डॉ. शशी पाटील,  समाजातील  प्रत्येक घटकासाठी  स्वास्थ्य  मार्गदर्शन करायचे. त्यांचा सेवा-संपर्क लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खूप मोठा होता. त्यांनी अनेक शाळा-कॉलेजातून लहान मुलांसाठी व तरुणांसाठी स्वास्थ्य जागरणाचे विविध उपक्रम राबविले.  त्यांनी 'जीवनाच्या बाराखड्या' या नावाचा उपक्रम लहान मुलांसाठी  अनेक वर्षे राबवला, जो मोठ्यांसाठी ही खूप उपयुक्त आहे.  त्यांनी या उपक्रमातून हजारो  बालकांना व तरुणांना समाजामध्ये 'स्वास्थ्य रक्षक' म्हणून कार्य करण्यास प्रेरित केले.  प्रस्तुत लेखस्तंभातून, 'जीवनाच्या बाराखड्या' या त्यांच्या उपक्रमातील व्याख्यानांचे संकलन, आम्ही क्रमश: प्रकाशित करीत आहोत..

जीवनाच्या बाराखड्या

मुलांनो आपण सगळे वज्रासनात बसुया. मान, पाठ, कंबर ताठ ठेवून डोळे बंद करुया, हात जोडून दीर्घ श्‍वास छातीत भरुन ॐ चा तीनदा उच्चार करुया अन् हळुवार पुस्तक उघडल्यासारखे हात उघडूया... हाताच्या तळव्यातील रेषांकडे पहात म्हणुया !

माझं नशीब माझ्या हातात...    माझं भाग्य माझ्या हातात...

माझं आरोग्य माझ्या हातात...  माझी शांती माझ्या हातात...

माझा धर्म माझ्या हातात...     माझं कर्म माझ्या हातात...

माझं भविष्य माझ्या हातात...   माझं आयुष्य माझ्या हातात...

माझं धनुष्य माझ्या हातात...   त्याचा बाण माझ्या हातात...

त्याचा ताण माझ्या हातात...    माझा कान माझ्या हातात...

माझा प्राण माझ्या हातात...    माझे प्रयत्न माझ्या हातात...

मीच माझा शिल्पकार...        मीच माझा चित्रकार...

मीच माझा पहारेकरी व        मीच माझा मारेकरी...

ॐ शांति शांति शांतिः

उपस्थित स्वास्थ्य जिज्ञासू नागरिक, शिक्षकवर्ग व बाळगोपाळांनो, मी तुम्हाला आरंभीच स्पष्ट करू इच्छितो, मी कोणी डॉक्टर व तुम्ही कोणी रोगी किंवा सामान्य हा भाव ठेवूच नका, ही अढी, ही भिंत नकोच आहे. मी तुमच्याच परिवारातला - आजोबा, काका, मामा, काहीही समजा. मनात येईल ते निःसंकोच विचारा. हा एक सुसंवाद आहे, या गप्पाच आहेत.

मी माझ्या वयाच्या पन्नाशीपर्यंत थेंबे-थेंबे साचत आलेल्या अनुभवांचे गाठोडे तुमच्यासमोर सोडून तुमच्या भावी वाटेतील काटे, दगडधोंडे, खड्डे वेचून काढावेत; तुमचा मार्ग बिनधोक करून द्यावा, हा माझा हेतू आहे.

तुमच्या वयात मला कुणी जर जीवनाच्या बाराखड्या अशा समजावून दिल्या असत्या तर... यापेक्षाही उत्तम आरोग्य किंवा यापेक्षा आणखी क्रांतिकारी विचार तुमच्यासमोर मांडायला, या पुढचा धडा द्यायला मी समर्थ झालो असतो. समजा, जीवनाचा प्रदीर्घ प्रवास जर उभा राहून केला गेला, गाडी घराजवळ आली आणि बसायला जागा मिळाली तर... त्या जागेचा तसा उपयोगच काय?

स्वास्थ्याची तुतारी

तुम्हाला मात्र जीवनप्रवासाच्या आरंभीच ऐसपैस जागा उपलब्ध व्हावी हा माझा हेतू आहे, ही मनीषा आहे. ज्यामुळे तुमच्यातला एखादा तरी स्वास्थ्याच्या क्रांतीची तुतारी निनादवू शकेल.

रोग आणि आरोग्य

मुलांनो... कशाला रोग म्हणायचे व कशाला आरोग्य...? जे जे सुखाचे, ते ते आरोग्य व जे जे दु:खाचे, तो तो रोगच, इथपर्यंत आपण सारेच जाणतो.

व्यत्यय

पण रोग म्हणजे नेमके काय? हे जेव्हा पाहिलं, तेंव्हा ‘रोग’ म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून एक अडथळा - एक व्यत्यय. पायाच्या नखापासून, डोक्याच्या केसापर्यंत प्रवाहित होणार्‍या जीव रासायनिक नैसर्गिक प्रक्रियेत एक व्यत्यय !

मग तो व्यत्यय जिथे असेल त्या अवयवाला अनुलक्षून रोगाची घोषणा केली जाते, झालं... समजा, अडथळा आतड्यात आहे तर पोटशूळ, अडथळा छातीत आहे तर हार्ट अटॅक, दमा, न्यूमोनिया, इत्यादी.

अडथळा नाकात आहे तर सर्दी, अडथळा डोक्यात आहे तर डोकेदुखी. मग अडथळा रक्तवाहिन्यांत असो, मज्जासंस्थेत असो. अडथळा मलाशयात असेल तर बद्धकोष्ठ. अडथळा मग कुठेही असू शकतो. हा अडथळा आहे तरी काय? कशाचा आहे हा अडथळा? तसा अडथळा हा सदानकदा फॉरिन मटेरिअलचा अर्थात विजातीय द्रव्यांचाच असतो असे ही नाही,  तर बर्‍याच वेळा सजातीयच प्रमाणाबाहेर झाले तरी ते विजातीय बनलेले असते व विजातीयांचाच हा सारा अडथळा होतो.

आपण बाहेरच्या जगात पाहिलं आहे, रस्त्याची वाहतूक चालू आहे. नद्यानाल्यांची वाहतूक चालू आहे, गटारींची वाहतूक चालू आहे. भूकंप होतात, वादळे येतात, झाडे उन्मळतात. गाड्यांना गाड्या धडकतात. जगात सतत काहीना काही चालूच आहे. काही निर्माण होत आहे. काही नष्ट होत आहे. काही आडवं पडत आहे, काही उभं होत आहे.

ही आडवी-तिडवी झालेली वाहने वाहतुकीला अडथळा करताच... दुतर्फा कर्णकर्कश हॉर्न आवाज करू लागतात. वाहनं जिथल्या तिथे ठप्प होऊ लागतात. ही आहे ती सूज, याच आहेत त्या कळा, हीच आहेत दुखणी आणि फुकणी.

कुठेतरी गटारीत एक काडी अडकते काय...? त्याला आणखी चार काड्या मदत करतात, जाळी तयार होते. गटार तुंबते. तुंबून वरून वाहायला लागते. असंच माणसाच्या तब्येतीतही होते. मग लकवा होतो. दमा येतो. सांधेवाई येते. मरगाई येते, करटे येतात, किसतोड होतायंत, मग जे काही क्लेश आहेत, ही सारी त्याचीच रूपे आहेत.

विनाकारण

मुलांनो, या जगात विना ‘कारण’ असे इथे काहीही होत नाही. मग एखाद्या झाडाचे पान हलायचे असो किंवा तुम्ही-आम्ही इथे जमलो आहोत हे असो. आपण काही उगीच आलेलो नाही. मी काही उद्देश घेऊन आलोय. तुम्ही काही हेतू ठेवून इथे एकत्र आला आहात. कारणाशिवाय मात्र कुणी इथे आलेलाच नाही.

मला हेच म्हणायचे आहे. आपल्या या जगात काहीही घडताना त्यामागे कारणे ही लागतातच. मग शरीरामध्येदेखील छोटेमोठे रोग व्हायचे असोत. पीडा जन्मायची असो...

मी तर म्हणतो, तिळाइतका फोडदेखील तुमच्या शरीरावर विनाकारण नसतोच मुळी; चार-दोन दिवसांपूर्वीचा भूतकाळ त्याला जबाबदार असतो. शक्य आहे तुम्ही जागरण केले असेल, उष्णता वाढली असेल, पाणी कमी प्याला असाल, मलमूत्र ठीक विसर्जन झाले नसेल, तेलातिखटाचे, मिठाचे प्रमाण वाढले असेल. ज्ञात-अज्ञात अनेक कारणे त्या तिळाइतक्या फोडाला छेदून जाऊ शकतात. हे तुम्हाला कितीसे माहीत आहे?

वर्तमानकाळातील प्रत्येक कण्हण्या-कुंथण्याला भूतकाळच जबाबदार असतो व वर्तमानकाळातील सावधगिरीच, निरामय स्वास्थ्याचा भविष्यकाळ उभा करून देते. हे आज जरी तुम्हाला कळले, तरी थोडेथोडके नाही.

नियम

बाळगोपाळांनो, प्रत्येक अपघाताच्या मागे कळत-नकळत आपलीच बेहिशेबी बेहोषी कारणीभूत असते. नियम प्रत्येक गोष्टीला आवश्यक आहेत, रस्त्याने चालायचे नियम आहेत, जेवणाचे नियम आहेत, स्वयंपाकाचे नियम आहेत, या सभेचेही काही नियम आहेत. चार-चौघांत राहायचे तर नियम आहेतच. संस्कृतीने, निसर्गाने आपल्या सर्वांनाच कळत-नकळत साखळदंडांनी बांधले आहे. जर त्या नियमांचं उल्लंघन केलेत की अपघात हा ठरलेलाच असतो. मी सभेत बोलतो आहे, तर माझा शब्द घसरून चालणार नाही. तुम्ही रस्त्याने चालला आहात तर पाय घसरून चालणार नाही. शेजारी बसलेल्या भगिनीशी वागताना दर्जा घसरून चालणार नाही. अन्यथा सार्‍याच ठिकाणी अपघात हा ठरलेलाच आहे.

सारेच रोग हे घसरलेल्या नियमांचेच पडसाद आहेत. इतकं तुम्हाला कळले की पुरे आहे. चुका तुम्ही कबूल केल्या तरच दुरुस्ती सुरू झाली म्हणायची. चुकाच जर तुम्ही कबूल केल्या नाहीत तर समस्यांचा गुंता वाढवीत जाता.

जे पेरता तेच उगवतं. ते फक्त रानातच नाही, तर तुमच्या या देहातसुद्धा...!

जीवनाच्या बाराखड्या

मुलांनो,

जसं भाषेच्या बाराखड्या असतात ना ! बाराखड्या आल्या तरच भाषा येते. तसं मी म्हणतो, जीवनाच्याही बाराखड्या असतात, यशस्वी परिपूर्ण जीवनासाठी, परिपूर्ण बाराखड्या गिरवायला हव्यात. मग त्या बाराखड्यांत श्‍वास आहे, पाणी आहे, अन्न आहे, श्रम आहे, विश्राम आहे, विचार आहे, भूक आहे, मलमूत्र विसर्जन आहे, निद्रा आहे, स्नान आहे, प्रत्येकाच्या दिनक्रमात या गोष्टी सार्वजनिक आहेत आणि त्या राहणारच, प्रत्येकाच्या जीवनाचा आरंभ याच बाराखड्यांवरून होणार आहे तर आधी याच बाराखड्या शिक्षकांनी, पालकांनी मुलांकडून गिरवून घ्याव्यात; घोटून वदवून घ्याव्यात, असं मला वाटतं !

जगाचे ज्ञान मिळवायचे; पण ज्या जमिनीवर पाय ठेवून आपण उभे आहोत, ती जमीनच आपण समजावून घेतली नाही तर काय उपयोगाचे?  शिखराखाली असलेला पायाच समजून न घेतल्यामुळे त्या शिखराला तरी तसा काय अर्थ उरणार?

आज मला सर्वत्र जे दिसतं ते हेच दिसतं आहे. जीवनाच्या बाराखड्याच लोकांना, विद्वानांना, शहाण्यांना, पदवीधरांना एक तर माहीत नाहीत किंवा माहीत आहेत, पण माहीत असलेली मंडळी त्यांचा वापर तरी करीत नाहीत.

शिक्षणाचा सदुपयोग

  तशी माणसंसुद्धा पदव्या घेतात, ज्ञान मिळवतात, शिक्षण घेतात; पण त्या शिक्षणाचा वापर जीवनात करूच नये असा कुठे दंडक नसतो. उलट सारेच शिक्षण जीवनात कुठेतरी इथे-तिथे उपयोगाचे व्हावे म्हणून शिक्षणाचा हेतू असतो.  खूप शहाणे, शिक्षण घेतलेले लोक, जेंव्हा खूप मोठ्या आजाराशी लोंबकळत असतात, तेंव्हा मला त्यांच्या सार्‍या शिक्षणाची कीव येऊ लागते. चोर पकडणार्‍या पोलिसाचाच खिसा मारला जात असेल तर तो पोलीस झोपाळू आहे, असंच तुम्ही नक्की म्हणणार! इथेंदेखील ‘अती शहाणा त्याचा बैल रिकामा’ असंच तुम्ही म्हणणार नाही का?

तुम्ही आज शिकत असलेले सारे पाढे किंवा झडती उद्याच्या जीवनात आकडेमोडीच्या झाडा-झडतीशी टक्कर देता यावी म्हणूनच आहेत. उद्या चांगल्या डिगर्‍या मिळवल्या, चार्टर्ड अकौंटंट झालात अन् किती वाजले हे दुसर्‍याकडे घड्याळ दाखवून विचारू लागलात, तर यानं हसं नाही का व्हायचं?

इथे मला नेमके हेच सांगायचे आहे. शरीरशास्त्र शिकलात, सायन्स शिकलात, प्राणिशास्त्र शिकलात, वनस्पतिशास्त्र शिकलात, आहारशास्त्र शिकलात, निसर्गोपचार, योगा, इत्यादी सार्‍यांचे तज्ज्ञ झालात अन् तुमच्या नाकावर बसलेल्या माशीला उठविण्याचं बळ तुम्हांकडे राहिलं नाही, तर त्यात हसं कोणाचं होईल? त्या शिक्षणपद्धतीचं की त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचं? आज शिक्षकांसारख्यांकडून मोठ्या पगाराचा वापर सात्त्विक मार्गांनी होणेच असंभव झाले आहे. त्यामुळेच की काय, बहुसंख्य शिक्षक दारूबाज होत आहेत. शिक्षणाची आधारशीला दारूत लोंबकळू लागली तर नवसमाज मग कुठे बरे जाणार?

चला, जीवनाच्या बाराखड्याच आपण गिरवायला घेऊया.

श्‍वास

श्‍वास घेऊनच जीवनाला आपण आरंभ करतो व तो सोडूनच शेवटही करतो. दरम्यानच्या घटनेला आपण काय ते ‘जीवन’ म्हणतो.

श्‍वासामार्गे आपण हवा आत घेतो. हवेत प्राणवायू असतो. प्राणवायूची भूक रक्तपेशींना असते. किती खोल व दीर्घ श्‍वास आपण घेणार तितक्या रक्तपेशी तृप्त होणार. तृप्त रक्तपेशी आपल्याला तृप्त करणार. हेच एकंदर श्‍वासाबाबतीत जीवनाचे इंगित आहे. दीर्घ व खोल श्‍वास घेणारे प्राणी दीर्घायुषी दिसतात. उंदीर एका मिनिटात सातशे वेळा श्‍वास घेतो, तर हत्ती एक मिनिटात बावीस वेळा श्‍वास घेतो.

म्हणजे आपण श्‍वास दीर्घ घेण्याशी, आपल्या दीर्घ आयुष्याचा पल्ला अवलंबून आहे, हे आपल्या लक्षात आलं असेल. प्राणायामात हीच क्रिया वारंवार करवून घेतली जाते आणि श्‍वास नैसर्गिक पद्धतीने घेऊन उच्छवास आपणहून मुद्दाम दीर्घ करायचा असतो.  श्‍वासापेक्षा अधिक समय उच्छवासाला द्यायचा असतो. याचाच सराव प्राणायामात गिरवायचा असतो. श्‍वास म्हणजेच ‘प्राण’. श्‍वासाचा खेळ म्हणजे प्राणाशी खेळ. जीवनात श्‍वासाचे लयबद्ध अवागमन म्हणजेच ‘प्राणायाम’.

मुलांनो, जो खेळ प्राणाशी आहे, जो खेळ जीवाशी आहे. तो खेळ पुस्तकांच्या माध्यमाने शिकण्यात अर्थ नसतो. मग सर्कशीतले झोके असोत किंवा मल्लखांब असो, कुस्ती असो किंवा पोहणे असो. असे पाण्यात जा, दोन हात मारा, पाय मारा, अन् इतक्याशा माहितीवर पोहू शकाल असं होणार नाही. त्याकरिता जाणकार हवा, गुरुजी हवेत, वस्ताद हवेत, कुणीतरी हवा, मामा हवा किंवा कुणी पालक हवा. इतिहासातील सगळेच योद्धे, वीर पराक्रमी यांना गुरूकुलात ऋषिमुनींकडून धनुर्विद्या, प्राणायाम यांचे शिक्षण दिले जाई. गुरूकुलात जीवनाच्या बाराखड्यांनीच आरंभ व्हायचा. ज्यातून वीर, पराक्रमी असे योद्धे खडे व्हायचे. लवकरच तुम्हीसुद्धा शास्त्रशुद्ध प्राणायाम नजीकच्या काळात शिकून घेण्याचा ध्यास धरा. तुम्हालाही शूरवीर व्हायचे आहे हे ध्यानी धरा. प्राणायाम विद्याग्रहण करण्याच्या कामी, प्रगतीसाठी अत्यंत साहाय्यभूत आहे.

पाणी

पाणी म्हणजे जीवन. हवेच्या नंतर दोन नंबरची मागणी म्हणजे पाणी. विश्‍वाच्या पसार्‍यात 70 ते 80 टक्के पाण्याचे अस्तित्व आपल्याला माहीत आहे. जे ब्रह्मांडात ते पिंडात... आपल्या देहात ज्या पाच तत्त्वांचा समावेश आहे. त्यांत पाणी हा घटक मेजॉरिटीने आहे. मेजॉरिटीने असलेल्या या घटकाला आपण मेजॉरिटीनेच दाद दिली पाहिजे.

वनस्पतीशास्त्रात ठिबक सिंचन पद्धती खूपच परिणामकारक झाली. तशीच पद्धती माणसाच्या आरोग्यरक्षणात का अग्रेसर ठरणार नाही? याच कल्पनेतून ताशी 3 ते 4 वेळा एकावेळी मुखात मावेल इतके पाणी पीत राहायचे. जे झाडाबाबत तेच माणसाबाबतदेखील का असू नये?

झाड खाऊनच तर तरलेला माणूस. झाडांचीच आवड मानवी आरोग्यामागे असावी, या कल्पनेतून हा अभिनव प्रकार मी माझ्या रुग्णालयात आरंभला. अन् काय आश्‍चर्य ! प्रसन्नता, उत्साह हा तर वाढलाच ! शिवाय रोगनिर्मूलनाच्या कामी त्याची मोठी मदत झाली. याने शिवाम्बु उपवास काळात लांबचा अपेक्षित पल्ला आम्हाला गाठता आला.

स्वच्छ, शुद्ध, ताजे, झर्‍याचे कातळ पाणी म्हणजे अवर्णनीयच. असे पाणी आज दुर्मिळच. आपण पितो ते पाणी नद्या-नाल्यांचेच; पण नद्या, विहिरी प्लॅस्टिक सामग्रींनी व घाणीने आज प्रदूषित झाल्या आहेत, होत आहेत. त्याकडे अधिक लक्ष पुरविणे गरजेचे आहे.

क्रमश:

Previous Post Next Post