मुळनक्षत्री : एक प्रेरणादाई जीवनधारा : भाग - 12

ही मंडळी हृदयाकडूनच मुकली आहेत

शिवाम्बू हा विषय शिवलिंग उपासना करणार्‍यांनी मान्य केला. भगवान शंकराने महादेवी पार्वतीला आरोग्य व सौंदर्य सुखरूप रहावे म्हणून सांगितलेले उपाय डामरतंत्र ग्रंथात 107 संस्कृत श्‍लोकात लिहिले आहेत. शिवाम्बूचा पेला हातात घेण्यापासून ते मूत्र उत्सर्जन करण्यापर्यंत ऋतूकालपरत्वे शिवाम्बू बरोबर अनुपानही सुचवले आहे.

ऋषी परंपरेनुसार मठाधिपती श्री. काडसिद्धेश्‍वर महाराज यांनी या उपचार पद्धतीला ‘जीवन जगण्याची कला’ म्हणून पुष्टी दिली व सर्वांनी मान्यही केली; तरी देखील आमच्या दिगंबर जैन परंपरेत, आमच्या परिवाराने शिवाम्बूला झिडकारलेलेच दिसते आहे. ग्रामीण भागात एक वाक्यप्रचार आहे. ‘वैद्याची पोरं गांजणाणं खाल्ली’ या म्हणीनुसार, शिवाम्बूसारख्या संजीवनी चिकित्सकेचा चिकित्सक, स्वतःच्या पदरी असताना ही वडिलोपार्जित माणसे, आज मला फोटोत पाहावी लागत आहेत. या उपचाराचा पहिला असर हृदयावरती होत असताना ही मंडळी हृदयाकडूनच मुकली आहेत. माझ्या केंद्रामध्ये विविध प्रकारचे अनेक रोगी बरे होत असलेले ऐकूनही त्याकडे कानाडोळा करून मी मरेन पण शिवाम्बू घेणार नाही, असेच म्हणत त्यांनी प्राण सोडलेला आहे.

माझे बंधू डॉ. श्री. एन. जे. पाटील यांनी एकदा इगतपुरी येथे विपश्यना केंद्रामध्ये दहा दिवस ध्यान शिबीर केले होते. शेवटच्या दिवशी उजव्या पायाच्या पिंढरीमध्ये शिरात शीर गुंतली आणि प्रचंड कळा येऊ लागल्या. पाय सरळ करता येईना. मी सोबत होतो. मनोहर मिरजे हे त्यांचे मित्रही सोबत होते, ते ड्रायव्हींग करत होते. अण्णांचा पाय मी माझ्या खांद्यावरती घेऊन मुंबईला आलो. तेथे एका डॉक्टरांना दाखवलं. तेंव्हा त्या डॉक्टरांनी सांगितलं, आज नी उद्या यातला अडथळा हार्टअ‍ॅटॅक यायला निमित्त बनू शकतो. शेवटी तसेच झाले. अशा प्रकारे ब्लॉकेज असलेल्या केसेस आमच्याकडे बर्‍या झालेल्या होत्या. शिवाम्बू बद्दल घृणा व जैन परंपरेतील कर्मठपणा या गोष्टींमुळे त्यांनी शेवटपर्यंत नकार दिला.

एकदा काय झालं, बाहुबली गुरूकुल आश्रम येथे महासभा चालली होती. त्या सभेचे अध्यक्ष डॉ. एन. जे. पाटील होते. त्या सभेमध्ये अध्यक्षीय भाषण करताना भावविभोर होऊन मत व्यक्त करताना त्यांना तिथेच हार्ट अ‍ॅटॅक आला.

त्या सभेत आमच्या सानेगुरूजी वसाहतीमध्ये राहणारे डॉ. सतीश पाटील (सर्जन) यांनी माझ्या बंधूंना आपल्या कारमध्ये टाकून कोल्हापूरला आणले. अत्यावश्यक सेवेसाठी हार्ट स्पेशालिस्ट     डॉ. कुलकर्णी यांच्याकडे त्यांना ठेवण्यात आले. डॉ. कुलकर्णी यांना तपासणीत गुंतागुंत अवघड वाटली, म्हणून पुढच्या उपचारासाठी मुंबईला पाठविले.

दरम्यानच्या काळात मी माझ्या भावाला, माझा उपचार घेतो का बघ? असं म्हणालो. तर त्यांनी घेऊन तरी बघायचं होतं? त्यावेळी कोपरापासून हात जोडून स्ट्रेचरवरूनच त्यांनी मला नमस्कार करून नकार नोंदवला. रेल्वेने ते बॉम्बे हॉस्पिटलकडे रवाना झाले. तेथे मध्ये टेबलावर घ्यायच्या आधी दुसरा व तिसरा अ‍ॅटॅक येऊन ते तेथेचं निधन पावले.

वडिलांनाही अशाच प्रकारे एके सकाळी हार्ट अ‍ॅटॅक आला. मिरजेमध्ये आधुनिक उपचार देत असताना उलटया होऊन ते देवाघरी गेले. चुलत्यांचाही हार्ट अ‍ॅटॅक येऊनच, त्यांचा शेवट झाला. तोडमोड झाली पण शिवाम्बूची तडजोड झाली नाही.

माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा असलेला भाऊ श्री. शांतीनाथ पाटील, यालाही हार्ट अ‍ॅटॅक येऊनच तातडीने बायपासचे ऑपरेशन करायला सांगितले होते. एकाच आठवडयामध्ये हार्ट दोनदा ओपन करून घ्यावे लागले.

अत्यावश्यक सेवेसाठी कोल्हापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून खास हेलिकॉप्टरने नेऊन डॉ. कोल्हे हार्ट स्पेशालिस्ट, मुंबई यांच्या नियंत्रणात एक महिनाभर ट्रीटमेंट चालू होती. तरी, मी त्यांना भेटायला गेलो नाही. अशा कर्मठ लोकांना भेटण्यामध्ये मला स्वास्थ्य वाटले नाही.

त्यावेळी मला बहिणीचा फोन आला. जयश्री पाटील बोलू लागल्या,  “शशीदादा, तू लवकर यावसं, शांतीदादा काही क्षणासाठी आहे.”

काही मंडळी तिकडे तातडीने रवाना होत होती. त्याच लोकांच्या ग्रुपमध्ये मीही निघालो. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हा शांतीनाथ अ‍ॅडमिट होता. मी आतमध्ये गेलो.

त्याच्या नाकात टयूब, सोबत ऑक्सीजन, कंबरेला टयूब, पांढरा फटक कृश चेहरा, सापाची कात सरकल्यागत त्वचेचे पापुद्रे, अ‍ॅलोपॅथीचा बडेजाव, गंभीर वातावरण हे सर्व पाहिलं.

माझ्यातला बंधुभाव जागा झाला. पूर्वग्रह दूषितता दूर केली. त्यांचा चरणस्पर्श घेऊन अ‍ॅक्युप्रेशर दिलं. स्वतःच्या हाताने स्पंजबाथ दिला. बेडशी खिळलेला हा भाऊ बेड सोडून खाली उतरला आणि त्याने चार पावले वॉर्डमध्ये रपेट मारली.

त्यावेळेस डॉ. कोल्हे राऊंड घेत होते,  “तुमच्या हातात इतकी जादू आहे! तुमचं सानिध्य इतकं महत्त्वाचं असताना, तुम्ही भाऊ म्हणविता आणि इतका उशीर का केला?”  असं ते मला म्हणाले. शांतीनाथ यांच्या पत्नी, म्हणजे माझी वहिनी एम. डी. असलेल्या सौ. उषा पालकर यांना मी म्हणालो,  “एक महिना माझ्याकडे कोल्हापूर येथे शिवाम्बू भवन मध्ये रहा.”

पालकर वहिनींना हा प्रस्ताव पटला. आधीच सगळे खूप कंटाळलेले होते. कोणीतरी जबाबदारी घेणारा हवा होता. एक महिनाभर माझ्याकडे राहिले. शिवाम्बू मॉलीश, नैसर्गिक आहार, सूर्यस्नान, अ‍ॅक्युप्रेशर यांच्या अनुरोधाने एका महिन्यात निरोप घेऊ बघणार्‍या माझ्या भावाला या उपचार पॅथीने उभे केले.

आजही आमच्या सगळया बहिणी म्हणतात,  “शशीदादा, तू आलास म्हणून शांतीदादा वाचला.”

दुसरा एक हार्ट अ‍ॅटॅक संबंधित आमच्या परिवारातील प्रसंग म्हणजे कवठेसार येथील माझा आतेभाऊ माझ्याच वयाचा, माझा सवंगडी ‘श्रीयुत बाळासाहेब किणीकर’ यांचा परवा-परवा हार्टच्या व्हॉलसाठी खास तीन लाखाचे ऑपरेशन करण्यात आले पण त्या बिचार्‍याला महिनाभर देखील जगता आलं नाही.

‘आमच्या उपचाराचा प्रसाद तू आधी घ्यावासं’ असं मी त्याला सारखा अग्रह करत होतो.  “मी मरणार पण धर्म बाटवणार नाही.”  असं तो मला म्हणाला. तो खरच अत्यंत धार्मिक होता. आमच्या उपचारामध्ये शिवाम्बू हाच एक उत्सर्जित पदार्थ असल्यामुळे तो या सर्वांना अस्पृश्य झाला होता.

या वडिलधार्‍या लोकांचा हा अ‍ॅटॅक काही अंशाने मलाही भिती घालत होता. डॉ कोल्हे एकंदर हिरिडीटीतली परंपरा पाहून आम्हा परिवारातल्या लोकांना प्रिकॉशन म्हणून म्हणाले,  “तुम्ही काही अत्यावश्यक गोळया चालू ठेवाव्यात नाही तर तुम्हालाही हार्ट अ‍ॅटॅक येऊ शकतो.”

आमच्या परिवाराच्या परंपरेत इतके हार्ट अ‍ॅटॅक का यावेत? यामागे बारीक निरीक्षण करिता ही मंडळी अधिक प्रमाणात दूध दुभत्याचा वापर करणारी होती. दूध-दूभतेसुद्धा आजच्या काळासाठी फक्त डोकेदुखी होऊन नाही तर हार्ट अ‍ॅटॅक ही होऊन बसला आहे. दूधा-तुपाचा चंगळवाद निर्विवाद दावा करतो आहे, दूधं जरूर पूर्णान्न आहे, पण अपूर्ण शरीरासाठी आहे. पूर्ण शरीरासाठी नाही. म्हणजेच ते बाळासाठी आहे, तुमच्यासाठी नाही. दूधाचा वापर एकवेळ औषध म्हणून वापर करू शकता पण अन्न म्हणून नाही. औषधासाठी सर्वकाही आम्ही वापरू शकतो. पण अन्नासाठी सर्वकाही वापरू शकत नाही.

दूधाचा पान्हा वासराकडे अर्थात बाळाकडे पाहून जर फुटत असेल, तुमच्याकडे पाहून तो जर फुटत नसेल, तर दूध घेण्याचा नैतिक अधिकार आम्हा लोकांना पोहचत नाही. मोत्या, खुराक खाऊ घालणार्‍याला पाहून शेपूट हालवत असेल, पण गाय वैरण घालणार्‍याला पाहून पाण्यावर घालत नाही.

‘बळी तो कान पिळी’ या न्यायाने वासराच्या नरडयावर पाय ठेवून आम्ही दूध काढत असतो. तर हा कायदा हातात घेण्याचा प्रकार होईल. कायदा हातात घेणार्‍याची निसर्ग गय करत नाही. तो शासन करतोच. देर है मगर अंधेर नहीं!

विमानाचं इंधन देवासमोरच्या समईत कसं चालावं आणि समईतलं इंधन त्या विमानात कसं खपावं? वाढत्या शरीराचं इंधन थांबलेल्या शरीराला कसं चालावं? बाळाचं टोपडं आता तुम्हाला कसं बसू शकेलं? तुम्ही बसवण्याचा प्रयत्न करत आहात तर टोपडयाला तरी किंवा डोक्याला तरी इजा होणारचं.

आमचा परिवार हा जैन परिवार. जैन परिवार तसा शाकाहारी परिवार. दूधदुभत्याचा परिवार. पण माणसाशिवाय कोणताही शाकाहारी प्राणी दूध पिताना दिसत नाही. घोडा, हत्ती हे शक्तिमान प्राणीही शक्तीयुक्त दूधाचा वापर करीत नाहीत. मग त्यांच्याकडे शक्ती नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही. पॉवर मोजण्यासाठी पण हॉर्सचा वापर केला आहे. पण हे सगळेच प्राणी मातेकडून स्तनपान केल्यानंतर प्रौढवयात आल्यानंतर अख्ख्या आयुष्यात पुन्हा कधी दूध पीत नाही हे खरं का खोटं? म्हणूनच या मनुष्येतर प्राण्यांना रक्तदाबाचा विकार नाही, मधुमेह नाही, चष्मा नाही, उष्मा नाही, दमा नाही.

माणसाच्या कल्पना व विज्ञान सुविधा निर्माण करण्याच्या प्रयत्नातून मनुष्य निघाला आहे. जितक्या सुविधा तितका हा कमकुवत होतोय. प्रतिकार शक्तीही म्हणूनच शेठजीपेक्षा शेतकर्‍याकडे आली व शेतकर्‍यापेक्षा धनगराकडे आली. जो-जो निसर्गाच्या सानिध्यात, त्याच्याकडेच प्रतिकार शक्ती.

जिभेने पाणी उडवून पिणारे मांसाहारी आहेत व ओठांनी झुरकून पिणारे सगळे शाकाहारी आहेत. शाकाहारी तेवढे पेट्रोलवाले, तर मांसाहारी डिझेलवाले ठरतील. परस्परांचे इंधन बदली केल्याच्या नंतर ऑटोमोबाईल विभागामध्ये जो गोंधळ होईल, कार्बोरेटर खराब होईल, जो अपघात होईल, ज्या समस्या त्या-त्याच समस्या मनुष्याच्या जीवनात भेडसावीत आहेत.

ऑटोमोबाईल मधल्या मशिनरीची रचना माणसाच्या देहातल्या रचनेला अनुरूप आहे. सारखीच आहे. थोडक्यात ऑटोमोबाईल मधील मशिनरीचा शोध हा मनुष्याच्या देह रचनेवरून शोधला गेला.

म्हणूनच निसर्ग उपचारामध्ये फाईव्ह व्हाईट स्लो पॉयझन मध्ये दूध समाविष्ट झालं आहे. महात्मा गांधीजींनी दूधाला बाजूला केले होते. सिद्ध समाधी योग ऋषी प्रभाकर यांनीही, दूधाला बाजूला ठेवले आहे आणि अखंड माझ्या पन्नास वर्षाच्या वैद्यकीय सेवेमधून आलेला अनुभव हा की मी दूधाला बाजूला करताच रोग बाजूला झाला आहे. मैदा, साखर, तांदूळ, मीठ व दूध हे सगळे सेंटरचे पदार्थ आहेत. मैदा, गव्हाचे सेंटर, साखर उसाचा सेंटर हे सगळे पाच सेंटर आपल्या सेंटरना विकसित करतात. अवास्तव वजन वाढवतात व आपल्या शरीराला निष्क्रिय करतात हा माझाच अनुभव नसून तुमचाही असेल. माझे वडील यांचे मुख्य अन्न दूधच होते. डॉ. एन. जे. पाटील हे दूधावरची साय व मलईसह दही यांचा वापर जास्त प्रमाणात करत असे. या वडिलधार्‍यांचे संस्कार आम्हा परिवारावरती अज्ञान अवस्थेत झाल्यामुळे हार्ट अ‍ॅटॅकसाठी आमची वर्णी लागली होती. दूधा-तूपाचा वापर कुटुंबात उपेक्षिल्यामुळे माझ्यावरती बालपणात यांचा अधिक मारा झाला नाही.

आम्ही ब्लड प्रेशरचे शिकार झालो होतो. आमच्या पायातली वाळू सरकत होती. आम्हाला आमची काळजी घ्यायची होती. त्यासाठी द्रविडी प्राणायाम करत होतो. डॉ. नंदकिशोर शर्मा यांनी तर ‘मिल्क-ए-सायलंट किलर’ या नावाचे सचित्र दोनशे पानी पुस्तक लिहिलं आहे.

ओशो देखील जैन समाजावरती टीका करताना म्हणत असायचे,  “हा समाज पाणी गाळून पितो, पण बाजारात रक्त न गाळता पितो आहे.”  दूधाने रक्त वाढत जरी असले, तरी दूध हे रक्तातूनच तयार झालं आहे, म्हणूनच दूधाने रक्त वाढते. रक्त वाढते म्हणजेच प्रेशर वाढते. प्रेशर वाढल्यामुळे स्ट्रोक (धक्का) येतो. अमर्याद हवा भरताना जी नेमकी स्थिति टायरटयूबची होते नेमकी तिच स्थिती मनुष्याची होते. धगधगलेल्या चूलीमध्ये एखादं ओलं लाकूड खपावं (सरपण) सेमं त्याच पद्धतीनं घाम गाळणार्‍या कबाडकष्टी लोकांना त्याचे विपरीत परिणाम दिसणार नाहीत.

आज कष्टचोर प्रवृत्ती वाढत आहे. त्यात विज्ञानाने सुविधा करून पुन्हा मनुष्य लोळा-गोळा बनवितो आहे त्या गोळयाला पुन्हा दूध पाजायचे म्हणजे हे अरिष्टचं म्हणावे लागेल. जे लोक आपल्या पायांनाचं चालवतं नाहीत, ते जर डोके चालविणार नसतील तर, मग यापेक्षा काय होणार?

शिवाम्बू हे सुद्धा कच्चे रक्तच असल्यामुळे, शिवाम्बूपानाचा परिणाम पहिल्यांदा हृदयावरतीच होतो. हृदयामध्ये दोष असलेल्या, वेदना असलेल्या रूग्णांना मैदा, साखर, तांदूळ, मीठ व दूध व प्राणीजन्य सर्वच पदार्थ आम्ही पूर्णतः बंद करायला सांगितलेले असतात. मी या सगळयाच गोष्टी पाळल्यामुळे माझा त्रास थांबला तो थांबलाच.

जेव्हा चि. सारंग ओजीरेला शिकत होता तेंव्हाच चि. नितीन वायूसेनेत सर्व्हिस करत होता. माझ्या हार्टची शक्ती आजमावून पाहावी याकरिता मी बॉम्बे हॉस्पिटल येथे डॉ. बोरजेस यांच्याकडे ‘एन्जोग्राफी’ करायला पंधराव्या मजल्यावरती लिफ्टने गेलो होतो. तेथे शरद कुलकर्णी हे शिवाम्बू प्रेमी व्यक्ती होती. त्यांनी मला,  “हे काय तपासून घेऊ नका. ही माणसे चांगल्या हार्टला भोक पाडू शकतात, मागे प्रॉब्लेम लावू शकतात. गप्प घरी जा आणि व्यवस्थित शिवाम्बू घ्या मी सांगतो म्हणून ऐका.”  असं मला म्हणाले. हे मी ऐकल्यानंतर चांगल्या हृदयाला व चांगल्या विचाराला मी घरी घेऊन आलो.

मात्र दोन्ही चिरंजीवांना एकंदरच आलेल्या पारंपारिक हृदयद्रावक घटना विशद कराव्यात या संज्ञेखाली त्याकाळी लिहिलेल्या पत्रातील बाप-मुलांचा परस्परातील खाजगी मजकूर तुम्हालाही वाचता येईल आणि खाजगी जीवन तुम्हालाही वाचवायला मदत करतील असं मला वाटतं.

शिवाम्बू भवन

कोल्हापूर.

 

चि. नि3 व 6रंंग यांस,

अनेक आशीर्वाद.

तू लिहिलेलं पत्र मिळालं. माझ्या पत्राला पाठविलेलं उत्तर जे तुझ्या वयाला व जबाबदार भूमिकेला शोभणारं शिवाय निरातिशय प्रेम व्यक्त करणारं होतं. तेव्हा धन्यवाद....

अचेतन अशा कागदावरही शिस्तबद्ध मारलेले रेघोटे, हव्या त्या माणसावर सुव्यवस्थितरित्या परिणाम घडवितात, त्याला रडवितात, त्याला भरून आणतात, सुन्न करून विषन्नही करतात.

माणूस जितका संवेदनशील तितका तो रसिक म्हणायला पाहिजे किंवा जितका रसिक अर्थात संवेदनशील तितका तो साजिवंत वाटतो.

तुम्ही माझे दोघेही चिरंजीव, अक्षरातलं अक्षरभाव समजून घ्यायला आता केवळ साक्षर झाला आहात असं नसून, सुशिक्षितही झाला आहात याचा मला गर्व आहे.

सुशिक्षण जितकी परिस्थिती, प्रसंग, वेळ इत्यादी देऊ शकते, तितकी विद्यालय देऊ शकतील यावर माझा विश्‍वास नाही. महात्म्यांना महात्मा बनविण्यात विद्यालयं फार थोडी राबली आहेत. अन्यथा, समाजानं, परिस्थितीनं त्यांना महात्मा घडविलं आहे. आव्हानात्मक असलेली परिस्थिती त्यांच्या जिवंतपणाला उपसत राहते व दडलेलं जिवंतपण एकदाचे उपसले गेले की, त्याचा अवतार विरून जातो. हे वास्तव आहे, त्याला इलाज नाही.

बरेच वृद्ध आता आपलं संपलं या सुस्कराच्या अविष्काराबरोबरचं जीवन संपवित असतात. अर्थात मृत्यूला जवळ करीत असतात. त्यांच्या आशा-निराशेत धावलेल्या राहतात. महात्मा व सामान्य यात हाच फरक राहतो की महात्मा तेच ठरतात की जे आपल्या पाऊलखुणा ठळक करून विरून जातात. शेवटी जाणं कोणालाही सुटलेलं नाही. जसं उमलायला हवं होतं, तसं उमलणं पूर्ण झालं की, तेथूनच कोमेजणं सुरू होतं. सौंदर्य आणि खुशबू आडोशाला जाऊ लागतात आणि तिथं काही नसल्याची शेवटी नोंद उरते. असं जरी सत्य कटू असलं तरी, जीवन झोकून दिल्याशिवाय त्याला अर्थ राहत नाही.

जी पत्रे दुःखी कष्टी जीवाला आधारभूत होतील, दोनदा तरी छातीचे भाते भरायला उसंत देतील, अशी ती सारीच पत्रे सार्वजनिकच आहेत. मग ती खाजगी असली तरी ती खाजगी राहू शकत नाहीत. जे म्हणून विधायक आहे ते सर्वांचे आहे, सार्वजनिक आहे. योग्य आणि अयोग्य कळणारं असं योग्य वय, आता तुम्हा स्वाधीन झालं आहे. अयोग्यापासून बाजूला होत असल्याचं मला स्पष्ट दिसतं आहे, अवास्तव दगड कपचा बाजूला काढला की उरते ती मूर्तीच असते.

आज तुम्हाला घडविण्याचा प्रयत्न केला. काही ठोके जिव्हारी लागले. त्यात फार मोठं यश मला जरी मिळाले नसले तरीही तुम्ही घडलातं. सुगंधासह सौंदर्य एकत्र झालं, याला बरीचशी परिस्थिती कारणीभूतं झाली. वेळ यावा लागतो म्हणतात खरचं वेळेनं आपलं काम निभावून नेलयं. ज्या प्रतिकृती निर्माण व्हाव्यात असा प्रयत्न होता तो प्रयत्न यशस्वी झाला. ते दिवे जातील तिथे प्रकाश रेटतील.

नियतीने माझ्या हृदयाला लावलेला चाप खेचायचा ठरविला तरी, माझा पाश कोणताही आता घोटाळणार नाही. मृत्यूला आम्ही मृत्यू नाही समजायला पाहिजे. कर्तृत्त्वाच्या परिपूर्तीनंतर मिळालेली ती पोच (पावती) असं समजायला हवं. ज्याला म्हणून काळाचं कोणतही बंधन राहत नाही. अगदी निर्बंध असलेली अशी एकच मोकाट गोष्ट म्हणजे मृत्यू होय. आदर्श घडविण्याच्या माझ्या वल्गना आणि कल्पना याद्वारे तुझ्या सौ. मम्मीसह सर्वाना खडे राहून धडे देताना परस्परांना, ज्या यातना झाल्या त्यासाठी मला जर क्षम्य कराल तर, पूर्णविरामाची पूर्व तयारी काही अंशानी झाली असं मी समजेनं.

रिझर्व्हेशन छोटया-मोठया प्रवासाला नेहमीच सुखाधीन ठरली आहेत. मृत्यूची तशी कोणतीही पूर्वसूचना, ही पुढील प्रवासाच्या दृष्टीने रिझर्व्हेशन आहे. सावधान राहून गोड निरोप घ्यायला यासारखी दुसरी संधी असेल असे मला वाटत नाही.

आता इतकेच, पुन्हा लिहू... या शुभेच्छा.

कळावे,

तुझा पप्पा.

 

जे तुम्हाला कळाले ते मला समजले!

श्री. नितीन पाटील,

न्यू दिल्ली.

 

ती. पप्पा,

शि. सा. नमस्कार,

तुमचं पत्र वाचताना मात्र खूप भरून आलं होतं. काहीतरी मिळवायला जाऊन स्वतःला गमवीत आहात. वाचल्यानंतर सुन्न अन् विषन्न मनःस्थितीत स्वतःचीच समजूत घातली. तास दीड-तास तसाच पडून राहिलो. तसे मला या सुट्टीमध्ये तुमच्याशी खूप बोलायचं होतं. तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष देण्यास कुठे चुकता आहात वगैरे बद्दल... पण नाही जमलं.

काही प्रसंग आणि वेळा अगदी विचित्रच असतात. अगदी स्वतःच्या प्राणप्रिय पप्पांच्या बरोबर सुद्धा मन उघडं करून बोलता येऊ नये, जिथं कसलाही आडपडदा नसतो, तिथं आभाळाला भिडलेली उंच काचेची भिंत मात्र उभी राहते आणि सर्व काही आतल्या आतच शिजत राहतं.

पप्पा, तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे. तुम्ही हॉस्पिटल वगैरे सर्व कामे बंद करून टाका, अन् स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. आज आम्हालाच नव्हे तर स्वास्थ्यप्रेमी, कोटयावधी शिवाम्बू जिज्ञासू रसिकांना तुमची गरज आहे.

तुम्हाला शंभरी पूर्ण करून शिवाम्बूची किमया सार्‍या जगास दाखवून द्यावयाची आहे. तेव्हा उगीच मनात कोणताही न्यूनगंड बाळगून सारखं घाबरून जात जाऊ नका हो. उगीच छोटया-मोठया गोष्टींसाठी विचार करत जाऊ नका.

खरं सांगू पप्पा, तुम्ही खूपच अल्ट्रासेन्सिटिव्ह आहात. या स्वभावामुळे हा प्रॉब्लेम तुम्हाला येतो आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेता आहात, ते जर बघितलं तर ते तुम्हाला काहीच होता कामा नये फक्त नडतोय तो तुमचा स्वभाव... आणि आतापासून तुम्ही बदलणे खूप गरजेचे आहे... बिल्कुल निष्काळजी होऊन जा, जगाचा काडी इतकाही विचार करू नका, जे काही कष्टाने आजपर्यंत मिळवलं आहात त्याचा पूरेपूर उपभोग घ्या. जिथे पैसे खर्चावे लागतात तिथे खर्चाचं, शेवटी पैस खर्चण्यासाठीचं मिळवलेले असतात, छोटया-छोटया गोष्टींसाठी स्वतःच कष्ट घेऊ नका. शेवटी जीवन म्हणजे एक प्रवास आहे... अल्प काळाचा, फक्त अनपेक्षित स्टेशनवर उतरायचं आहे... जसे ओशो म्हणतात.

जे काही तुमच्या अवती-भवती पसरलयं त्याला साक्षी भावानं, कोणतही, कसलही टेन्शन न घेता पाहात राहा. कुठे नुकसानं होतयं, होऊ द्या. त्यासाठी विरस नका होऊ. कुठे फायदा होतोय म्हणून हुरळून नका जाऊ, फक्त पाहा. जसं काही स्वतःचं मन म्हणतयं, ते ते करत राहा. बघा किती हलकं-हलकं वाटू लागेलं. आपलं जीवन म्हणजे अगदी एखाद्या कळीप्रमाणे आहे. ती कळी जशी हळू-हळू फुलते. लाजर्‍या डोळयांनी प्रकाशाचे स्वागत करू लागते... नकळत तिचे फुल होते, ते फुलं सुगंध उधळीत सुटते... वारा लग्नातल्या अत्तरदाणीप्रमाणे तो सुगंध दशदिशांना पसरवितो आहे. मग ते फूल हळू-हळू कोमेजू लागतं... हे सर्व काही सुसंगत व वास्तव आहे. तेव्हा यात काळजीचं कोणतचं कारण नाही. तेव्हा पप्पा, सर्व काही थांबवा. तुम्ही आणि तुमची तब्येत आता बहुमूल्य आहे. स्वतःला स्वतः मध्येच रमवून घ्या. विपश्यना आता तुम्हाला महत्त्वाची आहे. 

पप्पा, तुम्ही तुमच्या जीवनात खूप काही कष्ट घेतलेत. आता थांबा. कुठेतरी थांबायलाच हवं, फुलस्टॉप हवा. शून्यातून बरचं काही निर्माण केलतं. अनेक संकटातून पुढे आलात. तेव्हा नियतीच्या या जात्यामध्ये भरडले जाण्याअगोदर सावध मात्र राहा. काहीतरी मिळवायचं म्हटल की काहीतरी गमवावं लागतं म्हणतात. पण तुम्ही तर त्या मिळवण्याच्या मागे जाऊन स्वतःलाच गमवायला लागला आहात तेव्हा असलं मिळवणं आम्हाला नको आहे. त्या मिळवण्याच्या मागे जर जीवन गमावलात, तर ते गमावणं इतकं मोठं होईल की, हरवल्या क्षणाची व्यथा सगळया आयुष्यभर काळी सावली धरून आमच्या पाठीशी उभी राहिलं.

तेव्हा पप्पा, बिल्कुल काळजी न करता तब्येतीची काळजी घ्या आणि सर्व काही विधात्यावर सोपवून निर्धास्त राहा...

पुन्हा नंतर लिहीन, लोभ असावा, कळावे,

आपला ज्येष्ठ चिरंजीव

नि3, न्यू दिल्ली.

 

सल्ला देण्यापेक्षा स्वतः अनुभवणं केव्हाही महत्त्वाचंः

 

श्री. सारंग पाटील

ओजीरे, कर्नाटक.

तीर्थरूप पप्पा,

स.न.वि.वि.

आपलं बर्‍याच दिवसानंतर मोठं पत्र मिळालं व यापूर्वी पाठविलेले अंकही क्रमशः मिळाले आहेत.

पप्पा, स्वतःला मी भाग्यवान समजतो की मी निसर्गोपचार व योगासारख्या विषयाचा अभ्यास करीत आहे व या विषयावरील अनुभवनिपुण अशा व्यक्तीचा मी चिरंजीव आहे. खरोखरचं भविष्यात सर्वार्थानी यशस्वी होण्यासाठी यासारखे दुसरे क्षेत्र नाही.

सर्वांना सल्ला देण्यापेक्षा स्वतः त्याचा अनुभव घेणं व ती गोष्ट आचरणात आणणं फार महत्त्वाचं असतं. त्यासाठी माझे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

पप्पा, आपल्याला नेहमी अभिमान वाटेल असचं कार्य मी सतत करेन आणि हे माझं वचनं राहील की, आजपर्यत मी तुमची ओळख सर्वाना देत आलो आहे. मी असं काही करेन की सर्वजण माझी ओळख देऊ लागतील. बरे! असो.

तुम्ही आपल्या स्वास्थ्यासाठी इतकी काळजी घेऊन देखील, वारस इस्टेटीतला हा प्रॉब्लेम मात्र, वारसदार म्हणून आला आहे व तो आता दार ठोठावतो आहे ही खरोखरच सर्वाना आश्‍चर्याची, विचार करायला लावणारी गोष्ट आहे. पप्पा, अजूनही तो गेटमध्ये आहे, तिथूनच त्याची चाहूल घेऊन आहे तेथे सतर्क राहून, सावधान होणं   अगत्याचं आहे.

 “प्लिज, टेक केअर युवर सेल्फ.”

पप्पा, आपण म्हणता, एखाद्या शरीरातील अवयवाची सतत जाणीव होणं म्हणजेचं रोग होय. आणि ही गोष्ट शारीरिक, मानसिक समतोलावर निर्भर आहे. जेव्हा एखादा रोग या मॉडर्न सायन्सकडून आपण शिक्कामोर्तब करून घेतो, तेव्हा तर त्याची जाणीव नेहमी सतत पिच्छा करते व त्यामध्ये विपरीत स्वसंमोहन होते. मन नेहमीचं विचलित होतं, म्हणजेचं बिघडलेली स्थिती पुन्हा बळावते. हे सर्व आपल्यासारख्या जाणकारांना सांगावयास नकोच, तेव्हा खरोखरच आपली आता कसोटीची परीक्षेची घडी आली आहे असे मी समजतो.

हृदयाचा तसा संबंध शरीरापेक्षा मनाशी, अर्थात मानसिक स्थितीशी फार आहे. पप्पा, तुम्ही शिवाम्बू व गोमूत्र यांच्या आधारानं शारीरिक स्वास्थ्य मिळवलं, सर्व ही पिढीजात, पारंपारिक मंडळी मानसिक स्वास्थ्य कुठे मिळवित असतात.

पप्पा, मला वाटतं, जीवनात आपण कितीतरी आध्यात्मिक सानिध्य मिळवलंत त्यावर वाचन केलतं पण आचरणात आणलं ते फार थोडचं आणि जे आणलं ते फारचं अल्पकाळासाठी होय की नाही?

पप्पा, तुम्ही म्हणाला फुल जर झेंडूच असेल तर झेंडूचच होणार. गुलाबाचा सुगंध त्याला कसा येईल? नदीच्या प्रवाहात वाहत राहणचं योग्य, उलट दिशेस पोहण्यात विरोध, त्रास, दुःख इ. होणं हे स्वाभाविकचं आहे हो ना?

पप्पा, मला इथं असं सांगावयाचं आहे की, येणार्‍या प्रत्येक क्षणाचा सहज शांतपणे सामना करायला हवा. प्राप्त परिस्थितीचा सहज स्वीकार करा. कशाचीही काळजी करू नका.

नि3 दादा तो स्वतःच्या पायावर उभा आहे. माझी फक्त दोन वर्षे राहिली आहेत. दोन वर्षात मी नक्कीच आपला सर्व गाडा ओढण्यास समर्थ होईन.

तेव्हा मी म्हणेन आपण या क्षणापासून आम्हा दोघा चिरंजीवांच्या जबाबदारीतून मुक्त आहात. तुम्ही पिता या नात्याची सर्व कर्तव्ये पूर्ण केली आहेत.

मी लवकरच आपल्या खांद्यावरील जू माझ्या खांद्यावर घेईन. फक्त आपल्या मार्गदर्शनाची व आशीर्वादाची साथ मात्र राहू द्या.

आपण, आम्हाला जीवन दिले आहे व त्यावर आपलाच पूर्ण अधिकार आहे. आपण पाठविलेले ट्रेडमिंग ग्राफचे रिपोर्टस माझ्या तज्ज्ञ शिक्षकांना दाखविले आहेत. त्यांच्या मतानुसार आपल्याला काळजी करण्यासारखं त्यात काही नाही पण इथून काळजी घेणं आवश्यक आहे.

चोर अजूनही गेटवरच आहे. जागं होणं आवश्यक व त्यापेक्षा त्याच्या येण्याचं कारण शोधणं फार महत्त्वाचं होईल. जेव्हा आम्ही आपल्या नियमित चालू आहाराविषयी, चालू व्यतीत, वैयक्तिक दिनक्रमाविषयी व कामकाजाविषयी सर्व पातळीवर व सर्व दृष्टींनी विचार केला तेव्हा खालील निष्कर्ष काढला गेला. 1. कारण बालपणी आपल्या कौटुंबिक निराधाराच्या सवयीसह घरातील असलेले कुपोषणासह मानसिक वातावरण.

2. पण यापेक्षा सर्वात महत्त्वाचे कारण म्हणाल तर आपला अतिशय संवेदनशील मानसिक स्वभाव, जीवनात काहीतरी अतिउच्च करण्याची जबरी महत्त्वाकांक्षा व त्यासाठी जीव ताणून पराकष्ठा, मानसिक तणाव, अशांतता यांना जमेत घ्यावं लागेल. मेडिकल हेरॉल्डमध्ये त्याला टाईप अपरसनॅलिटी म्हणतात.

पप्पा आपण बर्‍याच विषयावर महत्त्वपूर्ण चिंतन व मनन केलं आहे, त्याप्रमाणे आपल्या या स्वभावावरही विचार करावा, निश्‍चित कारण शोधून त्याचे निर्मूलन करावे. आपल्या या संवेदनशील मनाचे कारण आहे ‘महत्त्वाकांक्षा’ बर्‍याच वेळा कोणताही नवा प्रयोग आपण स्वतःवरच करून पाहता, याचीही प्रतिक्रिया असेल.

आज मोठे योगी देखील म्हणतात, ‘आहारापेक्षा मानसिक स्थितीचा हृदयावर फार परिणाम होतो. अगदी ताबडतोब तो अनुभवू शकतो.’

पप्पा, तुम्ही जरी म्हणत असाल, ती कशाची अपेक्षा करत नाही, पण जे आहे कटू सत्य यातच आहे. मानसिक समतोल राखण्यासाठी ध्यान, योगा व विपश्यना फार मोठे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. नेहमी अंतर्मुख रहा. प्रत्येक वेळी काही जाणीवपूर्वक हृदयाचे ठोके टिपण्याचे कोणतेही कारण नाही. नेहमी हसतमुख समाधानी राहा.

महत्त्वाचे म्हणजे, अतिशय जाणीवपूर्वक कशाचाही विचार न करता एकांतात योगासने केल्यावरच त्याचे सुपरिणाम होतील. अन्यथा तो फक्त नावाचा योगा होतो.

पप्पा, खालील दिलेला कार्यक्रम एक महिना प्रयोग म्हणून करा. रोजचा दिनक्रम ठरवा, डायरी लिहा व टाईमटेबल बनवा. फार सोईस्कर होईल.

1. माकड आहार अर्थात सर्व फळे खा, ढेकर येईपर्यत खाऊ नका. टी.व्ही. पाहत जेवू नका, जाणीवपूर्वक अंतर्मुख होऊन सर्व गोष्टी करा. कोणत्याही गोष्टींचा राग येऊ देऊ नका. नेहमी हसतमुख रहा.

2. सर्व प्रकारच्या तेलाचा उपयोग बंद करा. तेलं असलेलं नैसर्गिक पदार्थ बंद. जसे कि, काजू, वाळलेले खोबरे, शेंगदाणे इ.

3. सर्व दूधाचे पदार्थ बंद. कोंडा भाकर अत्यावश्यक.

4. शिवाम्बू नियमितपणे, गोमूत्र मात्र केव्हातरीच पण थोडया प्रमाणात घ्या.

5. सप्ताहातून एक दिवस पूर्ण उपवास करा.

6. सकाळी एकाच वेळी 2 ते 3 लिटर पाणी पिणे पूर्णपणे बंद. कृपया एक महिन्यासाठी प्रयोग म्हणून दर दोन तासानी एक ग्लास पाणी पिऊन पहा.

7. नेहमी इनपुट-आऊटपुट अर्थात आहार-विहार यावर लक्ष असू द्या. नियमित गोमूत्रासारखा रेचक, लोहर ठोका, शरीरातील बर्‍याच      नाजूक अवयवांवर व रक्तावर परिणाम घडवेल तेंव्हा त्याचा उपयोग विचारपूर्वक करा.

8. सर्व रिपोर्ट फाईलमध्ये ठेवून डोळयाआड करा व विसरून जा कि, आपल्याला काही प्रॉब्लेम आहे. सतत लिखाणात किंवा वाचनात व्यस्त रहा. पुन्हा-पुन्हा त्याचाच विचार करून काळजी करून विघातक स्वसंमोहन करू नका. नेहमी पॉझिटिव्ह विचार मनात ठेवा.

9. संडासात तासन तास त्याच अवघड स्थितीत बसून लिखाण अगर वाचन करू नका. तुमच्या स्पेशल खुर्चीचा वापर करा.

10. जेव्हा मानसिक असमतोल अथवा शारीरिक अस्वस्थतेची जाणीव होते त्यावेळेस सर्व काम सोडून मोकळया जागेत शवासन करा. प्राणायाम फार उपयोगी ठरेल.

11. सकाळी टी. व्ही, रेडिओ पूर्णपणे बंद ठेवा, शांत सनईवादन अथवा ओम ध्वनी योग्य ठरेल.

12. पहाटे फार लवकर उठू नका. झोप (निद्रा) पूर्ण घ्या.

13. नियमित अनवाणी पहाटे फिरणे, आता पोहणे योग्य नाही. विपश्यना व प्राणायाम फार उपयोगी पडेल, रोज करा.

14. अ‍ॅक्युप्रेशर फार महत्त्वाचा आहे.

15. टी. व्ही. पाहणं बंदच करा. एखादं कॉमेडी सिरीयल जरूर पाहा व भरपूर हसा, विनोदी व्हा. हसा आणि हसवा, मला वाटत या सर्व गोष्टी आपण या आधीच सुरू केल्या असतील, नसतील कृपया या सारंगसाठी सुरू करा.

तेव्हा एकंदर ठीक, घरी मम्मी, यांना सा. नमस्कार रूग्णालयातील स्वास्थ्यप्रेमी रूग्णांना शुभेच्छा.

कळावे,

आपला आज्ञाधारक चिरंजीव,

सारंग.

 

वरील दोन्ही पत्रातील मजकूर माझ्यासाठी तरी महत्त्वाचा आहेच. जे रूग्ण स्वास्थ्याच्या दिशेने वेगाने प्रवास करू इच्छितात त्या स्वास्थ्य साधकास ही पर्वणी म्हणावी लागेल.

हा मुला-बापातला पत्र व्यवहार खाजगी जरी असला तरी त्यातला विचार खाजगी नाही. आजचा काळ हा मोबाईलचा आला आहे. पूर्वी अशी पत्रे मनाचा गाभारा दर्शवित असतं. मोबाइलचं युग औपचारिकता घेऊन आलं आहे. म्हणून कुणी याला कर्ण पिशाच्च ही म्हणतात.

सानेगुरूजींनी सिंधूला लिहिलेली पत्रे, आज विद्यार्थ्यांना लागू होतात, तशी पत्रे स्वास्थ्यप्रेमी रूग्णांसाठीच आहेत.

माझी धाकटी बहीण भारती, डॉ. आप्पासाहेब चोपडे यांना दिली. हे कीर्तनकार चोपडयांचे नातू, राहणार भिलवडी, एम. एस. सर्जन, त्यांचा समृद्ध शेतकरी परिवार. घरी तीन भाऊ मोठे-मोठे डॉक्टर, हे नात्याने माझे दाजी व पेशाने जनरल सर्जन. हे निसर्ग उपचार प्रेमी होते. सतत कामात व्यस्त असतं. स्वभावाने मात्र मस्त होते.

एके दिवशी त्यांच्या उजव्या खांद्यात दुखू लागले. फ्रोजन शोल्डर असेल का? शेवटी बोन कॅन्सर असं निदान पक्कं झालं. मी माझ्या दाजींना म्हणत होतो. ‘या उपचाराने काही फरक पडतो का? आपण पाहूया तरी.’ ‘हा उपचार घ्यायला मला सांगू नका. एक वेळ अंगाला लावायला चालेल, एनिमा द्यायला चालेल, पण प्यायला सांगू नका.फ

मी म्हणालो,  “भाऊजी, तुम्हाला कॅन्सर मधून बरे झालेल्या केसेस, रिपोर्टसह दाखवल्या तरी सुद्धा तुम्ही ऐकायला, मानायला तयार नाहीत? तुम्ही तर भारतीचे सौभाग्य आहात, मला तुमची काळजी वाटते.”  त्यावेळी त्यांनी मौन धारण केले.

सांगलीतल्या मी काही लोकांना फोन करून जुन्या काही कॅन्सर ग्रस्तांना रिपोर्टसह फाइली घेऊन यायला सांगितलं. नवीनभाई आचार्य यांना प्रोस्टेड कॅन्सर होता. त्यांनी आपल्या जवळील फाइल पुढे ठेवत आपल्या व्यथेची कथा ऐकवली. तसेच व्हेटरनरी डॉक्टर शिंदे यांनी आपल्या नागपूरच्या सासूबाई (प्राध्यापक चिमूरकर यांच्या पत्नी) की, ज्यांचा ब्रेस्ट कॅन्सर सर्वत्र पसरलेला असताना अ‍ॅलोपॅथी उपचार कसा कुचकामी ठरला व कशा तर्‍हेने शिवाम्बू पॅथीचा आधार घेतला आणि पूर्ण पथ्य पाळून दहा वर्षे कशी ठणठणीत बरी गेलीत याचा किस्सा सांगितला. त्यानंतर शिंदे पुढे म्हणाले,  “मी याच पद्धतीचा अवलंब करून सांगलीतल्या कॅन्सरग्रस्त अन्य 25 केसेसनां बरं केलं आहे. त्याचेही रिपोर्ट तुम्हाला वाचायचे असेल तर मी गोळा करून आणून दाखवीन. तुम्ही या उपचारावर विश्‍वास ठेवावा व पूर्णतः बरे व्हावेत. आम्हा सांगलीकरांना तुमच्यासारख्या उदारमतवादी डॉक्टरांची गरज आहे. तुम्ही या उपचाराला सहयोग द्यावा”  इतक्या स्पष्टीकरणानंतरही त्यांनी मला होकार दर्शवला नाही. याचा मला मनस्वी खेद वाटला. आणि मी तडक घरी निघून आलो.

ऐकणार्‍यांना मी कमी पडत होतो. न ऐकणार्‍यांना नाद आता करायचा नाही मग दाजी असले तरी काय झाले. इतका पुरावा देऊनही ऐकत नसतील. मग मी मनाचा निधार्र्र केला आणि सहा महिने एक वर्ष तिकडे फिरकलोच नाही. कान मात्र देऊन होतो.

मद्रास, केरळ, मुंबई येथे एक कोटी रूपये खर्चूनही काडीमात्र सुद्धा गुण अंगी लागला नाही. शरीरात रोग पसरला होता. हालचाली सगळया बंद झाल्या होत्या. सुजेने सगळं शरीर तुडुंब झालं होतं. लघवीही रक्तासारखी होत होती. अशा विकलांग अवस्थेला पाहून बाकीच्या बहिणी मला आग्रह करू लागल्या. आता जर तू नाही आलास तर या दाजीला मुकशील. मी मनाचा मोठेपणा करून हजर झालो.

त्यांच्याच घराच्या तळ मजल्यावर एका खोलीमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं. आमदार विष्णू अण्णा व सगळे सांगलीचे मातब्बर डॉक्टर, पाहुणे-पै, संबंधित लोक यांनी गर्दी केली होती. पाळी-पाळीने बघून जात होते. त्यांना जिथे झोपवण्यात आलं होतं. त्याच गर्दीत मी ही एक उभा होतो.

मला माझ्या दाजींनी हेरलं, मला म्हणाले,  “शशी दादा, जवळ या! आता प्लीज तुमचा उपचार सुरू करा.”  माझ्या बरोबर त्यांचेही डोळे पाण्याने खच्चून भरले. मी म्हणालो,  “भाऊजी, ती वेळ यशासाठी योग्य होती. तरीपण, तुम्ही अजूनही परवानगी देत आहात तर ही वेळही चमत्कारासाठी योग्यच आहे.”  असे म्हणून तातडीने कामाला लागलो.

नाकातून राइस टयूब गेलेली होती. इकडे दुसर्‍या बाजूला शिवाम्बूसाठी कॅथेटर टयूबही तयार होती. जी असेल ती लघवी असेल तशी युरीन बॅगेतून काढून राइस टयूब मध्ये ओतायला सुरू केली. जीव जाण्याचा काळ समीप आलेला समजून जैनांचा मनमोकार महामंत्र’ म्हंटला जात होता.

एक सारख्या शिवाम्बू प्राशनामुळे तडस भरलेले पोट खाली येऊ लागलं. त्यांचे धाकटे बंधू बाळासाहेब चोपडे गायनॅक सर्जन बेड पॅन लावणे, बेड साफ करणे या माझ्या कामात सर्जीकल स्टाइलने मदत करू लागले. गोमूत्र पान, गरम पाणी व ताजे शिवाम्बू आटवून शिवाम्बू मसाज या आमच्या कामाला धाकटी बहीण भारती चोपडे, भाचा आशुतोष चोपडे व भाची प्रियांका शहा हे सगळेच मदत करायला धावले. एकूण काम युद्ध पातळीवर सुरू झालं, लाभ-तोटा काहीही झाला तरी नाव ठेवणारं कुणीचं नव्हतं. वेळेचा सदुपयोग चालू होता. मास्क तोंडाला लावूनच जवळ येणारे लोक जवळ येत होते.

हळूहळू त्यांच्या लघवीच्या रंगात बदल होऊ लागला. लाल लघवी पिवळी होऊ लागली. पोटाची साइज कमी होऊ लागली. चेहर्‍याची सूज कमी दिसू लागली. एकूण शरीराची अवकळा बदलली. येणारे-जाणारे लोक बहुसंख्य डॉक्टर होते.

एक वृद्ध डॉक्टर सर्वांचे बॉस, हा एकूण झालेला, चाललेला फरक लक्षात घेऊन हा मेहुणा अप्पासाहेबला उठवून बसवितो की काय? आणि उठवून बसविला तर सांगलीत आम्हाला नाक राहणार नाही, असे समजून ते म्हणाले,  “हा काय गाईचा गोठा निर्माण केलाय इथे, हे सर्व बंद व्हायला पाहिजे.”  हा उपचार बंद व्हावाच असं त्यांचेच दुसरे बंधू आण्णासाहेब चोपडे यांनाही वाटत होतं, त्यांचाही असंतोष दिसत होता. त्यांनाही हे निमित्त पुरेसं झालं. चार दिवस सलग चाललेला उपचार, उपचाराच्या खोलीला कुलूप लावल्यामुळे बंद पडला. भारती चोपडे, माझी बहीण रडत म्हणू लागली,  “माझा माझ्या नवर्‍यावर काही हक्क आहे की नाही?”  बिचार्‍या भाच्याचाही नाइलाज झाला.

आप्पासाहेब चोपडे हे एक लोकप्रिय सामाजिक पुढारी होते. पण समाजाने अखेरचंही नेतृत्त्व केलचं. अशा प्रकारे शेवटी या उपेक्षिलेल्या उपचाराला खीळ बसली व 8 जानेवारी 2000 रोजी साडे दहा-अकरा वाजता त्यांच्या देहाने प्राण सोडला.

माझा भाचा आशुतोष चोपडे हा देखील वडिलांसारखाच शेराला सव्वाशेर होऊन एम. एस. जनरल सर्जन, कॅन्सर विशेष स्पेशालिस्ट, सांगलीत ख्यातनाम झाला असून तो नेहमी मजकडे आनंदकुंजला येतो. मला दिलासा देतो. आपण मिळून काही करूया असे म्हणतो.

मी रोजच सकाळी मॉर्निंग वॉकसाठी काही काळ निर्जनस्थळी जात होतो. सोबत कुत्रा व सायकल असायची. एका टेकडीवरती बसून उगवत्या सूर्याकडे बघून त्राटक करायचो. त्याबरोबर रूईचा चिकही बाटलीत काढत असायचो.

हा रोजचा नित्यक्रम झाला होता. त्यामुळे डोळे लाल होऊन सुजत असतं. त्राटकाचा काळ हळू-हळू वाढवायला हवा होता. मी थोडीशी घाई केली. दोन-तीन आठवडयाचं काम एका आठवडयात पार करण्याचा प्रयत्न केला.

सूर्य उगवल्यापासून आठ वाजेपर्यंत कधी-कधी नऊ वाजेपर्यंत डोळे न लवता त्राटक करू लागलो. सूर्याकडे पाहून त्राटक केल्यामुळे डोळयात जबरदस्त ताकद येते व ती ताकद रोग्यांना अंकित ठेवायला, संमोहित करायला निमित्त बनते. या सबबी खाली उजव्या डोळयामध्ये रेटिनामध्ये प्रॉब्लेम आले. रेटिना डी टॅॅच होऊ लागला. डोळयाला अंधारी आली. डोळयाला काही भाग दिसू लागला, काही दिसेनासा झाला. चष्म्याचा नंबर पाहणार्‍या दुकानदाराने हा दोष शोधून काढला आणि संबंधित तज्ज्ञांकडे पाठवले.

ते तज्ज्ञ होते राजारामपूरीतले डॉ. जोगळेकर, आय स्पेशालिस्ट. यांनी सर्व एक्सरे घेऊन, विशेष तपासण्या करून तुम्हाला अंधत्व येणार आहे, दृष्टी जाणार आहे. ऑपरेशन करून घेऊन त्याला थोपवणं शक्य होईल, असे सांगितले. ऑपरेशनची तारीखही ठरली. त्या तारखेच्या दिवशी मी माझ्या दवाखान्यातील पेंशटना ऑपरेशनला जात आहे असे सांगितले.

त्या पेशंटच्या ग्रुपमध्ये मुंबईचे एक डॉ. विद्यासागर क्लासेसचे संचालक श्री. राहुल कामत ज्यांनी आनंदकुंजच्या रूग्ण सेवेसाठी अ‍ॅम्ब्युलन्स सेवा रूजू केली आहे. ते उपचार घेत होते. ते मला म्हणाले,  “डॉ. तुम्ही स्वतःला सामान्य समजू नका . आम्ही तुम्हाला व्ही. आय. पी. समजतो. तुमच्यासारखा मनुष्य कोल्हापूर सारख्या ठिकाणी उपचार करून घेणं योग्य नाही. जाताना मी तुम्हाला घेऊन जाणार. आशिया खंडातील नामांकित डॉक्टरांची तारीख घेणार. त्यांचे आपण मत घेऊया. मगच ऑपरेशन करायचे की नाही ते ठरवू या.”

आशिया खंडातले रेटिनाचे ख्यातनाम डॉक्टर नटराजन हे डॉक्टर होते. यांची अपॉईंटमेंट ठरली. डोळे तपासले प्रॉब्लेम अशा ठिकाणी आहे की ऑपरेशन करताच डोळयाला अंधत्व येणारच अशी स्थिती आहे. त्यापेक्षा नैसर्गिक अंधत्व केव्हा येतयं तेव्हा येऊ द्या. आपण त्याला स्वीकारू या. ऑपरेशन करून काही करावयास गेल्यास टेबलावरच अंधत्व येईल.

त्यावेळी राहुल कामतला मी म्हणालो,  “तुमच्यामुळे माझे डोळे वाचले.”  तेव्हापासून मी सलग दहा वर्षे नैसर्गिक आहार करण्यास सुरूवात केली. माझा जो नंबरचा चष्मा होता तो घातल्याशिवाय मला गाडी चालवायला येत नव्हती, तो चष्माही माझ्या प्रयोगाने दूर झाला. चष्म्याशिवाय सगळयाच हालचाली करू लागलो.

आज तारखेपर्यंत अंधत्व तर आलेच नाही. प्रॉब्लेम जिथे आहे तिथेच थांबलेला आहे. जिवंत अन्नाने माझा डोळा अजूनही जिवंत आहे. अन्नचं औषध आहे व अन्नचं ब्रम्हही आहे. अन्नचं तारी व अन्नचं मारी याचाच अर्थ योग्य अन्न तारतं व अयोग्य अन्न मारतं. तेव्हापासून ज्या रोग्यांना आपला मरत असलेला अवयव वेगाने वाचवायचा असेल, शिवाम्बूच्या पॅथीबरोबर जिवंत अन्नाचा प्रकार चालू ठेवावा. यामुळे या जिवंत अन्नाबरोबर माणसाच्या जीवितव्याला शाश्‍वती येते.

कोणी काय म्हणायचे ते म्हणो, कोणी म्हणेल हा अन्नाचा परिणाम आहे मग शिवाम्बूचे नाव कशाला घेता? माझा उद्देश आडवा माणूस उभा झाला पाहिजे, हाच माझा छंद आहे. याचेच मी आव्हान स्वीकारतो. आधीच मॉर्डन सायन्सने हात टेकल्यानंतर ही मंडळी मजकडे येतात. यांचा रोग मातब्बर डॉक्टरांना पाडून आलेला असतो. खरे तर जनक राजाने शिवधनुष्य उचलणार्‍याला आपली कन्या सीता देऊ केली. याच न्यायाने जी पॅथी किंवा जी व्यक्ती आडव्या माणसाला उभी करते त्या पॅथीला किंवा व्यक्तीला यथोचित सन्मान करून त्याच्याकडची ती डिग्री त्यांना वाहिली पाहिजे. कारण डिग्री ही आडवा मनुष्य उभा करण्यासाठी संपादलेली असते. जो पैलवान त्याला कोणी पाडू शकत नसेल तो सर्वांनाच पाडत असेल तर त्याला आपण हिंदकेसरी पदक देतो. अशीच चुरस ज्या दिवशी या पृथ्वीवरती होईल तो सुदिन म्हणायला पाहिजे.

कुणी मंत्र उच्चारून, गंडा-दोरा लावून, कोणी भस्म लावून, कोणी मूत्र पाजूनही उभा करेना. मतलब उभी करण्याशी आहे. त्याचे कौतुक झाले पाहिजे. औषधासाठी औषध म्हणून शास्त्रात काही वापरायला सांगितले आहे. मनुष्य उभी करणारी कोणतीही विद्या निषिद्ध नाही.

मला सतत वस्ताद लोक मिळत गेले, वस्ताद औषधही मिळत गेले. डॉ. सदाशिव बिल्ले, हा खर तर जिल्हा परिषदेचा मलेरिया डॉक्टर, घरा-घरात जाऊन तापाच्या पेशंटची चौकशी करणारा डॉक्टर, पण एखाद्याकडे बुद्धिचातुर्य असेल तर तो काय करू शकतो? अत्यंत कमी वजनाचा, अत्यंत अ‍ॅक्टीव्ह, चेन स्मोकर म्हणावा असा, बिडया ओढणारा, आयुर्वेदाचा ग्रंथसंग्रह पदरी ठेवणारा, येईल त्या समस्येवरती तोडगा काढणारा असा मनुष्य मी पाहिला नाही.

डॉक्टर भोगे, आयुर्वेद तज्ज्ञ यांचा शिष्य म्हणवणारा व स्वामी शिवानंद, ‘ब्रम्हचर्य हेच जीवन अर्थात वीर्य नाश हाच मृत्यू’ या ग्रंथाचे लेखक स्वामी शिवानंद यांचाही हा शिष्य. योगायोगाने मला मिळाला. अत्यंत महत्त्वाकांशी असा हा मित्र.

आर्थिक बळ असलेला भैय्यासाहेब परदेशी, बौद्धिक बळ असलेला मी, हे असे आम्ही त्या काळात ब्रम्हा-विष्णू-महेश इतरांना वाटत होतो. पण दुर्दैव असे, माझी लुना गाडी यांनी खरेदी केली. कानाला कमी ऐकू येत नसल्यामुळे मागून आलेली गाडी त्याच्या लक्षात आली नाही व ते नामशेष झाले. सुदैवाने ते आजवर असते तर आनंदकुंज मध्ये आयुर्वेद आरोग्य उद्यान त्यांनी नक्कीच थाटले असते.

वेलीला आधाराची आवश्यकता असते. कोणताही, कसलाही आधार तिला पुरेसा असतो. विशेष गुणवत्ता असलेली व्यक्ती मला मोहित करायची. मग तो पेशंट असला तरी, शेतकरी असला तरी किंवा शेठजी असला तरी किंवा धनगर असला तरी सगळेच माझ्यासाठी सारखेच होते.

एकदा काय झालं. सुनंदा कुडाळकर या भगिनी मुंबईच्या होत्या. त्यांना सांधेवाईचा आजार होता. त्या माझ्याकडे आपल्या परिवारासोबत उपचार घेत होत्या. आरळयाचा बाळू धनगर हा त्यांना शोधत शोधत माझ्या दारात आला. माझा एक रोगी तुमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. मला त्यांना औषधोपचार करावयाचा असतो, तो मी त्यांना करण्यासाठी इथे आलो आहे. मी म्हटलं काही हरकत नाही. जडी-बुटीची औषध असेल.

त्याने एक बाटली आपल्या पोथडीतून काढली. प्रत्येक फुगलेल्या सांध्याला टिकल्या लावल्या अन् ब्लेडने नाजूक हाताने त्वचेला रेघोटया मारत बसताना मी पाहिलं. याने काय होणार? मी विचारलं. त्याच काळात दुसरा एक सांधेवाईचा पेशंट जो त्याहीपेक्षा कृश, उपचार घेत होता. जे कुडाळकर ताईंना लावलं आहे, ते यांनाही लावा! मी म्हणालो. त्याने त्या बरोबर त्या पेशंटलाही लावले. त्या प्रत्येक टिकलीवरती बारीक कापसाचे गोळे लावत होता. लावून झाल्यानंतर त्या पेशंटला उभा करायला सांगितलं. तो पेशंट उभाही झाला. मला खूपच आश्‍चर्य वाटलं. ती बाई दोन-तीन महिने तरी उभी राहू शकली नसेल असा त्या बाईचा मुटकुळा झाला होता.

माझ्या उपचारापेक्षा दृ्रतगतीने बाळू धनगराच्या उपचार पद्धतीचा परिणाम मला अधिक दिसला. हा परिणाम पाहूनच मनात मी याचे दास्यत्व पत्करावे लागले तरी, त्याची सेवा करावी लागली तरी या औषधाचा मागमूस लावायचं ठरवीलं. हे चीक कुठल्या झाडाचा आहे, हे विचारलं तर मग माझ काय राहिलं? माझ्या गुरूनं या औषधाचं नाव घ्यायचं नाही असं सांगीतलयं असं तो बाळू धनगर म्हणू लागला. माझी उत्सुकता शिगेला पोहचली. याच्या माहितीसाठी मला काही करावं लागलं तरी, मनात करायचं ठरवीलं. त्याला मॉलीश केलं, गोंजारण्याचा प्रयत्न केला, जेऊ-खाऊ घातलं. अन् पुन्हा त्याला खोदत राहिलो.

त्यावेळेस तो मला म्हणाला,  “तू आयुष्यभर जरी सेवेत राहिलास तरी मी या औषधाचं नाव सांगणार नाही!”  ‘या अशाच लोकांच्यामुळे पारंपारिक पद्धती अपरिचित राहिल्या आहेत’ अशा प्रकारचा शेरा मारत नांदणीचा एक शिक्षक, जो दम्यासाठी उपचार घेत होता तो म्हणाला,  “मला दादागिरी करावी लागली तरी करू या व त्याची माहिती ही काढू या. असे म्हणाला. गोंजारून बघितलं आता गुरगुरून बघू या.”

त्या धनगरासोबत त्याची पोथडी उचलायला एक पंधरा-सोळा वर्षाचा मुलगा होता. त्या शिक्षकाने त्याला बाजूला बोलावून घेतलं. हॉटेलमध्ये जाऊन चहा-पाणी करविला.  “कशाला त्याच्या नादाला लागलायं हे औषध आहे रूईच्या चिकाचं दूध. बाटलीमध्ये ते मीच गोळा करतोय.”  असे तो मुलगा त्या शिक्षकाला म्हणाला.

येथेच कोडे संपले. शिक्षकांनी मला बाजूला बोलावून सांगितले. खरे की खोटे बघण्यासाठी बाटलीतल्या चिकाचा परिणाम सेम तसाच रूईच्या चिकाचा होतो की नाही ते स्वतःच्या हातावरती पाहिले तर तो तसाच परिणाम झाला. दिवाळीचा सण आठच दिवसांवर होता. त्या मुलाला नवीन कपडे, सदरा दिला.

माझ्या शिवाम्बू उपचाराचा परिणाम होण्यासाठी दोन-चार दिवासचा काळ जायचा. दरम्यान वेदनाशामक अ‍ॅलोपॅथीची औषधे मला गरजेनुसार द्यावी लागत.

तेव्हापासून ती बंद करून रूईच्या चिकाचा वापर मी करू लागलो. टच् अ‍ॅन्ड गो नावाची एक शाई पुसून काढण्याची एक सेल्यूशन निघालं होतं सेम तसचं अ‍ॅक्शन होत असताना मी पाहत होतो. वेदना त्या कुठेही असू देत. हृदयात असू देत, सांध्यात असू देत. कवटीच्या आत मेंदूत असू देत. सर्वत्र औषधाचा परिणाम समान होत होता. चिकाचा हात धुऊन येईपर्यत रोग्याचं विव्हळणं थांबत असे. आधीच शिवाम्बूचा एक चमत्कार वाटायचा आणि त्यात या रूईच्या चिकाचाही चमत्कार होता. लोक सांध्यावरती रूईच्या चिकाचा वापर करत. यामध्ये त्या चिकाच्या निशाणीवरती रेझर ब्लेडने ऊसाचा पाला ओरखडतो तसा ओरखडायचा. त्याचा परिणाम तात्काळ व्हायचा. झोंबण्याची क्रिया पूर्ण होताच वेदना निघून जायच्या. सूज पांगून जायची. आजही आम्ही या रूईच्या चिकाचा वापर करीत आहोत.

एकदा काय झाले कोल्हापूरचे ख्यातनाम उद्योगपती महादेवराव महाडिक यांचे बंधू भीमराव महाडिक म्हणजेच युवा नेते मुन्ना महाडिकांचे वडील हृदयाच्या वेदनेने त्रस्त होते. त्यांच्या अत्यवस्थ अवस्थेत सर्व तज्ज्ञांच्या बरोबर घरी मलाही बोलावले होते. सर्वांचा इलाज करूनही भीमराव महाडिक छातीवरती हात ठेवून तळमळत होते. मी सोबत रूईचा चीक घेऊन गेलो होतो. मला ही सेवा करण्याची संधी मिळाली. कळीच्या जागेवर प्रत्येक सेंटिमीटरच्या अंतरावरती रूईच्या चिकाच्या टिकल्या लावल्या व नव्या कोर्‍या रेझरने रेघोटया मारल्या आणि कापूस चिकटविला आणि काय आश्‍चर्य, तळमळणे बंद झाले. झोप शांत लागली. आणि पुढील उपचारासाठी माझ्या उपचार केंद्रात दाखल झाले. यामुळे या मोठया लोकांशी माझा संपर्क वाढला. त्यांचे वजनही कमी झाले.

रेझर ब्लेडचा वापर दिसायला अयोग्य वाटतो म्हणून अन्य काही करता येईल का व सुरूवातीच्या कालखंडात मी त्या आरळयाच्या बाळू धनगराप्रमाणे हे औषध काय आहे मी सांगत नसे. पण या औषधासाठी बेळगावहून टॅक्सीने काही पेशंट खेपा करू लागले. हे प्रत्येक खेप एखाद्या किरकोळ औषधासाठी केवढयाला पडते असा विचार करून मी स्पष्टच उल्लेख करू लागलो. रेझर ब्लेडच्या ऐवजी देवी काढावयाच्या इनस्ट्रुमेंटनी काम होऊ शकेल का? हे मी पाहिले. काम होण्याच्या ऐवजी काम वाढले. त्रास वाढला. म्हणून पुन्हा ब्लेडनेच छेद घेणे चालू ठेवले.

माझ्या उजव्या हाताच्या वर कोपर्‍याजवळ एक हरभर्‍याएवढी गाठ होती. इंजेक्शनची सुई पाव इंच रूईच्या चिकात बुडवून ती सुई मागच्या सिरिंजला जोडून हाताच्या गाठीमध्ये सब क्युटन्टस सुई टोचून सिरिंजमधील किंचित हवा ढकलण्याचा प्रयत्न केला. बघता-बघता हात फुगायला लागला. इतका फुगला की हातोप्यातुन हात निघाला नाही. हात मोडल्याप्रमाणे सुजू नये म्हणून गळयात टांगून घेतला. चोवीस तासात ती गाठ शेंगाचा दाणा बाहेर येतो तशी आपोआपच बाहेर आली.

जखमेचा खड्डा मला मोठा दिसला. जखमेच्या भोवतीची त्वचेची रंध्रे विस्तीर्ण झाली. एकूण सारच दृश्य प्रथम दर्शनी कॅन्सरग्रस्त वाटू लागलं. अ‍ॅलोपॅथीचे डॉक्टर हा कॅन्सरच आहे, योग्य वेळी हात काढणे योग्य होईल, असा सल्ला देऊ लागले.

त्या काळात मडिलगे बुद्रुकचे डॉ. सदाशिव बिल्ले हे माझे जिवलग मित्र झाले होते. हा मनुष्य आयुर्वेदातील विशेष तज्ञ होते. एकंदर त्यांनी हकीकत समजून घेतली आणि त्यावरती उपाय (उतारा) सुचविला. पुस्तकाचे नाव घेऊन पेज नंबरही सांगितले.

रूईचा चीक अंगात शिरल्यास, येनकेन प्रकाराने अंगात शिरल्यास चिंचेचा पाला चेचून रस त्या व्यक्तीच्या सर्वांगाला फासावा. या सूचनेनुसार चिंचेच्या पाल्याचा रस लावण्यात आला आणि काय आश्‍चर्य नदीचं पाणी ओसरतं तशी सगळीच समस्या मालवून गेली. विषय मिटला, अरिष्ट संपलं.

मी प्रत्येक प्रयोग आधी स्वतःच केले मग सांगितले. माझ्यासाठी माझी तब्येत प्रयोगशाळा होती. मी कुठल्याच प्रयोगशाळेत गेलो नाही. कुठलेच सिद्धांत मांडले नाहीत. मी प्रत्येक प्रयोगानंतर शरीरातील स्थित्यंतरे पाहिली, एकूण परिणाम पाहिला, पेशंटसाठी योग्य की अयोग्य ठरविलं.

आजचे सायंटिस्ट उंदीर, घुशी, मांजर, कुत्रा, ससा यांच्यावरती प्रयोग करतात. ती बिचारी जगली तरच दुसर्‍यावरती प्रयोग करतात. मी सर्वत्र प्रयोग माझ्याच शरीरावरती करत होतो. नाजूक भागावर म्हणजेच डोळे, काख, लिंग या अवयवांवर रूईचा चीक लावणे धोक्याचे आहे.

क्रमश:

डॉ. शशी पाटील एक महान सेवाभावी चिकित्सक होते. 'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' हे त्यांच्या जीवनाचे ब्रीद होते. ते नेहमी निस्वार्थ व निर्मळ भावनेतून रुग्ण उपचार करायचे, त्यामुळे त्यांच्या फक्त हातालाच नव्हे तर त्यांच्या वाणीला ही गुण होता. त्यांच्या अनुभवसिद्ध उपचारांमुळे अनेक रुग्ण दुर्धर रोगातून मुक्त व्हायचे. मूलतः डॉ. शशी पाटील हे एक आध्यात्मिक साधक होते. प्रत्येक औषधोपचाराचा प्रयोग, ते प्रथम स्वतःवर करून पाहायचे. त्यांचा शिवांबू, योग, निसर्गोपचार व आयुर्वेदाचा फक्त प्रगाढ अभ्यास होता असे नाही तर ते एक उत्तम हस्त कुशल उपचारक होते. मॉलिश व ॲक्युप्रेशर यासारख्या उपचार कलेमध्ये ते निपून होते. ते एक उत्तम लेखक व कवी सुद्धा होते. त्यांनी आरोग्य विषयक अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. ते आरोग्याचा गहन विषय रुग्णांना दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणे देऊन सहजपणे पटवायचे.त्यांचे आपल्या वाणीवर चांगले प्रभुत्व होते. प्रस्तुत ‘मुळनक्षत्री - एक प्रेरणादाई जीवन-धारा’  या लेख मालिकेतून आम्ही  डॉ. शशी पाटील यांचे  ‘जीवन चरित्र’ क्रमश: प्रकाशित करीत आहोत. आज हजारो लोकांसाठी त्यांचे जीवन, नव-प्रेरणेचा स्त्रोत आहे.

Previous Post Next Post