उपचारांत सामोपचार
उपचार ! उपचारांत असं असतं तरी काय? उपचारांत अत्याचार नसतात, मोड-तोड नसते, उपचारांत तडजोड असते. उपचारांत सामोपचार असतो. ज्यात औषधांचा षोडशोपचार नसतो.
विवेक हा आयुक्तच
उपचारात असतात चार गोष्टी - युक्त आहार, युक्त विहार, युक्त श्रम व युक्त विश्राम, संपले. केवळ इतक्याच गोष्टींत सारी अरिष्टे संपलेली असतात. रोग विझलेला असतो. बेचैनी अदृश्य झालेली असते अन् आरोग्य हजर झालेले असते. या युक्त गोष्टी कळायला, मी म्हणतो, आयुक्त कशाला हवा ? ज्याचा त्याचा विवेक हा आयुक्तच की ! ...
पगड्यांच्या उठाठेवींत चूर
पण सर्वच आम्ही बेहोष आहोत. पगड्यांच्या उठाठेवींत चूर होत आहोत. करीअर म्हणतो, तिजोरीतल्या नोटा लावायच्यात म्हणतो, मुलांचे शिक्षण म्हणतो अन् दवाखान्यांच्या बिलांना, देहावरच्या आघातांना पुढे करतो अन् औषधांच्या चक्रात, तपासण्यांच्या फेर्यात, उसाशांच्या गदारोळात अडकतो.
आजची जीवनशैली
ही आहे माणसाची आजची जीवनशैली, जी रोगांची थैली ठरली आहे. कोण तरी काय करणार ? हे आहे शुक्लकाष्ट. ही ती आहे समृद्धी ! हीच आहे, आजची प्रगती !
रोग आज अशिक्षितांना असता, तर मी समजू शकलो असतो. पण...! सुशिक्षितांना, मुलांना, वृद्धांना, महिलांना, व्यापार्याला, श्रीमंतांना, गरिबांना, सर्वांना त्याने कुठेच ढिले सोडलेले नाही.
समस्येने विकलांग
रुग्णसेवेतून मला स्पष्ट कळलं की, आजच्या माणसाचे राहणीमान, संस्कृतीने प्राकृतिक ठेवलं नाही. सुविधेने समृद्ध जितका, तितका तो समस्येने विकलांग होतो आहे.
आपणही ऊर्जाच
आहाराची विविधता, पैशाची मुबलकता व मवापरा आणि फेकाफ ... म्हणे, ही गाफीलता. यानेच आरोग्याचा तोल ढासळतो आहे, ऊर्जेचा अपव्यय होतो आहे. आपणही ऊर्जाच आहोत, याकडे डोळेझाक होते आहे.
वेळेकडून दरिद्री
व्यायामाचा अभाव, स्वास्थ्याविषयी उदासीनता, संस्कृती आपली म्हणतेपण आहे, ममरावे परी कीर्तिरुपे उरावेफ, नाव महत्त्वाचे की तुम्ही महत्त्वाचे? नावाला वाचवायचे की आपल्याला वाचवायचे? जगाला दोन नंबरला ठेवून तुम्ही एक नंबरला असायलाच हवं ! तुमच्याकडे तुमच्यासाठी वेळ असायला हवा. माझ्याकडे वेळच नाही म्हणणार्याची मला कीव येते. वेळेकडून हे लोक मला दरिद्रीच म्हणावेसे वाटतात.
विद्वान; पण उलटे
बाकी, गेल्या चाळीस वर्षांनी मला हे दर्शन दिलं. मुंग्यांच्या रांगा तुम्ही पाहिल्यात का? त्या ओळीने कशा बरे जातात? कधी एकमेकांना जाता-जाता थडकतात आणि तुरुतुरू वाटेला लागतात. तशी माणसांची रांग, समस्यांना थडकत थडकत, तुरुतुरू चालू लागली आहे. मधेच उताणी पडू लागली आहे. झुरळं तुम्ही पाहिली असतील. सक्षम झुरळे पण उताणी पडली की कुचकामी होतात. पण ती सरळ करताच धूम पळतात. तशी माणसे विद्वान आहेत, हुशार आहेत, सक्षम आहेत; पण ती उलटी आहेत. मी त्यांना फक्त सुलटे करतो तेव्हा ती धूम पळत असतात. ज्याला तुम्ही उपचार म्हणता.
दुसरं काहीच करत नाही
जिथे जिथे ‘मी’ शब्द आला आहे, तिथे तिथे कृपया निसर्ग समजावे. हे मी का सांगतो? क्रेडिट मला लोक देत असतात. मोठ्या मातब्बर डॉक्टरांना रोगाने हरविलेले असते. विज्ञानाला, चारी मुंड्या चित करून रोगी, माझ्याकडे रोग घेऊन आलेला असतो. मी फक्त निसर्गाच्या नियमांचा आदर व कदर करायला भाग पाडतो. दुसरं काहीच मीकरीत नाही.
गुदमरायला होतं
पण लोक माझ्या पाया पडतात. मला हारतुरे घालतात. मी म्हणतो, हे कुठेतरी चुकतं आहे. काही प्राणी बैलगाडीच्या खालून सावलीतून जातात. त्यांना हार कशाला, त्यांना तुरे कशाला? गाडी ओढणार्या बैलांना चारा द्या, खुराक द्या, हार द्या, तो हार खायच्या आधी, त्याला तुरा द्या. मला काय म्हणून? अहो, सावली मलाच आणि हार पण मलाच! मला ज्याने गुदमरायला होतं, कुठेतरी पक्षपात होतो आहे, असं वाटतं!
प्रत्येक जण शंभरी गाठावा
मित्रहो ! तुमची पारख योग्य असू द्या, तुमचा निर्णय योग्य दिसू द्या, तुमचा पुरस्कार पात्र असू द्या, तुमची गाडी लाइनवर असू द्या, निसर्गाची गाडी आहे, ऊर्जेची माडी आहे, निसर्गाची सजा आहे. निसर्ग तसा प्रामाणिक आहे. शरीर प्रामाणिक आहे. आम्ही प्रामाणिक नाही, म्हणूनच ही केवळ अरिष्टे आहेत. अन्यथा अरिष्टांची गरजच नाही. प्रत्येक मनुष्य शंभरी गाठावा, अशीच निसर्गाची तरतूद आहे. निसर्गाने बावन्नकशी सोने दिले, आम्ही त्याला सांभाळू शकलो नाही. आम्ही त्याला लायक नाही.
उत्सर्जन ठीक नाही, म्हणूनच रोग ठळक
देहात असणारी नैसर्गिक प्रतिकारशक्ती, मी केवळ चुचकारून एकत्र केलेली असते. त्यासाठी उत्सर्जन संस्थेला कार्यक्षम केलेलं असतं. तिसरे काहीही करीत नाही. सगळ्या समस्या, सर्व रोग, कुरूपता, अशक्तता, वृद्धत्व सारे त्याचे उत्सर्जन ठीक होत नाही, म्हणूनच ते ठळक झालेले असतात.
गुन्हा कुणाचा, फाशी कुणाला?
तसा रोग हा कुणी दुश्मन नसतो. रोग मालकासाठी एक नोटीस आहे. अमुक अमुक ठिकाणी उंदीर मरून पडलाय, कुत्रा मरून पडलाय, घुशी मरून पडल्यात. यांच्या नोटिसा म्हणजे, त्या त्या अवयवाचे ते ते रोग होत. पॅनक्रियाज बिघडला - तुम्ही मधुमेह म्हणता. हृदय बिघडलं - तुम्ही हार्ट अटॅक म्हणता. कोण कुणावर अटॅक करतो. अहो, बोजा कुणाचा, खांदा कुणाचा ! गुन्हा कुणाचा, फाशी कुणाला? हृदयावरती तुम्ही अॅटॅक करता, का... हृदय तुमच्यावर करतं ! चोरी कुणाची, बोंबा कुणाच्या? चोरच कोतवालाला डाफरत असेल तर, तुम्ही त्याला काय म्हणाल?
रोगासह काट्यावर
मी प्रत्येक रोग्याला, त्याचा बोजा रोगासह काट्यावर घेऊन प्रथम तोलत असतो. उंचीच्या प्रत्येक इंचाला किलोग्रॅम धरत असतो. त्यात कमी-जास्त वजन हा त्याच्याकडून अत्याचार ठरवितो व तो अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न करतो. त्यालाच तुम्ही उपचार म्हणता...!
पडकं कुंपण
रोग काय, पशू काय, चोर काय, अतिरेकी काय, समस्या काय किंवा साथी काय; त्यांना येण्यासाठी कुंपण पडकं असेल तरच त्या, त्यावर पाय टाकत पुढे येतात. बंदोबस्ताला तोडत येण्याची प्रवृत्ती त्यांची. कुंपण तुम्ही पडके ठेवाल तर त्यांना आमंत्रणच... मआ बैल, मुझे मार.फ
मुडदासुद्धा
रोगाचा केंद्रबिंदू, भूकंपाच्या केंद्रबिंदूप्रमाणे शोधायचा झाल्यास, रोजच्या दिनक्रमाच्या त्रुटीतच तो सापडेल. त्यालाही समर्थ कारण लागते.
मेलेला मुडदासुद्धा, पोस्टमार्टेम केल्यावर काय कारण झालं मला मरायला, हे सांगतो म्हणे. मग तुम्ही आम्ही, जिवंत असताना, आम्ही रोगी का झालो? आम्हाला कळू शकायला हवं.
सफाईचं चिलखत
या अशा काळात तना-मनाची, कणाकणाची सफाई ठेवण्याची पराकाष्ठा... ही सावधानता आहे. सफाई घरादारापासून गटारी रस्त्यापर्यंत... सफाई नाका-नखापासून आतड्या कातड्यापर्यंत... सफाई अन्नपदार्थापासून मलविसर्जनापर्यंत... सफाईची कवचकुंडले होऊ शकतात. सफाईचे चिलखत होऊ शकते. सफाईचे उल्लंघन, लक्ष्मणरेषेचेच उल्लंघन. खांदा रावणाचा म्हणजेच अनंत समस्यांचा.
आला निसर्ग संपत
माणसाला वाचविण्यासाठी, तुम्ही कोणाकोणाला मारणार? कितीदा मारणार? परवा कोंबड्यांना संपवलंत. आता डुकरांना संपवणार, एकदा माकडांना संपवलंत. निसर्गही असाच संपत आला. कोंबड्यांना झाकून सकाळ व्हायची थांबणार कशी?
सफाईवर व साथीवर बोलण्याचा मला हक्क कसा? म्हणत असाल तर गेली चाळीस वर्षे विज्ञान म्हणजे विद्यमान अॅलोपॅथी, गुडघे टेकूनजिथे उभी आहे, असे रोग व असे रोगी या सफाईच्या उपचार प्रयोगांनी पूर्ववत बरे झाले आहेत. माझ्याकडे अनंत पुरावे आहेत.
प्रतिकारशक्ती पुष्ट
केवळ जीवनशैली बदलून, रोग पालथा झाला आहेे, होऊ शकतो. निसर्गाच्या नियमांचा आदर कदर करून प्रतिकारशक्तीला चुचकारले आहे. प्रत्येकालाच प्रतिकारशक्तीने पुष्ट, संपन्न होता येते.
करीअरचे कॅरीअर
हितगूज शरीराशी साधता आले पाहिजे. ज्याच्याकडून सर्व्हिस घेतो, त्यांना सर्व्हिस देताही आली पाहिजे. आजचा माणूस करीअर म्हणत म्हणत अनेक समस्यांचा कॅरीअर होतो आहे.
शंभरी ओलांडले का?
पैशाकडूनच सर्व काही खरेदी करू? ही त्याची भाबडी महत्त्वाकांक्षा आहे. स्वास्थ्य खरीदता येत नाही. अन्यथा प्रत्येक श्रीमंत, प्रत्येक डॉक्टर शंभरी ओलांडताना दिसले असते.
स्वयंवर कुठे आहे?
आज तर स्वास्थ्य सुळावरची पोळी ठरते आहे. का, तर कुणाकडेच स्वास्थ्य नाही. प्रत्येकजण काही ना काही स्वास्थ्याची कुरबूर मांडतो आहे. प्रतिकारशक्तीचे दिवाळे निघाले आहे. स्वास्थ्याला प्रतिष्ठा नाही. जावई शोधताना स्वयंवर नाही. कमीत कमी, माझी मुलगी उचलून नदी पार करणाराच, माझा जावई होईल; तरच प्रत्येकजण मेहनत घेईल. लग्न व्हायचे तर शर्त नाही. कष्टाला प्रतिष्ठा नाही.
ठायी ठायी कचरा
गाडी, माडी, धाबा ... व अतिदक्ष टेबल ही संस्कृती, ही प्रगती. असा हा प्रवास, काही सफल जीवनप्रवास म्हणता येणार नाही.
यामुळेच कुंपण पडके होते आहे. हा सर्वच प्रकार, कचराच आहे. ठायी ठायी कचरा. प्रतिकार शक्तीला आऊट करतो आहे. डोक्यापासून आतड्यापर्यंत केवळ सफाई करूया.
टांगा दुखणंं येशीला
मलविहीन तन होऊ द्या व विकारविहीन मन होऊ द्या. यासाठीच उपचार होऊ देत. प्रतिकारशक्तीच रोगाबरोबर व दुष्मनाबरोबरही निश्चितच मुकाबला करू शकते. ग्रामीण भागात मदुखनं येशीला टांगावंफ असा वाक्यप्रयोग आहे. मी त्याप्रमाणे माझी सामाजिक बांधीलकी लक्षात घेऊन, या विचारास वेस समजून, माझं दुःख (चिंतन-मनन) वाचकांसमोर टांगत आहे.
मंदिरे व शौचकूप निमित्तमात्र
अहो, प्रयत्नात उपचार तरी काय असतात? केवळ सफाई. उपचाराचं निमित्त करून केवळ सफाई, सफाई ! आधी स्थूल, मग सूक्ष्म. मग त्यानंतर अतिसूक्ष्म. अगदी मग नखापासून-नाकापर्यंत, कणाकणांपर्यंत...! नखशिखांत सफाई, अणू-परमाणूची सफाई, पेशींपेशींची सफाई, तनामनाची सफाई, विकारविहीन मन विपश्यना करतं अन् मलविहीन तन - शिवाम्बू पान करतं. याला मंदिरे व शौचकूप निमित्तमात्र होतात.
द्या आवकापेक्षा जावकाकडे लक्ष
सफाई म्हणजे तरी काय ? आवकापेक्षा जावकावर लक्ष, जावक परिपूर्ण कसे होईल. थोडक्यात, श्वासापेक्षा उच्छवासाला महत्त्व. आहारापेक्षा शौचाला महत्त्व, साधकबाधक विचारापेक्षा शून्याला महत्त्व, अमन-नमन स्थिती, पाणी पिण्यापेक्षा मूत्र विसर्जन महत्त्वाचं, घामाचा निचरा निकोप कसा कसा होईल? बस्स, याच गोष्टीवर लक्ष मी दिलं. थोडक्यात, विहिरीचे पाणी उपसणार. पाणी उपसले जाईल तर, ती विहीर जुनी असली तरी, पाणी नवे, ताजे राहील.
मित्रहो, यासाठी उपवास, एनिमा, पथ्ये, प्राणायाम, मॉर्निंंग वॉक, पोहणे, सत्संग, ध्यान, प्रार्थना, सद्सद्विवेक बस्स ! इतकंच !
‘आरोग्य’ यापेक्षा दुसरं काय असतं ?
कंदील पेटला की रोग पेटू लागतो. रोग पेटला की ऊब मिळायला लागते. ऊब मिळाली की हायसं वाटू लागतं. गारठलेला साप उबेने वळवळावा तसा माणसाचे ते अवयव जागा सोडायला लागतात. झोपलेला बसायला लागतो, बसलेला उभा राहायला लागतो, उभा राहिलेला चालायला लागतो, चालायला लागलेला पळायला लागतो. संपलं ! ज्याला तुम्ही सुधार म्हणता त्यात यापेक्षा दुसरी प्रगती काय असते !
क्रमश:
डॉ. शशी पाटील यांनी अनेको वर्षे मोठ्या जोमाने स्वास्थ्य जनजागृतीचे कार्य केले आहे. त्यांनी अनेक शहरातून, गावोगावातून. खेडोपाड्यातून 'शिवांबू, योग व निसर्गोपचाराच्या ' प्रचारार्थ महाराष्ट्रातील गावोगावी फिरून स्वास्थ्य मोहीम राबवली. त्यांनी या मोहिमेतून शकडो स्वास्थ्य सेवक व स्वास्थ्य प्रचारक निर्माण केले. प्रस्तुत लेख स्तंभातून, 'धडे धडाचे - गुद्दे मुद्द्याचे - आरोग्याचे ' या त्यांच्या मोहिमेतील व्याख्यानांचे संकलन, आम्ही क्रमश: प्रकाशित करीत आहोत..