भान हरपले, म्हणून स्वास्थ्य करपले?

समस्या?

आपण का कण्हत आहात? ... हा विव्हळण्याचा आवाज आपलाच काय? ... सर्दी, डोकेदुखी वा बारीक ताप वगैरे आहे वाटतं? कमरेत, पाठीत सणक आहे का? नाहीतर कदाचित दमा-खोकला, पोटदुखी, संधिवात, अल्सर, मधुमेह कण्हण्या-कुंथण्यात रूपांतरित होतो आहे. काय, झालंय तरी काय तुम्हाला?

काय, औषधोपचार हवा आहे?

सततच्या औषधांमुळे तुमचं शरीर इतकं दुबळं आणि परावलंबी झालं आहे. अन्‌ यावर आपण थोडे का औषधोपचार केले आहेत? नित्याची औषधं, रोजच्या आहाराचा एक हिस्सा झालेली आहेत. अख्ख्या आयुष्याची मिळकत आयुष्याबरोबरच संपवत आणली, तरी मागची व्याधी संपलेली नाहीये. बैलामागे गाडीचं चक्र लागलेलं असतं, तसं जणू तुमच्या मागे व्यथेच दुष्टचक्र लागलेलं आहे.

हे तुमचं नशीब नाही, दुर्दैव नाही, कर्मभोग नाही आणि प्रारब्धही नाही, तर केवळ तुमचं भान हरपल आहे.

तुम्ही आम्ही सर्वजण गतकालीन संस्काराचे गुलाम आहोत. बहुसंख्य जनता जे काही करते, त्याचे अनुकरणप्रेमी आहोत. केवळ याचमुळे आपल्याला भान राहिलेले नाही.

आपल्याला कल्पना आहे का, की तुमच्या रोगांपैकी ९०% रोगांची कारणं मुखामार्गे शरीरात प्रवेश करू शकली आहेत?

चालू वर्तमानकाळातील तुमच्या देहात उत्पन्न होत असलेली व्यथा, तुमचा भूतकालीन आहार-विहार हीच त्याची नांदी होय.

तुम्ही तुमच्या आवडीच्या अशा काही अन्नघटकांचं पुन:पुन्हा चर्वण केलेलं आहे; परंतु आपल्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी ते योग्य आहेत का? आपल्या शरीराला त्यांची गरज आहे का? आपलं वय, श्रम, कुवत यांना ते पूरक आहेत का? - याचा तुम्ही अजिबात विचार केलेला नाही.

तुमची ही चालू व्यथा म्हणजे पुन:पुन्हा प्रवेशिलेल्या निकृष्ट अन्नाचा परिणाम असण्याचीच मोठी शक्‍यता आहे.

तुमच्या शरीरात कोणतीही व्याधी आगंतुक टपकू शकत नाही. वारंवार तीच ती कृती आणि एकाच निकृष्ट अन्नपदार्थाचा संपर्क व्याधीला अनुकूल झालेला आहे. त्याला टाळणं हा तुमचा ‘उपाय’ आहे. त्यावाचून पर्याय शोधणं हा उपचार आहे. याकडे लक्ष केंद्रित करणं हे भानावर येणं आहे. यालाच ‘निसर्गोपचार’ म्हणण्याची परंपरा आहे. अर्थातच...

-   केवळ जिभेचा विषय लक्षात घेऊन केलेलं पाकशास्त्र निकोप नाहीये.

-   पाणी खेचवणारा आहार शास्त्रशुद्ध नाहीये.

-   जेवणानंतर ग्लानी (जडत्व) आणणारं भोजन योग्य नाहीये.

-  आहारपश्चात ढेकरा, गुळण्या, उचक्या आणवणारा अन्नपदार्थ ठीक नाहीये.

- व्यवहारात यालाच लोक श्रीमंती आहार, बादशाही भोजन म्हणून ओळखतात.

म्हणून श्रीमंत, बादशाही मंडळी डॉक्टरांकडे शहानिशा करण्याआधी आडवी होताना आढळतात.

- तिखट, खारट, तेलकट, तुपकट व गोड गरिष्ठ असे जेवण व डबाबंद बाजारी खाद्यं, चटकमटक पदार्थ अल्पायुषी बनविणारे आहेत.

अशाप्रकारच्या आहाराचा सतत संपर्क अजाणतेपणानं ठेवल्यामुळे तुम्ही व्याधिग्रस्त झालेला आहात. दोन इंचांच्या जिभेची गुलामी पत्करून सहा फुटांच्या चेतनायुक्त ज्योतीला भडकवत आहात, तडफडवत आहात.

जरा विचार करा...

१. भोजन भूक नसताना करीत आहात?

२. घास केवळ त्वरेनं गिळत आहात?

३. अशुद्धतेतून बनविल्या गेलेल्या सामूहिक आहारव्यवस्थेत तुमची वर्णी

लागली आहे?

४. अशुद्ध पाणी दुसरा पर्याय नाही, म्हणून प्राशन करीत आहात?

५. प्रदूषित हवेत राहात आहात?

यापैकी काहीही वारंवार घडल्यास प्रथम पोटाची कुरबुर सुरू होते व नंतर अन्य पीडा ठायी ठायी जाणवू लागतात.

आपल्या शरीरातील कोणत्याही व्याधीच्या उगमाकरता, ना तुम्ही औषध खाल्ले होते न विष.

आपलं चुकीचं पाकविज्ञान आणि त्याचं अयोग्य अनुपान आपल्यातल्या भिन्नभिन्न व्याधी वाढवीत आहेत, हे केवळ तुम्ही मान्य करून चालणार नाही, तर हे जाणलं पाहिजे.

ज्या अन्नातून प्रसन्नता लाभते, स्फूर्ती येते, जेवणानंतर पोटाच्या आकारमानात तणाव जाणवत नाही, भोजनाबरोबर किंवा नंतर पाणी पिण्याची तीव्र इच्छा राहत नाही, ते अन्न किंवा तो आहार खुशाल योग्य समजावा.

मानवी आहारशास्त्रज्ञांनी योग्य 'अमृत आहार' म्हणून अपक्व आहार व फळं, ज्याला आपण, ‘जंगली किंवा माकड-आहार’ म्हणू, तसा एकमेव संतुलित आहार घोषित केलेला आहे. हा आहार कायमचा अंगिकारला तर माणूस पीडामुक्त राहू शकतो.

सुष्टीरीवाजानुसार...

जे पेराल, तेच उगवेल,

जे जसं खाल, ते तसं रंगरूप घेईल,

जसं भराल, तसं पोषण होईल.

माणसाची श्रीमंती व बौद्धिकता याचा निकष, त्याच्या प्रसन्नचित्त व्याक्तीमात्वावरून मोजायला हवा.

तुमच्याजवळ किती प्रकारच्या मोटारी आहेत? किती प्रकारचे चश्मे आहेत? किती प्रकारच्या कवळ्या तुम्ही वापरता? कोट किती प्रकारचे आहेत? किंवा तुमच्या पोटाचं आकारमान किती वाढलं आहे? महालात किती सोई आहेत? फॅमिली डॉक्टर्स, नर्सेस किती आहेत किंवा नाहीत? औषधांचा ढीग किती आहे?

- यावर तुमची प्रचलित श्रीमंती मोजली जाते.

हा निकष योग्य आहे का?

अहो, हे तर शुद्ध दुबळेपणाचं प्रदर्शन आहे.

माणसाचं मोठेपण यात आहे?

हिरवळीत सरपटणाऱ्या प्राण्यावर हिरव्या रंगाची झाक आलेली दिसते. त्याचप्रमाणे तुमच्या सततच्या आहारविहाराचे पडसाद तुमच्या स्वास्थ्यावर उमटतात.

शक्यता आहे की...

दळलेलं धान्य तुम्हाला दळेल,

शिजविलेलं अन्न तुम्हाला शिजवेल,

तळलेले पदार्थ तुम्हाला तळतील,

भाजकी धान्यं तुम्हाला भाजतील,

हे तुम्हाला माहित आहे काय?...

फुगवलेले लठ्ठ पदार्थ, तुम्हाला लठ्ठ फुगवून टाकतील,

धान्याच्या पोटातील मैदा तुमचे पोट वाढवेल,

दळून, तळून, शिजवून नि:सत्त्व, निर्जीव झालेलं अल्पायुषी अन्न आपल्यालाही अल्पायुषी, निस्तेज करील.

परंतु

अपक्व व अंकुरित जिवंत अन्न तुम्हालाही जिवंत ठेवेल.

धान्याचा कोंडा तुम्हाला मजबूत ठेवेल.

तात्पर्य... पक्व अन्न आपल्याला लवकर पक्व (वृद्ध) बनवतं, तर अपक्व अन्न आपल्याप्रमाणे चिरकालीन तरुण ठेवण्याचा प्रयत्न करतं.

म्हणून माकड म्हातारं झालं तरी सतत अचूक उड्या घेऊ शकतं.

डार्विनच्या तर्कानुसार, 'मानवप्राणी उत्क्रांत होताना त्यानं प्रदीर्घ काळात निष्क्रिय राहिलेलं शेपूट शेवटी नामशेष झालं.' अपक्व आहाराचं महत्त्व प्रदीर्घ काळात समजून घेतलं गेलं नाही, तर त्याचा दात हा महत्त्वाचा अवयव निष्क्रिय होऊन नामशेष होईल.

तेंव्हा तुम्ही आता काहीही सांगू नका. तुम्ही कण्हता आहात, म्हणजे कुठंतरी चुकला आहात. तेंव्हा तुमची आवड तुम्हाला बदललीच पाहिजे. खुराक थांबवला पाहिजे. (मळलेल्या टॉवेलनं स्वच्छ अंग पुसण्यात काय प्रयोजन?)

तुमच्या देहाला श्रम नसतील, तर रोज दहा सूर्यनमस्कार तरी घातले पाहिजेत.

पहाटे सूर्योदयापूर्वी अनवाणी भ्रमंती केली पाहिजे.

तुमच्या धडाला जोडलेले हात आणि पाय श्रमासाठी आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे.

अनोशेपोटी उष:पान म्हणून लिंबू-पाणी यथाशक्य प्यायलं पाहिजे. लिंबू तुमचं शरीर स्वच्छ करतं.

भुकेच्या वेळीसुद्धा थोडी भूक शिल्लक ठेवून अपक्व आहार आणि फळं खाल्ली पाहिजेत. पोटात पोकळी राहिली, तरच जठराग्नी चांगला फुलेल.

प्रसन्न स्वास्थ्याकरता दारू, मटण, अंडी, मासे, तंबाखू व चहा हे पदार्थ सोडले पाहिजेत. हे भिजकं, ओलं सरपण तुमच्या देहात राख आणि धूर निर्माण करील.

यामुळे कदाचित तुमचा जुना दोस्त म्हणजे तुमची जीभ तुमच्याशी असहकारच

करेल. काही दिवस तुम्हालासुद्धा हे बंधन वाटेल. पण नंतर ते अंगी रुळेल. यानं

तुम्ही दीर्घायुषी, स्वावलंबी व आनंदी व्हाल.

पाच महातत्त्वांवर अवलंबून असलेल्या आपल्या रथाला पंचकर्मचिकित्सेचे पाच उमदे घोडे जुंपा. मग प्रसन्नचित्त स्वास्थ्य आपलंच आहे. निसर्गप्रेमी माणसाला ना स्पर्धा करायची आहे, ना दिखाऊपणा आणायचा आहे.

केवळ प्रसन्नचित्त व्यक्तिमत्व, लवचिक, चिवट देहपिंड यांसह दीर्घायुरारोग्य लाभलं की, संपलं!

शेवट संपण्यात आहे.

संपणं हा निसर्गाचा स्थायी स्वभाव नाही, तर त्याचे अंतिम चरण म्हणजे रूपांतरण आहे.

'मृत्यू' म्हणजे उगवण्याची पहिली पायरी जाणल्यास अटळ अशा मृत्यूबाबत

निर्भय राहता येईल. हाच समजूतदारपणा शेवटचे दिवस गोड करील.

Previous Post Next Post