आरोग्य का निसटावं ?
तुम्ही जे म्हणून गोळा करीत आहात, ते आरोग्यासाठीच करीत आहात ना? घरे, दारे, भिंती, गाडी, घोडी, माडी, नाडी, खोडी, इ. सर्व काही आरोग्यप्राप्तीसाठीच असते ना? शिक्षण रक्षण व्हावे म्हणूनच असते ना? मग, तरी आरोग्य कसे निसटत आहे?
तुमचा कुठेतरी गोंधळ होत आहे, असे मला तरी वाटते. तुम्हाला तर सारे काही कळते. नुकसान कळते, फायदा कळतो, तरी फायदा का नाही होत?
जे फायद्याचे अधिक, ते आधी
मला वाटतं, योग्य कामाचा क्रम लावायला आपण चुकतो आहोत. आधी काय व नंतर काय? हेच आम्हाला कळले नाही! हे ठरवितानासुद्धा, जे फायद्याचे अधिक, तेच आधी...! माझा जीव, माझं आरोग्य, याच्याशी निगडित गोष्ट कोणती? ती आधी आम्ही निवडली पाहिजे. अनेक कामांचा ढीग आहे, त्यात आधी कोणती? व्याधी कशात ?
कॉटवर चढत आहात
समजा, अनेक लोक तुमची वाट पाहत आहेत, तिष्ठत आहेत आणि शौचाची तुम्हाला भावना झाली आहे. मग तुम्ही दाद कुणाला आधी देणार? ही अशीच तुम्ही स्वतःवर अनेकदा कुरघोडी केली आहे. नंतर, नंतर म्हणत... यात अंतर देत गेला आहात. उद्या, उद्या म्हणत, मध्ये दिवस गमावला आहात; म्हणून आज दवाखान्याच्या कॉटवर चढत आहात. आखडून, जखडून, कष्टत, तिष्ठत, कुंथत बसला आहात.
सारा सारा अन्याय स्वतःवर
तुम्हाला कामाचा क्रम लावता आला नाही. आधी काय, नंतर काय कळलं नाही. बर्याच वेळा भूक असते, झोप येते, थकवा येतो, धाप असते. तुम्ही थांबलात कुठे? करीअर म्हणायचं आणि धावायचं. शेजारचा पुढे जातोय म्हणायचं आणि पुढे जायचं. बॉस म्हणायचं आणि बोजा उचलायचा. ‘आई गं’ म्हणायचं! अन् घास तोंडात कोंबायचा. सारा सारा अन्याय स्वतःवर, शरीरावर. का? तर हेच फक्त फुकट मिळालं आहे. बाकी सारं विकत.
तुम्ही सहज बघा, तुमच्या वाहनांना जो न्याय देता, तो तरी तुम्ही, तुम्हाला दिलात काय?
धनुष्य जिकडे, तिकडेच तीर
तुम्ही सततच स्वतः दोन नंबरला राहिलात. सततच तुम्ही जगाला एक नंबरला ठेवलात. आज तुम्हाला वाटत आहे, माझं आरोग्य एक नंबरचे हवे होते! कसं बरं ते होणार? धनुष्य जिकडे लावणार तिकडेच तीर जाणार ना?
खेळखंडोबा
जसे इथे शासनाचे नियम आहेत, तसे तिथल्या यमाला पण नियम आहेत. नियम शाळेला पण असतात, नियम खेळाला पण असतात; पण नियमांशी कोणी खेळतं का? खेळलो नियमांशी तर खेळखंडोबा ठरलेला. अम्पायर मआऊट, आऊटफ करणारच. दवाखान्याच्या कॉटवर बसवणारच.
शरीर प्रामाणिक आहे, निसर्ग प्रामाणिक आहे, फक्त आम्ही प्रामाणिक नाही, म्हणूनच ही झडती आमुची नडती आहे. स्वातंत्र्य काही जबाबदार्यांना चिकटून येते म्हणतात.
रोगातून सुटका होऊ शकते
मी गेली चाळीस वर्षे, सताड डोळे उघडून सर्वांना पाहत निघालो आहे. विज्ञान काय करते आहे, लोक काय करीत आहेत, आरोग्य कशाला म्हणायचे? उपचार काय काय असतात, रोग नेमका काय? खरंच रोगातून सुटका होऊ शकते की नाही ? इतके रोग आहेत तरी काय? इतके विविध तज्ज्ञ...! पैकी आवश्यक किती? पथ्यं म्हणजे काय? पथ्यं कशासाठी असतात? प्रतिकारशक्ती कशाला म्हणायचे? ही शक्ती कशी वाढविता येईल? मरण म्हणजे काय? मुडदा म्हणजे काय? वेदना म्हणजे काय? सुख म्हणजे काय? दुःख म्हणजे काय? सूज म्हणजे काय? फुग म्हणजे काय? बधीर म्हणजे काय? मूर्च्छा म्हणजे काय? मी सर्वांसर्वांवरच विचार करीत राहिलो. मी यांना समजून घेत राहिलो.
व्यावसायिकता कशाला ?
माझ्या चाळीस वर्षांच्या, कविमनाच्या चिकित्सकाला, जे वाटलं, जे दिसलं, जे भावलं, ते स्पष्टच मांडणार! यात व्यावसायिकता कशाला?
केविलवाणी स्थिती
मला आडवा माणूस उभा करायचा आहे. याला मी माझा छंद समजतो. आडवा माणूस उभा राहण्याचा, उभा होण्याचा प्रयत्न करतोय, अवतीभोवती लोकांना तो विनवणी करतोय, मला उठवायला धरा म्हणतोय! केविलवाणी स्थिती आहे त्याची...!
चाळीस वर्षे हेच केलं
खांदा, हात, डोके, पाठ यांपैकी काहीही देऊन मी त्याला उभा करणार. आडवा उभा करणं, हाच माझा छंदाचा विषय. एखाद्याला पिस्तूल छाप बिडी ओढण्याचा छंद असतो. पिस्तूल छाप म्हणजे पिस्तूल छापच...! अगदी तसे मला आडवा माणूस, म्हणजे आडवा माणूस उभाच करायचा असतो. मग तो कोणत्याही जातीचा, कोणत्याही रोगाचा, कोणत्याही वयोगटाचा, कोणत्याही लिंगाचा, कोणत्याही देशाचा असो...! तो हात करतो ना? मी हात देणार, मी केवळ चाळीस वर्षे हेच केलं.
टेंगुळासह रोगी
विज्ञानाच्या चौकटीला थडकून, टेंगुळासह आलेले रोगी, मातब्बर डॉक्टरांच्या गाठीभेटी घेऊन, फिया भरून, या उघड्या दरवाजात येतात. तेव्हा मी त्यांचं स्वागत केलेलं असतं !
जीव वाचवा
हे रोगी औषधं खाऊन, शस्त्रक्रिया करून, तपासण्या करून हतबद्ध झालेले असतात. त्यांना चैन नसते. कुणाला तरी बघून, कुणाचे तरी ऐकून, कुठं तरी वाचून, जीव वाचवायला ते आलेले असतात. जीव वाचविण्यासाठी विज्ञान जिथे गुडघे टेकते, तिथेच या उपचार दालनाचा आरंभ होतो. भारंभार पैसा, भारभार वेदना, भारंभार काळ दवडून झालेला असतो.
एकूण रोग समजून येतो
मी शांतपणे यांना प्रश्न विचारतो, कुठून बरे आलात? कुणी बरं पाठविलं? तुम्हाला काय काय त्रास आहे ? तज्ज्ञ डॉक्टर, माझे भाऊ, तुम्हाला बघून काय म्हणाले ? यातूनच मला रोग्याची अवस्था कळते. रोगाचे नाव व एकूण रोग कळतो.
त्रास मात्र कमी
मी विचारतो, आता तुम्ही खरंच बरं व्हायचं ठरवलंत का? या उपचारात थोडा त्याग आहे, कष्ट आहेत, ते घ्याल का? मी औषध देणार नाही. तपासण्याही करणार नाही; पण त्रास मात्र कमी होत जाईल.
आ बैल, मुझे मार
मी विचारतो, तुम्ही हा रोग मागवलात की कोणी पाठविला? हुशार मंडळी प्रश्नाचा रोख ओळखून स्पष्टच सांगतात, ‘मी तो मागविला साहेब ... !’ मग मी म्हणतो, इतक्या डॉक्टरांना, इतक्या औषधांना, पाडून विजयी झालेल्या रोगाला, तुम्ही मागविलात. ‘आ बैल, मुझे मार’ म्हणालात, कामाचा बैल काम सोडून आलासुद्धा ! या बैलाला आत्मविश्वासाने, केवळ निष्ठेने गांधीबाबांप्रमाणे ‘चले जाव’ म्हणायचे आहे. रोग चालता होईलच, बैल निघून जाईलच. अरिष्ट चालते होईलच, ‘तुम मुझे खून दो। मैं तुम्हें आजादी दूँगा।’ असे नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले. मी तसेच म्हणतोय, तुम्ही मला तुमचे कष्ट द्या, त्याग द्या, घाम द्या, मी तुम्हाला आरोग्य देऊ शकतो. चुकांची कबुली घेऊनच, दुरुस्ती करूनच, तंदुरुस्तीकडे जाणे मला योग्य वाटते.
स्वास्थ्याचे पैलू
स्फूर्ती, शक्ती, प्रसन्नता, निरामयता, सहिष्णुता सहनशीलता, शांती, उत्साह हे स्वास्थ्याच्या हिर्याचे पैलू आहेत. यांच्या अभावालाच मी दुःख, पीडा ही संज्ञा देतो.
स्वास्थ्य हवे सर्वांनाच
हे दागिने आपल्या सर्वांनाच हवे आहेत. तुम्हाला, मला, शेटजीला, शेतकर्यांना, विद्यार्थ्यांना, गुरुजींना, नेत्याला, अभिनेत्याला, बुशला आणि त्या लादेनलाही ! असे स्वास्थ्य आम्हा लोकांना अद्याप मिळालेले नाही, म्हणूनच ही महागाई, मरगाई, ही लढाई, हे स्फोट रक्ताचे पाट वाहवत आहेत.
कर्मे तुमची
आज समाजाचे स्वास्थ्य कोसळले आहे, माणसांचा दर्जा घसरला आहे. म्हणूनच माणूस पोहचेल तिथून निसर्ग पळ काढतो आहे. निसर्गाला माणूस व्हायरस वाटत आहे, त्यानेच डोंगर बोडके केले, नद्या गटारी झाल्या, आकाश धुरांनी घुसमटले, ग्लोबल वॉर्मिंग हजर झाले, अतिवृष्टी, दुष्काळ, जीव घेणार्या रोगांच्या साथी, स्वाइन नावाचा फाईन फ्लू आला. मग एकदा आम्ही माकडं मारली, कोंबड्या बंद डब्यांत कोंबल्या, का तर सांसर्गिक रोग माणसाला नकोत. का तर माणूस महत्त्वाचा. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे ! तुम्ही कोंबड्यांना डाळलंत म्हणून दिवस उगवायचा थांबणार का? तुमची कर्मे तुम्हाला सुटतील कशी?
देर है, मगर अंधेर नहीं
निसर्गाचेही एक कोर्ट आहे, त्याचेही काही कायदे आहेत. कायदा हातात घेणार्यांची बाकी खैर नाही. मग तो मोठा असो वा छोटा. मग... देर है मगर अंधेर नहीं। शेवटी काय, पेरणार ते उगवणारच.
योग्य गोष्टींचा मेळ
आरोग्य, आरोग्य असं असतं तरी काय? ज्यात योग्य गोष्टींचा केवळ मेळ घालायचा असतो. अर्थात अयोग्य गोष्टी नेमक्या ओळखायच्या असतात. जे मला उभं करील तेच योग्य, जे मला आडवं करील तेच अयोग्य !
स्लो पॉयझन
काही घटना, काही पदार्थ, काही कृती तत्काळ परिणाम घडवतील. काहींच्या परिणामाला काळ लागेल, वेळ लागेल; पण देर है मगर अंधेर नहीं, या उक्तीप्रमाणे...! काही विषे, काही स्फोट, काही यातना तुम्हाला तत्काळ उद्ध्वस्त करतील. काहींना उद्ध्वस्त करायला काळ लागेल. यालाच आपण मस्लो पॉयझनिंगफ म्हणतो. टाइम बॉम्ब म्हणतो.
जुंपलं भांडण
माझे गुरुजी विनोदाने कथा सांगायचे. गेंड्यासारख्या बधीर चमड्याचा मनुष्य, ज्याला प्रत्येक गोष्ट उशिराने कळायची.
बस भरली होती. काही लोक उभे होते. हाही उभा होता. बसच्या गर्दीत कुणा एकाचा पाय गेंड्याच्या पायावर पडला. तो तुडवला गेला. बिचार्याला कळायला दहा मिनिटे निघून गेली. तेवढ्यात ज्यांनी तुडवलं, तो उतरूनही गेला; पण जेव्हा त्याला तुडवल्याच्या संवेदना मिळाल्या, तेव्हा समोरच्या माणसाच्या पायावर पाय देऊन, जशास तशी, त्याने प्रतिक्रिया केली. साहजिकच कारण नसताना, हा लाथ का मारतोय? यावरून भांडण जुंपलं!
मधे वेळ नावाचा काळ
तसेच आपलेही काही गैरसमज आहेत. टाइम बॉम्बच्या काही संवेदना, टाइम गेल्यावर परिणाम घडवितात. तुम्हाला जाणकारांना किती तेे माहीत आहेत, मला माहीत नाही ! दारू, मटण, तंबाखू, चहा हे चार व मैदा, साखर, तांदूळ, मीठ व दूध हे पाच, मिळून झाले नऊ व दहावे आहे भूक नसताना घेतलेला तडस आहार. अशा या झाल्या दहा गोष्टी टाइम बॉम्ब तयार करतात. योग्य वेळ होताच स्लो पॉयझनिंग होते. अपचन, वजन समस्या, बेचैनी, रक्तदाब, वात-पित्त-कफ प्रकोप, मूळव्याध, सर्दी, मधुमेह, लकवा, हार्ट अटॅक, कॅन्सरपर्यंत अशा अनंत समस्या हे हजर करतात; पण वेळ नावाचा काळ मधे गेलेला असतो.
झुंज खात, झुंज देत
आमचे सगळे सण, सगळे उत्सव, आमचे सगळे समारंभ, आमच्या सगळ्या चैन्या, याशिवाय असतात कुठे? विज्ञानाने हा चंगळवाद आणला, समृद्धी आली, प्रगती झाली, मोबाईल आला, समस्या आल्या, ज्यांतून रोग आले, त्यातूनच डॉक्टर आले, उपचार आले. देह आपला, रणधुमाळी आपली, आहारांचा अत्याचार आपला. औषधांचा भडिमार, तज्ज्ञांचा अत्याचार, निमूटपणे शरीर मात्र सहन करीत राहतं. केवळ परमेश्वराचं, केवळ निसर्गाचं उपकरण म्हणूनच शरीर याला दाद देतं व एक दिवस मोडून पडतं. तेव्हा त्याला तुम्ही लकवा म्हणता, हार्ट अटॅक म्हणता, मधुमेह म्हणता, कोमा म्हणता, ब्लड प्रेशर म्हणता, ब्लड कॅन्सर म्हणता. अनंत गोष्टी म्हणून झाल्यावर, एक दिवस झुंज खात, झुंज देत, मरून जाता.
चुकवा तीर
मी तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही जिथे धनुष्य ठेवून बाण सोडत होतात, ते बाण कालांतराने तुम्हालाच लागत होते. बंदूक उलटी धरून चाप ओढत होतात, तेच बाण, तोच धनुष्य, तीच बंदूक मी फक्त त्यांची जागा बदलतो. ज्याने तीर चुकतात, गोळ्या हुकतात, इजा होत मात्र नाही. धनुष्याची जागा बदलताच अरिष्टे संपतात, शांती मिळते, आनंद मिळतो, स्फूर्ती येते, सहिष्णुता राहते. यालाच तुम्ही आरोग्य म्हणता, ज्याला मी योग म्हणतो. ज्याला तुम्ही उपचार म्हणता, ज्याला तुम्ही निसर्गोपचार म्हणता, ते हेच आहे.
क्रमश:
डॉ. शशी पाटील यांनी अनेको वर्षे मोठ्या जोमाने स्वास्थ्य जनजागृतीचे कार्य केले आहे. त्यांनी अनेक शहरातून, गावोगावातून. खेडोपाड्यातून 'शिवांबू, योग व निसर्गोपचाराच्या ' प्रचारार्थ महाराष्ट्रातील गावोगावी फिरून स्वास्थ्य मोहीम राबवली. त्यांनी या मोहिमेतून शकडो स्वास्थ्य सेवक व स्वास्थ्य प्रचारक निर्माण केले. प्रस्तुत लेख स्तंभातून, 'धडे धडाचे - गुद्दे मुद्द्याचे - आरोग्याचे ' या त्यांच्या मोहिमेतील व्याख्यानांचे संकलन, आम्ही क्रमश: प्रकाशित करीत आहोत..