डॉ. शशी पाटील यांचा स्वास्थ्य जनसंपर्क खूप मोठा होता. त्यांनी अनेक शहरातून, गावोगावातून. खेडोपाड्यातून  'शून्य बजेट आरोग्य' नावाची स्वास्थ्य मोहीम अनेक वर्षे राबवली. त्यांनी  या मोहिमेतून शकडो स्वास्थ्य सेवक व स्वास्थ्य प्रचारक निर्माण केले. आपल्या सारख्या आरोग्य प्रेमींसाठी,  प्रस्तुत लेख स्तंभातून, 'शून्य बजेट आरोग्य' या त्यांच्या मोहिमेतील व्याख्यानांचे संकलन, आम्ही क्रमश: प्रकाशित करीत आहोत..

उसंत कोणाकडे...?

मी आपणालाभाग्यवंतमुद्दाम म्हणतो आहे. आजकाल सिर सलामतीचा विचार करायला वेळ आहे कुणाकडे? जो - तो पगड्यांच्या उठाठेवीत गुंतला आहे. आपण जरी म्हणत असलो, ‘सिर सलामत तो पगडी पचासपणसिर सलामतहीच आमची अमानत मानायला किंवा त्यासाठी काही करायला उसंत आहे कुणाकडे?

प्रत्येक जण करीअरचा विचार करतोय, पगड्यांच्याच मागे उभा राहतो आहे. पण तुम्ही मंडळी, सिर सलामत, हीच माझी अमानत समजून तुम्ही सिर सलामतीचा विचार ऐकायला इथे आलात, म्हणून मी तुम्हाला भाग्यवंत म्हणालो. धन्यवाद.

माझ्यासमोर असलेला समूह किंवा माझ्यासमोर असलेली गर्दी ही दर्दी लोकांचीच मला म्हणावीशी वाटते. तुम्हाला दादासाहेबांकडून वर्दी ऐकायला मिळाली व तुम्ही दर्दी लोकांनी इथे गर्दी केली, म्हणूनच तुम्हाला धन्यवाद द्यावेत, असे वाटले!

तुमच्यात नि माझ्यात कुठे फरक आहे?

मित्रहो, मी तुम्हाला सुरूवातीलाच आणखी एक गोष्ट स्पष्ट करीन म्हणतो. माझ्यासमोर तुम्ही इतके जे लोक आहात, ना वयात, रूपात, आकारात, रंगात, ढंगात, स्वभावात कुठेतरी एक-दुसर्‍याशी साम्य आहे का? जर कुणी म्हणत असेलव्यक्ती तितक्या प्रकृतीतरीसुद्धा... मी तुम्हाला विचारतो, कुठे फरक आहे सांगा? काय अंतर आहे सांगा?

पांडुरंग तुमचा-माझा एकच!

अहो, तुम्हाला जे हवं आहे ना ! तेच मलाही  हवं आहे. तुम्हाला हवा आनंद, मलाही हवा आनंद, तुम्हाला हवी शांतता, मलाही हवी शांतता. तुम्हाला हवी प्रसन्नता, मलाही हवी प्रसन्नता, तुम्हाला हवी स्फूर्ती, मलाही हवी स्फूर्ती. तुम्हाला हवी सुरक्षितता, मलाही हवी सुरक्षितता, तुम्हाला हवे आरोग्य व मलाही हवे आरोग्य; मला सांगा, कुठे आहे फरक? जे तुम्हाला हवे तेच मलाही जर हवे आहे, तर मग तुम्ही नि मी वेगळे कसे?

जर एकाच पंढरीच्या प्रवासाला आपण सारेजण निघालो असू, तर तुमच्यात नि माझ्यात अंतर कुठे आहे? मी कोल्हापूरहून आलो. तुम्ही भले अमरावतीतून आलात, कुणी आणखी कुठून आले असेल. सर्वांचे ध्येय एकच. पोचायचे स्थळ एकच. उद्दिष्ट जर आपुले पांडुरंगाला भेटण्याचे, पंढरीला पोहोचण्याचे असेल तर मग आम्ही सहप्रवासी नाही का झालो? जरी कोल्हापूर व अमरावती यांमध्ये 24 तासांचे अंतर असले तरी, इथे कुठे अंतर आहे? यात कुठे दरी आहे? आपण घटकाभर भौगोलिक दूरी दूर ठेवूया. आपण मांडीला मांडी लावून बांधलेली शिदोरी सोडूया. बस्स ! आपले काय म्हणणे आहे? तुमच्यात नि माझ्यात होते ते अंतर जर संपले आहे, तर मीच तू व तूच मी असं म्हटलं तर हे विधान तुम्ही खोडणार तरी कसे?

भाषणबाजी कशाला?

तेंव्हा मित्रहो, तुमच्या आणि माझ्यातलं जे संकुचितपणाचं, औपचारिकतेचं अंतर आहे, ते आता बाजूला करुया.  म्हणून तरी मला तुम्ही आता आगळा समजू नका, वेगळा मानू नका. कारण तसा मी सगळाच तुमचा आहे व तुम्ही सगळेच माझे आहात, हे आधी चांगले लक्षात घ्या.

तुम्ही आणि मी जर एकच आहोत, तर आता मग भाषणबाजी कशाला? आणि भाषणबाजी करायला मी  राजकारणी कुठे आहे? मला भाषणबाजी जमायची नाही.

मी तुमच्याशी गुजगोष्टी करू इच्छितो. मी तुमच्याशी हितगोष्टी बोलू इच्छितो. मला काही कानगोष्टी द्यायच्या आहेत. काही गतगोष्टी सांगायच्या आहेत. कुठूनतरी मला तुमच्याशी गप्पागोष्टी करायच्या आहेत. आहात ना तयार?

चिकित्सा तुमच्या अरिष्टांची

मित्रहो, मी चिकित्सक आहे. चिकित्सा करणं, चिकित्सा मांडणं हा माझा स्थायी स्वभाव आहे; पण चिकित्सा करणार तुमच्या रोगाची, चिकित्सा करणार भोगाची. मला तुमच्या अरिष्टांची चिकित्सा करावीशी वाटते. तुमच्या दिनक्रमाची चिकित्सा मला करायची आहे.

मित्रहो, मी स्वत:ला प्रयोगवीर समजतो. प्रयोगवीर परिवाराचा मी स्वत:ला सदस्य मानतो.  कुठले प्रयोग? काय प्रयोग? प्र + योग = प्रयोग

पण प्रयोग म्हणजे काय?

प्र - म्हणजे प्रकृती व योग म्हणजे सांधा, जोड, जुळवाजुळव. कुठली प्रकृती? कसली प्रकृती? अहो, पिंडप्रकृती व विराट-प्रकृती यात असलेली दरी दूर करायची आणि मग काय रहातं ते पहायचं!

तुम्ही कधी विचार केला आहात का? सर्वच प्रयोगांमागे यापेक्षा वेगळा हेतू काय असतो? मग तुम्ही प्रयोग धर्माचे घ्या, विज्ञानाचे घ्या; मग प्रयोग शाळेचे घ्या किंवा आरोग्याचे घ्या; प्रयोग कोणतेही असू देतसर्वच प्रयोग विराट व आपण एकच आहोत हे शाबित करण्याकरिताच आपण करीत असतो.

प्रकृती पिंडाची व विराटाची

पूर्वीचे ॠषी स्वत:वर आधी प्रयोग करायचे, मग तो प्रयोग गुरूकुलातील मुलांवर व्हायचा, मग तो प्रयोग राजासमोर यायचा. राजा तो प्रयोग प्रजेसमोर ठेवून त्याला राजाश्रय द्यायचा. तसेच मीही आधी स्वत:वर प्रयोग करतो. रुग्णालयातील रोग्यांवर करतो. मग चार भिंतींबाहेर, तुम्हासमोर आणतो. पण आताचे शास्त्रज्ञ सारेच प्रयोग सश्या-कुत्र्यांवर, लांडग्यांवर, उंदरांवर, घोड्यांवर आधी करतात. जगली बिचारी तर मग माणसांवर प्रयोग करतात. 

माझा प्रयोग अनंतांनी केला

मी केलेला प्रयोग ॠषी-मुनींनी केला आहे. महादेवांनी केला आहे. देवी पार्वतीने केला आहे.  भारताच्या माजी पंतप्रधानांनी केला आहे.  माझा प्रयोग जगातील अनंतांनी केला आहे. हा प्रयोग अनोखा राहिला नाही. मी या प्रयोग परिवारामध्ये शबरीलासुद्धा घेतले आहे.  तुम्ही म्हणाल, कोण शबरी...? हो हो. तीच ती शबरी, रामाच्या रामायणातली. तुम्ही म्हणाल, तिचा काय संबंध इथे? मित्रहो, झाडाच्या प्रत्येक बोरामध्ये तिने आरोग्य आहे की नाही पाहिलं. का?... कशासाठी? दशरथाच्या पोराचं आरोग्य ठीक राहण्यासाठी, शबरीनं झाडाच्या प्रत्येक बोरामध्ये राम आहे का नाही पाहिले आणि मग रामाला वाहिले. राम पाहिला म्हणजे गोडी पाहिली व रामानं मात्र तिथे प्रत्येक बोरामध्ये शबरीची भक्ती पाहिली.

गबरी-शबरी

मित्रहो, शबरी म्हणजे भक्ती ! रामाने शबरीची भक्ती पाहिली, म्हणजे रामाचा विश्‍वास व शबरीची भक्ती मला इथे स्पष्ट दिसते. तसे तुम्ही, जनता जनार्दन माझ्यासाठी राम आहात. मी तुमच्यासाठी शबरी आहे. अर्थात तुमचा विश्‍वास व माझी भक्ती या माझ्या पुढच्या प्रयोगास बळ देणारे आहेत; म्हणून मी त्या गबरी-शबरीलापण यामध्ये घुसडले आहे. झाडाचं बोर आणि दशरथाचं पोर हा विचारसुद्धा तुम्ही नक्कीच म्हणणार थोर.

 हत्यारे विद्यार्थ्यांपर्यंत

मित्रहो, मानवी इतिहासाच्या परंपरेत लढायांना ऊत आला आहे. लढायांना आपण खूपच महत्त्व दिले आहे. लढाई-लढाई आणि लढाई-कथा शूराच्या, वीरांच्या, लढाया हत्यारांच्या, ‘युद्धस्य वार्ता: रम्य:युद्धे कोणालाच नको असतात; पण तरी ती ऐकायला रम्य वाटतात. दुसर्‍याचं झोंबडं आपल्याला आवडतं. तुम्ही हत्यारं वीरांच्या हातात पाहिली, तुम्ही हत्यारं पराक्रमींच्या हातात पाहिली, तुम्ही हत्यारं राजेरजवाडयांच्या हातात पाहिली, तुम्ही हत्यारं देव-देवी म्हणजेच देवादिकांच्या हातात पाहिली.

मित्रहो, आज आपण हत्यारं नेत्यांच्या आणि अभिनेत्यांच्याही हातात पाहतो आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हातातही आपण हत्यारं पाहतोय. हत्यार नाही असा शूरवीर शोधावा लागेल. पण मित्रहो, एक घटना तुम्ही ऐकली असेल, ज्याची इतिहासाने नोंद घेतली. गेल्या शतकानेही त्याची नोंद घेतली. ती घटना काय आहे? कोण आहे तो माणूस?

खडग बिना ढाल स्वातंत्र्य

अहो, दीडशे वर्षांच्या जुलमी सत्तेला ज्यानं केवळचले जाव’  ही घोषणा ऐकवून सत्ता उलथवली. हो ! तोच तो साबरमतीचा संत. ज्यानेखडग बिना ढाललढा दिला, तोमहात्मा’.

स्वप्न महात्म्याचे

तुम्ही म्हणाल, तो महात्मा इथं काय म्हणून आणत आहात? म्हणून मी सांगतो आहे. याच महात्म्याचं आणखी एक स्वप्न होतं, जे स्वप्न स्वप्नच राहिलं. कारण आपण त्याला जगू दिलं नाही. त्याचं स्वप्न काय होतं? ज्या देशाला अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले, त्याच अहिंसक मार्गाने याच देशबांधवांना आरोग्यही अहिंसक मार्गाने मिळवून द्यावे. ही मनीषा ज्या महात्म्यानं मनी बाळगली, आम्ही त्यांना सांभाळू शकलो नाही. आम्हीच दळभद्री म्हणायचे.

देशाच्या प्रत्येक बांधवाचं गोळीशिवाय, औषधाशिवाय, इंजेक्शनशिवाय, सुई, ऑपरेशन, चाकू वा रक्तपाताशिवाय आरोग्य वाचलं पाहिजे, वाचलंच पाहिजे असे म्हणणार्‍या महात्म्याला आम्ही कसे बरे विसरणार?

कुवत माझी

ते स्वप्न, मित्रहो, माझ्या कुवतीप्रमाणे मी त्याला घेऊन निघालो आहे. 1965 चा काळ. गांधीजींचा वारा होता, गांधीजींचा नारा होता. भारत खेड्यांत विखुरला आहे. भारत खेड्यांचा आहे. चला, चला, खेड्यात चला.

... क्रमश:

Previous Post Next Post