मुळनक्षत्री : एक प्रेरणादाई जीवनधारा : भाग - 4


शिवाम्बूकडे कसे वळालो ?

तेच-तेच रोग, तिचं-तिचं औषध व तीच ती माणसे आणि तोच-तोच पैसा यांनी मनाला उबग आला होता. एक मरगळ आली होती. वेगळं काहीतरी मला हवं होतं. या विचाराने मी ग्रासलो होतो.

मी काही ठिकाणी, सामान्य लोकांकडे असामान्य लोकांची रांग पाहत होतो. औषध ऐकत होतो. पाहतही होतो. शिरोळ तालुक्यातील  ‘अकिवाट’ हे लकव्यासाठी तर  ‘टोप संभापूर’ हे जुन्या जखमांसाठी,  ‘कसबा बावडा’ जळालेल्या जखमांसाठी प्रसिद्ध होते. औषध देणारा जरी सामान्य माणूस असला तरी, औषध घेणार्‍या असामान्यांची रीघ मी बघत होतो.

त्यामध्ये कलेक्टर असायचे, मामलेदार असायचे, प्राचार्य असायचे. ही जर सारी  ‘युनिव्हर्सिटी’ रांगेत उभी असेल तर त्या पद्धतीला सरकारी मान्यता का नाही म्हणायचे? असेच काहीतरी विशेष घबाड मलाही सापडावं यासाठी चिंतन, मनन, मंथन, विचारांचे काहूर चाललेलं असायचं. रस्त्याच्या मोरीच्या कट्ट्यावर मी बसलेलो असायचो. रात्र मध्यान्ह झालेली असायची. माझे हे मंथन-गुंजन चालूच असायचे. कोणीतरी शेतात पाणी पाजणारा शेतकरी त्या माझ्या आकृतीला बघून,  “कोण गा ह्यो?”  मी बोलावे तर एक, नाही बोलावं तर एक, नाही बोलावं तर भूत समजायचे. बोललो तर  “डॉक्टर तुम्ही?”  या वक्ताला, काय करतासा म्हणायचे! असं म्हणत होते.

 ‘सडोली’ हे गाव राधानगरी ते कोल्हापूरच्या रस्त्याला असून, भोगावतीच्या तिराला आहे. इथे हायस्कूल आहे. आज दोन-दोन आमदार या गावात आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांचे पुतळे आहेत. एकूण आबादी आबाद गाव आहे.

सडोली गावातील सामाजिक कार्यकर्ते कै. रामचंद्र पाटील, त्यांचे चिरंजीव विजयसिंग पाटील. प्रतिष्ठित मानसिंग पाटलांचे बंधू, रिकाम्या वेळेत मस्करी, गप्पा मारायला मजकडे यायचे.

धर्माच्या, राजकारणाच्या गावातील, घडामोडीच्या गप्पा रंगायच्या. त्यांचं लग्न होऊन वीस वर्षे झाली होती. तरी मुलं-बाळ नव्हते. तेवढीच खंत त्यांना पाहून दिसत होती.

एके दिवशी ते मला म्हणाले,  “तुम्ही माझ्यावरती काहीतरी उपाय शोधता का बघा?”

मी म्हणालो,  “दोष कुणाच्यात आहे?”

 “तेच आम्हाला माहिती नाही,”  असं ते म्हणाले.

मग मी चला म्हणालो,  “चला माझ्या थोरल्या बंधूकडे.”

उभयतांना थोरल्या भावाकडे म्हणजे डॉ. एन. जी. पाटील यांचेकडे घेऊन गेलो. थोरल्या भावाने त्यांना विशेष तज्ज्ञाकडे पाठविलं. त्यांनी विशेष तपासण्या केल्या. सिमेन्स रिपोर्ट स्पष्ट झाला. शुक्रबीज नसल्याचं स्पष्ट झालं. या जन्मात मूलं होणार नाहीत हे सिद्ध झाले.

हे विजू पाटील प्रत्येक पौर्णिमेला  ‘कणेरीच्या काडसिद्धेश्‍वर महाराजांकड’ त्याकाळी सत्संगासाठी पोहोचत असतं. सधन शेतकरी धनाढय व्यक्ती म्हणूनच महाराज त्यांना आपल्या पुढेच सत्संगला बसवत असत.

एकदा काय झालं विजयसिंगचा हात दारात चिमटला गेला.  “कुठे लागलय बघू या?”  असे महाराज म्हणाले. त्यांचे लक्ष हाताच्या भविष्य रेषेवर फिरले. आणि म्हणाले,  “तुमच्या हातात मूल होण्याचा तर योग आहे का झालं नाही आतापर्यंत? कुठं घोंड पेंड खातयं?”

तेव्हा विजू पाटील म्हणाले,  “मग महाराज काय करू? डॉक्टर तरी म्हणतात, या जन्मात मूल होणे शक्य नाही.”  तेव्हा महाराज म्हणाले,  “एक उपाय करतोस का बघ? आम्ही ऋषीमुनी जो मार्ग अवलंबतो तोच मार्ग अवलंबतोस का बघ?”

 “महाराज काय आहे तो मार्ग सांगा तरी!”  तेव्हा महाराजांनी त्यांना स्पष्टच सांगितलं,  “एक औषध असं आहे, जे पुरूषाला पूर्ण पुरूष आणि स्त्रीला पूर्ण स्त्री करतं आणि पूर्ण पुरूष व पूर्ण स्त्री पूर्ण मुलाला जन्म देऊ शकतात.”

 “त्या औषधाचं नाव तरी सांगा, कोठे मिळते ते, ठिकाण तरी सांगा?”  विजू पाटीलांनी विचारले.

तेव्हा महाराज हसून म्हणाले,  “या औषधाचे नाव आहे शिवाम्बू आणि ते तुझ्याकडेच आहे.” विजू पाटलांचा चेहरा  ‘शिवाम्बू’ शब्दाबरोबरचं विस्कटला. कारण प्रल्हाद केशव अत्रेंच्या ‘मराठा’ या पेपर मध्ये वाचताना मोरारजी वरती तोंडसुख घेताना, आम्हा महाराष्ट्रीयन लोकांना ‘शिवाम्बू’ शब्द सर्व सामान्यांच्या परिचयाचा झाला होता.

आम्हा भारतीय पंरपरेत साधू, ऋषीमुनी यांच्या आध्यात्मिक साधनेत ‘शिवाम्बू हे हाडासारखे आहे. घरदार सोडून आम्ही जेव्हा जंगलाची वाट पकडतो. तेव्हा आमच्याकडे धैर्य असांवं लागतं. अन् ते धैर्य या शिवाम्बूकडून मिळतं ही आपली संस्कृती आहे.’ विजयसिंग पाटलांच्या विस्कटलेल्या चेहर्‍यासाठी हे महाराजांनी त्यांना स्पष्टीकरण दिलं.

उंचीपुरी, फेटयासह सहा-सव्वासहा फुटांची, गोरीपान नाकेली, भगवी वस्त्र धारण केलेली, व्यक्ती म्हणजे ‘काडसिद्धेश्‍वर महाराज.’

 “आता तुम्ही सांगताय म्हटल्यावर, मी तो प्रयोग करणारच.”  विजयसिंग पाटीलांनी हमी दिली.

जशी आपली विचार प्रवृत्ती तशीच फळप्राप्ती होत असते. आता काडेची पेटी तुम्ही कशासाठी वापरणार? हा तुमच्या विचारांचा प्रश्‍न आहे. विचार चूलं पेटवण्याचा आहे की घराला आग लावण्याचा आहे, हा विषय आपला. काडेची पेटी हे आयुष्य आहे. आयुष म्हणजे शस्त्र. शस्त्र आपण हातात कधी घेतो? जेव्हा समझोता कुचकामी होतो तेव्हा शस्त्रे नाईलाजाने उपसली जातात.

तुझ्यासाठी ‘शिवाम्बू’ हे शस्त्र सगळया इलाजाच्या अंती उपसायचे आहे. महाराजांच्या इतक्या स्पष्टीकरणानंतर कानांवर हात ठेवून विजू पाटील उठले. शहाण्याला शब्दांचा मारा, अडाण्याला टोणप्याचा मारं, हे विजयसिंगाना माहीत होतं.

कारण, विजयसिंग शहाणा होता. या महाराजांच्या सत्संगात रंगला होता. या महाराजांची खासियत होती की, दृष्टांत दिल्याशिवाय कुठलीही गोष्ट बोलायचीच नाही. बोलण्यातील स्पष्टपणा, गोरा तेजस्वी चेहरा, प्रसंगानुसार चेहर्‍यावर उमटणर्‍या छटा, सिद्धांत पटवण्यासाठी गाढा अभ्यास, गाढा तप लागतो. हे सर्व त्यांच्याजवळ होते.

दुसर्‍या सकाळी विजयसिंगने पेला हातात घेऊन, पहिल मूत्र म्हणजे पहिला सॅम्पल बाजूला केला. महाराजांच्या प्रतिमेला स्मरून पहिल्या घोटापासून शेवटच्या घोटापर्यंत नाक धरून पिऊन टाकला. रोजचं असं घेणं चालू झालं. दुसरी पौर्णिमा हजर झाली. पौर्णिमेला सत्संग ठरलेला.

नियमाप्रमाणे विजयसिंग पाटील हजर. महाराजांची नजर विजयसिंग पाटील यांच्याकडे येताच, त्यांनी त्यांना बोलावून घेतलं आणि कानात कुजबुजले.

 “अरे! तू हे एकटा घेऊन चालणार नाही! मुलं ही दोघांना मिळून होत असतात.”  हे महाराजांचं बोलणं मध्येच थांबवून, “ती काय घेती हो?”  असं विजयसिंग म्हणाले.

“मग तुला अर्धवटचं मूलं होईल. कमरेच्या वरती तरी किंवा कमरेच्या खालती तरी,”  अशी महाराजांनी फुणगी टाकली आणि तशीच विजयसिंग पाटलांनी ही बातचीत आपल्या पत्नीला सांगितली.

 “महाराज सांगताहेत तर मी पण घेते की!”  ती पण रोजच्या रोज घेऊ लागली.

उभयंतां मध्ये वेगळा फरक जाणवू लागला, दिसू लागला. विनोदाने त्यांचे मित्र, मैत्रिणी फरक पाहून ‘पिठाची गिरण बदलली जणू!' असे म्हणू लागले.

कारण त्याच्या तेजामध्ये, हालचालीमध्ये विशेष बदल जाणवू लागला होता. काही विनोदाचे खासगी किस्से रंगले, गप्पा रंगू लागल्या. जेव्हा चार-दोन महिने निघून गेले. जेव्हा गरोदर सदृश्य पत्नीच्या ओटीपोटात काही चिन्हं जाणवू लागली. नंतर मी त्यांना खोचून-खोचून विचारल्यानंतर एके दिवशी त्यांनी तोंड उघडले.

“तुम्हाला वैद्यकीय लोकांना या गोष्टी पटणारचं नाहीत म्हणून काही गोष्टी मी सांगायचं टाळत होतो. जे तुमच्या लक्षात आलयं तेच आणखीन थोडसं पक्क झाल्यानंतर मी सांगावं म्हणत होतो.”

आता तुम्ही विचारतच आहात तेव्हा मी स्पष्ट सांगतो. का-कू करत हा सांगू लागला. मला काही कळेना. एका हाताने करंगळी उचलून, एका हाताने मूठ करून उभ्या करंगळीतून ग्लासमध्ये ओतत असल्यासारखी अ‍ॅक्शन करत तो ‘मोरारजी कोलाचा’ आधार घेतला असं सांगू लागला.

 “म्हणजे काय?”  मी विचारले. मला स्पष्ट होईना. कारण मी अनभिज्ञ होतो. तेव्हा कुठे त्याने शिवाम्बूचा उल्लेख केला. तरी मी  “म्हणजे काय?”  विचारलचं. मग माझी टयूब पेटली.

मी ‘मराठा’ पेपरमधून हा विषय वाचल्याचं आठवलं. तोवर माझही तोंड बिघडलं आणि हे तुम्ही, तुमच्या सारख्यांनी घेतलचं कसं? असं मी त्यांना म्हणालो. मोरारजी नेते असले तरी त्याच्याविषयी त्यामुळेच दुराग्रह होता. तेव्हा कुठे विजयसिंगानं स्पष्टीकरणात वरील तपशीलं दिला. तेव्हा कुठे मला कणेरी मठ कळाला. तिथले महाराज कळाले. तिथलं वैभव कळाले.

दरम्यानच्या काळात स्वतःच्या आई-वडिलांचं घर सोडल्यापासून तोपर्यंत भाडयाच्याच घरात आमचा वावर होता. घरमालक शेजारीच असायचे. माझी हालचाल, माझी मिळकत, माझी ऐट, माझा थाट ते पाहत असायचे. दोन-दोन मोटार सायकली माझ्याबरोबर धावत असायच्या. मोटार सायकलीवर बसूनच मी घरात यायचो.

त्यामुळे वरचेवर भाडे वाढवण्याची, असूयेने त्रास देण्याची भावना घरमालकांना होत असावी. कारण त्यांच्याकडून ‘भाडे वाढवा नाही तर जागा सोडा.’ चार-दोन महिन्याच्या काळात मला जागा सोडावी लागत असे, कधी वर्षानंतर हा त्रास व्हायचाचं. दरम्यान मी कंटाळलो होतो.

मुलं शाळेला जातं होती. आमच्या परिवारावर ‘लोहार गुरूजी’ यांची विशेष कृपादृष्टी होती. ते कन्नड भाषेत बोलायचे व मी ही कन्नड भाषेत बोलत होतो. मी त्यांचा वाटत होतो.

इयत्ता पहिली, दुसरी व तिसरी हा वर्ग सडोली मुक्कामी तेच घेत होते. चांगल्याची मुले चांगलीच पुढे सरकावीत असं वाटून मला ते म्हणाले,  “एकाच वर्षात दोन-दोन इयत्ता घ्यावं म्हणतो!”  मी म्हटल,  “बरं होईल, वर्ष वाचेलं, कमी वयात पुढच्या शिक्षणात, कमी वयोगटात त्यांना गती घेता येईल.”  त्यांनी तशी मेहनत घेऊन संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे कोवळया वयात मुलांची शिक्षणे पूर्ण झालीत.

स्वतःच्या घराची, मालकीच्या जागेची तीव्र आवश्यकता वाटू लागली. कुठे स्थायिक व्हायचं? मी सडोली मुक्कामीच जागा खरेदीसाठी पाहत होतो. माझा बँक बॅलन्स तीस-पस्तीस हजार पर्यंत आलेला होता.

मी वैद्यकीय सेवेबरोबरच फोटोग्राफी पण कारायचो. एका यात्रेच्या ग्रुपमध्ये, यात्रेकरूंच्या स्वास्थाची देखभाल करायला, माझी डॉक्टर म्हणून नियुक्ती झाली होती.

शिखरजी, काशी, बनारस, हरिद्वार इत्यादी तीर्थक्षेत्रांची दर्शने घेऊन पाहून गाडी मुंबईला आली होती. फुटपाथवर ‘यासिका सिक्स थर्टी फाईव्ह’ नावाचा जपानी बनावटीचा कॅमेरा सहाशे रूपयाला मी खरेदी केला. फोटोग्राफीची कला सरावानी अंगी आली.

वैद्यकीय व्हिजीट बॅगेबरोबर मोटारसायकलला फोटाग्राफीची पण बॅग अडकवू लागलो. लग्न, मुंज, वाढदिवस, हौशी, नवशी, गवशी, या लोकांचे फोटो खेचू लागलो. कधी शाळेचा ग्रुप, कधी मैत्रिणींचा समूह, कधी खिल्लारी बैलांची जोडी, कधी वास्तुशांतीची इमारत, ऊसासह भरलेला ट्रॅक्टर कॅमेर्‍यात घुसू लागले.

अशी दुधारी बंदूक मी मिळकतीसाठी वापरू लागलो. डबल रोल, तिब्बल रोल छायाचित्रे घेऊ लागलो. हळदी कुंकुवाला पदर सावरणारी बाई तीच आणि कपाळी कुंकू लावणारी बाई तीच! हे माझं वैशिष्टय असायचं. तुमच्याच खांद्यावर तुम्हीच बसलेले दिसायचे.

डॉक्टर ही तोचं, आणि पेशंट ही तोचं. असे डबल रोल फोटो घेण्यास माझं वैशिष्टय असायचे. शिवाय इर्मजन्सी हाताळायची आणि लग्न सोहळयात जाऊन फोटोग्राफीही करायचो. यामुळे दोन पैसे चांगले मिळायचे. यांनीच बहुधा घरमालक भाडे वाढवण्यासाठी आसिक व्हायचा. यासाठी स्वतःच्या जागेतला मुरूमाचा खडा मी कधी डोळा भरून पाहीनं, असं मला होऊन गेलं होतं.

साधारण आठवडयाला कोल्हापूरहून बाजार खरेदीला मी जायचो. भाजीपाला आणि औषध ही बाजाराची मागणी असायची. असाच एकदा बाजार केला. माझ्याकडे तेव्हा ‘इटालियन अ‍ॅटो मोटर' सायकल होती. रंकाळा तलाव सोडला व राधानगरी रोडकडे चढतीला वळालो.

चढत्या टेकाला माझी गाडी मीस फायर करून गचके देऊ लागली. शेवटी मी थांबलो, हीचं काय म्हणणं आहे? तरी एकदा बघून घ्यावं. म्हणून प्लग खोलून साफ केला.

तो पर्यंत एक मनुष्य तीन वर्षाच्या रडणार्‍या मुलाला घेऊन, समजावीत होता. तो गाडीजवळ येऊन उभा राहिला.

मी त्याला सहज विचारलं,  “या तुमच्या परिसरामध्ये एखादा प्लॉट द्यायचा आहे का?”  तोच त्या सोसायटीचा चेअरमन होता. ‘श्रीयुत आत्माराम कवडे (गुरूजी)’ हे त्यांचं नाव होतं. ते मला म्हणाले,  “प्लॉट नं. 13, असाच माझ्या सारखाच कॉर्नरचा प्लॉट आहे. रस्त्याच्या कडेला आहे. प्लॉट मालक अडचणीत आहे. त्याला सात हजाराचं कर्ज फेडायचे आहे. सात हजार आले तर तो प्लॉट द्यायला आजही तयार आहे. तो प्लॉट दाखवायला त्यानं मला बोलावून नेलं.”

मी म्हटलं,  “शेजारच्या प्लॉटची काय किंमत आहे? कसे विकत दिले-घेतले जातात? इथल्या मार्केटचा अंदाज काय आहे?”

त्यांनी सांगितले,  “त्या प्लॉटची किंमत तीन हजार पर्यंत आहे.”

मी म्हणालो,  “मी यांना डबल काय म्हणून द्यायचं?”

ते मला म्हणाले,  “त्यांना कर्जाचे पैसे उपलब्ध झाले तरच प्लॉट द्यायचा आहे. ते अडचणीत आहेत.”

‘सानेगुरूजी हौसिंग सोसायटी’ अशी सानेगुरूजींच्या नावावर ती सोसायटी होती. गुरूजी लोकांचीच सोसायटी ही. म्हणजेच सुशिक्षित लोकांचा सहवास, म्हणजेच रसिक लोकांचं सान्निध्य, रस्त्याला प्लॉट असल्यामुळे चिरमुरे घेऊन बसलो तरी, ते दिवसभरात खपतीलं ही कल्पना. डबल पैसा गेला तरी जाऊ दे. मनाशी ताळा घातला आणि सानेगुरूजी सोसायटी मधील प्लॉट नं. 13 चा 1974 ला मालक झालो. त्या काळात मी प्रमाणाबाहेर किंमत दिली आणि प्लॉटचं मार्केट वाढवलं, अशी सोसायटीत कुजबुज सुरू झाली.

बेडरूम, किचन आणि दिवाणखाना असा बंगला. अ‍ॅटॅच बाथरूम, संडाससह. टुमदार घर यथावकाश तयार झालं. मला या घराला साधारण चाळीस हजारापर्यंत खर्च आला होता. हौसिंग सोसायटीने तेरा हजाराचे कर्ज मंजूर केले होते.

इंदिरा गांधींच त्याकाळी सरकार होतं. तिनं आणी-बाणी पुकारली होती. ‘सिताराम कांबळे गवंडी कम कॉन्ट्रॅक्टर’ यांच्याकडे ते खंडित काम दिले गेले होते. हा शेजारच्या डोंगरे गुरूजी यांच्या परिचयाचा होता. लागेल तसे त्याला पैसे त्याचे डायरीवर सह्या घेऊन भागवले होते.

शेजारांच्या शिकविण्याने मला पैसे न देताच माझ्याकडून इमारत बांधून घेतली असा दावा त्याने कोर्टात ठोकला. केस कोर्टात रंगली. पोलीस जबाब सुरू झाला. आम्ही रेव्हेन्यू स्टॅम्प न लावता सह्या घेतल्यामुळे या नोंदी रद्दबादल झाल्या.

पोलीस अधिकारी मला ओळखत असल्यामुळे निम्मी रक्कम तुम्ही सोसावी आणि निम्मी रक्कम त्यांनी सोसावी असा समझोता झाला. तीन हजार रूपये फरकाची रक्कम निघाली. बँकेत माझ्या खात्यावर रक्कम नव्हती. रक्कम मिळाल्याशिवाय घराचा कब्जा मिळणार नव्हता.

मी धाव घेतली एन.जे.पाटील अण्णांच्याकडे. तेव्हा ते म्हणाले,  “माझ्याकडे पैसे नाहीत, मी देऊ शकत नाही. मात्र मी महावीर बँकेत जामीन राहू शकतो. बँकेमार्फत पैसे द्यायची व्यवस्था करू शकतो. बँकेचा हप्ता व व्याज तुझ तू बघ.” असे डॉक्टर एन.जे.अण्णा म्हणाले. मला बँकेकडून रक्कम मिळाली. घरात रहायला गेलो. वास्तविक वास्तुशांती पण झाली.

एकदा काय झाले, शेजारच्या शिक्षक लोकांचा समूह वर्गणी गोळा करत येत होता. माझ्याही दारात आला.  “वर्गणी कशाची?”  मी विचारले. देवीच्या समोर बकरं कापण्यासाठी तीन रूपयांची वर्गणीची मागणी पुढे आली.

मी कायमच्या साठी घर बांधलं होतं. नेहमीच्या साठी राहणार होतो. माझेही संस्कार यांना समजावेत म्हणत होतो. मया कामाला मी वर्गणी देणार नाही. ही अंधश्रद्धा आहे. शाळेचा एखादा स्कॉलर विद्यार्थी, त्याच्या करिता शंभर रूपयाचा पुरस्कार माझ्याकडून घेऊन जा पण या कामासाठी वर्गणी मिळणार नाही.’ हा आदर्श विचार मी त्यांच्याजवळ ठेवला होता.

माझ्या आदर्शाचा स्पष्टपणा नडला. समूहातील काही लोकांना राग आला. यातूनच असहकार, बंड, दंगेधोपे, भांडण-तंटयाचे निमित्त, असंतोष, मनस्ताप होऊ लागला.

शेजारीच विद्यमान आमदार पी. एन. पाटील (सडोलीकर) यांचे झारे यांच्या मळयात बुलडोजरचं मोठ गॅरेज होतं. डॉ. पाटील यांना शेजार्‍यांचा उपद्रव होतोय, त्रास होतोय, हकलण्याचा प्रयत्न होतोय हे कळल्यानंतर स्वतः पी. एन. पाटील शेजार्‍यांना दम देऊन जीपगाडीतून निघून गेले.

या भागात त्यांचा दबदबा होता. त्यांच्या राहत्या सडोली मुक्कामी माझी पत्नी भाऊबीजेच्या दिवशी त्यांना ओवाळत असे. याची जाणीव ठेवून त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केली.

दरम्यान विजयसिंग पाटीलांकडून कळलेला शिवाम्बूचा वृत्तांत, विषय मंथनासाठी, मनाच्या ऐरणीवर घेऊ लागलो. दाखला स्पष्टच आमने-सामने होता. मनात वाटू लागलं की ही पूर्ण व्हायची गोष्ट आहेच काय? आणि इतकी ही करामती असेल तर, आधीच माझ्या पायाला पोलिओ होता. तरीपण, म्हातारपणात तरी चांगले दिवस यावेत म्हणून हा डोस मी घेतला तर....

योगायोगानं गुढीपाडवा, त्याच आठवडयात होता. आता म्हटलं कुठलीही चांगली गोष्ट मुहुर्तानेच करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. नवीन वर्षाचा आरंभ हा नव्या विचारांचा प्रारंभ. म्हातारपणासाठी तरतूद म्हणून साडेतीन मुहूर्तापैकी हा मुहूर्त आणि साडेतीन हाताच्या देहाचे आरोग्य अशी सांगड घातली. मनाचा हिय्या केला. तोवर मी हे कोणालाच सांगितलं नाही. तोपर्यंत मी फारसा या विषयी बोलत नव्हतो.

पाडव्याच्या दिवशी नियमाप्रमाणे सकाळी चार वाजता जाग आलीे. संकल्प लक्षात आला. वॉशबेसिनला मोठा आरसा होता. आरश्याच्या साक्षीने आरश्याला पाहत-पाहत स्टीलच्या ग्लासमध्ये लघवी केली. पेला काठोकाठ भरू दिला.

मी तसा जैन कुटुंबातला मनुष्य. बोट बुडवलेलं नव्हे तर शिवलेले पाणी न पिण्याची प्रथा असणार्‍या परिवारातील मी. त्या काळची परंपरा जोपासणारा असा, आता हा ग्लास तोंडानी प्यायचा आहे म्हटल्या नंतर चेहर्‍यावर तो निषेध व्यक्त होत होता.

मी स्वतःला प्रयोगवीर समजतो. ‘प्र’ म्हणजे प्रकृती, या प्रकृतीचा त्या प्रकृतीशी म्हणजे निसर्ग व दुसरा अर्थ म्हणजे ‘देहयष्टी’ स्वतःची व निसर्गाची या दोघांची सांगड घालून देण्याचा योग म्हणजे ‘प्रयोग’ ही माझी समजूत होती.

या विचारांशी मी हिम्मत केली, जिद्द केली, मनाचा निग्रह केला, एकदाचा ग्लास तोंडाला लावला. घाट्-घाट्-घाट् घोट घेऊन टाकला. पेला रिकामा झाला. आरशात पुन्हा तोंड पाहिलं. मी बाटलोय याची खंत दिसली. थोडा वेळ जाऊ दिला. पोटामध्ये खुटूर-फुटूर आवाज येऊ लागला. पोटातलं रसायन धक्का घेऊ लागलं. आता काय होतयं? कुणास ठाऊक? मला काहीच माहीत नव्हतं. अनुभव नव्हता. जगावेगळ मात्र केलं होतं. उलटी होते की शौचाला होतं होतं, हे काही नेमकं समजत नव्हतं. काहीतरी होऊ दे म्हणून मी शौचास बसलो. खळळ- खळळ् करून मख सरकलं. सरांडीवरती सरांडी झाडून झाली. जणू सॅनेटरी फिटींग ओपन झाल्यासारखं. जुन्या-पुरान्या मैलाचा तीव्र दुर्गंध येऊ लागला. दुर्गंध परमळू लागला.

नको ते विचार मनात येऊ लागले. आता कस व्हायचं? काय वैद्यकीय मदत लागलीचं तर कोणाला काय सांगायचं? पुन्हा संडासच्या बाहेर आलो. हातात काही काम घ्यायचं म्हटलं, तो पर्यंत पुन्हा संडासची भावना झाली, पुन्हा झाडणी झाली. हे थांबतय की नाही? थांबलच नाही तर काय करायचं? कोणाला काय केलं म्हणून सांगायचं. रेल्वेचा जेव्हा शोध लागला होता. तेव्हाही यात पहिल्यांदा कोणी बसायचं हे धूड चालू लागल्यावर ते थांबेल की नाही? याची कोणी खात्री द्यायची? म्हणून म्हणे पहिल्यांदा त्यात कैद्यांना बसवलं.

शेवटी शोध थांबला, जसं चालू झालं होतं तसं ते आपोआपच थांबलही. तसं हायसं वाटू लागलं. कुणीतरी चार हांडे पाणी तापवून चोळून-चोळून अंघोळ घातल्यासारखं वाटू लागलं. मळ-मळ, मरगळ निघून गेली. काजळी माझी झाडली गेली.

ही फारच कमालीची गोष्ट दिसते असं मला  वाटू लागलं. मुहूर्ताने लोक यासाठीचं कामाला सुरूवात करतात की सातत्य राहावं, की ज्याने मी दुसर्‍या दिवशी ही घ्यायचे ठरवले.

दिवसामागून दिवस निघाले तरी पत्नीलाही मात्र कळू दिलं नाही. मात्र माझ्यातला बदल पत्नीच्या लक्षात यायला लागला. माझ्या कामातली उरक तिच्या लक्षात यायला लागली.

रोजच्या प्रॅक्टिस मध्ये जे पेशंट कमकुवत आहेत, पैशानं, मनानही आणि शरीरानं, त्यांना हेरायला लागलो. औषधाच्या बरोबर तुम्ही ‘शिवाम्बू' पण घ्या, हे सांगायचं? म्हणून गोळया पाण्यातून न घेता शिवाम्बूतन घ्यायला सांगाव का? हा माझ्यासमोर प्रश्‍न होता.

कुठे-कुठे तरी संधी साधून पुटपुटायला लागलो. त्याबरोबर लोकांना वाटू लागलं, डॉक्टरचं टाळकं बिघडलं वाटतं. आतापर्यत हे असे कधीच बोलत नव्हते. आज मूत्र प्या म्हणतात उद्या काय खायला सांगतात कोणास ठाऊक? त्यापेक्षा त्यांचा नादचं सोडणं योग्य. माझी प्रॅक्टीस मंद होऊ लागली. बसलेला जम ओसरू लागला. असं होणं परवडणारं नव्हतं. आता हे बोलायचं तूर्त तरी टाळावं, असं मी ठरवलं आणि पाच-सहा महिने बोललोच नाही.

तो पर्यंत शिवाम्बूने माझ्या शरीरात प्रचंड क्रांती केली होती. मला त्याला बाजारात चालवून पहायचं होतं. जोखून, तोलून पाहायचं होतं. त्याच्यासाठी काय करू तरी? असं झालं होतं. लोक खोटा पैसा बाजारात चालवून पाहतात. हा खरा पैसा होता. संस्कृतीमुळे चालवायला अडचण होत होती.

दरम्यानच्या काळात मी स्वानुभव व प्रॅक्टीस मधले रूग्ण अनुभव वास्तुशांतीच्या काळात दोस्तांना मंद आवाजात चोरून, बाकीच्यांना कळू नये म्हणून मंद आवाजात सांगत होतो, समजावीत होतो. तरीपण जिलेबी तळणार्‍या ब्राम्हण वृद्ध आचार्‍याला हा आवाज कानी पडला. त्याचे कान तिखटच म्हणावे लागतील. तो जिलेब्या काढायच्या सोडून माझ्याकडे आलाव मला म्हणू लागला,  “डॉक्टर हे जे तुम्ही काय बोलत आहात याच संदर्भात एक पुस्तक, जिलेब्या बांधण्यासाठी रद्दी खरेदी करत असताना माझ्या हाती लागलयं.”

मी म्हटलं,  “त्याचं नाव काय?”

 “त्याच्या वरचं कव्हर फाटलेलं आहे साहेब, ‘शिवाम्बू चिकित्सा’ असं काही तरी आहे.”

मी म्हटलं,  “जिलेब्या करायचं राहू दे, ते पस्तक हाताला लागतयं का बघ!” त्याच्या मदतीला जो पोरगा होता त्याला त्याने घराकडे पाठवलं.

 “दाराच्या वरती एक फळी आहे, त्या फळीवर जे पुस्तक आहे ते घेऊन ये.” शुक्रवार पेठेत त्याचे घर होते. ‘काशीकर’ नावाचा तो आचारी होता.

पुस्तक वीस मिनिटात हातात आलं, तसा मला आनंद झाला. या शिवाम्बूची महति मुद्रित झालेली पाहून मी ते पुस्तक चाळलं आणि काय आश्‍चर्य त्यात एकशे सात संस्कृत मधले श्‍लोक होते. मिरजेच्या ‘वासुदेव कार्लेकर’ जे दिवाण होते. हे त्या लेखकाचे ते पुस्तक होते.

पहिलाच मुद्रित अवशेष मी पाहत होतो. श्‍लोकामध्ये रोगानुसार, ऋतुमानानुसार शिवाम्बूच्या बरोबर अनुपान काय करावं, काय नाही? याचा स्पष्ट उल्लेख होता. खुद्द शंकर भगवान, परमप्रिय पत्नी, पार्वतीला ब्युटी केअरसाठी, स्वास्थ्यासाठी समजावून देणारा प्रयत्न त्यात मला दिसला.

एका बाजूला देवांचा देव ‘महादेव' आणि दुसर्‍या बाजूला नेत्यांचा नेता महानेता पंतप्रधान ‘मोरारजी देसाई’ हे दोघेही एकच विधान मनोभाव करायला लाजत नसतील, तर मी तरी का हळू बोलावं. मी लाज सोडली. त्या वास्तुशांतीच्या सगळया समारंभातच या ताज्या घटनेचा तपशील दिला. कोल्हापूर-राधानगरी या महारस्त्यावरती माझे घर आहे. त्या घरावर दर्शनी भिंतीवर पाच बाय दहाच्या आर.सी.सी बॉक्स काढला होता. त्याच्यावरती चक्क लिहिलं ‘व्याधीमुक्त शिवाम्बू उपचार केंद्र’ आता म्हटले, लाजायचं नाही, कोणी लाजमोडया म्हटलं तरी चालेल.

तोपर्यंत पत्नीला माझा दृष्टिकोन कळाला. हे मनात घेतलं की तेचं करतात. तिला आपल्या मुलाबाळांची लग्ने कशी होतील? पाहुणे-पै काय म्हणतील? याची चिंता लागली. ती चिंता दरवाजे आदळून, हातातील भांडी आदळून कामाचा निषेध व्यक्त करत होती.  “नाही तेच तुम्ही डोक्यात घेतातचं कसं? तुमचे आई-वडील, माझे आई-वडील आमच्याकडे येणारचं कसे?” असे ती म्हणत होती. हा सगळा सोवळयाचा परिवार, शिवाशिव न खपवून घेणारा परिवार, पावित्र्य जपणारा परिवार.

माझी आई कधीतरी माझ्याकडे यायची, तेव्हा ती पेल्यातून पाणी पीत नसे. ‘तुझे पेले शिवाम्बूने रंगले असतील.' ती घागरीलाच तोंड लावायची. घागरीत तरी शिवाम्बू केलं नसशील म्हणायची. या खात्रीने ती पाणी प्यायची. सरोजिनीच्या मैत्रिणींनी तिला ‘शिवाम्बू मावशी’ म्हणून टोपण नाव पाडलचं. त्या मैत्रिणींची मुलं ‘शिवाम्बू माताजी' पण म्हणू लागली. आणखीन तिचा जळफळाट सुरू झाला.

माझं उपनगरात घर होतं. सकाळी फिरायला येणारे लोक शहर सोडून याच रस्त्याला यायचे. त्यावेळेस माझं एकचं घर रस्त्याला होतं. एवढा मोठा बोर्ड लिहून कोणत्या जाहिरातीचा हा बोर्ड आहे, हे समजून घेण्यासाठी एक चार-पाच मंडळी, सूर्य उगवायच्या वेळेस त्या बोर्डजवळ थांबले.

त्यातला एक जण चष्म्यातून निरखून पाहत मोठयाने वाचत होता. माझ्या कानी तो आवाज पडला. मी त्या बरोबर दाराबाहेर आलो.

 “या आत या, आपण बोलू या!”  मी त्यांना म्हणालो. त्याबरोबर तो ग्रुप आत आला. त्यामध्ये प्रमुख बोलके होते, ‘अमितचंद शहा.’ गुजरी मधील भेंडे गल्लीतील सोन्याचे व्यापारी, ते मला म्हणाले,  “येथे तुम्ही काय काय करता?”

मी म्हणालो,  “शिवाम्बूचा उपचार करतो.”

ते म्हणाले,  “तुम्ही सर्वसामान्यांसाठी हा महान उपचार घराच्या भिंतीवर लिहून फार मोठं औदार्य दाखविलं आहे.”

मी म्हटलं,  “ते कसं?”

तेव्हा ते म्हणाले,  “मला आधीच पैसे कमी नाहीत आणि बायकोला दुखणं पण कमी नाही. तिच्या तोंडातल्या हिरडयांना अल्सर झाला होता. जवळ-जवळ त्यावेळचे चाळीस हजार रूपये खर्च झाले होते. तरी तिला काडी मात्र गुण नव्हता. एकदा अमेरिकेतील एक विशेष तज्ञ डॉक्टर, काही व्ही.आय.पी. रोग्यांसाठी मुंबईत आला होता. मी ती संधी साधून, त्याच्या समोर ही चाळीस हजाराची फाईल ठेऊन त्याची फी वेगळी भरली आणि म्हणालो, ‘इथंपर्यत प्रवास माझ्या बायकोचा झाला आहे.’ आता पुढचा प्रवास काय करावा?”

त्या बहाद्दरानं ते सारं वाचलं.  “जगातला सगळाचं उपचार तुम्ही संपविला आहे, एकच उपचार बाकी आहे.”

 “तो आणखीन कोणता उपचार?”  अमितचंदनी विचारलं,

 “तो मी लेटरहेड वर लिहितो.”  म्हणून त्यांनी चार शब्द खरडली.

ती चार शब्द मोडकी-तोडकी हिंदीमध्ये अशी होती,  “पिसाब खुदका पिना, और खाना नेचर का, फल-फु्रट पर, इलाज पंद्रह दिन का!”  एवढेच ते शब्द होते. माझ्या बायकोनं त्याचं अनुकरणं केलं आणि माझी बायको आजपर्यंत ठणठणीत आहे.

माझ्या हातात हात घेऊन पायाला स्पर्श करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि पुढे म्हणाले,  “मी तुमच्या कामाला मदत करू इच्छितो. तुमचे काही विशेष खर्चाचे काम असेल तर माझ्यावरती सोपवा.”

माझं चिंतन, मनन, मंथन यातून गट्ठा लिखाण झालं होतं. ते लिखाण त्यांच्या समोर ठेवत मी म्हणालो,  “एवढं प्रकाशित करून द्या.”  ‘स्वस्थ स्वास्थ्य’ ही वीस-तीस पानाची पुस्तिका हजार प्रति दोन-तीन आठवडयाच्या अंतरात टेबलवरती आल्या. त्यावर किंमत लिहिली होती ‘विनाशुल्क!’

मी सदरील ‘स्वस्थ स्वास्थ्य’ सगळया वृत्तपत्रांना, संपादकांना पाठवलं, त्यांनी त्यातील मजकुरासह पुढारी, समाज, अग्रदूत, सकाळ इत्यादी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये त्यातला काही महत्त्वाचा मजकूर वेगवेगळया रूपात प्रसिद्ध झाला.

ते पुस्तक मी विजिटला येणार्‍या दर्जेदार लोकांना वाटू लागलो. सादाला प्रतिसाद मिळत गेला. कोल्हापूरवासीय डॉक्टर खडबडून जागे झाले. त्यात माझे बंंधू डॉ. अण्णाही होते. ‘अण्णांना’ एन.जे. म्हणूनही संबोधित असतं.

या सर्व प्रकारामुळे अण्णांचा जिवलग मित्र, याचा भाऊ मुतु पाजायला लागलायं असा प्रचार करू लागले. काही निनावी पत्र, अश्‍लील चित्रांसह पोस्टाने येऊ लागली. तिकडे त्याचं काम चालू होते. इकडे माझं काम चालू होतं.

सामना चालूच राहिला. पंचक्रोशितले जुने शिवाम्बू उपासक माझ्या भेटीला येऊ लागले. सदिच्छा मतं व्यक्त करू लागले. त्यांच मत होतं ‘अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांकडून धोका होण्याची शक्यता आहे.’

शेवटी काही शिवाम्बूप्रेमी मंडळी, तुम्ही एक संघटना उभारावी शिवसेनेप्रमाणे, ‘शिवाम्बूसेना' उभी करावी असे म्हणू लागली. कोल्हापूरच्या कृषी विद्यापीठातील प्राध्यापक श्री. एन. के. पाटील याचे लिडिंग करत होते.

सरस्वती सिनेमा टॉकीजच्या समोर माधवराव जामदार यांच्या घरी प्रत्येक शनिवारी शिवाम्बूप्रेमी लोकांच्या बैठका होऊ लागल्या आणि शिवाम्बू उपचार, प्रचार व प्रसार होऊ लागला. ‘अनुभव संयोजक महामंडळ’ या नावाचे मंडळ स्थापन पण केलं. प्रत्येक शनिवारी अनुभव कथन करणारे व उत्सुकतेपोटी श्रोतेगण यांची संख्या वाढू लागली. यामुळे जामदारांची जागा अपुरी पडू लागली.

हळूहळू संघटनेला बळं आलं. माझा एक मित्र अण्णासाहेब घाटगे काडसिद्धेश्‍वर महाराजांचा पट्टशिष्य होता. तो फार मोठं स्वप्न रचू लागला. कोल्हापूरला ‘घाटगे-पाटील’ ही ट्रान्सपोर्ट संस्था देशात प्रसिद्ध होती. तो घाटगे आणि मी पाटील. शिवाम्बूच्या क्षेत्रात ही नावे देशभर लोकं वाचतील हे माझं स्वप्न होतं. तो भाषण द्यायचा. रूग्णांना मसाजही करायचा. कणेरीच्या महाराजांचे निरोप, आशीर्वादही आणायचा. हाच त्याचा सत्संग होता. अशा रितीने अपेक्षित विकास होत होता.

नंतर एक सर्वोदयवादी, पंच्चावन-साठ वयाचे, विनोबा भावेंच्या पवनार आश्रमात सेवेच काम केल्याचं निमित्त सांगून, ‘श्रीयुत माणिकराव मेहेंदळे’ यांनी मंडळात प्रवेश केला. गोरे पान, टक्कलधारी, दाढीवाले खरचं सर्वोदयवादी वाटत होते. ते मंडळात राजकारण आणू लागले. तोपर्यंत या मंडळाचं अध्यक्षपद माझ्याकडेच होतं.

पण काही दिवस गेल्यानंतर म्हणू लागले,  “शशी पाटीलांचं नावं इतक झालं की, शशी पाटील म्हटलं की शिवाम्बू म्हणतात आणि शिवाम्बू म्हटलं की शशी पाटील म्हणतात. अशा प्रकारे ते लोकांमध्ये एवढे प्रसिद्ध झालेत. तर बाकीच्यांना ही संधी द्यावी.”  असं सर्वोदयवादी मेहंदळेंच  मत होतं.

मग मी एकूण राजकारणाचा गंध ओळखून माझं अंग बाजूला करणे योग्य समजलं आणि हळूहळू माझ्या कामात मी व्यस्त झालो. हळूहळू मी त्यातून इंटरेस्ट काढून घेतल्यानंतर त्या मंडळाची कार्यवाही मंद झाली आणि आज जवळ-जवळ शिवसेने प्रमाणे शिवाम्बूसेना होऊन उभे राहिले असते.

कणेरीच्या महाराजांची पटशिष्या, शांताबाई डोइजड. यांना लकवा झाला होता. महाराजांच्या विनंतीनुसार, लकव्यावरती उपचार घेण्यासाठी माझ्या केंद्राचं नाव त्यांनी सुचविलं. त्या माझ्या उपचार केंद्रामध्यें दाखल झाल्या. त्यांना पाहण्यासाठी स्वतः काडसिद्धेश्‍वर महाराज आमच्याकडे येणार होते ही माहिती शांताबाई कडून मला मिळाली. मी श्री. अण्णासाहेब घाटगे यांना ही दिली.

तेव्हा ते म्हणाले,  “आपल्या केंद्राकडे महाराज येतात. हा फारच मोठा योगायोग आहे, ते कोणत्याही निमित्ताने येऊ देत, मी त्या दिवशी हजर होईन. परंपरेनुसार स्वागत-समारंभ सोपस्कार मीच पाहीन. यथेचिज पादपूजा मीच करीन. तुम्ही काही काळजी करू नका.”

ठरल्या दिवशी महाराज आले. अण्णासाहेब घाटगे हजर झाले. यथोचित कार्यक्रम सुरळीत पार पडला. त्यावेळी मी जवळून महाराजांचे दर्शन घेतले. पदस्पर्श केला. चरणावर माथा ठेवला. त्याबरोबर ते आशीवार्द देत उद्गारले,  “तुझा जन्म या उपचाराच्या उत्कर्षासाठी झाला आहे. तू तेच करावसं.”  शांताबाई लकव्याच्या बरोबरच मधुमेहानं ही पीडित होत्या.

महाराजांची कृपा रहावी म्हणून ही केस कसोटीची होती. या पेशंटला यश देण्यासाठी कार्पोरेशनच्या समोर त्यांच्या बंगल्यावरती जात होतो. महाराज तेव्हा 80 ते 85 वर्षाचे असतील. ते स्वतःही मधुमेहाने पीडित होते. पण त्यांची राकट शरीरयष्टी स्वतःच शिवाम्बू घेत असल्याचा निर्वाळा देत होती. महाराज ही अभिव्यक्ती धाडसी व जिद्दी होती. ‘जो बोले सो हरीकथा’ होत होती.

आपल्या मठावरती ही आपण असचं भक्तांसाठी ‘शिवाम्बू क्लिनिक’ उघडावं अशी त्यांची इच्छा दिसली, लगेच अण्णा घाटगे यांनी होकार दर्शविला. मॉलिश, उपवास, सूर्यस्नान या गोष्टी उपलब्ध झाल्या. आध्यात्मिक प्रतिष्ठा या उपचाराला अपेक्षा काय असू शकते. लगेच मी तातडीने त्यांचा अनुग्रहही घेतला. मी ही त्यांचा एक शिष्य झालो.

प्रत्येक पौर्णिमेला कणेरी मठाच्या वार्‍या करू लागलो. या पंचक्रोशी शिवाय मुंबई, पुण्याचे भक्तगण मोठया संख्येने यायचे. मठावरती लक्झर्‍यांचा तांडा रहायचा. महाराज प्रवचनामध्ये शब्दानं शब्दाचा किस काढून खल करायचे. जात-पातीचा शब्द येतो, तेव्हा ‘तू जा आत म्हणजेच समजेल जात.’ असं म्हणत असतं.

काही कालांतराने त्यांचे आणखीन एक शिष्य मला येऊन मिळाले, ते होते बाचणीचे ‘विश्‍वनाथ गावडे.’ महाराजांनी देह ठेवल्यावर थोडे काही दिवस प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला, मी बाचणीला सत्संगासाठी जात होतो. तेव्हा निर्भीडपणे भक्तांसाठी, शिष्यबंधूंसाठी मी या उपचाराची समर्थता प्रवचन माध्यमाने पटवत होतो. बाचणी हे गाव सडोली, गाडेगोंडवाडी, आरे, सावरवाडी यांच्या पंचक्रोशीत आहे. ही गावं माझ्या अ‍ॅलोपॅथीच्या प्रॅक्टीसची होती. धार्मिक अधिष्ठान मोठया महाराजांकडून मिळाल्यामुळे या उपचार पद्धतीला इथे नाक मोडणारा कोणी मनुष्य नव्हता.

जवळ-जवळ जगामध्ये शिवाम्बुच्या बरोबर प्रकर्षाने उच्चारलं जातं ते म्हणजे ‘मोरारजी देसाई’ यांचं नावं. मोरारजी देसाई म्हटले की शिवाम्बू आणि शिवाम्बू म्हटले की मोरारजी देसाई, असं जणू समीकरणचं झालं आहे. हे मीडियाने करवलं होतं. यामुळे मोरारजी देसाई यांची कुचेष्टाही झाली तरी ते लाजले नाहीत. या पॅथीच्या मात्र असलेली समर्थता त्याना लाजवू दिली नाही.

तेव्हा ते उच्च पदावरती होते त्या काळात उपचारापूर्वीचे जे म्हणून रिपोर्टस् आहेत, जो म्हणून घटनाक्रम आहे, जी म्हणून त्यांची छायाचित्रे आहेत, त्याच्या-त्याच्या नकला मी त्यांच्या पत्त्यावर पाठवित होतो. एके दिवशी त्यांनी मला कार्ड पाठविलं. त्यामध्ये उल्लेख होता, ‘हे माझ्याकडे काय म्हणून पाठवितं आहात?’ त्या काळात त्यांनी ‘केंद्रीय योग अनुसंधान परिषद’ असा एक पत्ता दिला व यांच्याकडे हे रिपोर्टस् पाठवावे असं सांगितलं.

मी माझ्या पत्रातून या पॅथीला लोकमान्यता किती आहे. या उपचारामध्ये समर्थता किती आहे? एकूण लोक रूची लक्षात घेऊन याला राजमान्यता मिळावी या अपक्षेने व आमच्या चालू कामाची व्याप्ती लक्षात येण्यासाठी मी हे आपणाकडे पाठवित आहे असा खुलासा केला.

येथून पुढे संबंधित अनुसंधान परिषद यांचेकडे पाठविले जाईल असे कळविलं. ‘सरकारी कामं नि बारा महिने थांब' त्यांच्याकडून कुठलीही पोचपावती मिळाली नाही.

एकदा कोल्हापूरच्या भागामध्ये पन्हाळा येथे काहीतरी निमित्ताने कार्यक्रमासाठी मोरारजी देसाई यांचे येणं झालं. त्या काळात त्याचं चार ओळीचं हस्तलिखित कार्ड मजकडे आलं. दि. 19 डिसेंबर 1981 रोजी सकाळी ठीक सहा वाजता रेल्वे स्टेशनावरती ते येणार त्यांनी कळविले.

कार्यक्रमांच्या संबंधित लोकांकडे संपर्क साधून वेळ निश्‍चित करा, अशी त्यात सूचना होती. कार्यक्रमाच्या मंडळींनी या आमच्या कार्यक्रमाची दखलच घेतली नाही. एकूण त्यांच्या कार्यक्रमाच्या लिस्टमध्ये ‘शिवाम्बू केंद्राला भेट’ ही आमची मागणी होती.

आज पंतप्रधान मोरारजी देसाई माझ्या ‘शिवाम्बू उपचार केंद्राला’ भेट देणार होते आणि त्याच दिवशी माझ्या धाकटया भावाचा लग्नसोहळयाचा कार्यक्रम होता. मला दोन्ही कार्यक्रमांचा मेळ घालावयाचा होता. व वेळेचाही मेळ घालायचा होता. दोन्ही गोष्टी आमच्या परिवाराच्या प्रतिष्ठेच्या होत्या. हे लग्न आमच्या घराण्यातील शेवटचे लग्न होते, प्रतिष्ठेचे होते.

19 डिसेंबर 1981, ही सकाळ उगवली.मी ठीक वेळेवरती लुनावरून त्यांचे स्वागत करायला निघालो. कपाळाला नाम ओढून लोकांच्या मोठया ग्रुपमध्ये मला मोरारजीभाई दिसले. मी त्यांच्या जवळ जाऊन हार गळयात घालून, मी शशी पाटील असल्याची ओळख दिली.

त्यांनी लगेच मला,  “तुमचा कार्यक्रम कोणत्या वेळेत ठरला आहे?”  असे विचारले.        

मी म्हणालो,  “सर! या लोकांनी माझी दखलच घेतली नाही.”

तेव्हा ते त्यांच्याकडे पाहत म्हणाले,  “तुम्हाला फोनवरून मी शिवाम्बू केंद्राच्या भेटीचा उल्लेख केला होता, तुम्ही त्याची नोंद का घेतली नाही?”

त्यांनी जाब विचारला तेव्हा ‘ही गोष्ट किरकोळ वाटली’ असे कार्यक्रमाच्या प्रतिनिधीने त्यांच्याकडे पाहत सांगितले.

त्या क्षणाला मोरारजीभाईंनी बोट करून सांगितले,  “आधी प्रथम भेट शिवाम्बू केंद्राची. मी लगेच म्हणालो, मी माझ्या लोकांना शिवाम्बू प्रेमींना चार वाजता आमंत्रित केलयं.”

तेव्हा ते म्हणाले,  “मी आताच मिळालो तर मिळालो कारण यांनी तुमच्या कामाची दखल घेतली नाही. शिवाम्बू भवन चलो.”  म्हणत ते गाडीत बसले. लवाजम्यासह ताफा निघाला. सायरन वाजू लागला. भरधाव वेगाने गाडया निघाल्या. मी ही लुनावरून निघालो. माझ्यासाठी ही इमर्जन्सी होती.

कोणतीही पूर्व तयारी घरी नव्हती. घरासमोर मांडव मात्र घातला होता. पण आमंत्रित कोणीच नव्हते. ते चार वाजता येणार होते. मोबाइल फोनचा जमाना नव्हता. काही पेशंट सकाळच्या प्रातःविधीमध्ये, आंघोळीमध्ये गुंतले होते. सौ. सरोज सफाई कामात गुंतल्या होत्या. अचानक या सगळया गाडया दारात थांबल्या. जवळच शाळा होती. शाळेची मुले स्वागताला आली. मांडव शोभा झाली. तोपर्यंत मी फोटोग्राफरला मागे बसवून वेगाने येण्याचा प्रयत्न केला. तोपर्यत मोरारजीभाई मी बसतो त्या खुर्चीवर बसलेले दिसले.

मी मोरारजीभाईंना नमस्कार केला. फोटोग्राफरने लगेच फोटो घेतला. बातचीत टेप करण्यासाठी टेपरेकॉर्डरही टेबलावरती ठेवण्यात आला होता पण तो ऑन करायचा राहिला. मी नखशिखांत खादीचे कपडे चढविले होते. त्यांना खादीच्या कपडयांचे लोक आवडतात असे त्यांच्या जवळील संबंधित लोकांनी सांगितले होते. मी त्यांच्या मर्जीत राहण्याचा प्रयत्न केला. ते जिथे बसले होते त्याच्याच मागे भगवान ओशो यांच्या पुस्तकांचा भंडार होता. ते त्या पुस्तकांची नावे पाहत होते. एक डोळा बारीक करून पुस्तके निरखत होते. मला भिती वाटत होती हे ओशोंची पुस्तके ओळखतील याची.

त्यांनी मला विचारलं,  “इथं काय-काय करता?”  ही सकाळची भेट अचानक होती.

मी त्यांना म्हणालो,  “वरच्या पहिल्या मजल्यावरती हे शिवाम्बू उपचार केंद्र आहे.”  लगेच ते उठले आणि म्हणाले,  “चला तिकडे निघू या.”

मी त्यांच्या पी. ए. ना विचारले,  “यांना शिष्टाचार म्हणून काय देण्यात यावं?”

 “फक्त नारळाची पाणी चालेल,”  असं तो म्हणाला.

लगेच नारळाचा इंतजाम केला. नारळ फोडला नी पाणी आणलं. त्यांनी ते नारळ पाणी प्राशन केलचं नाही. त्यांनी नारळ स्वतः फोडला. ते पाणी त्यांनी प्राशन केले.

आता हॉस्पिटलकडे जाण्यासाठी खडा जिना होता. तो चढायचा म्हणून मी जिन्याजवळ गेलो, तिथे मी त्यांचा हातात-हात घेण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना आधार देऊ इच्छित होतो. त्यांना वाटलं मी त्यांचा आधार घेतो आहे. त्यांनी कन्फर्म करण्याचा प्रयत्न केला,  “हा आधार तुमच्यासाठी की माझ्यासाठी?” असं त्यांनी विचारलं. मी लगेच म्हणालो,  “हा आधार तुमच्यासाठी सर!”

 “मला नि हा आधार!”  असं म्हणून माझ्या हातातला हात काढून घेत आपले दोन्ही हात मागे बांधून खडा जिना चढू लागले. ते वरती पोहोचले सुद्धा.  

त्यांना एक साबण फासलेला, आंघोळ करीत असलेला मनुष्य दिसला. ही या क्षणाची भेट अचानक होती. त्या माणसाला त्यांनी विचारले,  “अरे तू साबण कशासाठी वापरतोस? साबण आरोग्याला डाभण आहे. या तळहाताच्या रेषा भविष्यासाठी नसून मळ काढण्यासाठी आहेत.”

हा उदात्त थोर विचार, थोर मंडळीच करू जाणो.

पुढे ते म्हणाले,  “मला कमाल वाटतं याचं की, ज्यांच्या व्यवहारामध्ये क्लिनरचा ड्रायव्हर होताना दिसतो, कंपाउंडरचा डॉक्टर होताना दिसतो, शिपायाचा साहेब होताना दिसतो. दोन-चार वर्षात हे प्रमोशन मिळालेलं असतं, तीस-चाळीस पन्नास वर्षाचा जीवन प्रवास करूनही स्वास्थ्याच्या वाटा का कळू नयेत? प्रत्येकजण वैद्य का होऊ नये?”  असं त्यांचं मत होतं.

तोपर्यंत अचानक गडबडीच्या भेटीमध्ये ते मसाज विभागात आले.  “इथे शिवाम्बूचे काही प्रयोग करता असे मला काही वाटत नाही?”  असं ते म्हणाले.

मी म्हणालो,  “का सर! असे का म्हणता?”

त्या बरोबर ते उद्गारले,  “अहो इथे किती वास असायला हवा.”

मी म्हटलं,  “तुम्ही येणार आणि तुमच्या बरोबर चार लोक असणार म्हणून चोख सफाई केली आहे. वास येऊ नये याची काळजी घेतली आहे.”  त्यांच्या सोबत शेजारीच अण्णा खोचीकर, दुधगावचे बाळासाहेब पाटील असे काँग्रेसचे कार्यकर्ते शिवाम्बू उपचार घेत होते. पुरावादाखल त्यांनी आम्ही उपचारच घेतो आहे, याचा निर्वाळा दिला.

या दरम्यान त्यांनी मला काही सूचना दिल्या. मसाजच्या रूममध्ये छतापर्यंत खालीवर टाईल्स हव्यात, स्टिम वाफेची उत्तम व्यवस्था हवी, मसाज टेबल सुधारित हवा,

मी त्यांना म्हणालो,  “लवकरच तुम्हाला आणखीन बोलवणार आहे. हा निसर्ग उपचार, निसर्गाच्या सान्निध्यात जाणार आहे. तिथे उच्च कोटीची व्यवस्था करण्याचा घाट आहे.” असे म्हणून पुढच्या कार्यक्रमाच्या घाईमुळे सोबतचे लोक त्यांना घेऊन पुढे जात होते.

जाता-जाता कॉटवरच्या रूग्णांना,  “तुम्हाला काय होतयं? आणि काय करता आहात? उपवास आणि मसाज यालाच महत्त्व द्या. तुमचे सगळेच पेशंट बरे होतील. रिझल्ट उत्तम येईल”  असे म्हणून घाई-घाईत गाडीत बसले आणि नमस्कार केला. मी ही त्यांना नमस्कार केला.

अशा रीतीने शिवाम्बूच्या कामाची या निमित्ताने परमावधी गाठली. कधी नि कधी तरी माझ्या घरी माझ्या उपचार केंद्रात पंतप्रधान मोरारजीभाई देसाई हे येतीलचं माझ्या या कार्याची दखल घेतीलचं, माझे कार्य त्या प्रतीचे झालेच पाहिजे, असा माझा विलक्षण संकल्प होता. या उच्च फ्रिक्वेन्सीच्या संकल्पामुळे शेवटी त्यांना इथे यावचं लागलं. या कामामध्ये त्यांची आणि आमची भेट घालून देण्यामध्ये गिर्यारोहक युवा प्रतिनिधी मोहन हवालदार यांनी मध्यस्थी केली होती. त्यांनीच पूर्वसूचना दिल्या होत्या. त्यांनीच मार्गदर्शनही केलं होतं.

मोहन हवालदार एक कार्पोरेटर असून एक पत्रकार होते. त्यांना शिवाम्बू उपचाराने जीवनदान मिळाले होते. त्यांनी भेट घालून देण्यासाठी जीवाची बाजी लावली होती. हा उपचार केंद्र लोकमान्य व्हावा, प्रसिद्धीला यावा सासाठी वैयक्तिक, सामाजिक प्रयत्न होते. थोरले भाऊ एन. जे. पाटील यांचेही ते जिवलग मित्र होते. राजारामपुरीत दहाव्या गल्लीत यांचा निवास होता. पुढारी वृत्तपत्र विभागात ते काम करत होते. त्यांचा मित्र परिवारही मोठा होता. यानंतर मी भावाच्या सुनीलच्या लग्नाला  रवाना झालो.

मूळ परिवारातून पाच भावांपैकी आम्ही दोघे म्हणजे डॉ. एन. जे. पाटील व शशीकांत पाटील असे आम्ही दोघेचं कोल्हापूरात राहत होतो. बाकी तिघे शांतीनाथ, महावीर व सुनील कल्पवृक्ष याच कंपनीत एकत्र कष्ट उपसत होते. शांतीनाथ त्या काळात ब्रम्हचारी अवस्थेत राहणार म्हणून त्यांची एक नैतिक जैन समाजामध्ये प्रतिष्ठा होती. ते जयसिंगपूर नगरपरिषदेत नगराध्यक्ष म्हणून निवडूनही आले. शेवटचा भाऊ चि. सुनील याचे मन भूतो न भविष्यति’ असे लग्न जे. जे. मगदूम हायस्कूल या पटांगणात करण्यात आले होते. याचकाळात भूतपूर्व पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांची शिवाम्बू केंद्राला भेट ही वार्ता वृत्तपत्रामध्ये छापली गेली होती. यामुळे जो जिथे होता तो टोकावरच अग्रावरच होता, हे लोकांच्या निदर्शनास येत होते.

आधीच सगळया पेपरमध्ये मोरारजींची शिवाम्बू केंद्राला भेट अशी वार्ता होती. आणि हे लग्न तर कल्पवृक्षच्या प्रतिष्ठेच्या शिगेला पोहोचलेले. त्यामुळे साहजिकच लग्नातील लोक मला विचारत होते,  “पंतप्रधान सकाळी तुमच्या घरी आले होते आणि संध्याकाळी या लग्नाला तुम्ही हजर.”

मी म्हटलो,  “तो सूर्य आणि हा जयद्रथ! “ माझ्यासाठी होता.

मोरारजीभाईंची दुसरी भेट मुंबई येथे कांतीभाई पारेख व डॉ. जी. के. ठक्कर यांच्या निमित्ताने घडली. कांतीभाई पारेख यांचे स्वतःचे कॅम्प एरियात महात्मा गांधी रोडला पुण्यामध्ये प्रिटींग प्रेस आहे. शिवाम्बूसाठी ते विशेष उपक्रम राबवित असतात.

तो उपक्रम असा होता कि, ज्या-ज्या लेखकाने शिवाम्बू वरती पुस्तके लिहीली आहेत, ती पुस्तके प्रत्येकाच्या दहा-दहा प्रति घेऊन एक शिवाम्बू लायब्ररी त्यांनी बनवली होती. ती लोकांना वाचायला देऊन ती पुस्तके परत घेताना हे पुस्तक लोकांनी वाचले की नाही? याची पाच प्रश्‍न विचारून ते परीक्षा घेत आणि पाच प्रश्‍नाच्या उत्तरादाखल, परीक्षेत पास होणार्‍याला पाच रूपयेही देत.

अशा प्रकारची भरीव काम करणारी ही व्यक्ती मला मित्र म्हणून मिळाली होती. काळे-सावळे, उंचीने बुटक साठ एक वयाची व्यक्ती कांतीभाई पारेख ही होती. मी त्यांचा कारभार बघायला त्यांच्या घरी गेलो होतो. माझाही कारभार बघायला माझ्याही घरी ते आले होते. ते मोरारजीभाईंचे दोस्त होते. मी तुम्हाला मोरारजीभाईकडे एक दिवस नेणार. पुन्हा एकदा गाठ घालून देणार असे ते अधून-मधून म्हणत असत.

डॉ. जी. के. ठक्कर यांच्या वाळकेश्‍वर येथील निवासस्थानी मी भेटायला गेले असताना कांतीभाई पारेख मला तिथे मिळाले. त्यांनी तिघांनी मिळून ओशीयांना येथे मोरारजीभाईंच्या भेटीसाठी योजना आखली. अपॉईंटमेंट घेतली.

कांतीभाई देसाई म्हणजे मोरारजीभाईंचे चिरंजीव. यांची फोनवरून मुलाखत घेताना तुम्ही शिवाम्बूवाले तर नाही ना? असे कांतीभाईंनी विचारले.

कारण कांतीभाई देसाई शिवाम्बूवाल्यांना मज्जाव करीत असतं. देसाई परिवार हसे होणार्‍या विषयापासून अलिप्त राहावा असं त्यांना वाटत असावं. कांतीभाई पारेखने आम्ही सगळे शिवाम्बूवालेच असताना शिवाम्बूवाले नाही असे सांगून अपॉईंटमेंट मिळवली.

शेवटी चार वाजता दिलेल्या वेळेमध्ये तिघे गेलो. कांतीभाई देसाईनी आमच्यातल्या दोघांना ओळखले, हे शिवाम्बूवालेच आहेत. त्यासाठी त्यांनी रोखायचा प्रयत्न केला. त्यातूनही कांतीभाई पारेखनी गुजराती संभाषण करून प्रवेश मिळवला व आम्ही तिथे आत गेलो.

मोरारजींचा चरणस्पर्श घेतला. माथा टेकला.

मोरारजीभाईना अंगात एक बंडी, डोक्यावर टोपी शिवाय आम्ही प्रथमच पाहत होतो. त्यामुळे त्यांचे दंड स्पष्ट दिसत होते. गोरेपान त्वचा, भरीव पिळदार सलमान खानचे दंड मी पाहत होतो.

जी. के. ठक्कर माझ्याकडे बोट करून म्हणाले,  “हे कोल्हापूरचे डॉ. शशी पाटील, जे वीस बेडचे शिवाम्बू केंद्र चालवित आहेत. हे अ‍ॅक्युप्रशर चांगलेच करतात, तुम्ही कर म्हणत असालं तर तुम्ही त्यांचं अ‍ॅक्युप्रेशर घेऊन पाहावं.”

त्यावेळी ते उदास दिसले म्हणून मी विचारलं,  “तुमची इथे कुचंबना होत असेल तर मी तुम्हाला आमच्याकडे नेईन. कायमसाठी आम्ही तुमची सेवा करीत राहू, तुमच्याकडून मार्गदर्शन मिळवीत राहू.”  चि. कांतीभाई देसाई यांचा विरोध लक्षात घेऊन मी हा सवाल पेश केला होता. त्यांनी त्याचे उत्तर मौन राहूनच दर्शवलं.

त्यांची संमती मिळाल्यानंतर मी कॉटवरती त्यांना बिलगून बसलो. मूड चेंजर हा माझ्या अ‍ॅक्युप्रेशरचा एक विशेष नमुना होता. मी त्यांना तो दाखवायला सुरू केला. खांदयापासून सुरू करून मान, डोक्याची मागची बाजू, कानशिलाचा भाग, माथा यांना योग्य रीतीने अ‍ॅक्यूरेट प्रेशर देऊन सुंदर भावनेने अ‍ॅक्युप्रेशर अदा केला. त्या प्रत्येक अ‍ॅक्युप्रेशरची छायाचित्रे इकडे जी. के. ठक्कर घेत राहिले. त्यामुळे काही चित्रीकरण झालं. आम्ही त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या काळात त्यांनी राजकारणातून निवृत्ती स्वीकारली होती.  “अ‍ॅक्युप्रेशर कसं वाटलं?”  विचारलं.  “अच्छा-अच्छा बहोत अच्छा!”  अशी त्यांनी शिफारस केली.

कांती देसाईंचा तगादा होता तुम्ही जास्त वेळ घेत आहात. समय संपल्याची ते चाहूल देऊन गेले. ही अशा प्रकारची विशेष दुसरी भेट झाली. ही अशा प्रकारची अविस्मरणीय ग्रेट भेट म्हणायला हवी.

कांतीभाई देसाईंची पत्नी पुढे काही दिवसांमध्ये माळयावरून उडी घेऊन आत्महत्या केलेली वार्ता आम्ही पेपरमध्ये वाचली.

नुकताच पावसाळा संपला होता. उन्हाची तिरपी किरणं नव्यानच लोकांच्या अंगाला झोंबत होती. गणपती उत्सवाचा काळ होता. याच काळात ‘फ्ल्यू’ ची साथ गावा-गावात लोंबकळत होती. हा काळ डॉक्टरांच्या सिझनचा काळ मानला जाई. या महिना-दोन महिन्याच्या काळात खेडयातील डॉक्टर्स मिळकत करतात. बाकीच्या दहा महिन्यात ते असंभव.

बीड या गावात हरिजन वाडयामध्ये तक्क्यात काही रूग्ण समूह माझी वाट पाहत होता. मी आठवडयातून दोन दिवस त्या गावात जात होतो. तो वार होता सोमवार व गुरूवार. आज गुरूवार होता. मी तक्क्यात जाऊन बसलो. एकेक पेशंट तपासायला घेतला. लगेच औषध-गोळया देणं चालू केलं.

‘बना चोपडे’ नावाची एक मुलगी. गुडघ्यात मान खुपसून, कुबड काढून त्या तक्क्यातल्या रांगेत बसली होती. तिची पाळी आली. तिला मी सहज झोप म्हटलं. कृश शरीर, आकसलेले हात-पाय, फुगलेलं थोडसं पोट व अ‍ॅनिमिकता म्हणजेच रक्ताचा अभाव (पंडू आजार). तिचे ओठ व दात ओळखत नव्हते. दोन्हीही मला व्हाईट दिसले. जीभही दाताच्याच रंगाची. ही पोर बारा वर्षाची की चौदाची या संभ्रमात मी होतो. कारणं ती परकरं पोलक्यात होती. तिचे वजन वीस किलो असेल. तोंड सुकलेलं. मुलगी मुळात गोरी. अंगठया इतकीच वेणी मागे सुतळी बरोबर लोंबत होती.

मी तिला बिटर पिल्सच्या दोन गोळया आणि आयर्नच्या गोळयाचं पाकीट दिलं. साधारण त्यात पन्नास-एक गोळया असतील. पहिल्या दिवशी या दोन गोळया जंताच्या खा म्हणालो. आणि दुसर्‍या दिवसापासून रोज सकाळी-संध्याकाळी एक या काळया गोळया खा म्हणालो.

त्या मुलीने विचारलं,  “हे कशाबरोबर घेऊ?”

मी बोलता-बोलता कचरतच बोलून गेलो,  “हे तुझ्या मूत्राबरोबर घ्यायचयं, तू घेशील का?”

त्याबरोबर ती उद्गारली,  “मला बरं होण्याशी कारण, तुम्ही मूत्रातून सांगा किंवा ‘गू ' वातून खायला सांगा. मी रोगाला कंटाळलेय.”

सोबतचा सगळा स्त्रियांचा समूह तोंडावरती पदर घेऊन फिदी-फिदी हसायला लागला.  “काय गं बाई, औषध असलं कसलं?”

अस म्हणू लागल्या. मात्र मुलगी मला जिद्दी भेटली.

सोमवार उगवला. त्याबरोबर मी त्या गावात पुन्हा गेलो. शेतकरी मंडळी सकाळ-सकाळीच भेटतात. उधारी वसूल होण्यासाठी लोक घरात आहे तोपर्यंतच अर्थात सूर्य उगवायच्या अगोदर मी गावात प्रवेश करीत होतो. गावाच्या वेशीमध्ये माझ्या येण्याच्या काळात पाच-पन्नास लोकांचा ग्रुप मला दिसला. सगळयांचाच चेहरा सुतकी वाटत होता. त्यामध्ये बना चोपडेचा दारूडा भाऊ सदा चापडे हा जो एस.टी. चा ड्रायव्हर समोर पुढे उभा होता. ती सगळी मंडळी माझी वाट पाहत होती.

माझ्या मनात आलं, त्या पोरीचं काय बर-वाईट झालं वाटतं. ही नसती आफत हातघाईवरती येती वाटतं. मी पुढे जाऊ की नको? पुन्हा मनाचा हिय्या केला. हेतू तर माझा चांगला होता. जीवनात पडझड ही असायचीचं. मी मनाला सांगितलं, टाकं पाऊल पुढे.

मी त्या भावाला विचारल,  “कशी आहे रे बना?”

 “दावतो चलाचं!”  असं म्हणून तो पाठमोरा झाला. मी त्याच्या मागून निघालो. त्याच्या शब्दात ‘दम’ होता. आता दम समजायचा की विनम्रता हा माझा भ्रम.

समूह माझ्या मागून येत होता. माझी छातीची धडधड वाढत होती. लोक मौन अवस्थेत होते. सदा एका झोपडीत शिरला, मी ही वाकून शिरलो.

उन्हाच्या किरणांतून आत गेल्याने काळाकुट्टं अंधार नजरे समोर आला, मला काहीचं दिसेनासं झालं. थोडया वेळाने मला दिसू लागलं. दारिद्रय तर झोपडीत ठायी-ठायी लोंबकळत होतं. सदा मात्र आत निघून गेला. डोळयात काजळं भरलेली एक बाई, तान्ह्या बाळालां पाजत होती.

मी तिलाचं विचारलं,  “कुठे आहे गं बनां?”

त्याबरोबर पदराने घाम पुसत ती म्हणाली,  “म्याचं की वो बना!”

मी विचारलं,  “अग हे मुलं कोणाचं? आणि तुला हे झालं कधी?”

त्याबरोबर ती म्हणाली,  “हे मूलं माझं नव्हं का, झालं तुमच्या औसुदानं!”

मी म्हणालो,  “अगं खरचं, काय झालं सांगशील की नाही, तुझं लग्न तरी झालयं की नाही?”

त्याबरोबर चुलीपुढे भाकरी बडवत असलेली तिची आंधळी आई, जावयाचं नाव काढू नकासा ‘भाडया! बरं नसलं की माहेरला धाडतोयां!’ म्हणजे लग्न झालयं एवढा पुरावा मला पुरेसा होता.

म्हणजेच माझ्या औषधावरती संशय तर नव्हता. त्या वेळी शेजारच्या बायका आत आल्या, त्या सांगू लागल्या,  “आवं तुम्ही गोळया देऊन निघून गेलासा, जंताचं औषध तर तिनं तुम्ही सांगितलेल्या पाण्याबरोबर घेतलं. दुसर्‍या दिवशी रात्री मध्यान्हीला हागाया बाहेर पडली. उकिरडयावर गेली आणि तिथचं किंचाळली आणि त्याबरोबर आम्ही सगळी लगबगीनं कंदील घेऊन गेलो. कायं ग बाई झालं? असं म्हणत असताना त्या कंदीलच्या प्रकाशात एक लेकरू टकामका कंदीलकडे बघत असलेलं दिसलं. ही बाळंत झाली होती. मुलाच्या रडण्याचा आवाज नव्हता. आम्ही ते सुपात घेतलं व आत आलो.”

मी बनाला विचारलं,  “अगं तू गरोदर तरी होतीस का? पाळी कधीपासून नव्हती?”

सगळचं गुलदस्त्यात मला दिसलं. आधीच बना अशिक्षित, मतिमंद, वेडसर असल्यामुळे तिला यातील काहीच कळालं नाही. माहेरला येऊनचं तिला वर्ष झालं.

द्राक्षे सुकतात तेव्हा बेदाणा बनतो. बेदाणा जेव्हा ओला होतो तेव्हा तो पुन्हा द्राक्षासारखा टपोरा होतो. सेम याच तत्त्वावरती कुपोषित असलेलं पोटातील अर्भक, त्याचा बेदाण्यापासून द्राक्षाकडे प्रवास सुरू झाला. आधीच दिवस पूर्ण झाल्यामुळे मुलाच्या आकारातही पूर्णता आली होती. हे बाळ पोटात असूनही, गरोदरपणाचा आकार कसा दिसला नसेल? याचं गूढ सर्वांच्यासाठी अजूनही आहे.

मी ही गोष्ट तडीस न्यायचं ठरविलं. आज नी उद्या कोणी मला विचारलं तर मला पुरावा हवा होता. तिच्या नवर्‍याला बोलावलं, चावडीतल्या कमिटीला बोलावलं. झालेली हकिकत पंचनाम्याच्या रूपाने लिहा असं म्हणालो. आणि झाली हकिकत नवर्‍याच्या हस्ताक्षरात लिहिली गेली. ती अजूनही माझ्या दफ्तरी जमा आहे. ती खालीलप्रमाणे आहे....

बाळू चोपडे

मु.पो.वडळ,

ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर

दिनांक. 24/11/78

माझी पत्नी बनू चोपडे ही गेले वर्षभरापासून पंडया रोगाने आजारी होती. ती आपण स्वतः गरोदर असल्याचे आम्हाला सांगायची, पण आम्हाला ते मुळीच पटले नाही. पण जेव्हा डॉ. शशी पाटील यांनी माझ्या पत्नीवर शिवाम्बू उपचार केला. काही दिवसांनी ती सुखरूप बाळंत झाली, मुलगा झाला व बनूच्या तब्येतीत पण सुधारणा झाली. हे जेव्हा आम्हाला समजले तेव्हा हे काही खरे वाटले नाही. मी स्वतः जाऊन पाहिल्यानंतर मला शिवाम्बू बद्दल माहिती कळाली व या उपचारामुळे ही बरी झाली   असे कळाले. शिवाम्बू उपचारामुळे कोणत्याही प्रकारचे रोगी बरे होतात हे मला पटले.

त्या बाळाचे नांव ‘पांडुरंग’ तो आज अडतीस एक वयाचा आहे. दैत्यासारखा असणारा उंचापुरा बाप. सरकारी भारत डेअरी, इथे तो शिपाई आहे. बापाला शोभणारा मुलगाही तसाच झाला.

सासवा-सुनांचा तंटा सोडवण्यासाठी पण शिवाम्बू चिकित्सकाचा तिनं उपयोग केला. कारण इतका माझा जिव्हाळा, विश्‍वास या लोकांशी वाढला होता, मी बोलेन ती ‘हरिकथा’ व्हायची. दारूडा सदा, त्याने दारू सोडली. एकूण अशा प्रकारे बनाच्या परिवाराचा जीर्णोद्धार झाला. माझ्या नजरेतील सामाजिक स्तरावरील ‘शिवाम्बू’ थेरपीची ही पहिलीच केस म्हणावी लागेल.

ज्या गावात या उपचाराच्या उद्घोषाने मला वेडयात काढलं होतं ते गाव म्हणजे ‘पीरवाडी’ ती माझ्या ‘शिवाम्बू भवन' पासून तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे. त्या गावात माझा जम कसा बसेल. याची मला चिंता होती.

अशाच एका सकाळी-सकाळी या गावात प्रवेश केला. थंडीचे दिवस होते. थंडी कडाडून पडली होती. काही लोकांचा समूह गावाच्या वेशीतच शेकोटीच्या धगीला शेकत होता. त्यात एक मनुष्य पायाला चिंध्या बांधून कुबडया घेतलेला दिसला. नाका-डोळयावरून हा महारोगी आहे हे स्पष्ट होत होतं. मी मनात म्हटलं,  “हा माझ्या उपचाराच्या कसोटीला योग्य मनुष्य आहे. या शिवाम्बूला समाज टाकाऊ समजतात व महारोगालाही टाकाऊ समजतात. या दोन टाकाऊला एकत्र आणून टिकाऊपणा येत असला तर पाहावं अर्थात वाक्यामध्ये दोन नकार एकत्र आले तर ते वाक्यच होकारात्मक होतं. दोन टाकाऊ एकत्र करून टिकाऊपणा का नाही येणार?”  या हेतुतून मी थांबलो. हाच विषय मनाच्या ऐरणीवरती मी घेतला होता.

मी त्या समूहातील पंडित लाडला बोलावून घेतलं व मी त्याला म्हणालो,  “हे बघा, अमेरिकेत माझा मित्र आहे. औषध खात्यात तो काम करतोय. त्याने काही औषध माझ्याकडे पाठविली आहेत. ती तुमच्या पाय बांधलेल्या जखमेवर वापरू इच्छितो.”  तो लगेच माझ्या पायांच्या बोटांना स्पर्श करून म्हणाला,  “मग काय देवचं पावला की! माझी बायको वरून भाकरं टाकते आणि तुम्ही तर, डॉक्टर होऊनशान अमेरिकेचं औषध आणलयं म्हंटल्यावर....”  असं म्हणून,  “या डॉक्टर! आपण घराकडे जाऊ या.”  असं म्हणत तो पाय ओढत कुबडी घेऊन निघाला. घरात जाऊन घोंगड टाकलं. मी बसलो, तोही बसला. पायाची चिंधी त्याने सोडली.

घोटयाच्या खालील सगळाच भाग सुजून तडम झालेला. मी तळाची बाजू दाखवं म्हटलं. त्यामध्ये खोल लिंबू बसेल इतकी वाढलेली जखम होती. मी माझ्या बॅगेतून कापूस काढला. एक बाटलीही काढली. बाकी काही केलं नाही. जखम त्याचं अमेरिकेच्या औषधाने स्वच्छ केली आणि कोरडा कापूस त्या जखमेवर दाबला आणि गॉस-पीस ठेऊन नेहमीच्या डे्रसिंग पटट्ीने वेढे मारले. आणि ड्रेसिंग पूर्ण केलं.

सोबतच्या बाटलीचे टोपण उघडले, त्या बाटलीच्या तोंडावर बोटं धरलं आणि ते ड्रेसिंग चपचपीत अमेरिकेच्या औषधानं भिजवलं आणि त्याला सांगितलं,  “जस सिमेंटच्या कामावरती तीन आठवडे पाणी मारतात, तसं या बाटलीतल्या औषधानं हे ड्रेसिंग भिजवीत जा. तू हे ड्रेसिंग सुकू देऊ नकोस.”  एवढं म्हणून मी उठलो आणि तोही उठला. पाय ओढत-ओढतचं पुन्हा मला रामराम केला. या गावात मी आठवडयातून एकदा येत होतो.

पुढच्या आठवडयात मी जेव्हा याच्या घरी आलो, याचं काय झालं पाहण्यासाठी. आत त्याची आई आंघोळ करत होती. मी आवाज सोडला,  “कुठं गेला पंडित लाड?”  कारण त्या रोग्याचं नाव होत  “पंडित लाड.”

आंघोळ करतचं आई म्हणाली,  “कुठं जातोया?”  तो पर्यंत शेजारच्या घरातून ढुंगणाने सरकत पंडित हजर झाला.  “बसा-बसा डॉक्टर साहेब.”  म्हणत त्याने घोंगड सरकवलं.

मी ते ड्रेसिंग आता सोड म्हणालो,  “काय झालयं बघू या!”  त्यानं ड्रेसिंग सोडलं आणि पायाचा तळवा पाहिला, माझा मलाच धक्का बसला. हा फसवतोय का? दुसराच पाय दाखवतोय का? दुसराही पाय दाखव म्हणालो. कारण त्या पायाच्या तळव्यावरती, तिळाइतकी पण जखमेची निशाणी नव्हती. मी आश्‍चर्यचकित झालो. परमेश्‍वरानं जे घबाड मला द्यायला पाहिजे. ते घबाड त्या बिचार्‍याने मला दिलचं आहे. अशा अविर्भाबात मी त्याच्या घराचा उंबरा सोडला.

 “तू आता ढुंगणाने का रांगतोस?”  मी त्याला विचारलं.

 “ड्रेसिंगला माती लागू नये म्हणून.”  त्यानं उत्तर दिलं.

आता कुबडीपण वापरू नकोस. चालायला लाग. हा चालायला लागला. दहा वर्षे कुबडीचा सहवास केवळ दहाच दिवसांत त्याने संपविला.

मी तिसर्‍या आठवडयात पुन्हा त्या गावात गेलो. ग्रामपंचायतच्या चावडीत काही लोकांचा समूह माझी वाट पाहत होता. त्यातल्या सरपंचानं मला स्पष्टचं विचारलं,  “आमच्या मोगहातल्या पंडित लाडाला जे अमेरिकेचे औषध दिलं, तेच औषध तुम्ही ह्या आकारामाला द्या, सखारामाला द्या, या रख्माला द्या.”  कोण कंबर धरून बसला होता, कोण डोकं धरून बसला होता, कोण गुढघ धरून बसला होता.

 “अमेरिकेच औषध कोण देत नाही म्हणतोय?”  असं म्हणत मी माझ्या व्हिजीट बॉक्स मधून एक-एक बाटल्या काढल्या. प्रत्येकाकडे एक-एक बाटली दिली. दुखतयं तिथचं चोळा फक्त म्हणालो. दुखणं जर थांबल नाही तर चार पदरी कापडाच्या घडया ठेवा म्हणालो, आणि काय गंमत? दुसर्‍या दिवशी माझ्या घराकडे रीघ लागली, अमेरिकेच्या औषधासाठी.

औषधात गुण असल्याशी मतलब. कुणीचं काही शंका घेण्याचं कारण नव्हतं आणि कुणी शंका घेईल कसा? कारण झटपट परिणाम दिसत होता. अमेरिकेच्या औषधाचा! तो परिणाम अमेरिकेच्या शब्दाचा, की त्यातील औषधाचा हा शोध घ्यायचा मात्रा बाकी होता.

पिरवाडीच्या शेजारचे गाव ‘देव्हाळ' या गावातही हा आवाज पोहचला. पीरवाडीतल्या कुठल्या तरी पाहुण्यानं, आपल्या पाहुण्यांना सांगावा धाडला. गणपा पाटलाच्या आईला नुकताच लकवा झाला होता. त्याने आपल्या आईला घोंगडयात टाकलं. घोंगडयाचे चारही कोपरे पकडून पाटकुळीला लावलं व माझ्या राहत्या घरी सानेगुरूजी कॉलनीमध्ये आणलं आणि समोर घोंगड सोडलं. घोंगड सोडताच हात एका बाजूला पडला, पाय एका बाजूला पडला, मान एका बाजूला पडली, तोंडातून लाळ ओघळत होती. डोळयातून पाणी झिरपत होतं. पेशंट जमीनदोस्त झालेला.

हिला लकवा झाला आहे. तुम्ही तुमच्या कडचं अमेरिकेचं औषध द्यावं असं गणपाचं सांगण होतं. या अमेरिकेच्या औषधानं पंडित लाडाचा महारोग भुईसपाट झाला होता. मग माझ्या आईला लकवा म्हणजे किरकोळ गोष्ट आहे, अशी त्याची समज होती.

पण माझ्या दृष्टीने ही माझी परीक्षा होती. हा पेशंट माझ्या घरी ठेवून घ्यावा लागणार होता. हा तसा इनडोअर होणारा पहिला पेशंट होता. पेशंटला मी नाव विचारलं,  “आजी, तुझं नाव काय?”  हुंकारा शिवाय आवाज नव्हता. गणपानचं तिचं नाव सांगितलं,  “पार्वतीबाई”  मी म्हणालो,  “शंकर भगवानजी पण पार्वती व गणपाची आई पण पार्वतीच.”

आतापर्यत हे अमेरिकेचं औषध चोळून, लावून भागवलं होतं. आता मात्र हे प्यावं लागणार होतं. हे औषध आता झाकून कसं राहणार? हा माझ्यापुढे प्रश्‍न होता. तरीपण माझ्या सुपीक डोक्यातून एक क्लृप्ती सुचली.

मी गणपाला म्हणालो,  “चोवीस तासांमध्ये आई जितकी लघवी करते तितकी गोळा करायची, एक थेंब पण चुकू द्यायचा नाही. आणि ती मी वजन करणार आणि त्याचं वजनाचं अमेरिकचं औषध देणार.”

गणपा म्हणाला,  “काय इलाज असेल तो करा. मी सांग काम्या ओ नाम्या.”  मी पेशंटला कबूल आहे का विचारलं.

दोन खोल्यांच माझं घर. एका खोलीत पार्वतीबाईला ठेवलं आणि दुसर्‍या खोलीत सरोजिनीबाई असायची. आता माझी आणखीन परीक्षा होती. पार्वतीबाईंसाठी कॉट भाडयाने आणला.

शिवाजी पेठेतल्या ‘बलभीम बॅकेत’ तो भाडयाने मिळायची व्यवस्था होती. गणपा निघेल तसं मूत्र छोटयाशा भांडयात एकत्र करत होता. पाच-सहा तासाने भांडयाची साईज वाढायला लागली. गणपा पलिकडच्या खोलीत आणून ठेवायला लागला. ते औषध अमेरिकेचं वाटावं म्हणून चार तुळशीची पाने त्यात कुस्करून टाकली आणि दुसर्‍या स्टीलच्या जारमध्ेये घालून पाजायला द्यायला लोगलो. एकसारखं त्याचं वजनाचं अमेरिकेचं औषध ती पीत निघाली. तसं-तसं लूज मोशन सुरू झालं. अंथरूण साफ करण्यापासून गणप्या राबू लागला.

या कामासाठी गणपानं गौरा नावाच्या आपल्या बहिणीला बालावून घेतलं. धुण्याच्या कट्टयावर गौरा धुणं आदळू लागली. काम सुरू झालं. मलं सरकायला लागला. तीन दिवसाचा काळ गेला.

गौरा बाहेर धुणं धुत होती. मी शहरातून कुठून तरी घरी आलो होतो. पेशंट बेड वरती नव्हता. म्हणून मी बाहेर धुणं धुत बसलेल्या गौराला विचारलं,  “तुझी आई कुठं गेली?”  गौराला वाटलं, डॉक्टर चेष्टा करतात. गौरा लगा-बगा आत आली. खरचं कॉटवरती आई नव्हती. गौरानं मग छातीवरती हात बडवला आणि मोठयाने किंचाळत म्हणाली,  “कसलं हो तुमचं औषध आई ईरघाळली की.”

 “अगं गौरा मी इकडे आहे ग.”  आवाजाबरोबर आम्ही सगळे त्या दिशेला गेलो. तो संडासचा दरवाजा होता.  “अगं मी इथे आहे गं गौरा!”  आम्ही सगळेच संडासकडे धावलो.

गौरा म्हणाली,  “तू इथे कशी आलीस?”  तुला बगल बदलायला येत नव्हती. हात-पाय ओढायलां माणूस लागत होता आणि तू तर इथं आलीस कशी? पार्वती म्हणाली,  “अगं हे कसलं औषध दिलयं, कळत नाही. झाडाचं व्हायला लागलायां. तुला किती बरं त्रास? म्हणून मी उठायला, संडासला तरी जायला येतयं का बघीतलं.”

आम्ही तिचा दंड धरून पुन्हा बेडवरती नेण्यासाठी तिला आधार दिला. तो आधारही ती हातातून काढून घेत बेडवर जाऊन बसली.

दुपारीची वेळ होती. गणपा गावाकडं गेला होता. ही आश्‍चर्याची घटना फोनवर ऐकून गणपा पाहुण्यां-रावळयांना घेऊन आला. अमेरिकेचं औषध सर्वत्र गाजू लागलं. मध्येच पार्वती म्हणाली,  “अरं गणपा! येता-येता किटलीभरून पाणी आणं. कोल्हापूरचं पाणी बिघडलयां जणू, काढा मचूळ-मचूळ लागतोयां.”  तेव्हा मी म्हणालो,  “पाणी बिघडलं नाही, दुखण्यामुळे तुमचं तोंड बिघडलयं. तुम्हाला बाभळी आलेयं. म्हणून ते मचूळ-मचूळ लागतयं.”  आता हसावं की रडावं हा आमच्यासमोर प्रश्‍न होता.

एकसारखं लघवी पिल्यामुळे, लघवीची काँटिटी वाढत होती. सफाईचे काम वाढत होतं. दुर्गंध वाढत होता. सरोजबाईचा अबोला माझ्या लक्षात येत होता. आणखीन दोन दिवस गेले. एकूण पाच दिवस झाले.

पार्वतीबाई मला म्हणाली,  “आता मला सोडा की घरला! अजून किती दिवस मला ठेऊन घेऊन पैसा करणार हायसा?”

पार्वतीबाईंचे केस विसकटलेले होते.  “बांधा अंबाडा अन् जा घरला. अंबाडयाची गाठ घालत नाहीस तोवर घराची गाठ पडणार नाही.”  मी तिला म्हणालो. तिने उजव्या हाताने अंबाडयाची गाठ घालण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. काम चालूच राहिलं. सातव्या दिवशी मात्र ही अंबाडा बांधून दाखवू लागली, डोक्यावर पदर घेऊ लागली. गौराचं कामं हलकं होऊ लागलं. आणखीन दोनच दिवसात, म्हणजे दहाव्या दिवशी, लकवा कोणाला झाला होता? अशी म्हणण्याची वेळ आली. आम्हा सर्वानाच आश्‍चर्य वाटलं. तिला घरी सोडून द्यावं लागलं.

देव्हाळया गावातले, शेजारी-पाजारी पार्वतीला भेटायला आले. अडसरीत तिष्ठत असलेले जुने-पुराणे जीर्ण पेशंट, अमेरिकेच्या औषधासाठी मजकडे धाव घेऊ लागले.

पेशंटची वाढती संख्या पाहून मला हॉस्पिटलसाठी वेगळी जागा भाडयाने घ्यावी लागली. पाच-सहा कॉटची व्यवस्था मी केली.

दरम्यानच्या काळात एक पेशंट मजकडे आला होता. त्याचं नाव होतं सखाराम पाटील. बैलांनी दहा वर्षापूर्वी सखाराम पाटलाला मारलं होतं. दहा वर्षे झालं तो उभा राहिला नाही. अ‍ॅडमिट मात्र झाला. उपचाराच्या दहाव्या दिवशी हा ही उभा झाला.

जो पर्यंत त्याला अमेरिकेच्या औषध या टोपण नावावरच शिवाम्बू खपवित होतो. तोपर्यंत शिवाम्बूचा त्याला मागमूस नव्हता. पुढच्या सातत्यासाठी शिवाम्बूचा खुलासा होणं क्रमप्राप्त होते. केवळ दहा दिवसाचं महत्त्व विशेष रीतीने जाणवू लागलं. बाळाच्या डिलीव्हरीला जगात सर्वत्र नऊ महिने नऊ दिवस पुरेसे असतात. येथे रोगाच्या डिलीव्हरीला तरी नऊ दिवस नऊ तास पुरे झालेत म्हणायचे.

सफाईला, फरशी पुसायला एका बाईंची नेमणूक केली. ती बाई काचेच्या विस्कटलेल्या तुकडयातून चालावं तसं, चालत-चालत सफाई करू लागली. लोक डिस्चार्ज घेऊन जाताना, माझ्या बरोबरच पत्नीचाही चरणस्पर्श करू लागले. पत्नी, स्पर्श टाळण्याचा प्रयत्न करीत म्हणू लागली,  “माझ्या कशाला पाया पडतायं. मी माझ्या नवर्‍याला  विरोध करते.”

म्हातार्‍या भावरूषी बायका, “अगं तुझ्या दादल्यानं, माझ कुंकू घट्ट केलं ग, मला पाया पडू दे.”  बायको माझी घरात धुण धूत असायची, भांडी घासत असायची आणि हे लोक नमस्कारासाठी आत आलेले असायचे. हळू-हळू पत्नीलाही माझ्या उपचाराची शक्ती आकलन होऊ लागली.

सौ. सरोजला नाकाची तक्रार होती. नाक पूर्णपणे बंद व्हायचं, चोंदायचं, रात्र-रात्रभर झोप नसायची. कान, नाक, घसा याचे डॉक्टर तर घरचेच होते. आम्ही डॉ. अण्णांकडे गेलो होतो. तेव्हा माझ्या घराचे बांधकाम चालू होते. तेव्हा त्यांनी ऑट्रोव्हिन ड्रॉप्स (नाकाचे औषध) दिले होते. नाकात दोन-दोन थेंब घातल्यानंतर नाक खुले व्हायचे नंतर झोप लागायची. आठवडयाला दोन बाटल्या लागायच्या. डॉ. अण्णांनी,  “तुझ्या घराचं काम झालं की हिचं ऑपरेशन करू या, वाढलेलं हाड काढू या.”  असे मला म्हणाले होते. कामाच्या व्यापामुळे दोन-तीन महिने सर्व काही विसरलं.

एकदम माझ्या लक्षात आलं  “तुझ्या नाकाचं औषध मी आणलचं नाही. तुझ्या नाकाची तक्रार आता कशी आहे? औषधाच्या शिवाय इतके दिवस गेलेच कसे?”  मी विचारले.

तेव्हा ती म्हणाली,  “हे तुमचेचं औषध.... लोक माझ्या पाया पडून जात असल्याने मी प्रभावित झाले.”

 “तू या उपचाराला नाक मोडित होतीस, विरोध करीत होतीस आणि ह्याचं उपचारानं नाक सरळ करून घेतलस कायं? चलं, डॉ. अण्णांना दाखवू या. नेमकं काय झालं, समजून घेऊ या.”  मी म्हणालो.

आम्ही दोघेही अण्णांकडे आलो. त्यांनी नेझल फोरसेफ नाकात टाकून प्रकाशाचा कवडसा आत फेकून नाक तपासले. आणि काय आश्‍चर्य ते उद्गारले,  “कुठे ऑपरेशन करून घेतलं?”

मी म्हटल,  “विचार तुझ्या भावजयलाचं.”

 “पदरचा डॉक्टर फुकटचा असताना दुसरीकडे ऑपरेशनला जाऊच कशाला?”  सरोज उद्गारली.

 “मग नेमकं काय केलं...? कशाने हाड बाजूला झालं, हाड् हाड् म्हणून बाजूला न सरकणारं हाड ऑपरेशन शिवाय सरकलचं कसं?”  ही त्याची उत्सुकता होती.

सरोजनं माझ्याकडे बोट करून,  “भावजी! यांच्याच औषधाची ही करामत म्हणायला हवी. गळयाला हात लावून देवा शपथ्! सांगते.”

लगेच अण्णा म्हणाले,  “वैद्यकीय क्षेत्रात काय-काय आणता रे बाबानो? कर्मवीरांनी शैक्षणिक क्षेत्रात क्रांती केली, तू क्रांतीवीर नाना आहेस.”  मला भाऊ शमशूनाना म्हणायचे.

दरम्यानच्या काळात वाटयाला आलेली शेती वर्ष दोन वर्ष करण्याचा प्रयत्न केला. वाटेकरी ठेवला. हाताला काही विशेष लागत नसल्याचं पाहिलं. शेवटी मी शेती विकून बदल्यात शेत घ्यावे असे ठरविले. पंचेचाळीस हजाराला ती सदरील शेती विकली आणि पीरवाडी येथे बंगल्यापासून तीन कि.मी. अंतरावर भूमकर पेपर मिलच्या मागे, पंचवीस हजाराच्या दरम्यान एकावन्न गुंठयाची जमीन खरेदी केली.

पुईखडीच्या टेकडीवर आम्ही रोज सकाळी फिरायला येत होतो. ही माळाची जमीन हवेशीर आहे. आज नी उद्या आपल्याला बाबा आमटे सारखे ‘आनंदवन’ उभारता येईल या कल्पनेतून इथली पण जागा कोणी विकत असेल तर ती आपण घेऊ या. चौकशी सुरू केली. अडीच एकराचा तळ खोत नावाचा पीरवाडीचा शेतकरी याने विकायला काढला होता. आठ हजार रूपये एकर प्रमाणे वीस हजार खर्चून तो ही खरीदला.

क्रमश:

डॉ. शशी पाटील एक महान सेवाभावी चिकित्सक होते. 'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' हे त्यांच्या जीवनाचे ब्रीद होते. ते नेहमी निस्वार्थ व निर्मळ भावनेतून रुग्ण उपचार करायचे, त्यामुळे त्यांच्या फक्त हातालाच नव्हे तर त्यांच्या वाणीला ही गुण होता. त्यांच्या अनुभवसिद्ध उपचारांमुळे अनेक रुग्ण दुर्धर रोगातून मुक्त व्हायचे. मूलतः डॉ. शशी पाटील हे एक आध्यात्मिक साधक होते. प्रत्येक औषधोपचाराचा प्रयोग, ते प्रथम स्वतःवर करून पाहायचे. त्यांचा शिवांबू, योग, निसर्गोपचार व आयुर्वेदाचा फक्त प्रगाढ अभ्यास होता असे नाही तर ते एक उत्तम हस्त कुशल उपचारक होते. मॉलिश व ॲक्युप्रेशर यासारख्या उपचार कलेमध्ये ते निपून होते. ते एक उत्तम लेखक व कवी सुद्धा होते. त्यांनी आरोग्य विषयक अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. ते आरोग्याचा गहन विषय रुग्णांना दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणे देऊन सहजपणे पटवायचे.त्यांचे आपल्या वाणीवर चांगले प्रभुत्व होते. प्रस्तुत ‘मुळनक्षत्री - एक प्रेरणादाई जीवन-धारा’  या लेख मालिकेतून आम्ही  डॉ. शशी पाटील यांचे  ‘जीवन चरित्र’ क्रमश: प्रकाशित करीत आहोत. आज हजारो लोकांसाठी त्यांचे जीवन, नव-प्रेरणेचा स्त्रोत आहे.

Previous Post Next Post