यांनी आमदारांच्या मजकूरासह छापला होता. यामुळे शिवाम्बूला दर्जा मिळाला होता. पेपरवाल्याकडून दाद मिळाली होती.

कोल्हापूरातल्या प्रसिद्ध डॉक्टरांच्या ग्रुपमधील डॉक्टर, ‘पुढारी’ चे संपादक ग. गो. जाधव यांना फोन करून म्हणाले होते,  “तुम्ही तुमचा पेपर शिवाम्बूत बुडविणार असाल तर तो घरात घ्यायचा की नाही तेे आम्ही ठरविणार.”  त्यावेळी ग. गो. जाधव एके दिवशी मला फोन करून म्हणाले,  “तुम्ही आता स्वतंत्र पेपर काढावा, आमच्या पोटापाण्यावरती ओरखडे नकोत.”

त्यानंतर ‘शिवाम्बू समाचार’ मासिक आम्ही काढायचं ठरविले. वैयक्तिक स्वतंत्ररित्या शिवाम्बूचे तुणतुणे गायचे ठरविले.

उपनगरामध्ये एक शाळेची इमारत, रस्त्याला ‘व्याधिमुक्त शिवाम्बू उपचार केंद्र’ व सोबत विरळ चार बंगले, रस्त्याने जाणार्‍यांना दिसत असतं.

त्या काळात बाजार भोगावकडचे, पाट-पन्हाळयाचे गुरूवारचे महारोगाचे पेशंट सवारी गाडी करून येत असतं. कंपाऊंडच्या बाहेर थांबत असतं. गाडीतच उपचाराच्या नंतर झोपत असतं. त्यांना मॉलिश करणे, ड्रेसिंग करणे व त्यांना उपचाराविषयी माहिती देणे इत्यादी कामे शक्यतो कंपाऊंडच्या बाहेर जाऊनच मी करीत असे. त्यावेळी शेजारील शाळेेचे वर्गशिक्षक, मुलांना चिथवीत असतं. महारोग्यांना दगड मारून हुसकावित असतं. तुमचा दवाखाना दुसरीकडे हलवा हा घाणेरडा उपचार इथे करू नका असं म्हणतं असतं.

त्याचकाळात माझे वडील हर्नियाच्या उपचारासाठी मजकडे दहा दिवस राहिले होते. ऑपरेशनशिवाय मार्ग शोधण्यासाठी निसर्ग उपचार, शिवाम्बू सोडून घेत होते. मुलांचा दंगा बघून कंपाऊंडच्या बाहेर उंच-उंच करून पाहत मला म्हणाले, त्या वेळेला मी महारोग्याला त्याची मान मांडीवर घेऊन मॉलिश करीत होतो.  “अरे, शश्या हे काय करतोयस? हे तुला झालं तर!”  तेव्हा मी वडिलांना म्हणालो,  “मला झालं तर उपचारातच तथ्य नाही असं समजा आणि जर मला काही झालं नाही तर मग समजाल की नाही या उपचारातच अर्थ आहे.”

रोगी-महारोगी उपचाराने बरे होत होते म्हणूनच ते येत होते. त्याच काळात निवृत्ती चौगुले नावाचा पेशंट वडिलांच्या बरोबर बंगल्यामध्ये उपचार घेत होता. त्याचं वय पस्तीस होतं. त्याचा ताप सहा महिन्यामध्ये निवला नव्हता. म्हणून तज्ञ लोकांनी तापाचे कारण दाताची कवळी समजून संपूर्ण कवळी काढण्याचा घाट घातला होता.

ती कवळी वाचवण्यासाठी व ताप बरा करण्यासाठी त्याने या शिवाम्बू उपचार केंद्राकडे धाव घेतली होती. तो नियमाप्रमाणे पाच दिवसाच्या उपवासात होता. उपलब्ध शिवाम्बू पीत होता. त्याचा ताप निवला होता. त्याची संपूर्ण हालणारी कवळी मी माझ्या वडिलांना नेऊन दाखविली. महा मनुष्य दोन-तीन महिन्यानंतर कसा होतो बघा. हा मनुष्य तुमच्याकडे दाखवण्यासाठी मी जयसिंगपूरला येईन. त्याचं काय होतं? कसा होता? कसा झाला? हे तुम्ही ठरवा. मग तरी तुम्ही या उपचारावरती विश्‍वास ठेवाल की नाही? जो उपचार उपकार करतो. त्याला आपला म्हणाल की नाही?' 

संपूर्ण घरचं माझी प्रयोग शाळा होती. पेशंटच्या हितासाठी, कल्याणासाठी जुन्या बाजारातून उपचाराला आवश्यक असणार्‍या गोष्टी हेरत होतो, आणत होतो. पत्नीची माझ्या नेहमीच कुरकुर असायची. घरात पसारा पसरून ठेवताय, भांडयांना, डब्याना भोके पाडतायं म्हणून...

एकदा काय झालं विवाहामध्ये पाहुणे लोकांवर सुवासिक अत्तर पाणी मारावयाची, अत्तरदाणीचा स्टीलचा पंप, तो मी घरी मुद्दाम आणला होता. त्यात मी प्रयोगासाठी शिळे मूत्र भरले होते. त्वचेच्या रोग्यांना व वाहत्या जखमेच्या रोग्यांना, वाहत्या कानासाठी, मी त्याचा वापर करीत असे.

एकदा काय झालं, भाऊबीजेच्या सणाला बहिणी आल्या होत्या. त्यांच्या बरोबर भाचे मंडळींचा ग्रुप होता. भाच्यांना वाटलं, यात अत्तरपाणी वगैरे असावं त्यानं सगळयांच्या अंगावरती मारण्यास सुरू केलं. वरडयानं वासासहित सगळे ओले झाले, बहिणी म्हणाल्या,  “काय रे शशी दादा कशात काय-काय ठेवतोस?”

त्यानंतर मात्र भाचे मंडळी कधीच आली नाहीत.

रोगी मात्र स्वतः बरे झाल्याच्या नंतर इतर रोग्यांना पाठवित राहिले. ‘माऊथ पब्लिसिटी’ याच माध्यमांनी लोक येत होते. या उपचार केंद्राला सुप्रीम कोर्ट समजून शेवटचा अपील करायला, दयेचा अर्ज करायला, इथं तरी फाशी माफ होते का? पाहायला, उपचार घ्यायला लोकांचा तांडा येत होता.

मी पहिली दहा वर्षे जी अ‍ॅलोपॅथी प्रॅक्टिस केली, त्याच्यामध्ये काही लोकांचा विश्‍वास मी संपादित केला होता. आजही काही विशेष त्रासातून मुक्त होण्यासाठी म्हणजे साधारणपणे नव्या जुन्या जखमा, पातळ होणारे जुलाब, यांच्यावरती इलाज करायचा तर पांगळा डॉक्टरच पाहिजे होता.

सावरवाडीचा सोमा नावाचा धनगर अशा विशेष प्रसंगाला मी अ‍ॅलोपॅथी सोडलेली असतानाही येत असायचा. त्या काळात मी कोणाला तरी उघडया अंगावर शिळया मूत्राने मॉलिश करत असायचो.

जाड-जूड चप्पल घालून शिवाजी महाराजांसारखा फेटा घालून हा धनगर गडी फेटा हालवत म्हणायचा,  “डाग्डर, हे आतासा काय करतासा? जे बराबरं न्हायं, यामुळे तुमचि इभ्रत जातीया.”  त्या बिचार्‍याला तेव्हा काय माहिती, माझ्याकडे येऊन किती लोकांना जीवनदान मिळालेलं होतं.

लोकं नाक मोडले तरी मी माझं काम चालूचं ठेवलं. सुरूवातीला माझी पत्नी सौ. सरोज मांजरीण जशी फरफटत पिल्लांना नेते तसं माझं साहित्य तिकडून-इकडे, इकडून तिकडे लोटताना, झाडतांना फरफटत असे. जसं-जशी या उपचाराने गुण घेतलेली लोक तिला भेटू लागले, तिथून दर्शन घेऊन जाऊ लागले, तसं तसा हिचा विरोध कमी झाला.

तसाच विरोध संबंधीत मित्रांचाही, नातेवाईकांचा पण होता. पण कालांतराने आपोआपच शिथिल झाला. तसाच शेजार्‍यांचा, कॉलनीतल्या लोकांचा विरोध मी अनुभवत होतो. हे उपचार केंद्र बाहेर निघावे, निर्जन ठिकाणी असावे म्हणून नगरपालिकेत अर्र्जेही पडू लागले.

आडवा मनुष्य उभा होतो. याच्याकडे कुणाची नजर नव्हती. ‘दुनिया झुकती है मगर झुकानेवाला चाहिए’ या न्यायाने मी काम    चालूच ठेवले.

छोटया-मोठया विरोधांना मी जुमानित नव्हतो. बाथरूम संडासमध्ये अचकट-विचकट चित्रे रेखाटली जातात तसे काही चित्रांकित निनावी पत्रे मजकडे येऊ लागली. या सगळयाला मी निमूटपणे सहन केले.

‘देर है मगर अंधेर नही!’ हळूहळू अनेक ठिकाणी व्याख्यानाचे सत्र, व्याख्यानातील मजकूर वृत्तपत्रांमध्ये झळकू लागला. समाजातील असंतोष कमी झाला. ही प्रसवपीडा प्रत्येक महात्म्याने संताने सहन केलेलीच आहे.

अज्ञान अवस्थेमध्ये अशा प्रतिक्रिया व्हायच्याच. मलमूत्राबरोबरच उच्चारला जाणारा व मुतारी मध्ये उग्र दर्पासह भपकारा सहन केलेले, अनुभवलेली ही मंडळी असल्यामुळे व लहानपणी दोन-तीन वर्षाचा असताना स्वतःच्या मूत्रात खेळणार्‍या मुलाला पालकांच्याकडून पाठीत रपाटा मिळाल्यामुळे ही घृणा आणखीन कडक झाली होती. आता त्याच पाठीवर समजुतीचा हात ठेवून जीव वाचवण्यासाठी ‘मरता क्या नहीं करता’ याच न्यायाने शंभर बेडचे आज तरी आनंदकुंज सजले आहे.

मी एकदा विपश्यनेच्या दीर्घ ध्यान शिबिराला इगतपुरी येथे गेलो होतो. जवळपास महिनाभराच्या काळासाठी माझी दवाखान्यात अनुपस्थिती राहणार होती. तेव्हा गुण आलेल्यांचा व गुण उधळणार्‍यांचा वणवा सरोजिनीला सहन करावा लागत होता.

साठ-सत्तर वयाची ‘रत्नाबाई बेलेकर’ नावाची कोल्हापूर मधील कसबा बावडा येथील महिला सिटीबस ड्रायव्हरची मावशी मेंदूच्या विकाराने बेशुद्ध झाली होती. विशेष तज्ज्ञांनी सगळे प्रयोग संपविले होते. त्या बस ड्रायव्हरने डयुटीवर असताना, आमच्या शिवाम्बू केंद्रात येणार्‍या-जाणार्‍या लोकांची गर्दी पाहिली होती.

एके दिवशी त्याने शिवाम्बू केंद्राच्या गेटला बस लावली. लगेच आतून चार-पाच लोकांनी त्या आडव्या बाईला उतरवले. अतिशय अत्यवस्थ असलेल्या अवस्थेत उपचारासाठी तिचे नातेवाईक घेऊन आले. सूज, वजन जवळ-जवळ 100 च्या पुढे अशा अवस्थेतील ही बाई स्ट्रेचर वरून आणली होती.

सरोजिनी तिच्या नातेवाईकांना म्हणाली की,  “डॉक्टर परगावी गेलेत तेव्हा या पेशंटवर उपचार करणे शक्य नाही. तुम्ही पेशंटला घरी घेऊन जावा.”

सरोजबाईची ही खरी पहिली कसोटी होती. नातेवाईकांच्यातील काही मंडळींचा शिवाम्बू चिकित्सेवर असलेला विश्‍वास पाहून तिने धाडस करून शिवाम्बू उपचार करण्याचे ठरविले. उपचाराचे काम अत्यंत सोपं असायचे. शिवाम्बू पिणे, अधून-मधून पाणी देणे, पहिले चार-पाच दिवस उपवास करणे, सूर्यस्नान, मॉलिश आणि एनिमा करणे बस इतकेच टप्पे उपचारासाठी पुरेसे होते.

रत्नाबाईचा चेहरा पूर्ण सुजलेला, दोन दात पुढे आलेले त्यामुळे भयानकच दिसत होती. नाकात नळया होत्या. त्यामुळे सौ. सरोज गोंधळून गेली होती. कमी-जास्त झालं तर काय करू? असा विचार तिच्या मनात गोंधळ माजवत होता. पण नातेवाईक मंडळी शिवाम्बु उपचार करण्याच्या जिद्दीनेच आली होती.  “मावशी, काहीही होऊ दे, नाही तरी घरात जाऊन पेशंट मरणारच आहे. आम्ही जगण्याची उमेद हरवून बसलो आहोत. आपले उपचार सुरू करा. त्यातून पेशंटचे काहीतरी बरे वाईट झाले तरी चालेल.”

या अशा नातेवाईक मंडळीच्या विनंतीनुसार बेशुद्धावस्थेत असलेल्या व मृत्यूला समर्पित करण्यास सज्ज झालेल्या तिच्या शरीराला नवजीवन देण्यासाठी सरोजबाई प्रवृत्त झाल्या. युद्धपातळीवर काम सुरू झाले. उग्र वासासह मल विसर्जन होऊ लागले. घाण उपसण्यासाठी मला कुठं आणलायसां? असं ती तिच्यासोबतच्या बायकांना म्हणू लागली. रत्ना मावशी चांगली शुद्धीवर आली. तिची तब्येत जाडजूड होती. तिचेे दोन सुळे दात तोंड बंद करूनही बाहेर यायचे. दिसण्यात ती बेरूप जरी असली तरी गुणांनी मात्र ती देवीच होती. सरोजिनीला लेकीसारखी गालावरून हात फिरवून कानावर बोटं मोडायची. ती सधन शेतकरी कुटुंबातली होती.

आज पंधरा वर्षे झाली तरी दिवाळी-दसर्‍याला ती चोळी-काकणं व गुर्‍हाळयाच्या काळात गुळाचा रवा (ढेप) आजमितीला तिच्याकडून येत असतं. तिच्याइतकी अप्रूप यापूर्वी कोणत्याही पेशंटनी आमच्यासाठी केली नव्हती.

सौ. सरोजला मिळालेल्या पहिल्या यशामुळे ती हिंमतीने कामाला लागली. तिच्या मैत्रिणींनी मला शिवाम्बू काका, तिला शिवाम्बू काकी संबोधले तरी त्यांचं ती स्वागत करू लागली. त्याच आमच्या राहत्या बंगल्याला ‘शिवाम्बू भवन’ ही संज्ञा मुक्रर केली. आमची मुले जेव्हा लहान होती तेव्हा अनेक शिबीरांमध्ये हिरीरीने भाग घेत. चेष्टेने माझे दोस्त मला म्हणत, सौ. सरोज वहिनी तुम्हाला मदत करायला नसून तुम्ही कुणाच्या गळयात पडू नये म्हणून वॉच करायला आहेत. कारण सुरूवातीला स्त्रियांनाही मलाच मॉलिश करावं लागायचं. त्याकाळी समाजामध्ये शिवाम्बूविषयी एवढी घृणा होती की, मसाज करायला तर दूरच पण लोटायला, झाडायलाही आम्हाला लोक मिळतं नसतं.

लोटणं, झाडणं आम्हाला उभयंतानाच करावं लागे. लोकांना बाहेर उन्हात झोपवून रोग्यांच्या उपरोक्ष आम्ही दवाखाना साफ करायचो. दवाखान्याला तरी दवाखानाही कसा म्हणायचा? कारण, इथे कुठल्याही प्रकारचा दवा मिळत नव्हता. माझे मित्र माझ्या दवाखान्याला कबुतरखाना म्हणत असतं. छोटया जागेमध्ये अधिक पेशंट ठेवण्याची व्यवस्था असल्यामुळे त्यांनी ‘कबुतरखाना’ अशी संज्ञा ठेवली होती.

मधल्या काळात कल्पवृक्ष टयुबवेल कंपनी फारच फार्मात होती. शांतीनाथ हे बंधु संचालक होते. त्यांना सुनील व महावीर यांची जोड होती. यांच्याकडे गाडया-घोडयांचा सुळसुळाट असायचा. चार-चौघात नाव असायचं. समाजात दबदबा असायचा. माझ्याही मनात यायचं. आपण धंदा बदलावा काय?

त्यात माझे बंधू म्हणाले,  “आमची एकंदर प्रगती बघा आणि वाटलं तुम्हाला तर भागीदारीत टयूबवेलमध्ये या.”

डॉ.एन.जे.पाटील व माझ्यामध्ये सहा लाख रूपये खर्चून सहा इंची नवी कोरी रीघ, बँक प्रकरण करून खरेदी केली. बँकेला घर तारणं दिलं. महिना दोन-महिना रीघच्या ड्रायव्हरला घासून बसलो. डोक्याला डोकं लावून झोपलो. माती धुरळयात भटकंती केली. टक्के-टोणपे, हिंदोळे खाल्ले. आमची नवी कोरी रीघ मध्ये-मध्ये बंद पडत होती. अडकून बसत होती. पूर्व अनुभव नव्हता.

एकदा काय झालं आमच्या सप्लाय लॉबीमध्ये काही साहित्य आपले तर नाही ना, म्हणून माझे बंधू चेक करत होते. त्यामध्ये त्यांच्या गॅरेजचे साहित्य असेल ते बाहेर फेकत होते. त्यामध्ये रिकामे डब्बे पण, जे संडाससाठी वापरता येतील, तेही बाहेर काढत होते. यातून माझ्या भाऊबंदकीला मी ओळखलं.

वैद्यकीय क्षेत्रात आम्ही दोघेच भाऊ बंगला बांधून यांना आम्ही सुखाधीन दिसत होतो. धंद्यातली नुकसान आणि घरावरती बँकेची जप्ती ही चिन्हे माझ्या लक्षात आली. जाणकार भाऊबंद भाऊबंदकी खेळू शकतात.

माझे वडील एकदा माझ्या बाजूने म्हणाले होते,  “तुझा नाजूक पाय अन् तुझा नाजूक धंदा सोडून यांच्या नादाला लागू नकोस. त्या लोखंडी घिसाडयांच्या नादाला लागू नकोस. गप्प तुझा होता तो धंदा सांभाळ.”

यातूनच मला संदेश मिळाला होता. हळू-हळू मी एन. जे. पाटीलांना सांगून मला एवढं काही मोठं व्हायचं नाही तेंव्हा तुम्ही मला वगळा. हळू-हळू गोड बोलून एकंदर अंदाज घेऊन वेळीच मी माझे अंग काढून घेतले. पुढे डिझेलच्या किंमतीत वाढ झाली. नोकर पगार वाढले. मात्र कॉम्पिटेशनने टयूबवेलचा रेट तोच राहिला. त्यामुळे तो धंदा पुढे जाऊन बसला व त्यांच्या-त्यांच्या आपआपसात भाऊबंदकी शिरली. रस्सीखेच झाली. इस्टेटसाठी कोर्टकचेर्‍या चालू राहिल्या आणि कल्पवृक्ष फर्म संपुष्टात आली.

माझा भाऊ शांतीनाथ पाटील, म्हातारपणात माझे कसं होणार? या सबबीखाली विनाशकाले विपरीत बुद्धी या न्यायाने वयाच्या पन्नासाव्या वर्षी डॉ. सौ. उषा पालकर, एम. डी. हिच्याशी त्यांनी विवाह केला. औषधाच्या सह म्हातारपण सांभाळले जाईल. अशी त्यांची कल्पना होती. या लग्नामुळे व कांजीपंथामुळे जैन समाजातील त्यांचा दबदबा कमी झाला. रोष राहिला. 

क्रमश:


डॉ. शशी पाटील एक महान सेवाभावी चिकित्सक होते. 'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' हे त्यांच्या जीवनाचे ब्रीद होते. ते नेहमी निस्वार्थ व निर्मळ भावनेतून रुग्ण उपचार करायचे, त्यामुळे त्यांच्या फक्त हातालाच नव्हे तर त्यांच्या वाणीला ही गुण होता. त्यांच्या अनुभवसिद्ध उपचारांमुळे अनेक रुग्ण दुर्धर रोगातून मुक्त व्हायचे. मूलतः डॉ. शशी पाटील हे एक आध्यात्मिक साधक होते. प्रत्येक औषधोपचाराचा प्रयोग, ते प्रथम स्वतःवर करून पाहायचे. त्यांचा शिवांबू, योग, निसर्गोपचार व आयुर्वेदाचा फक्त प्रगाढ अभ्यास होता असे नाही तर ते एक उत्तम हस्त कुशल उपचारक होते. मॉलिश व ॲक्युप्रेशर यासारख्या उपचार कलेमध्ये ते निपून होते. ते एक उत्तम लेखक व कवी सुद्धा होते. त्यांनी आरोग्य विषयक अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. ते आरोग्याचा गहन विषय रुग्णांना दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणे देऊन सहजपणे पटवायचे.त्यांचे आपल्या वाणीवर चांगले प्रभुत्व होते. प्रस्तुत ‘मुळनक्षत्री - एक प्रेरणादाई जीवन-धारा’  या लेख मालिकेतून आम्ही  डॉ. शशी पाटील यांचे  ‘जीवन चरित्र’ क्रमश: प्रकाशित करीत आहोत. आज हजारो लोकांसाठी त्यांचे जीवन, नव-प्रेरणेचा स्त्रोत आहे.

Previous Post Next Post