युक्त श्रम व युक्त विश्राम
निसर्गोपचारात श्रमाबरोबर, विश्रामालाही तितकेच महत्त्व आहे, नाही का? जितक्या तासांचा दिवस तितक्याच तासांची रात्रसुद्धा...
मुलांनो, निसर्ग स्पष्ट संकेत करतो आहे. श्रम व विश्राम फिफ्टी-फिफ्टी. तुम्ही सारखे कामच करावे, खूप पैसा मिळवावा किंवा खूप उद्योगच करीत राहावे. खूप अभ्यास करावा, हा आपल्या संस्कृतीचा आदर्श आहे, मात्र निसर्गाचा नाही. विश्रामानेच श्रमाला रूप येते, विश्रामानेच श्रमाची शक्ती वाढते. विश्रामानेच झीज भरून निघते. सारे मनुष्येतर प्राणी सूर्योदयाबरोबरच कलकलाट सुरू करतात. चिवचिव चालू होते तर सांजेबरोबर शुकशुकाट. मात्र हे निसर्गाचे घड्याळ पाहायला जंगलात जायला हवं. मर्क्युरी लॅम्पखाली किंवा डांबरी रस्त्यावर ही अपेक्षा करून चालणार नाही. चुकीच्या वाटचालीने चालणारा मानवसमाज; पण त्यामुळे त्याची केवढी फजिती होते आहे?
श्वासानंतर लगेच उच्छवास घेतला जातो. श्वास हाच श्रम व उच्छवास हाच विश्राम आहे. प्रत्येक क्षणाला हा व्यापार चालू आहे. विश्रामातच सुस्कारे सोडले जातात व श्रमात श्वासाला गती द्यावी लागते. प्रत्येकाच्या एका पोटाबरोबर दोन पाय, दोन हात, एक डोके हे प्रत्येकालाच समान देण्यात आले आहे. पक्ष्याचे पिल्लू ठीक पंख फुटताच वेगळे होते, त्याचे ते खळगे भरू लागते. गायीचे वासरू पाय फुटताच धावू लागते.
पशुपक्षी स्वावलंबी आहेत. त्या प्रत्येकाला भूक पळवीत आहे. कुणीतरी आपली शिकार करील याकरिता सतत सुरक्षिततेत व सावधानतेतच त्यांचे जीवन आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्वही वर्तमानात जगताहेत. उद्यासाठी कोणाकडेच संग्रह, नियोजन व विचारही नाही.
माणूस मात्र दहा पिढ्यांची उठाठेव करीत तिरडीवर चढतो आहे. किती मिळवावं? कुठे ? सतत व्याप. देश पुढे आला पाहिजे ना... पण... स्मशान पुढे येतं.
निसर्गाचा स्पष्ट संकेत आहे. श्वासावर श्वास चढू लागला की विश्राम घ्या. छातीची धडकी, सुपलणारे पोट, धमन्यांतून वाहणारं रक्त व रंध्रारंध्रांतून फसफसणारा घाम पूर्वस्थितीला येईपर्यंत विश्रांती ही घेतलीच पाहिजे. अति सर्वथा वर्ज्य आहे. उचित श्रम उचित विश्राम हेच निसर्गाचे संकेत आहेत. रात्रपाळी, ओव्हरड्यूटी, वेठबिगार हे सारे रोग आहेत. हातापायांपासून अगदी विचारापर्यंत शून्य होणं, यालाच ध्यान म्हणतो. ध्यान परमविश्रांती आहे. शवासन हा विश्रांतीचा आदर्श नमुना आहे. जरूर थकल्या-भागल्या वेळी स्वास्थ्यप्रेमी मंडळींनी शवासन करावे, अल्पसा वेळ का असेना, जमिनीवर हातपाय पसरून अधून-मधून निश्चेष्ट, निपचित, गलितगात्र, जमीनदोस्त व्हायला हवे.
स्वावलंबन
तुमचे कपडे तुम्हीच धुवा, एक-दोन पिळे धुवायला जाऊनच तुमच्या दंडाढोपरांचं पीळ सांभाळलं जाईल. तुम्ही बसता-उठता ती जागा झाडणं, लोटणं, फरशी पुसणं याने, कंबर पाठ यांच्यासाठी व्यायामाचा वेगळा पाठ गिरवावा लागणार नाही. तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी दुसर्यावर अवलंबून राहिलात की तुम्ही अधु आहात, लुळे-पांगळे आहात, हेच तुम्ही सिद्ध करता. मलविसर्जनानंतर जर रोजच माउलीला अजुनी साफ करावं लागत असेल तर तुम्ही अजूनही कुक्कुलं बाळ आहात, हे सिद्ध होतं. कशासाठीही तुम्ही दुसर्यांवर अवलंबून राहात असाल तर, तुम्ही अधू आहात, अपंग आहात हेही का सिद्ध होऊ नये?
तुमचा घास, तुम्हाला बनविता आला पाहिजे. तुमचा बिछाना तुम्हाला टाकता आला पाहिजे, तुमचा पसारा तुम्हाला काढता आला पाहिजे. तुमचे केस, कटिंगसह सावरता आले पाहिजेत. तुमचे पायताण, प्रसंगी ठोकून ठीकठाक ठेवता आले पाहिजे.
तर तुम्ही ‘सु-शिक्षित’ होत आहात. अन्यथा शिक्षण काय कामाचे? शिक्षण प्रत्येकाला स्वावलंबी बनवते. जे शिक्षण नोकर-चाकर वाढवून, आधुनिकता वाढवून स्वत:ला गोबरगणेश बनवीत असेल, तर ते कसले शिक्षण? ती शुद्ध फसवणूक आहे. मग अशांनाच व्यायामाची गरज राहते. त्यांच्या पोटातल्या पाण्याला हलवायला मग डॉक्टर लागतो. डोळे उघडायला चिमटे लागतात. इकडून तिकडे न्यायला स्ट्रेचर लागते. हाच तो द्राविडी प्राणायम... दुसरे काय?
झोप
ही विश्रामातील परमोच्च अवस्था, जन्मापासून-मृत्यूपर्यंत एक आवश्यक असलेली गोष्ट. बालपणात झोपेचा काळ मोठा व अंतिम काळात झोपेचा काळ कमी-कमी हा निसर्गसंकेत आहे. तुम्ही नजीकच्या काळात काळझोप घेणारच असता. तेंव्हा झोप कमी-कमी होत निघालेली असते. आयुष्याचा आढावा घ्यायला, कानोसा घ्यायला निसर्ग तुम्हाला जणू उद्युक्त करतो आहे. माफक झोपेने आतड्यातील चयापचय चांगले चालते. झोप म्हणजे जमिनीशी समर्पण. धरतीमातेशी जवळीकता. दिवसभर मुलं हुंदड्या घालून, उनाडक्या करून शेवटी आईच्या कुशीत येतात, तेंव्हा ती अवश्य झोपतात. झोप म्हणजे थोडी ब्रह्मांडाशी टाळीच. झोपेचा अनादर करणारे बहुधा अनिद्रेचे शिकार होतात. आपल्या झोपेला दाद द्या - कैफ वा डुलकी पाणी मारून चेतविण्यापेक्षा डुलकी घेऊन बाजूला करा. तरच तुम्ही करीत असलेले काम परिपूर्ण कराल. नैपुण्य मिळवाल, एकाग्रता साधाल. याचा अर्थ झोपाळू व्हा असा नाही. मर्यादित झोप हवीच. झोपेचा कोटा ठरलेला, तुम्हाला दिलाच पाहिजे. रात्र जागली असेल तर दिवसा झोपून भरपाई केलीच पाहिजे. अन्यथा या थकबाक्या दवाखान्याच्या कॉटवर जमा कराव्या लागतात. श्रमाची, दिवसभराच्या ताणतणावाची खाचखळगी झोप भरून काढत असते. तेव्हा बालपणापासूनच झोपेची, अभ्यासाच्या निमित्ताने अवहेलना नको. झोप ज्या बिछान्यावर घेणार, तो बिछाना स्वच्छ हवा. चार-दोन दिवसांनी उन्हात टाकलेला असावा. गादीपेक्षा साधारण पातळ, जान सारखा बिछाना योग्य आहे. जसे रेतीमधून सायकल चालविणे कष्टाचे होते, तसे गादीवर झोपणार्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त कष्टानेच धावत राहते. शिवाय शरीर मजबूत (हार्ड) होण्याऐवजी गादीसारखे फसफशीतच झाले तर नवल का वाटावे? वातावरणाचा परिणाम तुम्हाला घेरतोच. मी म्हणतो म्हणून नव्हे, तर हा कुदरती कानून आहे.
24 तासांपैकी जिथे आपण चार-आठ तासांसाठी आडवे होणार असतो ती खोली, अडगळीची मुळीच असू नये. ठीक वायुविजन होणारी असावी, धूर किंवा दुर्गंध देणारी अजिबात नसावी. डोळे उघडताच झाडे किंवा आकाशाचे दर्शन घडविणारी जागा उत्तम समजावी. लवकर झोपून लवकर उठणे हे महाभाग्याचे आहे. जीवनात पहाट सतत हवी तर पहाटे उठावेच लागेल. सूर्योदयापूर्वी उठणार्या लोकांनीच क्रांत्या घडविल्या आहेत. व्यक्तिमत्त्व विकास पहाटे उठणार्यांच्यात चांगला झाला आहे.
उपवास
उपवास जीवनाच्या बाराखडीत महत्त्वाचा विभाग आहे. ज्याचा विश्राम या सदरात समावेश करायला पाहिजे; कारण उपवास म्हणजे बाहेरपासून आतपर्यंत परिपूर्ण विश्रांती.
उप म्हणजे जवळ व वास म्हणजे निवास. मर्यादित उपवास नक्कीच आरोग्यास जवळ करतो आणि स्वयंपाकापासून आहारापर्यंत अगदी चयापचयापर्यंत विश्राम. परिपूर्ण विश्राम.
प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी मर्यादित उपवास हा निसर्गोपचाराचा आत्मा आहे.
उपवास म्हणजे एका आहारापासून दुसर्या आहारापर्यंतचा काळ होय. उपवासामध्ये देहाची उत्सर्जन क्रिया चांगली होते. उपवासकाळात शरीराची गात्रे, रंध्रे, ग्रंथी, आतडी, वाहिन्या सार्या निकोप व सक्षम होतात.
भुकेपोटी होणारा उपवास वेगळा व स्वास्थ्यासाठी होणारा उपवास वेगळा.
उपवासात देहाची उपासमार नसते, तर रोगाची उपासमार असते. रोगपोषक द्रव्यांचा निचरा उपोषणात घडतो. जसे आपण फुरसतीच्या वेळात फावल्या वेळात अडगळीची कामे काढतो तसा देहसुद्धा, उपवासकाळात आपली पडझड स्वत:हूनच सावरू लागतो. आडव्या गोष्टी उभ्या करू लागतो. म्हणजेच दुर्लक्षित अवयवांकडे लक्ष द्यायला लागतो.
ज्ञात असलेले सर्वच पशुपक्षी, प्राणी, किट-पतंग अगदी वनस्पतीसुद्धा, आपल्या अस्वस्थ अवस्थेत उपवास या निसर्गशक्तीचा वापर सर्रास करतात व आरोग्याची उधळण होताच पुन्हा आहारासाठी धावू लागतात.
उपवास धर्म, व्रत, पूजा, पाठ याही निमित्ताने करण्यामध्ये निश्चित हाच उद्देश असतो.
उपवास या शक्तीचा यथायोग्य उपयोग करून प्रत्येक रुग्णात स्वास्थ्यानुकूल स्थिती मी हजारो रुग्णांमध्ये आलेली पाहिली आहे.
रोजचा आहार कडकडून भूक लागेपर्यंत वाट पाहून प्रत्येकाने केल्यास उपवासाची बहुधा गरजही राहत नाही; पण माणसाचा लोभ आहे व लालसेशिवाय समृद्धी ही त्याला तसे करू देत नाहीत. सारखी वारंवार पिके काढून निकस झालेली जमीन सुधरवण्यासाठी काही दिवस जमिनीसुद्धा पड ठेवतात. हा जमिनींचा उपवासच आहे किंवा रोपांचा सर्वांगीण विकास व्हावा, झाडे चांगली तरतरावीत याकरिता, माळी पहिल्या पहिल्यांदा झाडाची छोटी छोटी फळं व फांद्या मुद्दाम काढतो. किंबहुना नैसर्गिक होणारी पान, फूल, फळ गळती याच उद्देशाने होत असावी. सशक्त बाळ निपजण्यासाठी दोन पाळण्यांत अंतर ठेवा हा उपदेशसुद्धा काय सांगतो? निसर्गात सुकाळ व दुष्काळ. या दोन घटना त्या स्थळाचे भरघोस विकास साधण्यासाठीच असतात, असं म्हटलं तर तेही वावगं नाही.
मुखावर नियंत्रण
ज्यांच्या मुखावर नियंत्रण नाही, जी मंडळी सतत तुंबडी भरत असतात, अशांनी सप्ताहातून एक दिवस अवश्य उपवास करावा किंवा एक-भुक्त तरी राहावे.
कोणताही अस्वस्थ रुग्ण, आपल्या वजनाच्या प्रत्येक दहा किलोच्या पटींमध्ये 24 तासांचा उपवास बिनधोकपणे करू शकतो. उदाहरणार्थ, 40 किलो वजनाचा रुग्ण 4 दिवस, 80 किलो वजनाचा रुग्ण 8 दिवस, उपवास बिनधोकपणे पण तज्ञांच्या देखरेखीखालीच शिवाम्बू घेऊन करू शकतो.
गॅसवर शिजणार्या दुधाला जेव्हा उकळी यायला लागते, तेव्हा गृहिणी लगबग तीन गोष्टींपैकी एक गोष्ट करते. तीसुद्धा उपवासाचीच कृती आहे.
एक तर ती भांडे त्वरित उतरवते किंवा गॅस कमी करते किंवा पाण्याचे चार शिंतोडे टाकून टेंपरेचर उतरवते हे सारे तेच आहे. उपवास म्हणजे चुलीवरचे भांडे उतरवणेच होय. लक्षात घ्या म्हणजेच लक्षात येईल.
उपवासाचे शस्त्र, डोके दुखते, अंग दुखते, ताप आहे, सर्दी आहे, जखम आहे त्या त्या वेळी अवश्य वापरून पहा. पीडेचा डोंगर उतरविण्यासाठी उपवासासारखी दुधारी तलवार नाही. मला वाटते, आता उपवासाबद्दल इतके पुरे आहे.
क्रमश:
डॉ. शशी पाटील समाजातील प्रत्येक घटकासाठी स्वास्थ्य मार्गदर्शन करायचे. त्यांचा सेवा-संपर्क लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खूप मोठा होता. त्यांनी अनेक शाळा कॉलेजातून लहान मुलांसाठी व तरुणांसाठी स्वास्थ्य जागरणाचे विविध उपक्रम राबविले. त्यांनी 'जीवनाच्या बाराखड्या' या नावाचा उपक्रम लहान मुलांसाठी अनेक वर्षे राबवला, जो मोठ्यांसाठी ही खूप उपयुक्त आहे. त्यांनी या उपक्रमातून हजारो बालकांना व तरुणांना समाजामध्ये 'स्वास्थ्य रक्षक' म्हणून कार्य करण्यास प्रेरित केले. प्रस्तुत लेखस्तंभातून, 'जीवनाच्या बाराखड्या' या त्यांच्या उपक्रमातील व्याख्यानांचे संकलन, आम्ही क्रमश: प्रकाशित करीत आहोत..