विचार

विचाराबद्दल कोणाला काय विचारावं? विचार सतत चालूच आहेत. पाट्या टाकण्याचे काम मन सतत करते आहे. या झाडावरून त्या झाडावर, या फांदीवरून त्या फांदीवर, मन सारखे विषय बदलून भटकते आहे. विचारांनी ग्रस्त झालेला सुदृढ माणूससुद्धा थकून जातो.  उदासीनता, निरुत्साह या काय गोष्टी आहेत? मठ्ठपणा, बेहोशी हे सारे विचारांच्या प्रहाराचे मी परिणाम समजतो.

या चाललेल्या मनाच्या घालमेलीला कसं बरं आवरावं? रेल्वेचे डब्यावर डबे चढावेत तसे विचारांवर विचारांचे थैमान चालते तेव्हा नेमकं काय करावं? हा प्रश्‍न तुम्हालाच नाही, अनेकांना पडलाच आहे. कशी याची फ्युज काढून ठेवायची? कशी विचारांची लाईन तोडायची? बर्‍याच वेळेला परीक्षेच्या वेळीसुद्धा अप्रासंगिक विचार येऊन मौलिक दुर्मिळ वेळेचा अपव्यय होतो.

यासाठी मनावर विजय मिळवायचा असतो. मनाला जिंकायचं तर, कसं बरं जिंकणार मनाला? मन व विचार दोन नाहीतच; एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तेव्हा मुलांनो, काही अंतर्मुखी संत लोकांनी अत्यंत चोखपणे त्यावरही इलाज शोधला आहे.  दर्याच्या लाटा कोण व कशा थांबणार? त्याआधी एक गोष्ट सांगतो म्हणजे लक्षात येईल.

एक अत्यंत उद्योगशील असा, उद्योगसम्राट कर्मयोगी होता. काम-काम, कामे करीत राहायचा. कामाच्या प्रचंड दबावाखाली व्यस्त राहायचा. त्याला कामकाज करण्यासाठी एक तडफदार मनुष्य कर्मचारी म्हणून हवा होता. प्रामाणिक व तडफदार कामगारांची त्या वेळीही वानवा असावी. त्याने सरळ गुरूकडे धाव घेतली. गुरूने त्याला एक मंत्र दिला. हा मंत्र एक लाख वेळा उच्चारताच एक शक्ती प्राप्त होईल, असे सांगितले. त्याने लगेच जंगलात जाऊन साधना सुरू केली. निष्ठेने साधना सिद्धही झाली. वेताळी चेटूक त्याला प्रसन्न झाला.

मी तुझे सारे काम निमिषमात्रात करीन, अशी त्याने ग्वाही दिली. पण त्याबरोबरच त्याने एक अट घातली. अट होती, जेव्हा काम नसेल तेव्हा मी गप्प राहणार नाही. मी तुझ्या छातीवर गुद्दे मारीत राहीन. तू पुढचे काम सांगेपर्यंत मी हे काम चालू ठेवीन.

झालं... खूप साधना करून सिद्धी प्राप्त झालेली, ठीक आहे म्हणाला, याचेकडे तरी खूपच काम होते, तो त्या चेटकाला घेऊन घरी आला.

कामाची लिस्ट त्याच्याकडे दिली. काम सांगताच काम करी. चेटूकच ते, अगदी विजेच्या ताकदीप्रमाणे इकडे काम होई. इकडे काम सांगितले की तिकडे झालेच. मग बँकेत जायचे असो की परदेशात, काहीही सांगा; कामे सारी चुटकीसरशी होऊन जायची. काम होताच हे चेटूक प्रत्येक वेळी अस्तन्या मागे सरकवून छातीवर ठोसे मारण्याच्या तयारीत राहायचे. काम काम तरी किती सांगणार? कामे सारी संपत आली, काम सांगायला विलंब होऊ लागला. दरम्यान त्याला छातीवर त्याचे ठोसे सहन करावे लागत होते. पुन्हा तो पस्तावून गेला. पुन्हा तो त्या साधूकडे गेला. झाली हकीकत सांगितली. साधू म्हणाले, ‘त्यात काय आहे? काळजी कशाला करतोस?’ साधू म्हणजे ‘सदगुरु’. सदगुरूने त्याला एक नामी युक्ती सांगितली. काय सांगितलं असावं? ‘अरे, तू जिथे पेढीवर बसलेला असतोस ना, त्यासमोर एक रिकामा गोल पिलर आहे, खांब आहे ना?’

  हा म्हणाला, ‘होय आहे ना ! मग...?’

‘मग काय, तुझे एक काम संपले की दुसरे काम हातात येईपर्यंत त्याला खांबाभोवती घिरट्या मारायला लाव.’

‘फेर्‍या मारणं हेही कामच आहे. ते निमूटपणे करत राहील. तुझे छातीवरचे गुद्देही वाचतील आणि तुझे काम होत राहील. कसे?’ ही फक्कड नामी युक्ती सदगुरूंनी सांगून टाकली.

मुलांनो, अगदी तसेच, मीही एक नामी युक्ती या तुमच्या मनाला वश करण्यासाठी सांगू इच्छितो. मनात असणार्‍या विचाराकडे जर तुम्ही पाहिलेत तर लक्षात येईल की, मन कधी वर्तमानात नसतेच मुळी! मनातील विचार अधिक करून भूतभविष्यामधलेच असतात. मनदेखील चेटकाप्रमाणेच अगाध शक्तीचे, प्रचंड वेगाचे व अत्यंत सूक्ष्मतेचे द्योतक आहे. याला लगाम घालता येतो, ही तुम्हाला आश्‍चर्याची गोष्ट वाटेल. मोकाट सुटलेल्या, चौखूर उधळलेल्या मनाला वश करणं कसं बरं शक्य व्हावं?

काही काळ का असेना, मनाला वश करणं किंवा विचारशून्य ठेवणं शक्य आहे.

तुम्ही हा प्रयोग आताच करून पहा. चला, आताच तो प्रयोग करूया. चला सर्वजणच डोळे बंद करूया. थोडं जिथं आहात तिथे स्थिर बसा. थोडं शांत होऊन चाललेल्या स्वाभाविक श्‍वासाकडे पहा, डोळे बंद ठेवून मनानेच पहा.

अती सर्दी झाल्यावर, नाकाच्या ज्या टोकाला पाण्याचा थेंब लोंबकळतो, त्या स्थानावर काही क्षण येऊया ! तिथं या क्षणाला होणार्‍या संवेदनांकडे अंत:चक्षूंनी पहा. एक दहा श्‍वास पहा, त्यांतला एकही श्‍वास दुर्लक्षित होऊ नये याची काळजी घ्या. हे तुमचे कौशल्य आहे. ही तुमची कुशाग्रता आहे. हा तुमचा पराक्रमसुद्धा समजा. चला, सगळेच प्रयत्न करूया...

हं ! आता उघडा बरं डोळे, काय बरं घडलं? दहा श्‍वासांच्या चपाट्यात मनाला नाकाच्या खुंटीला तुम्ही बांधलं होतंत. मन चिडीचूप बसलं होतं की नाही? मन चिडीचूप होताच खूप बरं वाटलं की नाही?

हळूहळू दहाचे अकरा, अकराचे बारा करीत करीत साधारण 15 मिनिटांवर जा. मग तासावर आधिराज्य मिळवू शकाल. परमशांती लाभू लागेल. इतस्तत: टकरून बोथट झालेल्या मनास थोडी धार येईल व तुम्ही जे काम हाती घ्याल, ते चोख होईल. प्रसन्नता राहील. एकपाठी व्हाल. एकदा वाचलं की लक्षात राहील. मनाची एकाग्रता तुमच्या व्यक्तित्वाला खतपाणी घालेल. विचारांची शून्यता हाच मनाचा उपवास आहे.

मौन राहाणेसुद्धा... वाचेवर प्रभुत्व आणणेच आहे. प्रथम मनात विचार येतात. विचार पुढे जाऊन उच्चार करतात. उच्चारच कृती करवतो व कृती परिणाम घडवते.

आरंभ थांबवलात, जर आरंभ होऊच दिला नाहीत. मग... जर आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून येणार? संपलं. हीच आहे ती कला. मुलांनो, रोज सकाळ संध्याकाळ तूर्त पाच-पाच मिनिटे तरी करत रहा बरं ! करणार ना? जे करणार ते हात वर करतील. छान, सारेच करणार तर, छान...!

क्रमश:

डॉ. शशी पाटील  समाजातील  प्रत्येक घटकासाठी  स्वास्थ्य  मार्गदर्शन करायचे. त्यांचा सेवा-संपर्क लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खूप मोठा होता. त्यांनी अनेक शाळा कॉलेजातून लहान मुलांसाठी व तरुणांसाठी स्वास्थ्य जागरणाचे विविध उपक्रम राबविले.  त्यांनी 'जीवनाच्या बाराखड्या' या नावाचा उपक्रम लहान मुलांसाठी  अनेक वर्षे राबवला, जो मोठ्यांसाठी ही खूप उपयुक्त आहे.  त्यांनी या उपक्रमातून हजारो  बालकांना व तरुणांना समाजामध्ये 'स्वास्थ्य रक्षक' म्हणून कार्य करण्यास प्रेरित केले.  प्रस्तुत लेखस्तंभातून, 'जीवनाच्या बाराखड्या' या त्यांच्या उपक्रमातील व्याख्यानांचे संकलन, आम्ही क्रमश: प्रकाशित करीत आहोत..

Previous Post Next Post