अन्न

मातीतून निर्माण झालेले अन्नघटक म्हणजेच पृथ्वीतत्त्व; पृथ्वी म्हणजे जडत्व, ठोसपण, भारीपण, वजनदार हेच तिचे वैशिष्ट्य. म्हणूनच अती अन्न खाणारे लवकर पृथ्वीतत्त्वाशी विलीन होतात किंवा मरतात. हाच काय तो अनुभव, अति खाशी अन् मसणात जाशी!

अन्न तारतंही व मारतंही

भुकेपोटीच अन्न स्वादपूर्ण असतं. भूक थोडी शिल्लक ठेवून आहार थांबवणं हा संयम असतो. खाताना पूर्णत: चर्वण करणं हा शहाणपणा असतो. जिवंत अन्न खाणार्‍यालाही जिवंत ठेवतं. मेलेलं अन्न खाणार्‍याच्या धोंडशिरा तोडतं. अखंड धान्ये, खाणार्‍यांनाही जीवन अखंड देतात. स्वत: लांबडे झालेले अन्न खाणार्‍यालाही लांबडेच करते. मुडदे खाणारे मुडदेच होतात. तात्पर्य काय, ‘पेरावे तेच उगवते’. तेव्हा कृपया तेच पेरा जे तुम्हाला हवे आहे.

हे जग इच्छा तशी पूर्ती करणारेच आहे. चुकीचे पेरला आहात म्हणून चुकीचे उगवले आहे. आता योग्य पेरा म्हणजे योग्य उगवेल.

शाकाहार व वारस

मुलांनो, मनुष्य हा माकडाचाच तर वारस ठरलाय. हनुमानाला आपण आपल्या संस्कृतीनं शक्ती व आरोग्याचे प्रतीक मानले आहे. शाकाहार हाच तर हनुमानाचा आहार आहे. मानवी देहरचनाच शाकाहाराशी मिळतीजुळती आहे. मानवी जीभ, दाढा, आतडी, नखे, इ. सारी शाकाहाराची साक्ष देतात. सबब, मनुष्यप्राणी पूर्णत: शाकाहारी आहे. प्राणिजन्य सर्वही अन्न, अगदी दुधापर्यंत निसर्गोपचारात निषिद्ध मानले आहे.

सौम्य विष

निसर्गोपचारामध्ये मानल्या जाणार्‍या पाच पांढर्‍या स्लो पॉयझनमध्ये मीठ, साखर, मैदा, तांदूळ व दूध यांचा समावेश होतो. उसाचा सेंटर साखर आहे. गव्हाचा सेंटर मैदा आहे. पॉलिश तांदूळ हा भाताचा सेंटर आहे. दूध तसा म्हशीचा सेंटर आहे. या सर्व सेंटरकडून मानवी देहाचे सेंटर म्हणजे पोट, आतडी यांच्यावर सतत आघात होतोय. यातूनच किंवा त्यांच्या अतिरेकातूनच अतिरेकी प्रवृत्ती निर्माण होते.

मुलांनो, तुम्हाला साहजिकच वाटेल, आमच्या तोंडचे दूध-भात, साखर, मिठाया, बिस्किटे, खारी, इत्यादी सारी काही बंद करून हे बिचारे काय साधत असतील? तुम्ही म्हणता ते काही खोटे नाही !

देहात रोगपोषक विजातीय द्रव्ये बनवण्यात यांचा मोठा सहभाग आहे. असे लक्षात आले आहे की ताप, खोकला, डोकेदुखी, अपचन, सर्दी, सूज, मलावरोध, आळस, अनिद्रा, सांधेवाई, इत्यादी अनेक व्याधीपीडेत यांचाच हस्तक्षेप होतो आहे. चोरांना मदत करणारेही व्यवहारात चोरच समजले जातात. पर्यायाने तेही शिक्षेस पात्र ठरतात. तद्वत रोगपीडेस साहाय्य करणारे अन्न निषिद्ध होय. आपले तरी हे वय खायचेच आहे. या वयात इतक्या अटी कोण मान्य करील. तथापि यांचा अतिरेक टाळता आला तरी आज पुरे आहे. हे तुम्हाला माहीत तरी असावेच.

स्वाद

मुलांनो, जिभेच्या आवडीमध्ये या किंवा या पदार्थांपासून बनलेले पदार्थच आपण काय ते खात असतो, सगळ्या मिठाया, सगळे सण, सगळे महोत्सव, सगळे प्रसाद, सगळी लग्ने, सगळी हॉटेल्स, सगळी चैन या सर्वांमध्ये यांचीच बनावट असते. यांचाच आस्वाद असतो.

जिभेला जे आवडतं, ते बहुधा स्वास्थ्याला का आवडत नाही? अडीच इंचांची जीभ, पण पाच-सहा फुटांच्या शरीराला नेहमीच कशी अधे-मधे कैचीत पकडीत असते? समूहांनी समूहाकरिता बनविलेला आहार पूर्णत: जीभ अधिष्ठित असतो. प्रत्येकाला चांगलं म्हणवून घ्यायचं असतं. संपूर्ण आरोग्याचा विचार यात कोणीच करीत नाही. हा विचार करायला खरं तर कोणीच भानावर नसतो.

तुम्ही कुमार आहात. तुम्हाला खेळायचं असतं, बागडायचं असतं, कमी-जास्त खाल्लात तर फारसं काह बिघडत नाही. कारण तुमच्या सततच्या हालचालींनी जठराग्नी धगधगलेला असतो. धगधगलेल्या चुलीत एखादे ओले सरपण ढकलले तर तेही पेट घेतेच; पण वारंवार हे चालवू लागलात तर चुलीत धूर होणारच.

आग्रह

आपल्याकडे डोळस प्रेम कमी, आंधळं प्रेम जास्त, असाच अनुभव सर्वत्र येतो. आग्रह करून खाण्याचे पदार्थ वाढले जातात. आजीचा आग्रह, आईचा आग्रह, ताईचा आग्रह, दोस्तांचा आग्रह. या आग्रहातून काही घास आपण अधिक कोंबतो, ढकलतो. नाइलाज होतो, पदार्थ महाग असतो. पानावर ठेवावा तर ऊर्जेचा अपव्यय, वाढणार्‍यांचा अवमान होतो. खावे तर छातीचे ठोके वाढतात. आपली अवघड स्थिती होते. शेवटी आपण खातोच. या अशा वारंवार घटनेमुळे व आपल्या अतिखाण्याच्या लालसेमुळे आपली साईज बदलायला लागते. शरीर आडवंतिडवं पसरू लागते. कुरूपता येऊ लागते. बेडौलता हजर होते.

भूक नसताना खाणे टाळले पाहिले. भूक नसताना घेतलेला आहार विषात रूपांतरित होतो. करपट ढेकरा हा त्याचाच पुरावा आहे. अस्वस्थता, तगमग ही त्याचीच फलनिष्पत्ती आहे आपण ‘पडक्या कुंपणावर पाय’ हा शब्दप्रयोग ऐकला असालच. या तुमच्या विकलांग स्थितीचा लाभ, रोग घेऊ पाहील तर नवल कसले आणि हे असेच होते.

धान्यातील अखंडता

ज्वारीच्या, त्याच्या पिठाच्या मर्यादा व भाकरीच्या मर्यादा लक्षात घेऊया. ज्वारी वर्षभर टिकू शकते. पीठ 8/15 दिवसच टिकते. अन् भाकर मात्र दुसर्‍या दिवशीच खराब होते. म्हणजे भाकर बनविण्यात ज्वारीचे आपण नकळत डिव्हॅल्युएशन करतो. यातून काय साधलेत? साधारण एक रुपयाची ज्वारी, भाकर बनेपर्यंत ती पंचवीस पैशांची होते.

शरीराभोवती जसे वातावरण आपण तयार करतो, तस्सं आपलं शरीर रूप धारण करतं. हिरवळीत राहणारे, सरपटणारे किट-पतंग हिरवेच असतात. शेजारी असलेल्या प्रत्येक वस्तूंचा प्रभाव हा एक दुसर्‍यावर सारखा पडतच असतो. हेच ते, मी नेहमी म्हणतो, जे पेराल तेच उगवेल.

आपल्याकडे बारशाला घुगर्‍या वाटण्याची पद्धती आहे. हा संस्कार का आला? काय सांगायचे आहे यातून... तर... अखंड धान्ये अखंड जीवन, अखंड आयुष्य देऊ शकतात. पूर्वजांना हा संकेत यातून आपल्याला द्यायचा आहे. नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी या तशा शुभेच्छाच आहेत.

आजही मी पाहतो आहे. चौदा प्रकारचे धान्य एकत्र करून घुगर्‍या केल्या व चर्वण करून खाल्ल्या तर शरीर पुष्ट होतं. शौचाला साफ होतं. सर्व अभाव भरून निघतात. जी धान्यांची टरफलं, धान्यांना वर्षभर अबाधित ठेवत होती, तीच टरफलं आपल्यालाही आयुष्यभर अबाधित ठेवतात. टरफलातले तंतुमय पदार्थच आतड्यातून अन्न पुढे सरकत ‘ठोक’ मलविसर्जन करायला मदत करतात, भाग पाडतात.

प्रत्येक धान्यात तसे विषही आहे व अमृतही आहे. प्रत्येक धान्याच्या केंद्रबिंदूला विष आहे व कडेला सालीमध्ये त्याचा उतारा आहे. उतार्‍यासह घेतलेले औषध वर्मी पडते. म्हणून शक्यतो कोंड्याची भाकर, भरपूर उसळी, पालेभाज्या, कोशिंबिरी यांनीच पानातील भाकर दडून जावी. यावर मनसोक्त ताक प्यावं. विनापॉलिश तांबड्या तांदळाचा भात खावा. पॉलिश्ड पांढरा तांदूळ तुम्हालाही पांढरे बनवितो, अर्थात निस्तेज करतो. तेव्हा पॉलिश्ड तांदूळ टाळावा.

दूध

दुधाऐवजी ताक वापरावे. दूध ही महाशक्ती आहे. दूध हे पूर्णान्न आहे. अपुर्‍या देहाला पूर्ण होण्यासाठीच हे अन्न अवश्य द्यावं 

दूध फुटतं मातेला

मातेला दूध फुटतं बाळासाठी, वासरासाठी... निसर्गोपचारात निसर्गसंकेताना खूपच महत्त्व दिले जाते. बाळ थोडं मोठं होताच आईचं दूध कमी होऊ लागतं. आई अन् मूल जिवंत असूनही दूध काही काळानंतर अदृश्य होतं, असे का? तर हे दूध पुढे न पुरवण्यात निसर्गाचा नक्कीच काही संकेत आहे. कुणी याचा विचारच केला नाही. बाळाचा विकास करणारे दूध सततच तुम्ही पीत राहिलात. हे अस्स झालं, हवा माराल तशी इनर फुगते. म्हणून काय झालं? तिच्या मर्यादा लक्षात घ्यायला नकोत का? जो तो हवा मारीतच राहिला. ज्यातून मग ब्लडप्रेशर हजर झाले, मधुमेह हजर झाला, लकवा पोहोचला, हृदयावर हल्ला झाला. कुणी यांना समजूनच घेतलं नाही.

समृद्धी ज्यांची त्यांची

दुधाचा पूर आणलात, रोगांनाही ऊत आणलात. पण कशाचा कशाशी संबंध आहे? हे कुणी पाहायलाच तयार नाही. स्वास्थ्याची सुई हरवली कुठे? कोणी पाहायलाच तयार नाही. ती हरवली एका ठिकाणी व शोधली जातेय दुसर्‍या ठिकाणी. ती हरवली स्वयंपाकघरात... शोधली जातीय दवाखान्यात... डॉक्टरांच्या खिशात. तिथेही सापडेल इंजेक्शनची सुई, दंडाला दंड करायला मात्र जरूर सापडणार ! पण एव्हाना कोण लक्षात घेणार? हरवण्यात व शोधण्यात केवळ काळ गेलाय. त्याने हा केवढा घोटाळा झालाय? घोटाळाच घोटाळा... दुसरं काय?

मुलांनो, काही अन्न स्वत:च पळत असते, काही थांबत असते. जे अन्न लवकर पचते, ते सुपाचक असते. जे उशिराने पचते ते दमदार असते. ज्यांना सतत पळायचे असते, त्यांनी पळणारे पदार्थच खावेत. ज्यांना गाद्यागिरद्यांवर लोळायचे असते, त्यांनी दमदार जड अन्न अवश्य खावं. मागणीनुसार पुरवठा करा म्हणजे अपेक्षेनुसार घटना घडतील.

मित्रहो, स्वत: लांबडे झालेले अन्न, तुम्हाला लांबडेच करते. बहुधा हे अन्न खाऊन झाल्यावर लांबडं व्हावं वाटतं. यावरून लांबडे अन्न लांबडेच करते हे सिद्ध होते. दिव्यात तेल घातल्यावर दिवा मंद होत असेल तर तेलात भेसळ होती हे सिद्ध होते. तेंव्हा पळणार्‍या अन्नाची यादी आहे. थांबणार्‍या अन्नाची यादी आहे. तामसिक अन्न, थांबवणारे व रुतवणारे आहे. चला, काय आहे सात्त्विक व काय आहे तामसिक ते समजूनच घेऊया.

मित्रहो, मातेचं दूध तिच्याच बाळाला कुणीच तापवून पाजीत नाही. जसंच्या तसं धारोष्ण देण्याची पद्धत आपल्या सर्वांना माहीत आहे. धरतीमाता म्हणजेच काळी आई ही माझी माता. तिची बाळं म्हणजे आम्ही सारी जनता... तिचे स्तन म्हणजे झाडे-झुडपे... तिचं दूध म्हणजे त्यांतले रस, ज्यूस. बस्स इतकं कळलं की पुरे आहे.

सगळ्या फूलभाज्या, फळभाज्या, पालेभाज्या व सर्व फळे हे सारेच पळणारे व पळवणारे पदार्थ ठरलेत. हे सहज पचतात. यांना शिजवलात की  ते स्वत: मुडदे बनतात व हेच मुडदे आम्हालाही मुडदे करतात व आपल्याला तरी मुडदे व्हायचे नाही. पान, फुल, फळ, खोड व मूळ ही पाचही अंगे आमचे पंचप्राण आहेत. मुडद्यांचा आहार हा खरा तर राक्षसी आहार आहे, तामसी आहार आहे. हा आहार घेतल्यावर साहजिकच लांबडे व्हावे वाटणार. कुंभकर्ण बनावे वाटणार. बकासुर व्हावे वाटणार. कारण अन्न तसे मन व पाणी तशी वाणी आपल्याला माहीत आहे. तात्पर्य, निदान निम्म्यापेक्षा अधिक भूक कच्चे अन्न खाऊन शमवूया.

क्रमश:

डॉ. शशी पाटील  समाजातील  प्रत्येक घटकासाठी  स्वास्थ्य  मार्गदर्शन करायचे. त्यांचा सेवा-संपर्क लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खूप मोठा होता. त्यांनी अनेक शाळा कॉलेजातून लहान मुलांसाठी व तरुणांसाठी स्वास्थ्य जागरणाचे विविध उपक्रम राबविले.  त्यांनी 'जीवनाच्या बाराखड्या' या नावाचा उपक्रम लहान मुलांसाठी  अनेक वर्षे राबवला, जो मोठ्यांसाठी ही खूप उपयुक्त आहे.  त्यांनी या उपक्रमातून हजारो  बालकांना व तरुणांना समाजामध्ये 'स्वास्थ्य रक्षक' म्हणून कार्य करण्यास प्रेरित केले.  प्रस्तुत लेखस्तंभातून, 'जीवनाच्या बाराखड्या' या त्यांच्या उपक्रमातील व्याख्यानांचे संकलन, आम्ही क्रमश: प्रकाशित करीत आहोत..

Previous Post Next Post