काय आहेत त्या चार गोष्टी?
युक्त आहार व युक्त विहार, युक्त श्रम व युक्त विश्राम. आणखी काय? या चार गोष्टीच रोगांना पळवू शकतात. आरोग्याला खेचू शकतात. मग एक सांगा, तुम्हाला आरोग्यवान तरी व्हायचं आहे का?
युक्ततेसाठी आयुक्त कशाला?
मित्रहो, या युक्ततेतील युक्तता ओळखणार तरी कशी? पुन्हा आली का पंचाईत! यातील युक्तता ओळखायला आयुक्त (तज्ज्ञ) कशाला हवा? तुमच्या मतीला थोडी गती द्या.
श्वासावर श्वास चढतो तेव्हा थोडं थांबा. घामावर घाम येतो तेव्हा टिपा. प्रगतीच्या ढिगार्याखाली सापडला आहात म्हटल्यावर, बेताने एक-एक अंग सोडवून तरी घ्या.
युक्त आहार तुम्ही कशाला बरं म्हणणार?
तुम्ही दोन-अडीच इंचांच्या जिभेचं कशाला बरं ऐकणार? पाच-सहा फुटांच्या देहाचं ऐकणार की नाही ऐकणार? तुम्ही मायनॉरिटीला महत्त्व देणार की मेजॉरीटीला? तुम्ही जिभेला पुष्ट करणार की शरीराला? काय करायचं? आता बुचकळ्यात पडला असाल. जिभेच्या बाजूला व्हावं तरी एक आणि देहाच्या बाजूला व्हावं तरी एक. पण मित्रहो, एका बाजूला तरी तुम्हाला व्हावंच लागेल. माणूस नदीच्या दोन्ही दरडींवरून एकावेळी जाऊ नाही शकत.
मोरारजी मुद्द्याचे बोलले
मित्रहो, आपल्या देशाचे माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई एकदा माझ्या कार्यस्थळावर आले होते. माझं कार्य त्यांनी पाहिलं. आपल्या मार्गदर्शनपर उल्लेखात ते स्पष्टपणे म्हणाले,
‘मला कमाल वाटते तुम्हा लोकांची, अहो, लोकव्यवहारामध्ये, केवळ चार-दोन वर्षांमध्ये क्लीनरचा ड्रायव्हर होताना मी पाहतो आहे. कंपाऊंडरचा डॉक्टर होताना मी पहातो आहे. शिपायाचा साहेब होताना मी पाहतो आहे. मंत्र्याचा महामंत्री होताना पाहतो आहे. हे सारेच आपल्या कौशल्यावर जर बढती मिळवतात तर मग, दहा-वीस वर्षांच्या, चाळीस वर्षांच्या देहानुभवावरून प्रत्येक माणूस हा डॉक्टर का झाला नाही?’
हा त्यांचा मुद्दा मला अत्यंत महत्त्वाचा वाटला दूरगामी वाटला. स्वत:च्या देहाला काय पाहिजे, काय नाही, ते आपल्याइतके दुसरा कसा बरे जाणू शकेल?
अंदाज हवामानाचा व तज्ज्ञांचा...
तुम्हाला लागलेली तहान, तुम्हाला लागलेली भूक, तुम्हाला आलेली झोप, तुम्हाला आलेले शौच, दुसर्यांना कसे बरे कळणार? तो तुमच्या तब्येतीचा तज्ज्ञ कसा बरं होऊ शकतो?
तो जरी तुमच्या तब्येतीचा तज्ज्ञ असला तरी स्वत:च्या तब्येतीचा महातज्ज्ञ आपणच नाही का ठरणार? हृदयतज्ज्ञांना हृदयविकार, कॅन्सरतज्ज्ञांना कॅन्सर, एड्स तज्ज्ञांना एड्स, टी.बी. तज्ज्ञांना टी.बी. होतोच कसा? घरच्या आप्त-इष्ट-मित्र स्वकीयांच्या छायाचित्रांना हार घातला जातो कसा? ते प्रत्यक्ष त्यांना का पाहू शकले नाहीत? ते का जगू शकले नाहीत?
मला माझी तब्येत जितकी कळू शकते तितकी दुसर्यांची मला कशी कळू शकेल? दुसर्याचे सारेच अंदाज असतात. अंदाजपंचे दाहोदर्शे. हवामानाचा अंदाज किंवा तुमच्या देहाचा अंदाज हा कदाचित एक होऊ शकेल.
हितगुज अवयवांची (हाकेनंतर धाक)
तुमचे अवयव तुमच्याशी बोलू शकतात. हितगुज करू शकतात. संकेत सोडू शकतात. प्रसंगी रागावतात, फुगतात, सुजतात, तापतात आणि फुटतातसुद्धा. हे पहा, तुम्ही झोपलेल्या मित्रांना उठवणार कसे? हाक मारूनच ना? एक हाक दिलीत. दोन -तीन हाका दिल्यात. साला, झोपलाय का मेला? याला झालं तरी काय? तुम्ही नक्की म्हणणार. आणखी त्याच्याजवळ जाल. कानाजवळ मोठा आवाज कराल. उठला नाही तर हलवाल. गुद्दे माराल. चिमटे घ्याल. तरीही हलला नाही, प्रतिसाद दिला नाही, तर मग तुम्ही काय करणार? दवाखान्याकडे पळाल की नाही?
या गोष्टी तुम्ही तुमच्या मित्रासाठी केल्या आहेत. देहाचे अवयव तुम्हाला जाग यावी म्हणून असेच आकांडतांडव करीत असतात. पण काय करणार? तुम्ही अशी काही ताणून दिली आहे... पगड्यांच्या, करिअरच्या, बँकेच्या, प्रेस्टीजच्या उठाठेवीत तुम्ही जागे कुठे आहात? तो शंख करून उठवतोय; पण उठणार कोण?
गुडघ्याचे म्हणणे आहे - मालक-मालक, वजन कमी करा. पोटाचे म्हणणे आहे - मालक-मालक, जरा कमी खा, खांद्याचे म्हणणे आहे मालक-मालक, थोडं हला तरी. ढुंगणाचे म्हणणे आहे, थोडं उचला तरी, कड साहवेना झालाय. पहिल्या हाकेला ऐकून तुम्ही न ऐकल्यासारखं करता, आणि चालतं तोवर चालवता. मग दुसरी हाक, तिसरी हाक, मग धाक. मग झ्याक. मग लाख रुपये खर्च करूनही तुम्ही दिसतच नाही. तुम्हाला फोटोतच पाहावे लागते. ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ संस्कृती तुमची म्हणते आहे. वाह रे कीर्ती ! अन् वाह रे मूर्ती !
सासुरवाशीण सूनबाई
सासुरवाशीणसुद्धा अशीच कण्हत-कुंथत असते. सासू म्हणजे सासू. काय सांगायची सोय नाही. अहो, तांदळासारखेच खडे घेऊन तांदळात मिसळत आहे आणि मला म्हणते वेचून दे. मी आता करू तरी काय? संस्कृती तुमची असली. दादला सोडून मी पळू शकत नाही. ही काय आपली खोड सोडत नाही.
मी ठरवलं. चला, खोल विहीर पाहावी आणि एकदाचा कायमचा सोक्षमोक्ष लावावा. आणि घेतली झाली उडी संपला विषय... सूनबाई फेल झाल्या. खाष्ट सासूच्या छळामुळे सूनबाई फेल. दुसर्या दिवशी पेपरमध्ये आलं.
किडनी, हृदय, स्वादू... सारेच फेल
ठीक आहे. इकडं तुम्ही खाष्ट मालक होऊन, बेदम खाऊन आतड्याचे काम वाढवीत आहात. औषधं खाऊन किडन्यांचे काम वाढवीत आहात. नोटा मोजून, डोक्याचे काम वाढवीत आहात. जिभेला मनसोक्त स्वाद दिलात अन् मग स्वादुग्रंथी फेल केल्यात, ज्याला तुम्ही मधुमेह म्हणालात, मधुर नावं मधुमेहाला दिलीत. यानं काय फरक पडणार?
मग झाली किडनी फेल, ज्याला तुम्ही डायलेसिस करता आहात. मग म्हणाला हार्ट फेल. मग आता म्हणता सारंच संपलं. उचला आता. सगळीच मर्मस्थानं तुमची, तुमच्या अतिरेकाला त्यागून एकेक निघाली आहेत. जशी, खाष्ट सासूच्या जाचाला कंटाळून सुलक्षणी सून पण खोल विहिरीत फेल गेली.
संप, टाळेबंदी, मोर्चा, काळे झेंडे बाहेरच असतात असं नाही. तुमच्या देहातसुद्धा सतत सर्वत्र असेच राजकारण चालू आहे. तुम्ही त्याच्या हालचालींनाच, संकेतांनाच रोग म्हणता, भोग म्हणता. आणि डॉक्टरपुढे जाता. तो चार सुया लावून, आपल्या पोळीवर बिचारा तूप सोडणार. कोणी झालं तरी दुसरं काय करणार?
मातेचं मातृपण व आपलं जागेपण
बालपणी तुमच्या आईने पण असंच केलं असतं तर, पोर का रडतं? कळत नाही. भूक लागली की नाही? पाजलं का नाही? हे न पाहता दवाखान्यात नेत राहिली असती तर डॉक्टर तरी काय करणार? सारखंच रडतं म्हणता, मग झोपेचं इंजेक्शन ढोसत राहील; आणि समजा, असंच झालं असतं तर तुम्ही आज दिसला असता का? तुम्हाला तुमच्या आईचं नाव माहीत नव्हतं, जरी मुलाचं नाव ठेवलं नसलं तरी, आई आपल्या मुलाचा आवाज ओळखते. मूल आपल्या भुकेला जाणते. लागली भूक तर मूल रडून आईकडे संकेत सोडतं. बिचारी माउली लगबगीने बाळाला उराशी धरते. चुरूचुरू मूल चोखू लागलं. बाळ वाढ धरू लागतं. हीच ट्रीटमेंट तुम्ही तुमच्या अवयवांना द्यायची होती; आणि अजूनही द्या. वेळ गेली नाही. श्वास चालू आहे, तोवर त्वरा करा.
माउलीचा उपचार, हाच निसर्गोपचार
हाच आहे माउलीचा उपचार. हाच आहे निसर्गोपचार. माउलीला भूक पाहायला स्टेथॅस्कोप कशाला? बाळ झोपलं की नाही पाहायला इ.सी.जी. कशाला? बाळ उठलं की नाही हे पाहायला एक्स-रे कशाला? बाळ हसतं की नाही पाहायला सोनोग्राफी कशाला? बाळाचं हृदय चालू का बंद पाहायला कार्डिओग्राम कशाला? बाळाला उठवायला ट्रॅक्शन कशाला? आणि नाचवायला अॅक्शन तरी कशाला?
बाळ म्हणजेच मित्रहो, तुमचेच अवयव. माउली म्हणजे स्वत: तुम्ही. मालक म्हणजे स्वत: तुम्हीच आणि सून म्हणजे तुमचेच अवयव आणि सासू म्हणजेसुद्धा तुम्ही स्वत:च.
एक सदे तो सब सदे
तेव्हा आहार-विहार, श्रम-विश्राम यांना युक्ततेचा आधार द्यायचा ! अतिरेक टाळायचा. विश्राम म्हणून लोळत राहायचं नाही आणि श्रम म्हणून बैल बनायचं नाही. आहार म्हणून काहीही खायचं नाही आणि विहार म्हणून कुठेही शिरायचं नाही. हे कळलं की संपलं.
मग, ‘मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार, मीच माझा पहारेकरी आणि मीच माझा मारेकरी. माझा जन्म माझ्या हातात, माझे कर्म माझ्या हातात. माझा धर्म माझ्या हातात. माझे नशीब माझ्या हातात.’
क्रमश: