दंडास दंड म्हणूनच सुया उदंड
मी खेड्यात अगदी दुर्गम खेड्यात पोचलो. जिथे वाहनं पोहोचत नव्हती, तिथं पोचलो. लोकांचे चाललेले दिनमान पाहिले. लोकांचे कष्ट पाहिले. लोकांचे अज्ञान पाहिले, लोकांची व्यसनं पाहिली, तेच ते रोग पाहिले. व्यसनांना लंपट लोक पाहिले. रोगालाही लंपट होत चाललेली औषधं पाहिली व पैशाला लंपट होत असलेले डॉक्टरही पाहिले. हे सारे लपंडाव मी त्यामध्येच खेळत-खेळत पाहत होतो. काय करावं? कळत नव्हतं, कुठं पोचावं? समजत नव्हतं.
माणूस तरी, आपल्या हाताला असलेले दोन दंड, हे इंजेक्शनचे दंड सहन करण्यासाठीच आहेत. असा त्याचा समज झाला होता. दंडाला उदंड इंजेक्शनं देणारे डॉक्टरही उदंड होते. झटपट गुण आणि बेगडी झगमगाट. आजचा एक तरी दिवस पदरात पडला, हा परस्परांचा विचार असावा कदाचित; पण पदर एका बाजूने मात्र फाटत निघाला होता.
प्रतिकारशक्तीला क्षती
आता तीच औषधे पूर्वीसारखी काम करायला तयार होईनात. त्यांच्या मात्रा वाढवाव्या लागत आहेत. माणूस पुढे जाऊन पोचला आहे म्हणजे नेमके कुठे गेला म्हणायचा...? मित्रहो, त्याची प्रतिकारशक्ती शिथिल झाली. कशाने झाली? काय झालं त्याला? कोणालाच त्याची फिकीर नाही.
आपल्या जन्माबरोबरच एक प्रतिकारशक्तीही कमांडो स्वरूपात जन्मलेली आहे. ती प्रतिकारशक्ती अन्य वन्य प्राण्यांत त्यांच्या वयाबरोबर वाढत गेलेली आहे व आपली मात्र वयाबरोबर खच्ची होत जात आहे.
असं का बरं झालं? आम्ही काय घोडं मारलं? कुठं आमचं चुकलं?
तर मित्र हो ! आपली सुबत्ता, आपली समृद्धी आपल्या सुविधा, आपली प्रगती, आपली विद्वत्ता या सर्वांनी आपल्याला इथवर आणून पोचवलं आहे, असा माझा तरी दावा आहे. यांनीच आपण नाजूक, दुबळे, अपंग व कमकुवत झालो आहोत.
प्रत्येकाच्या प्रतिकारशक्तीचे निरीक्षण करा, तुम्ही पहा ! आश्रयाखालच्या माणसापेक्षा ढगाखालचा माणूस आपल्याला मजबूत दिसतो. प्रतिकारशक्ती धीरूभाई अंबानींपेक्षा, रामा गड्याकडे जादा आहे, म्हणजे प्रतिकारशक्ती ही ना पैशाकडे पाहून येेते; ना विद्वत्तेकडे पाहून येते; तर ती ढगाला पाहून, आकाशाला पाहून येते, हे पक्के झाले की नाही ते पहा.
तुम्ही गंमत पहा. रोगप्रतिकार करण्याची शक्ती पोस्टमास्तरपेक्षा पोस्टमनकडे जादा आहे. शेठजीपेक्षा शेतकर्याकडे अधिक आहे. दलालापेक्षा ती हमालाकडे अधिक दिसते. शिक्षकांपेक्षा विद्यार्थ्यांकडे ती अधिक आहे. थोडक्यात, जो जो निसर्गसान्निध्यात तो तो प्रतिकारक्षम हे पक्के झाले की नाही?
इंडियन पोलीस कमिशनरपेक्षा प्रतिकारशक्ती चंदन तस्कर वीरप्पनकडे तुम्हाला अधिक दिसेल. शिट्टी वाजवली तर फौजपाटा पोलीस कमिशनरकडे असू शकतो; पण रोग प्रतिकारशक्ती ही पोलीस कमिशनरपेक्षा वीरप्पनकडेच अधिक असणार! हे कसं? तुमच्या लक्षात आलं का?
काय झालं माहीत आहे का? कसं निघालं दिवाळं प्रतिकारशक्तीचं ?
मित्रहो, डार्विनचं काय म्हणणं आहे? म्हणे माणूस हा माकडाचाच वंशज. कधी काळी माणसाला म्हणे शेपूट होती. काही माकडांनी शेपटीचा वापर सोडला. त्यामुळे त्यांची शेपूट झडली, म्हणजे सुटली. बिनशेपटीच्या माकडाला माणूस म्हटले गेले. फक्त तिथे हाड राहिले. ते हाडसुद्धा, हाड हाड म्हणूनही ‘माकडहाड’ या नावेच ते आपला परिचय देते. हा संदर्भ तुम्ही म्हणाल कशासाठी...?
तर जे अवयव आपण आज वापरत नाही. ते अवयव कालांतराने झडून नामशेष होणार आहेत; म्हणजे अवयव हे आवश्यकतेतून आले होते व अनावश्यकतेतून परत निघालेसुद्धा...
प्रतिकारशक्ती तुम्हाला आज नको झाली म्हणून तीही आता जाणारच. तीही जाईलच. अहो... आता कुठे राहिली सांगा? एकीकडे शेपूट नसणार्या या माकडाला तुम्ही माणूस म्हणालात आणि आज दुसरीकडे प्रतिकारशक्ती नसणार्या माणसाला तुम्ही काय म्हणत आहात? तर एड्सच ना ! यात कुठे कुणाचे चुकले? चूक समजून घ्यायची चूक आता कशाला बरं करायची?
केवळ गेल्या साठ-सत्तर वर्षांचा काळ जरी जमेत घेतला, तर काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील. माझा असा दावा आहे की, प्रतिकारशक्तीच्या धोंडशिरा तोडण्यात प्रामुख्याने चहा व इंग्रजी औषध, ही प्रमुख बाब मला दिसते.
मित्रहो, एक काळ असा होता, चहा कोणालाच माहीत नव्हता, इंजेक्शन कुणाला माहीत होतं? आणि आता चहा कोणाला माहिती नाही इंजेक्शन, गोळ्या, बाटल्या, ऑपरेशन, याचे रिपोर्ट आणि त्याचे रिपोर्ट, यांशिवाय आहे काय?
अहो ! बसताना औषध, उठताना औषध, हगताना औषध, जेवताना औषध, झोपताना औषध, जागे होताना औषध, जन्मताना औषध, मरताना औषध, गोळी गुटख्याची , गोळी बंदुकीची, गोळी तंबाखूची. दाराघरात चहा, खायला चटक-मटक, प्यायला दारू, खेळायला मटका, यानं झालं काय? दिवाळं निघालं प्रतिकारशक्तीचं!
आपली संस्कृती दुर्मिळतेला महत्त्व देते. दुर्मिळ आज निसर्ग झाला. दुर्मिळ आज आरोग्य झाले. म्हणूनच वृत्तपत्रांतून आरोग्यावर स्पेशल पुरवण्या चालू लागल्या. माणसांने आज रस्ते सुधारले, गाड्या सुधारल्या, दिवाणखाना सुधारला, पायांतील वहाणाही मजबूत शिवल्या. घरातील भांड्यांनाही घट्ट केलं, सारं सुखरूप केलं; पण मनुष्यदेह सुखरूप का नाही झाला? पोकळ का होत निघाला आहे? निसर्ग हाच स्वर्ग व रोग हाच उपसर्ग, असा मानलेला वर्ग तुम्ही, माझ्यासमोर आहात. अमरावती अमर लोकांची आणि माती कोल्हापूरची, ज्यांनी सर्वत्र मल्ल पुरवले, या दोन्ही गोष्टींसाठी आरोग्य हवेच. आरोग्याची माहिती द्यायला कोल्हापूरची माती अमरावतीच्या मातीशी नाती जोडायला नव्यानं आली आहे.
मी तुम्हाला विचारतो, निसर्गाकडे तुम्ही इतकी दौलत, इतकी सवलत पाहता. तुम्ही त्याच्या ताब्यात का जात नाही? तुम्ही त्याच्या हवाली का होत नाही? निसर्ग इतका दयाळू, कनवाळू, मायाळू, कृपाळू मला वाटतो आहे. याकडे किती मोठी दौलत आहे! किती मोठी सवलत आहे! पाहुण्याचा पत्ता नाही तोवर, किती जय्यत तयारी त्याची!
अहो, जन्माच्या आधी ज्यानं आईच्या छाताडावर दुधाला टाचलं. जन्मतोय तोवरच त्याच्याकडे प्रतिकारशक्तीचा कमांडोही दिला. तुम्ही मला सांगा, मातेच्या आणि बाळाच्या मधलं पाईपलाईनचं कनेक्शन तोडल्याची जखम चार-दोन दिवसांत नाही का सुकली? नाही तर अजून पण तुम्हाला या दवाखान्यातून त्या दवाखान्यात, बेंबाट या - त्या डॉक्टरांना दाखवत मिरवावं लागलं असतं, फिरवावं लागलं असतं. अहो, नाही तर आमचं सरकार आहेच की ! मतेही आमच्याकडून घेतं आणि कमांडोही आपापसांत वाटून घेतं! या निसर्गानं असं केलं का सांगा?
ज्या निसर्गानं रांगायला गुडघे दिले, उभे राहायला पाय दिले, चावायला दात दिले, गिळायला गळा दिला, पिकवायला मळा दिला, टेकायला ढुंगण दिलं, नाचायला अंगण दिलं, ढगाखाली ज्यानं इतका आसरा दिला, पसारा दिला, दृष्टीच्या आधी त्यानं सृष्टी तयार ठेवली, डाव्याजवळच उजवं ठेवलं. दिवसाला चिकटून रात्र ठेवली, उन्हाळ्याच्या जवळच पावसाळा ठेवला, तलवारीलाच चिकटून ढाल ठेवली, विषाजवळच ज्यानं त्याचा उतारा ठेवला, पूर्वेच्या नीट समोर पश्चिम ठेवली, दक्षिणेच्या नीट समोर उत्तर ठेवली, आकाशाच्या नीट खाली जमीन जामीन म्हणून ठेवली. ज्याने इतक्या सार्या जोड्या लावल्या, त्याने तुमच्या रोगाजवळ औषध न द्यायला, त्याला काय बरं झालं? तो काय वेडा आहे? तुम्ही त्याला कफल्लक कसे समजता? त्याला कद्रू कशाला म्हणता? तो काय दळभद्री आहे? तुम्हीच सांगा कोण दळभद्री?
अहो, त्यानं तुमच्या प्रत्येक रोगाबरोबर, जिथं तुमचा हात संपला ना ! तिथंच त्यानं दव्याचा फवारा ठेवला आहे. तो नुसताच दवा नाही, तर तो दुवा देणारा दवा आहे. लाथ माराल तिथं पाणी काढण्याचं ज्यानं बळ तुम्हाला दिलं; त्यानंच लाथेच्या उगमाजवळच औषध ठेवलं आहे.
काय गंमत आहे नाही? राजवाड्याचे नऊशे नव्व्याण्णव दरवाजे बंद असावेत आणि एकच दार उघडं असावं आणि तिथंही डोळे बंद करून आंधळे होऊन जाण्याची हौस तुम्हाला दिसते, याची मला कमाल वाटत आहे. एस. टी. बसमध्ये मागील बाजूस एक छोटी खिडकी पाहिलीत का? तिथं स्पष्ट लिहिलेलं असतं. वाचलंत का? तिथं ‘संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग’ संकटे येऊच नयेत; पण आलीच तर बाहेर पडण्याचा मार्ग माहीत असू द्या ना ! मी इकडून आलोच नव्हतो. आता मी इकडून येणारच नाही. मदतीचा हात देणार्यांना आडमुठेपणाने असे दटावणार असाल तर, कोण तरी काय करणार? थोडी सबुरी घ्या. हात द्या, हिंमत घ्या. हळूच कोणास कळू न देता बाहेर या. तुमचे अन्य आप्त गाडीत बसून वाट तुमची पाहत आहेत.
वासरू लागलंय घसरू...
मित्रहो, गाईच्या नुकत्याच उपजलेल्या वासराला पाहिलंत का? जन्मले नाही तोवरच, डोळ्यांनी बाहेरचं जग टकमका पाहत राहतं. लगेच उभं राहण्याचा प्रयत्न काय करतं? पुनःपुन्हा नाकातोंडावर काय पडतं? आदळतं, आपटतं, लागतं. गाईच्या पुढच्या ढांगेत पोहोचतं. कास शोधतं. पुन्हा पडतं. कास मागच्या ढांगेत, हे शोधतं पुढच्या ढांगेत. बिचारा शेतकरी त्याला पोटाजवळ घेतो. त्याच्या मुखात स्तनाग्र देतो. बिचारं वासरू चुरूचुरू दूध चोखू लागतं. मग वासरू, वासरू राहत नाही. बिचारं तेही पाडा बनतं. गाय बनतं.
मित्रहो, मीही सेम तेच करू लागलो आहे. एक-दोन वासरांचं नाही; गेल्या 35 वर्षांत 20 हजार वासरांना उठवलं, पोटाजवळ घेतलं. त्यांच्या मुखात त्यांची त्यांची थानं दिली. डॉक्टरांच्या ताब्यातली मान सोडवली. सावकारांच्या ताब्यातली रानं सोडवली. सोनाराच्या ताब्यातले कान सोडवले. हा असा दुवा देणारा दवा हाताच्या अंतरावर ठेवून कशासाठी भीक मागत आहात? या दवाखान्यातून त्या दवाखान्यात कशासाठी जात आहात? बादशहाची मुलं तुम्ही; पण काय करणार? नादा-नादानं नादान झालात. बाद पण झालात. आता मी तुम्हाला साद देतो आहे. मला तुम्ही फक्त हुंकार द्यायचा. बस्स !
महाशत्रू
खरंच माणसाचे महाशत्रू आळस आणि अज्ञान हेच खरे ! जन्मोजन्मी याच्याशी आम्ही लढा देतो आहे आणि पापांचा आम्ही घडा भरतो आहे. एक दिवस स्मशानात येतो आहे. सर्वांचं शेवटचं ठिकाण जरूर शेवटीच येऊ द्या. पण अधलीमधली स्मशानपीडा आपण थांबवू या.
पुरस्कार बैलास द्या !
मित्रहो, तुम्ही मला पुरस्कार देता, हार मलाच घालता, सत्कारही माझेच करता. पण मी म्हणतो, माझे कशाला? ही गाडी जो बैल ओढीत आहे, त्याला तुम्ही हार घाला. तो हार खाण्याआधी त्याला हार घाला. गाडीखालून काही चतुष्पाद प्राणी रान तोडीत जात आहेत. सावलीही त्याला आणि हारही त्यालाच कशाला? बैलावर हा अन्याय नाही का?
मित्रहो ! बैल म्हणजे ‘निसर्ग’ या अर्थाने मी म्हणत आहे. निसर्ग सृजन असून सर्जनही आहे. तोडतो, जोडतो आणि उभा करतो. नेमका कचरा तेवढा कचर्यात टाकतो.
मित्रहो, आरोग्य आहेच काय? आरोग्य हवे कोणा-कोणाला?
माझ्या दृष्टीने आरोग्य आहे, योग्य गोष्टींची जुळवाजुळव. आ + योग्य = आरोग्य. काय योग्य? हे कळायला मात्र तुमच्याकडे योग्य शहाणपणा पाहिजे.
आता शहाणा कोण? ज्याला ठीक मित्र आणि शत्रू ओळखता येतात, तो शहाणा. मित्र कोण? जो मला उभा करील तो मित्र? शत्रू कोण? अर्थातच जो जो मला आडवा करील तो तो शत्रू, बस्सं ! इतकं ज्याला कळलं तो शहाणा. आरोग्य शहाण्यांचे आहे.
केवळ धट्ट्या-कट्ट्या तब्येतीला मी आरोग्य म्हणत नाही. अहो धट्टी-कट्टी तब्येत वेड्याकडे असू शकते, धट्टी-कट्टी तब्येत मूर्खाची पण असते. धट्टी-कट्टी तब्येत अतिरेक्याकडे पण आहेच. दरोडेखोराकडे पण आहे. काय ही मंडळी आपण आरोग्यवान समजणार? हे दुर्गुणच ते आरोग्यवान नाहीत, हे शाबित करीत आहेत. मग ते असे आरोग्य आहेच काय?
आरोग्य आहे शांती, आरोग्य आहे आनंद, आरोग्य आहे प्रसन्नता, आरोग्य आहे स्फूर्ती, आरोग्य आहे पावित्र्य, आरोग्य आहे सहिष्णुता. आरोग्य आहे विनम्रतासुद्धा. आरोग्य आहे सौंदर्य, माधुर्य. ही सारी भूषणे आरोग्याला शोभा देतात. किंबहुना सार्या भूषणालाच आपण आरोग्य म्हणावे लागेल. आरोग्य म्हणजेच व्यक्तित्व विकास, आरोग्य म्हणजे लवचिकता. आरोग्य म्हणजे प्रतिकारशक्ती, स्मरणशक्ती आणि संयमशक्तीसुद्धा.
मित्रहो ! हे असलं आरोग्य कुणाला बरं नको आहे? मला पाहिजे, तुम्हाला पाहिजे, यांना पाहिजे, त्यांना पाहिजे, हे असलं आरोग्य शेठजीला पाहिजे - शेतकर्याला पाहिजे. हमालाला पाहिजे - दलालाला पाहिजे; विद्यार्थ्याला पाहिजे - शिक्षकाला पाहिजे. नेत्याला पाहिजे - अभिनेत्याला पाहिजे. मी म्हणतो हे असले अस्सल आरोग्य, त्या ओबामांनाही पाहिजे आणि लादेनला पाहिजे. लादेनला म्हणालात तर मुद्दाम पाहिजे.
हे आरोग्य नाही म्हणूनच लढाया चालू आहेत. अपघात, घातपात चालू आहेत. हे आरोग्य नाही म्हणूनच कुंथणे चालू आहे, मुतणे चालू आहे.
हे असले आरोग्य मग कसे बरे मिळविणार?
मोर्चा, मिरवणूक, टाळेबंदी, नाकेबंदी, संप, घेराव, बंड यांपैकी काही करून मिळणार का? का मोठमोठाले बोर्ड लिहून, होर्डिंग उभारून, ‘आरोग्य’ नावाचं दूध काढून किंवा ‘स्फूर्ती’ नावाचे दही काढून मिळवता येईल का? मग हे आरोग्य कसं शक्य आहे? तुम्ही सहज आणि सरळ झालात, तर तुम्ही आरोग्याचे हक्कदार होणार. जो मला आडवा करतो, त्याला दूर ठेवा. मग शत्रू काळा की गोरा, नकटा की धाकटा बघण्यात काय अर्थ? माझा विघातक मी दूर ठेवला पाहिजे.
मित्रहो, केवळ व्यसनेच आपली शत्रू नाहीत, तर प्रमाणाबाहेर घेतलेले दोन घासही विरोधी पार्टीलाच मतदान करणारे आहेत. कंपनी म्हणून, आग्रह म्हणून, नाइलाज म्हणून किंवा पर्यायच नव्हता म्हणूनसुद्धा, नाना वेळी, नाना प्रसंगी असंच झालेलं आहे. हेच मतदान एकत्र होऊन रोगाला शक्ती देत आहे. रोगच निवडून येतो आहे. एक -एक मताने केवळ दिल्लीचं राज्य हलतं असं नाही. इथल्या हृदयाचं राज्यही असंच हलतं झालं.
नितू मांडकेचं तरी काय झालं? आशिया खंडातला प्रसिद्ध हृदयतज्ज्ञ, बिचारा हृदयाकडूनच फेल व्हावा. अत्यंत दुर्दैवी गोष्ट !
लोक बेभान होऊन पगड्यांच्या उठाठेवीत राहतात आणि सिर सलामतीला विसरतात. मी म्हणतो, तुम्ही तुमचं मत तरी, तुम्हाला द्याल की नाही? इथं तुम्ही मान हलवता आणि तंंबाखू मग कशासाठी खाता? दारू कशासाठी घेता? चहा कोणासाठी पिता? का हे विरोधी पार्टीला मतदान नाही? मग विरोधक निवडून येईलच की ! आणि निदान झीट येण्याआधी तरी, डिपॉझिट सांभाळायचा होता ! मूळ भांडवल तरी टिकवायचं होतं !
देणार्यानं देताना तुम्हाला काय कमी दिलं होतं? चार-चौघांसारखं झ्याक नाक दिलं; डोळे, कान, हात-पाय सारं काही बरोबर देऊनसुद्धा, पुन्हा त्याचीच काय म्हणून अब्रू घेत आहात. त्याचीच काय म्हणून धिंड काढीत आहात.
क्रमश: