मुळनक्षत्री : एक प्रेरणादाई जीवनधारा : भाग - 3


युवकभारती

अक्षय्य तृतीयेचा दिवस होता. साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहूर्त होता. आरोग्य हाही साडेतीन हाताचा प्रश्‍न होता. शेवटी मी माझ्या गावाकडे आलो. दवाखान्यासाठी जागा शोधू लागलो. मोठं पटांगण असलेलं, जिथे माझे चुलते व आजोबा राहत होते.

त्यांच्या समोर संभुनाना यांचा पडका वाडा. त्याचा काही हिस्सा दवाखान्याला मिळाला. दाराला  ‘दवाखाना' म्हणून पाटी टांगली. एक लाकडी टेबलं ठेवलं. पेशंटला तपासण्यासाठी एक बाकवजा लांबडी टेबल खुर्ची ठेवली. आडोसा म्हणून पडदे लावले व कामाला आरंभ केला.

नारळ फुटला. डॉक्टरी व्हिजीट बॅग सायकलला लावून लोक बोलावतील तिकडे धावू लागलो. ताप, खोकल्याच्या पेशंटना, ड्रेसिंग आणि हागवण, ओकारी यावर उपचार देऊ लागलो. यामध्ये जैनेतर लोकचं जास्त होते. मोलमजूरी करणारे, वाडीभागातले, माळावरचे, धनगर वाडा, हरिजन वाडा इथलाच भरणा जास्त असायचा. गुण लोकांना येईल तसा माझा जम बसू लागला. मी गुंतून जाऊ  लागलो.

त्याच परिसरात भावकी असल्याने त्यांना हे दिसू लागलं. पॉलिशचा बूट, गळाबंद स्टार्च टिनोपाल कपडे आणि सळसळतं तारूण्य, यामुळे त्यांना आणखीन मी सलू लागलो.  ‘गोर्‍या रामूचे नातू सगळेच खोर्‍याने पैसा ओढत आहेत.' अशी भावकीत कुजबुज सुरू झाली. अशा पद्धतीने वर्षे-दोन वर्षे निघून गेले.

जेवायला आपल्याच घरी जायचो.  ‘पुरण' नावाचा राजस्थानी आचारी स्वयंपाक करायचा. तो मला महाबिलंदर वाटायचा. मी जेवायला येण्याच्या आधीच भाकरीची बुट्टी रिकामी व्हायची. माझे दोन वर्षांनी थोरले असलेले भाऊ शांतीनाथ यांची त्या काळात चलती होती. त्यांची चालबाजी चालायची. त्याच्याच इशार्‍यावरती व्यवस्था हालायची. मला प्रेमाची भूक होती. जी कुठेच मिळत नसे. त्याचीच माणसाला हाव असते.

समोरच नकात्याच्या वाडयात बालवाडी चालत होती. तेथे एक नौटंकी मास्तरीण स्मिता पाटीलच्या देहयष्टीची श्रीमती भिवसे या मुलांना धडे देत होत्या. काही शेजारची चांडाळ चौकडीतील मुले माझ्या पेशंटच्या बाकावर येऊन बसायची. ही मुल त्या बाईसाठीच शीट घालायची.

मी त्यांना एकदा म्हणालो, “असा दंगा-धोपा इथे करू नका. माझं अब्रूचं काम आहे. नाजूक आहे.”ती मुलं मला दाद देत नव्हती.

त्यांच्यात अमंगळ बोलणी होत होती. तसं हे टग्यांचेच गांव होतं. या बाईला शिंगावरती घेऊयाच. त्याही बाई गुलाबाचं फूल डोक्यात घालून बदकासारखं यायच्या हे मी पाहत होतो.

एकदा काय झालं? माझ्या दवाखान्याच्या दारात चप्पल लागून फोड आल्याचं निमित्त करून या बाई आल्या. माझ्या छातीत थोडसं धस्सं झालं. त्या वेळेस दोन-चार पेशंटही होते. पाळी-पाळीनं सर्वांना उपचार दिल्यानंतर त्या मॅडमची पाळी आली. फोड किरकोळ होता. ड्रेसिंग करून पाठवून दिलं. नंतर बालवाडीतून एक छोटी मुलगी गुलाबाचं ताज फूलं घेवून, “बाईंनी तुम्हाला दिलयं म्हणून टेबलावर ठेऊन जाऊ लागली.

या वहीवाटीनंतर एके दिवशी कण-कण ताप आल्याचं निमित्त करून दवाखान्यात कुणीच नसल्याची संधी बघून या मॅडम पुन्हा आल्या. “तुम्हाला मी रोज पाहते,”म्हणू लागल्या.

“तुमच्या विषयी गावातील लोकांकडून ऐकते आहे.” असं म्हणू लागल्या, तिची सुंदर अक्षरेही मला दिसू लागली. ती मला लग्नासाठी गळ पण घालू लागली. ती जातीने मराठा होती. प्रेम सहानुभूतीचा मी भुकेला होतो. जैन जातीविषयी थोडासा उद्वेग होता. आपले लोक आपले वाटतचं नव्हते.

मी तिला म्हणालो, “हे शक्य तेव्हाचं होईल, जेव्हा तू मेडिकल लाईनची होशील.”

तिने विचारलं, “मग त्यासाठी काय करायला पाहिजे?”

मी सांगितलं, “नर्सिंग कोर्स कर! आपण दोघे मिळून मॅटर्निटी होम काढूया.”

त्यानंतर तिने लगेच मंजूर केलं. बालवाडीच्या शाळेला राजीनामा दिला. कोल्हापूरच्या सरकारी दवाखान्यात त्या नर्सिंग कोर्सला रूजू झाल्या.

आण्णांच हॉस्पिटल त्या काळात बाजारगेट पोलिस स्टेशन इथे आलं होतं. आईच्याच नावावरती  ‘ताराबाई हॉस्पिटल' म्हणून होतं. मी तेथेही पुढे अवघड पेशंट घेऊन येत असायचो.

एके दिवशी मी त्या ताराबाई हॉस्पिटलचा जीना उतरला. एक नर्स नर्सिंग ड्रेसमध्ये समोर दिसल्या. त्या कोण? म्हणून चेहर्‍याकडे पाहिले तर त्याचं मॅडम होत्या. डयुटीवरती निघाल्या होत्या. त्यावेळेस माझ्या छातीत पुन्हा धस्स झालं. मधल्या काळात मी तिला विसरलो होतो. आता माझे मॅटर्निटी होम लवकरच निघेल याची खात्री होती. पुन्हा काही दिवस निघून गेले. दरम्यान माझी प्रॅक्टीस कुंभोजला चालूच होती.

एकदा काय झालं, माझ्या दवाखान्यासमोर माझ्या मातोश्री उभ्या होत्या. तिचा भोळा-भाबडा स्वभाव. रस्त्याने एक मनुष्य डोक्यावरती जेवणाची बुट्टी घेऊन शेताकडे निघाला होता. आईने त्याला सहज विचारलं, “जावयाला जेवण आणलं काय?”

ती बुट्टी डोक्यावरून माझ्या टेबलावर ठेवत तो म्हणाला, “किती दिवसापासून पाटलाच्या घरात मुलगी द्यावी म्हणून माझा प्रयत्न होता. तो आता तरी यशस्वी होऊ द्याच. आणि लगेच  ‘दोन घास तू खाल्लचं पाहिज' म्हणून मला दटावू लागला.”

तो होता,  ‘नाभिराज मुळे' अत्यंत गोर्‍या लोकांच कुटुंब. पण जैन समाजाने झिडकारलेलं. मूळचा सावकार पण कर्तृत्वाने कंगाल झालेलं कुटुंब. शेता-शेतात रोजगाराला जाणारे, पण ऐट यांची, थाट यांचा, काळा कोट, इस्त्रीचा शर्ट, कुचकुचीत पांढरी टोपी आणि स्वभाव चित्रपटातील निळू फुले यांच्या विशेष चारित्र्याचा, दारूबाज.... कोणालाही अटक करणारा हा बिलंदर माणूस कोणावरही कृष्ण कारस्थान रचणारा, पाताळयंत्री माणूस म्हणून गावात प्रसिद्ध होता. माझी आई म्हणत असायची, “त्यांच्या मुली बाहुलीसारख्या आहेत. मलाही नातू गोरेच होतील.” ही आईची भाबडी समज. हे ही एक नवीन कारस्थान शिजू लागले.

बघता-बघता चेष्टा करता-करता गोष्टी सत्यात उतरू लागल्या. मुळे यांचा वाडा म्हणजे काळया पहाडी दगडांचा एक जुना किल्लाच होता. अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर यादीचा दिवस ठरला. लोकांना आता करमणूक म्हणून मजा बघायची होती. लग्नात येतात तसे लोकं यादीला आलीत.

तक्क्या, गादी, लोड यांनी वाडा सुशोभित केला होता. यादीपण झाली. आई म्हणत होती,

“आतापर्यंत अशी यादी मी कोणाचीच झालेली पाहिली नाही.” या यादीत माझ्या घरचे लोक आई शिवाय कुणीच नव्हतं. भावकी मात्र पुरी उतरली होती. कारण त्यांना मजा बघायचीच होती.

इकडे माझे वडील या नव्या घटनेमुळे चिंतीत झाले होते. आधीच दुखावलेला शश्या, नाभिराज मुळे, असा त्याचा सासरा, माझं आता कसं होणारं? म्हणून सगळया शक्तीनिशी हे लग्न मोडण्यासाठी त्यांनी प्रचंड घाट घातला. जंगी प्रयत्न करण्यात आले. शेवटी त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले. त्या प्रयत्नातलाच एक भाग.

एका रात्री दवाखान्यात मी झोपलो होतो. आईचा रडण्याचा मोठा आवाज मध्यरात्री माझ्या कानी पडला, मी तसा दचकलो. पुन्हा आवाज समजून घेतला. ती म्हणत होती,

“अरे शशीकांत, मला हे सगळेच लोक मारायला लागलेत रे!” मी दरवाजा उघडला तसे चार-पाच-सहा लोक आत शिरले. “हे लग्न तू माग घ्यावसं.” त्यांनी सबुरीने सांगण्याचा प्रयत्न केला. गुरगुरून सांगण्याचा प्रयत्न केला, अगदी साम, दाम, दंड वापरण्यात आले.

मी एकच म्हणायचो, “हे लग्न झाले आहे. आता पुढचं लग्न पुढच्या जन्मी आणि तेही तुमच्याच मर्जीने होईल.”

वडील खजील होऊन म्हणाले, “अरे शशीकांत, तुझाच एक मुलगा अशा रीतीने तुझ्या मनाविरूद्ध लग्न करत असेल, तर तू काय करशील?”

मी वडिलांना म्हणालो, “जो मुलगा मला सोडून वागत असेल आणि मी जर केळी खात असेन व सगळयांना वाटत असेन. त्या सर्वांच्या पेक्षा एखादे केळ मला सोडून वागणार्‍या मुलाला मी अधिक देईन, मला माहिती आहे. केळीची अशी किंमत काय आहे? तुम्ही काय केलंत, तुम्ही सगळया केळीच्या सालीच माझ्यासमोर फेकलात. आठवतं का तुम्हाला?”

या बैठकीमध्ये भावकीतले तीन-चार लोक,स्वतः एन. जे. पाटील, त्यांचे अंतुभाई शहा ही दोस्त मंडळीही होती. प्रत्येकांनी आपले वजन वापरले होते. त्यांना ही माझी भाषा वकिली वाटली होती. त्यांनी समज काढण्याचा प्रयत्न केला.

मी एका शर्तीवरती हे लग्न मागे घेईन म्हणालो, “मी या परिवाराचा आहे की नाही? ही शंका मला दूर करायची होती. इतर मुलांच्या प्रमाणे शशीकांतही माझाच आहे व तो इतरांप्रमाणेच माझ्या वरस हक्काला पात्र आहे. हे प्रॉमिसरी नोटवर लिहून द्यायला तयार व्हाल का?” हे मला एक आमिष होते.

ही पण सुंदर अक्षराची, अनेकदा मला प्रेमपत्र लिहिणारी, दादा म्हणणारी, बेबी-नंदासारखी दिसणारी, या सगळयाचं गोष्टी जमेला नसल्याने, मी हरकत नसल्याचे सांगितले.

ही सगळीच मंडळी कार घेऊन बोलणी करायला भोसेगावला गेली. त्याचं दिवशी त्या मुलीच्या यादीचा समारंभ त्याच क्षणी चालला होता.

 ‘अलभ्य लाभ! योग्य वेळेवरती तुम्ही लोक आलात' असं इंदूच्या वडिलांनी स्वागत केलं. आम्ही का आलो होतो...? हे त्यांना सांगताचं आलं नाही. चढत्या वेलीला चढवायचचं असतं हा विषय शेवटी गुलदस्त्यातच राहिला.

तो पर्यंत माझे कुंभोज गावतून अपहरण करून मला अज्ञात स्थळी आणलं होतं. तो दादा चांभाराचा गोठा होता आणि  ‘कोगे’ हे गाव होते. ही मुस्कटदाबी होती का दादागिरी होती हा माझ्या समोर प्रश्‍न होता.

“तू येथेच प्रॅक्टीस करावीस, मी आठवडयातून एकदा येत जाईन, तुझ्या प्रॅक्टीसला गती देईन.”  डॉ. भाऊ मला म्हणाले.

त्या गावात भावांचे मित्र लोक पण होते. सुधाकर, मधुकर, कोठावळे परिवार, गांधीवादी लोक त्या काळात  ‘नयन कोठावळे' हे करवीर सभापती होते. त्यांच्याच हस्ते माझ्या दवाखान्याच्या उद्घाटनाची फीत कापण्यात येऊन कोग्याच्या दवाखान्याची वार्ता  ‘सत्यवादी' वृत्तपत्रात फोटोसह छापून आली सुद्धा.

त्याच दिवशी एक अपघात झाला होता. मांगोरे गवळयाचा मुलगा आठ-दहा वर्षाचा बाजीराव न्हाव्याकडून केस कापून घेत असताना त्याच्या टपोर्‍या गालावर कानाच्या समोर कट मारताना कोंबडयाच्या झुंजीतील एक कोंबडा उडून न्हाव्याच्या वस्ताराच्या मुठीवर आस्कमिक येऊन थडकल्यामुळे तो वस्तरा मुलाच्या गालात घुसला होता.

माझ्या दवाखान्याच्या उद्घाटनादिवशीच ती केस माझ्या टेबलवरती आली. मी त्याला तोंडात आत चार टाके आणि बाहेर चार टाके टाकून उपचार दिल्यामुळे हा डॉक्टर नाही सर्जन आहे असा गवगवा कोग्यात झाला.

अशा रीतीने कुंभोजच्या घटना व कुंभोजला विसरण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला व शेवटी माझ्या लग्नाचा विषय लोंबकळतच राहिला.

मी मनात ठरविलं, काय तरी होऊ देलं, घरचे लोक करतील तसे करू देत. त्यांनीच ठरवू देत. लग्न कोणाशी करायचे आणि केव्हा करायचे ते?

एकदा कोग्याहून आईला भेटायला जयसिंगपूरच्या परिवारात आलो होतो, तेव्हा सुनील हा धाकटा भाऊ पाच-सहा वर्षाचा असेल. त्याला शिकवणी करायला एक मुलगी येत असे. “ही मुलगी तुला चालतेय का बघ?” आई व मी कॉटवर बसलो असताना आई मला कोपरखळी लावून म्हणाली.

नाकी-डोळी तशी नीटस होती पण सावळी होती. “काहीतरी कर” असं मी म्हणालो. मला तर लग्नात इंटरेस्ट राहिला नव्हता. एकूण झालेल्या घटनांमुळे मी पस्तावलो होतो. आई पुढे म्हणाली,

“मुलगी आमच्या जातीची आहे. आमच्या नजरेतल्या लोकांची आहे. तिचे वडील  ‘नटवालाल चंदूलाल शहा’ या वखारीत विश्‍वासपात्र हेड दिवाणजी आहेत.” त्यांचा चेहरा व नेहरूंचा चेहरा काही अंशाने साम्य होते. सालस, सोज्ज्वळ असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं.

कोरगावकरांच्या चाळीतल्या कोपर्‍यातले दुकानदार  ‘अलगोंड पाटील' यांनी मध्यस्थीच्या बोलणीला आरंभ केला.

बोलणी यशस्वी होण्याची चिन्हे दिसू लागली. यादीची तारीख ठरली. रीतसर पाहण्याच्या बैठका होऊ लागल्या. पैकी एका बैठकीत मी त्या मुलीच्या वडिलांना विचारले,

“तुमच्या मुलीला व तुम्हाला, मला पोलिओ झाला आहे, हे माहित तरी आहे का? नाहीतर मी माझा पाय गुडघ्यापर्यंत उघडा करून दाखवतो तरी?”

तेव्हा ते म्हणाले, तू मला लहानपणापासून माहीत आहेस. मी तुमच्या घराण्याला ओळखतो. तू इथे काय पाय दाखवू नकोस.

सोबत माझी बहीण जयश्री पाटील, ही त्या मुलीची वर्गमैत्रिण होती. त्या बैठकीत तिने स्पष्टचं विचारलं, “काय ग सरोज, माझा भाऊ तुला पसंद आहे का?” तिने हुंकार भरला. त्या हुंकारात राग होता की अनुराग होता, यात मी तरी गोंधळून गेलो.

त्या मुलीचे वडील सज्जन व प्रामाणिक असल्याने आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्यांच्या पदरी तीन-चार मुली होत्या. ही त्यातली ज्येष्ठ मुलगी. तिही शिकवण्या करून वडिलांच्या मिळकतीला हातभार लावत होती. तिचेही आईच्या आजोळाचे  ‘उदगाव' गाव होते आणि तेही पाटीलचं.

होऊ घातलेल्या सासर्‍यांच नाव  ‘बापूसाहेब बाळगोंडा पाटील.' हे खुद्द दोनोळी-कोथळीचे. मी स्पष्टच त्यांना सांगून टाकल होतं हुंडा म्हणून काही द्यायचा नाही. अति खर्चाच्या भानगडीत पडायचं नाही. तरीपण त्यांनी हौस-मौज केलीचं.

स्वकर्तृत्वावर कमवणार्‍या माणसाला फुकटचा पैसा नको असतो. लग्नाची सर्व जबाबदारी वर पक्षाने स्वीकारली. मी या काळापर्यंत बँक बॅलन्स साधारण तीन हजारापर्यंत केला होता. या वेळेला माझे वय पंचवीस झाले होते. लग्नाला मी बँक बॅलन्स घेऊनच आलो होतो. वडील व कारभारी भाऊ शांतीनाथ यांनी आपल्या प्रतिष्ठेला शोभेल अशा थाटामाटात लग्न केले. उदगाव-जयसिंगपूरच्या मध्ये  ‘कुंजवन' म्हणून क्षेत्र आहे. तेथे लग्नसोहळा उरकला. 6 डिसेंबर 1968 या दिवशी एकदाची सप्तपदी समाप्त झाली.

कारभारी भाऊ, “तुझ्या लग्नाचा खर्च तूच केला पाहिजेस.” असे म्हणाले होते. मी म्हटलं, “ठीक आहे.”  नवरी मुलीसह वाजत-गाजत मी घरी आलो. आहेर-माहेर यांच्यात मला इंटरेस्ट नव्हता. माझा बँक बॅलन्स लग्नात पूर्णपणे संपला.

मी त्या काळात माझी प्रॅक्टीस  ‘गणेशवाडी' नावाच्या, त्याचं टोपणनाव  ‘करपेवाडी' या गावाच्या डोंगरावर चालू होती. हा संपूर्ण भाग दुर्गम होता.

मी ज्या-ज्या भागात प्रॅक्टीस केली. त्या-त्या गावात मी रोग लोटतो आहे हा समज असायचा. गावचा कचरा गोळा करतो आहे. वर्षे-सहा महिन्यानंतर आता येथे कचरा राहिलचं कसा? मग इथे राहण्यात अर्थ नाही. अशी समज करून घेत होतो.

नजीकच असलेल्या गावात शिरत होतो. कांग्याच्या जवळ असलेलं गावं म्हणजे  ‘बहिरेश्‍वर' हा सगळा कोल्हापूरच्या पश्‍चिमेचा भाग त्याला आमचे लोक कोकणच समजत होते. त्याकाळी पांडुरंग पुजारी यांच्या घरी लग्नाच्या आधी वर्ष-सहा महिने मी प्रॅक्टीस करत होतो.

सुरूवातीला प्रॅक्टीस तुफान असायची. वर्षे-सहा महिन्यांनी मंद व्हायची. अस भटक्या जमातसारखं मी पुढे सरकत होतो.

प्रत्येक गावात, प्रत्येक ठिकाणी ताई, आक्का, मामा, काका, दादा या शब्दांनी आपुलकी साधत, सोपा, माजघर, स्वयंपाकघर व परसदार कुठेच मला मज्जाव नव्हता. सगळयांच्या गळयातला ताईत बनण्याचा माझा प्रयत्न चालू असायचा.

नव्या सुनबाईला घेऊन आईने ठरवलं, शशीचे ठिकाण एकदा बघून तरी यावं आणि सुनबाईची शिस्त लावून यावं. आईच्या प्रपंचामध्ये ज्या दोन-दोन गोष्टी होत्या. त्यातील एक-एक अति आवश्यक असलेल्या गोष्टी तिनं गाठोडयात बांधल्या. मी पाहत होतो. ती काय भरत होती. एक काडेची पेटी, एक पोळपाट, एक तवा, एक घागर, एक परात व लग्नाचे चार कपडे. एवढचं तिनं गाठोडयात बांधलं व म्हणाली, “चल आता.”

आम्ही तिघेजण स्टेशनवरती आलो. रेल्वेनं प्रवास हातकणंगले पर्यत केला. तो पर्यत कारभारी भाऊ शांतीनाथ याला आईने गाठोडयातून,  ‘इथून काय बर नेलं असेल?’ याचा तपास लावायचा होता. तो मोटर सायकल वरून पाठलाग करीत स्टेशनवर आला आणि आईकडील गाठोडे हिसकावून परतला. “हे कुठ घेऊन चाललीस?”  ते गाठोडे घेऊन तो जयसिंगपूरला गेला. आई रडू लागली. आईला मी म्हणालो, “आम्हाला काही कमी नाही. तू काही रडू नकोस.”

त्या दुर्गम खेडयात ताई, अक्का, मामा म्हणूनच संबंध जोडले होते. हा जरी मागासलेला अशिक्षित भाग असला तरी प्रेमाने श्रीमंत होता. आमची अप्रूप होत होती. आमचं स्वागत झालं. शेजार्‍याकडून घागर, तवा, पोळपाट, लाटणं मागून आणलं.

तीन दगडावरती चूल मांडून आम्ही नवा प्रपंच चुलीवर ठेवला. जे होतं नव्हतं ते पोतं, घोंगड, चादर ते अंथरलं व पहिला दिवस सरकला. बायकोच्या कष्टाचीच पहिली ओळख अशी झाली. विहिरी, आडातून पाणी खेचायचे. त्या जागेची सफाई करायची. भिंती लिपून सारवणं केली. त्याच डोंगरावर छोटया-छोटया ज्या वस्त्या होत्या, जी आठ-दहा गावे होती. तिथं वैद्यकीय सेवा देणारा डोंगराळ भागात मी एकटाच होतो.  ‘हिमालय की गोद में ' सारखीच थोडक्यात अवस्था होती.

त्या पिक्चरमधील डॉक्टरची भूमिका मजकडे होती. तिथली प्रजा मला राजा समजत होती. मी त्यांना त्या लोकांना तळहाताच्या फोडासारखा जपत होतो.

आईने चार दिवसात अंदाज घेतला आणि यांची आता काही काळजी करायचं कारणं नाही, असं समजून बिनधास्त होऊन आई आपल्या ठिकाणी परतली. आईने, आईचे कर्तव्य पूर्ण केले.   

आसपासची गावं बीड, सावरवाडी, बहिरेश्‍वर, म्हारूळ इत्यादी गावागावांतून, घराघरातून फिरून दवा घरपोच करणारा मी डॉक्टर होतो. औषधाचा परिचय होता. कंपाउंडर या कामाची कला चांगली अवगत होती. त्यामुळेच तर ते लोक मला डॉक्टर म्हणत असतं. तसं एस. एस. सी. नंतर माझ शिक्षण थांबलचं होतं.

वैद्यकीय शिक्षण तसं कोणतचं नव्हतं. आर.एम.पी. म्हणा हवं तर.  ‘रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर' या संस्थेचा मी एक सदस्य होतो. मात्र टाके घालण्यापासून सलाइन लावण्यापर्यंत, डिलीव्हरी पासून ड्रेसिंग करण्यापर्यत मी सारीच कामे हातावेगळी करत होतो. आपतकालीन परिस्थितीत योग्य ठिकाणी पेशंटना पाठवत होतो. डॉक्टर वाटाव म्हणून रूबाबात राहत होतो. पावसाळयात चिखल-पाण्यातून वाट तुडवीत होतो. आपुलकी राहावी म्हणून गोड बोलत होतो.

जेव्हा मी सावरवाडी या गावामध्ये घराघरात फिरून वैद्यकीय प्रॅक्टीस करत होतो. त्याच वेळेला  ‘श्रीयुत महादेव जाधव' हा एक सधन शेतकरी आणि अभ्यासू गृहस्थ माझ्या नजरेला पडला. कपाळाला भस्माची बोटे दिसत होती. रोज सकाळी पोथीपुराण, फोटो यांना बत्ती-उदबत्ती दाखवत असायचा. एका फोटोला तो ओवाळत असताना मी तेथे पोहोचलो,

 “महादेव हा कोणाचा फोटो आहे?”  तर त्याने त्यावेळेला बीडचे शंकरभाट महाराज माझे गुरू आहेत, त्यांची भविष्यवाणी फारच तंतोतंत वस्तुस्थितीशी जुळणारी असते. हे भविष्यपटू आहेत. असं मला सांगितलं.

 “आता हे सध्या कुठे असतात?”  मी विचारले.

तेव्हा त्यांनी सांगितलं ,  “हे मुंबईला असतात.”

मी म्हणालो,  “भविष्य वर्तवण्यासाठी त्यांना काय हवं असतं? कोणता मजकूर महत्त्वाचा आहे?”

तेव्हा ते म्हणाले,  “जन्मतारीख व जन्माची वेळ इतके पुरेसे आहे.”

त्यांच्याकडे 1800 साला पासूनचे पंचांग आहे. मनुष्य व्यासंगी असेल तर हे सगळे सांभाळत असतो. मी लगेच त्यासाठी किती पैसे द्यावे लागतात वगैरे विचारले.

लांबलचक लखोटयातून छत्रपती शिवाजी महाराज जसे पत्रव्यवहार खलिता पाठवून करत होते. तसचं एक ऐतिहासिक खलिता महादेवाने माझ्या ताब्यात देत महादेव म्हणाला,  “माझे गुरू श्री. शंकरभाट महाराजांनी ही तुमची भविष्यवाणी पाठविली आहे.” ती लिखाण मजकूराची सुरळी होती. सुरळी सोडवायला लागलो. हनुमानाच्या शेपटीसारखी लांबडी व्हायला लागली. ती मी वाचायला लागलो.

आत्मकथा हा तसा भूतकाळच आहे. आत्मकथा हे तसे पाहिलं तर सिंहावलोकन आहे. मग भविष्य किंवा ज्योतिष्यं यात असं काय असतं?

बाण धनुष्यापासून सुटतो तेव्हा एकूण होणारा त्याचा प्रवास याला दिशा, हवा, वातावरण, गुरूत्वाकर्षण यांना भेदत, छेदत यांना जमेला घेऊनच चालू क्षणाचे वर्णन, बाणाचे एकूण प्रवास वर्णन हे खरे खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र म्हणावे लागेल.

मग तो शिवधनुष्य बाण ओढणारा राम असो की अर्जुन यावर पूर्वानुभव, अंदाज, भाकिते, तर्क यांना एकाच तागडीत जोखून, वापरून वर्तवलेले गणिती हिशेब, ताळा म्हणजेच भविष्य. यावर किती विश्‍वास ठेवायचा किती नाही हे वाचकांनीच ठरविलेले बरे.

मी आत्मकथेचे कथन प्रांजळपणे केले आहे. निव्वळ जन्माची वेळ तारीख या शिवाय काही माहित नसलेला मला न पाहिलेला सामान्य मनुष्य एक ज्योतिष्य तज्ञ काय म्हणतोय बघू या तरी! लखोटयातील मजकूर याप्रमाणे-

जो.गु. ॥ शंकरनाथ बुवा बीडकर

ता. करवीर, जि. कोल्हापूर

(सध्या वास्तव मुंबई)

प्रति,

नावः शशीकांत जनगोंडा पाटील

(सध्या मु. सावरवाडी, ता.करवीर,

जि. कोल्हापूर)

जन्मतारीखः सोमवार. ता. 25, माहे-जून, सन 1945

जन्मवेळः सकाळी 9 वाजून 50 मिनिटे (माझी आई म्हणते, बेंदूर सणासाठी निघालेली बैलांची मिरवणूक वाजत-गाजत दारात आली होती आणि तुझ्या आवाजाचा आरंभ झाला.)

 ॥अथ॥

॥श्री गणेशाय नमः॥ शुण्डा मण्डल संप्रसार करणैमौलिस्थलान्दोलनैर्नेत्रोन्मीलन मीलनैर विरल श्री कर्णतालक्रमैः॥ दानालिध्वनितैर्विलासचरितैरूदध्वनिनोद्गजि- तैर्जातानन्दभरः करीन्द्र वदनो नः श्रेयसे कल्पताम्॥1॥ कल्याणानिः दिवामणिः सुललितां कार्न्ति कलांना निधिर्लक्ष्मी क्ष्मातनयो बुधश्‍च बुधतां जीव श्‍चिरज्जावित्राम॥ साम्राज्यं भृगजोऽर्कजा विजयतां राहुर्बलोत्कर्षता केतुर्राच्छतु तस्य वान्चितमियं पत्री यदीयोत्तमा॥2॥ जन्मसमयः क 9 मि 50 (स्टॅ.टा) दि.॥ स्वास्तिश्रीमन्नृपविक्रमार्कराज्यसमयातील संवत2001 तथाच भूपतिशालिवाहन कृतशके 1867 पार्थीव नामसंवत्सरे उत्तरायने ग्रीस्म ऋतौ सन्मांगल्य फलप्रद मासोत्तमे शुभकारिणी जेष्ठ मासे शुक्लपक्षे पौर्णिमा तिथौ घटय 36 प 35 परं 15 जनतिथी चंद्र वासरे मूळ नक्षत्रं घटयः 50 प 8 परं मूळ जन्मक्षे द्वितिय चरणे शुक्र योगः घटय 32 पलानि 16 परं ॥ जन्मयोगे तातकालिके बालव करणे धनु राशि स्थिते चन्द्र राशिवमाशे 9 द्ये आर्द्रार्क ख्ये नित्ररति दैवत्ये गुरू राश्याधिपतौ स्वान येनौ राक्षस गणे क्षत्रीय वर्णे गज वर्गे आद्यभाग युजायां अग्नी हंसके आद्य नाडी स्थिते श्रीफणीश्‍वरचक्रे मिथून संक्रान्तेर्गतांशाः । 9।50 एवमादिपच्चाङशुद्धावास्मीन्दिने श्रीसूर्योदयाद्वतेष्ट घटयः 9 पलानि 27॥ एतत्समये सिंगृ लग्नवहमानायामस्यां शुभग्रहनिरीक्षितकल्यावति वेलाया स्वधर्मपरायणश्रीमान् रा.रा. जनगोंडा रामगोंडा पाटील गृहे अखंड सौभाग्यवती ताराबाई नामाख्या सव्य कुक्षौ पुत्र रत्न प्रासूत तस्य धनु राश्यपुरि यशवन्त जन्मनामानि मूळ नक्षत्रस्य 2 चरणानुगतं यो काराक्षरोपरि योमगोंडा नाम घाताष्टकम् श्रावण मासः।3।8।13 तिथयः शुक्र वासरः भरणी नक्षत्रं वज्रयोगः। तैतील करणं 1 प्रहरः 4 चंद्रा॥ व्यावहारिक शशीकांत नाम ॥ शुभं भवतु ॥

या घात वारादी नुतनवस्त्रालंकार परिधान करणे स्मश्रुकर्म प्रयाणादि. शुुभ कर्म वजेयतः इति घात चन्द्र॥1॥ अथ श्री गौरी जातेक उमा महेश्‍वर संवादे या मुलाचा जन्म शके 1867 जेष्ठ शु॥ 15 सोमवार सकाळी स्टॉ. 9वा. 59 मि. उद्गाव येथे झाला आहे. अक्षांश 16-42 रेखांश 74-20 पलभा 3-36 प्रमाणे ते दिवशी र.उ. 6ः3 अ 7ं=8 सूर्योदयात गत घटी 21 पळे 55 चरण 2 रा रास धनु तेवेळी रवी मिथुन राशीचे अंश 9 कला 50 असून सिंह लग्न अंश कला 23 आहे.

वात पीत प्रकृती, भव्य शरीर धट्टा-कट्टा. छाती दंड मजबूत. शूर व मानी स्वभाव. उग्र चेहरा. मोकळया मनाचा. बोलण्यात दुसर्‍यावर छाप बसविणारा, दयाळू व स्थिरबुद्धी असा होईल. नक्षत्र पद्यावर पडले आहे. त्याचे फल धैर्यवान होईल.

अथ जन्म नक्षत्र फलम्ं॥ धनवान बंधुमान लोकांचे भाषणावर विश्‍वास ठेवणारा असा होईल. अथ चंद्र राशी फलम् दीर्घ कंठ व मुख असा पूर्व द्रव्याचा धनी दा.ता. शक्तीमान वक्ता हुशार मोठे दात व नाक धारण करणारा उद्योगी. मांसल दंड, भितिने वश न होणारा असा होईल. आयुष्य प्रमाण वर्षे 90 त्यात प्रथम येणारे घातादी दिवस 19 महिने 4=7=9 वर्षे 2-2-5-9-14-19-27-35-45-50-60-65-70 या वर्षी शरीरास आजाराचे त्रास व पीडा होईल. म्हणून अनिष्ठ समयी (प्रसंगी) योग्य उपाय करावे. अथद्वादश भाव फलम्ः॥

लग्न स्वामी 11 वा असून लग्नी गुरू आहे. म्हणून हा मुलगा राजलक्षणी असून उदार, शांत, मनुष्य लोभी निरोगी धट्टा-कट्टा, सावळया रंगाचा, विद्यासंपन्न, धर्म शास्त्र जाणणारा असून स्वतंत्रतेची फार आवड असेल॥1॥

धनी स्वामी लाभाव स्वग्रही आहे. म्हणून हा मुलगा स्वतःचे कर्तव्यावर धन संपादन करील. बोलण्यात हुशार, बुद्धिमान, लोकांवर छाप बसविल. पण हावाव धन फार काळ टिकत नाही॥2॥

कांतीय स्वामी 9 वा असून मंगळ तिसरे स्थानावर पाहत आहे. म्हणून भावंडाचे सुख पाहिजे तसे मिळणार नाही. स्वतःचे खर्चात काटकसर करणे, दुसर्‍या करीता खर्चाची पर्वा न करणे, स्वतः विषयी फार अभिमान, कोणास न भिणे, पराक्रमी वृत्ती नेहमीच राहिल॥3॥

चतुर्य स्वामी मंगळ असून त्याची दृष्टि 4 थे स्थानांवर आहे. म्हणून चौथ्या महिन्यात मातेस त्रास होईल. सारांश मातृ सुख उत्तम मिळेल. वाहन सुख बरे आहे. घर शेती दुभति जनावरे लाभतील. याला इच्छेप्रमाणे अन्न, वस्त्र मिळेल. तोटा पडणार नाही.॥4॥

पंचमात केतु चंद्र व स्वामी गुरूची दृष्टि असा योग असलेने विद्यायोग बरा आहे. मध्यंतरी काही कारणाने थोडा खंड पडेल. वैद्यकीय क्षेत्रात प्रगती होईल, त्यानेच धन संपादन करील॥5॥

षष्टम् स्वामी शनि 11 वा असलेने मस्तक व नाभी यावर व्रण होईल. याला परजातीचे लोकांकडून फायदा होणार आहे. आपसातील शत्रूकडून थोडा त्रास होईल. पीतांशा पासून त्रास, देवी, हगवण हे सुद्धा त्रासाचे आहे. वीज किंवा पशु यांपासून सांभाळून असले पाहिजे॥6॥

सप्तमावर गुरूची दृष्टी, हा योग उत्तम असलेने विवाह योग 20 ते 25 दरम्यान आहे. पत्नी उत्तम सांसरिक, मनमिळाऊ असून विवाहापासून भाग्योदयास प्रारंभ होईल. शेवटी वातांचे भय नेत्रास विकारमय म्हणून उपाय करावा॥7॥

अष्टम् स्थानी गुरू 1 ला व अष्टमावर शनिची दृष्टी आहे. म्हणून लागण्याचे भय. संगीताने थोडा द्रव्य नाश. वात विकार भस. मामाचे कुळात हानी. परगावात शत्रु. विष, सूर्य यापासून सांभाळावे लागेल॥8॥

नवम् स्थानी स्वग्रही असून शुक्राने युक्त आहे व गुरूची दृष्टी भाग्यावर असलेने हा मुलगा भाग्यवान असून पुत्र द्रव्यहिसुखे उत्तम मिळतील. नवीन घराचा योग असून धंदा उद्योगात प्रगति होर्ईल. व्यवसाय चाांगले चालतील॥9॥

दशम् स्वामी नवम् स्थानात असलेने मुलगा भाग्यावान धर्माचरणी असून जनसेवा करील. उपकार करण्याची वृत्ती असेल. स्वकष्टाने ऐश्‍वर्य भोगील स्वतंत्र घर व्यवसाय करील॥10॥

लाभ स्वामी स्वग्रही असून पाप ग्रहाने दुषित आहे. पण बलवान असलेने अनेक प्रकारचे लाभ होतील. वयाचा 28 ते 35 हा लाभाचा काळ आहे. धन, सोने वगैरे जवळ साठा होईल. नोकरीपेक्षा स्वतंत्रता लाभदायक आहे. बुधामुळे धंद्यात प्रगति होईल.॥11॥

द्वादश स्वामी 5 वा असून 12 वे स्थानावर मंगळाची दृष्टी आहे. सुगंधी पदार्थ उत्तम वस्त्रे उत्तम शयनादी सुखे प्राप्त होतील. शत्रूंचा नाश होईल. करील त्या कामात जय प्राप्त होईल. पण विशेष दुसर्‍यावर अवलंबून राहू नये॥12॥

इति द्वादश भाव फलंम् 1ः12ः12। याचा जन्म केतुच महादशेत झाला आहे. धनु राशीचा पंचमातील केतु उच्च असलेने जन्मापूर्वी 2 वर्षे 3 महिने 1 दिवस 18 घटी ही दशा पूर्ण होऊन जन्मापासून 4 वर्षे 8 महिने 28 दि 42 घटका म्हणजे ता 23।2। 1950 पर्यंत आहे. त्यात घरी मातेस थोडा त्रास होईल. धनाची हानी होईल. त्यामुळे घरच्या मंडळीचे मन स्थिर असणार नाही॥ त्यात केतुची अंतर्दशा 4 महिने 27 दिवस अत्यंत त्रासाचे आहेत.

नंतर शुक्राची महादशा 20 वर्षे. शुक्र भाग्यात आहे व अंतर्दश 3 वर्षे 4 महिने हा काळ वयाचा 24 आहे. त्यात शिक्षण प्रगती विवाह उत्तम होईल. विवाहानंतर धंदा उत्तम चालेल. ता. 23।2।1970 पर्यंत हा काळ आहे.

नंतर रवीची महादशा 6 वर्षे व अंतर्दश 3 महिने 18 दिवस ता. 23।2।1976 पर्यंत. त्यात पुराणावर श्रद्धा, धन प्राप्ती, उद्योग सिद्धी, पुत्र सौख्य. देह सौख्य, जागा खरेदी, घराचा योग. परगावी प्रगती ही पुढे मिळतील.

वय वर्षेे 30 पुढे चंद्र दिशा 10 वर्षे वय वर्षे 40 अंतर्दशा 10 महिने 23।2।1986 पर्यंत. त्यात सर्व प्रकारची कामे होतील. संततीपासून समाधान पूर्वाजीत घरी थोडी गती होईल.

नंतर मंगळ दशा 7 वर्षे पर्यंत अंतर्दशा 4 महिने 27 दिवस ता. 23।2।1993 पर्यंत. त्यात मुलांचे शिक्षण त्यांची प्रगती. भांडणात व कोर्टात जय. लोकांकडून मान शरीरास थोडा त्रास कार्यात विघ्न ही फळे मिळतीलच.

नंतर राहू दशा 18 वर्षे 23।2।2011 वयाची 65 वर्षे. अंतर्दशा 2 व. 8म. 12 दि. पर्यंत. त्यात सर्वांकडून मान द्रव्य प्राप्ती व समाधान. घरी थोडेसे वातावरण गढूळ होईल.

पुढे गुरूची महादशा 16 वर्षे वयाची 81 ता. 23।2।2027 अंतर्दशा 2 वर्षे 1 महिना 18 दिवसपर्यंत. त्यात सर्व गोष्टीचे समाधान. संतती पासून आराम. मुलांची प्रगती. धनाचा साठा. शरीर शक्तीहिन ही फळे मिळतील॥

पुढे शनिची दशा 19 वर्षे वयाची 100 त्यात 65 ते 81 हा आयुष्याचे समाप्तीचा आहे. 3 वर्षे 3 दिवस त्रासाचे असून शेवटी वात, पद्यास त्रास. या पासून धोका आहे. म्हणून नेहमी ईश चिंतन, परोपकार, शिव, आराधना वगैरे धार्मिक बाबीपासून बरं आहे. सारांश कुंडली उत्तम असून ग्रहमान उच्च आहेत.

मी माझं जीवनचरित्र प्रत्यक्ष अनुभवातून व वरील भविष्य वाणी मजकुरातून तुमच्या समोर मांडले आहे. तुम्ही तुमचा तौलनिक विचार करावा.

‘सावरवाडी' याच नावानं आर्थिक सबळता दिली. दाणदुणं देऊन माझी चूल चालविली तुळशी नदीच्या पलीकडे  ‘आरे' हे गाव मला दिसले. या गावात राहण्याचा मोह मला झाला. कारण हे गाव सुशिक्षित होतं. तिथं शाळा होती. अमेरिकेचा शोध खलाशा कडून लागला म्हणतात, तसं माझ्या प्रॅक्टीसमध्ये नव-नवीन गावे नजरेत येत होती. हा मला तसाच शोध वाटत होता. हे गाव गावकर्‍याचं होतं. भजन, कीर्तनाचा, या गावात निनाद होता.

तो पर्यंत माझी पत्नी पहिल्या वेळेस गरोदर होती. दिवस पूर्ण होताच माहेरी सुखरूप डिलीव्हरी झाली. ती तारीख होती 2 मार्च 1971. या गावात सौ. सरोज हिचा मित्र परिवार मोठा होता. त्यामुळे डोहाळे समारंभाची अप्रूप झाली.

भोगावती व तुळशी नदीच्या कैचीत सापडलेलं हे गाव. पावसाळयात पुराने वेढल जायचं. कोल्हापूरचा संपर्क तुटायचा. डॉक्टरांचा लोकांना जीवा-भावाचा आधार वाटायचा.

पहिला जेष्ठ चिरंजीव. त्याचं नावं नितीन असं ठेवण्यात आलं. पहिला वाढदिवस 2 मार्च 1972 रोजी संपूर्ण आरे गावाला आमंत्रण देऊन जिलेबी व मसाले भात, खास आचारी बोलावून उरकण्यात आला.

गाडेगोंडवाडी, कारभारवाडी, सडोली, बाचणी ही गाव नजीक होती. ती गावं प्रॅक्टीससाठी थापटणं चालू झालं.  ‘सडोली’ हे गाव आरे पेक्षा सुधारित वाटायला लागल. या गावात येऊन राहण्याचा मोह झाला.  ‘विद्यमान आमदार पी. एन. पाटील' यांच्या मालकीच्या गॅरेजमधल्या माडीवरती जागा उपलब्ध झाली.

आर्‍यातून सडोलीला राहायला आलो. त्या काळात पत्नीला पुन्हा दिवस गेले होते. सारंग तेथेच जन्माला आला. तो दिवस होता 9 जानेवारी 1973. या दोघांचे शिक्षणही त्याच गावात तिसरी-चौथी पर्यत झालं.

सडोली मुक्कामी जेव्हा आम्ही पी. एन. पाटीलांच्या गॅरेजमध्ये वास्तव्य करून होतो. त्याच गॅरेजमध्ये खाली बुलडोझरचे गॅरेज असायचे. वरच्या मजल्यावर एक कापडाचे दुकान, भांडयाचे दुकान, शेजारी उदगावचे मित्र डॉ. मगदूम व माझा परिवार असे आम्ही भाडेकरू होतो. कोल्हापूरच्या मॅटर्निटी हो “ध्ये सौ. सरोज यांची सुखरूप डिलीव्हरी झाली होती. अत्यावश्यक सेवेनंतर त्या घरी परतल्या होत्या. बाळंतिणीला दोन बाळं हाताळण्याचा हा पहिला अनुभव होता.

मी जेव्हा आरे या गावी होतो, तेव्हाच चिरंजीव नितीन जन्मले होते, त्याचे बालजीवन तेथून आरंभले होते. सौ. सरोज जयसिंगपूर मुक्कामी आल्यावर सासरला व माहेरला दोन्ही ठिकाणी जात असत. ती मला बोलून दाखवत असे,  “तुमचं कापड दुकान असल्यामुळे मला रोजच्या रोजच नव्या साडया वापरता येतील या समजाखाली मला तुमच्याशी लग्न करायला आकर्षण वाटत होतं.”

तिने एकदा धाडस करून जयसिंगपूरला आलेली असताना माझ्या वडिलांना,  “मला साडी हवी आहे.” अशी मागणी घातली. वडिलांच्या स्वभावाचा अंदाज त्या बिचारीला माहित नव्हता. पूर्वपीठिका तिला माहित नव्हती. मागणीच्या बरोबर वडिलांनी मागणी फेटाळून म्हणाले,  “शश्याला इथे ये म्हणावं, राब म्हणावं आणि मग साडी घे.”  त्यानंतर तिने कधीच वडिलांकडे मागणी घातली नाही.

परिवारात नव्याने नितीनने आपली हजेरी लावली होती. यथावकाश चि. सारंगनेही आपली हजेरी लावली. खारी सारखी खाणारी दोन मुलं परिवारात सामील होताच मी वडिलांकडे, जे शेतीतून धान्य येतेपैकी, दोन पोती ज्वारी आणि दोन पोती शेंग प्रत्येक वर्षाला तुम्ही द्यावं, नातू खाणारे झालेत. जी धडपड चालते ती पुरणारी पुरेशी नाही, अशी मी कारभारी भाऊ असताना मागणी घातली. त्याही मागणीला फेटाळून वडील म्हणाले,  “छदाम मिळणार नाही.”

परिवारातून आम्ही बाजूला राहत असल्याने आम्ही बाजूलाच राहू आणि वडिलांच्या इस्टेटीला मुकू या भयाने प्रसंगावधान राखून मग माझी मला वाटणी पाहिजे ही मागणी घातली. थोरले भाऊ शांतीनाथ पाटील कारभारी होते. कारभार सांभाळत होते. ते मला म्हणाले,  “तुला म्हणून काही मिळणार नाही, रीतसर तू कायद्याने यावसं.”

मी ही हकिकत डॉ. एन. जे. पाटील भावाला कथन केली. त्यांनीही सहानुभूती दाखवून तुला त्यांनी धान्य तरी द्यायलाचं हवं होतं. पायाचे अपंगत्व लक्षात घ्यायला हवे होते. त्यांनी आपले वकिल मित्र अरविंद शहाशी संपर्क साधला.  “आपण रीतसर नोटीस काढू या. वाटणी मिळायला काही अडचण नाही.” असं ते म्हणाले. नोटीसांच्या फैरी सुरू झाल्या. दमाला दम देणं चालू झालं. कायद्याच्या पुढे त्यांच्याही वकिलानं सागितलं,  “तुम्हाला तो मागतोय म्हटल्यानंतर ती द्यावीच लागेल. तुमची मिळकत द्यायची की नाही हा तुमचा हक्क आहे. पण वडिलोपार्जित इस्टेट ही द्यावीच लागेल.”

शेवटी वडिलांनी शक्कल चालवली. वडिलोपार्जित इस्टेटीवर शश्याचा हक्क असेल तर आपण असं करू या, पाच भावंडे, चार बहिणी व आम्ही दोघे नवरा बायको असे मिळून अकरा लोकांच्या वाटण्या पाडायच्या आणि त्यात जे येईल, जे निकृष्ट असेल ते त्याला देऊन टाकून रिकामं होऊ द्या. मला कोणीकडून तरी संबंध संपवायचे होते. माझ्या जीवन विकासाला आरंभ करावयाचा होता. सारं चित्त मला एकवटायचं होतं. त्यानुसार मी त्यांना संमती दिली. जे तुम्हाला द्यायचं ते देऊन टाका.

जी निकृष्ट जमीन होती, काही कामाची नव्हती. अशा दीड एकराच्या जमिनीचा तुकडा मला देण्यासाठी त्यांनी निवडला. मी त्यांच्याशी लढण्यासाठी अपुराच होतो. तसं माझ्याकडे मानसिक बळही नव्हतं. कर्जाच्या जमिनीचा दीड एकराचा तुकडा व घराच्या ऐवजी जयसिंगपूर येथे एक प्लॉटचा तुकडा जो वादाच्या भोवर्‍यात अडकलेला होता, ज्याच्यावरती एक कुंभार नावाचं कुळ राहत होतं, त्यातही चुलत्याची निम्मी वाटणी अडकलेली. आणि रोख रक्कम पाच हजार रूपये त्यांनी देऊ केले. अस्सलं जमिनी त्याच्याकडेच राहिल्या. कोटयावधी रूपयांच्या मिळकती त्यांच्याकडेच राहिल्या.

त्या काळात परिवारातल्यांची भरभराट होती. “कल्पवृक्ष टयूबवेल कंपनी” या नावाची कंपनी फार्मात होती. मला कुणी कडून तरी यांच्याशी संपर्क कायमचा संपावायचा होता. देतात ते घेऊन तो मी रीतसर हक्क संपल्याचा शिक्कामोर्तब केला.

शांतीनाथ पाटील कारभारी बंधू, शाळा बांधून देत असत. शाळा, मंदिरे येथे फ्री टयूबवेल खोदून देत असत. कर्णासारखं औदार्य, बंधूभाव त्यांचं त्या काळात होतं. पण भावासाठी भाऊबंदकी होती. हा भाऊ म्हणजे मी कुठे पुढे जाऊ नये ही चिंता त्यांना होती.

एकदा काय झालं. चि. नितीनला जेवायला वाढले व सौ. सरोज दुसर्‍या एका कामात गुंतली. त्यावेळी नितीनचा घास तोंडात असताना पाठीवर मागे कलंडला. घास घशात अडकला व धनुष्याकार होऊन तो डोळे गरागरा फिरवू लागला.

मी जवळच होतो. सरोजिनीचा आवाज ऐकला,  “नितीन कसा करतोय बघा, पटकन या.” मी त्याच्या पाठीवरती गुद्दे देऊन, मारून तो घास काढण्याचा प्रयत्न केला. घास नरडयात श्‍वसन नलिकेत होता. मी हेड लो पोजिशन दिली. दोन्ही पाय उचलून डोक खाली केलं.

त्याबरोबर नितीनचा आवाज आला,  “पप्पा!”  म्हणून त्याने मला मिठी मारली व तो पुन्हा बेशुद्ध झाला.

त्या अवस्थेत डोळे सताड उघडे झाले. डोळयाजवळील मर्मस्थाने आत गेली. मी त्याबरोबर हा काय काळाचा प्रकोप म्हणायचा. एक मुलगा आला आणि दुसरा निघाला असे मनात म्हणून त्याला वाचविण्यासाठी प्रयत्नाची पराकष्टा करावी या हेतूने खोली बाहेर आलो. शेजारची बिर्‍हाडेही खोलीत धावली.

कापड दुकानातला रंगाकाका तोही नितीनला पाहण्यासाठी धावला. रंगाकाका मला गडबडीने म्हणाला,  “शंकर काकांची गाडी बोलवा, जावा. आपण कोल्हापूरला निघू या.” शंकर काका म्हणजे विद्यमान आमदार पी. एन. पाटील यांचे चुलते, मी त्यांच्याकडे धावतच गेलो. त्यांना झाली हकीकत सांगितली. ते अंघोळीला निघाले होते. बिचारे ते काका गॅरेजमधून अग्निशामकाची गाडी बाहेर काढतात तसे त्यांनी आपली गाडी काढली. एक्सिलेटर वरती एक पाय ठेवून एक हात हॉर्नवरती ठेवून गाडी वार्‍याच्या वेगाने त्या अत्यवस्थ बाळाला घेऊन कोल्हापूरच्या रस्त्यावर मार्गस्थ झाली.

लहान मुलांचे स्पेशालिस्ट त्यावेळी महाद्वार रोडवरती डॉ. देवधर एकमेव बालरोगतज्ञ होते. माझ्या एन. जे. पाटील भावांचे ते मित्र होते. हॉस्पिटलमध्ये शिरताच मी डॉक्टरांना म्हणालो,  “सर! हा माझा मुलगा आहे. वाचवता आला तर बघा.” असे म्हणून नितीनला त्याच्यासमोर ठेवला. कान, नाक, घसा यांचे डॉक्टर म्हणजे एन. जे. पाटील यांना मदतीला बोलावले. एमर्जन्सी आहे म्हणून तोही तात्काळ आला.

पेशंटला अतिदक्ष विभागात ट्रीटमेंट चालू होती. डॉक्टर सगळेच बिझी होते. मी देवधरांना सहज चोवीस तासानंतर विचारले,  “काय! मुलाची अपेक्षा करू का?”  ते मौनच राहिले. मी समजायचं ते समजूनच गेलो. बाळ अठ्ठेचाळीस तास बेशुद्ध राहिले. नंतर काही हालचाली होऊ लागल्या. हळू-हळू तब्येतीत सुधारणा होत गेली व सहाव्या दिवशी आम्हाला डिसचार्ज मिळाला.

डॉक्टरांचे भारंभार बील मला भागवता यावे म्हणून माझी इटालियन अ‍ॅटो सायकल मी तीन हजार रूपयांना विकली. व पैसे भरून डिसचार्ज घ्यावा म्हणून देवधरांच्या ऑफिसमध्ये शिरलो.

 “आज तुम्ही बाळाला घेऊन जाऊ शकता.”

 “मी म्हणालो, सर मला प्लीज बील सांगा.”

चष्म्यातून माझ्याकडे बघत मोठा डोळा मोठा करून म्हणाले,  “डोन्ट टॉक नॉनसेन्स! आपआपसात बील कशाला विचारतोस?”  मी गहिवरलो.

पुढे मी त्यांच्यावरती कविता करून उपकाराची परत फेड करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा,  “ती कविता वाचून मला तू लाजवलसं.”  एवढचं फक्त ते म्हणाले. देवधर हे फक्त आडनावाचे नव्हते तर देवाला धरून होते. मोठी माणसं खरच कशी मोठी असतात हे प्रसंगानुरूपच कळते.

त्याच परिसरात व त्याच घरात राहत असताना चि. नितीन यांच्यावर अडीच वर्षाचा असताना ओढवलेला दुसरा एक प्रसंग.

असाच एकदा जेवायला बसलेला असताना डाव्या नितंबाला हात लाऊन किंचाळला. डोळे पाण्याने भरले. मला काहीतरी चावलं म्हणाला. मी काय चावलं, बघावं म्हणून त्याला उभा करण्याचा प्रयत्न केला. तो डावा पाय जमिनीला टेकवतच नव्हता. मी मनात म्हंटलं, काय झालं   तरी काय? पण त्या पायाची पोझिशन मला पोलिओच्या अ‍ॅटॅकसारखीच वाटली.

मी लगेच मिळेल ती गाडी पकडून डॉ. देवधर यांच्या हॉस्पिटलमध्ये आलो. बाप अनुभवत असलेले अपंगत्व मुलालाही येऊ नये हा उद्देश ठेऊन मी तत्परता दाखवली होती. पोलिओचे डोस ही ज्या-त्या वेळेला दिले होते. तरीही त्याला हा अ‍ॅटॅक कसा काय आला. पायाची 100 टक्के कोणतीच हालचाल स्वयंपूर्ण होत नव्हती. डॉ. देवधरांनी योग्य वेळी हा निर्णय घेतलास त्यामुळे पाय वाचू शकला. दोन-तीन दिवस ठेवून घेऊन पुन्हा त्याचा पाय विशेष एक्सरसाइज करून सुस्थितित आणला. त्यांच्या या योग्य व पद्धतशीर उपाचारामुळे (म्हणजे मॉलिश करणे, शिडया चढायला लावणे इ. वगैरे प्रयोगांमुळे) पाय वाचू शकला.

कोल्हापूर मूक्कामी, नव्या बंगल्याचे काम चालू होते. आर. सी. सी. कामाचा बजरंग सुतार स्लॅबच्या फळया निखळत होता. त्या काळात चि. सारंग मागच्या दारात खेळत होता. पायरीवरती त्याचा हात होता. बजरंगने मागे टाकलेली फळी उभ्या स्वरूपात उजव्या हाताच्या तर्जनीवरती आदळली. त्याचबरोबर तर्जनी तुटून पाच टक्के राहिली. हाताच्या पंजाला चिकटून राहिली होती. मी लगेच त्याला जोडण्याचा प्रयत्न केला. तसेच गडबडीने कापड बांधून डॉ. एन. जे. पाटील अण्णांकडे नेले.

त्यांनी एकूण परिस्थिती पाहिली व म्हणाले,  “शशीकांत, हे बोटं काढावं लागेल.”  मी  म्हटलं,  “आहे तसे जोडं, काय होतयं बघूया. नंतर काढावे लागलं तर काढूया. टाके व्यवस्थित घाल.”  हाडावरती हाड ठेवल व ड्रेसिंग करून प्लास्टर केलं. प्लास्टर आम्ही वाळूच दिलं नाही. नखांकडच्या बाजूकडून प्लास्टरच्या सुरळीत शिवाम्बूचे चार-चार थेंब मधून टाकत होतो. प्लास्टर सुकत आला पुन्हा एखादं दुसरा थेंब अशा पद्धतीनं पूर्णपणे तर्जनी व्यवस्थित जोडली गेली. वाकडी का दिसेना पण ती आज त्याच ठिकाणावरती आहे.

क्रमश:


डॉ. शशी पाटील एक महान सेवाभावी चिकित्सक होते. 'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' हे त्यांच्या जीवनाचे ब्रीद होते. ते नेहमी निस्वार्थ व निर्मळ भावनेतून रुग्ण उपचार करायचे, त्यामुळे त्यांच्या फक्त हातालाच नव्हे तर त्यांच्या वाणीला ही गुण होता. त्यांच्या अनुभवसिद्ध उपचारांमुळे अनेक रुग्ण दुर्धर रोगातून मुक्त व्हायचे. मूलतः डॉ. शशी पाटील हे एक आध्यात्मिक साधक होते. प्रत्येक औषधोपचाराचा प्रयोग, ते प्रथम स्वतःवर करून पाहायचे. त्यांचा शिवांबू, योग, निसर्गोपचार व आयुर्वेदाचा फक्त प्रगाढ अभ्यास होता असे नाही तर ते एक उत्तम हस्त कुशल उपचारक होते. मॉलिश व ॲक्युप्रेशर यासारख्या उपचार कलेमध्ये ते निपून होते. ते एक उत्तम लेखक व कवी सुद्धा होते. त्यांनी आरोग्य विषयक अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. ते आरोग्याचा गहन विषय रुग्णांना दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणे देऊन सहजपणे पटवायचे.त्यांचे आपल्या वाणीवर चांगले प्रभुत्व होते. प्रस्तुत ‘मुळनक्षत्री - एक प्रेरणादाई जीवन-धारा’  या लेख मालिकेतून आम्ही  डॉ. शशी पाटील यांचे  ‘जीवन चरित्र’ क्रमश: प्रकाशित करीत आहोत. आज हजारो लोकांसाठी त्यांचे जीवन, नव-प्रेरणेचा स्त्रोत आहे.
Previous Post Next Post