धडे धडाचे, गुद्दे मुद्द्याचे

डॉ. शशी पाटील यांनी अनेको वर्षे मोठ्या जोमाने स्वास्थ्य जनजागृतीचे कार्य केले आहे. त्यांनी अनेक शहरातून, गावोगावातून. खेडोपाड्यातून  'शिवांबू, योग व निसर्गोपचाराच्या ' प्रचारार्थ महाराष्ट्रातील गावोगावी फिरून स्वास्थ्य मोहीम राबवली. त्यांनी  या मोहिमेतून शकडो स्वास्थ्य सेवक व स्वास्थ्य प्रचारक निर्माण केले. प्रस्तुत लेख स्तंभातून, 'धडे धडाचे - गुद्दे मुद्द्याचे - आरोग्याचे ' या त्यांच्या मोहिमेतील व्याख्यानांचे संकलन, आम्ही क्रमश: प्रकाशित करीत आहोत.. 

मित्रहो,

तुम्ही विचार करा, आजकाल अत्यंत निकडीचा, जिव्हा़ळ्याचा, जवळचा, खासगी असा कोणता विषय तुम्ही समजता ?

माझे - माझे आरोग्य

मला विचाराल तर... मी म्हणेन, माझा अत्यंत निकडीचा, जिव्हाळ्याचा, जवळचा, खाजगी असा विषय, मी नक्की म्हणेन ‘माझे - माझे आरोग्य.’

सुळावरची पोळी

आज आरोग्य ही सामान्य गोष्ट राहिली नाही. आज आरोग्य सुळावरची पोळी ठरली आहे; कारण आज कुठल्या विद्वानाकडे आरोग्य दिसत नाही. श्रीमंताकडे आरोग्य दिसत नाही. सत्ताधीशाकडे आरोग्य दिसत नाही.

काही ना काही म्हणतीलच

आरोग्याचा विषय काढला तर, काही ना काही, देहाची कुरबूर आपली आपली मांडतीलच. मग... कुठेतरी दुखतंय म्हणतील, फुगलंय म्हणतील, सुजलंय म्हणतील, काळवंडलंय म्हणतील, झोप नाही म्हणतील, शौच नाही म्हणतील, भूक नाही म्हणतील, साखर म्हणतील, प्रेशर म्हणतील, काही ना काही बाकी म्हणतील हे नक्की! हे मी कशाच्या जोरावर इतक्या ठामपणे म्हणू लागलो आहे? काय माझ्याकडे पुरावा आहे?

कनवटीचे पणाला

तर मित्रहो, मी गेली चाळीस वर्षे, लोकांच्या आरोग्याची उधळलेली घडी सावरण्यात, त्यांचे रोग तुडविण्यात व्यतीत केली आहेत. असाह्य व असाध्य असेच रोगी माझ्याकडे धावत येत होते. हवेला तोंड पसरून भयभीत स्थितीत सारं कनवटीचे पणाला लावीत लोक येतात, येत होते व येत आहेत.

रोग मात्र पालथा

विज्ञानाचे सारे तारे तोडून, तज्ज्ञांच्या फिया भरून, घरेदारे, दागिने, बँका पालथ्या घालूनसुद्धा, रोग मात्र पालथा झाला नाही म्हणून मंडळी माझ्याकडे आली होती.

आग सोमेश्‍वरला

का, काय झालं बरं? रोग, तरीसुद्धा का पालथा झाला नसेल ? अहो, आग सोमेश्‍वरला अन् बंब रामेश्‍वरला! काय होणार तुम्हीच सांगा?

सुविधांनी रोगग्रस्त

मुळात विज्ञानाचा जन्म सुविधा निर्माण करण्यासाठीच झाला. हे तुम्हाला मान्य आहे का पहा! सुविधांमुळे माणूस नाजूक, कोमल, असमर्थ, दुबळा, अकार्यक्षम होत होत तो आता रोगग्रस्त झाला, असा माझा तरी दावा आहे.

विज्ञानाने लाचार

विज्ञानाने वाहने निर्माण करून पायांना तोडले. विज्ञानाने कारखाने उभारून हवा खराब केली. हात आळसाला जोडला. पाकशास्त्रात रुची वाढवून पचनशक्ती संपुष्टात आणली. विज्ञानाने गरजा वाढवून माणसाची मती भ्रष्ट केली. ज्याने माणूस ऐदी झाला, कैदी झाला, माणूस हा असा लोळागोळा झाला, माणूस विज्ञानाने लाचार झाला.

माणूस उद्धट  व हट्टी

त्याला एक तास वीज जाऊन चालत नाही, नळाचे पाणी थांबून भागत नाही. खिशातला पैसा संपून खपत नाही. हाकेला ‘ओ’ मिळालीच पाहिजे. खटक्याला दिवा लागलाच पाहिजे, नळाला पाणी आलेच पाहिजे, फेकला पैसा तर तमाशा दिसलाच पाहिजे. एकूण काय, माणूस हट्टी झाला, उद्धट झाला, असंयमी झाला...

वास्तविक संसाराच्या कळीतून परमार्थाचे कमळ उमलले पाहिजे; परंतु सामान्य माणसे ज्या पद्धतीने परमार्थ करतात, त्याने संसाराची कळीच कुस्करली जाते.

खाऊ तेवढे भाऊ

आराम सर्वांनाच प्यारा झाला, पैसा सर्वांनाच हवा झाला... आरामातून पैसा कमावणारा जावई, प्रत्येकालाच पाहिजे झाला! मग कुणी कागद, कुणी सिमेंट, कुणी चारा, कुणी रस्ते, कुणी खडी खाऊ लागला. सगळेच ‘खाऊ तेवढे भाऊ’ झाले. हे सारे काही एका विज्ञानाकडून झाले.

साप माणसाला एकदाच दंश करून त्याचा जीव घेतो; परंतु भ्रष्ट व अनिष्ट मार्गांनी मिळविलेला शापित पैसा हा साप माणसाला क्षणोक्षणी दंश करून त्याचे जीवनच विषमय करून उद्ध्वस्त करतो.

प्रतिकार रोगाबरोबर

अन्यथा पूर्वीचा माणूस खरा होता, बरा होता. उशाला धोंडा ठेवून झाडाच्या सावलीत झोपत होता. त्याला झोप लागत होती. नदीत पाणी होतं. डोंगर बोडके नव्हते, दंडाला पीळ होता, मनगटात बळ होतं, दंडाला सुया माहीत नव्हत्या, गळ्याला गोळ्या दखल नव्हत्या, अख्खा माणूस प्रतिकारक्षम होता, प्रतिकार मग रोगाबरोबर आणि दुश्मनाबरोबरही !

जगणे महाग, मरणे स्वस्त

आज आत्महत्या स्वस्त झाल्या, पाण्यात उड्या घेणं सहज झालं, रेल्वेखाली पडणं सोपं झालं!

एकूण काय...?

मरण सोपे, जगणे अवघड.

अर्थात जगणे महाग,

मरणे स्वस्त...

म्हणूनच विद्यार्थी अपयशांना भिऊन, शेतकरी कर्जाच्या व्याजाला भिऊन, सुना जाचाला भिऊन, सोबत मुलाबाळांना घेऊन, उड्या घेत आहेत.

संयम संपला, विचार थांबला !

एक घाव, दोन तुकडे

माणूस अगदी शीघ्रकोपी झाला. एक घाव दोन तुकडे ! समाज दवाखान्याच्या, कोर्ट-कचेरीच्या पायर्‍याना झिजवू लागला.

शिक्षण दगाबाजीचे

शिक्षण चालबाजीचे व लबाडीचे मिळू लागले. अहो, पीएच. डी. शिकलेली मुले आज माझ्यासारख्या बापाला विचारू लागली, ‘तू माझ्यासाठी काय मिळवलंस...?’ एकूण काय... दगाबाजी, दगाबाजी, दगाबाजी !

देवाने माणसांना डोकी देऊनसुद्धा ती डोकी शहाणपणाने वापरायचीच नाहीत, असा जणू त्यांनी निश्‍चय केल्यामुळे एकमेकांची डोकी फोडण्याचे प्रसंग निर्माण होतात, हीच मानवी जीवनातील मोठी डोकेदुखी होय.

माणसातील माणुसकी जागृत करणे हाच आहे खरा धर्म, तेच आहे खरे शिक्षण व तोच आहे मानवजातीच्या सर्व समस्यांवरील प्रभावी उपाय.

निसर्गाचा तोल गेला

कुटुंबातील एकसंधपणा संपला, समाजातील विश्‍वास संपला, शिक्षणातील सुरक्षितता संपली, धर्मातली निष्ठा संपली, वडीलधार्‍या बुजुर्गांचा धाक संपला, शासनाची भीती संपली. एकूण, निसर्गाचा तोल गेला... प्रलय ! प्रलय ! प्रलय !

समाजाची नाडी

सारा काही विज्ञानाचा हा परिपाक नव्हे काय? इकडे विज्ञानाने वैद्यकीय विभागात मानवी शरीरातील मर्मस्थळे बदलविण्याची क्षमता बाळगलेली असताना लोक हवालदिल होऊन, अगतिक होऊन, नाशिकच्या फरशीवाल्या बाबांपासून, आस्था टी.व्ही.च्या रामदेवबाबापर्यंत, स्वास्थ्यासाठी पदर पसरीत आहेत, याचा अर्थ काय? यातून समाजाच्या स्वास्थ्याची नाडी स्पष्ट होते.

लोकांना जगायचे

खालच्या कोर्टातील फाशी वरच्या कोर्टात माफ होईल, अशा प्रकारच्या केवळ आशेतून, अनेक प्रकारच्या विद्यमान उपचारांनंतर, या उपेक्षिलेल्या प्राचीन उपचाराकडे, लोक शेवटी वळतात व यशाची हमीही मागतात; कारण लोकांना काहीही करून जगायचे आहे, वाचायचे आहे. यावरून विज्ञानाचा, आधुनिकतेचा गवगवा करणारे निश्‍चितच अंतर्मुख होतील, असे मला वाटते.

मरता, क्या नहीं करता?

सर्वच उपचार पद्धतींना तशा मर्यादा या आहेतच. आस्था टी.व्ही. चॅनेलवर रामदेवबाबांच्या योग दरबारात होणारी बातचित, नेमकी काय सांगते हे लक्षात येण्यासारखे आहे. जीव रक्षण करण्यासाठी लोक कोणी काय सांगेल ते ते, करायला तयार आहेत. शेवटी, ‘मरता, क्या नहीं करता?’ हे आहेच.

याच आशेने

माझ्या चाळीस वर्षांच्या विनाऔषध स्वास्थ्य मोहिमेमध्ये दाखल होणारे रुग्ण, विद्यमान उपचारांमधून रिपोर्ट, दाखले घेऊनच आलेले होते. साधारणपणे हार्टचे, बायपासचे रुग्ण, शस्त्रक्रिया स्थगित करता येईल का? कॅन्सरचे रुग्ण, माझी गाठ, शस्त्रक्रिया करूनही पुनःपुन्हा  वाढते, इथे ती वाढ थांबेल का? काहीही केले तरी वजन वाढते आहे, तेव्हा इथे दाद मिळेल का? विवाहाच्या वीस वर्षांनंतरही संतान नाही; तेव्हा चान्स शेवटी तरी मिळेल का? बी. पी., मधुमेह, गुडघेदुखी, पोटशूळ, संधिवात, इ. रुग्ण महागडी औषधे खायची तरी किती? इथे दाद मिळते का? निम्म्याहून अधिक केवळ याचेच रोगी आशेने ‘आनंदकुंज’ नावाच्या शिवाम्बू आश्रमात लोकाश्रयाला येतात.

आश्रम जनस्वास्थ्यहितार्थ

आम्ही हा आश्रम आता कोल्हापूरच्या पश्‍चिमेला कळे, बाजारभोगाव मार्गे, डोंगराच्या कुशीत, कासारी नदीच्या किनारी, 30 एकर जागा घेऊन वसविला आहे. अर्थात बर्‍याच दिवसांचे स्वप्न होते ते. निसर्गोपचार निसर्गाच्या कुशीतच असावा. प्रदूषणमुक्त हवा, मुबलक पाणी; अर्थात शांत, प्रशांत परिसर. शंभरएक रुग्णांच्या निवासाची, आहाराची, उपचारांची व्यवस्था व प्रशस्त योगा हॉल, लॅब, अतिदक्ष सेवादालन, मॉर्निंग वॉकसाठी खुले पद-उद्यान, पोहण्यासाठी स्विमिंग टँक, फिजिओथेरपीची साधने इ. गोष्टींनी सुसज्ज होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे सेंटर सुरू झाले असून, पन्नासएक रुग्ण येथे आज उपचार घेत असतात. देशाच्या सर्व भागांतून, परदेशातूनही रुग्ण येतच आहेत. उपचार देशी, पेशंट परदेशी हा विनोदाचा प्रश्‍न असला तरी, हा उपचार निर्वाणीचा लोक मानत आहेत. ट्रस्ट रजिस्टर करून जनस्वास्थ्यहितार्थ 12 ही महिने 24 तास पोलीस खात्यासारखे काम चालू आहे.

शोधा म्हणजे सापडेल !

मला मिळालेल्या 40 वर्षांच्या रुग्णसेवेतून जी गोष्ट लक्षात आली आहे, ती ही की, लोकांचे स्वास्थ्य जिथे हरवले आहे, तिथेच त्यांनी शोध घ्यायला हवा, शोधा म्हणजे सापडेल. सुई जिथे हरवते, ती तिथेच कुठेतरी मिळते. आपल्या स्वास्थ्याची वसाहत आपल्या दिनक्रमातच लपली आहे, आहार, विहार, आचार, विचार यांतच ती गुंतली आहे. तेव्हा हरएक रुग्णाला संपूर्ण स्वास्थ्यासाठी इथूनच प्रवास करायला हवा.  वास्तववादाच्या अधिष्ठानावर प्रयत्नवादाची कास धरीत विकासवादाकडे झेप घेणे म्हणजे जीवनविद्या.

निसर्ग निश्चित निश्चिंत

विज्ञान कोठून जन्माला आलं ! असं मला कोणी जर विचारलं, तर मी म्हणेन, जेव्हा मानवाच्या नजरेला आग दिसली, मग ती आग फांदीला फांदी घासून असेना किंवा आकाशातून कडाडलेली वीज असेना किंवा उन्हाच्या तावाने आग जन्मलेली असेना; साधारण तेव्हापासून विज्ञानाचा काळ सुरू झाला असावा, असं मला वाटतं. तोपर्यंत शुद्ध पूर्ण  निसर्ग निश्चितपणे निश्चिंत होता. जंगलं जळाली, पालापाचोळा जळाला, पशु-पक्षी, कीट-पतंग जळाले. फळे-कंदमुळे भाजली. माणसाच्या जिज्ञासेने या जळक्या अवशेषांनाही जीभ लावून पाहिले.

माणूस आगीच्या स्वाधीन

येथूनच माणूस आगीच्या स्वाधीन झाला. येथूनच आग त्याच्याशी पाठशिवणीचा खेळ खेळू लागली. आगीची ठिणगी किंवा ऊब हा तसा सूर्याचाच अंश आहे. म्हणूनच तिच्या जिभळ्या सूर्याच्या दिशेने आकाशाकडे सरकताना दिसतात.

आगीशिवाय चाललंच असतं

पृथ्वीच्या पोटात असणारा ‘लाव्हा’ व प्राण्यांच्या अंगात असणारा ‘लहू’ हे दोन्ही रस तसे लालच आहेत आणि दोन्ही बाहेर पडताच घट्टही होतात. या पृथ्वीवर पाण्याशिवाय जरूर नडलं असतं; पण आगीशिवाय चांगलंच चाललं असतं, असं मला वाटतं

विश्रामालाही आग

माणसाने आगीला वश करून घेतलं. माणसानं आगीला जिंकलं. आगीला गुलाम केलं. आज माणूस डोक्यावर, खिशात, घरादारात आग घेऊन मिरवत आहे. रात्रीलाही त्याने दिवे लावले. विश्रामालाही ज्याने आग लागली. सारंच आज अग्निकुंडात खदखदत आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आग सर्वही गोष्टींना भस्म करते. आग विभूती देते. आज प्रत्येक देशाकडे अशा पन्नास पृथ्वीग्रहांना पाघळून टाकण्याची क्षमता आहे. असं हेच विज्ञान आज म्हणत आहे. आगीतून जन्माला आलेलं विज्ञान, शेवटी पुन्हा, आगीलाच जाऊन मिळालं म्हणायचं.

माणसाच्या वस्तीला वसविणार्‍या वासुदेवाचीही माणसाला फिकीर राहिलेली नाही. ही कृतघ्नता की प्रगती. तुम्ही काही सांगाल?

स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्गदेवतेने जी व्यवस्था केली, त्या व्यवस्थेला जीवन असे म्हणतात.

आधीच माकड... हातात कोलीत

माणसाने पाक विज्ञान पूर्णत: आगीत पेटवलं आहे. भाजके, तळके अन्न माणसाचे आज टाळके फिरवीत आहे. दोन-अडीच इंचांची जीभ, पाच-सहा फुटांच्या देहाला आडवा करते आहे. आधीच माकड.... त्यात हातात कोलीत !

आकाशात सुखाने विहार करण्यासाठी पक्ष्याला दोन पंखांची गरज असते, त्याचप्रमाणे जीवनाच्या गगनात आनंदाने व डौलाने विहार करण्यासाठी माणसाला प्रपंच आणि परमार्थ या दोन्हींची नितांत आवश्यकता असते.

गेल्या शतकाला काय माहीत होतं ?

त्यात गेल्या शतकाने आपल्या देशाला, आपली निशाणी म्हणून, ब्रिटिशांनी दोन गोष्टी भेट म्हणून दिल्या आहेत. पैकी एक आहे अलोपॅथी व दुसरी आहे चहा. मला तुम्ही सांगा, अठराव्या शतकातल्या आपल्या देशाला, यांपैकी काय माहीत होतं ? या गोष्टींना कोण जाणत होता ?

झटपट गुण आणि टीपटॉप ठेवण यांमुळे ब्रिटिशांच्या या भेटीचा परिणाम, प्रभाव घेत जनमानसात उतरला.

नैसर्गिक सिस्टीमची वाट

ज्यामुळे निसर्गाच्या धूळदाणीबरोबरच, देहाच्या नैसर्गिक सिस्टीमची वाट लागली. अलोपॅथीचे एक दु:ख हे आहे की, अलोपॅथी परिणामाकडे पाहत उपचार देते. कारण मुळाकडे ती पाहतच नाही. देहावर एखादे करट किंवा एखादी गाठ, ही कशी व का आली? तिचे काय संकेत आहेत, याचा तपास न करता तिला तोडायचे कसे, इतकेच ती करते आहे.

अलोपॅथीची शोकांतिका

समजा, गाडी पिक-अप घेत नाही. मिक्सफायर करते आहे, तर कार्बोरेटर साफ करेल, डी-कार्बन करेल; पण तेल गाळून घेणे व टाकी साफ करणे करणार नाही, फ्युएल योग्य आहे की नाही पाहणार नाही. ही आहे, अ‍लोपॅथीची शोकांतिका !!

स्पीड ब्रेकर्स

दुसरी म्हणाल तर, एका रोगावर उपाय करताना, जी औषधे दिली जातील, ती औषधे त्या रोगाची तीव्रता नक्की शिथिल करतील; पण अन्य रोगांना ती औषधे उठवून बसवतील. ही त्या औषधांची कमाल म्हणावीशी वाटते. ही सर्व औषधे, रसायनांमधून, विजातीय द्रव्यांतून बनलेली असतात. शरीराच्या मूळ विजातीय द्रव्यांत ही औषधे पुन्हा सामील होतात. तीच पुढे जाऊन, आरोग्याच्या प्रवासात स्पीड ब्रेकर्सचे काम करू लागतात. कुठे ना कुठे, ही देहात पेरलेली औषधे, उगविल्याखेरीज राहत नाहीत. जशी आत जाताना गुण दाखविले, तशी, ती बाहेर पडतानाही, आपले गुण उधळवल्याशिवाय राहत नाहीत. यात काय तो फक्त मध्ये काळ गेलेला असतो. 

प्रतिकारशक्तीचा र्‍हास

त्यामुळे रुग्णाला, आजपर्यंत खाल्लेल्या औषधाचा हा परिणाम आहे, हे लक्षातच येत नाही. मर्मस्थान नाकाम करीलच. वारंवार घेतलेली औषधे स्वाभाविक प्रतिकारशक्तीचा र्‍हास करतात. ही गोष्ट आणखी वेगळी. एड्सचे भूत यातूनच जन्माला आलं आहे, असा माझा तरी दावा आहे.

 मालक हाच बॉस

आपण उगीच गंमत म्हणून पाहूया, प्रत्येक रोग हा संवेदनेच्या मार्गांनी हजर झालाय. मुळात शरीर यंत्रणेचा मालक, हा बॉस आहे. त्याला छोट्या-मोठ्या गोष्टींची खबर देणे, हे प्रामाणिक शरीराचे कर्तव्य आहे. नेमलेले खबर्‍यांचे काम शरीर वक्तशीरपणे करीत असते. पण... आपली संस्कृती सुखद संवेदनेला स्वास्थ्य म्हणत बसली. दुःखद संवेदनेला संस्कृति रोग म्हणत राहिली.

शरीर - इमानदार  खबर्‍या

खबर्‍या (शरीर) जेव्हा दुःखद संवेदनेला घेऊन आला, तेव्हा संस्कृतीने (विद्यमान पॅथीने) खबर्‍यालाच ठोकले. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती (कमांडो) दुखावली. खबर्‍या दुखावला, म्हणून औषधे (पांगुळगाडा) देऊन, त्याला संस्कृतीने पुन्हा सबळ करण्याचा प्रयत्न केला. त्या पांगुळगाड्याने (औषधाने) खबर्‍याच्या कमरेतील अवसान संपविले.

गाडगे फोडून की गळा कापून?

थोडक्यात ‘ध’ चा ‘मा’ झाला. रोगाला धरून आणण्याच्या ठिकाणी, रोग्यालाच मारून आणले.

गाडग्यात अडकलेले डोके सोडवणार तरी कसे? गाडगे फोडून की गळा कापून? हा सारा चिंतनाचा विषय, मी सुज्ञ वाचकांसमोर ठेवतो आहे.

क्रमश:

Previous Post Next Post