मुळनक्षत्री : एक प्रेरणादाई जीवनधारा : भाग - 13
मला कळालेली विपश्यना
डॉ. एन. जे. अण्णा व आपले मित्र मंडळी एका ध्यान शिबीरासाठी इगतपुरीला निघाले होते. “शशीकांत, तुला यायचयं का?” असं ते मला म्हणाले. ही संधी मला आली होती. त्यांच्याच वाहनातून येणं-जाणही होतं, तशी तोशीश काहीच नव्हती. मी म्हंटलं, “चला गाडी इगतपुरीला जाते आहे तर मी येणार.”
विपश्यना विद्यापीठ इगतपुरीच्या स्टेशनापासून एक किलोमीटरच्या अंतरावरती होते. तेव्हा गोयंका गुरूजी हे स्वतःच ध्यानाचा क्लास घेत असतं.
दहा दिवस बोलायचे नाही. सकाळी चार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत झोपायचं नाही. गरजेपुरता मिताहार करायचा. नजरेसमोरच टांग्याच्या घोडयाप्रमाणे पाहायचं. आम्ही सगळेच नवीन होतो. नवाच अनुभव घ्यायचा होता. एकूण मनाचा खेळ खेळायचा होता. स्वतःशी स्वतः मौनेतून बोलायचं होतं. आपलीचं आपण चौकशी करायची होती. एकूण गौतम बुद्धांचा प्रयोग होता. पण अनंत लाभाचा होता.
पहिले तीन दिवस स्थिर बसून डोळे बंद ठेवून नाकाच्या टोकावर मनाला थांबवायचं होतं. याला मअनापानसती योगफअसे म्हणत. गुरूजींची नजर आमच्याकडे असायची. संध्याकाळच्या प्रवचनात खुलासा असायचा. याने मनाला धार येत होती. मन सूक्ष्म होतं होतं. तासन्तास मनाने स्वाभाविक श्वासाला टिपायचं एवढचं काम होतं. पण मन कंटाळून जायचं. पाय अवघडून जायचे. कंबरड सणकून निघायचं. कधी उभे लांबडे होऊ असे वाटायचे. कधी मन नाकावरून निघून गेलेले असायचे.
गुरूजी सांगायचे, चालू असलेला स्वाभाविक श्वास शांतपणे स्थिर होऊन, मनाच्या माध्यमाने श्वासाच्या धक्क्याला, श्वासाच्या हिंदोळयाला, केवळ पाहायचं हेच कौशल्य होतं. ‘पश्यन्ति’ म्हणजेच पाहणे. ‘वि-पश्यन्ति’ म्हणजेच विशेष रूपाने पाहणे, यथाभूत पाहणे, जसच्या तसं पाहणे.
टेबल टेनिस पटूच्या दोन पक्षात बॅटने परस्परांत बॉल फेक होते. सेम तसेच ‘अनापासती योग’ या क्रियेमध्ये पिंड आणि ब्रह्मांडात श्वासाच्या हवेच्या गोळयाची परस्परात तीच स्थिती झालेली असायची. नाकाच्या टोकाचा त्रिकोणी भाग टेबल बनलेला असायचा. तर श्वासाच्या हवेचा गोळा बॉल बनलेला असायचा. यामध्ये आपण खेळाडू व्हायचे नसून अंपायरची भूमिका घ्यायची असते.
गोगलगाय पुढे जाताना मागे एक म्यूकस सोडते किंवा आकाशातला रॉकेट पुढे जाताना लांबलचक धुराचा पट्टा विराट आकाशात सोडतो. तसं मंद श्वासाची हालचाल व अवागमन, नाकपुडया किंवा मिसरूटाच्या जागेवरती या त्रिकोणी भागावरती त्याच्या ज्या वर्तमानी संवेदना उमटतात. त्या पाहायला मन एकवटायचं. एकाग्र करायचं. हेच जागेपण. खाज आली तरी शारीरिक प्रतिक्रिया कोणतीच करायची नाही.
मान, पाठ व कंबर सरळ ठेवायची. हे अँटिनाचे काम करतात. हे सर्वच आम्हाला आरंभी सर्कस वाटायची. दोन दिवसाच्या बैठकी नंतर सराव झाला. तिसर्या दिवशी खूपच आनंद झाला आणि विपश्यना अनुभवली. एखाद्याने झाडाच्या पारंबीला पकडून लोंबकळल्यास झोके घेता-घेता झाडावरती सहज चढणे सहज शक्य व्हावे तसे नाकाच्या लोंबकळणार्या श्वासाला पकडून सहजपणे परमानंदाला प्राप्त होता येते.
जशी गृहिणी तांदूळ निवडताना तांदळाच्या ढिगातून पाच-सहा दाणे तांदळाचे ओढते, त्यात नजर फेकते आणि तांदळा व्यतिरिक्त नको त्या गोष्टींना हेरते. तसं एवढचं काम डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखापर्यंत पार्ट बाय पार्ट जे म्हणून शरीराचं अस्तित्व आहे. जे म्हणून सहजासहजी आरामात, मनाला अस्तित्वाच्या संवेदनांची सुखद किंवा दुःखद नोंद घेणे शक्य आहे. ती-ती घ्यायची मग असं स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायचं. सूक्ष्माकडून सूक्ष्मतमकडे पोहोचायचं. सूक्ष्मतमकडून तरंगाकडे आपोआप जाणं व्हायचं. त्यालाचं ‘धाराप्रवाह’ ही संज्ञा असायची. हाच आहे तो परमानंदाचा क्षण, हाच आहे तो चिदानंदाचा क्षण, हाच तो समाधानाचा समाधीचा क्षण. पण मोहळून किंवा मोहून जायचे नाही.
पण इथे पण समता ठेवायची असते. साक्षी भाव ठेवायचा असतो. तितकी प्राप्ती अधिक होते. याच अवस्थेत ध्यानस्थ, समाधीस्थ असलेल्या मूर्ती आपण मंदिरात पाहत असतो. मूर्तीचे लांबडे कान हे सजगता दर्शवितात. मूर्तीचे आकाशाकडे फिरवलेले पायांचे तळवे, आता आम्हाला चालायचे काहीच राहिलेले नाही. व आकाशाकडे फिरवलेले हाताचे तळवे, आता हाताने आम्हाला कुठलेही काम करावयाचे उरले नाही. जणू हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात.
मूर्तिच्या चेहर्यावरील स्मित, हे आनंद दर्शवित असतं. व मस्तिष्काच्या मागे गोलाकार, तेजस्वी आभामंडळ तपाची प्रखरता दर्शवितात, ना मी शरीराचा आहे, ना मी कोण्या जातीचा आहे, ना कोण्या नावाचा आहे. बिंदू सिंधूला मिळाल्याची ती नोंद. टाळी ब्रह्मांडाला मिळाल्याची ही पोच असते. ना मी उजव्या पक्षाचा, ना मी डाव्या पक्षाचा, ना मी वर पक्षाचा, ना मी वधू पक्षाचा, ना मी याचा, ना मी त्याचा.
भेंडीची वाळलेली बी अत्यंत हलकी असते. स्ट्रॉ सारखी दोन इंचाची काचेची पाईप ओठात धरून, जमिनीशी समतोल होऊन बी त्या पाईपच्या छिद्राच्या पृष्ठभागावर ठेवून हळूवारपणे फुंकू लागलो तर जी दशा त्या बी ची होते. तीच दशा त्या तपस्व्याची होत असताना जाणवते. ना ती बी काचेच्या पाईपला चिकटते. ती अंतराळी होते. काही क्षण तरंगत राहते. यात साक्षीभाव आणि समताभाव पुुष्ट ठेवणे हा फारच महत्त्वाचा असतो.
हा भाव या ठिकाणी येताच क्षणी शरीराचा संबंध सुटतो व शरीराचा संबंध सुटल्यामुळे एकूण माया बाजाराशी कनेक्शन तुटते. थोडक्यात या पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणाचे नातेही संपते व आपण अंतराळी झाल्याचं फिलिंग होतं. त्यामुळे शरीरामध्ये ऊर्जेचा व्यय थांबतो. त्यामुळे झीज, अभाव व उणीव भरून निघते, व यामुळेच रोगही बरा होऊ शकतो.
खरतर रोग हा खड्डा, असून उपचार ही भरपाई असते. म्हणूनच मी माझ्या रूग्णांना ‘तनाला शिवाम्बूचे मॉलिश व मनाला विपश्यनेचे पॉलिश’ असे विनोदाने सांगत असतो. ही दूधारी बंदूक ज्याच्या खांद्यावरती राहील, त्यांची शिकार कुठलाही रोग करूच शकत नाही. खरंतर रोगमुक्तीसाठी ही ध्यान पद्धती नसून तर ती भवमुक्तीसाठी ध्यान प्रक्रिया आहे. हे मुद्दाम गुरूजी सांगतही असतात.
तथापि मी माझ्या स्वास्थ्य प्रेमींना सांगत असतो, मलविहीन तन करण्यासाठी शिवाम्बू व विकारविहीन मन करण्यासाठी विपश्यना. याला तोड नाही. औषधाशिवाय रोग निमूर्लन या मोहिमेत मी यांना अग्रस्थान देतो. थोडक्यात तनाची शुद्धी शिवाम्बूकडून होते व चित्ताची शुद्धी विपश्यनेकडून लवकर होते. असा अनेकांचा अनुभव आहे.
विचाराच्या प्रवाहाला आपण ‘मन’ म्हणतो व संवेदनेच्या प्रवाहाला आपण ‘तन’ म्हणतो. अशा मना-तनाची ही खिल्लारी जोडी जीवनाची गाडी ओढीत असते. स्वतःकडून स्वास्थ्याकडे, स्वास्थ्याकडून समाधानाकडे, समाधानाकडून समाधीकडे एकूण जीवनाचा हाच स्थायी स्वभाव आहे. उद्देश्य पण आहे.
विपश्यना मनुष्य जातीच्या इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण ध्यान प्रयोग आहे. जितक्या लोकांनी विपश्यनेतून बुद्धत्व प्राप्त केलं, ते कोणत्याही दुसर्या ध्यान प्रयोगातून कधीच केलं नाही. विपश्यना ध्यान प्रयोग अभूतपूर्व आहे. बुद्ध म्हणत असायचे, ‘इपश्यको, या आणि बघा’ बुद्ध कुठल्याही धारणेचा आग्रह करीत नाहीत.
बुद्धाच्या मार्गावर चालण्यासाठी ईश्वराला मानणं न मानण्याची गरजच नाही. बुद्धाचा धर्म हा एकटाच असा धर्म आहे, ज्याच्या मध्ये मान्यता, पूर्वग्रह, विश्वास याची अजिबात गरज नाही. बुद्धाचा एकमेव धर्म आहे जो वैज्ञानिक आहे. बुद्ध म्हणतात, या! आणि बघूनच घ्या. मानण्याची गरज नाही. आधी बघा व मगचं जाणा. ज्यांनी पाहिलं, जाणलं त्यांनी मग मानण्याची गरज नाही, मानणचं भाग पडतं. आणि बुद्धाची ही जी पाहण्याची व दाखवण्याची प्रक्रिया होती, ती म्हणजेच विपश्यना. खरेतर हा सरळ-सरळ प्रयोग आहे. आपल्याच येणार्या-जाणार्या श्वासाकडे केवळ साक्षीनं पाहायचं.
श्वासाकडून तुमचा आत्मा व देह हा जोडलेला आहे. श्वास हाचं पूलं आहे. एका बाजूला देह आहे व दुसर्या बाजूला चेतना आहे, चैतन्य आहे. मध्यावरती श्वास आहे, जर तुम्ही श्वासाकडे योग्यरीतीने पाहत असाल तर शरीर भिन्न असल्याची जाणीव होईल. तुमची आत्मचेतनेतच उपस्थिती राहते.
बुद्ध म्हणतच नाहीत की, तुम्ही आत्म्याला माना. पण श्वासाकडे पाहण्याशिवाय मार्गच नाही. जो श्वास बघेल तोच शरीराहून वेगळा होईल आणि जो श्वासाकडून भिन्न झाला तो शरीराकडून वेगळा झालाच. कारण शरीर आणखीन दूरची गोष्ट आहे. श्वास नंतर आहे आणि मग तुम्ही आहात.
तुम्ही श्वासाकडे बघायला लागतात की तुम्ही शरीरापासून बाजूला होता. शरीराकडून सुटलात, श्वासाकडूनही सुटलात तरच मग शाश्वतेची प्रचिती येते. त्याच दर्शनामध्ये तुम्ही जंप घेता. जगामध्ये जी उंची असेल ती हीच आहे आणि खोली असेल ती पण हीच आहे. बाकी सर्व व्यर्थ उपद्व्याप आहेत.
रोगाच्या मध्ये तुम्ही पाहिलं असेल, श्वास वेगळया पद्धतीनं चालतो. क्रोधामध्ये तो एका ढंगाने चालतो. तुम्ही पळत असताना एका ढंगाने चालतो आणि हळू चालाल तर तो वेगळा ढंग पकडेल.
श्वास बदलला की भाव बदलतात. जरा प्रयत्न तरी करून बघा, जर रागावलेला असलात तर श्वासाला डोलू देऊ नका. श्वासाला स्थिर ठेवून अखंड ठेवण्याचा प्रयत्न करा. श्वासाचा रिदम तुटला नाही तर तुम्ही रागवूच शकत नाही. तुम्ही अडचणीत याल. रागवू इच्छित असाल तरी रागवू शकणार नाही. क्रोध उठला तरी तो पुन्हा-पुन्हा कोसळेल.
लक्षात ठेवा प्राणायाम आणि विपश्यनेत हाच फरक आहे. प्राणायामामध्ये श्वासाला बदलण्याची नक्कल असते. विपश्यनेमध्ये श्वासाला जसच्या तसं पाहण्याची कला असते. मग ती कशीही असू देत. ओबड असेल, धोबड असेल, आखूड असेल, लांब असेल, तिरकी असेल.
बुद्धाचं म्हणणं आहे. श्वासामध्ये नक्कल आणू नका. तुम्हीच छोटे आहात, तुमची नक्कल मोठी होऊच शकत नाही. तुमचे हातच छोटे आहेत. त्यामुळे त्याचा छापही छोटाच राहील, त्यामुळे बुद्धांनी हे नाही सांगितलं की, तुम्ही श्वासाला बदला! म्हणूनच बुद्धांनी प्राणायामाचे समर्थन नाही केलं. बुद्ध म्हणतात, “तुम्ही फक्त बसून घ्या. श्वास तरी चाललेलाच आहे. जसा चालत आहे बसून बघत राहा.”
रस्त्याच्या किनार्याला बसून जसे यात्रेकरूंना आपण पाहतो किंवा नदीच्या किनारी बसून वाहणार्या पाण्याला आपण पाहतो. तुम्ही काय करणार? आलाच तरंग तर बघणार! आलीच लाट तर बघणार! रस्त्याच्या वरून चालणार्या गाडया बघणारं!
कधी कधी गाय जात असेल तर कधी गाय बघणार. जे आहे, जसं आहे तसचं तुम्ही पाहायचं आहे. थोडं तरी बदलण्याची आकांक्षा आरोपित करू नका. बस्स, शांत बसून श्वासाला पाहत रहा. बघता बघता श्वास आणखीन शांत होईल कारण का? बघण्यामध्ये शांती आहे. निवड न करता बघण्यामध्येच शांती आहे. करणं न करण्याचा काही प्रश्नच नाही. जसं आहे तसं ठीक आहे. जसं आहे तसं शुभ आहे.
डोळयाच्या समोरून जात असलेल्या गोष्टींशी आमचं काही देणं-घेणं नाही. उद्वेग्र होण्याचा कुठला प्रश्नच नाही. आसक्ती बाळगण्याची काही कारणचं नाही. जे पण विचार सरकत जात आहेत त्याकडे निःपक्ष होऊन टी.व्ही. मधील जाहिरातीची पट्टी सरकते तसं पहायचं आहे.
काही मंत्र उच्चारायचा नाही. काही प्रार्थना करायची नाही. ना कुठलं आसन निवडायचं आहे. इतकी सुगम आणि सरळ गोष्ट आहे. जितकी तुमच्या जीवनात विपश्यना पसरत जाईल. तुम्ही या बुद्धांच्या अद्भुत आमंत्रणाला जाणार. ‘इपश्यको या आणि बघा’ असं बुद्धाचं म्हणणं आहे. शास्त्र सांगतयं म्हणून ईश्वराला मानू नका. मानाल तर चूक होईल. बघणं, दर्शन करणं हेच मुक्तिदायी आहे. दीर्घ मुदतीच्या सतीपठठान वैगेरे विपश्यना शिबिरे मी अनुभवली. गेली वीस वर्षे मी विपश्यी साधक आहे.
मान्यताच हिंदू बनवीत असते, मुसलमान बनवीत असते, जैन बनवीत असते, बौद्ध बनवीत असते. दर्शन तुम्हाला परमात्म्याच्या बरोबर एक करून टाकते. मग तुम्हाला हिंदू, मुसलमान, इसाई, जैन, बौद्ध व्हायची गरज नाही. हाच अनुभव घ्यायचा आहे आणि हेच अनुभव घेणे योग्य आहे.
स्वस्थ तोच असतो ज्यानं अमृताला जाणलं आहे. शरीर मरणार्या धर्माचं आहे. मृत्यू त्याच्या कणाकणात, पेशी-पेशीत लपून आहे. काही काळ जायचा अवकाश, शरीरच स्मशान आहे. त्यासाठी चिंता करण्याची गरज नाही. शरीर स्वस्थ आहे की अस्वस्थ तुमच्या ध्यानाशी त्याचा काही संबंध नाही.
तुम्ही असं समजता का, जे स्वस्थ आहेत ते ध्यानाला उपलब्ध होत आहेत. खरं बघायला गेलं तर उलटं आहे. ज्याचं शरीर स्वस्थ आहे ते ध्यानाच्या बाबतीत विचारच करीत नाहीत. ते म्हणणार आहेत, बघायला येईल म्हातारपणी. आता काय पडलयं. चार दिवसाची जिंदगानी आहे. खाऊ या, पिऊ या, मजा करू या. ज्यांचा मृत्यू होतोय ते करू देत ध्यान.
मी जीवन असचं किती दिवस गमवू, असं औषध शोधल पाहिजे की ज्यानं मृत्यूच होणार नाही. एकदा बुद्ध निघाला होता, युवा संस्थेच्या उद्घाटनाला, रस्त्याच्या कडेनं आडव्या माणसाला नेताना बुद्धानं सारथ्याला विचारलं होतं, “काय आहे हे?”
“हा मनुष्य मेला आहे,” असं सारथी म्हणाला.
बुद्धांनी लगेच विचारलं, “मी पण मरणार?”
त्यावर सारथी म्हणाला, “कसं सांगू? आणि खोटं तरी कसं बोलू? आपण असा काही प्रश्न विचारित आहात, मला अडचणीत टाकत आहात. पण मी खोटं तरी कसं सांगणार? आता आपण सुंदर आहात, तरूण आहात. मरण सर्वांनाच येतं. मृत्यू अपरिहार्य आहे. याच्यातून कोणीही वाचलेला नाही.”
बुद्ध सारथ्याला म्हणाले, “रथ परत फिरवं !”
“तुम्ही असं कसं सांगत आहात, रथ फिरवा म्हणून, तुमच्या हस्ते तर उद्घाटन होणारं, लोकं तिथे वाट पाहतील.”
बुद्ध म्हणाले, “होऊन गेले उद्घाटन. आता मला उद्घाटनात रस नाही. जर मरणं येणारं असेल तर त्याआधी मला मरणं जाणलं पाहिजे. अमृताला जोपर्यंत जाणणार नाही. तोपर्यंत मला चैन पडणार नाही.” शेवटी बुद्धांनी घर सोडले.
मृत्यू आहे, म्हणूनच ध्यानाचा शोध चालू होतो. देह अस्वस्थ आहे. हे दुर्दैवाचे नाही. त्याला सुदैवात बदला. मग देहाच अस्वस्थ होणं बाधा नाही पोहचवणार. श्वास जर चालत असेल, एवढीच शर्त पुष्कळ आहे. श्वास जर चालला नसता, तेव्हा श्वासाच्या प्रति जागा. बसून जागा, उभे राहून जागा, चालताना जागा, प्रवास करताना जागा, झोपून पण जागा.
हे आजारातलं आजारपणं असतानाही करता येतं. हॉस्पिटलमध्ये भरती होणार्यालाही मी हेच सांगत असतो. खरं तर हे आहे. घरच्या माया बाजाराच्या उपद्व्यापामध्ये हे घडलचं नाही हे दुर्दैव आहे. हॉस्पिटलमध्येच हे सौभाग्य प्राप्त होतं. ध्यानासाठी वेळ मिळतो. तिथं काय दुसरं करायचचं नसतं. अंथरूणात झोपल्या-झोपल्या दुसरं करणारचं काय? येणार्या-जाणार्या श्वासाला तरी तुम्ही बघू शकता. श्वासावरती तुम्ही ध्यान आरोपित करू शकता ना! बस्स! इतकचं पुरेसं आहे.
मन सततच भूत-भविष्यामध्ये रमत असतं. पाहिजे-नको मध्ये गुंतत असतं. आळस, अज्ञानात पडत असतं. नकार-विकारात गुंतत असतं. ते या निमित्तानं प्रथमचं श्वासाकडे बघत-बघत वर्तमानात येतं. यासाठी श्वासाचं आयोजन सेंटरला असलेल्या नाकाकडे दिलं आहे. तुमचा ड्राईव्हरचा साक्षीभाव रस्त्याच्या मधल्या पांढर्या पट्टयाकडे असतो, तेंव्हा तुम्ही ना डाव्याचे ना उजव्याचे, ना शरीराचे ना श्वासाचे, तुम्ही सेंटरचे झालेला असता. सेंटरला असलेली अवयव बहुधा सेंटरलाच घेऊन जातात. शरीरात शोधली गेलेली चक्रे ही सेंटरलाच आहेत. संभोग ही एकच गोष्ट सर्वसाधारण मनुष्य होशपूर्वक करतो आणि परमानंदाचा अनुभव घेतो. संभोग हा ऊर्जेचा त्याग आहे. संभोग ही शिडीवरची उतरण आहे. ब्रह्मचर्य हेच जीवन, अर्थात वीर्यनाश हाच मृत्यू, अशाप्रकारे अध्यात्माच्या नीतिमूल्यात जोखले जाते. उर्जेचा क्षय करणारी निकृष्ट गोष्ट संभोग धरली असली तरी पण हे सर्व सामान्यांच्या दिनक्रमात असामान्य गोष्ट असते. शिडी ची उतरण दुःखाकडे, पातळाकडे, भवभवाकडे व शिडीची चढाई दुःख मुक्तीकडे, भवमुक्तीकडे आपणाला घेऊन जाते. असं अध्यात्म सांगतं.
या भवसागरात संभोगाच्या द्वारेच प्रवेश मिळविला व ध्यानातून, समाधीतून भवमुक्ती मिळवली. म्हणूनच संभोगातून समाधीकडे, समाधीतून मुक्तीकडे असं कुणी जरी म्हटलं तरी गैर वाटावयाचे कारण काय?
निकृष्ट का असेना, संभोग ही एवढीच गोष्ट जागृत पातळीवरतीच भोगली जाते, ज्याच्यामध्ये साक्षीभाव राहतो. देहभान विसरण्याची क्रिया उभयतांची झालेली असते. हा सूर्य किरणाचाच कवडसा का असेना. अंधारात कवडसा ही, आपण अंध नाही याची शाश्वती देऊ शकतो. आपण डोळस आहोत याची खात्री मिळते पण समाधीतून मात्र अख्ख्या सूर्याचे दर्शन झालेलं असतं अन् तेही डोळे बंद ठेवून.
शरीराचे दर्शन संभोगाशिवाय नाहीच मुळी, स्वतःच्या, ‘स्व’ चे दर्शन समाधी शिवाय नाहीच मुळी. ही दोन टोके आहेत. तळ खालचे व शिखर वरचे. म्हणूनच अजिंठा, खजुराहो या लेण्यांमध्ये संभोगाच्याबरोबरच ध्यानाची, समाधीची शिल्पे, आहेत. या शिल्पांना, लेण्यांना हे सांगावयाचे असेल काय? जो-जो संभोग करायला लायक आहे. त्या सामान्याला स्वतःचे दर्शन समाधीच्याद्वारे घेता येते. गणिताचा ताळमेळ हिशोबासाठी आवश्यक आहे तसा जीवनाचा ताळमेळ या गणिताशी निगडीत दिसतो.
तेव्हा समाधीपासून दूर-दूर उभे राहून, तुम्ही फक्त पाहू नका. पाहणारेच फक्त होऊ नका तर भागीदारही बनायला हवेत. सुरूवातीला ही भागीदारी वेडेपणाची वाटेल. पण नंतर-नंतर अन्य कोणतेही काम एक उपद्व्याप वाटेल.
जितके आपण डोळयांनीच काय ते पाहून जग समजून घेतलतं, तितके अन्य अवयवांनी नाही. अगदी सर्व पाहणं हे नजरेनेच शक्य झालं आहे. पाहून होणारी, नजरेनेच हेरून होणारी खात्री ही प्रत्यक्ष खात्री असते, ती विश्वास पात्र असते. डोळे पाहायचं काम करताहेत. परत त्याचं डोळयांना पाहून आपण काय ते जिवंत कि मृत हेही ठरविण्याची सर्वसाधारण कल्पना सर्वांना ज्ञात आहेच. म्हणजे जोवर पाहणं चालू तोवर जीवन जीवन चालू असतं. बुबुळे डोळयाची बाजूला सरकारी कि माणूस सरकला, इथपर्यत आपण नक्की करून घेतलेली असते.
थोडक्यात काय? पाहणं म्हणजेच जाणणं, जाणणं म्हणजेच समजणं, साधारणपणे डोळे उघडल्यापासून ते झाकेपर्यंत जी चित्र आपण पाहतो. जी माहिती एकत्र करतो. त्यालाच आपण ज्ञान, बुद्धी म्हणतो. पुन्हा बुद्ध्यांक सुद्धा मोजताना पाहण्याची, आकलन करून घेण्याची शक्ती पुन्हा डोळयांची हालचाल पाहूनच निश्चित करतात. बाह्य जगाशी आपलं नातं डोळयांशीच काय ते अधिक असतं.
मात्र तेच, पोटात आपल्या दुखायला लागलं किंवा डोकं दुखायला लागलं किंवा दाढ दुखायला लागली, तर हे जाणून घ्यायला हे कळवून घ्यायला काही डोळयांची आवश्यकता असते. इथे डोळयांचा उपयोग नसतो. तर हे ज्या माध्यमांनी कळतं त्याला आपण संवेदना म्हणतोच. फक्त दुःखाच्याच संवेदना नसतात. तर सुखाच्याही संवेदना असतात. आवडणारी संवेदना सुखाची व न आवडणारी ही दुःखाची, झालं...
हे मूल्यांकन करून इथूनचं आपण जीवनाच्या रहाटगाडग्याला गती देतो. जे आवडतं त्याला जवळ करतो, हवं म्हणतो व जे आवडत नाही त्याला दूर ठेवतो, नको म्हणतो. हाच राग-द्वेष होय.
साधारणपणे त्यात आपली सुरक्षितता आहे. त्या गोष्टीचं आवडत असतात व ज्यात असुरक्षितता आहे त्याच नावडत असतात. केंव्हा-केंव्हा उलटही अनुभव घेतो.
म्हणजे जितक्या सुख-दुःखाच्या जाणीवा आहेत. या जाणीवा संवेदनेच्याच रूपानं आपण झेलीत असतो. जाणत असतो म्हणजे संवेदनेकरिता डोळयांची आवश्यकता आहेच असं नाही. कारण संवेदना आपण नखापासून केसांपर्यत अगदी टिपकागदाप्रमाणे टिपतच असतो. संवेदना निर्माण करून देण्यात सर्व ज्ञानेंद्रियांचा समावेश आहे. आपणाला ही गंमत माहीत आहे का? व्यवहारात बाह्य जगतात प्रत्येक गोष्ट मग वस्तू असो पदार्थ असो, ऐवज असो ते देऊन त्याचा पैसा करतो, म्हणजे सर्वांचे अंतिम रूप चलनात पैशात आणतो.
अगदी तसे... अंतर जगताता म्हणजेच आपल्या देहकुडीत काहीही करून... कशाचाही प्रत्येकाचं म्हणून आपण संवेदनाच अनुभवीत असतो, संवेदनाचं बनत असतात. त्या संवेदनाना एकत्र करण्यात सारं अख्ख आयुष्य वेचीत असतो. मग ते रूप असो, शब्द असोत, गंध असो, आपल्याला आश्चर्य वाटेल, जीवनात एखाद्या पदाचं एखाद्या श्रीमंतीचं, एखाद्या निवासाचं, स्वादाचं, पोषाखाचं किंवा गरिबीच्या सुद्धा जाणीवा आपण संवेदनेच्या रूपांनी प्राप्त करीत असतो.
तुम्ही जीवन बारकाईनं समजून घेतलतं की, एक गोष्ट लक्षात येण्यासारखी आहे. आपण जे जीवन अनुभवत असतो. जीवनात ज्या क्रिया-प्रक्रिया करीत असतो. त्या सर्वच्या सर्व जाणिवा, एकमेव संवेदनेच्याच रूपांनी आपण पकडीत असतो. त्या संवेदनेलाच सर्वस्व समजत असतो. पण त्या संवेदना, क्षणा-क्षणाबरोबर सरकत असतात. त्या संवेदनेला आपण स्थिर ठेवू शकत नाही. ही मजबूरी आहे. आकाशातील मेघाप्रमाणे त्या सरकत राहतात. म्हणूनच केवळ जीवन मृगजळ ठरलयं. जीवन क्षणभंगूर ठरलयं. जीवन मायाबाजार ठरलयं, म्हणून मी म्हणतोय संवेदना जाणवणं हेच जिवंतपण आहे.
संवेदना क्षणभंगूर आहेत हे जाणणं, प्रौढपण आहे. साधारणपणे आवडणार्या संवेदना एकत्र करण्याचा आपण दिवसभर प्रयत्न करीत असतो. न आवडणार्या संवेदनेला नजरे समोरील चिल्टे, घुंगुरटे ढकलावेत याप्रमाणे बाजूला ढकलीत असतो. पण हा प्रयत्न काहीच कामाचा होत नाही. साबणाच्या फुग्याच्या अर्थात चमकणार्या गोळयाला पकडल्यावर हातात काहीच जसे उरत नाही. आता आहे, सापडेल म्हणेपर्यत नाहीसं होतं. शेवटी हाताची मूठ रिकामी ती रिकामीच राहते.
पण याच संवेदनेला पकडून ठेवण्यासाठी आपण किती आटापिटा करतो, किती मेहनत घेतो. किती लबाडी करतो. जीवनाच्या जाणीवांचं अंतिम रूप संवेदना आणि ती ही अचल, अस्थिर हे ज्या महानुभवांनी जाणलं, तेच संत झाले, गौतम बुद्ध वगैरे.
आपल्याला वाटतं पैसा झाला कि सुखी होऊन जाऊ, पण अनुभव काय? पैसा विविध संवेदनेला जन्म देऊ शकतो पण तोही स्थिर ठेवू शकला नाहीच. नाना संवेदनेला पैशाच्या माध्यमांनी विकत घेतलात पण संध्याकाळी हिशोबाच्यावेळी ती हातीच लागणार नसेल, तर मग काय कामाची?
आपण प्रत्येकजणाने कोळीष्टक पाहिलं असेल, त्याचा जाळीदार निवास, त्याची चाल, त्याची शिकार आणि त्याची एकूण हालचाल...
छोटासा कोळी पण आठ-दहा ठिकाणी अडसरीच्या भिंतींना आधार करवून, आकर्षक सुंदर प्रमाणबद्ध साईझमध्ये संवेदनशील जाळे विणतो. जे जाळें किट पतंगाला दिसतही नाही. भटकणारे किटपतंग मात्र त्यात अडकून बसतात व हा जाऊन त्यावर हात, दोन हात करून, ताव मारीत राहतो. ताव मारून झाला कि तो परत जाळीच्या मध्याला येतो. कारण मध्यापासून जाळीच्या कुठेही परिघावर त्याला हल्ला करणे सोईचे होते, जवळ पडते.
तसचं आपल्याही देहाच्या सेंंटरला असणारा वासनेचा प्रतिनिधी देहाच्या माध्यमानी विश्वाच्या भितींना 8-10 ठिकाणी म्हणजेच पाच कर्मेंद्रिय व पाच ज्ञानेंद्रिय या माध्यमांना चिकटून एक सुंदर जाळ विणतो आहे. रंग, रूप, वास, चव, गंध, स्पर्श या माध्यमांनी ज्या संवेदना प्राप्त होतील, त्या त्यांना घेऊन वासनेच्या प्रतिनिधिपर्यंत, संवेदनेच्याच रूपानी रसद पोच करणं, सतत काम चालू ठेऊन आहे. पण ज्या भांडयाला तळच नाही असं भांडे आज भरेल उद्या भरेल वाट पहात, आपण वेडे, एक सारखे दमतो आहोत.
आपण जन्मलो वासनेच्याच माध्यमांनी, जगलोही वासनेच्यासाठी व मेलो वासनेच्याच निमित्तानं झालं. संपलं जीवन. संपताना, ‘अंत्यमती सो गती’. अंत्यक्षणी जो विचार असतो. कर्मबीज त्याचे फळ घेऊन पुढचा जन्म घेतं. हे असचं चालायचं!
या जगात झाडाचं पानही कारणाशिवाय उगीच हालत नाही म्हणतात. म्हणजे कोणत्याही कार्याला कारण लागते. म्हणजे कारणचं कार्य बनते व पुढे जाऊन ते कार्यच पुढच्या कार्याचा कारण ठरतं. याच कार्यकारण भावाला कर्म सिद्धांत म्हणतात. बीज फळ निर्मिती करतात व ते फळच परत बीज ठरतात, असचं हे नैसर्गिक चक्र आहे. हेच ते रहाट गाडगं आहे. हे असचं चालायचं!
आपण मग जे इथे जन्मलो, ही जी जन्मण्याची कृती झाली. याला मागील जन्मी पडलेली कर्म बीज कारण आहेत. म्हणजे आपलं इथे असलेले अस्तित्व हे कोणाच्या मेहरबानीन नसून आपल्याच मनस्वी इच्छेतून, वासनेतून, अनुकूल बीजातून आपण अवतरलो आहोत. आपलं अवतरणं हे फळ रूपानं असलं तरी, पुढच्या जन्माचं बीजही या फळात समाविष्ट आहेच.
आपण प्रथम मनात विचार आणतो, विचार-उच्चार निर्माण करतात, उच्चार-आचार निर्माण करतात, आचार म्हणजेच कृती, कृती-परिणाम घडवतात, परिणाम संवेदना निर्माण करताहेत आणि संवेदना तरी स्थिर पकडीत येतात कुठे? तेंव्हा काय करू या बरं! हाच अनित्य बोध... हेच ते स्वप्न, हाच तो माया बाजार.
आता इथे ज्या आसनात तुम्ही आम्ही बसलोय. हे आसन या क्षणाला सुखासन म्हणूनच ठरवून बसलोय की नाही?
चला, हे आसन आता कायमचं ठेवू या की. किती वेळ या आसनात बसणार? काही क्षणातचं हे आसन दुःखात परिवर्तन होईल. पुन्हा कूस बदलावी वाटेल, बदलावी लागेल.
सत्य, सत्य दुसरं काही नाही. हो, सत्य ते हेच. संवेदना परिवर्तनशील आहेत. वस्तुमात्र गोष्टी नित्य बदलताहेत. बदलाहट हाच निसर्ग आहे. संपलं हे सत्य समजल्यावर मग कोण न्हाव्याचा उकिरडा उपसणार हो? उपसेल तितका जर केसंच हाती लागणार असतील तर त्याच्या बापजाद्याच्या व्यवसायाचे उत्खनन कशासाठी? हा एक विचार, विचार करण्यासारखा नक्कीच आहे.
व्यवहारामध्ये हातून एखादा गुन्हा घडत नाही, तोवर तो गुन्हेगार ठरत नाही व जोवर तो गुन्हेगार ठरत नाही तोवर त्याला शिक्षाही केली जात नाही.
पण निसर्ग नियमात तसे नाही. कोणत्याही वृत्तीचा आरंभ मनात प्रथम विचारानी होतोय. विचारांचा आरंभ होताच त्या संभावित कृतीचे परिणाम देहावर व्हायला लागतात. त्याचे साधक बाधक नियोजित जे परिणाम आहेत, ते देहावर संवेदनेच्या रूपानी उमटायलाही लागतात.
मन तर विचाराशिवाय कधी थंड बसलेलं नाही. सारखचं काही ना काही, हे नको, हे पाहिजे, कधी भूतकाळात तर कधी भविष्यकाळात सारखेच नको/ पाहिजे, याच्या पाटया टाकण्यात व्यस्त राहतं. चांगली किंवा वाईट गोष्ट घडण्याआधी अनेकदा विचार माध्यमानी न्यू प्रिंट आपण मनात काढतो. अगदी ध्यास घेतो. मग ती घटना हातून होते व त्याचे परिणाम सुरू होतात.
गंमत पाहा. एकाएकी एखादी गोष्ट आठवते. एखाद्या ठिकाणी वेळेत पोहोचायचं असतं. वेळ तरी अपूरा असतो. आपसुकच छातीत धस्सं... होतं. हळूच हृदयाची स्पंदने वाढतात. श्वासाला गती येते, म्हणजेच तो विचार आघात करताच हृदयावर व श्वासावर त्याच्या निनादाच्या परिणाम लहरी आल्याचं. याच त्या संवेदना. क्षणात मासा क्षणात तोळा माणसाला घडवत राहतात.
अष्टोप्रहर आपण याच प्रकारच्या चक्रात मनाला देहाला बुद्धीला गुंतवून व्यस्त ठेवून त्रस्त होतो. हेच रोगकारक आहे शिवाय दुःखासाठी हेच मूलगामी आहे. रक्तदाब यानेच वाढतो.
मन हेच सर्व भटकंतीला निमित्त आहे. मनामुळेच आपला इथवर प्रवास झालाय. त्याच्यामुळे पुढील प्रवासही होईल. या एकंदर व्यवस्थेला ओळखून मनाची वळवळ कशी शांत, स्थिर, शून्य करता येईल या करिता जी तालीम आहे, जी पूर्ण तयारी आहे. त्यालाच तप, साधना, स्वाध्याय, ध्यान इत्यादी उन्नत मनुष्य म्हणू लागला.
दिवस रात्र चोवीस तासामध्ये मी माझ्या मनाला स्थिर किती काळ ठेऊ शकतो, ते साध्य आहे. ते ध्येय आहे. मुळात तेच लक्ष्य आहे. हळूहळू हा काळ वाढविणे हाच पराक्रम आहे. हे खरे शौर्य आहे. हेच कौशल्य आहे. हाच व्यक्तित्व विकास आहे.
बाह्य व्यावहारिक जगात बँक बॅलन्सला महत्त्व जितके आहे, तितकेच अंतर जगतामध्ये मनाच्या अमनी दशेला महत्त्व आहे.
मनाला स्थिर करायचे म्हणजे नेमके काय करायचे बुवा? मनाला स्थिर करायचे म्हणजे समुद्राच्या लाटांना स्थिर करण्यापैकी नक्कीच आहे. मग त्यासाठी जंग-जंग प्रयत्न करावे लागतील का? हा असा विचार घेऊन या जगात अनेक लोकांनी प्रयत्न केला व शेवटी यशही मिळविले. कुणी मन शब्दातं रमतं म्हणून, एखाद्या शब्दाशी लोंबकळत राहून तरंगायचा प्रयत्न केला. आपण म्हणतोय बुडत्याला काडीचा आधार पण काडी तुम्हाला वाचवू शकत नाही, तर आधार देऊ शकते.
राम, राम आहे. कृष्ण, कृष्ण आहे. हरी, हरी आहे. केवळ पैलवानांचे नाम घेऊन पैलवान कसे होता यावे.
पायाला चिखल लागला तर पुन्हा पाय धुवायलाही पाणीच वापरतो. तसेच शब्दानीच शब्द बाजारात रमतो व पुन्हा एखाद्या शब्दानीच पुन्हा तरण्याचाच हा प्रयत्न करतो.
गंमत पाहा, ज्या ज्या वेळेला आपण देहाला, मनाला विसरतो, तेव्हा आनंदी होतो. म्हणजे आपला आनंद तनामनाला विसरण्याशी वर्तमानात असण्याशी निगडित आहे. हे एकदा लक्षात आलं कि पुरे आहे. ही इतकीशी शेपूट आपल्याला हत्तीवर चढायला पुरेशी आहे. कारण आनंदच सारं काही आहे. माणूस पत्त्यांनी खेळतो, एखादा सिनेमा पाहतो, एखादे वेळेस गप्पा मारतो, प्रणयक्रिडा करतो ही मंडळी सुद्धा, देहभान विसरतात तेव्हाच ते आनंदी होतात व हा आनंदच त्यांना पुन्हा-पुन्हा तीच ती कृती करणेस प्रवृत्त करतो. पण हा आनंद दुसर्याशी अर्थात पत्त्याशी, सिनेमाशी, गप्पांशी निगडित असल्याने कुठंतरी आपण आपला आनंद परावलंबी करत नाही का? जोवर त्यांचा सहयोग तोवर आनंद मिळणार की नाही? ही आनंदाची टाकी तुमची तुम्हालाच खोलता आली पाहिजे, तितके त्यात डुंबता येईल.
या संकल्पनेतून अनेक साधकांनी संशोधन केले. एकेकटे निर्जन जंगलात ते खपले. निश्चिंत होण्याकरिता चिंतन केले व मार्ग काढला.
त्यापैकी एकाने, दुसरे काही केले नाही. गप्प थंड डोळे बंद करून थंड बसून राहिले. मनाच्या उडया, मनाच्या वाकुल्या केवळ पाहायचं ठरवलं, नि पाहत राहिला अगदी साक्षी होऊन, कशाशीही त्याच्याशी संधान जोडायचे नाही असं ठरवून, गप्प अंतःचक्षूनी पाहात राहिला.
मन देखील इतकं खटयाळ आहे, तुम्ही त्याला दाद देत नाही, तुम्ही त्याला मेचत नाही असं झालं की, ते ही थंड पडून राहिलं. प्रथम प्रथम यांनी मनावर ताबा मिळवायला काय केलं? जो श्वास प्रत्येक क्षणाला आत बाहेर ट्रिपा करतोय, त्यावर लक्ष केंद्रित केलं.
अगदी स्वाभाविक श्वास, जसा चालु आहे तसाच चालू दिला. आत बाहेर होताना त्याचा जिथं म्हणून स्पर्श होतोय, ते पाहिलं आणि तिथं आपलं होश जाग ठेवलं, हळूहळू काय गंमत झाली माहीत आहे? श्वास मंद होत निघाला, नकळत होत निघाला, श्वासच मनाला रसद देत होता कि काय कोणास ठावूक? मन थंड पडलं, श्वास मंद होत निघाला. त्यातही देहभान विसरता आलं व काय गंमत आहे. आनंदाचे तरंग येऊ लागले. पहाटे तो मंद वारा उघडया खिडकीतून यावा, असा वारा आल्हाद पुरवू लागला. सतर्क मनुष्य स्वावलंबी असतो तर परावलंबी मृर्च्छित राहतो. परावलंबी अपंग असतो. स्वावलंबी सबळअसतो. स्वावलंबनाचा पाठ द्यायला अख्खा निसर्ग कसा उभा आहे? हे लक्षात घेण्यासारखे आहे.
जीवनाच्या या जगड्व्याळ मायाबाजारात, ‘स्वावलंबन’ हा, अत्यंत मौलिक अर्थ साठवून ठेवलेला एक जबरदस्त शब्द मला वाटतो. बर्याच गहन तत्त्वांचा निसर्गाच्या संकेतांचा जीवनातल्या अनुभूतींना सर्व सांध्यांवर छेदुन जाणारा शब्द म्हणजे, स्वावलंबन होय. स्वतःच्या बळावर, स्वतःच्या कर्तृत्त्वावर, विचारावरचं सार्या उतरंडया रचलेल्या स्पष्ट दिसतील. परावलंबनासारखे दुःख नाही व स्वावलंबनासारखे सुख नाही. हीच ती अनुभूती.
मस्वफवर अवलंबून राहणं, तसं याला मानणं, याला जाणणं, यातच शांती, समाधान, स्वास्थ्य मुक्ती सारं-सारं काही यातच दडलयं. पण म्हणून सुद्धा जो, थोडाही हुरळून नाही गेला. त्यालाही साक्षी भावानचं स्वीकारलं. साक्षी भावामुळे, कर्मबीज पडायची थांबली, कर्मबीज म्हणजे कॉज, कॉज म्हणजे ब्रेक होताच इफेक्ट ब्रेक झाला, शोध लागला, अनंताच्या दुःखाचं, इथचं इंगित कळालं.
या जगात तस पाहिलं तर, प्रत्येक जीव प्राण्याची, किट पतंगाची, चराचराची हालचाल, हाच मार्ग शोधण्यासाठी अविरत प्रयत्न करतोय. बिचार्याला त्याच्या प्राप्त साधनशुचितेतून ते त्याला मिळाले नाही, म्हणून केवळ तो भटकतोय. म्हणजे प्रत्येकाची प्रत्येक हालचाल चिदानंदी उपभोगण्यासाठीच आहे. पण त्याचा शोध हरवल्या ठिकाणी तो शोधत नाही, म्हणून चौर्यांशी लक्ष योनीतून भटकतो आहे बिचारा! इतकचं.
हे इतकं कळालं तेव्हा, तो मनुष्य उन्नत झाला, प्रौढ झाला, पोचला वगैरे असं आपण म्हणतो.
शिवाम्बूतून स्वास्थ्य, हाही स्वालंबन या पाठातील एक विभाग आहे. मोठ-मोठया संकटाच्या वेळी कोण कामास येतो? यावरूनच तो तुमचा की नाही हे ठरतं. कुणी कोणाचे नाहीत, सारेच झाले स्वार्थी, हे वैतागायचे स्वर म्हणता येणार नाहीत, यातही तसं तथ्य आहेच.
स्वतःची शक्ती ही सजातीय व दुसर्याची शक्ती ती विजातीय ठरते. विजातीय म्हणजेच क्लेशमूलक होय. सर्व रोग विजातीयतेतून जन्मतात असा निसर्गोपचार सांगतो. म्हणून अंतरयात्रेत रममाण झालेल्या काही भूतकालीन मुक्तिमार्गी लोकांनी शिवाम्बूला मनोभावे अंगीकारले आहे. तेंव्हा, जय शिवाम्बू!