मुळनक्षत्री : एक प्रेरणादाई जीवनधारा : भाग - 2
शेजारचे ‘अण्णासाहेब टारे’ फ्रेम मेकर हे आमच्या वडिलांचे जिगरी दोस्त, पुढे त्यांनी एकत्रच इंदुमती राणीचा बंगला खरेदी केला. ते अण्णासाहेब, मी शाळेतून दप्तर घेऊन येत असताना माझ्या मानेला पकडून, ‘हे पोरगं साधारण नाही’ असे वडिलांना म्हणायचे आणि शेजार्यांनाही म्हणून दाखवायचे.
ते आमच्या परिवाराचे एक हितेच्छू होते. त्यांच्या फोटो फ्रेमच्या दुकानामध्ये ते बाहेर गेलेले असताना मी शिरत असे. कपाटातील चित्रे-तस्वीर पाहत असे. प्रत्येक गोष्ट हात लावून त्याची कुवत लक्षात घेत असे. ते आले की मी पळून जात असे.
त्यांच्या शेजारी ‘हरिभाऊ भोजणे’ हे टेलर (शिंपी) होते. त्यांच्याही मशीन वरती ते नसताना मी बसत असे. हे यंत्र चालतं कसं?, सुई दोरा ओवतो कसा?, बॉबीन मधला दोरा खेचतो कसा? या सर्व गोष्टींची माझ्याकडून पाहणी व्हायची. भोजणे आले की पाय उडवत पळणं व्हायचं. यातून ‘खोडकर मुलगा’ हा शिक्का माझ्यावर पडायचा. प्रयोगवीर जन्मताना असाच जन्माला येतो.
एकदा वडील मला बेदम मारत होते, खोली बंद होती. निसटायला, पळायला कुठेच जागा नव्हती. मी तातडीने मांडी घालून बसलो. डोळे बंद केले, मंदिरात भगवान महावीर कसे बसतात अगदी तसेच. महावीरावर भक्ती असलेली व्यक्ती मार देण्याचे सोडून देईल या आशेवर मी होतो. तरीपण पाठीत रपाटे पडत होते, मी ऐकत होतो. तेच चित्र, शीस पेन्सिलने कागदावर उतरवून वडिलांचा रागीट चेहरा आणि माझी ध्यानस्थ मुद्रा चाळीच्या संडासवरती चिकटवली.
कोरगावकर बिल्डिंगमधल्या चाळीत एकच संडास होता. सगळे चाळीतले लोक मला विशेष करून ओळखत असत. माझ्या कलागुणांना जाणत असत, मला दाद देत असतं. रक्षण-संरक्षण करत असत. एकदा वडिलांनी डोळयात चटणी घातली होती. तेव्हा शेजारच्या कुसुम नावाच्या भगिनीने माझे डोळे धुतले होते.
बर्याच वेळेला माझ्या डोक्यात जेव्हा नाइलाज व्हायचा तेव्हा-तेव्हा आत्महत्येचा विचार यायचा. एकदा अशीच मी दगडांची खाणं पाहिली होती. ती माळावरती शाळेच्या जवळ होती. दुपारची वेळ होती. ‘बाबुराव बोरगावे’ हा माझा मराठी शाळेतला कष्टाळू मित्र आपल्या वडिलांच्या बरोबर सायकल रिपेरिंगला मदत करत होता. मी त्याला माझा हा मनोदय सांगितला. त्याबरोबर तो म्हणाला, “शशीकांत, असलं काही करू नकोस. माझा एक भाऊ (शौकत अली) या काचेच्या खोलीमध्ये बसून वॉच मेकरचे काम करतोय तू ते जरी शिकलास तरी तुझे जीवन भागून जाईल. तू असा काही विचार करू नकोस.”
त्या प्रामाणिक मुस्लिम मित्राने मला आधार दिला, मलाही ते पटले. अशा अनेक बिकट प्रसंगी मी महावीर धोत्रे, सुरेश निमगोंडा पाटील, आप्पासाहेब बेळकुडे, आण्णा नांद्रेकर यांच्या आश्रयाला जात असे. ते त्या काळात मला सोडून जेवत नसतं. मानसिक आधार देत असतं, समजूत काढत असतं.
एकदा काय झालं मी माझ्या आजोबांना मी स्वतः रचलेल्या, केलेल्या कविता ऐकवत होतो. तेव्हा आजोबा मला म्हणाले, “अरे शशी! हे सगळचं लोणचं आहे. भाकरीबरोबर लोणचं ठीक आहे. आधी गरज आहे ती भाकरीची. तेव्हा तू भाकरीच्या मागे लाग. तू चार आणे मिळवून-कमवून आणतो का बघ!”
“त्यासाठी काय करायला हवं.” मी आजोबांना विचारलं
आजोबा म्हणाले, “लोहाराकडे जाऊन चार घणं मारतो का बघ. भाकरीसाठीच लेका शिकायला पाहिजे. त्या भाकरीबरोबर हे लोणचं ठीक आहे.” आजोबा माझे रसिक असून हुशार व चाणाक्ष. ते एकदा मला म्हणाले, “तू जगाच्या पाठीवरती कुठेही जा. तू माळावरती एका दगडावरती जरी जाऊन बसलास तरी तुझ्या भोवती माणसे गोळा होतील. ती तुला उपाशी ठेवणारचं नाहीत.” हा दूरगामी विचार मी विसरलोच नाही.
साने गुरूजी वसाहत ही माळावर होती. माझे सवंगडी मित्र, “इथे कोण पेशंट येणार? तू उपाशी मरशील. चोरा-चपाटयांचा मार खाशील.” असे म्हणत असताना, माझ्या व्यासंगाने त्या माळावरती पंतप्रधान मोरारजीभाईंना देखील खेचले.
त्या काळात मी आठवीला होतो. ‘बाहुबली गुरूकुल आश्रम’ येथे कुंभोजहून जाऊन-येऊन शालेय शिक्षण घेत होतो. आजोबांचा स्पष्ट उच्चार माझ्या मनाचा ठाव घेत असायचा. एकदा आजोबांच्या लेकीचा मुलगा ‘शांतीनाथ आडमुठे’ हे जे डिग्रजला असतात. “याचे दोन्ही पाय अधिक पळतात, तेव्हा काय करूया बर? तुझा पाय बदलू या का? त्याचा तुला आणि तुझा त्याला जोडू या का?” असं आजोबांनी मला विचारलं.
त्यावेळी मला विलक्षण आनंद झाला. मान उभा हालवत मी त्याच्याजवळ गेलो. त्यांनी हातात कडबा तोडण्याची कुर्हाड घेतली. “आधी कोणाचा तोडावयाचा?”
मी म्हणालो, “शांतीनाथचा मग माझा.”
आजोबा म्हणाले, “तुला चांगला पाय पाहिजे तर आधी तुझाचं पाय तोडायला पाहिजे.”
मग मी राहू देत म्हटलं.
मी जेव्हा बाहुबलीला येऊन-जाऊन करत होतो. सगळा स्वयंपाक मलाच करावा लागत होता. गव्हाच्या चपात्या अन् दुधातल्या शेवयांची खीर हेच मला सोपं जायचं. नाका-तोंडाला लागलेलं पीठ पुसत-पुसत मी बाहुबलीला शाळेत जायचो. स्वयंपाकाच्या आचार्यापासून गवंडीकाम, लोहार काम, धोबीकाम, सुतारकाम, वायरमन, चर्मकार अगदी न्हाव्यापर्यतची सर्व कामे करण्याचा प्रयत्न करत असे. हे असे स्वावलंबन! हे माझ्या परिवारातल्या भावंडामध्ये माझे हे वैशिष्टय म्हणावे लागेल. धुतलेल्या कपडयांची इस्त्री धोबीघडी घालून उश्याखाली ठेऊनच होत असे. त्यामुळे मी भावंडांच्या आणि मित्रांमध्ये ठळक दिसत असे.
मी साधारण आठवी इयत्तेत होतो. श्री. पुजारी सर, जयसिंगपूर हायस्कूलचे हेडमास्तर होते. त्यांनी मला शाळेतून हाकलले होते. त्याचे निमित्त काय होते तर, त्या काळात पाच रूपये शालेय फी असायची. घरातून ती मला दिली जायची नाही, म्हणून मी नादारीचा अर्ज भरला. तेव्हाही पुजारी सर म्हणाले होते, “तुमच्या वडिलांना शाळा काढायला सांगा. आम्हाला नोकरीला ठेवा म्हणावं, अशी तुमची परिस्थिती असताना तुला नादारी मिळणार नाही. चल तू घरी जा. फी आण व मगच शाळेला ये.”
इकडे बाप फी देईना, तिकडे गुरूजी शाळेत बसवेना. काय करावं तरी काय?
‘डी.डी.मगदूम सर’ माझ्या मराठी विषयाचे सर, मी त्यांच्याकडे गेलो. मी त्यांच्या घरी मराठी विषयाच्या प्रश्नासाठी अधून-मधून जात असे. तेव्हा बूट पॉलिशचा डब्बा व ब्रश त्यांच्याकडे पाहिला होता. त्याची मी त्यांच्याजवळ मागणी घातली. “काय करतोस रे त्याचं?” असं त्यांनी मला विचारलं.
मी म्हणालो, “मिरजेच्या रेल्वे स्टेशनवर जातो व कुणाचे तरी बूट पॉलिश करतो व चार पैसे मिळवतो. तुमचा नवा कोरा डबा आणि पॉलिशचा ब्रश परत करतो व शाळेची फी भरतो.”
“हे मी तुला करू देणार नाही,” सर उत्तरले.
“मी तुझ्या थोरल्या भावाचा वर्गमित्र आहे. तु कोणत्या अडचणीत आहेस? हे मी त्याला कळवितो.” त्याकाळी थोरले भाऊ अर्थात एन. जे. पाटील, एम. बी. बी. एस. च्या पहिल्या वर्षात होते. पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेज येथे शिकत होते.
डॉ. अण्णा सुटीत कधी-कधी घरी येत असतं. एकदा आईची आई (आजी) व डॉ. अण्णा एका कॉटवर बसले होते. अण्णा आजीला म्हणाले, “शशीकांतशी हे लोक असे का वागतात? हे काय मला कळत नाही. तुम्हाला माहीत आहे का आजी?”
हे आजीलाही कोडचं वाटतं होतं.
यातून मला या दोघांचीही सहानुभूती असल्याचं जाणवत होतं. त्यात माझ्या कुंभोजच्या आजोबांचीही साथ होती. या अख्खा परिवारात हे तिघे जण माझ्या पार्टीची माणसे मला वाटत होतीत.
मी माझ्या भावना इत्थंभूत, आँखो देखा हाल पत्ररूपानी कळवत असें. भाऊ आपल्या मित्रांसमोर पत्र वाचत राहिला. त्यामुळे मित्रपरिवारामध्ये माझ्याशी ही एक गोतावळा तयार झाला होता. त्यामध्ये रवीन्द्र टोणगावकर (मामा) हे डॉ. अण्णांचे रूम पार्टनर होते. गांधीवादी व अत्यंत हुशार, स्कॉलर विद्यार्थी व सोज्वळ व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांचे आई-वडिलही साधे व गांधीवादी, उदार होते. हे धुळया जवळच्या दोंडाई या गावचे. आज सोशल थोर सर्जन आहेत. यांनी आता ग्रामीण आरोग्य सुधारणा, शस्त्रक्रिया विभागामध्ये खूपच सामाजिक काम केले आहे.
टोणगावकरांनी एकदा मला तेव्हाचं पाच पैशाचे कार्ड लिहिले होते. ते कार्ड छापील अक्षरासारखे होते. शाईही काळी होती. त्यांनी लिहिलं होतं...
चि. शशीकांत यांस,
अनेक गोड आशीर्वाद.
तुझी माझी ओळख नाही पण तरीसुद्धा पत्र लिहितोय.
तुझ्या अण्णांना तू लिहिलेली टपाले, आम्हीही सगळेच त्याचे मित्र एकत्र पत्र वाचतोय म्हटलं. आम्हाला तुजकडील हालहवाला समजतोय. यावरून एक माझा निष्कर्ष आहे.
‘एकतरी तू मागच्या जन्मी लेखक होतास किंवा या जन्मी खूप मोठा लेखक होणार आहेस.’
मला तेव्हापासून नेहमीच चांगल्या अक्षरांचा मोह होतोय. चांगली अक्षरे दिसली की, त्या मजकूरावरच नाही तर, मजकूर लिहिणार्या व्यक्तीवर माझं प्रेम जडायचं, मग ती स्त्री असली व पुरूष असला तरीही, कारण माझी अक्षरे चांगली नव्हती. मी ते पत्र जपून ठेवून अनेकांना दाखवित राहिलो. ते पत्र झिजून-झिजून अखेर संपलं.
माझे कौतुक कुणीतरी केल्याचा मला खूप आनंद झाला. मी ही काही कमी नाही याची मला जाणीव झाली. नव्या उमेदनी पुन्हा लिहू लागलो. माझे बंधू त्या मित्राचे तोंड भरून कौतुक करत. आजही ती त्या दोंडाईचा धुळे पंचक्रोशीतली फार मोठी व्यक्ती आहे. त्यांची शिफारस ही माझ्यासाठी परमोच्च होती.
डी. डी. मगदूम सर! यांनी मला त्या काळात बूटपॉलिशचा हा व्यवसाय करू दिला नव्हता. स्वतःच्या खिशातील पैसे माझ्या शालेय फी साठी दिले होते. शाळा सुरळीत सुरू झाली. एन. जे. पाटील नंतर त्यांचे पैसे परत करीत असतं.
घरी कुटुंबीयांमध्ये वाद असायचा. घर अशांत असायचं. घरात भांडण असायची. कधी-कधी मी उपाशी असायचो. शाळेलाही उपाशीच जायचो. आईला इतक्या सगळयांचीच उठाठेव होत नसायची. आई अंथरूणात कोसळलेली दिसायची. कधी वडील आईला बदडायचे. सगळयाचं कारण ‘शश्याचा विकास’ हेच होतं. यांची एक समज होऊन बसली होती. ‘शश्याचा विकास म्हणजे आमचा भकास’ शेवटी मला जेवणच देऊ नये. असा वडिलांनी वटहुकूम काढला.
त्या चाळीत आमच्या राबत्या खोलीत चिपरी, जैनापूर, उमळवाड, कोथळी, दानोळी येथील काही विद्यार्थी कम्बाइन मध्ये राहत असतं. त्यांना मी उपाशी आहे हे कळल्यावर प्रत्येकाने आपापल्या डब्यातील एक-एक घास एकत्र बाजूला केला व माझे जेवण बाजूला तयार होऊ लागले.
कधी श्री. आदप्पा रत्नपारखे भाजी द्यायचे. कधी नयनची आई (घोलकर) जेवायला बसवायची. असं होऊन मी एकूण चाळीचा झालो होतो. एकदा वडिलांनी हे सर्व पाहिलं व वडिलांचा जळफळाट झाला.
त्यात डॉ. एन. जे. भावानी आपले थिटे पडणारे कपडे शशीकांतला बसतील या भावनेने पाठवले. त्या कपडयात हॅट, बूट, टाय पण होते. त्या वयात मला आणखीन काय पाहिजे होतं? मी ते घातलं आणि चांगलाच नटलो. त्या काळात देवआनंदचे सोंग शिखरावर होते. मला माझे मित्र देवआनंद म्हणू लागले. वडिलांचे मग काय झालं असेल? वडिलांकडून भावाला शिक्षणासाठी मिळत असलेले दीडशे रूपयाचे मानधन त्यांनी बंद केले. भावाची नाकेबंदी झाली.
कुंभोजच्या आजोबांनी काही दिवस, माझी आबाळ होत असलेली पाहून हा कुठेतरी मरेल म्हणून खांद्यावरती घेतलं आणि मला कुंभोजला घेऊन आले. जिथं शेतीवाडी, चुलते, काका-काकी होते. ते काका-काकी म्हणजे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांचे आई-वडील होते.
जेव्हा-जेव्हा आजोबा म्हशीच्या धारा काढीत, त्या-त्या वेळेला रेडका बरोबरच मलाही तेथेच उभा करीत. फेसासकट निघालेल्या पांढर्या दुधाचा पेला माझ्या तोंडाला लावीत व मी मान वर करून पेला रिकामी करीत असे. पांढर्या दुधानी उमटलेल्या मिशा मी हाताच्या कोपर्याने पुसे. आजोबांनी विचार केला. समोर असलेल्या महादेवाच्या देवळात शाळा भरते. त्या शाळेतही मला दाखल केलं. त्या वेळेस मी दुसरी-तिसरीत असेन. आजोबांची हुशारी, शब्दातील स्पष्टता माझ्या लक्षात यायची.
एकदा मी धडा वाचत असताना ‘कमल वैरण टाकत हाय’ असं वाचलं. आजोबांनी शेण काढत-काढतच जमिनीला चिपाड आदळून ‘अ’ ला काना आहे की नाही बघ? असे म्हणाले. तेव्हा मी मुद्दाम विचारायचो, “तुम्हाला कसे माहिती आजोबा?, पुस्तक तर माझ्या हातात आहे.”
“माहिती आहे मला, तू सरळ वाच” असं ते म्हणायचे.
आजोबांमुळेच हळू-हळू माझ्या वाणीतील स्पष्टता, स्पष्ट झाली. चुलते मला म्हणायला लागले, “शशीकांत हा आमच्यात बामणी वाटतोय.”
घरात शेतातील दाण्यादुण्यांची रास असायची. पोत्यांची थप्पी असायची. त्या थप्पीवरती मी चढायचो. शाळेतील “झेंडावंदन’ आणि ‘वंदे मात्रम’ यांची नक्कल करायचो.
आजोबांचे थोरले ब्रम्हचारी भाऊ सातगोंडा पाटील यांना ‘पार्किंसन’ हा रोग होता. त्यांना उठ-बस जमत नसे. ते मला हातात हात द्यायचे व उठव म्हणायचे. मग मी त्यांना उठवायचो, कधी नाकारायचो. “अरे! मी तुला उपकार केले होते. तुला खाऊ दिला होता, सगळ फिटलं का?”
“फिटलं! फिटलं!” मी म्हणायचो आणि हात झाडायचो त्यावेळी काका-काकी हसायचे.
दारात, गल्लीत गारेगारवाला, चिरमुरेवाला घंटी वाजवत यायचा, तर ते पोत्याकडे जाऊन ज्वारी (धान्य) दोन ओंजळ घ्यायचे व माझ्या ओटीत ओतायचे, मी ते घेऊन जायचो. ही भाषा संकेताची असायची, ते त्याला देऊन गारेगार, चिरमुरे खायचो, हेच ते उपकार होते.
चुलतीला दुधाचा पेला दिसू नये याची काळजी आजोबा घ्यायचे. कारण चुलतीची मुले होती, म्हातारा पार्सिलिटी करतोय असा आक्षेप चुलती घेऊ नये म्हणून! माझ्यावरील आजोबांचे प्रेम पाहून चुलतीने शेवटी ‘शश्याचा आजोबा’ असं टोपणं नाव टाकलचं.
एकदा मला शेतावर खळयावरती आजोबांनी झोपवलं. त्यावेळेस मी दहा वर्षाचा असेन. आजोबा खळयावरती रात्रपाळी करत होते. मध्यानं रात्रीचं मी पिकांमधून झोपेतच चालत गेलो म्हणे. एका विहिरीच्या कडेला पुन्हा झोप लागली. तिथं दोन स्त्रिया सकाळच्या वेळेस जळतणासाठी आल्या होत्या.
“अगं! ह्यो गोर्या रामूचा नातू दिसतोया!” असं म्हणाल्या.
त्यांनी मला काखेत घेतलं आणि आजोबांच्या हवाली केलं. ते अंतर होत दोन-चार किलोमीटरचं. बारा बलुतेदारांपैकी ती सुंदरा नावाची महारीण होती. तिच्या कुटुंबात जैन धर्म पाळला जायचा. नमोकार मंत्र म्हटला जायचा. महारीण असूनही तिच्यावर जैन धर्माचे संस्कार होते.
एकदा माझे डोळे आले होते. आजोबांनी मला उचललं आणि दारातून जाणार्या मेंढयांच्या कळपात नेलं. शेळीच्या शेपटीचा तुरा माझ्या डोळयांवरून फिरविला. शेजारच्या भावकीतल्या कुसुम काकीने हळदीचा पाण्यात बुडविलेला पिवळा रूमाल डोळे पुसायला दिला.
एकदा मला आठवतं, एक लांब, उंच, ब्राम्हण गृहस्थ, ज्यांचं नाक लांब होतं आणि ज्यांना मधून-मधून नाक खाजवायची सवय होती ते आले होते. रात्री आठची वेळ होती. शेतीची खरेदी-विक्रीची बोलणी चालू होती, मध्ये कंदील होता. चुलते, आजोबा, ते ब्राम्हण गृहस्थ व मी असे चौघेजण आम्ही बसलो होतो.
त्या ब्राम्हण व्यक्तीने नाक खाजविले की मी लगेच नाक खाजवित होतो. जशीच्या तशी नक्कल करत होतो. हे सगळं पाहिल्यानंतर चुलत्यांनी डोळे वटारून दटावण्याचा प्रयत्न केला. परंतु मी पुन्हा तीच नाक खाजवण्याची नक्कल करीत होतो. आता हा काही ऐकत नाही म्हणून चुलत्यांनी कंदीलच उचलून बाजूला केला. कारण, त्या ब्राम्हण व्यक्तीने खाजविलेले मला दिसू नये व मी केलेली त्यांची नक्कल त्यांना समजू नये. याची काळजी कंदील उचलून घेतली गेली.
पुढे चुलते व वडील यांच्यात वाद आला. निमित्त काय तर आमच्या वडिलांना चार मुली, लग्नात हुंडा देण्याची प्रथा. या चारही लग्नाच्या हुंडयात मोठी रक्कम सामाईकच जाणार. चुलत्याला एकच मुलगी होती. त्याआधी आपण वेगळं व्हाव ही कुजबुज माझ्या कानी आली. मी जशीच्या तशी वडिलांना कळविली.
वडिलांच भावावर प्रेम व विश्वास असल्याने, ‘चौवगोंडा माझी थुंकी ओलांडणार नाही, असं होणं अशक्य आहे.’ या विश्वासावर वडील राहिले आणि एके दिवशी चुलते व आजोबा दोघेही जयसिंगपूर ठिकाणी अचानक इस्टेटीची मोजदाद करायला आले. ‘शशीकांत खरं सांगत होता तर!’ याची वडिलांना नंतर खात्री पटली.
बर्याच वेळेला कुंभोज ते जयसिंगपूर फेर्या व्हायच्या. त्यामध्ये कुंभोजच्या शाळेत तशा नोंदी व्हायच्या एकंदर माझ्या उनाडपणामुळे आणि माझ्या विषयीच्या गैरसमजुतीमुळे वडिलांना वाटू लागलं की याला ‘रिमांड होम’ मध्ये ठेवणे योग्य. त्यावेळचे रिमांड होम होतं ‘बाहुबली गुरूकुल आश्रम’ खटयाळ आणि वांड मुलांसाठीच खास या आश्रमाची निर्मिती करण्यात आली होती.
तो काळ होता 1961-62 चा मी त्यावेळेस इयत्ता आठवीत होतो. शेवटी आश्रमात नाव दाखल केलं. टेक्निकल आठवीचा वर्ग मी निवडला. सुतारकाम, लोहारकाम त्यात शिकवलं जायचं. मी मुळातचं स्वावलंबन प्रिय. सुतारावर, लोहारावर आपण अवलंबून राहू नये. केस कापणे व चप्पल दुरूस्तीही मी स्वतःच करीत होतो कोणत्याही कामासाठी मी नडू नये असं मला वाटायचं.
त्या काळात मी आल्या अनुभवावर एक कविता लिहिली. कवितेचे ध्रुवपद होतं ‘ज्योतिवरील काजळीला हलविले, काय ते माझे चुकले’ ही लिहिलेली कविता मी वर्गशिक्षकांना दाखविली. त्या कवितेत समाजातील निंद्य व्यक्तींचे ते वर्णन होते. त्यांनी ती अशुद्ध कविता शुद्ध केली. मी ती ‘जैन बोधक’ पाक्षिकाकडे सोलापूरला पाठविली. ती छापूनही आली.
त्याचबरोबर माझे कव्हरींग लेटरही छापले गेले. एकूण ‘बालकवी शशी’ तिथेच शिक्कामोर्तब झाला.
तो अंक वडिलांच्या घरी यायचा. वडिलांचा तिळपापड झाला. त्यांनी तडक आश्रमातील संचालकाकडे धाव घेतली. ‘माणिकचंद भिशीकर’ हे संचालक होते. वडील म्हणाले, “आताच्या आता शशीकांतला आश्रमातून हाकललं पाहिजे.”
तेंव्हा गुरूजी म्हणाले, “पण का?”
“कारण त्यांनी ही कविता माझ्यावरतीच लिहिली आहे.” ‘जैन बोधक’ पाक्षिक समोर टाकून वडील म्हणाले.
तेंव्हा गुरूजी म्हणाले, “यामध्ये समाजातील निंद्य, चांडाळ व्यक्तींचे वर्णन आहे, स्वतःचे कशाला म्हणता?”
“ते माझचं आहे.” असं वडील म्हणाले.
‘चोराच्या मनात चांदण’ आणि खरचं ते त्यांचचं होतं. जी वागणूक वडिलांकडून मला मिळाली होती त्या वागणुकीचे वर्णन मी त्या कवितेत केले होते. ही गोष्ट खरी होती. कारण प्रत्येक कवी अनुभवावेच दर्शन कवितेत घडवत असतो. शेवटी माझी उचलबांगडी झालीच. वडिलांचा विजय झाला. मला माझ्या गाशा गुंडाळावा लागला. मी आता जाणार तर कुठे जाणार? याचा विचार करू लागलो.
तिथेच ‘पद्मनाभ’ हा मिस्त्री, संस्थेचे बांधकाम विभाग पाहात होता. त्यांची देहयष्टी लालबहादूर शास्त्री सारखी होती. तसेच कपडे, तशीच टोपी, तसेच जाकीट सर्व काही खादीचे होते. शिवाय ते ब्रम्हचारी होते. ते शाहिरी करायचे, डफावरती गाणी म्हणायचे. ते माझे मित्र झाले.
ते मला म्हणाले, “मी फक्त भातच करतो, तो थोडा वाढविता येईल, तू माझ्याकडे रहा.”
मी काही दिवस त्यांच्याकडे काढले. तोपर्यंत वडील पुन्हा माझा शोध घेऊ लागले. याला कोणी आश्रय दिला. शेवटी पद्मनाभ या मेस्त्रींचं नाव पुढे आलं. त्यांनाही कामावरून कमी करण्याचं फर्मान काढलं. तो बिचारा हिरमुसला. काकुळतीन मला म्हणू लागला,
“शशीकांत तू आता आकाशातून पडला आहेस असं समज? आणि मी सांगतो तिथे जायचं. मी सोबत चिठ्ठी देतो.”
‘जिथे होतकरू मुलांना, अनाथ मुलांना सांभाळलं जातं.’ त्या संस्थेला एक टपालही लिहिले व एके दिवशी एस. टी. मध्ये बसवलं, ती एस. टी. पुण्याहून जाणार होती. तसं मी भावाला कळवलं.
पुण्यात तर माझे भाऊ होतेच. ते मित्रांसह सगळेच मला भेटण्यासाठी स्टॅण्डवर आले. मी एस.टी. तच बसून भावाला खिडकीतून निरोप देत होतो.
“आता ही माझी शेवटची भेट.” तेव्हा भाऊ म्हणाले, “असं काही समजू नकोस, आता आम्ही सगळेच डॉक्टर झालोय. तू आता गप्प खाली उतर! आम्ही तुझा पाय दुरूस्त करतो. तुझे पंख घट्ट होऊ देत. मग नंतर कुठे उडून जायचयं तिथे जा.”
तरीही मी त्यांना येणार नाही, उतरणार नाही अस सांगत होतो. तोपर्यंत माझी वळकटी आणि ट्रंक कोणीतरी दोस्त मित्रांनी खाली उतरविली, ते भाऊचेच मित्र होते, माझे अपरिचित होते. त्यामुळे माझा नाइलाज झाला. मला उतरावेच लागले. शेवटी भावांच्या निवासस्थानी बोर्डिंगमध्ये आलो.
लगेच चार दिवसात ससून हॉस्पिटलात जो पाय पोलिओ ग्रस्त व घोटयाच्या पुढे पंजा लोंबत होता त्याचं ऑपरेशन केले. तो फिक्स करण्यासाठी प्लास्टर केले. डॉ. ताटके सर ऑर्थोपेडिक (हाडाचे तज्ञ) होते. हे माझ्या भावांचे सर होते. त्यांनी त्या ऑपरेशनचे नेतृत्त्व केलं. प्लास्टरने बोटापासून जांघेपर्यत पाय त्यामुळे झाकून गेला. त्यामुळे मी आणखीन अपंग झालो. माझी हालचाल मंदावली.
मैला, घाम, मूत्र, पू, रक्त हाड यांच्याशी खेळ म्हणजेच वैद्यकीय क्षेत्र अशी माझी समज होती, हे स्वतःच्या अंगावरती उडवून घ्यायचं ही माझी घृणा होती.
कारण अण्णा आधी-मधी सुट्टीत घरी येत होते. तेव्हा इतर ठिकाणचे इष्ट मित्र, नातलग, जे रोगी होते, ते सल्ला उपचारासाठी घरी एक व्हायचे. तेव्हा त्यांची हाणामारी, आक्रोश मी पाहत होतो. धाकटा भाऊ म्हणून मी त्यांची सेवा करत होतो आणि मलाच ती उठाठेव करावी लागत होती. कारण माझा नाइलाज होता. तेव्हाची माझी ती शिसारी होती.
अख्खं वैद्यकीय क्षेत्र ‘ससून’ म्हणजे नर्सेस, डॉक्टर्स, वॉर्डबॉय, आया यांना मी डॉ. एन. जे. पाटीलांचा भाऊ, निव्वळ एवढयाचं भांडवलीवर, एवढा प्रतिसाद, एवढी इभ्रत देत होते की काही विचारूच नका. डॉ. एन. जे. पाटील ही एक दिव्यव्यक्ती समजली जाई. ते कॉलेजचे जी. एस. (जनरल सेक्रेटरी) होते.
त्यावेळेस माझे वय वीस वर्षाचे होते. गायकवाड नावाची नर्स तेथे स्पंजबाथसाठी येत असे. हळूहळू परस्परांत जिव्हाळा वाढला. हा जिव्हाळा काहीसा भावांना कळला. आधीच माझ्याकडे येणारी प्रेमाची अनेक पत्रे भाऊ वाचत होते.
“माझ्यावर अजूनही कोणी कसं प्रेम करत नाही?” असं विनोदाने म्हणत होते. एकूणच वैद्यकीय क्षेत्राविषयी, सुश्रुषेविषयी गोडी, ओढ निर्माण झाली.
शिरोळ तालुक्यामध्ये आमदार-खासदार असलेले ‘रत्नाप्पा कुंभार’ यांना लोक देव मानत. शिरोळ तालुका काँग्रेस निवडणूक प्रचार समिती यांच्याकडे मी ‘रत्नाप्पाण्णा’ यांच्यावरती लेखमाला गुंफली होती. निवडणूक प्रचार मोहिमेत ती माझ्या फोटोसह प्रकाशित व्हायची.
“पूर्वी गांधीचौकात चाललेल्या अनेक समारंभात मुठी आदळून जे मत व्यक्त केले जात होते. तसे माझे मत व्यक्त करण्यासाठी काय करावं लागेलं? काय शिक्षण घ्यावं लागेल?” असं मी चाळीतल्या आदप्पाला विचारायचो.
तेव्हा ते मला म्हणायचे, “त्यासाठी बॅरिस्टर व्हावे लागेल.” मी त्यांना म्हटलं, “मग मी तेच होणार.” बर्याच लहान मुलांना आजही विचारा, “मोठा झाल्यावर तू कोण होणार?” ते म्हणतात, “मी पोस्टमन होणार, पोलीस होणार, शिक्षक होणार.”
शेवटी ऐट-थाट ज्या सोंगातून व्यक्त होते, तेचं सोग मुले बहुधा पसंद करतात. तस मला माझा मुद्दा टेबल आदळून सांगता आला पाहिजे म्हणून मी ‘आर्टस् साइड’ निवडायचं ठरवलं. एम. ए. पीएच. डी. व्हायचं ठरविलं. शेवटी काळाच्या मनात काय वेगळचं होतं.
वैद्यकीय क्षेत्राचा लळा लागला आणि वैद्यकीय क्षेत्राच्या मी प्रेमात पडलो. भाऊ मला पायाचे प्लास्टर सोडल्यानंतर आग्रह करू लागले की, “तू लॅब टेक्निशियनचा कोर्स पूर्ण कर. तुला तो सोपा आहे. माझ्या पुढच्या सेवा व्यवसायात तुझी मला मदत होईल.”
रोज दुर्बिणीतून काही गोष्टी समजून घेतल्या. रक्त, लघवी, मल तपासण्याच्या विभागामध्ये स्टार्च टिनोपालचे कपडे, गळाबंद बटण हा त्या काळात माझा रूबाब होता. हा माझा छंद होता, हे माझे वैशिष्टय होतं.
भाऊ बिचारा साधा रहायचा. आधीच तो सावळा होता. उंचीने बुटका होता. बोलणं साधं असायचं. त्यामुळे तो देवमाणूस वाटायचा. तसा तो देवमाणसच होताही.
वॉर्डातून येणारे कॉल्स, मलाच अटेन्ड करावयास लावायचा. एवढं मोठ हे ससून हॉस्पिटल, त्यात ते सरकारी. दाद ना फिर्याद. कोण कुणाला कळत नव्हता? ट्रीटमेंट द्यायला मलाच पाठवायचा. सर्जरीच्या वेळेसही मलाच घेऊन जायचा, इमर्जन्सीच्या वेळी माझ्या भावाला मीच असिस्ट करायचो. रिकाम्या वेळेत ऑपरेशन थिएटर मध्ये गॅलरीतून पाहण्याची व्यवस्था होती. तिथून ती प्रत्यक्ष चाललेली शस्त्रक्रिया मी पाहत राहायचो. सलाईन लावण्यापासून ते टाके घालण्यापर्यंत सगळीच डॉक्टरची, वॉर्डबॉयची पडतील ती कामे करत असल्यामुळे कुठेच मी कमी नव्हतो. असं होता-होता मी असाच डॉक्टर बनलो.
हॉस्पिटलचा मात्र, मी पांढर्या शुभ्र पोषाखात, रूबाबात, राहत असल्याने मी, डॉ. एन. जे. पाटीलच आहे असा बरोबर गैरसमज व्हायचा.
अशी वैद्यकीय सेवा घोटून निघत होती. डॉ. एन. जे. पाटील मात्र एम. बी. बी. एस. च्या नंतर एम. एस. ची परीक्षा देण्याकरिता पुस्तकात चूर असायचे. त्यांच्या सोबत त्यांचे रूम पार्टनर कधी डॉ. अनिल गांधी, तर कधी रवीन्द्र टोणगावकर असायचे. तिथेच जवळपास एक मेस होती. वडिलांनी भावाची मासिक तनखा बंद केली होती. आता तर भावांशीच त्यांनी माझ्याच निमित्ताने अबोला धरला होता. मेसच्या एका डब्यात आम्ही दोघे जेवत होतो. वाटून खात होतो.
डॉ. ए. जी. गांधी जे भावाचे रूम पार्टनर होते, त्यांचे वडील जैन बोर्डिंगमध्ये सुपरिटेंड होते. डॉ. ए. जी. गांधी यांचे शिक्षण पूर्ण झाले होते. ते सर्जन झाले होते. त्यांनी पुण्याच्या सदाशिव पेठेत, पूर्वीच्या रानडे यांचा दवाखाना भाडयाने घेऊन हॉस्पिटल उघडले व मला आग्रह केला कि, “शशीकांत तू मला मिळाला पाहिजेस?” आणि मी त्यांना मिळालो.
त्यांचा जम बसेपर्यंत मी कष्ट घ्यायचे ठरविले. त्यामुळे हॉस्पिटलची फरशी पुसण्यापासून ऑपरेशनला असिस्ट करण्यापर्यंत सर्व कामे मी करत होतो.
पुण्यात महाराष्ट्र बँकेच्या समोर एक हॉटेल होतं ‘हॉटेल सदासुख.’ मला तिथं डॉ. ए. जी. गांधी ‘पर्ल यामाहा’ या हिरव्या रंगाच्या जपानी मोटर सायकल वरून हॉटेल समोर सोडत असत, आणि म्हणत असत, “चापून नाष्टा कर, तोपर्यंत मी आलोच!”
मी चापून नव्हे साधातरी नाष्टा कसा करू? पैसा खिशात होता कुठे? अजूनही त्यांच्या प्रॅक्टीसला गती नव्हती. त्यांचा जम अजूनही बसला नव्हता. त्यामुळे ते तेवढच सांगून निघून जात, मी येताना तुला घेऊन जाईन! परत आल्यावर विचारायचे, “नाष्टा केलास का?” मी फक्त उभी मान हालवत होतो. मी हॉटेल मध्ये जातच नव्हतो. सोडल्या ठिकाणी मी उभा राहत असे.
साधारण हा काळ, सदाशिव पेठेच्या गणेश उत्सवामध्ये गणपतीसमोर कुणी वेडया मुस्लिमाने लघवी केल्याचं निमित्त करून संपूर्ण शहरात हुल्लडबाजी झाली होती, तो होता. कर्फ्यू ऑर्डर निघाली होती. 144 कलम पुकारला होता. रस्त्यावरती सापडेल त्याला झोडपलं जात होतं. मी गांधींच्या हॉस्पिटलच्या गॅलरीतून हे दृश्य पाहत होतो.
पुण्यात असलेल्या वास्तव्याच्या काळात पाणशेत धरण फुटल्याची बातमी होती. त्याचे परिणाम म्हणून समाजामध्ये प्रचंड असंतोष, भिती पसरली होती. या विशेष काळात मी तिथेच होतो. जखमी होऊन आलेल्या समूहाला वैद्यकीय सेवा तोकडी पडत होती.
ससून हॉस्पिटलमध्ये त्या दरम्यान मी ही कामाला जुंपलो होतो. फर्ग्यूसन कॉलेजच्या शेजारी पंडया कॉर्टर्समध्ये एका खोलीत मी निवास करायचो. सोबत रूम पार्टनरही असायचा. वाहतूक सगळी सायकलीनचं व्हायची. मग गांधीच्या हॉस्पिटलकडे जायचं असो वा ससून हॉस्पिटलमध्ये. ओम सायकल दुकान येथून सायकल भाडयाने घेतली जात होती.
साधारणं एक वर्षाच्या वास्तव्यानंतर अण्णांचं शिक्षण पूर्ण झालं. अण्णा कॉलेजमध्ये शिकत असताना अण्णांचं लग्न वहिनीच्या बाजूकडील माणसांनी शाही इतमामाने बेळगाव मुक्कामी करून दिलं होतं. लग्नाच्या अक्षताच्या वेळी मी कोणाच्या तरी संगतीने थिएटरमध्ये जाऊन बसलो होतो. मला लग्नातल्या अक्षतांचं गांभीर्य कळालं नव्हतं. त्यामुळे अण्णा त्यावेळेस नाराज झाले होते.
बेळगावचे ‘शांतप्पा बसाप्पा द्वडड्णावर’ हे सासरचे लोक बडे श्रीमंत होते. त्यांच्या मँगनिजच्या खाणी होत्या. कर्नाटकातील हॉस्पेट बल्लारी या त्यांच्या ऑफीसमध्ये काही दिवस मी मॅनेजर व कॅशिअर या हुद्यांवर सुद्धा काम केलं होतं. कामगारांना खाणीवर पगार वाटपही केलं होतं. अधून-मधून सुपरविजनसाठीही खाणीवर जात होतो.
दरम्यानच्या काळात कोल्हापूर येथे स्टेशनच्या समोर ‘पायशेट्टी’ यांच्या दुकानाच्या माडीवर ‘सर्जिकल क्लिनिक’ नावाचे डॉ. आण्णांनी हॉस्पिटल उघडले. मला अण्णांकडून निरोप आला.
‘तू मला मदत करायला निघून ये.’ आण्णांचा तसा मित्र परिवार मोठा होता. त्यामुळे त्यांचा लवकरचं जम बसला. तेथेही मी फरशी पुसण्यापासून ऑपरेशनला असिस्ट करण्यापर्यंत खपत होतो. अण्णा माझे होते. हॉस्पिटलही माझं होतं. पडेल ती कामं करीत होतो. मला रूबाबात राहणेही आवडत असे. आणि आल्या गेलेल्या बरोबर मिठास बोलणेही मी बोलत असे.
मला लोक छोटे डॉक्टर संबोधायचे. मी नसलो तर, “छोटे डॉक्टर कुठे आहेत?” अशी चौकशी व्हायची. मी ही प्रत्येकाची विचारपूस सौजन्याने करायचो. त्यामुळे लळा-गळा जमायचा. औषधाच्या पुडया देण्यापासून केस पेपर करण्यापर्यंत सारी कामं मी पाहत होतो. दवाखान्याच्या शेजारीच एक-दोन गल्लीच्या अंतरावर आण्णाचं बिर्हाड रहायचं. रिकाम्या वेळेत वहिनी चालू कामकाज बघायला हॉस्पिटलमध्ये डोकावयाच्या.
एकदा मी कुठेतरी बाहेरच्या कामामध्ये व्यस्त होतो. म्हणून माझी कामे अण्णांनाच करावी लागली. त्यावेळी रूग्णांची गर्दी होती. अण्णांच्या कडून एक पेशंट इंजेक्शन घेण्याचं नाकारत होता.
“तुमचे हात जड आहेत. तुमचं इंजेक्शन दुखतयं मला, छोटे डॉक्टरचं देऊ देत. ते येऊपर्यंत थांबतो.” असं म्हणत होता. ही बातचीत वहिनीने ऐकली. तिथेच त्या उभ्या होत्या. वहिनी अण्णाला लगेच म्हणाल्या,
“शशीकांत, नाकापेक्षा मोती जड होतोय.” आधीच सासरचे लोक वहिनीला जड होतं होते. कौटुंबिक प्रायव्हसी नाही म्हणून ओरड असायची. त्यामुळे तरी तिच्या सासरची वर्दळ कमी झाली होती. वहिनी मोठया बडेजाव घरातल्या. त्यांना आम्ही लोक किरकोळ वाटायचो.
येथूनच अण्णा आणि माझ्यामध्ये अंतर येऊ लागले. येथेही भाऊ-बंदकी सुरू झाली. अण्णांनी एके दिवशी मला स्पष्ट सांगितलं की,
“तू आता कुठेतरी जा बाबा!”
मी कुठे जाऊ? आणि काय करू? हा माझ्यापुढे प्रश्न होता.
समोरच गोकुळ हॉटेल होते. “तू असं करं निदान घराकडे तरी जेवायला येऊ नकोस. गोकुळ हॉटेलमध्ये खातं घालून देतो तू तेथे जेवत जा आणि मला मदत करीत जा. म्हणजेच मला कौटुंबिक स्वास्थ्य तरी लाभेल.” असे अण्णा मला म्हणाले. महिना दोन महिने निघून गेले. हॉटेलचे बिलं कोणी भागवलचं नाही. मी आतापर्यंत अण्णा माझे, वहिनी माझी, हॉस्पिटल माझं, ना कुठला पगार होता ना खर्चायला पैसे होते. आपल्यात कसला पगार शेवटी गोकुळ हॉटेल मालकांनी माझं जेवण बंद केलं. माझ्या नाडया गुंडाळल्या गेल्या.
माझ्या डोक्यात नाही ते विचार येऊ लागले. तोपर्यत कुंभोजचे बाबासाहेब गारे (पिठाच्या गिरणीचे मालक, जे आण्णांकडे मधुमेहासाठी अॅडमिट झाले होते) मला कॉटवर बसवून म्हणाले, “तू आता गप्प गावाकडे चलं, मला रोज दोन इंजेक्शन मधुमेहासाठी तरी द्यावीच लागतात. तू ती द्यावीस. तुला त्याची मिळकत होईल आणि तुझ्या गावदरीच्या शेतात हागून-मुतून आलास तरी तुझ्या शेताला फायदाही होईल.” ते माझं मन परिवर्तन करत होते. माझा तणाव कमी करत होते. माझी समजूत काढत होते.
त्याकाळात हॉस्पिटलची उधारी मीच वसूल करीत होतो. मनाला वाटू लागलं काही पैसे बाजूला काढायला हवेत. तसे मी दीड-दोन हजार रूपये बाजूला काढले. जवळच देना बँक होती. तिथे ठेवले. काहीतरी माझ्याकडे आधार हवा होता. काही औषधही मी बाजूला काढली. एक सुटकेस भरली. आता म्हटलं बाहेर पडायला धाडस करावं. बाबासाहेब गारे म्हणतात तसं आपल्या कुंभोज गावी प्रॅक्टीससाठी जावं.
तोपर्यंत अण्णांच्या कन्सल्टींग रूममध्ये देना बँकेचे कॅशिअर कामाच्या तक्रारीसाठी योगायोगाने आलेले दिसले. डॉ. अण्णांकडे सल्ला घेण्यास ते आले होते. त्यांना मी दिसताच त्यांनी मला सॅल्यूट दिला. त्याबरोबर अण्णांनी त्यांना विचारलं “तुम्हाला शशीची ओळख कशी?”
तेव्हा ते सहज बोलून गेले की, “यांच आमच्या बँकेत खाते आहे.” इथं माझ भांड फुटलं.
अण्णांनी विचारलं, “खात्यावरती किती रक्कम आहे?” ते बघून सांगतो म्हणाले. तो पर्यंत एक-दोन दिवस गेले असतील. हे पैसे जप्त होतील म्हणून मी गडबड केली. आधीच मी पैसे काढून घेतले. त्यातून मी एक नवी कोरी लेडिज रॉईली सायकल खरेदी केली. अशा रितीने अण्णांच्याही परिसराचा शेवटी निरोप घेतला.
श्याम कोरेचे हे आमच्या थोरल्या बंधूचे, डॉ. एन. जे. पाटील यांचे वर्गमित्र. त्या काळात दीपस्तंभाप्रमाणे मला धीर धरायला लावीत. कधी घरी घेऊन जात. जेऊ-खाऊ घालत. घर त्यांचं सामान्य होतं. घरात म्हशी होत्या. त्यांचे वडील आडत दुकानात हमाली करायचे. शामरावांचेही नुकतेच लग्न झालेले. तुला काही लागलं तरी तू भावासारखं माझ्याकडे यायचं आणि भावासारखं मागून घ्यायचं हा असा दिलदार मनुष्य वीज मंडळाचा मजूर प्रतिनिधी होता. मोठ-मोठया चळवळीत असायचा. मजूरांच्या कल्याणासाठी त्यांचे प्रयत्न असायचे. फारच जिद्दी मनुष्य. त्यांचा मला आधार वाटायचा. मी जेव्हा दवाखाना पहिल्यांदा उघडला, मी माझ्या स्वतंत्र व्यवासायाला आरंभ केला, तेव्हा त्यांनी चार ओळीचं पत्र लिहिलं होतं.
कोल्हापूर
1 मे 1967
प्रिय मित्र शशीकांत यांस,
स.न.वि.वि.
अदुईक 12 मे 1967 रोजी तुझ्या दवाखान्याचे उद्घाटन आहे. या प्रसंगी मी तुझे अभिनंदन, सुयश चिंतनेस हजर राहणं अत्यंत आवश्यक आहे, पण कोर्टात केस असलेने मला सांगली येथे जाणे अत्यंत आवश्यक आहे. तरी तू माफ करशील अशी आशा करतो. तुझ्या कर्तृत्वाला वावं मिळो. हीच तुझ्यासाठी परमेश्वरा जवळ प्रार्थना. नमस्ते.
तुझा मित्र, श्याम कोरेचे
(हे प्रेरणादायी पत्र मी अजूनही जपलं आहे.)
क्रमश: