मुळनक्षत्री : एक प्रेरणादाई जीवनधारा : भाग - 1

बालभारती

थेंबाथेंबाने तळे साचते, विटेवर वीट ठेवून इमारती उभ्या होतात, तसेच घटनेला घटना जोडूनच जीवनाला आरंभ होतो. विचाराला विचार जोडूनच घटना जन्म घेतात. जीवन कोठून कस सुरू झालं म्हणावं? तर या अनादी अनंत अशा जगात, मी जिथे जन्मलो तिथला पत्ता देणं, तिथली हकीकत सांगणं हेच चरित्रात असतं. माझ्या देहकुडीने कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर (उदगांव) मुक्कामी जैन परिवार निवडला. माझे वडील कुंभोजचे. कुंभोज हे वारणा नदीकाठी वसलेलं समृद्ध, सधन व निसर्गरम्य असं गाव.

वडील मुळचे शेतकरी कुटुंबातले. वडिलांच्या वडिलांचे नाव रामगोंडा पाटील, खुद्द वडिलांचे नाव जनगोंडा पाटील. ज्या गल्लीत कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) जन्माला आले. त्याच गल्लीत हा परिवार नांदत होता. कारण आजोबांचीच बहीण कर्मवीर अण्णांची आई असं म्हटलं तरी चालेलं. आमच्या आजोबांना चार भाऊ थोरले सातगोंडा पाटील, दोन नंबर रामगोंडा पाटील, तीन नंबर जिनगोंडा पाटील व चार नंबर लिंगोंड पाटील व एक भगीणी कृष्णा आजी असा एकूण जुना परिवार.

जनगोंडा रामगोंडा पाटील हे माझ्या वडिलांचे नाव, आजोबांचे शिक्षण त्यावेळच्या सातवीपर्यंत झालेले. वडिलांचेही शिक्षणही सातवी पर्यंत झालेले. वडिलांचे लग्न सोळाव्या वर्षातच करण्यात आले. इतक्या अल्पवयात करण्याचे कारण म्हणजे माझ्या वडिलांची आई, माझ्या आत्याला जन्म देताच निर्वतली. मुलगी होताच बाळंतरोग झाला म्हणतात. वडील त्या परिवारात ज्येष्ठ होते. त्यामुळे लवकर लग्न करावं लागलं.

आजोबांनी आपल्या वाडयात शेतीला जोडधंदा म्हणून चार डबे मांडून भुसारी दुकान थाटलं होतं. आजोबा मला अधून-मधून म्हणत असत, डोक्यावरून तेलाचे डबे कोल्हापूरातून कुंभोजला आणत होतो बाबा!

माझे आजोबा खरचं कष्टाळू असून हुशार व रसिक होते. त्यांचेच संस्कार बालपणी माझ्यावरच अधिक झाले होते.

वडिलांनी आपल्या लग्नानंतर स्थलांतर केलं. ते शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर मुक्कामी व्यापारी पेठेत पोहोचले. आईचे माहेर त्याच तालुक्यातील ‘उदगांव’. तेही पाटील कुटुंबच. आईचे नाव ताराबाई व तिच्या वडिलांचे नाव पायगोंडा पाटील. आई म्हणताना म्हणते, “लग्नात मी बारा वर्षाची होते बाबा! व नंतरच उपवर झाले.” माझा थोरला भाऊ नेमगोंडा यांचा जन्म आईचे वय सोळा वर्षाचे असताना झाला म्हणतात. जे कोल्हापूरात काही काळ डॉ. एन. जे. पाटील ‘ई. एन. टी’ सर्जन या नावाने कोल्हापूरवासियांना ज्ञात होते.

जयसिंगपूर मुक्कामी वडिलांनी सुरूवातीच्या काळात भागीदारीत आडत दुकान उघडलं होतं. जयसिंगपूर हे गाव व्यापारी पेठं होती. सभोवती पंचक्रोशीतील शेतकर्‍यांचा माल या पेठेत विक्रीला यायचा. शरीराने धष्टापुष्ठ असलेले माझे वडील गोरे-गोमटे होते. आजोबांनाही गोरा रामूचं म्हणायचं. थोडयाच दिवसात ‘चंद्ररूप क्लॉथ स्टोअर्स’ नावाचं कोरगावकरांच्या बिल्डिंगमध्ये ‘शंकरलाल रमेशचंद्र’ या मोठया कापड दुकानासमोर आमच्या वडिलांनी कापड दुकान थाटलं होतं.

त्या वेळचा काळ म्हणजे ‘कन्ट्रोलचा जमाना!’ आणि स्वातंत्र्य लढयाचा काळ, गोव्याचा वाद. फायदा-तोटा हा व्हायचाच. ‘कुंभोजकर पाटील अण्ड सन्स’ असे मुलांच्या जमान्यात त्याचे पुढे नाव देण्यात आले. त्याच बिल्डिंगमध्ये आमच्या परिवाराचा निवास असायचा.

जिथे सोबतचे लोक संपूर्णपणे मारवाडी समाज होता. मनीपॉवरला महत्त्व देणारी ही मंडळी. जवळच समोर गांधी चौक. जयसिंगपूरातील समारंभांचा मुख्य अड्डा असायचा. सगळे समारंभ याच चौकात साजरे व्हायचे. कोणताही मोर्चा असो, झेंडावंदन असो, प्रभातफेरी असो, 15 ऑगस्ट असो, चळवळ असो, आंदोलन असो सगळे कार्यक्रम तिथेचं रंगत असतं. रेंगाळत असत. तेथील सगळे कार्यक्रम आमच्या निवासाच्या गॅलरीतून स्पष्ट दिसत असत. ऐकू येत असत.

मला तशी पाच भावंडे, चार बहिणी. दोन-दोन वर्षांनी पाळणा हललेला. माझा नंबर चौथा. प्रथम एन. जे. पाटील, नंतर कमल पाटील, तीन नंबर शांतीनाथ पाटील (आज जे जैन समाजामध्ये इथल्या पंचक्रोशीत कल्पवृक्ष शब्दाबरोबर लोक त्यांना ओळखतात.) त्यांच्यानंतर मी शशीकांत पाटील (आज मला डॉ. शशी पाटील, ‘शिवाम्बू चिकित्सक’, ‘शिवाम्बू महर्षी’ म्हणून संबोधतात.) माझ्या पाठीवरती महावीर पाटील (आज त्यांची ओळख ‘विपश्यना शिक्षक’ म्हणून आहे. त्यांनी आपल्या विपश्यनेच्या विचाराला आयुष्य वाहिले आहे.) यांच्यानंतर जयश्री पाटील, नंतर भारती पाटील, (या डॉ. आप्पासाहेब चोपडे; सर्जन-सांगली यांच्या पत्नी) यांच्यानंतर सुनील पाटील (सध्या हे अर्थ-मूव्हर कॉन्ट्रक्टर आहेत) त्यानंतर शेवटची सुनीता पाटील (डॉ. एम. डी. मोहिरे; न्यूरोफिजिशियन-कोल्हापूर यांच्या विद्यमान पत्नी आहेत.)

त्यावेळचा जमाना आठ-नऊ मुलांच्या ग्रुपचाच असायचा. ‘अष्टपुत्र सौभाग्यवती भव’ हा आशीर्वाद सार्थ व्हायचा. अर्थात लागू पडायचा. कुटुंब नियोजनाचा म्हणावा तसा प्रयत्न त्या काळात यशस्वी झाला नव्हता. मोहिम होती पण अंधश्रद्धेत गेली होती.

माझा जन्म ता. 25 जून 1945 रोजी, सोमवार, वेळ-सकाळी 9.50 मी. सवंत 2001, शतक 1867, मराठी ज्येष्ठ महिना, पक्ष शुक्ल, तिथी पौर्णिमा, नक्षत्र मूळ (मूळनक्षत्री) रास धनु असा आहे. इतकी सविस्तर माहिती ही एवढ्यासाठीच की, एखादा भविष्यवेत्ता ह्या माणसाच्या कुंडलीची करामत काय असू शकते? याचा शोध घेऊ शकतो.

जयसिंगपूरवासी ज्योतिष्यतज्ञ श्री. वाठारकर त्याकाळी 80 वर्षाचे प्रसिद्ध सडपातळ गोरे गृहस्थ होते. त्यांनी नोंदविलेल्या ह्या गोष्टी माझ्या घडामोडीला निमित्त बनल्या आहेत. म्हणूनच इतका उल्लेख केला. श्री. वाठारकर हे शास्त्रीयब्राम्हण पंडित असून वडिलांचे खास मित्र होते. त्यांनीच वडिलांना सांगितले, “हा मुलगा जो आज जन्माला आला आहे. तो मूळनक्षत्रावर जन्मल्यामुळे परिवारातील वडिलोपार्जित लोकांना धोका आहे.” माझे वडील आधीच जुन्या मतांचे, विचारांचे कर्मठ असल्याने त्यांनी कच खाल्ली. वडिलांनी, यातून काही मार्ग निघेल का हो? याची विचारणा केली. तोपर्यंतच, आई सांगते, “तिचे वडील काशीहून येताना कॉलरा होऊन देवाघरी गेल्याची तार आली.”

बोलाला फळ प्राप्त झालं. पुन्हा लोकांनी भिती घेतली आणि त्या बाळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. येथूनच बाळाची अबाळ सुरू झाली. पालकांच्या मनात विष पेरलं गेलं. ‘मूळनक्षत्री मुलाचं अस्तित्व म्हणजे शापित यमाचे सानिध्य’ पालकांनी ज्योतिषांना, पंडितांना, उपाध्यांना काही सौडीशास्त्र निघू शकते का हो? काही शांती-विधी वगैरे-वगैरे काही असेल तर सांगा! सर्वांनीच सांगितलं दुसरा कोणताचं उपाय नाही. आता भोगच भोगायचे. या मुलाची कसली वेळ म्हणायची.

हळूहळू या बाळासाठी दुजाभाव सुरू झाला. तरीसुद्धा चंद्राच्या कलेप्रमाणे बाळ वाढू लागले, रांगू लागले, जेवायला बसलेल्या लोकांच्या ताटाकडे, ताटातील साहित्याकडे धावू लागले. हातात सापडेल त्या गोष्टी तोंडात कोंबू लागले.

आजूबाजूला असलेल्या घरात देखील उपद्रव देऊ लागले. शेजारीच बाबू मानधने यांची म्हातारी आई म्हणायची कि, “हे पाटलाचं कुटुंब? हे कसलं कुटुंब? पाटलांना मुल जास्त झाली वाटतं? जास्त झाली तर मग काढलीच कशाला?” अशी कुजबुज सुरू झाली.

बसल्या ठिकाणीच मी ‘सू’ पण करायचो आणि ‘शी’ पण करायचो. कुणीही उचलून कडेवर न घेतल्याने लाळचं तोंड न साफ केल्यामुळे माशा, चिलटांचा त्रास, नागडं उघड बाळं, हळूहळू त्या बाळाच्या पोटाचा आकार अवास्तव वाढू लागला.

माझी आई म्हणते, “तुझं डोक व पोटचं मला फक्त दिसतं होत” शेजारचे लोक बर्‍याचदा ढुंगण धुवायचे, साफसुफ करायचे. आजीच्या, आईच्या मैत्रिणी आजही मला बघून, हात थापटून ‘आई चपाती केली? बाबा चपाती केली? अक्का चपाती केली?’ हे गीत मला पाहून सुरात गात असतात, हे गीत मी लहानपणी माझ्या मुखाने, हाताने थापटून म्हणत असे म्हणे!

त्या कोरगावकरांच्या इमारतीत अनेक बिर्‍हाडे होती. कंट्रोलचा जमाना असल्याने अमेरिकेचा गहू त्या काळात लोक अधिक खायचे. सगळयांकडे बहुधा चपातीच केली जायची. गव्हाची चपाती पचायला आणखीनचंं जड, त्यामुळं माझंं पोट अधिकचं वाढू लागलं. लाळ खूप गळत होती. छाती सतत भिजत होती. मूल बसेल तिथचं बसत होतं. या मुलास दिली जाणारी वागणूक लोकांच्या मनात चिंता व्यक्त करत होती. या मुलाचे पुढे कसे होणार, असे शेजारच्या मारवाडी समाजाला वाटत असे.

त्यातले एक वल्लभभाई बियाणे जे काही वर्षांपूर्वी अस्थम्याच्या शिवाम्बूच्या ट्रिटमेंटसाठी मजकडे अ‍ॅडमिट होेते. त्या वेळी ते मला म्हणाले, “तू लहान असताना मला तुझे पुढे कसे होणार? याची काळजी वाटत होती, पण आता तर तूच माझी काळजी घेत आहेसं.”

ज्या ढुंगणावर मी जमिनीवर बसत होतो. ती जागा सतत ओली असायची. त्यामुळे जो भाग जमिनीला टेकत होता तो भाग कालांतराने निर्जीव व बधीर झाला. जैन मंदिरातील एक पंडित त्यांचे नाव ‘बापू पंडित’ पीठ मागायला याही घरात यायचे.

आमच्या आईला मात्र म्हणायचे, “या मुलाची उगानिगा का करत नाही? याचा पाय बिघडतोय असं मला वाटतं, तुम्ही कुठेतरी दाखवून घ्या. याच्या पोटावरून याला ‘मुडदूस’ झाल्यासारख वाटतयं. जाणत्या लोकांची मते घ्या.”

दिवसामागून दिवस चालले होते. हे बाळ उचलून धरलं तरी डावा पाय अंतराळीच धरायचे. तो पाय जमिनीला टेकत नव्हता. पायाचा आकार बदलायला लागला. शेवटी सगळयांच्या आग्रहाखातर मिरजेला जाणं भाग पडलं. ‘मिशनरी हॉस्पिटल’ ‘रूग्णसेवा म्हणजेच परमेश्‍वर सेवा’ अशी त्याकाळची लोकांची आख्यायिका होती.

मिरजेतील दवाखान्यात शेजारचा पेशंट माश्याचे तुकडे खात असताना आईने पाहिले व सगळेच घरी निघून आले. मूलं मेलं तरी चालेलं पण आम्ही धर्म बाटवणार नाही. त्यामुळे उपचार थांबला. त्या काळात ‘पोलिओ’ हा शब्द नवाच होता.

खेडयातील स्त्रिया, पॉरं वरून गोंडस दिसत्या पण पायातून वारं गेलया जणू? असं म्हणू लागल्या.

मी तीन वर्षाचा झालो. पांगूळगाडा देऊन चालविण्याचा प्रयत्न चालला. टाक पाऊल तुला पैसे देतो. आणा, दोन आणा त्या काळी दिलाही जायचा व त्या आशेने मी पावलेही टाकायचो. पावले टाकल्यानंतर शेजारील, चाळीतील लोक टाळया वाजवायचे, मी हसायचो, सगळयांना कौतुक वाटायचे.

माझा चौथा नंबर असल्याने बाकीच्या भावंडांना थिटे पडलेले, गाठोडयातले कपडे मला घातले जात. मला खास असे काही कपडयांचे अप्रूप नव्हते. समवयस्क सवंगडयाबरोबर खेळू-बागडू लागलो.

कुणी ‘पांगळया’ म्हणतं तर कुणी ‘शश्या’ म्हणत. मला काही भावना नव्हत्या. खंत नव्हती; मला विधीनिषेध नव्हता.

चाळीत असणारे आदाप्पा रत्नपारखे हे एक भाडेकरू होते. ते मला ‘नाना शमशू नाना’ तर कधी ‘तैमूरलिंग’ म्हणायचे. इतिहास काळात दीड पायाचा तैमूरलिंग होता म्हणे.

आदाप्पा रत्नपारखे यांची थोडीशी कृपादृष्टी माझ्यावर दिसत होती. ते खरच रत्नपारखे होते. ते नेहमी म्हणायचे, “हा मुलगा क्रांती करेल.”

तेथेच चाळीेेत असणार्‍या ‘महावीर बँकेत’ ते शिपाई होते. त्यामुळे कष्टाळूपणा व करारीबाणा हा त्यांच्यामध्ये दिसत होता, आणि का कुणास ठाऊक त्यांची सहानुभूती मला दिसायची. सेवेचा भाव असायचा. विनोदाची वृत्ती असायची. हसवण्याचा प्रयत्न असायचा. त्यांच्या पत्नीलाही माझ्याबद्दल आपुलकी वाटायची.

हळूहळू वयाच्या सहाव्या वर्षी मी शाळेत जाऊ लागलो. अक्षरांची तोंडओळख व्हायला लागली. येता-जाता रस्त्यानं असलेल्या पाटयांचे वाचन करत-करत, शाळेचे धडे गिरवत होतो. बडबडत, थांबत, चालत, पाय ओढत होतो. रस्त्यातील माणसं ‘पडशील बाळया’ म्हणायची. खेडयातील स्त्रिया परस्परांत म्हणायच्या, “वरून पोरगं साजरं दिसतया पण पायालाच काय झालं असलं तरी?” आणि मान हालवून चुक-चुकायच्या. मला याची लाज वाटायची.

हळूहळू रस्त्यावरून जाणं अवघड वाटू लागलं. रहदारीचे रस्ते मला भिती घालू लागले. मी मग बोळा-बोळातून शाळा गाठू लागलो. चड्डीच्या नाडीची लांबी गुडघ्यापर्यंत असायची. दादा कोंडकेची लांबडी चड्डी मागून आणल्यासारखी दिसायची. आताच्या सारखा त्याकाळी शाळेचा ड्रेस नव्हता. जवळ-जवळ संपूर्ण शाळेत मीच एक अजागळ, गबाळा दिसायचो. त्यामुळे लोकांचं आणखीनच लक्ष माझ्याकडे वेधायचे आणि मी लाजेने चूर-चूर व्हायचो.

वर्षा दोन वर्षाच्या पाळण्यामुळे आई हतबद्ध व्हायची. या सगळयाच मुलांच्या उठाठेवीतून मी ‘मूळनक्षत्री’ म्हणून टेहाळणी व्हायची. बाकीच्या भावंडांकडून आईला मदत व्हायची. पंगुत्वामुळे माझा काही, इतर लोकांना, कोणालाच उपयोग होत नव्हता. कामाच्या माणसांना जपलं जायचं. गरम-गरम त्यांना आधी वाढल जायचं. जादा तूप दिलं जायचं. मी रिकामटेकडा! उरलं-सुरलेलं, भांडी घासून-पुसून खायचो.

आई मला भांडी घासायला लावायची. कपडे धुवायला लावायची. तुझ काम मला होत नाही म्हणायची. साबण, कपडे घेऊन दगडालाच साबण चोळायचो. त्यावरती माझे ओले कपडे घासायचो. बाकीची भावंडे साबण हातातून काढून न्यायचे. त्याकाळी ‘सनलाईट’ साबणाची मोठी वडी असे. हातात मावत नसे.

या संपूर्ण चाळीत एकच संडास असायचा. पन्नास एक बिर्‍हाडे हा संडास वापरायचे. बुट्टी संडास असायचे. हे संडास अतिशय घाण असायचे. टमरेल घेऊन जावे लागायचे. एकदा मी असाच टमरेल घेवून निघालो होतो, तेव्हा माझी बहीण माझ्या हातातून टमरेल हिसकाऊन म्हणाली, “हे टमरेल घेऊन कुठे निघालास हा टमरेल आमचा आहे.” मी मात्र त्यांचा नव्हतो.

मी त्यावेळी साधारण दहा वर्षाचा होतो. मला दिवाळी-दसर्‍यामध्ये सुद्धा नवीन कपडे नसायचे. लोकांनी वाजविलेल्या फटाक्यातून न फुटलेले फटाके मी शोधून काढायचो व ते वाजवायचो, व ते वाजले की टाळी वाजवून उडया मारीत असायचो.

वडील नगरशेठ म्हणून ओळखले जायचे. मला कुटुंबीयांकडून मिळत असलेल्या दुजाभावामुळे मी यांना सापडलो तर नसेन ना? आणि सापडलोच असेन तर, वडिलांनी या सापडलेल्या मुलाच्या नावापुढे नाव लावायला केवढा मोठेपणा दाखविला असेल. कारण बाकीच्या भावंडांच्या नावासमोर वडिलांचे नाव असायचं तसेच माझ्याही नावासमोर त्यांचे नाव असायचे.

मी त्यावेळेस साधारणतः तिसरीमध्ये होतो. एकदा मला शाळेतून हाकलण्यात आलं. कारण कुणीतरी वर्गमित्राने वाडीचा पेढा प्रसाद म्हणून आणला होता. गुरूजी तो पेढा सगळयांना वाटत होते. तो तसाच मलाही दिला गेला. मी तो खाल्ला नाही. टाकून दिला. त्याबरोबर आमचे बा. द. कांबळे गुरूजी, “का खाल्ला नाही देवाचा प्रसाद? का टाकलास?” म्हणून त्यांनी मला घराकडे हाकललं.

मुलं ही संस्काराची गुलाम असतात. वडिलांची कडक शिकवण सगळया भावंडांना होती की, जैनाच्या देवाशिवाय कुठल्याही देवाला मानायचं नाही, भजायचं नाही. थोडक्यात बाकी सर्व मिथ्या. वडील त्याही वेळेस शाळेत हजर झाले. कांबळे सर व हेडमास्तर यांना, ‘मुलांना तुम्ही जबरदस्ती करू नये’ अशी वडिलांनी धर्माबाबत सक्त तंबी दिली.

मानसशास्त्र सांगत, पहिल्या सात वर्षाच्या मध्ये जे संस्कार होतात तेच बहुधा जीवनाचा आराखडा बनवित असतात.

तसा पहिला संग ‘वडिलांच्या’ कडूनच, रांगडं व्यायामी व पुष्ट शरीर बांधा, घाम गाळत केलेली कष्टाची कामे, आपलाच हेका आपलाच ठेका, दुसर्‍यांच्या वरती लादण्याचा प्रकार, ‘बळी तो कान पिळी’ हा स्वभाव टिपला गेला. आईकडून मिळालेली देणगी म्हणाल तर बोलण्याचे चातुर्य, डागून, बिंबवून, मर्मभेदी शब्दफेक हे आमच्या मातोश्रींचे गुण माझ्या मनाने टिपलेत.

दुसरा संग, ‘जैन संस्कृती’ ही अहिंसेची शिकवण देते. ‘स्वतः जगा व दुसर्‍याला जगू द्या.’ आपल्या सारखचं आपल्याबरोबरच्या मुंगीलाही अस्तित्व आहे. त्यांनाही मुलेबाळे आहेत. त्यांचाही प्रपंच आहे. त्यांचाही बँक बॅलन्स आहे. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यातही चेतना आहे. त्यांनांही अभयदान हवचं असत. त्यांनाही जगायच असतं. त्यांना मुद्दाम मारणं म्हणजे केव्हाही पाप असतं.

जैनांचा दुसरा पार्ट म्हणजे ‘स्वावलंबन’. येताना एकटा व जातानाही एकटाच मधला बाजार परस्परांचा. आपलीच कर्मे आपलेच विचार, आपल्यावर भले-बुरे परिणाम करत असतात. दुसरी कोणतीही अन्य शक्ती यामध्ये फेरबदल अथवा ढवळा-ढवळ करू शकत नाही. अख्या अध्यात्माचं सार, अगदी थोडक्यात सांगायचं झाल तर ‘तूच तुझा शिल्पकार’, ‘तूच तुझा पहारेकरी’ आणि ‘तूच माझा मारेकरी,’ असचं म्हणावं लागेलं.

तिसरा संग म्हणजे ‘शेजारी-पाजारी.’ माझ्या शेजारी व्यापारांचा मारवाडी वर्ग. त्यांचा पैसा हा सर्वस्व. पैसा मिळवणे हाच मारवाडी बाणा. मग त्यासाठी काहीही करायला लागू देत. कितीही कष्ट उपसायला लागू देत. या समाजात भीक मागणारे लोक नाहीत. यांचा छाप आमच्या परिवारावरही गडद पडला.

या शेजार्‍यांचा आमच्या परिवारावर फारच परिणाम झाला. पैसा मिळकतीच्या कामात आमचाही परिवार त्यांच्या खांद्याला खांदा लावून पैसा एके पैसा असे पैसा पिसण्याच्या कामात आम्ही सगळे सहभागी झालो.

संग चौथा, ‘मित्र व शाळा’ या माध्यमाने समाजाच्या चाली, रीती, रूढी व परंपरा, भक्षणं, रक्षण, शिक्षण यांचे शास्त्र याची माहिती त्या माझ्या मनावर बिंबली. मुद्रितकला वाचनाची कुवत माझ्यात आली. एकूण जीवनाचा सारीपाट कळाला.

जो जन्माला घालतो तोच पालन-पोषण, रक्षण करतो, त्यांना ‘आई-वडील’ म्हणायचं. चुना, विटा, माती घेऊन जो घरे बांधतो त्याला ‘गवंडी’ म्हणायचं. चुली, घागरी, माठ बनविणार्‍याला ‘कुंभार’ म्हणायचं. जीवनाची इकडची, तिकडची माहिती देणार्‍याला ‘गुरूजी’ म्हणायचं. आपले भले चिंतणार्‍याला व बरोबरी करणार्‍याला ‘मित्र’ म्हणायचं व आपल्याशी वाईट वर्तणूक करून बुरे चिंतणार्‍याला ‘शत्रू’ म्हणायचं.

हे सगळेच शाळेतून आम्हाला मिळाले. जीवनाचा पाया पहिली सात वर्षे ज्या मातीत घातली गेली ती माती होती कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरची (वडिलांचे गाव). कुंभोज हे आजोळ. उदगाव (आईचे माहेर). इथल्याचं रूढी परंपरेतून मी वाढलो आणि घडलो. साहजिकच हाच मानाचा पॅटर्न बनला. हीच माती मला चिकटली.

जन्मताना आपण सगळेच कोरी पाटी असतो. बालीश असतो, संस्कारक्षम असतो. हालत असेल, चमकत असेल, तिकडे नेजर धावते, म्हणूनच पाळण्यातल्या मुलाला खुळखुळा वाजवून समजवितात. शेण उचलताना तुम्ही फक्त शेण उचलू शकत नाहीत ते जिथे पडले असेल ती तिथली माती घेऊनच उठेल हाच संस्कार. हे सगळेच परिणाम मी माझ्याजवळ पाहतोय. पैशाला वाजवी महत्त्व दिल्यामुळे माझी सोन्यासारखी माणसं म्हणजे चुलते वगैरे काही दुखावली गेली. स्वावलंबन, सेवा व अहिंसावादी विचार मला गांधीबाबाकडे घेऊन गेलेत.

आम्ही आमचे उभे राहायला, स्वतःची देखभाल करायला समर्थ आहोत हा विचार परस्परातले रिलेशन खराब करायला निमित्त झाले. तू वेगळा, मी वेगळा, माझा आत्मा महत्त्वाचा, धर्म महत्त्वाचा यातून आप-पर भाव दृढ झाला. थोडक्यात मन मुर्दाड झाले.

कोणी कोणाचेच भले-बुरे करू शकत नाहीत. आपले जीवन सर्वस्वी आपले विचार, आपली कर्मे घडवीत असतात. याच विचारांच्या खांबावर माझ्या जीवनाची वेल तरारू लागली होती. त्यामुळेच मला जो पाही त्याला मी सगळाच वेगळा वाटत होतो. लहानपणी मला शेजारी-पाजारील लोक ‘क्रांतीवीर नाना’ असेही म्हणत असतं.

निरागस मुलांचे बालमित्र अनेक असले तरी जे बालमित्र अजूनही संपर्क जोडून असतील त्यांचा उल्लेख जरूर झाला पाहिजे. तशा दोन मित्रांचा उल्लेख मला आर्वजून करावासा वाटतो. पैकी एक ‘राजगोंडा पाटील’ आणि दुसरा ‘राजाराम गुरव.’

कुंभोज आजोळी, आजोबा-आजीच्या जोडी पैकी आजी नव्हती, आजोबाचं होते आणि उदगाव या आईच्या गावी, आजोळला आजी आजोबांपैकी आजोबा नव्हते तर आजी होती. तो वाडा गाव कामगार पाटलांचा वाडा होता. त्या वाडयात राजगोंडा नावाचा गावकामगार पाटलाचा मुलगा होता. पाटील म्हटलं की थोडासा अभिमानी, पण बालपणामुुळे तो गंध नव्हता.

शेवयाच्या डब्याचं टोपणं काढून, त्या टोपणावर डफ समजून थाप मारून, उडया मारून तो शाहीरकी करायचा. कधी मी प्रेक्षक व्हायचो तर कधी सूरकरी. काठीला डबा बांधून तार छेडायचा. कानाला हात लाऊन हा जीऽऽ-रं जीऽऽ-जी म्हणायचा.

त्यावेळी मला आजी भाकरीवरती लोण्याचा गोळा टाकून त्याला लोणचं घासून देत असेे. तो पण आपल्या आजीकडून तसचं भाकरीला लोणचं घासून घेऊन येई व आम्ही मांडीला मांडी लाऊन खात असू.

एकदा काय झालं. माझी मावशी हंडयातून पाणी घेऊन पाणी प्यायली. ते भांड उष्ट झालं. पुन्हा तेच भांड हंडयात बुडवलं. हंडा उष्टा झाला. आजीनं त्यातलचं पाणी माझ्याजवळ आणून ठेवलं. मी ते हात धुण्यासाठीचं फक्त वापरलं. जयसिंगपूर दीड-दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तेथे जाऊन पाणी पिऊया हा विचार मी केला.

“हे पाणी मी पिणार नाही” असे म्हणून मी जयसिंगपूरकडे निघालो. घरापासून उदगाव हायस्कूलपर्यंत आजी पाठलाग करत आली.

“तुला घागरीतलं पाणी देते चल म्हणाली.” शेवटी आजी मला पकडण्यात यशस्वी झाली आणि ओढून मला घराकडे नेलं आणि माझी समज काढली.

‘राजगोंडा रामगोंडा पाटील’ मात्र हायस्कूलमध्ये माझा वर्गमित्र राहिला त्याची अक्षरे रेखीव असायची. त्याची हुशारी ठळक दिसायची. दिलीपकुमार आणि राजकपूर यांचा तो चाहता होता. दिलीपकुमार सारखाच केसं विंचरायचा, केसांचा कोंबडा ठेवायचा. शाळेच्या बोर्डवरती त्याचं नावं त्याच्या हुशारीमुळे लिहिलं गेलं. बालपणात त्याची आजी व माझी आजी मैत्रिणी होत्या. तोच वारसा आम्ही पण टिकविला. मित्र म्हणून आजही माझा त्याच्याशी संपर्क टिकून आहे. मला उदगाव गावची नाडी फोननी संपर्क ठेवल्याने कळू शकते.

असाच एक मित्र ‘राजाराम शंकर गुरव’ नावाचा. कुंभोज आजोळी, बालपणापासून तो आजही माझ्याशी संपर्क ठेवून आहे. गुरवाचा वाडा महादेवाच्या देवळालाच चिकटून होता आणि त्या देवळाच्या समोरच हा पाटील वाडा होता. तिथे हा राहात होता.

एकदा काय झालं, आम्ही फिरत-फिरत घरी न सांगताच शेतात गेलो. मी कुंपणात पडलो. बाभळीचा ताठर काटा डाव्या हाताच्या तळव्याकडून वरच्या भागाकडे वर आला. तो काटा राजारामने उपसला आणि त्याच कुंपणाच्या शेंड्याचे दूध त्या जखमेवर सोडले. हात घरी येईपर्यतं सुजून तडम् झाला होता. हा आमचा प्रताप घरी आल्यानंतर सर्वाच्या लक्षात आला.

...... पुढे कुंभोज गावात, माझा जेव्हा दवाखाना झाला तेव्हा तो रोज रात्री माझ्या बैठकीत यायचा. जेवलास की नाही? विचारायचा आणि दोन खाऊची पाने पुढे करायचा. सुपारी कातरायचा. जेवलो नसेन तेव्हा जेवण घेऊन यायचा. आकडी जाड दूध व भात ही त्याची समृद्धी होती.

आजही तो आनंदकुंज पर्यंत आपली समृद्धी हा सहभोजनाचा उपक्रम अजूनही राबवत असतो. कधी-कधी मला वाटतं. आईच्या गावचा राजगोंडा आणि वडिलांच्या गावचा राजाराम यांनाच फक्त माझ्या जीवनाचं राज, रहस्य इंगीत कळालेले आहे. हेच फक्त माझे खरे मित्र म्हणायला हवेत. मात्र राजगोंडा व राजाराम हे परस्पर एकमेकांना अजूनपर्यंत कधीच भेटलेले नाहीत.

कुंभोज गावच्या आजोळी मी तीन विशेष व्यक्तिरेखा विसरू शकलो नाही. त्यापैकी पहिली व्यक्तीरेखा आहे बंडा काका, दुसरी कान्या बाळू व तिसरी म्हणजे ग्रामपंचायतचा सादवणारा शिपाई (सनदी) याचं वैशिष्टय काय म्हणालं, तर हे ज्या वेळेला माझ्या संपर्कात येतं, यांचे गुण वैशिष्टय आजतागायत मी विसरलो नाही.

बंडया काकाच अपंगत्व, त्याचं लाळ गळणं, त्याची आडवी टोपी. बंडाकाकाला बाजारातून काही आणायला सांगितलं, दुकानदार त्याला विचारितं असे, “बंडा काय पाहिजे?”

तेव्हा तो म्हणायचा, “तू म्हण! तू म्हण!” मग दुकानदार एका ओळीनं दुकानातल्या सामानाची नावे घेत असे. बंडाकाकाला काडयाची पेटी हवी असेल तर तो दुकानदार जोपर्यंत काडेच्या पेटीवरती येणार नाही तोपर्यंत आकाशाकडे बघत घुमत राहणार व काडीच्या पेटीवरती आल्यावर टाण करून टाळी वाजवून जमिनीवर स्वतः जंप घेऊन पाय आदळून होकार देणार.

कान्या बाळूचे वैशिष्टय म्हणालं तर, हा घाणेरडे, मळलेले कपडे घातलेला, एका डोळयाने चकणा पाहणारा, दिसेल त्या व्यक्तीला, “अण्णा चहाला पैसे!” असे म्हणून मागत असे.

त्याच्या ताब्यातून जीव सोडवणे प्रत्येकाला मुश्कील व्हायचे. एक चिटोर कागद व पेन घेऊन त्याच्या मागे लागल्यास याच्यावर सही कर! आणि पैसे घे असे म्हणताच तो दाणदाण आल्यावाटे पळून जायचा. कधी काळी त्याच्या भावाने सही घेऊन त्याला फसविण्याचा हा परिणाम होता.

ग्रामपंचायतीची दवंडी देणारा शिपाई हाही डोळयाने काना बघायचा, लकवा झालेला, एक हात लोंबकळणारा, पाय उचलून टाकणारा, दुसर्‍या हातात पंचायतचे नळकुटे तोंडाला लाऊन स्पष्टपणे उच्चार करीत, “ऐका हो ऐका.... इकडे लक्ष द्या.” असे म्हणून जो मजकूर असेल तो-तो ठसक्यात व ठेक्यात उच्चारायचा. तसा त्याचा ठेका आणि स्पष्टता ही ब्राम्हणी शब्दांची असायची. ती तशीच त्याच्याकडूनच माझ्याकडे आली आहे असं मला वाटतं. प्रत्येक गल्लीत मी त्याच्या मागोमाग जात राहून, सादवताना मी त्याच्यासमोरचं हात बांधून उभा रहायचो.

जयसिंगपूर मुक्कामाच्या शेजारी मारवाडी लोकं होते. कुंभोज मुक्कामी शेजारी ब्राम्हण लोकांची सोबत होती. उदगाव-आजोळी मुक्कामी जैन लोकांचा ग्रुप होता आणि आज सानेगुरूजी हौसिंग सोसायटी, कोल्हापूर मुक्कामी लाटकर व रानडे या दोघांच्यामध्ये आमचा प्लॉट आहे. इथेही ब्राम्हणांचाच शेजार आहे.

शेवटी संस्काराचेच गुलाम आम्ही. जसे संस्कार तसा आकार. संस्कार हीच युनिव्हर्सिटी असते. असं मी म्हणतो. या युनिव्हर्सिटीचा माझ्यावर प्रभाव पडला. जग हेच बंदीशाळा म्हणावी लागेल. जो डिग्री घेतो, तो क्लोजअप होतो. जो डिग्रीच घेत नाही त्याच्या दहाही दिशा उघडयाचं राहतात. ‘जे-जे भेटे भूत तेथे मानीजे भगवंत’ याचा पडताळा म्हणजे माझे अस्तित्व होते. सततच मी जगाकडून आजतागायत शिकण्याचा प्रयत्न केला. जे-जे धडे घेतले. ते धडे जे-जे मला पटले ते न तटता मी दुसर्‍यांना देत गेलो. आधी केले मग सांगितले हे असेच आदान-प्रदानाचं स्वरूप ठेवलं.

झुक-झुक, झुक-झुक आगीनं गाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी.... मामाच्या गावाला जायला रेल्वेच्या गाडीची आवश्यकता नव्हती. पण कृष्णा नदीच्या पुलावरून या गाडया जाताना दिसत असतं. धुरांच्या रेषा हवेत सोडत असत. आईला एकटाच पाठचा भाऊ होता. मधल्या काळात त्यांचं आडत दुकान होतं. नेहरूंच्या कळपात सोडलं तर हा खपावा असं मामाचं नाक आणि टोपी होती.

मामा तसे प्रामाणिक आणि सज्जन गृहस्थ होते. त्यांचा मित्र संघ तसाच मोठा होता. त्यांचा लाभ माझ्या वडिलांना झाला. मलाही झाला. मामा मला नवीन कपडे व कधी जत्रेत खर्चाला पैसे देत. माझ्या आईला अक्का शहाणी म्हणतं. अक्का-शहाणीचा मुलगा शशीकांत म्हणून माझी ओळख अनेकांना करून देत. माझी आजी मामाच्या लाख चुका पोटात घाली. कारण मामा एकमेव होता.

‘जोगणी’ हा सण उदगाव गावात दिवाळी साजरी झाल्यासारखा. हा मुख्य सण साजरा व्हायचा. जत्रेचं रूप यायचं. सुगीत हा सण यायचा. मामा राजकारणातही असायचे. निवडूनही यायचे. पुढे ते कल्पवृक्ष या भावांच्या कंपनीमध्ये मॅनेजर झाले. त्या कंपनीला घरचा मनुष्य मिळाला होता. मामा तिथे असतानाच माझ्या वाटण्यांचा गोंधळ चालू झाला. माझे म्हणणे होते, या नाजूक कामातही मामागिरी दाखवावी. माझ्यावरती अन्याय होत असतानाही मामा मख्खपणे बांधावरती राहिले. त्यांनी बांध सोडला नाही. याचा मला राग आला.

मामाचे चुलत भाऊ श्री. देवगोंंड पाटील मला कधी-कधी भेटायचे. त्यावेळी भेटेल त्या वेळेला ते म्हणत असत, “तुझी टाइमिंग चांगली. तु आम्हाला सापडला नाहीस. बाप्पा आणि मी आलो होतो. ऊसाची कांडी हातात घेऊन तुला फोडून काडण्यासाठी आम्ही आलो होतो, ऊस न ऊस पाहिला शेतात, तू कुठे सापडला नाहीस हे तुझं नशीब समजायचं. नाहीतर काहीतरी महत्त्वाचा अवयव कायमचा दुखवून घेतला असतास.”

आजीने माझ्या सेवेचा व्यासंग बघून तूच मला माती दिली पाहिजेस म्हणून शेवटी हट्ट धरलाचं. मामाच्या प्रेस्टीजला हा अडथळा होता. शेवटी आजीने पडत्या काळात सानेगुरूजी हौसिंग सोसायटी मध्ये इथेच शेवटचा श्‍वास घेतला. तिला हवे ते करून देणे, मॉलिश करणे, इ. कामे आम्ही उभयंता करत असू.

क्रमश:


Previous Post Next Post